‘मराठी कळफलकाचे समानीकरण होणे’ - एक नड

'नड' म्हणजे एका अंगाने ‘गरज’ व दुसर्‍या अंगाने ‘अडचण’. नड आडवी येण्याने प्रत्यक्श परीणाम ‘विकसनावर’ होत असतो.

काळाच्या उत्तरोत्तर प्रगतीनुसार लिखाणाला व ते पद्धतशीरपणे मांडण्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आलेलं आहे. परंतु मराठी भाशकांसाठी ‘लिहीता येणं’ याचा अर्थ - ‘शुद्धलेखनाचे नियम’ किंवा ‘साहित्य’ या संबंधित विशय एवढाच असतो. आणि म्हणूनच 'लिहिणं' म्हणजे फक्त कागदावर वा दृश्य पटलावर वर्ण उमटविणं नाही, स्वतःच काहीतरी दर्जेदार, जे इतरांच्या देखील उपयोगी पडेल असं काहीतरी लिहिणं असा देखिल आहे हे समजून घेण्याची आता गरज आहे. या लेखाचा विशय केवळ मराठी भाशेपूरता मर्यादित ठेवत असल्यामुळे सध्याच्या काळात सामान्यांकडून उपलब्धीत लिख-साधनांच्या मदतीने मराठीतून लिहीण्याच्या नडी काय-काय आहेत? कुठे-कुठे आहेत?, ह्यावरच प्रकाशझोत ठेवत समस्यांचे अनेक पैलू थोडक्यात मांडलेले आहेत.

पैलू पहिला- 'शब्द हेचि ब्रह्म!'
जे 'अर्थपूर्ण ध्वनी' आपण संभाशण करताना उच्चारत असतो, ते एका अंगाने (दृश्य बाजू) आपले तात्पूरते काम करता करता, हवेत विरून (इ.: इवॅपोरेट, डिसॉल्व) जातात. पण ठराविक बाबतीत, काहि उच्चारलेले 'अर्थपूर्ण ध्वनी' दुसर्‍या अंगाने कार्यप्रवण होवून आपल्या वास्तवातल्या आयुश्यात त्याचे परीणाम दाखवत, कधी ते 'खरे ठरतात' तर कधी 'ते आपल्यावरच 'बुमरँग' सारखे उलटत आपली परीक्शा घेतात.' हे होतं शब्दांच्या 'अदृश्य दुनियेबद्दल'!

भाशेची अदृश्य बाजू समजून घेण्यासाठी अगोदर तीची दृश्य बाजू व्यवस्थित समजून घेता यायला हवी. भाशेचा संबंध जसा प्रत्यक्श समाजाशी असतो तसाच तो त्याच समाजाला उपयोगी पडणार्‍या समाजशास्त्र, तंत्र-विद्न्यान या शास्त्रांशी देखिल असतो. आपण याच मर्यादेत राहून भाशेची अदृश्य बाजू ओळखण्यासाठी तीची दृश्य बाजू समजून घेवूया.

अर्थपूर्ण-ध्वनी ठरविलेल्या-संकेत-पद्धतीने लिहिले गेले कि ते शब्दांच्या 'दृश्य जगात' येतात. असे होण्याने त्यांना स्वतः चे बळ प्राप्त होते. या अशा लिखीत-शब्दांच्या बळावरच हे जग उभे आहे, अनेक व्यवहार चालत आहेत. ‘ते कसे?’, हे मोजक्या उदाहरणांमधून पाहुया.
आपल्या सद्य समाजात उच्चारीत-शब्दांपेक्शा लिखीत-शब्दांना स्वत:चा मान मोठा असतो, मग ते लिखीत-शब्द =

- ‘जन्म- मृत्यूचा दाखल्यावरचे’, ‘लग्नाच्या नोंदणीबाबत’ असोत,
- ‘शालेय परीक्शा उत्तीर्ण प्रमाणपत्रावरचे’ असोत,
- ‘उच्च शिक्शण प्राप्त केलेल्या प्रमाणपत्रावरचे’ असोत,
- ‘नोकरीत रुजू करून घेतल्याचे’, ‘व्यवसाय करता येण्याचे परवानगीपत्र’ असोत,
- ‘कर भरल्याचा पुरावा दाखवणारे’ कागदपत्र असोत,
- ‘सरकारचे कायदे, धर्माचे लग्नासंबंधीतचे कायदे’ असोत,
- 'विविध देशांचे आप-आपसातील करारनामे’ असोत,
- ‘बहुतेक सर्व देशांमधील राजकिय व्यवहारांमध्ये सुसुत्रता ठेवणार्‍या एखाद्या विश्वसंघटनेचे नियम’ असोत.

