इग्नोबल पुरस्कार

परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो?

आपल्याला सगळ्यांना नोबेल पुरस्कार माहीत आहे. सोप्या शब्दात, त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इग्नोबल पुरस्कार. १९९१ साली हार्वर्ड-एम आय टी या दोन्ही विद्यापिठांतर्गत असलेल्या संस्था/व्यक्ती यांनी इम्प्रॉबेबल रिसर्च अशी संस्था चालू करून "discoveries that cannot, or should not, be reproduced" साठी म्हणून हा मजेशीर पुरस्कार चालू केला. मजेशीर म्हणायचे कारण असे की त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणल्याप्रमाणे:

"Our goal is to make people laugh, then make them think. We also hope to spur people's curiosity, and to raise the question: How do you decide what's important and what's not, and what's real and what's not — in science and everywhere else?"

थोडक्यात जे ऐकल्यावाचल्यावर "याला संशोधन म्हणतात?" असे म्हणत हसायला येईल पण त्याच बरोबर विचार करण्यास पण भाग पडेल असे संशोधन यात दिसेल. अर्थात साहीत्य आणि शांततेच्या बाबतीत संशोधनापेक्षा इतर गोष्टींना महत्व आहे, जसे ते नोबेल मधे असते...

नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी हा पुरस्कारसोहळा हार्वर्ड विद्यापिठात होतो. ज्या ज्या विषयात नोबेल पुरस्कार दिला जातो, (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्यिक आणि शांतता), त्यामध्ये,तसेच सार्वजनीक आरोग्य, अभियांत्रिकी आणि विविधांगी संशोधनात हा पुरस्कार देण्यात येतो.


(The 2009 Ig Nobel Prize winners, joined by nine amused Nobel laureates, take a bow as the ceremony concludes. Photo: Richard Baguley. संदर्भ)

पुरस्कार देण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते असतात. मजेशीर भाषणात आणि संशोधनाचे वर्णन करत पुरस्कार दिला जातो. २०१० मधे गुगल आणि इकोलॅब ह्या दोन संस्था प्रामुख्याने प्रायोजक असल्याने त्यांना FIGS (Friends of the Ig) असे म्हणले गेले होते.

अर्थात हे सर्वांनाच आवडू शकेल अशातला भाग नाही. विकीवरील माहितीप्रमाणे, ब्रिटीश सरकारचा वैज्ञानिक सल्लागार रॉबर्ट मे यांनी या पुरस्कारावर आक्षेप घेत ब्रिटीश शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जाऊ नये असे म्हणले होते. त्यांचे म्हणणे होते की असल्या प्रकाराने केवळ प्रामाणिकपणे केलेल्या संशोधनाची थट्टाच होते. अर्थात त्याला अनेक शास्त्रज्ञ आणि "केमिस्ट्रि अँड इंडस्ट्री" सारख्या जर्नलने विरोध केला होता.

अशी कुठली संशोधने आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला? काही उदाहरणादाखल पुरस्कार बघा:

वैद्यकीय शास्त्रातील पुरस्कार - जपानी शास्त्रज्ञांना, पायाच्या दुर्गंधीवरील रसायानिक संशोधन आणि त्यातील निष्कर्ष, " ज्यांना त्यांच्या पायाला वास येतो असे वाटते, त्यांच्या पायाला वास येत असतो आणि ज्यांना तसे वाटत नाही, त्यांच्या पायाला येत नसतो!"

शांततेचा पुरस्कार - पेप्सीकोला कंपनीने फिलीपिन्समधे कोट्याधिश करण्यासाठी जाहीर केलेल्या स्पर्धेत चुकीचा नंबर विजेता म्हणून जाहीर केल्याने, जवळपास ८ लाख आशावादी (की आशाळभूत?) स्पर्धक त्यांच्यातील मतभेद विसरून एक झाले!

गणितातील पुरस्कार - अलाबामा प्रांतातील सदर्न बॅपटीस्ट चर्चने केलेल्या नैतिकतेच्या विश्लेषणासाठी गणिताच्या वापराला. या संशोधनात त्यांनी, प्रत्येक तालुक्यातील किती नागरीक हे (धार्मिक) पश्चाताप न करण्यामुळे नरकात जाणार, ह्याचा अंदाज तालुका पातळीवर गणिताचा वापर करत काढला!

रसायनशास्त्र - एका फ्रेंच इम्युनॉलॉजिस्टने होमिओपथिक शोध लावून सांगितले की पाण्याला स्मरणशक्ती असतेच पण त्याबरोबर ती दूरध्वनी आणि आंतर्जालाचा वापर करत इतरत्र पाठवता येते.

