शालीवाहनाचा राजवंश

शालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला. मूळ अकाउंटस ऑफिसर असलेले फडके, सेवानिवृत्तीनंतर (१९८९) प्राचीन भारतीय इतिहासात रस घेऊ लागले. त्यांनी १९९१ साली एम्.ए आणि त्यानंतर १९९७ साली पी.एच्.डी मिळवली. (डॉ. इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली). उत्खनन आणि इतिहास या दोहोतील त्यांचा व्यासंग चकित करणारा वाटला

पुस्तक छोटे आहे (११४ पाने.) त्यात तळटीपा नाहीत, संदर्भ पुस्तकांची यादी आहे पण नेमके कुठचे काय वाचायचे हे नाही. पुस्तकात अनेक अटकळी आहेत त्याबद्दल लिहिताना त्यांनी विरुद्ध अटकळींबाबत विचार केलेला दिसतो. पण तो अपूर्ण वाटतो. हे सोडल्यास पुस्तकातल्या अटकळी आणि त्यांचे विवेचन खूप नवीन विचारांना चालना देते. याशिवाय भरपूर माहिती मिळते. पुस्तक विस्कळीत वाटते पण शेवटपर्यंत वाचल्यावर त्यातील प्रकरणांची संगती लागते.

त्यांचे शालीवाहन राजवटीवरचे प्रतिपादन साधारणपणे असे आहे. शक हे मध्य अशियातले लोक. पर्शियाच्या सायरस -दरायसने इसपु ५५० च्या सुमारास गांधार आणि सिंधुपार प्रदेश इराणी साम्राज्याला जोडला. त्यावेळी शकांच्या वसाहतीतील काही भारताकडे सरकले. मौर्य साम्राज्यात फारसा टिकाव न धरता आल्याने ते दक्षिणे कडे सरकू लागले. आणि विदर्भात वैनगंगेच्या तिरी पवनी येथे आले. इसपू २३० मधे (अशोकाच्या मृत्युनंतर) आपले राज्य त्यांनी घोषित केले. इस. २३० (म्हणजे एकंदरीत ४६० वर्षे) त्यांचे राज्य विदर्भातून गोदावरी तिरी पैठण आणि नंतर आंध्रात स्थिरावले. याच दरम्यान सागरी आणि नद्यांमधील जलवाहतुकीमुळे भारताच्या दक्षिण भागात सुबत्ता आली. परशुराम हा देखील याच दरम्यान माहूर येथे राहत असे. त्याने दक्षिणेत (आणि कोकणात) नागरीकरण आणण्यास मदत केली. 'आश्वलायन गृह्यसूत्रे' हा या भागातील एक महत्वाचा ग्रंथ. यात चैत्यपूजा आहे. या प्रकारच्या चैत्यपूजेतून बुध्दपूर्वकालीन वेळी महाराष्ट्रात अनेक गुंफा तयार झाल्या. (भारतात १२०० गुंफा आहेत त्यातील ९०० महाराष्ट्रात आहे.) अस्थि मडक्यात घालून जमीनीत पूरून त्यावर समाधी बांधायची असा या समाजात रिवाज होता. त्याचेच रूपांतर नंतर खांबांवर उभारलेल्या स्तुपासारख्या चैत्यमंदिरात झाले. 'चितपावन' (कोकणस्थ) हे याच 'चैत्य' शब्दाचे रूप आहे.

या प्रतिपादनाच्या अनुषंगाने या पुस्तकात अनेक विषय हाताळले गेले आहेत. भारतात लेखनकला साधारण इसपू ६०० साली आली. (तत्पूर्वी चित्रलिपी असायची.) 'भास' (पाणिनी देखिल) नाटककार याच सुमारासाचा (भासाच्या नाटकांवरून आपल्या प्रतिपादनाला उपयुक्त अशा गोष्टी यात घेतल्या आहेत.). विदर्भात झालेले उत्खनन, सापडलेली नाणी यावरून केलेला कालनिर्णय. मृतांच्या समाधीत केलेली शिळावर्तुळाची योजना विदर्भात अनेक ठिकाणी सापडते. (ही पद्धत शकांची होती.) त्याचबरोबर माहूर (रेणूका-परशुरामाचे ठिकाण) येथेही ती मिळाली. याच भागात सापडलेल्या शिलालेखांवरून त्यांच्या प्रतिपादनास पुराव्यांची जोड मिळते.

