अंश ईश्वराचा
मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे. ही गोष्ट त्याला रानटी अवस्थेत असताना कळली की कपिवस्थेत याबद्दल विशेष माहिती नाही पण त्याचे नेमके फायदे तोटे मनुष्यावस्थेत कळले असे मानू. आपला गट निर्माण केला की एकत्रितरीत्या शत्रूवर चाल करून जाणे सोपे पडते, स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करता येते, शिकार करणे सोपे जाते या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या असाव्या. टोळी जसजशी मोठी होत गेली तसतसे टोळीत अंतर्गत कटकटीही निर्माण झाल्या असाव्यात आणि मग त्या टोळीला शिस्त लावण्यासाठी, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोळीतील शक्तीने आणि बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे त्या टोळीचे नेतृत्व आले असावे. नगरे स्थापन झाल्यावर आणि टोळ्यांची व्याप्ती वाढल्यावर याच टोळीप्रमुखाचा राजा झाला.
आयसीसच्या रूपातील क्लिओपात्रा |
टोळीची किंवा राज्याची व्यवस्था राखतानाच राजाला स्वतःच्या भवितव्याचा विचार करणे, आपले पद राखून ठेवणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणेही आवश्यक होते. या कामी केवळ शक्तीचा उपयोग नव्हता तर युक्तीचा उपयोगही करणे आवश्यक होते. राजाच्या मागे उभे राहणारे बळकट वीर, सेनापती, अमात्य, मंत्री, इतर हुशार सल्लागार आणि सामान्य प्रजाजन या सर्वांत एकी राखण्यास आवश्यक असणारा गुण म्हणजे राजनिष्ठा. एखाद्या व्यक्तीविषयी अपार निष्ठा बाळगण्यासाठी त्या व्यक्तीला एकतर कर्तृत्वाने अतिशय मोठे होण्याची गरज असते किंवा जन्माने/ पदाने अत्युच्च असण्याची गरज असते. या दोहोंमुळे ही व्यक्ती पूजनीय ठरत असे, लोकांच्या निष्ठा राजाकडे अबाधित राहत आणि त्यायोगे राज्य आणि राजा सुरक्षित राहत असे. कर्तृत्वाने नेमके किती मोठे व्हायला हवे याच्या सीमा आखलेल्या नसल्याने आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला मर्यादा असल्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यास केवळ कर्तृत्वाचा उपयोग नाही; त्यापेक्षा भव्य काहीतरी उभे करायला हवे ही जाणीवही राज्यपद उपभोगणाऱ्यांना झाली असावी. हे जे काही भव्यदिव्य आहे ते मानवी हस्तक्षेपा पलीकडले असणे किंवा अमानवी असणे किंबहुना ते तसे दाखवणे पथ्यावर पडले. याचे कारण विज्ञानाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती किंवा न उमजणाऱ्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने ईश्वरी संकेत मानणे. या गोष्टी आपल्या हातात नाहीत किंवा या गोष्टींना आपण रोखू शकत नाही, या आपल्या मानवी शक्तीच्या पल्याड आहेत या भावनेतून ईश्वराबद्दल दरारा निर्माण झाला आणि याच भावनेतून जन्माने मोठे होणे -उच्च असणे या संकल्पनेची निर्मिती झाली. राजा हा साक्षात ईश्वराचा अंश आहे किंवा साक्षात ईश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी आहे असे दर्शवून देणे हे राज्यव्यवस्था आणि पद सुरक्षित ठेवण्यास कारणीभूत ठरते याची जाणीवही माणसाला झाली. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी या युक्तीचा वापर हमखास होऊ लागला.
जगातील बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अशाप्रकारे राजाला किंवा टोळीप्रमुखाला ईश्वरी अंश, देवाचा पुत्र किंवा साक्षात भगवंत मानण्याची प्रथा आहे. आपल्या महाकाव्यांचा विचार करता त्यातील कोणतेही महापुरुष मानवी नाहीत असे दिसून येईल. कथेतील मुख्य पात्रांचे चमत्कारिक जन्म, पुनर्जन्म, अवतार वगैरे गोष्टी सदर पात्रे सामान्य मनुष्यापेक्षा वेगळी आणि वरचढ होती हे दाखवण्यासाठी केलेला आढळतो. महाभारतातील जवळपास सर्व पात्रांचे जन्म चमत्कारिक आहेत. या पात्रांना दैवी गुण चिकटवलेले आहेत. याचप्रमाणे, इलियडचा विचार केला तरीही अशाचप्रकारचे संदर्भ आढळतात. इतरत्र इतिहासात डोकावले तर इजिप्तमध्ये राजाला देव मानण्याची प्रथा आढळते. राजा (फॅरो) हा होरस हा देवाचा पुनर्जन्म मानला जाई. इजिप्तची प्रसिद्ध फॅरो क्लिओपात्राने स्वतःला इजिप्शिअन देवता आयसीस म्हणून घोषित केले होते. तिच्या आयसीसच्या रूपातील प्रतिकृती आढळतात. चीनमध्ये राजा हा स्वर्गपुत्र असल्याचे मानले जाई, रोमन संस्कृतीत राजाला देव मानण्याची प्रथा होती, इंका संस्कृतीही राजाला देव मानत असे आणि अशा अनेक संस्कृतीत राजाला अमानवी गुणांचा धनी बनवल्याचे दिसून येईल.