इतर अनेक गोश्टीमध्ये त्यांचे अस्तित्व असते. या लिखीत-शब्दांचे ज्याचे आपल्या आयुश्यावर परीणाम होत असतात, होत आले आहेत.

पैलू दुसरा - 'लिपी म्हणजे काय?'
लिपी म्हणजे काय?, लिपीचे नियम कोणते? हे शाळेत शिकवले जात नाही, नव्हते. आज आपल्याच लिपीबाबतची निरक्शरता सुशिक्शितांमध्ये सुद्धा आहे. काही सुशिक्शितांकडून तर ‘शुद्धलेखनाचे नियम हेच लिपीचे नियम’ असा समज करून घेतले जातो. व्यंजनाचा म्हणजेच क्शराचा उच्चार कसा करायचा? हे अनेकांना कळत नाही. ‘तद्न्य’ ह्या शब्दातील ‘द’ चा उच्चार अनेक जण पूर्ण द असाच उच्चारतात. पण जर त

लिपी म्हणजे ‘लिहीण्याची पद्धती’. सध्या आपली मराठी भाशा ज्या लिहीण्याच्या पद्धतीतून साकारली जाते, त्या लिपीला ‘देवनागरी’ म्हटले जाते. देवनागरी ही लिपी संस्कृत, हिंदी, मराठी, काश्मीरी, सिंधी या भारतीय भाशांमधून लिहीण्यासाठी वापरली जाते.

लिपीचा इतिहास:
लिपी व भाश्यांचा आभ्यास करण्यासाठी तो आभ्यास कागदावर पद्धतशीरपणे मांडावा लागतो. याच साठी पाश्चिमात्य विद्वानांनी लिपींच्या, लिहीण्याच्या पद्धतींच्या अनेक वर्गवार्‍या केल्या आहेत. या वर्गवारींपैकी ‘अबुगिदा’ ह्या वर्गात ‘देवनागरी’ लिपीला स्थान देण्यात आलेले आहे.

‘अबुगिदा’ हे नाव ग्रीक भाशेच्या वर्णमाले मधील (alphabet’s) पहिल्या चार अक्शरांना – अल्फा, बीटा, गॅमा, दिटा यांच्या क्रमानुसार एकत्र आणून तयार झालेले आहे. इंग्रजी भाशेच्या वर्णमालेला ‘अल्फाबेटस्’ हे नाव अल्फा, बीटा या दोन अक्शरांपासून तयार झालेले आहे. अबुगिदा ह्या वर्गातील लिपींमध्ये विविध स्वराचा उच्चार दर्शविण्यासाठी मुख्य क्शरचिन्हाभोवती स्वरचिन्ह चितारलेले असते. अशा लिपींमध्ये, क्शराच्या उच्चारामागून येणार्‍या स्वराचा उच्चार येतो तिथे, ‘क्शरचिन्ह’ (व्यंजन चिन्ह) हे स्वरचिन्हांसोबत लिहीले जाते. जेंव्हा लिहीताना क्शरचिन्हाच्या मागून स्वरचिन्ह येणार नसेल तर तेंव्हा तिथे असणार्‍या स्वरचिन्हाच्या अभावाचा स्पश्टपणे उल्लेख (‘पाय मोडण्याचे चिन्ह’) चिन्ह दाखवून केला जातो. उदा.: ‘तद्न्य’ मधील ‘द्’ ह्या क्शरचिन्हाचा मागून स्वरचिन्ह न येता तो ‘न्य’ ह्या जोडाक्शराचाच भाग आहे, तिथे ‘पाय मोडणारे’ ( ‘पाय मोडणे’ असे लिहीणं काहीसं हिंसक वाटते, पण नाईलाज आहे.) चिन्ह दाखवलेले आहे. गंमत म्हणजे, जगातील अर्ध्या अधिक लिपी ह्या अबुगिदा ह्या वर्गात येतात.