फोनेशियन व्यापारांनी केलेले साहसी प्रवास. (त्यांनी अफ्रिका खंडाला वळसा घातला होता.) फोनेशियन हे वेताच्या होड्या वापरत असत. म्हणून ते भारतीय असावेत. ते सूर्यपूजक होते. आणि कोकणात त्याच प्रकारच्या सूर्यमूर्ती खूप मिळाल्या आहेत. (या फोनेशियन/फिनिशियन लोकांवर अधिक वाचायची उत्सुकता वाढली आहे.) इसपू. २७० मधील ग्रीक लेखक इरॅस्टोथेनिस याने असे वर्णन केले होते की गंगासागरातून श्रीलंकेला जाण्यास २० दिवस लागत. हेच व्यापारी पॉलेनिशियन बेटांवर (पॅसिफिक मधल्या) जात असत. ऑस्ट्रेलियात गेले होते. एवढेच नाहीतर या बेटांवर त्यांच्या सूर्यमूर्तीच्या खुणा अजून टिकून आहेत.

त्यांच्या प्रतिपादनातील मुद्यांमुळे कित्येक विषयातली उत्सुकता जागृत झाली. भासाची नाटके या प्रकरणात त्यांनी भासाच्या रामायणावरील व महाभारतातील नाटकांवर लिहिले आहे. आणि हे सगळे हल्लीच्या रामायण महाभारता विषयीच्या कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे. रामाला कळते की आपले वडील गेले. तिकडे रावण आचार्याच्या वेषात येऊन सांगतो की श्राध्दासाठी हरणाचे मांस (कांचनमृगाचे) सगळ्यात चांगले. राम शिकारीस जातो आणि सीताहरण होते. वनवास फक्त १२ महिन्यांचा असतो. भरत आपल्या आजोळी गेला असतो. वाटेत येताना तो एका गुहेत दशरथाचे चित्र पाहतो. त्यावरून समजते की ते आता नाहीत. (या दोन्ही पद्धती शकांच्या.) अशाच कथा महाभारताच्या आणि त्यावर नाटके आहेत. मराठी विश्वकोषात यावर चाळले असता असे कळले की भासाची ही नाटके मराठीत भाषांतरीत होऊन १९३१ साली प्रकाशित झाली आहे.

प्रतिपादनात अतिशयोक्ति असेल असे वाटते. पण मांडलेले विचार बर्‍याच पुराव्यांनी दिले आहेत. पुराव्याच्या आधारे लेखक स्वतःचे विचारविश्व उभे करतात. ते सुसूत्र आहे. पुस्तक जर अधिक संदर्भासह असते तर त्यावर विश्वास ठेवता आला असता. लेखकाच्या इतर पुस्तकात (वा शोधनिबंधात) हे कदाचित आले असणार. उत्सुकता मात्र मोठया प्रमाणात चाळवली गेली हे नक्की.

प्रमोद

Comments

गौतमीपुत्र शातकर्णी

उत्तम माहिती. येथे अधिक चर्चा करता यावी.

गौतमीपुत्र शातकर्णीवरील मागे झालेली चर्चा येथे संदर्भासाठी देते.

परशुराम हा देखील याच दरम्यान माहूर येथे राहत असे. त्याने दक्षिणेत (आणि कोकणात) नागरीकरण आणण्यास मदत केली.

हा परशुराम नेमका कोणता? रेणुकापुत्र परशुरामाला इतक्या नंतर अस्तित्वास आणले तर रामायण महाभारताला कोठे ठेवायचे? की परशुराम ऐतिहासिक मानायचा?

त्यावेळी शकांच्या वसाहतीतील काही भारताकडे सरकले.

विक्रमादित्य शक राजा होता ना? त्याच्या कारकिर्दित विक्रम शके संवत्सर सुरु झाले. शातकर्णीने त्यावर विजय मिळवून शालिवाहन शक हे नवे कॅलेंडर सुरु केले ना?

