रागनियमन

आपल्याला राग का येतो?
आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसऱ्याचा राग का येतो?

अहंकार
त्याने मला असे कसे म्हटले? मी एवढी त्याच्याहून मोठी आहे हे तो विसरला का? किंवा मी काय शिकलेला आणि तो काय शिकलेला? स्वत:ला माझा साहेब समजतो की काय? असे विचार आपल्या मनात येतात. म्हणजे कुठेतरी आपला अहंकार दुखावला गेलेला असतो. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो.

घाई
एकाच वेळेला आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात. मग त्या ठराविक वेळात आवरल्या जात नाहीत. किंवा ते करताना कोणी विचलित केले तरी आपल्याला राग येतो. समजा आपल्याला कुठेतरी जायचे आहे. इतर काही कामामुळे उशीर झाला आणि रस्त्यात जाताना सगळे वाहतूक दिवे लाल लागले की आपली चिडचिड होते. कार्यालयामध्ये काम करताना त्या दिवशीच्या कामाची यादी चाललेली असते आणि त्यात आठवण होते, आपल्याला कोणाला तरी दूरध्वनी करायची. अशा वेळी फोन लागत नसला किंवा व्यस्त लागला की आपली परत चिडचिड.
मग तो दूरध्वनी आपटला जातो किंवा हवी असलेली व्यक्ती भेटली नाही तरी राग येतो. फोनचा आणि त्या व्यक्तीचा. शिवाय बरेच काम अजून व्हायचे असते म्हणून त्या कामाचा.

अपेक्षा
आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. साधे म्हणजे आपण आपल्या मुलांकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून काही अपेक्षा करतो आणि ते जर आपल्या अपेक्षेनुसार वागले नाहीत की आपल्याला लगेच राग येतो.
आपण विचारही करत नाही की आपल्या अपेक्षा योग्य होत्या की नाही? त्यांच्या दृष्टिकोनातून विचार न करताच आपण रागवतो.

नकारात्मक विचार
छे असे होणारच नाही. आपणच नेहेमी भोगणार. आपण कितीही झटा, पण आपल्याला ते मिळणारच नाही. मी सांगतो, आमचे नशीबच वाईट. आम्हाला लगेच अशी नोकरी मिळणारच नाही. आमच्या नशिबात नुसते कष्टच आणि परत ह्या कष्टाचे फळ मिळणार नाही, ते नाहीच. आम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले पण तुम्हाला वाटते का की, ती मोठेपणी आम्हाला विचारतील? मी दिसायला इतका चांगला, इतकी चांगली नोकरी, आणि एवढे चांगले शिक्षण, पण आम्हाला कुठली आली त्या क्ष सारखी बायको मिळायला?

तर थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो. विचार करून पहा. आता आजूबाजूचे जग बदलणे सोपे, का आपण स्वत: आपले विचार बदलणे सोपे आणि शक्य आहे? आपला राग आपण नियंत्रित करणे सोपे आहे, का आपण इतरांचे वागणे बदलू शकणे सोपे आहे? आपला राग नियंत्रित करणे जास्त शक्य आहे, कारण ते आपल्या हातात आहे. आपल्याला येणारा राग हा सक्रिय प्रकारात मोडतो का निष्क्रिय प्रकारात मोडतो हे आधी जाणून घेतल पाहिजे.

आता सक्रिय राग म्हणजे काय? काहीतरी होते आणि आपल्याला राग येतो. म्हणजे आपली चांगली फुलदाणी कोणाच्या तरी हाताने फुटते मग आपल्याला त्याचा राग येतो. पण आपण जेंव्हा विचार करतो की, त्या माणसाने ती काही मुद्दाम फोडलेली नाही, तेंव्हा थोडया वेळाने तो राग शांत होतो. म्हणजे व्हायला हरकत नसते आणि अशावेळी जर सल राहिला नाही, तर तो सक्रिय राग झाला. माणूस चिडले आणि थोडया वेळाने शांत झाले.

दुसरा असतो निष्क्रिय राग. असा माणूस बाहेरून थंड असतो, पण आत मध्ये अगदी धुमसत असतो.

अगदी सगळ्या बाबतीत त्याला लोकांचा द्वेष, राग, तिरस्कार सगळेच असते, पण बाहेरून अगदी शांत असतो. त्याच्या मनात सूडाची भावनापण असते. तर असा राग फारच महाभयंकर असतो. आधी बघा तुमचा राग कशा प्रकारात बसतो ते. निष्क्रिय राग नियंत्रित करणे कठीण असते.

खालील गोष्टी करून काही फायदा होतो का ते बघा

१. अंतर-तपास: दिवसभराचा आढावा घ्या आणि बघा आपला राग सक्रिय होता का निष्क्रिय? आपण तो नियंत्रित केला की नाही? कशामुळे आपल्याला राग आला होता? तो योग्य होता का? आणि मग आपण आपली कृती सुधारण्याचा प्रयत्न करा.

२. सखोल श्वसन: राग आल्यावर हे जरूर करून बघा. राग कमी तरी होईल. आतताईपणाने निर्णय घेतला जाणार नाही. ताबडतोब तोंडाला आले ते बोलून टाकले जाणार नाही.