मानसशास्त्र- हार्वर्ड विद्यापिठ आणि टेंपल विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या people who believe they were kidnapped by aliens from outer space, probably were — and especially for their conclusion, "the focus of the abduction is the production of children या निष्कर्षाबद्दल!

वगैरे वगैरे...

बाकी १९०१ पासून हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच जरी नोबेल पारीतोषिके भारतीयांना मिळाली असली तरी १९९१ पासून चालू असलेल्या पुरस्कारात आपण चांगले नाव केले आहे:

अर्थशास्त्राचा पुरस्कारः भारतीय वंशाच्या रवी बात्रांना. त्यांच्या The Great Depression of 1990 आणि Surviving the Great Depression of 1990, ह्या दोन पुस्तकांच्या यशस्वी विक्रीसाठी ज्यात त्यांनी केवळ स्वतःच्या (बात्रांच्या) जोरावर जग हे आर्थिक मंदीतून कसे वाचू शकेल हे सांगितले होते.

शांतता पुरस्कारः भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकीस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या अणूस्फोट करून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी.

सार्वजनीक आरोग्य: National Institute of Mental Health and Neurosciences, Bangalore, India मधील संशोधकांना, "nose picking is a common activity among adolescents."

गणितः केरळ कृषीविद्यापिठातील संशोधकांना, "हत्तीच्या पाठीवरील क्षेत्रफळ" काढण्याच्या पद्धतीस.

शांतता पुरस्कारः उत्तर प्रदेशातील "लाल बिहारी" नामक एका शेतकर्‍यास. (वास्तवीक यात मला विनोद वाटण्यापेक्षा विचारच अधिक करावासा वाटला). या शेतकर्‍याला तो बँकेत कर्ज काढायला गेला तेंव्हा समजले की तो कायद्याने मृत आहे. त्याच्या चुलत्याने त्याला फसवले होते. १९७६ ते १९९४ त्याला विविध पद्धतीने भांडत बसावे लागले. त्याने स्वत:च्या नावामधे "मृतक" (मयत) असे घातले, आणि "मृतक संघ" देखील काढला. आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी राजीव गांधींच्या विरुद्ध निवडणूकीत पण उभा राहीला. पण त्याचे कोणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी १९९४ साली त्याला न्याय मिळाला.

----

अर्थात या पुरस्कारातील मूळ विचार, "make people laugh, then make them think" हे देखील सत्य होऊ शकते. नेदरलँडच्या विद्यापिठातील संशोधकांना असा पुरस्कार देण्यात आला कारण त्यांनी शोधले होते, "मलेरिया पसरवणार्‍या डासांना माणसांच्या पायाचा वास आणि लिंबर्गर प्रकाराचे चीज आकर्षीत करते". मात्र त्याच संशोधनाचा वापर नंतर अफ्रिकेत मलेरिया नियंत्रणासाठी केला गेला.

-----


(संदर्भः विकीमिडीया. A live frog levitates inside the Ø32mm vertical bore of a Bitter solenoid in a magnetic field of about 16 tesla at the Nijmegen High Field Magnet Laboratory)

असा आत्तापर्यंत एकच शास्त्रज्ञ झाला आहे ज्याला दोन्ही, म्हणजे इग्नोबल आणि नोबेल पुरस्कार मिळाला आहे. रशियात जन्माला आलेला, नेदरलँडचा नागरीक आणि ब्रिटनचा रहीवासी असलेला आंद्रे जीम याला ग्राफीन नामक द्विमितीतील कार्बनचा शोध लावल्याबद्दल भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१० साली मिळाला. मात्र याच आंद्रे ला एक बेडकास चुंबकीय शक्तीच्या वापराने तरंगायला लावण्याच्या प्रयोगाबद्दल इग्नोबल पुरस्कार मिळाला होता!

Comments

नाडी

हाहा. खरेच की. इग्नोबल पुरस्कारांच्याबाबतीत भारताची स्थिती चांगली दिसते आहे.

काहीच्याकाही आंतरजालीय लेखनासाठी नाडी पुरस्कार द्यायला हवेत. मधुलेखा ह्यांचा ताजा चर्चाप्रस्ताव उत्तम उदाहरण आहे. प्रतिसादलेखनासाठी मात्र असे पुरस्कार घोषित करून काही फायदा नाही. प्रत्येक वेळी रावलेच बाजी मारणार हे निश्चित!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असेच काही नाही..