भारतीय लिपींचा मुळ आधार:
पाश्चिमात्य विद्वानांच्या आभ्यासानुसार, ‘इंडो-आर्यन’ या भाशांच्या शाखेतील ‘ब्राह्मी लिपी’ इ.स.पूर्व 5 व्या शतकात अस्तित्वात होती. ती (ब्राह्मी लिपी) पूर्वेकडील देशांमधील ‘अरमाइक’ लिपीतून उद्भवली असावी, असा त्यांचा कयास आहे.

लिपीचा गाभा – ‘वर्ण संकल्पना’:
प्रकट केलेल्या विचारांना चिंन्हांच्या रूपात धरून ठेवण्याच काम ‘वर्ण’ करतात. ‘वर्ण’ (इ.: कॅरेक्टर) हा भाशेचा अतिसुक्शम घटक असतो. सोप्या शब्दात म्हणायचं तर, वर्ण म्हणजे भाशेतील ‘भुईमुगाच्या शेंगा’. भुईशेंगेच्या आत जसा दाणा असतो, तसा वर्णाच्या आत विचारांचा, भावनांचा अर्थ दडलेला असतो. जसे शेंगा फोडून दाणा खायचा असतो, त्याची टरफले चाटायची नसतात, अगदी तसेच वर्णा आतील अर्थ समजून घ्यायचा असतो, लकीर-का-फकीर होवून वर्णांनाच अर्थरूप समजायचे नसते.

वर्णांचे दोन भाग असतात.
एक असतो, ‘दृश्य भाग’ - जो त्या विशिश्ठ वर्णाची ओळख आपणहून दाखवतो.
दुसरा असतो, ‘अदृश्य भाग’ - जो त्या वर्णाची ओळख ओळखून घेण्यासाठीचा असतो.

लिपीतील ‘दृश्य तत्व’ हे एखाद्या लिपीचा ‘आकृतीबंध’ (इ.: विसेबल ऍंड डिफानेबल एलिमेंट) असतो. एखाद्या अदृश्य संकल्पनेच, पहाता येण्याजोगं रूप हे ह्या तत्वाचे गुणविशेश. या गुणावरूनच लिपीतील ह्या भागाला ‘आकृती’ म्हणता येईल. या भागात आपल्या डोळ्यांना दिसणार्‍या आकृती येतात, त्यांना ‘वर्ण आकृती’ म्हणूया.

वर्ण आकृतींचे प्रकार खालील प्रमाणे असतात -
1. क्शर चिन्हं (व्यंजन चिन्ह)
2. स्वर चिन्हं
3. व्याकरणी चिन्हं
4. तर्क चिन्हं
5. अवांतर चिन्हं
लिपीतील अदृश्य तत्व हे एखाद्या लिपीची ‘माया’(इ.: इन्विसिबल बट नोटिसेबल बिहेविअरल एलिमेंट) आहे. लिपीतील अदृश्य तत्व हे त्या लिपीतील चिन्हांचे –‘स्वत:चे गुण व त्या चिन्हाचे इतर चिन्हांसोबत मांडणीमधील नियम असतात. अदृश्य तत्वाच्या ह्या गुणविशेशावरून लिपीच्या ह्या भागाला ‘प्रकृति’ (इ.: बेसिक इंस्टिंक्ट) म्हणूया.