अलेक्झांडर द ग्रेट हा झ्यूसचा पुत्र आहे हे स्वतः त्याची आई सांगत असे आणि तो पद्धतशीर प्रचार होता. पुढे सिवाच्या चेटक्याने अलेक्झांडर हा अमुनचा मुलगा असल्याचे म्हटले पण ग्रीकांनी तो झ्यूसचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले अशी अलेक्झांडरच्या गोटातून बतावणी केली गेली. रोमन सम्राट ऑगस्टसला देव म्हणून घोषित करण्यात आले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पोटी अद्वितीय पुत्र जन्म घेतो आहे असे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. अशोकाच्या शिलालेखात देवांना प्रिय या विशेषणाचा सातत्याने वापर केलेला दिसतो. हुमायूनलाही स्वप्नातून आपल्याला अद्वितीय पुत्र होणार आहे हे कळून चुकले होते. अकबरावर सलीम चिश्तीची कृपादृष्टी असल्याच्या आणि शिवाजीराजांनाही भवानीचा दृष्टांत झाल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.रामदासांनी राजांबद्दल लिहिलेल्या या ओळी बोलक्या आहेत -
धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।
या आणि अशा अनेक उदाहरणांवरून राजा हा अतिमानवी शक्तींशी जवळीक साधणारा आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिसतो. राजाला देवाचा अंश मानणे यापेक्षा थोडी पुढची पायरी देवराजा ही प्रथा. कंबोडियातील ख्मेर राजघराण्यात ही प्रथा दिसते. या प्रथेत राजा ही शिवस्वरूप असून सर्वश्रेष्ठ आहे असे मानले जाई. यालाच मनुष्याचे दैवतीकरण करणे असे म्हणता येईल. चंद्रशेखर यांच्या लेखात जयवर्मन राजाचा मृत्यूनंतर अवलोकेतेश्वराच्या रूपात दैवतीकरण झाल्याचा उल्लेख आहे. ही प्रथा केवळ कंबोडियातच नाही तर इतरत्रही आढळते. मानवी आयुष्यात किंवा मानवी मृत्यूनंतर त्याला देवाच्या जागी बसवणे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही. व्यक्तिपूजा, अवतार, महात्मा वगैरे अनेक शब्द मनुष्याला अतिमानवी शक्तीच्या जवळ घेऊन जातात आणि जसे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही तसे जगातील इतर संस्कृतींनाही हे "दैवतीकरण" नवे नाही. दैवतीकरणाची ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे आणि आता राजे गेले तरी नेत्यांच्या रूपात ही पद्धत सुरू राहिल किंबहुना महात्म्यांच्या उपाधीतून सुरू असल्याचेच जाणवते.
होमरचे दैवतीकरण |
अशाचप्रकारच्या दैवतीकरणाचा उल्लेख डॅन ब्राऊनच्या लॉस्ट सिंबलमध्ये अनेकांनी वाचला असेल. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूपश्चात त्याचे दैवतीकरण यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडाच्या छतावर दिसते. याला ऍपॉथिओसिस ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन (apotheosis of George Washington) म्हणून ओळखले जाते. दैवतीकरणाची ही पद्धत अर्थातच ग्रीक किंवा रोमनांची. टायटसच्या प्रसिद्ध कमानीच्या छतावर (The Arch of Titus, बांधकामः सुमारे इ. स. ८१) सम्राट टायटसचे दैवतीकरण दिसते. इलियड आणि ओडिसीचा निर्माता महाकवी होमर याच्या दैवतीकरणाचे प्राचीन शिल्पही उपलब्ध आहे. कॉन्स्टंटिनो ब्रुमिडी या इटालियन चित्रकाराने १८६५ मध्ये यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या छतावर ही चित्रकारी केली. सन १८६२ मध्ये हे चित्र काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळते. ही परवानगी यू. एस. कॅपिटॉल बिल्डिंगचा प्रमुख स्थापत्यशास्त्रज्ञ थॉमस वॉल्टरकडून ब्रुमिडीला मिळाल्याचे कळते. याआधी १८६०मध्येही एका जर्मन चित्रकाराने वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाचे पेंटिंग तयार केले होते. या चित्राचा पगडा कॅपिटॉल बिल्डिंगीतील चित्रावर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या राष्ट्रपित्याचा दर्जा या आधी अनेक वर्षे मिळालेला होता. त्याची लोकप्रियता मृत्यूनंतरही वाढत गेली. याचा फायदा घेण्यासाठी हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ब्रुमिडीला महिना दोन हजार डॉलर्सच्या तनख्यावर हे चित्र काढण्याची परवानगी मिळाली. तयार झालेले चित्र अनेकांच्या पसंतीस पडले हे वेगळे सांगायला नको. आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.
जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण
वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाच्या या एका चित्रात एकूण सात दृश्ये आहेत. मध्यभागी १३ कुमारिकांसह जॉर्ज वॉशिंग्टन स्वर्गारोहणासाठी तयार झालेला दिसतो. १३ कुमारिका अमेरिकेच्या तत्कालीन १३ वसाहती दाखवतात. वॉशिंग्टनच्या डोक्यावर E Pluribus Unum (विविधतेत एकता) हे अमेरिकेचे घोषवाक्य दिसते. वॉशिंग्टनच्या चित्रासभोवताली इतर ६ चित्रे दिसतात आणि ही सर्व चित्रे प्रगतिशील अमेरिकेत होणारे दैवतीकरण दर्शवतात.
युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.
विज्ञान - मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.
नौधन(सागरी)- समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.
वाणिज्य - मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.
यांत्रिकी - या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.
शेतकी - सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.
चित्राविषयी याहून अधिक माहिती आंतरजालावर शोधल्यास सहज उपलब्ध आहे. ज्यांना फ्रीमेसनरीच्या कॉन्स्पिरसी थिअरीत रुची आहे त्यांच्यासाठी थॉमस वॉल्टर, १८६५ मधील अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन हे दोघे फ्रीमेसन्स होते. तत्पूर्वीचे अब्राहम लिंकन हे फ्रीमेसन नसले तरी सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते फ्रीमेसन बनले नाहीत असे कळते. चित्रात दिसणारे बेंजामिन फ्रँकलिन हे फ्रीमेसन होते आणि अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतःही फ्रीमेसन होते.
अधिक माहिती:
वॉशिंग्टनचे दैवतीकरण
क्लिओपात्राचे आणि होमरचे चित्र विकिपिडीयावरून घेतले आहे.
