जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांच्यावरील आरोप आणि युरोपवारी

नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांना आपल्या युरोपवारीचे बेत रद्द करावे लागलेले आहेत.

नऊ वर्षांपूर्वी बुश अध्यक्षपदी असताना त्यांनी असे जाहीर केलेले होते की अल्-कायदाशी सुरु केलेल्या युद्द्यादरम्यान पकडलेल्या युद्धकैद्यांना द्यायच्या वागणुकीसंदर्भातले जीनिव्हा करारातले कायदे अमेरिकेला लागू होत नाहीत. त्यानंतर अमेरिकेच्या निरनिराळ्या सैनिकी तुरुंगांत चालू असलेल्या छळाच्या बातम्या प्रसिद्ध होत गेल्या. बुश्, रम्सफेल्ड् यांच्या यंत्रणेने ज्याला हिरवा कंदील दाखवला त्याचे परिणाम विकिलिक्स् आणि अन्य "लीक्स्" मुळे समस्त दुनियेस पाहायला मिळालेले आहेत.

या तुरुंगांमधून सुटका झालेल्या दोन कैद्यांनी , फेब्रुवारी ७, २०११ रोजी जिनिव्हा येथील आंतर्राष्ट्रीय न्यायालयात जॉर्ज बुश यांच्या विरोधात तक्रार नोंदवायचे जाहीर केलेले होते. फेब्रुवारी १२ रोजी बुश यांचे जिनिव्हात भाषण आयोजित केलेले होते.

स्विस कायद्यांनुसार जर छळांचा आरोप झालेली व्यक्ती अशा तक्रारीच्या वेळी स्विस सीमारेषेमध्ये असेल तर किमान प्राथमिक सुनावणीसाठी या व्यक्तीला अटक करण्याची व्यवस्था आहे. बुश यांनी आपले जिनिव्हाचे बेत रद्द केले यात आश्चर्य वाटायला नको.

बातमीचा दुवा : http://www.truth-out.org/george-bush-cuts-and-runs-torture-case-switzerl...

बातमीमधे म्हण्टल्याप्रमाणे , छळ केल्याच्या आरोपातून बचावणे हे एखाद्या पत्रकाराने फेकलेल्या बुटापासून बचावण्याइतके सोपे नाही. अनेक मानवाधिकार संस्था , अनेक आंतरराष्ट्रीय कायदे आणि नोबेल पारितोषिक विजेत्यांपासून अनेकानेक व्यक्तींचे प्रयत्न अशा कामाकरता चालू आहेत.

ही घटना हे एक निमित्त आहे असे म्हणता येईल. या घटनेचे महत्त्व सांकेतिक आहे; पण असे घडणे म्हणजे जबाबदार व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या प्रक्रियेची नांदी ठरेल अशी आशा करता येईल.

Comments

चांगली बातमी...

बातमी एकदम चांगलीच आहे! म्हणजे जॉर्ज बूश अथवा अमेरिकेस शह बसला म्हणून नाही तर त्यातून जो संदेश मिळत आहे, विशेषतः अमेरिकन राजकारण्यांना त्यातही रिपब्लीकन पक्षाच्या.

एकूणच अमेरिकेचे परराष्ट्रधोरण म्हणजे "माय वे ऑर नो वे" असे आणि स्वतःचे वेगळेपण (पक्षी: स्वार्थ) टिकवण्यासाठी आंतर्राष्ट्रीय करारात न अडकायचे असते. त्याचे आत्तापर्यंत त्यांना सुस्पष्ट तोटे झाले नाहीत. पण हळू हळू होत आहेत. असेच दुसरे उदाहरण म्हणजे "आंतर्राष्ट्रीय सागरी कायद्या"संदर्भात. तो देखील अमेरिकेने मान्य न केल्याने, पर्यावरण बदलामुळे वितळणार्‍या उत्तर ध्रूवावरील सागरी मार्गावर आपला हक्क सांगणे त्यांना अवघड जात आहे.