वर्ण संकल्पनांचे प्रकार खालील प्रमाणे असतात -
1. क्शर चिन्हं (व्यंजन चिन्ह) - संकल्पना व व्याख्या
2. स्वर चिन्हं - संकल्पना व व्याख्या
3. व्याकरणी चिन्हं - संकल्पना व व्याख्या
4. तर्क चिन्हं -संकल्पना व व्याख्या
5. अवांतर चिन्हं -संकल्पना व व्याख्या
हे सगळे सांगण्यामागचा उद्देश: देवनागरी तसेच इतर भारतीय लिपींमध्ये त्यांच्या ‘प्रकृती भागातील नियम’ हे ब्राह्मी लिपीतून अनुवांशिकतेने आलेले आहेत. आणि म्हणूनच ‘ब्राह्मी लिपी’ हि भारतातील अनेक लिपींचे मुळ स्त्रोत आहे, असे आभ्यासक मानतात. भारतातील विविध लिपींमध्ये वर उल्लेखलेल्या ‘आकृती भागात’ विविधता आहे, वेगळेपण आलेले आहे. काळाच्या ओघात लिपीतील ‘आकृती भागात’ जरी लक्शणीय बदल झालेले असले तरी, ब्राह्मी लिपीपासून जे गुण ‘प्रकृती भागात’ रुजलेले आहेत ते अजूनही बर्‍याच अंशी स्थिर आहेत, एकसमान आहेत.

भिन्न-भिन्न फाँट हे त्या लिपीच्या आकृतीबंधाची वेशभुशा असते.

पैलू तिसरा - 'क्रियेतून प्रतिक्रिया’, ‘प्रतिक्रियेतून नवी-क्रिया व नवी-उपप्रतिक्रिया’ व त्या सगळ्यांचीं ‘एकंदरीत साखळी '

कोणतीही क्रिया झाली वा केली गेली की त्यातून वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रतिक्रिया उद्भवतात. लिहीण्याची क्रिया ही सामान्यपणे हातानेच होते, होत आलेली आहे. बरं! एका हाताने मनातले विचार धडाधड लिहून-लिहून लिहिणार तरी किती?
पाश्च्यात्यांनी 'टंकलेखन यंत्र' व त्या पाठोपाठ काही काळानंतर संगणकाद्वारे 'लिखाण' करण्याचा शोध लावला. आणि त्या लगोलग पाश्च्यात्यांनी त्यांच्या मनातले विचार नव्हे, वैचारीक उर्जा शिस्तबद्ध पद्धतीने दोन हातांनी धडा-धडा प्रवाहीत करण्याचा सपाटा लावला व तसे करीत त्यांनी 'जे लिहिलं ते वास्तवात आणले'. व तसे करून वैचारीक प्रगतीमध्ये उर्वरीत जगाला मागे देखिल टाकले. या बाबतीत रोमन लिपी देखिल या यंत्रांना चांगलीच सोयीची ठरली. पण मराठी माणसांचं घोडं अडतं ते लिहिण्यावरच. आपल्यापैकी बरेचजण आजही आपल्याच भाशेतून, आपल्याच लिपीतून लिहायचं म्हटलं तरी अडखळताहेत. आणि तसे करून आपण आपले विचार वास्तवात आणण्यात तितके सर्मर्थ ठरत नाही आहोत. असं का होतयं?

टंकन कलेचे शास्त्र:
लिपीमध्ये 'चिन्ह कशी लिहावीत?' हे जसे लिपीतद्न्यांकडून ठरवले गेलेले आहे. अगदी तसेच ती चिंन्हे कळफलकाच्या माध्यमातून कशी टंकली जावीत ह्याचे देखील मार्गदर्शन तसा विशय विकसित होवून, त्या विशयातील तद्न्यांकडून व्ह्यायला हवे, असे आपल्याला वाटत का नाही? कारण तसे होण्याने कळफलकाच्या स्वरूपात समानता येवून त्यामुळे त्या भाशी समाजात तंत्राविशयी जाण, समज व वापर एकसारखाच होवू शकेल. जे समाजाच्या एकसंध वैचारीक वाढीला व भाशेच्या सार्वजनिक उपयुक्ततेला पूरक होऊ शकेल.