लेख वाचून गोंधळ निर्माण झाला आहे. अधिक प्रश्न वेळ होईल तसे विचारते.

परशुराम

गौतमीपुत्र शातकर्णीवर झालेली चर्चा वाचली. मी वाचलेल्या पुस्तकात यातील बहुतेक मुद्दे आले आहेत. पुस्तक वाचल्यावर नाणेघाटात जायची इच्छा होत आहे.

लेखकाने दिलेल्या माहिती नुसार. परशुरामाचा उल्लेख 'राम जामदग्न्य' असा होत असे. ऋग्वेदात (दहाव्या मंडलात सूक्त ११०) मधे राम जामदाग्न्य असा उल्लेख आहे. याच ऋचा अथर्ववेदात आहेत. लेखकाच्या म्हणण्यानुसार ऋग्वेदात ही सुक्ते नंतर घालण्यात आली. याचेच उदाहरण म्हणून पुरुषसुक्ताचा उल्लेख केला आहे. पुरुषसुक्तात शूद्रवर्णाचा उल्लेख आहे. पण असा वर्ण मात्र ऐतिहासिक काळात आला असे लेखकाचे म्हणणे आहे. अथर्ववेदाच्या वेळी जमदग्नी होता. त्याचा उल्लेख 'भार्गव वैदर्भी' असा केला आहे. (यावरून तो विदर्भात माहूरला असण्याबद्दल पुष्टी मिळते.) माहूरमधील उत्खननात शिळावर्तुळे सापडल्याने पुढील कयास बांधला आहे. लेखकाच्या मते परशुराम हे नाव रामजामदग्न्य नावाऐवजी वापरण्याचा काळ यानंतरचा. म्हणून सातवाहन शिलालेखात जामदग्न्य असा उल्लेख आहे. भासाने देखिल असाच उल्लेख केला आहे.

रामायण महाभारतातील परशुरामाच्या कथा या नंतर आल्या आहेत (लिखाणाच्या वेळी) व त्या कथा काढल्यातरी मूळ कथांना कसली बाधा पोचत नाही. असे ही लेखकाचे म्हणणे आहे.

विक्रमादित्य शक राजा होता ना? त्याच्या कारकिर्दित विक्रम शके संवत्सर सुरु झाले. शातकर्णीने त्यावर विजय मिळवून शालिवाहन शक हे नवे कॅलेंडर सुरु केले ना?

यावर पुस्तकात कसलाच उल्लेख नाही. माझी अशी समजूत होती की शकांना हरवून शालिवाहनाने स्वतःची कालगणना सुरु केली. पण पुस्तकातील प्रतिपादनाने त्या समजुतीस तडा गेला.

प्रमोद

माझीही

माझी अशी समजूत होती की शकांना हरवून शालिवाहनाने स्वतःची कालगणना सुरु केली.

-माझीही अशीच समजूत होती.

सातवाहन का॑ आन्ध्र घराणे

इतिहासाच्या इंग्रजी पुस्तकांच्यात सातवाहन राजांचा उल्लेख आन्ध्र राजघराणे असा येतो.हे नाव या राजघराण्याला का पडले असावे या बद्दल कोणी काही सांगू शकेल का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आंध्र