प्रत्येक वेळी रावलेच बाजी मारणार हे निश्चित!
असेच काही नाही. पाळलेल्या राक्षसाला विसरु नका....
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

अन्वयार्थ

पाळलेला राक्शस?

नक्की कुणाचा हेवा

प्रत्येक वेळी रावलेच बाजी मारणार हे निश्चित!
असेच काही नाही. पाळलेल्या राक्षसाला विसरु नका....

हाहाहाहा. कोलंबसा, चुकलास की! रावसाहेब, तुम्हाला नक्की कुणाचा हेवा वाटतो आहे बरे? रावळेंचा की पाळलेला राक्षस ह्यांचा?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्पर्धा

पूर्णमूर्ख उर्फ सुवर्णा यांनाही भरघोस मते मिळू शकतील काय?

ऐकुन आहे

त्या कसलेल्या राजकारणी आहेत असे ऐकुन् आहे. ;-)

-Nile

हाहाहा

मस्त लेख! इग्नोबल पुरस्कार आवडले. ऑस्कर ऍवार्ड्स सारखे रद्दी चित्रपटांनाही कुठलेसे पुरस्कार देतात असे मधे ऐकले होते ते आठवले.

नाडी, भविष्य, होमिओपथी ह्यांची उत्साहाने बाजू मांडणार्‍या उपक्रमींना हे पुरस्कार द्यायला हवेत.

मस्त

उपक्रमींनाही असे पुरस्कार मिळायला पाहिजेत याच्याशी सहमत.

अंतराळ-विज्ञान पुरस्कारः हा प. वि. वर्तकांना जायला हवा. एक दमडी खर्च न करता मंगळावर स्वारी करून आल्याबद्दल. ;-)

जागतिक-एकात्मता पुरस्कार : अर्थातच पु. ना. ओकांना. सर्व जग त्यांना प्राचीन भारतीयांचे वसतीस्थान वाटते. ना. ;-)

हा हा हा.

शांततेचा पुरस्कार - पेप्सीकोला कंपनीने फिलीपिन्समधे कोट्याधिश करण्यासाठी जाहीर केलेल्या स्पर्धेत चुकीचा नंबर विजेता म्हणून जाहीर केल्याने, जवळपास ८ लाख आशावादी (की आशाळभूत?) स्पर्धक त्यांच्यातील मतभेद विसरून एक झाले!

हा हा हा. :)

इग्नोबल

मागे एकदा रेडियोवर या इग्नोबल पारितोषक वितरण समारंभाचे प्रसारण ऐकले होते. (दुवा - तब्बल दोन तासांचा समारंभ आहे, सावधान)

धमाल नुसती.

वाकडा चमचा आणि डार्विन पारितोषिके

छान माहिती. याबद्दल पूर्वी वाचले नव्हते.
एका भारतीय संशोधकाला अशाच प्रकारात नॉमिनेशन मिळाल्याचे वाचले होते.

यावरून आठवले बेन्ट स्पून पारितोषिक आणि डार्विन पारितोषिक हे वाचले होते. याची भारतीय आवृत्ती काढण्याचे माझ्या मनात घोळत होते. (विशेषतः वाकड्या चमच्या बद्दल.) माझ्या मते गोमुत्रावरील संशोधन यात खूप वरच्या क्रमांकाचे राहिले असते.

प्रमोद

आश्चर्य

इग्नोबलविषयी इथे इतका इग्नोरन्स?

हेहेहे

>गणितः केरळ कृषीविद्यापिठातील संशोधकांना, "हत्तीच्या पाठीवरील क्षेत्रफळ" काढण्याच्या पद्धतीस.

कैच्याकै !

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

वा व्वा !

अतिशय उत्तम संकल्पना. लेख वाचनातून् सुटला होता- पण आता या पुरस्कारांबद्दल अधिक माहिती मिळवतो.
डोक्यात अनेक नॉमिनेशन्स घुमत आहेत. या पुरस्कारांवर भारताचा वरचष्मा राहणार , हे नक्की.

बाकी अटलजी आणि नवाज शरीफ यांना दिलेल्या पुरस्काराची गंमत वाटली. या निकषावर अमेरिकेने वर्षानुवर्षे शांतता पुरस्कार जिंकले पाहिजेत. (सार्वकालिन शांततेसाठी सार्वकालिन युद्ध !)

आवडला!

(सार्वकालिन शांततेसाठी सार्वकालिन युद्ध !)

एकदम चपखल! :-)

 
^ वर