पैलू चौथा – देवनागरी कळफलकाचा इतिहास

पहिला देवनागरी कळफलक हा सन 1930 साली रेमिंग्टन कंपनीकडून बनवण्यात आला होता. जर्मनीत रेमिंग्टन कंपनीसाठी ह्या टायपरायटरची व त्याच्या कळफलकाची संरचना 'व्ही. एम. अत्रे' या मराठी माणसाकडून घडविली गेली होती. (बहुधा अत्र्यां कडूनच) त्या यंत्राला 'नागरी लेखनयंत्र' असे नाव देण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्रपाप्ती काळानंतर, 1964 रोजी भारत सरकारच्या 'अधिकृत भाशा विभागा' (डिपार्टमेंट ऑफ ऑफिशिअल लॅंग्वेज) कडून देवनागरी लिपीकरीता कळफलकाच्या स्वरूपाच्या एका संरचनेला स्विकृती देण्यात आली होती. 1969 साली याच संरचनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या. 1968 साली ऑप्टिमा या एका जर्मन कंपनीशी सहयोग तत्वावर आधारीत (कोलॅबरेशन म्हणायचं आहे) 'गोदरेज' या भारतीय कंपनीने ‘देवनागरी टंकलेखन-यंत्र’ विकसित केले होते. या टंकलेखन यंत्राच्या 'कळफलकाच्या स्वरूपाची' व 'त्यात वापरण्यात येणार्‍या 'टंक-रूपाची' (इ.: टायप फेस) संरचना लिपीतद्न्य एल. एस. वाकनकर यांच्याकडून बनवून घेण्यात आली होती.

येथून एक गंमत घडली. टंकलेखन यंत्रा पूर्वी साक्शरांच्या मेंदूत केवळ 'प्रत्येक वर्णाचे' रूप लक्शात ठेवले जाई. टंकलेखन यंत्र निर्मिती झाल्यानंतर व त्या यंत्राच्या वापरानंतर, केवळ लिखाणा दरम्यानचा विचार करताना, लेखकांच्या नव्हे, टंकलेखकांच्या डोक्यात 'अक्शर' ह्या संकल्पनेतील 'क्शर' व 'स्वर'; चिंन्हांच्या रूपात स्वतंत्र रूप घेवू लागले. हि 'मुळाक्शरांची स्वतंत्र रूपे टंकलेखन यंत्र वापरणार्‍या व्यक्तीच्या मेंदूत वेगवेगळी लक्शात ठेवण्यात येवू लागली.
उदा.:-
‘मला कसे बरे लिहायचे आहे.’ हे वाक्य लिहण्यासाठी टंकलेखन यंत्राच्या शोधापूर्वी लिहीणारा लिहीताना लक्शात घ्यायचा:- ‘म-ला—क-से—ब-रे—लि-हा-य-चे—आ-हे-.’
टंकलेखन यंत्राचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करणार्‍याच्या डोक्यात वरील गोश्ट वेगळ्या पद्धतीने लक्शात घेण्यात येवू लागली.-

व आता संगणकात युनिकोड डाटा एनकोडींग आल्यानंतर, इंस्क्रीप्ट चा अंमल सुरू झाल्यानंतर, मराठीतून टंकन करताना लेखकाला अक्शर संकल्पना लक्शात घेवून खालील प्रमाणे टंकावे लागते. अक्शर संकल्पनेनुसार टंकणे योग्य आहे, परंतु जे उमटते ते ‘अक्शर संकल्पनेनुसार’ उमटत नाही. ते जे उमटते ते असते प्रचलित लिखाणाच्या पद्धतीनुसार...

अक्शर संकल्पनेतील तर्कसूत्र -
अक्शर = (क्शर)+ (स्वर)
परंतु लिहीण्याची पद्धती, जी परंपरेनुसार लिहीण्याला प्रमाण मानत होती/ आहे. तीचे तर्कसूत्र - वेगवेगळ्या पद्धती =
1) अक्शर = (स्वरचिन्ह) + (क्शरचिन्ह) उदा.= पि
2) अक्शर = (क्शरचिन्ह) + (स्वरचिन्ह) उदा.= मी, 3) अक्शर = (क्शरचिन्ह) + (क्शरचिन्ह) + (स्वरचिन्ह) उदा.= क्ट, ट्क 4) अक्शर = (स्वरचिन्ह) + (क्शरचिन्ह) + (क्शरचिन्ह) उदा.= ट्वि , ट्वु,
‘अक्शर’ संकल्पनेशी ‘पारंपारीक लिहीण्याच्या पद्धती’ मिळतीजुळती नसल्यामुळे लिहीणं आणि त्यापुढे टंकणं हे काम खुप त्रासदायक व गैरसोयीचे ठरले आहे. ‘सोयीपेक्शा परंपरा महत्वाची!’, हा विचार प्रत्येकवेळी वरचढ होत आला आहे.