(थोडक्यात लेखकांनी लिहिलेले मांडतो.)
सातवाहनांना पुराणांनी आंध्र म्हणून संबोधिले आहे. (बहुदा भविष्यपुराणाचा हा उल्लेख आहे.) त्यात कुठेही सातवाहन हे नाव नाही. या वंशाचे ३० राजे होऊन गेले. आणि प्रत्येकाचा कार्यकाल पुराणांनी दिला आहे. महाराष्ट्रातील (पश्चिम) गुहांमधे जे शिलालेख होते त्यातील राजांची यादी पुराणातल्या यादीत जुळते. मात्र शिलालेखांमधे कुठेही आंध्र म्हणून संबोधन नाही. मौर्यकालात फक्त विदर्भातील राज्याला 'अश्मक' म्हणायचे. त्याच्या सीमांच्या वर्णनावरून हे निश्चित होते. हा भाग सातवाहनांकडे होता अशा तर्‍हेचा शिलालेख ओरिसात (कलिंग) आहे. याशिवाय विदर्भात सातवाहन राजांची नाणी भरपूर प्रमाणात सापडली. अकोला १६००, अडम (नागपूर जवळील एक गाव) ६०००. याउलट आंध्र वा पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अशा खुणा कमी सापडल्या. कोटलिंगला सातवाहन २३४, सातकर्णी ४७ आणि चिमुक २५ अशी नाणी सापडली. जास्त शिलालेख प. महाराष्ट्रात आहे. अन्य विद्वानांच्या (मिराशी) मते सातवाहन पूर्वी जुन्नरला होते. तिथून ते पैठणला गेले आणि शेवटी आंध्रात गेले. लेखकाच्या मते ते पवनी (पूर्वीचे नाव पोतनम्) आधी होते. यात एक श्लोक, एक शिलालेख आणि पवनी, अडम इत्यादी ठिकाणचे उत्खनन असे बाजुने पुरावे आहेत.

पहिल्या वीसराजांच्या नावात 'श्वात' आहे हा मध्य अशियातील श्वात, सुवात नदीचा उल्लेख आहे असे लेखकाचे म्हणणे आहे.

प्रमोद

बरीच वेगवेगळी माहिती

पुस्तक वाचताना विस्कळित वाटले असेल, त्याची कल्पना येत आहे.
विचार करण्यासारखी खूप माहिती आहे.
पुस्तकाची ओळख दिल्याबाबत धन्यवाद.

हराप्पा संस्कृतीच्या त्यातल्या त्यात आधुनिक (म्हणजे तरी प्राचीनच) स्तरांमध्ये अस्थि पुरायची मडकी सापडली होती, त्याबद्दल दा.ध.कोसंबी संदर्भ देतात. जर हा रिवाज मध्य-आशियाई असेल, तर बहुधा त्याचा भारतात संकर आधीपासून झाला असावा. फक्त शकांपासूनच नव्हे. शकांनी प्रथा दक्षिणेपर्यंत पोचती केली असेल - माहीत नाही.

आश्वलायन गृह्यसूत्रे शकांची हे वैशिष्ट्यपूर्ण... गृह्य सूत्रांबद्दल आणि श्रौत सूत्रांबद्दल संदर्भ, आणि त्यातील वचने प्रमाण म्हणून संस्कृत शास्त्रार्थ-वाङ्मयात खूपदा दिसतात. प्रथांबद्दल आधारसामग्री म्हणून इतिहासाच्या आधुनिक चर्चेतसुद्धा हे गृह्य-श्रौत-सूत्रवाङ्मय येते. शिवाय "ज्याचा संदर्भ ग्रंथांत आहे, त्या आचार्याचा काळ ग्रंथाच्या पूर्वीचा मानावा" अशा प्रकारच्या प्रमाणांतही गृह्य-श्रौत-सूत्रवाङ्मय उल्लेखले जाते. या वाङ्मयाशी माझी मुळीच ओळख नाही, याबद्दल थोडेसे शल्य वाटते. ओळख चांगली असती, तर शकांच्या चर्चेत त्यांचे महत्त्व अधिक जोखून-पारखून समजले असते.

हराप्पा

हराप्पा संस्कृतीबद्दल लेखकाने फारशी टिपणी केली नाही. मडक्यात अस्थि पुरायच्या आणि सोबत शिळा वर्तुळे करायची ही शक लोकांची पद्धत. याच पद्धतीचे अनेक दाखले विदर्भातील उत्खननात मिळतात. (उदा. माहूर येथील उत्खनन )

याशिवाय चैत्य लाकडाचे असल्याने आज शिल्लक नाहीत. पण त्यांची चित्रे आहेत असे लेखक सांगतो.

आश्वलायन गृह्यसुत्रावर अधिक (मूळ स्वरूपातील ग्रंथ) वाचायची इच्छा आहे.

प्रमोद

वा

छान ओळख करून दिलीत.
थोडक्यात लेखका विषयीची ओळख वाचून अजूनच आवडले.
पुस्तक मिळाले तर नक्की वाचेन.
(थोडे आधी कळते तर मागवताही आले असते.)