तरी देखील बूश ना जिनेव्हात जाणे रद्द करायला लागणे हे अजूनच स्पष्ट संदेश आहे. आता त्यातून काय थयथयाट करतात ते उजव्या चॅनल्सवर बघायला/ऐकायला मजा येईल...

आठवते त्याप्रमाणे: असेच आरोप मला वाटते हेन्री किसिंजरवर आहेत. म्हणून त्यांना काही युरोपिअन राष्ट्रांमधे जाता येत नाही.

कठीण आहे

लायबेरियाचा चार्ल्ज़ टेलर आणि युगोस्लावियाचा स्लोबोदान मिलॉसविच ह्यांच्यावर खटले भरण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली. पण महाशक्ती अमेरिकेच्या माजी राष्ट्रपती बुश ह्यांच्यावर होणे जरा कठीण वाटते. बुश ह्यांना एकटे कसे काय जबाबदार ठरविता येईल हा एक मुख्य मुद्दा आहे. अमेरिकन प्रतिनिधी सभा, सिनेट ह्यांचीही काही जबाबदारी नाही काय? असो. एक विनोद. रम्ज़फ़ेल्ड ह्यांच्या ८०० पानी आत्मचरित्रात त्यांनी अबू ग़ैरबनंतर राजीनाम द्यायला हवे होते असे म्हटले आहे म्हणे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रतिसाद

बुश यांना एकट्यालाच जबाबदार ठरवणे बरोबर नाही आणि असल्या प्राथमिक स्वरूपाच्या घटनांमुळे एकंदर भूतपूर्व अमेरिकन अध्यक्षाला (किंवा त्याच्या प्याद्यांना) एकंदर धक्का लागणे कठीण आहे या दोन्ही गोष्टी मान्य आहेतच.

मी वर म्हण्टल्याप्रमाणे, एखाद्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या सीमेबाहेर पडताना - आणि तेही युरपला जाताना - विचार करावा लागणे, आपले प्रवासाचे बेत रद्द करण्याची नामुष्की येणे या घटनेला काही एक सांकेतिक महत्त्व आहे.

आणखी

सांकेतिक महत्त्व असावेच. पण धाकट्या बुशांनी आपल्या आत्मचरित्रात 'वोटरबोर्डिंग' ह्या यातनापद्धतीच्या वापराला मंजुरी देण्याचे श्रेय घेतले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हे गंडांतर आले आहे असे दिसते. निक्सन काळातले परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर ह्यांच्यावरही अनेक देशांत फौजदारी चौकश्या सुरू आहेत. त्यांच्याबाबतीत, त्यांना अटक होऊ नये म्हणून, अमेरिकेचे परराष्ट्र खाते योग्य ती काळजी घेत असते.

ही बातमी वाचावी: Bush Cancels Trip to Switzerland

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जुनी चर्चा

याच विषयावर हाही एक धागा आहे.
स्वित्झर्लंडचे धोरण अर्थातच चुकीचे वाटते.

विवेचन

स्वित्झर्लंडचे धोरण अर्थातच चुकीचे वाटते.
याबद्दल प्रस्तुत संदर्भात काही अधिक विवेचन करता आले तर उत्तम.

नक्कीच

एका देशातील 'गुन्ह्यांचा' निवाडा दुसर्‍या देशाने केल्यास तो सार्वभौमत्वावरील हल्ला ठरेल.
स्वातंत्र्याचा संकोच करण्याची उतरंड (पेकिंग ऑर्डर) अस्तित्वात आहे हे मला मान्य आहे. उदा., मुलांना किरकोळ मार देण्याचे पालकांचे स्वातंत्र्य पोलिस मान्य करतात पण गंभीर इजेची दखल घेतात, काही कायदे करण्याचे स्वातंत्र्य राज्यांना असले तरी मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्याचा केंद्राचा हक्क अबाधित असतो. परंतु, याच धर्तीवर, जर काही किमान मानवी हक्क जागतिक पातळीवर जपण्याचे सर्वानुमते ठरविले गेले असेल तर स्वित्झर्लंडने अमेरिकेशी युद्ध पुकारून अमेरिकन न्यायव्यवस्थेविषयीचा अनादर प्रकट करावा.