टंकलेखन यंत्रावर 'मनातल्या मनात 'वर्ण दृश्य' आठवून टंकन करीत वर्णांची 'चित्रे' कागदावर उमटवणे, हे काम टंकलेखकाचे असे. टंकनाची ही पद्धत रोमन लिपीचे टंकन करण्याच्या अगदी विपरीत होती. टंकनाच्या या शैलीत 'ज्या कारणासाठी यंत्र वापरायचे तो हेतू' सामावलेला नव्हता. परंपरेनुसार लिहीण्याच्या पद्धती व त्यामुळे येणार्‍या वर्णांच्या किचकटपणामुळे -'टंकनासाठीची बटणे पटावर कुठे-कुठे आहेत?' हे सरावाने माहित झालेल्या तसेच 'लिपीतील व्याकरणी सूत्र'* समजलेल्या व्यक्तीला केवळ कोणते वर्ण उमटवायचे आहेत हि कल्पना करीत तेवढेच टंकावे लागे. हे असे ध्यानात घेवून टंकणे खरीच कठिण बाब होती. बरं एवढे उपद्-व्याप करून जे कागदावर उमटले जायचे ते दिसण्याच्या बाबतीत अगदीच गचाळ असायचे. व आता संगणकात, मोबाईलवर देखिल तीच गिचमिड दाखवणारे वर्ण दिसत आहेत. विनोदाने, दाक्शिणात्य लिपींना ‘जिलबी’ म्हणतात, पण आज मोबाईलवर, देवनागरी लिपी ‘कोंबडीच्या पायांच्या ठश्या’ सारखीच दिसते. उदा.:- ट्रू, क्रु, श्रू.


पैलू पाचवा – देवनागरी कळफलकाचा विकास, अडचणी व त्रूटी

1981 च्या दरम्यान भारतीय सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स खात्याने एक समिती नियुक्त केली होती. या समिती समोर – ‘भारतीय भाशांमध्ये वापरात येणार्‍या व संगणकासाठी वापरात येवू शकणार्‍या वर्णांच्या संगणकी-कोडचे प्रमाणीकरण करणे, त्या संनिध (जोडून) हे संगणकी-कोड ‘अमेरीकी ऍस्की कोडवर’ बेतलेले असावेत.’ असे उद्धीश्ठ ठेवण्यात आले होते.

1982 ते 1991 ह्या कालावधीत ‘भारतातील भाशांसाठीचे संगणकी-कोड - इस्की’चे, काम पूर्ण झाले. या कामाचा हेतू भारतीय भाशांचे ‘युनिफॉर्म कोडींग’ करून त्यायोगे भाशेच्या संगणकीकरणाचे 'राश्ट्रीयीकरण' करणे हा होता. त्याकरता, ‘एखाद्या व्यक्तीला भारतातील एकापेक्शा जास्त भाशा येतात, ती व्यक्ती कोणत्याही भारतीय भाशेत संगणकावर टंकू शकते.’ हा विचार मुलाधार होता. त्यामुळेच हाच विचार सर्व भाशांच्या कळफलकाच्या स्वरूपाबाबत एकरूपता आणून रेटण्यात आला. परंतु तो विचार ‘कितपत वापरात येवू शकतो?’ याचा विचार केला गेला नव्हता. तसेच मुळ विचारांचा आवाका राश्ट्रीय पातळीवरचा आणि केवळ तेवढाच असल्यामुळे तेथुनच 'वैश्विकीकरण' आणि 'स्थानिकीकरण' या दोनही बाबींकडे' दुर्लक्श होत गेले. कळफलकाच्या स्वरूपाची संरचना देखील ‘एका बाजूला स्वरचिन्हे व दुसर्‍या बाजूला क्शरचिन्हे’ असा केला. असे करताना आधि ज्या मंडळींनी देवनागरी टंकलेखन यंत्राचा विकास करून कळफलकाचे स्वरूप साकारले होते त्यांच्या कामाकडे, आभ्यासाकडे दुर्लक्श करण्यात आले. केवळ ‘स्वर व क्शर’ या संकल्पनेच्या दृश्टीने कळफलकाचे रूप ठरवण्यात आले.
इस्कीच्या कळफलकाचे स्वरूप :-