Comments
चांगली माहिती
लॉस्ट सिंबल हे पुस्तक आवडले नसल्यामुळे हे चित्र गूगलले नव्हते. धन्यवाद.
--
इतर सार्या राजांविषयीची विधाने मान्य आहेत परंतु वॉशिंग्टनला दैवत करण्यामागच्या हेतूचा आरोप पटला नाही. जनतेत प्रचलित असलेल्या धर्मात राजाला घुसविण्याचा प्रयत्न केल्यास त्यामागे राजकीय हेतू असू शकतो. त्या चित्रात वॉशिंग्टन ख्रिश्चन धर्मातील देव बनलेला दिसत नाही. त्यामुळे ते चित्र केवळ प्रगतीचे रूपक मानावे असे मला वाटते.
माहितीपूर्ण लेख
लेख वरवर चाळला परत वाचून मग प्रतिसाद देईन. वॉशिंग्टन बद्दलची माहिती एकदम नवी आहे. मी कॅपिटॉल हिल वगैरे भागात बराच फिरलो आहे तिथे मला असे दैवतीकरण झाल्याचे कधीच भासले नव्हते. त्यामुळे माहिती रोचक आहे. सध्या त्या भागात वास्तव्य करणार्या उपक्रमींकडून या विषयावरची जास्त माहिती वाचायला आवडेल
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
+१
माहितीपूर्ण लेख. चांगली माहिती मिळाली.
मस्त लेख
पण नवीन काहीही नाही..........
आपले पुढारी लोकपण ठिकठिकाणी पुतळे (स्वताचे) उभारुन स्वतःचे दैवतीकरणच् करतात ना...............
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
देवत्वाचा अंश .. नव्हे, प्रत्यक्ष देवच!
हिंदूहृदयसम्राट श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी दस्तुरखुद्द बाळासाहेब यांची भगवान श्रीकृष्णासारखे किरीट, बासरीसहित अशी छबी काही दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रात पाहिल्याचे आठवते.(कदाचित व्यंगचित्रही असेल!)
आतुर....
काही दुवा उपलब्ध असल्यास कृपया देणे! चतुर्भुज "रूप" पहाण्यास आतुर आहे......
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
वसुंधराराजे शिंदे
श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीचा दुवा मिळाला नाही. क्षमस्व!
परंतु राजघराण्याचे, भाजपाचे लाडके व राजस्थानचे मुख्यमंत्री असलेले वसुंधराराजे शिंदे यांच्या दैवतीकरणाचे दोन फोटो मिळाले. (कदाचित फोटोशॉपची करामत असू शकेल!)
किरणोत्सव
अर्रे व्वा!! वरून कृपादृष्टीने ठेऊन असलेले ते त्रिदेव कोण बरं? आणि खाली देवींच्या किरणांत न्हाउन निघालेला 'भक्त' कोण तो?
उत्तम फोटोज् आहेत.
बोगॅम्बो खुश हुआ....
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
अजून एक
ही कल्पना भाजपाने अथवा ज्याने कोणी पिकासावर टाकली त्याने चोरलेली दिसतेय. :-)
मूळ लेखासंदर्भातः
नवीन माहिती आवडली. तिथे अनेकदा गेलो असलो तरी अशा पद्धतीने लक्ष दिलेले नव्हते.
अमेरिकेच्या "स्वांतत्र्य" संकल्पनेची स्थापना होण्याचे एक कारण हे स्वतःच्या पद्धतीने धर्मोपासना करता न आलेले युरोपातील "पिलग्रीम्स" देखील होते. अर्थात तरी देखील मूळ हे ख्रिस्तीधर्माशीच बांधलेले होते. जरी तो कसा आचरायचा यातील भेदभाव मान्य केले तरी. दुसरीकडे युरोपातून आल्याने, ग्रीक-रोमन परंपरेचा पगडा असावा. त्यामुळे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथसारखेच वॉशिंग्टनला पण देव करायचे कुणाच्या डोक्यात आले असले तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात कालांतराने येथे ख्रिस्तीधर्मावरील पकड ही ढिली झाली नसली तरी अनेक अर्थाने बदलली. जरी अधिकृत ऐतिहासीक माहीतीत त्याचे मूळ जतन केलेले असले तरी, त्यात असे कुणाला देवत्व देणे दुर्लक्षित करण्यासारखे वाटल्याने जास्त प्रसिद्धीस पावले नसावे असे वाटते.
आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.
सहमत. "पहीला" हे खरे आहे :-) कारण रोनाल्ड रेगन यांना देखील देवत्वाला अथवा तत्सम पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांच्या नावे $५ चे सोन्याचे आणि $१ चे चांदिचे नाणे तयार करायचा बेत तर आखला जात आहेच, पण Did Ronald Reagan encounter angels? असे देखील म्हणणारे आहेत!
कॉपी-ओरिजिनल
२००७ मधील वरीजिनल बातमी.
नितिन थत्ते
वसुंधरा देवी
आता या वसुंधरा चालीसा ला संगीत कोण "गुणी" संगीतकार देईल बारं?
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
अजून एक...
अजून एक अमेरिकन देवता (अथवा मसिहा) होऊ शकेल असे दोन वर्षांपूर्वी वाटले होते (आणि आत्ता वाटत नसले तरी अजूनही शक्य आहे):
मात्र वर आलेल्या प्रकारात भारतीयांचा हात कोणीच धरू शकणार नाही असे वाटते. त्याचे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे करूणानिधी आपला पुत्र स्टालीन समवेतः
काळा गॉगलवाला श्रीकृष्ण
भारी प्रकार आहेत वरचे. :-) काळा गॉगलवाला श्रीकृष्ण सर्व चित्रांमध्ये भारी.
:))))))))))
अनब्रेकेबल् आहे का तो........
गॉगल..... पण धृतराष्ट्राची इष्टाइल चोरण्याचं काय् कारण्??
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
जाने भी दो यारो
ये सब क्या हो रहा है, दुर्योधन?