प्रश्न

एका देशातील 'गुन्ह्यांचा' निवाडा दुसर्‍या देशाने केल्यास तो सार्वभौमत्वावरील हल्ला ठरेल.
अमेरिकेच्या सार्वभौम सीमेच्या आत येऊन आम्ही बुश इत्यांदिचे निवाडे करतो असे स्वित्झर्लंड्चे म्हणणे नाही. जी व्यक्ती त्यांच्या सीमारेषेत येते ती विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या न्यायप्रक्रियेच्या अखत्यारीत येते.

दुसर्‍यांच्या देशात जाऊन मग तिथल्या राज्यकर्त्यांचा निवाडा करणारे अन्य कुणी आहेत असे म्हणता येईल :)

फरक

गुन्हा आधीच घडून गेलेला आहे. इंटरपोलमार्फत किंवा थेट अमेरिकेकडे, स्वित्झर्लंडने बुश यांची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे सीमारेषेचा मुद्दा भंपक आहे.

परंतु ....

माझ्या मते जेव्हा एखाद्या परदेशस्थ निघून/पळून गेलेल्या व्यक्तीवर देशाच्या सीमारेषेत असताना केलेल्या गुन्ह्यांबद्दलचे आरोप असतात तेव्हा त्याच्याबद्दल इंटरपोल किंवा अन्य देशांकडे मागणी केली जाते. (उदा. टायगर मेमन, दाऊद इब्राहिम, रोमां पोलान्स्की) या संदर्भात दोन देशांमधे एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीज् असल्या तर आरोपींची देवाणघेवाण करणे त्या करारांअंतर्गत येते.

या प्रसंगीचा मुद्दा वेगळा आहे. प्रस्तुत गुन्हा हा अशा विशिष्ट वर्गीकरणात येतो की स्विस कायद्यांनुसार, अशा स्वरूपाचे गुन्हे कुठेही घडलेले असले तरी जिनिव्हा कायद्यानुसार त्यावर स्विस भूमीत आरोप ठेवता येतो. याच जिनिव्हा कायद्याचा भंग बुश् यांनी केला - किंबहुना हे कायदे आपल्याला लागू होत नाहीत असे जाहीर करून मग जे करायचे ते केले.

माझ्यामते एका बेसावध क्षणी बुश् यांनी जिनिव्हाचे आमंत्रण स्वीकारले आणि या वॉचडॉग् समूहांनी अचूक वेळ साधून बुश यांच्यावर नामुष्की येईल अशी व्यूहरचना केली.

तरीही

प्रस्तुत गुन्हा हा अशा विशिष्ट वर्गीकरणात येतो की स्विस कायद्यांनुसार, अशा स्वरूपाचे गुन्हे कुठेही घडलेले असले तरी जिनिव्हा कायद्यानुसार त्यावर स्विस भूमीत आरोप ठेवता येतो. याच जिनिव्हा कायद्याचा भंग बुश् यांनी केला - किंबहुना हे कायदे आपल्याला लागू होत नाहीत असे जाहीर करून मग जे करायचे ते केले.

गुन्हा घडल्याचे ज्ञान झाल्यापासून तक्रार करण्यासाठी एक मुदत असते. त्या मुदतीत तक्रार न केल्यास ती मुदतबाह्य (टाईमबार) होते. त्याचप्रमाणे, स्विस यंत्रणेला बुश यांचे वक्तव्य गेली नऊ वर्षे माहिती असूनही त्यांनी "युद्धगुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या" अशी मागणी न केल्यामुळे आता त्यांना कारवाईचा काहीही नैतिक हक्क नाही असे मला वाटते.

माझा अंदाज

आता मी जे लिहितो आहे ते माझ्या अंदाजानुसार.