-निनाद

आतापर्यंतचे सर्वोत्तम

चर्चा चांगली चालली आहे. इतिहासाबाबत असलेल्या नावडीमुळे ह्याबद्दल अधिक मत देता येत नाही.
पण मी असे नेहमीच म्हणतो की, सध्या मानव जसे जीवन जगत आहे, ते आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे.

माहिती की ठोकताळे?

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
पुस्तक विस्कळीत आहे हे जाणवते. शिवाय स्पष्ट संदर्भ, तळटीपा यांविना पुस्तकात ऐतिहासिक माहिती आहे की ठोकताळे? असा प्रश्न पडला.
तरीही पुस्तकातली (धाडसी वाटणारी) विधाने तपासण्याजोगी आहेत हे नक्कीच.
उदा. भारतात लेखनकला साधारण इसपू ६०० साली आली. (तत्पूर्वी चित्रलिपी असायची.) - हे खरे असेल तर ही चित्रलिपी आणि अर्वाचिन लेखनकला यांचा 'रोझेटा स्टोन' कुठे मिळण्याची शक्यता आहे? या चित्रलिपीचा हरप्पन लिपीशी काही संबंध आहे काय? वगैरे.

छान लेख

माहिती देणारा छान लेख.

कुशाण टोळ्यांचे पारीपत्य केल्यावर शालिवाहनाने सुरु केलेले शालीवाहन शक हे माहिती होते फक्त आता पर्यंत.

http://rashtravrat.blogspot.com

आन्ध्र राजघराणे

माझ्याकडे ए.व्ही.विलियम्स जॅकसन व वि न्से न्ट ए. स्मिथ या लेखकांनी लिहिलेल्या व 1906 या साली प्रसिद्ध झालेल्या हिस्टरी ऑफ इंडिया या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. यावर खालील माहिती मला मिळाली इ.स.पूर्व 27 या कालात सुशर्मन हा कण्व किंवा कण्वायन कुलातला राजा दख्खन (कृष्णा व गोदावरी नद्यांच्या खोर्‍यातील प्रदेश) प्रदेशात राज्य करत होता. आन्ध्र राजकुलातील एका राजाने त्याचा वध करून हे राज्य स्वत:च्या ताब्यात घेतले. आन्ध्र हे राजकुल इ.स.पूर्व 220 या कालापासूनच अस्तित्वात होते. त्यामुळे त्या कुलापैकी कोणत्या राजाने सुशर्मन राजाचा वध केला हे सांगता येत नाही. आन्ध्र राजांची राजधानी कृष्णा नदी काठी असलेले श्रीकाकुलम हे गाव होते. आन्ध्र राजघराण्याचे सर्व राजे स्वत:ला सातवाहन कुलाचे मानत असत व स्वत:ला सातकर्णी हे पद लावून घेत असत. त्यांचे वैयक्तिक नाव हे ज्ञात नसे त्यामुळे कोणता राजा राज्य करत होता हे सांगणे बर्‍याचदा अवघड होते. 17 व्या आ न्ध्र राजाचे नाव 'हल' हे होते ही माहिती सप्तशतकी या मराठी काव्य ग्रंथात त्याच्या नावाचा उल्लेख असल्याने आपल्याला मिळते. आन्ध्र घराण्यातील 21 ते 23 क्रमांकाच्या राजांची माहिती त्यांनी पाडलेल्या नाण्यांच्या वरून मिळते. 21वा राजा पहिला विलिवायकुर हा राजा इ.स.84 मधे गादीवर आला. हा फक्त 6 महिने गादीवर होता. त्याच्या नावाने पाडलेली नाणी उपलब्ध आहेत. या नंतर शिवलाकुर हा त्याचा पुत्र गादीवर आला. त्याने 28 वर्षे राज्य केले व नंतर राजदंड आपला मुलगा दुसरा विलिवायकुर याच्याकडे सोपवला. शिवलाकुर हा मोठा पराक्रमी होता. त्याच्या राज्याच्या पश्चिमेस असलेल्या शक, पल्लव व यवन राजांचा त्याने पराभव केला. या राजांची राज्ये मालवा,गुजरात आणि काठियावाड येथे होती. (या तिन्ही राज्यांबद्दल या पुस्तकात बरीच माहिती दिलेली आहे.)नाहक आणि नहापणा या राजांनी आ न्ध्र राजांशी युद्धे सतत चालू ठेवून बरीच हानी पोहोचवली होती. इ.स.126 मधे विलिवायकुर दुसरा या आन्ध्र राजाने या सर्व पश्चिमेकडच्या शत्रूंचा पूर्ण नाश केला न नहापणा या राजाचा वध केला व चाष्टण या आपल्या क्षत्रपाची उज्जैन येथे नेमणूक केली. इ.स.144 मधे दुसरा विलिवायकुर या राजाची आई 'बलश्री' हिने एक शिला लेख लिहून आपल्या मुलाचे कर्तुत्व रेकॉर्ड करून ठेवले आहे. चाष्टण क्षत्रपाचा वंश उज्जैन च्या गादीवर पुढे अनेक पिढ्या राहिला. चवथ्या शतकात हो ऊन गेलेला चंद्रगुप्त विक्रमादित्य राजा याच्याच वंशातला होता.
इ.स.138 मधे दुसर्‍या विलिवायकुर राजाचा मुलगा दुसरा पुलमयी हा गादीवर आला. चाष्टण या क्षत्रपाचा नातू रुद्रदमन याने आपली मुलगी दक्षमित्रा हिचा विवाह पुलमयी राजाशी करून त्याच्याशी नाते जोडले. हे नाते असूनही पुलमयी व रुद्रदमन यांच्यात इ.स. 145 मधे युद्ध झाले व त्यात रुद्रदमन विजयी झाला. पुलमयी आपला जावई असल्याने त्याने फक्त आपला मुलुख परत ताब्यात घेऊन पुलमयीला सोडून दिले.