भो भो केशव...
कृष्ण पडतोय् म्हणुन रडायला येतेय्.... बाकि नॉट् अनिथींग् सिरीयस्!
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
उत्तम निरीक्षण
उत्तम निरीक्षण आणि छान लेखन. धन्यवाद.
माझे निरीक्षण - अमोघ आणि फायद्याचे कर्तुत्व करणाऱ्यांना, ज्याचा फायदा होतो तो साधारण माणूस फायदा होईपर्यंत देव/महात्मा वगैरे मानतो. आपण ज्याकाही राजांची उदाहरणे इथे दिली आहेत ते बहुतांशी असाधारण कर्तुत्ववान राजे होते त्यामुळे त्यांना तसे पद मिळणे साहजिक आहे, सर्वांनाच आपण ईश-अंश आहोत हा प्रपोगांडा करायची गरज होती असे वाटत नाही. बाकी असामान्य पण तोट्याचे वागणारा अश्या लोकांचे दैवतीकरण हे फार कमी काळ होते किंवा होतच नाही, हिटलर/स्टालिन/पोल पॉट हि काही उदाहरणे आहेतच.
तसे नव्हे
मला वाटते मी योग्य उदाहरणे देऊन प्रपोगांडा कसा केला जातो ते लिहिले आहे. जे राजे होते ते जन्मत: असाधारण नव्हते. त्यांना असाधारण बनण्यासाठी ज्या गोष्टींची मदत झाली त्यापैकी एक म्हणजे ते देवाचे अंश आहेत हा प्रपोगांडा. तो ते जिवंत असतानाच त्यांच्या आप्तांकडून झालेला दिसतो. जी उदाहरणे दिली ती अशा राजांची की जे इथे सर्वांना माहित आहेत. अन्यथा, इंका आणि चीनी संस्कृतीतील वगैरेही उदाहरणे देता येतील.
प्रपोगांडा ?
शिवाजी राजांना असा प्रपोगांडा करायची गरज होती असे वाटत नाही, जे लोक भवानी मातेला मानत होते ते तसेही शिवाजी राजांना मानत होते, जे लोक म्लेंछ/यवन भवानी मातेला मानत नव्हते ते प्रपोगांडला बळी पडणार नव्हते. हं दुसरे लोक हे नंतर करू शकतात हे पटते, पण त्यामध्ये दस्तरखुद्द राजाचा स्वार्थ जाणवत नाही. असामान्य माणसाला प्रपोगांडा करायची मुळात गरज भासते हे पटत नाही.
वेगळे नाहीत
इतर कोणत्याही हुशार आणि सद्वर्तनी राजांपेक्षा शिवाजीराजे वेगळे नाहीत. त्यांच्यात काही वेगळे असेल तर ते "आपले" आहेत इतकेच. जर ते असामान्य झाले तर ते त्यांच्या धोरणांनी झाले. जन्मतः असामान्य नव्हेत.
हेच इतर सर्वांच्या बाबतीतही लागू आहे ना. अकबरावर सलीम चिश्तीची कृपा आहे याचा हिंदूंवर काय परिणाम होणार होता, अलेक्झांडर हा झ्यूसपुत्र आहे याचा पोरसवर काय परिणाम होणार होता आणि क्लिओपात्रा ही आयसीस आहे याचा ऑक्टेविअनवर काय परिणाम होणार होता?
राजाला शत्रूपासून जितकी भीती असते त्याच्यापेक्षा जास्त भीती आप्तांकडून असते. ते राज्यसत्ता सर्वात आधी उलटवू शकतात. या आप्तांत नातेवाईक, मंत्री, सेनापती, स्वधर्मीय वगैरे आले. त्यामुळे यांना राजनिष्ठ ठेवणे ही सर्वात मोठी कसोटी असते. ते एकजूटीने असले तर शत्रूशी सामना करता येतो.
आपल्याला भवानीचे दृष्टांत होतात हे सांगणारे राजे एकतर अतिशय हुशार असायला हवेत किंवा अंधश्रद्ध. मला तरी अतिशय हुशार राज्यकर्ते वाटतात.
तुमच्या वरच्या विधानावर एक गोष्ट सांगते. ही मी फार पूर्वी वाचली होती आणि आता संदर्भ देऊ शकत नाही तेव्हा जमल्यास विश्वास ठेवावा अशी विनंती. :-(
अकबराच्या सैन्यासमोर सलीम चिश्तीच्या कृपेने अमानवी (पिशाच्चयोनी) सैनिकांची एक फळी असते आणि यांचा पराभव करणे केवळ अशक्य आहे अशी अफवा उठवली जाई. या गोष्टीच्या भीतीनेच शत्रू अर्धा गठळत असे.
+१
सहमत आहे. तसेही भवानीला मानणारे सगळेजण (उदा. चंद्रराव मोरे) राजांना मानत नव्हतेच. (सिसोद्यांची लिंक इन्व्हेण्ट व्हायच्या आधी) या स्वकीयांचा विरोध बोथट करण्यासाठी राजांना हे करणे गरजेचे होते.
अमेरिकेला/जॉर्ज वॉशिंग्टनला सांगण्यासारखा जुना इतिहास (उदा. ईक्ष्वाकूंपासूनची वंशावळ इत्यादि) नसल्याने डायरेक्ट ईश्वरी अंश सांगावा लागला असेल.
नितिन थत्ते
नाही.
इतिहासाप्रमाणे मोरे महाबळेश्वरास मनात होते, भवानीवर श्रद्धा असेल हि.
ह्या विधानाप्रमाणे "भवानीचा दृष्टांत" हा प्रपोगंडा कुचकामी ठरतो, मग गरज कशी?, सामान्य माणसाच्या मनात घर करण्यासाठी का? राज्यकर्ते स्वकीय अश्याप्रकारच्या प्रपोगानड्यास भिक घालत नाही हे खरे.