नैतिक अधिकार काय नि कुणाचा याबद्दल बोलता येईलच. परंतु एखाद्या व्यक्ती/संस्थेने पुढे येऊन जर एखाद्या व्यक्तीवर आरोप केलेला असेल आणि ती व्यक्ती स्विस सीमारेषेत हजर असेल तर अर्थातच एकंदर यंत्रणा मार्गाक्रमण करते. यामध्ये स्वित्झर्लंड् या देशाने, त्याच्या सरकाराने किंवा त्यादेशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुठल्याही घटकाने काही "मुलखावेगळे" केलेले नसून, मी वर म्हण्टल्याप्रमाणे, इथे काही वॉचडॉग्ज् नी आपले काम बजावलेले दिसते.

ईंटर्प्रीटींग जिनीव्हा

मला सम्जलेले ज्ञान असे---
दोन बहिण भाऊ आहेत. रिंकू टिंकू. त्यातील रिंकूने टींकूचे चे चॉकलेट हडपले.
टिंकूने आपले आइ बाबा ऐकत नाहीत म्हणून शेजारच्च्या पिंकूच्या घरात जाऊन तक्रार केली.
पिंकुने लगेच पाळत ठेऊन रिंकू आल्या आल्या स्वतःया आइ बाबांना खबर दिली.
आता पिंकूच्या आइ बाबानी त्याना रिंकूच्या घरात घडलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यावी का???

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

या तक्रारींची मुदत काय आहे?

या तक्रारींची मुदत काय आहे?

(वेगवेगळ्या तक्रारींसाठी वेगवेगळ्या मुदती असतात. यूएस् च्या आंतरिक कायद्यात खून आणि बलात्कार या गुन्ह्यांना कालबाह्य होण्यासाठी मुदत नाही. आरोपी मेल्यावर त्या तक्रारी बाद होतात, पण त्याला "कालबाह्य" असे म्हणता येत नाही. अन्य गुन्ह्यांसाठी कमी-अधिक वेगवेगळ्या मुदती असतात.)

सार्वभौमत्वाच्या प्रश्नाबद्दल आंतरराष्ट्रीय कायद्यात बराच ऊहापोह झालेला आहे, असे वाटते. याबाबतीत स्पेनने चिलेच्या पूर्वीच्या राष्ट्रपती आगोस्तो पिनोचेट् वर काढलेला वॉरंट आठवतो.

- - -
स्विस कोर्टाने असा वॉरंट काढल्याबद्दल विश्वासार्ह दुवा मिळू शकेल काय? गार्डियन वर्तमानपत्रातल्या बातमीनुसार अजून असा वॉरंट काढलेला नाही. वॉरंट काढण्याची शक्यता होती इतकेच (दुवा).

विकीलीक्स

कायदाप्रक्रीयेचे महत्व आहेच, पण ह्यामध्ये विकीलीक्स ला विशेष श्रेय द्यावे लागेल, व्यवस्था तर असतेच पण गुन्हा उघड होत नाही हे दुखणे असते. तरी विकीलीक्सची दखल घेऊन तसे जाहीर प्रतिपादन केल्यास स्विस कायदाप्रक्रीयेचे कौतुक करता येईल.

नामुष्की

बुश यांना काही होईल असे वाटत नाही पण त्यांची अशी नामुष्की जगासमोर येते आहे हेच सुख आहे. ;-)

खराय.

यालाच नामुष्कीचे स्वागत म्हणत असावेत.

नोंद घेण्यासारखी घटना

जॉर्ज बुशला पकडले जाईल, व टेलर, मिलोसोव्हिच यांच्यावर चालवला तसा खटला भरेल असे सध्या तरी वाटत नाही. पण हा प्रवास बुशला ह्या कारणामुळे रद्द करावा लागला ही नांदी आहे. यापुढे अमेरिका अथवा कोणत्याच देशाला, नेत्याला त्यांची जबाबदारी टाळता येणे कठीण आहे.

 
^ वर