खबरदार, दहशतवाद्यांवर नी फुटीरतावाद्यांवर कारवाई कराल तर!

दिनांक ५ नोव्हेंबरच्या 'टाइम्स् ऑफ् इंडिया'मधे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना आपला इंग्लंडचा प्रस्तावित दौरा रद्द करणे भाग पडले अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. कारण? काही लंकन तामीळ संघटना इंग्लंडच्या कोर्टात युद्धगुन्हेगारीबद्दल राजपक्षे यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. बातमीत पुढे म्हंटल्याप्रमाणे युद्धगुन्हेगारीसाठी व मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी लागू असलेल्या युनिवर्सल् ज्युरिस्डिक्शनच्या तत्त्वाप्रमाणे त्या वर्गात मोडणारा गुन्हा इंग्लंडमधे घडला नसला तरीही त्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात खटला दाखल करता येतो. राजपक्षेविरोधी मोहिमेत ग्लोबल् तामीळ फोरम् पुढाकार घेत आहे. यापूर्वी १९९८ मधे स्कॉटलंड यार्डनी चिलीचे हुकुमशहा ऑगस्ट पिनोशे यांना त्यांच्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत स्पॅनिश नागरिकांवर अत्त्याचार केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. गुजरात दंगलीनंतर ऑगस्ट २००३ मधे मोदी इंग्लंडला गेले होते त्यावेळी मोदींना व्हिसा देण्यावरून इंग्लंडच्या गृहखात्यावर बरीच टीका झाली होती. अलीकडच्या काळात मानवी हक्कांसाठी झगडणारांनी इस्राएलच्या परराष्ट्र, संरक्षण आणि गुप्तहेरखात्याच्या मत्र्यांनी इंग्लंडमधे प्रवेश केल्यास त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी वॉरंट मिळवले आहे हे समजल्यावर काही मंत्र्यांनी आपला इंग्लंडचा दौरा रद्द केला तर बाकीचे हीथरो विमानतळावरूनच मायदेशी परत गेले. बातमीत अशा प्रकारात मोडणारी आणखीही काही प्रकरणे दिली आहेत आणि ही एक मोदींना अप्रत्यक्ष सूचना आहे असेही म्हंटले आहे.

माझ्या मते यामुळे दहशतवाद्यांचे नी फुटीरतावाद्यांचे फावणार आहे. अतिउत्साही मानवाधिकारवाले आणि भूमीगत संघटनांच्या गुप्त संपर्कात राहून समाजात उजळ माथ्यानी वावरणार्‍या संघटना दहशतवाद्यांविरुद्ध व फुटीरतावाद्यांविरुद्ध कारवाई करणार्‍या राष्ट्र्प्रमुखांची व शासनकर्त्यांची पंचाइत करून टाकणार आहेत. आझाद काश्मीरच्या मागणीला उचलून धरणार्‍या अरुंधती रॉय भारत सरकरमधल्या मंत्र्यांना इंग्लंडमधे अडचणीत आणू शकतात. उपरोल्लेखित राजपक्षे प्रकरणात उजळमाथ्यानी वावरणार्‍या ग्लोबल् तामीळ फोरम् ची फुटीरतावादी एलटीटीई ला मदत होणार आहे. कदाचित तो ग्लो. ता. फो. च्या कार्याचा अघोषित भागही असेल. एलटीटीईच्या शाखा भारतात नसतीलच असं म्हणता येणार नाही.

आपल्याला काय वाटतं?

Comments

केवळ दृष्टिकोनाचा फरक

"एकाचा दहशतवादी हा दुसर्‍याचा स्वातंत्र्यसैनिक असू शकतो" हे मान्य नसेल तर कृपया या दोन संकल्पनांच्या व्याख्या सांगून फरक स्पष्ट करा.

मीन्स अॅंड एंड्स

आंदोलनं करणं, व ती मोडून काढणं या दोन्ही गोष्टी मानवहक्क सांभाळून झाल्या तर चांगलंच नाही का? सत्यासाठी हत्या योग्य हा विश्वास मोडून पडून प्रत्येक मानवी जीवन हे स्वतंत्र सत्य आहे, हे प्रस्थापित झालं तर उत्तमच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत, पण...

"प्रत्येक मानवी जीवन हे स्वतंत्र सत्य आहे" यासोबतच "प्रत्येक देश हे स्वतंत्र सत्य आहे" हेही प्रस्थापित व्हावे की! एका देशातील 'गुन्ह्यांचा' निवाडा दुसर्‍या देशाने केल्यास तो सार्वभौमत्वावरील हल्ला ठरेल.
स्वातंत्र्याचा संकोच करण्याची उतरंड (पेकिंग ऑर्डर) अस्तित्वात आहे हे मला मान्य आहे. उदा., मुलांना किरकोळ मार देण्याचे पालकांचे स्वातंत्र्य पोलिस मान्य करतात पण गंभीर इजेची दखल घेतात, काही कायदे करण्याचे स्वातंत्र्य राज्यांना असले तरी मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्याचा केंद्राचा हक्क अबाधित असतो. परंतु, याच धर्तीवर, जर काही किमान मानवी हक्क जागतिक पातळीवर जपण्याचे सर्वानुमते ठरविले गेले तर ब्रिटनने श्रीलंकेशी राजकीय संबंध तोडावेत, सर्व व्यापार थांबवावा, आणि युद्ध पुकारावे. अशी, भ्याड, अटक करणे चूक आहे.

स्थितप्रज्ञ कसा दिसतो?

सत्तेवर आहे तोवर राज्यकर्ता जे म्हणेल तेच खरे! उद्याचे उद्या!
आज मुशर्रफसुद्धा इंग्लंडमध्ये आहेत. त्यांना तर अनेक आरोपांखाली अटक करता येईल! आणि आतंकवाद्यांनी असे करायचे ठरविले तर 'लाल मस्जिद'ची केस तर मस्त आहे!
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुशीलो बांबांग युधोयोनो यांनीही याच कारणासाठी आपली हॉलंडवारी रद्द केली!
पण इथेही थोडासा वर्णद्वेषाचा भाग आहे कां? कारण 'गोर्‍या' जॉर्ज बुश-४३ यांनाही इंग्लंडमधील अफगाणी, इराकी लोकांच्या संघटनांनी अद्याप कसे मोकळे सोडले आहे कुणास ठाऊक?
पण अरुंधती रॉयसकट इंग्लंडमधल्या लोकांना जे कांहीं करायचं असेल ते करू द्या! पण मी तर गिलानी यांच्यासारखा देशद्रोही वाटेल ते बोलत व करत असताना स्वस्थ बसलेल्या आपल्या सरकारच्या जयजयकारात मग्न आहे!
हल्ली तर खूप वेळा मला 'तुझे आहे तुजपाशी'मधील स्थितप्रज्ञाची पुलंनी दिलेली व्याख्या आठवते!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!

 
^ वर