@प्रियाली - दैवतीकरण करणे हा राजकारणाचा भाग असू शकतो हे मान्य, मी फक्त हे सामान्यकरण होऊ शकत नाही असे म्हणत होतो.
भवानी तलवार
आपल्याला भवानीचे दृष्टांत होतात हे सांगणारे राजे एकतर अतिशय हुशार असायला हवेत किंवा अंधश्रद्ध. मला तरी अतिशय हुशार राज्यकर्ते वाटतात.
शिवाजी राजांनी आपल्याला भवानीचा दृष्टांत झाला असे सांगितल्याचे कुठे आढळते? मला शंका वाटते की नंतरच्या सभासदबखरी (?) वगैरेंपासून ही आख्यायिका आली असेल.
प्रमोद
अफझलखान वधाच्या वेळी
मी शिवकालीन बखरी फारशा वाचलेल्या नाहीत हे कबूल करीन. माझे ज्ञान असेच सुप्परफिशिअल आहे. तेव्हा सुधारून देता यावे.
माझ्या आठवणीप्रमाणे, अफझलखान आला असता आता आपला निभाव नाही अशी भीती अनेकांना पडली होती तेव्हा त्यांचे खच्ची झालेले मनोबल वाढवण्यासाठी महाराजांनी देवी स्वप्नात आली असे काहीसे म्हटले होते का?
लेख आवडला नाही.
लेख आवडला नाही.
न आवडण्या मागची कारणे.-
- लेखाचे नाव व त्याची सुरवात वेगळा विशय आहे हे भासवणारी होती. पण तसे असले तरी केवळ त्यात 'चिंतन न करताच' किंवा 'चिंतन करण्याला घाबरून' वर-वरचे मत-प्रदर्शन केलेले होते.
- ह्या लेखात 'जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण' हा मुख्य विशय छुप्प्या पद्धतीने सादर करणे एवढाच होता, असे वाटते. केवळ त्या विशयाची 'कमी माहिती' कमी दिसली असती म्हणून 'भारदस्त लिहीण्याचा आव आणण्यासाठीच' 'वरचा बराच फाफटपसारा' 'पेश करण्यात आला.'
काही उत्तरे
रिटे आणि चंद्रशेखर यांच्यासाठी एकत्रित उत्तर देते -
बाब्बौ! आरोप हा फारच स्ट्राँग शब्द झाला. मी तो स्वीकारणार नाही, तेव्हा निरीक्षण म्हणू.
होय चित्र प्रगतीचे रूपक आहे हे खरेच पण ख्रिश्चन धर्मातले देव कोणते? देव ही ग्रीकोरोमन संकल्पना आहे. येथे हेतू इतकाच आहे की वॉशिंग्टनला लार्जर दॅन लाईफ दाखवणे. त्याच्या कार्यामुळे विविधतेतून राष्ट्राचे एकीकरण झाले ते कायम राहावे, वॉशिंग्टन हा इतर अमेरिकन जनतेपेक्षा (नेत्यांपेक्षा) महान आहे या हेतूने झालेली ही चित्र निर्मिती मला वाटते. वॉशिंग्टनचे मंदिर उभारून त्याचे नवस किंवा बड्डे साजरे करणे, पंथ बनवणे हा हेतू निश्चितच नसावा.
असो. हे एकच चित्र असे म्हणता येणार नाही. वॉशिंग्टन डीसीमध्ये दिसणारी लेडी फ्रीडम ही अथीना/ मिनर्वा आहे (तिच्या मेड्युसाच्या ढालीसकट आणि घुबड आणि नाईकीसोबत). वॉशिंग्टनचा झ्यूस म्हणून उभारलेला पुतळा डीसीमध्ये आहे. हे रूपांतरण नक्कीच हेतुपुरस्सर आहे. माझ्यामते,वॉशिंग्टनचे कार्य सतत लक्षात राहून त्याला महात्मा बनवण्याच्या उद्देशाने झाले आहे.
कदाचित पुढली शंका निघेल की ही संकल्पना ही केवळ एक स्टाईल आहे. अशाप्रकारची चित्रे बनवण्याची फॅशन होती.
हा वरचा पुतळा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांना तो आवडला नाही, कळला नाही तेव्हा अशी फॅशन अमेरिकेत नसावी हे निश्चित. अर्धनग्न वॉशिंग्टन काहींना अश्लील वाटला तर काहींना ते अपमानास्पद वाटले. विकीवरही याबद्दल वाचता येईल. झ्यूसबद्दल अमेरिकन लोकांना फारशी माहिती नाही. मिनर्वा/अथीनाबद्दलही नाही. मी लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये खूप वेळ काढला आणि लोकांचेही निरीक्षण केले. त्या पुतळ्याचे थांबून निरीक्षण करणारे कमी होते आणि एक दृष्टीक्षेप टाकून निघून जाणारे अधिक. तेव्हा हे इथे काही दर्शविण्याचा प्रयत्न आहे हे आजच्या अमेरिकन माणसाला लक्षात येते असे वाटत नाही.
व्यक्तीला मोठा करणे
वॉशिंग्टनचे दैवतीकरण करण्यापेक्षा त्याला लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा हा प्रयत्न आहे हे विधान मला जास्त पटले. अमेरिकेमधे राष्ट्राध्यक्षाला कितीही महत्व अअसले तरी वेळप्रसंगी त्याचे वाभाडे काढायला (क्लिंटन, बुश) अमेरिकन माध्यमे व नागरिक मागे पुढे पहात नाहीत. अशा परिस्थितीत अध्यक्षाचे दैवतीकरण केले जाईल ही कल्पना काही मला पटली नव्हती. तसेच ऐतिहासिक राजे (ज्यांना देवपण मिळणे हे त्यांचे देशावर, सैन्यावर नियंत्रण आणि व्यक्तिगत फायदे यासाठी खूप लाभदायक होते) त्याच्याशी अमेरिकन अध्यक्षाची तुलना जरा ओढून ताणून होते आहे असे वाटले. परंतु आता केलेल्या खुलाशानंतर या दोन गोष्टीत काहीतरी समान सूत्र आहे हे मान्य.