हा सर्व इतिहास सत्य मानला तर मग खालील प्रश्न उरतात.

शालीवाहन राजा कोण? त्याच्या नावाने शक का सुरू केला? आणि या शालीवाहन राजाने कोणत्या विक्रमादित्याचा पराभव केला?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

प्रादेशिक सीमा

१९४७ पर्यंत व काही अंशी पुढेही कधीच प्रादेशिक सीमा कायमस्वरुपी नसलेल्या ह्या देशात, भाषिकप्रदेश निर्माण करुन लोकांना त्यातच राहायला सांगितले जात आहे. एखाद्या विभागाने वेगळे होणे मागितले तर त्यात गैर काय हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. अजुन किती वर्षे भारतात हेच प्रदेश असेच राहू शकतील?

याआधीची चर्चा

या आधीची चर्चा आणि त्यातील वंशावळ वाचली तर शातकर्णी आणि सातवाहनांची माहिती मिळते. स्वातीकर्णी, शातकर्णी, सातकर्णी हे बहुधा पद असावे कारण त्या वंशावळीत अनेक राजांनी ती उपाधी लावलेली दिसते.

सातवाहन या नावाचा अर्थ माझ्यामते सूर्य असा होत असावा. चू. भू. दे. घे. सूर्याच्या वाहनाला सात घोडे असतात म्हणूनही असेल. कदाचित आपण सूर्यवंशी आहोत हे दर्शविण्यासाठी असावे परंतु नेमके माहित नाही.

शालिवाहन याला गौतमीपुत्र या नावाने ओळखले जाते. शालिवाहन हे नाव त्याने नंतर धारण केले असावे? यातील "शालि" या शब्दाचा अर्थ शाळीग्रामाशी संबंधित आहे का? किंवा वरील सात हे देखील एखाद्या शब्दाचे भ्रष्ट स्वरुप आहे का? असे करून (शाळीग्राम) विष्णूशी वगैरे संबंध दाखवायचा आहे का वगैरे प्रश्न मनात आले.