इस्कीच्या आधिच्या कळफलकाचे स्वरुप, जे टंकलेखन यंत्रासाठी वापरात येत होते, ते महाराश्ट्र सरकारकडून अप्रत्यक्शरित्या प्रमाणित केले गेलेले होते. पूर्वी ‘टंकलेखन यंत्र’ शिकलेल्यांना परीक्शा घेवून महाराश्ट्र सरकार कडून प्रमाणपत्र दिले जात असे. अजूनही टंकलेखनाच्या परीक्शा घेतल्या जातात, प्रमाणपत्रे दिली जातात.
हि बहुतांशी टंकलेखन यंत्रे ‘गोदरेज’ कंपनीद्वारे विकसित केली गेली होती. त्या कळफलकाचे स्वरूप :-

परिक्शा उत्तीर्ण होवून ‘प्रमाणपत्र’ देणे, हे राज्यसरकारकडून कळफलकाचे स्वरूप अप्रत्यक्शपणे स्विकारण्या सारखेच होते. त्याकाळी ज्यांनी-ज्यांनी मनगट मोडे मोडेपर्यंत प्रशिक्शण घेतले होते, त्यांच्या कश्टाला आता मोल उरलेले नाहीच सोबत जे प्रमाणपत्र महाराश्ट्र सरकारकडून मिळाले होते ते देखिल आज बिनकामी ठरत आहे. कारण महाराश्ट्र सरकारचेच ह्या विशयी धोरण स्पश्ट नाही.

पैलू सहावा – देवनागरी कळफलकाचा विकास, अडचणी व त्रूटी

युनिकोड इस्कीवर बेतलेली आहे. युनिकोड ही संकल्पना भाशांच्या लेखी स्वरुपाचे वैश्विकीकरण करण्यासाठी योजलेली होती.
इस्की ज्या लिपीच्या संकल्पनेवर बेतलेली आहे त्या देवनागरी लिपीच्या संकल्पनेतच काही नडी आहेत. त्यामुळे इस्कीमध्ये ज्या गोश्टी राश्ट्रीयकरण करण्याच्या उद्देशाने आखल्या होत्या त्या व भारतीय लिपींमधे असलेल्या नडी या दोनही गोश्टी युनिकोड तंत्रामध्ये अनुवांशिकतेसारख्या झिरपल्या गेलेल्या आहेत. व त्याचेच आज अनेक दोशात रुपांतर झालेले आहे.
इंस्क्रीप्ट ज्या एका सिद्धांतावर उभे आहे, तो सिद्धांत – ‘अबुगिदा ह्या वर्गातील, भारतीय भाशांमध्ये लिपींमध्ये विविध स्वराचा उच्चार दर्शविण्यासाठी मुख्य क्शरचिन्हाभोवती स्वरचिन्ह चितारलेले असते. अशा लिपींमध्ये, क्शराच्या उच्चारामागून येणार्‍या स्वराचा उच्चार येतो तिथे, ‘क्शरचिन्ह’ (व्यंजन चिन्ह) हे स्वरचिन्हांसोबत लिहीले जाते. जेंव्हा लिहीताना क्शरचिन्हाच्या मागून स्वरचिन्ह येणार नसेल तर तेंव्हा तिथे असणार्‍या स्वरचिन्हाच्या अभावाचा स्पश्टपणे उल्लेख (‘पाय मोडण्याचे चिन्ह’) चिन्ह दाखवून केला जातो.’
ह्या सिद्धांतामुळेच वर्णाची दृश्य किचकटता निर्माण होत आहे. अशा किचकटपणामुळे मराठी भाशेचा जिथे संगणकाचा सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी वापर गरजेचा आहे तिथे इस्की व त्यायोगे युनिकोड तंत्र बिनकामाचे आहे. उदा.: डाटा सॉर्टींग, स्पेलचेक इत्यादी संगणकीय सुविधां ज्या सार्वजनिक स्तरावर उपयोगाच्या आहेत.
अखेरीस काही (डेड एंड) अनुत्तरीत रहाणारे प्रश्न:

- उद्याचा जमाना 'ग्लोबल-लोकलायजेशन' चा असेल तिथे हे इस्कीवर आधारलेले युनिकोड तंत्रद्न्यान मराठी भाशेला उपयोगाचे होवू शकेल का?
- ‘ज्या भारतीयाला एकापेक्शा जास्त भाशा येतात, ती व्यक्ती इंस्क्रीप्ट कलफलकाचा वापर करू शकते’, हा इंस्क्रीप्ट मागचा मुळ-विचार कितपत उपयोगितापूरक आहे?
- देवनागरी लिपीमधील ‘बाळबोध पद्धतीमध्ये’ असणार्‍या अनेक उणिवा आजच्या काळातील प्रगत लिख-साधनांच्या वापरांमध्ये गैरसोयीचे होत आहेत. त्या दूर कधी होतील?

Comments

लेख चांगला आहे

मी आपला लेख वाचला. पहिल्या वाचनात फारसा कळला नाही (कारण मला बरेचसे नवे होते त्यात) पण मी मराठी टंकलेखन शिकलो व आता सरावा मुळे वेग वाढला आहे. माणूस सरावाने ब-याच गोष्टी आत्मसात करू शकतो. आमच्या एविएशन फिल्ड मध्ये आम्ही मॅन मशीन इंटरफेस म्हणतो. विमानातले (फायटर व विपनाईस्ड) कळ फलक त्याच शास्त्रावर आधारित असतात. त्यामुळे आपला अभ्यास व लिहिलेला लेख भावला व महत्व पटले.

रावले साहेब आपल्याला धन्यवाद

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

धन्यवाद!

चितळे साहेब,
लेख वाचून अभिप्राय दिल्याबद्दल आपला आभारी आहे. लेख तुम्हाला भावला हे कळल्यावर बरे वाटले.

'माणूस सरावाने बर्‍याच गोष्टी आत्मसात करू शकतो.' आपल्या या मताचा मी देखील आहे. ज्या गोश्टीचा सराव एखाद्या समाजातली बरीच मंडळी अधिकृत म्हणून मानलेली जी प्रशिक्शण पद्धत असते व जिथून ते शिकतात, ती पद्धत पुढे उपयोगात यायला हवी. आजपर्यंत टंकलेखन कलेचे प्रशिक्शण देणार्‍या संस्थांनी 'शासनमान्य' म्हणून जे शिकवले ते आज कुचकामी ठरलेले आहे. हि बाजू स्पश्ट करण्यासाठीच् हा लेख लिहीला होता.
तसेच एखाद्या भाशेची लिपी ही त्या भाशेच्या भाशीकांचे गुण, दोश व काही अंशी त्या समाजाची उत्कर्शावस्था कुठल्या स्तरापर्यंत जावू शकते हे देखिल ठरवत असावी. असे मला वाटते. (उदा.:उलट्या पद्धतीने लिहीणारे, जर उत्कर्शावस्थेत आले तर ते इतरांना वैचारीकदृश्ट्या मागेच घेवून जातील)
सध्याची देवनागरी लिपी (जी हिंदीमुळे राश्ट्रलिपी म्हणूनही जी ची ओळख आहे) म्हणूनच मराठी माणसासाठी 'एक नड' आहे, विकसनाच्या वाटेवरली!

+१

>>एखाद्या समाजातली बरीच मंडळी अधिकृत म्हणून मानलेली जी प्रशिक्शण पद्धत असते व जिथून ते शिकतात, ती पद्धत पुढे उपयोगात यायला हवी.

रोचक अभिप्राय आहे.

नितिन थत्ते

लिहायचं 'रोचक', पण मनात असतं..'खोचक'

रोचक अभिप्राय आहे.

प्रस्तुत लेखाचा लेखक स्वत:च स्वत:च्या लेखावर अभिप्राय देवू शकतो?

----------------------------
तुम्ही कोणते केशतेल वापरायचे.....
तुम्हाला.....टक्कल पडण्यापूर्वी????

 
^ वर