मात्र अमेरिकन कॉन्ग्रेस सभागृहातली चित्रे आपल्याकडच्या पानवाल्याच्या दुकानात शंकर, साईबाबा, नेहरू आणि केनेडी यांची चित्रे लावलेली जशी पूर्वी असत त्यातलाच प्रकार वाटला. दोन्ही कडचे बौद्धिक सामर्थ्य बहुदा एकाच पातळीवरचे असावे. अमेरिकेतील बहुसंख्य लोक असा विचार करत नाहीत हे त्या देशाचे भाग्यच समजता ये ईल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
दैवतीकरण
वॉशिंग्टनचे जे चित्र आहे त्याप्रकारच्या चित्राला दैवतीकरणाचे चित्र म्हणूनच ओळखले जाते. अर्थातच, वर म्हटल्याप्रमाणे वॉशिंग्टनचा पंथ किंवा देऊळ तयार करण्यासाठी ते काढलेले नाही. अमेरिकन जनता राष्ट्राध्यक्षांचे वाभाडे काढण्यास तयार असली तरी वॉशिंग्टन आणि लिंकन यांच्याबाबत अतिशय "सॉफ्ट कॉर्नर" ठेवून असतात असे वाटते.
मी सहसा वॉशिंग्टनविषयी वाह्यात विनोद वगैरे ऐकलेले नाहीत (नसतीलच असे नाही पण जसे गांधीजींविषयी दिसतात तसे ऐकलेले नाहीत आणि ही माझी चूक असेल किंवा माझे वाचन अपुरे असेल आणि असे कुणी दाखवले तर गैरसमजही दूर होईल तेव्हा चू. भू. दे. घे.)
दैवतीकरण
लेख आणि माहिती आवडली. विशेषतः वॉशिंग्टनचे चित्र. हे चित्र अजून समजले नाही. कदाचित त्यावर लेबल टाकले असते तर जास्त चांगले समजले असते.
या लेखात दोन पद्धतीची आर्ग्युमेंटस आहेत. एकात जो राजा आहे (वा त्याचे वंशज) तो स्वतःचे दैवतीकरण करतो. तर दुसर्यात खूप दिवसांनी वेगळेच लोक त्याचे दैवतीकरण करतात.
यातील पहिले आर्ग्युमेंट निर्विवाद आहे. त्यात त्या राजा/राणीचा फायदा आहे. पण दुसर्यात तसा काहीच फायदा दिसत नाही.
जॉर्ज वॉशिंग्टनचे उदाहरण दुसर्या प्रकारात बसते. त्यामुळे त्याकडे थोडे संशयाने पहावे वाटले. चित्रातील देवता रोमन/ग्रीक आहेत. (ख्रिश्चन धर्मात देवदूत दाखवले असते.) त्यांच्या बद्दल आदर/कुतुहुल असू शकते पण पूज्य भाव असणे कठीण. दैवतीकरण त्यामुळे होणार नाही. त्या ऐवजी ते चित्र एक उत्तम चित्र, कविकल्पने सारखे चित्र कल्पना मांडणे जास्त योग्य ठरेल. चित्र कोणी काढले, कुणाच्या सांगण्यावरून काढले अशी माहिती मिळाली तर अधिक समज करता येईल.
'स्चतःचे दैवतीकरण ही राजांची गरज असते' हे फार चपखलपणे मांडले आहे.
प्रमोद
दोन पद्धतीची आर्ग्युमेंटस
हो बरोबर. :-) एक त्यांच्या हयातीतील प्रयत्न आणि दुसरे मृत्यूपश्चात प्रयत्न (जसे जयवर्मनसाठीही झाले.)
होय त्याकडे संशयाने बघितले जाते म्हणूनच फ्रीमेसनरीची कॉन्स्पिरसी थिअरी तेथे चिकटवता येते. पारंपरिक अर्थाने दैवतीकरण झाले असे मला म्हणायचे नाही हे वर म्हटले आहेच पण जॉर्ज वॉशिंग्टन हा सर्वश्रेष्ठ असल्याचा (झ्यूसमध्ये रूपांतर) हा प्रयत्न असावा असे वाटते. (जसे गांधींना महात्मा बनवण्याचा)
हे चित्र प्रसिद्ध असल्याने मी खूप लिहित बसले नाही पण ते कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून काढले याची माहिती लेखात आहेच. अधिक माहिती आणि मोठी चित्रे विकीवर मिळतील.
नजरेआड झाले
पण ते कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून काढले याची माहिती लेखात आहेच
हो, चित्र बघण्याच्या नादात तपशील डोळ्याआड झाला!
मोठे चित्र आणि विकीवरील दुव्यावरून भरपूर शंकानिरसन झाले. विकी वरील युद्ध, विज्ञान वगैरेची चित्रे खूप छान आहेत.
एका कठीण प्रसंगानंतर (सिविल वॉर) पूर्वराजाचे दैवतीकरण करणे हे कदाचित राज्यासाठीही हिताचे असेल. (राजारामाने शिवाजीचे मंदिर बांधले आहे याची आठवण झाली.)
प्रमोद
कोठे?
सहमत! विविधतेत एकता हा बॅनर म्हणूनच तेथे येत असावा असा माझा अंदाज आहे आणि केवळ निरीक्षण, ठोस पुरावा वगैरे नाही. :-)
हे कोठे आहे? अद्याप सुस्थितीत आहे का?
कोकणात
मंदिर बहुदा कोकणात आहे. अजून शाबूत असावे. मी कुठल्यातरी पुस्तकात मूर्तिचा फोटो पाहिला होता. तिथे जाऊन येण्याची इच्छा होती. पण राहिली. आठवणीप्रमाणे ते तळ कोकणाकडचे ठिकाण असावे.