गौतमीपुत्र

मी वर दिलेल्या संदर्भाप्रमाणे इ.स.144 मधला शिलालेख कोरून घेणार्‍या राजमातेचे नाव बलश्री असे असून ती गौतम घराण्यातील असल्याने तिला गौतमी असे म्हणत असत. तिचा पुत्र दुसरा विलिवायकुर हा राजा असावा.
हा विलिवायकुर म्हणजे प्रियाली यांनी दिलेल्या यादीतला 23वा राजा किंवा गौतमीपुत्र शातकर्णी असला पाहिजे. म्हणजे शातकर्णी, सातवाहन, शालीवाहन ही सर्व या दुसर्‍या विलिवायकुर राजाची पदे किंवा घेतलेली नावे असावीत.
अवांतर

आईच्या नावाने हा राजा ओळखला जात होता ते तेंव्हाच्या पितृसत्ताक पद्धतीत कसे मान्य झाले ते कळत नाही?

त्याचप्रमाणे विलिवायकुर हे नाव संस्कृतोद्भव वाटत नाही. हे राजे तमिळ असू शकतात का?

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आईच्या नावाने ओळखणे

आईच्या नावाने ओळखणे हे आपल्या संस्कृतीस नवे नाही.

उदा.

ऐलराजवंश इलेच्या मुलांचा म्हणून ओळखला जातो.

अशी आणखीही उदाहरणे आहेत. सध्या कामात असल्याने आठवत नाहीत पण नंतर लिहिन.

पुलमयी राजा

दुसर्‍या विलिवायकुर राजाचा पुत्र किंवा 24व्या सातवाहन राजाचे नाव मी वर दिलेल्या संदर्भाप्रमाणे पुलमयी आहे. ते प्रियालीताईंनी दिलेल्या पुलोमत या नावाशी बरेच मिळते जुळते वाटते. तसेच विलिवायकुर राजाच्या बापाचे नाव या संदर्भात शिवलाकुर असे दिले आहे ते प्रियालीताईंच्या यादीत शिवस्वाती आहे. दुसरा विलिवायकुर राजा हाच शालीवाहन असला पाहिजे या साठी हे आणखी दोनसंदर्भ वाटतात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गोदावरी

थोडा प्रतिसाद आधी दिला आहे.
लेखकाच्या म्हणण्यानुसार सातवाहनांनी जलमार्गाची वाहतूक सुरु करून दक्षिणेस भरभराटीला आणले. पश्चिम किनार्‍यावर माल उतरवायचा, नाणेघाट मार्गे घाटावर चढवायचा. मग गोदावरीतून पूर्व किनार्‍यावर न्यायचा. (आणि उलट सुद्धा). गोदावरीचा जलवाहतुकीसाठी उपयोग हा त्यातील एक भाग असावा. विदर्भातील वैनगंगा (पवनी) आणि पैनगंगा (माहूर) या नद्या गोदावरीच्या उपनद्या (पण गोदावरी पेक्षा जास्त जलसाठा असलेल्या) याच जल वाहतुकीतील एक टप्पा मानता येतो.

आंध्रतील त्यांचे अस्तित्व त्यामुळे साहजिक आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार पुराणे इस ३००-४०० मधे झाली असल्याने त्यांच्यात जागांचा इतिहास नीटसा नाही. ना सातवाहन नावांचा.

प्रमोद

भासाची नाटके

भासाची नाटकांबद्दल उत्सुकता वाटते. त्याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

आणि हे सगळे हल्लीच्या रामायण महाभारता विषयीच्या कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे.

शक्य आहे परंतु याला भास एकटाच अपवाद नसावा. विशाखादत्ताचे मुद्राराक्षसही याच प्रकारचे आहे. त्यात पर्वतकाचा मृत्यू विषकन्येमुळे होतो. या विषकन्येला आधी चंद्रगुप्ताचा नाश करण्याकरता पाठवलेले असते. पर्वतक म्हणजेच पुरु (पोरस) असा सर्वसामान्य संकेत आहे. परंतु प्रत्यक्षात पुरुचा मृत्यू हे चाणक्याचे षड्यंत्र नव्हते.