प्रमोद
सिंधुदुर्ग
यावरून आठवलं की वरील मंदिरासारखे सिंधुदुर्गावर राजांचे पंजे आणि पावले यांचे ठसे आहेत* असे सांगितले जाते. तेथेही त्याला फुले वगैरे वाहून पूजा करतात असे आठवते.
सिंधुदुर्गावर फार लहानपणी गेल्याने आठवणी पुसट झाल्या आहेत पण कोणाला आठवत असल्यास लिहावे.
* नेमके राजांचे आहेत का नाहीत हे माहित नाही.
शिवाजी मंदिर
सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी राजांचे मंदिर आहे.
चन्द्रशेखर
ऐकून आहे बॉ
* नेमके राजांचे आहेत का नाहीत हे माहित नाही.
>>> असावेत. तसे तिथले लोक तरी म्हणतात. पंजे वेगळ्या घुमटीत आहेत् व पाऊले वेगळ्या. आणि त्याना इतकस मोक्याच ठीकाण दिलेल नाही. आणि मंदिर वेगळ्या ठिकाणी आहे.
त्यामुळे ते पाऊले व पंजे इंदुलकरांचे असण्याचीही 'शक्यता' वर्तवता येईल. बाकि ईतिहासतज्ज्ञानाच माहिती.
आम्ही शक्यता वर्तवमात्र
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
सिंधुदुर्ग
नेमके शिवाजी राजांचे मंदिर आहे. मी ते बघितलेले आहे. त्याच प्रमाणे एका पंजाचा ठसा बुरूजाच्या भिंतीच्या मधे एका ठिकाणी आहे.मनगट अतिशय रूद दिसते. अर्थात तलवार चालवायची म्हणजे ते आवश्यकच होते. पावलाचा ठसा मला तरी कोठे बघायला मिळाला नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
लेख आवडला
अधिकारी व्यक्तीने दिलेला संदेश अन्याय्य, अनैतिक असला तरी तो पाळण्याकडे लोकांचा कल असतो असं प्रयोगांतून सिद्ध झालेलं आहे. (अपरिमित वेदना होत असताना दिसत असूनसुद्धा केवळ लॅब कोटमधल्या व्यक्तीने अधिकारवाणीने सांगितल्यामुळे अधिकाधिक तीव्र विजेचे झटके देण्याचा प्रयोग आठवतो). पोलिस, सैनिक वगैरेंचा सहज ओळखू येणारा गणवेश असतो. राजासाठी या अधिकारदर्शक गोष्टी निर्माण कराव्या लागतात. डोळे दिपवणारा राजमुकुट, छाती दडपवून टाकणारी राजसभा, उंचावर असलेलं सिंहासन... हे सगळे राजा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचे व्हिज्युअल प्रयत्न आहेत. लोक ज्यासमोर आपसूकच मान लववतात त्या देवाशी नातं सांगणं ही दुसरी पद्धती. स्वतःचे पुतळे उभारणं, स्तंभ उभारणं हेही त्याच गटात बसणारं.
धर्मसत्तेने/लोकवाङमयाने या व अशाच युक्त्या वापरून मुळात देवाला देवत्व दिल्यानंतर त्याचाच आधार घेऊन राजांनी स्वतःची प्रतिमा अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला. उंच वृक्षावर वेली चढाव्यात तसं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
चांगला लेख
राजा हा साक्षात् देवाचा अवतार आहे, ही कल्पना जुनी आहे खरी.
वॉशिंग्टनच्या देवत्वाभिषेकाचे चित्र मात्र सत्य-नव्हे-तर-अलंकारिक-रूपक म्हणून स्पष्ट असावी असे वाटते.
(लेख "क्रमशः" असावा अशी विनंती. राजांच्या ईश्वरी अंशाबद्दल सर्वेक्षण आहे, तितपत लांब वॉशिंग्टनच्या चित्राबद्दलच्या एका उदाहरणाबाबत विवरण आहे. पुढल्या भागात अन्य राजाच्या किंवा पुढार्याच्या देवत्वाभिषिकाबद्दल इतपत विस्ताराने माहिती असावी, असे वाटते. कदाचित एम् जी आर किंवा जयललिता यांच्या देवळांबाबत...)
हाहाहाहा!!
_/\_
विस्तार राजाचा
"राजा हा अंश ईश्वराचा" या कल्पनेचा व्यत्यास म्हणजे "देव हा विस्तार राजाचा"
राजामध्ये राज्याभिषेकाच्या वेळी देवाचा अंश उतरतो, अशा प्रकारचे काही वाचल्याचे अंधुक आठवले. म्हणून ऐतरेय ब्राह्मणातला राजसूय यज्ञाचा/राज्याभिषेकाचा विधी पुन्हा तपासला.
त्यात प्रजापतीकडून इंद्राच्या अभिषेकाचे वरणन आहे, आणि सार्वभौमत्व इच्छिणार्या राजाने तसाच ऐंद्र अभिषेक करवून घ्यावा, म्हणून तपशीलवार वर्णन आहे. पण त्यातील बहुतेक मंत्रांत इंद्रत्व हे रूपक आहे, असे थेट तरी सांगितले आहे, किंवा बर्यापैकी स्पष्ट आहे.
मात्र इंद्राच्या अभिषेकाच्या वर्णनात मात्र क्षत्रिय/राजाच्या अधिकारासाठी इंद्राला तसा अभिषेक करवून घ्यावा लागला, असे हेतुवर्णन आहे.
अंश देवाचा<->विस्तार राजाचा हे दोन्ही दिशेचे संबंध परिस्थितीनुसार मनात येत असतील आणि वापरले जात असतील असे वाटते.
इंग्रजीमध्येसुद्धा एकीकडे देवाला "लॉर्ड, किंग" वगैरे संबोधतात. आणि दुसरीकडे राजाच्या दैवी शक्तींबद्दल तर कथा उपलब्ध आहेतच (आर्थर राजाला तळ्यातल्या बिगरख्रिस्ती देवीकडून तलवार मिळणे...). आणि राज्यारोहणाच्या वेळी राजाचा प्रमुख बिशपच्या हाती तैलाभिषेक होतो, त्या तेलातून ख्रिस्ती पवित्र-परमात्मा राजाच्या ठिकाणी येतो... वगैरे. (दुवा)
- - -
संदर्भ :
ऐतरेय ब्राह्मण संस्कृत मूलपाठ्याचा गूगलबुक्स दुवा - पूर्ण पाठ्य मोफत उतरवता येते. इंद्राच्या अभिषेकाचे वर्णन - पृष्ठे २०१-२०४, राजाच्या महाभिषेकाचे वर्णन पृष्ठ २०४ पासून पुढे
ऐतरेय ब्राह्मण इंग्रजी भाषांतराचा गूगलबुक्स दुवा - पूर्ण पाठ्य मोफत उतरवता येते. इंद्राच्या अभिषेकाचे वर्णन - पृष्ठे ३२९-३३१, राजाच्या महाभिषेकाचे वर्णन पृष्ठ ३३१ पासून पुढे.
विठ्ठल
विठ्ठल हा राजा आणि वारकरी हे त्याचे सैनिक अशा पद्धतीचे वर्णन वारकरी वाङ्मयात दिसते. रा.चि. ढेर्यांनी यावर लिहिल्याचे आठवते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असा तुकारामाचा अभंग आहे ते याच प्रकारच्या रूपकाचे. ढेर्यांनी इतर संतांचे दाखले दिले आहेत. देव हा राजाचा विस्तार या व्यत्ययाचे हे उदाहरण.
त्याच बरोबर 'देव हा आदरणीय व्यक्तिचा विस्तार' असे ही दिसते. 'विठू माझा लेकुरवाळा' वा देवींना आई म्हणणे हे त्यातलेच असावे.
प्रमोद
जीझस
जीझसलाही डेविडचा वंशज ठरवून किंग ऑफ किंग्ज वगैरे म्हटले जाते ना!
असो. दुव्यांसाठी धन्यवाद.
राज्य राजकारण सत्ता दमन इ इ
शिवाजी राजांना तर राज्याभिषेक नको होता. त्यांचा स्वतःचा राज्याभिषेकाला तीव्र विरोध होता. असे ऐकून आहे. मग तरी त्यांचा राज्याभिषेक का केला गेला?
यावर ईतिहासाचे जाणकार प्रकाश टाकतील ही अपेक्षा कम् विनंती!
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
?
शिवाजी राजांना तर राज्याभिषेक नको होता ही माहिती नवीन आहे.
उलट स्थानिक ब्राह्मणांनी क्षत्रिय नसल्याच्या कारणाने राज्याभिषेक करण्यास नकार दिला म्हणून त्यांनी काशीहून गागाभट्टांना आणून क्षत्रियत्व सिद्ध करवून राज्याभिषेक करवून घेतला.
(गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी बळेच दिलेली असू शकते)
नितिन थत्ते
??
आँ? काय म्हणता राव्??
उलट स्थानिक ब्राह्मणांनी क्षत्रिय नसल्याच्या कारणाने राज्याभिषेक करण्यास नकार ...........????
आपले राजे क्षत्रीय नव्हते????.... ही नवीनच् माहिती....! ऐकाव तितक् माझं "ज्ञान" कमी--> अत्यल्प--> अतिशय अत्यल्प असल्याच दिसुन् येतय्.....
गागाभट्टांना वेगळा साक्षात्कार झाला होता का??
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
दमड्या
पंडित गागाभट्टांची तत्त्वे विकत घेण्यात आली होती.
होन...
स्थानिक ब्राह्मण का इतके श्रीमंत झालेले राजांच्या कारकिर्दीत?? कि त्यांची तत्त्वे(?) विकत घेता येऊ नयेत?
राजे क्षत्रीय नाहित हे ते कशावरून म्हणत् होते? एवढा गाजवलेला पराक्रम दिसत नव्हता का "स्थानिकांना"?? जन्मावरून वर्ण ठरवणारं हे कसलं "तत्त्व"?
गीतेमधेच् म्हटलय् ना ते कि गुणकर्मःविभगशया ऑर समथींग लाइक दॅट्..... माझी स्मरणशक्ती चांगली असेल तर्..........?
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
लेख आवडला.
पण वर वॉशिंग्टनचे दैवतीकरण म्हटले आहे, वॉशिंग्टन डीसीला नाव हे जॉर्ज वॉशिंग्टनच्याच काळात दिले गेले असावे हे पाहता हे शक्य आहे असे वाटते. पण अमेरिकेत तसेही जिवंत माणसांच्या नावानेही वास्तू/जागा ओळखण्याची पद्धत आहे.
बाकी इतर चित्रांबद्दल माहिती वाचून हे अमेरिकेचेच दैवतीकरण आहे असे म्हणता येईल असे वाटले. वॉशिंग्टन नावावर श्लेष आहे का?
युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.
अमेरिका युद्धात विजयी कारण कोलंबियाची तिला मदत.
विज्ञान - मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.
अमेरिकेतील शास्त्रज्ञ/तंत्रज्ञांवरही बुद्धीच्या देवतेचा वरदहस्त आहे.
नौधन(सागरी)- समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.
रोमन देवतांचा वरदहस्त अमेरिकेच्या समुद्री सत्ता, कम्युनिकेशनवर दिसतो आहे.
वाणिज्य - मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.
अमेरिकेवर कुबेराचा वरदहस्त.
यांत्रिकी - या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.
अमेरिकन तोफा/स्टीमबोटी असाव्यात..
शेतकी - सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.
पाण्याची देवता अमेरिकन शेतीवर प्रसन्न आहे.
श्लेष नसावा
चित्राने दिलेली स्पष्टीकरणे ही छान आहेत. वॉशिंग्टनमुळे होणारी अमेरिकेची प्रगती असे दाखवायचे असावे.