भासाची नाटके नाट्यशास्त्राचे नियम पाळत नाहीत असे विकीवर वाचले. मागे गूगलबुक्सवर मुद्राराक्षसात नाट्यशास्त्राचे नियम कसे पाळावे यावर एक पुस्तक वाचले होते. दुर्दैवाने मला ते आता मिळत नाही. (मी नेमके काय सर्च केले होते ते आठवत नाही परंतु ते पुस्तक अतिशय रोचक होते.)

असो. तर, भासाची नाटके नाट्यशास्त्राचे नियम पाळत नाहीत याबाबत लेखक काही लिहितात का?

भासाची नाटके आणी मुद्राराक्षस

लेखकाने दोन्हींचा उल्लेख काही पाने भरून केला आहे.

भासाची काही नाटके दु:खांत आहेत हे नाट्यशास्त्राच्या नियमाला धरून नाहीत. म्हणून ती त्यापूर्वीची आहेत.
त्याच्या नाटकात रामायण महाभारतापेक्षा वेगळ्याच गोष्टी येतात. पंचरात्र नाटकात दूर्योधन एका यज्ञाच्या समाप्तीनंतर दक्षिणा वाटताना दिसतो. त्यात गुरु द्रोण 'कौरव पांडवात' समेट व्हावा अशी दक्षिणा मागतात. दूर्योधन अट घालतो की त्यांनी पाच दिवसात त्यांना शोधले तर तो समेट करेल. म्हणून विराटावरचा हल्ला. त्यात अभिमन्यु कौरवांकडून लढतो आणि अर्जुनाला ओळखतो. दूर्योधन अर्धे राज्य देऊन समेटास तयार होतो. (शेवटी युद्ध होते ते वेगळे.)

उरूभंग नाटकात, दुर्योधन धारातिर्थी पडला असताना समेट करतो. सगळ्यांची क्षमा मागून मरतो.

मुद्राराक्षसात आर्य चाणक्य ज्या साम्राज्याचा उल्लेख करतो त्यात दक्षिणे कडचे देश नाहीत. (यावरून सातवाहन हे पूर्वी विदर्भात होते याला पुष्टी मिळते.) या गोष्टीचा उल्लेख लेखकाने केला आहे.

प्रमोद

सहमत

भासाची काही नाटके दु:खांत आहेत हे नाट्यशास्त्राच्या नियमाला धरून नाहीत. म्हणून ती त्यापूर्वीची आहेत.

भासाची नाटके नाट्यशास्त्राच्या पूर्वीची असावीत हे मीही वाचले आहे. दु:खांताबद्दल आठवत नाही पण मला वाटते, स्टेजवर मृत्यू दाखवू नये, लढाई दाखवू नये, पात्रांनी कोण-कोणत्या भाषांत बोलावे, सूत्रधाराने नाटकाची सुरुवात करावी असे अनेक नियम त्यात होते.

मला ते पुस्तक पुन्हा वाचायला मिळाले तर बरे होईल पण शोधून सापडत नाही आता.

वाचनीय

प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे तसेच चर्चेत विविध संदर्भपैलूंबाबत उलगडा करण्याचे प्रयत्न करणाऱ्या इतर सहभागी उपक्रमींचे मनःपूर्वक आभार. आजवर माहीत नसलेल्या गोष्टींचा संक्षिप्त आढावा म्हणून हा चर्चा-प्रस्ताव (तथा इतर संदर्भ-दुवे) मी वाचला—अधिक जाणून घेण्याची लालसा उत्पन्न न झाली तर नवलच!

ही सगळीच

सर्वच माहिती नवीन आहे.
>>चैत्यपूजेतून बुध्दपूर्वकालीन वेळी महाराष्ट्रात अनेक गुंफा तयार झाल्या. (भारतात १२०० गुंफा आहेत त्यातील ९०० महाराष्ट्रात आहे.)
माझी अशी समजूत होती, की बुद्धाच्या काळानंतर या चैत्यभूमी तयार केल्या गेल्या. बहुतांशी व्यापारी/व्यापारउदीमाच्या मुख्य ठाण्यांना जोडणार्‍या मार्गांलगतच्या टेकड्यांमध्ये.

चित्पावनांमध्ये समारंभांनंतर बोडणाचा एक विशिष्ट विधी असतो. त्याचेही मूळ शोधायला हवे असे वाटते.

 
^ वर