३. नकारात्मक स्थितीचा अस्वीकार: नकारात्मक स्थितीचा स्वीकार करू नका, किंवा तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. दुसरा रागावला असला आणि तो राग तुम्ही स्वीकारलाच नाही, तर तो राग त्याच्याजवळच राहील. म्हणजे कोणी रागावले असले आणि आपण त्यामुळे रागावलो नाही, शांतच राहिलो, तर आपल्याला त्या रागाचा त्रास होणार नाही. म्हणजे कोणी म्हटले की ह्या साध्या गोष्टी तुला करता येत नाहीत, तुला काही समजतच नाही. आता ह्या नकारात्मक गोष्टी आपण स्वीकारच केल्या नाहीत की राग येणारच नाही. ओरडणे, रागावणे त्या दुसऱ्याजवळच राहतील.

४. जागा सोडा: जागेचा त्याग करा. एखादा खूप रागावला आहे. खूप आरडाओरडा चालला आहे. तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, पण स्वत:ला परिस्थितीप्रमाणे जुळवून घेणे तुमच्या हातात आहे.

५. सौम्यपणे आणि सावकाश बोला: जे लोक सगळ्या गोष्टी घाईघाईने करतात किंवा जोरजोरात बोलतात, असे लोक लवकर रागवतात. लवकर संतापतात. आणि तसे पाहिले तर, आजूबाजूच्या लोकांना पण संतापवतात. आपण जर आपला निषेध किंवा आपला विरोध, आरडाओरडा न करता दाखवला, तर समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद पण मिळू शकतो किंवा आपण दुसऱ्याला पण पटवून देऊ शकतो. बघा पुढच्या खेपेला तुम्हाला कोणाचा राग आला आणि तुम्ही आरडाओरडा न करता तुमचा मुद्दा सांगितलात की समोरच्याला पटतो की नाही ते.

६. खाली बसा किंवा चक्क आडवे व्हा: रागावले असताना जर खाली बसले तर रागाचा आवेश कमी होतो. माणूस जेंव्हा उभा असतो तेंव्हा रागावून जास्त तावातावाने बोलत असतो असे लक्षात येईल. जरा खाली बसला, की रागाचा आवेश उतरतो.

७. जरा थंड पाणी पिऊन बघा.

८. दुसऱ्या बाजुनी विचार करून बघा: कोणावर रागवण्याआधी त्याच्या दृष्टीकोनातून विचार करून बघा. दुसरी व्यक्ती का रागावली असेल किंवा त्या व्यक्तीचे असे वागण्याचे कारण काय असेल?

ह्यातील काही गोष्टी पटतील, काही पटणार नाहीत. सगळेच उपाय प्रत्येक वेळेला लागू होतीलच असे नाही. राग संपूर्णपणे निघून जाईलच असेही नाही. पण निदान नियंत्रणात राहील किंवा थोडासा कमी होणे पण शक्य आहे. काही गोष्टी अंमलात आणणे शक्य आहे आणि काही फरक पडतो का ते बघता येण्यासारखे आहे. उपाशीपोटी राग जास्त येतो. राग आलेला असताना जर दोन घास पोटात गेले तर राग नाटयमयरीत्या कमी होतो असा अनुभव आहे. संतापाचा ताबडतोब निचरा करावा. ओरडा आरडा करून वगैरे. म्हणजे मन स्वच्छ राहतं, याउलट तो साठत राहिला तर त्याचं रूपांतर विद्वेषात होतं. हे सगळं रागवल्यावर आठवायला पण पाहिजे. यातला गमतीचा भाग सोडून दिला तरी, एक गोष्ट खरी की, रागाचा सामना करण्यासाठी आपल्या मनाला तयार करावं लागतं. सखोल श्वसन केल्यानंतर मन स्थिर झाल्याचा जो एक क्षण आपल्याला मिळतो, त्या एका क्षणात सगळा राग पचवून टाकण्याचं सामर्थ्य असते. ह्यानंतर बाकीचे उपाय करताना आपल्या जीवाचा तळतळाटपण होत नाही. विपश्यना, कोणत्याही प्रकारचं ध्यान, प्राणायाम अशा गोष्टींनी तयार केलेलं मन कुठल्याही रागाचा सामना करू शकतं आणि एखाद्या कमलपत्राप्रमाणे त्या वैफल्याच्या भावना त्याच्यावर न साठता निघून जातात आणि त्याची परिणती विद्वेषात होत नाही. राग आला की १ ते १०० अंक मोजा. त्याचे २ फायदे आहेत. राग हळूहळू नाहीसा होतो. व आपल्याला १ ते १०० अंक नीट मोजता येतात याचा आनंद वाटतो.

नियमांचं पालन न करणारे लोक पाहून खूप राग येतो. बसमधे, सरकारी कार्यालयांमधे, बँकेत, अगदी कुठेही असे लोक आणि त्यांना निमूटपणे सहन करणारे लोक बघून खूप राग येतो. नियमांचा अंमल ज्यांचे हातात असतो त्यांनी तो रुजू केल्यास बेशिस्त लगेच नियंत्रणात येते.

एकदा एक रेल्वेचा तिकिट कारकून, घोळक्यानी समोर येणाऱ्या लोकांना पाहून बराच रागावलेला होता. त्यानी काम थांबविले आणि जाहीर केले की रांगेत उभे राहाल तरच तिकिटे देईन. लगेच लोक रांगेत उभे राहिले. तो प्रयोग जादूच्या कांडी सारखाच वाटला.

स्वयंसुधारणेबद्दलच्या निरनिराळ्या व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरांना उपस्थिती लावल्यावर असा अनुभव येतो की असल्या मानसशास्त्रीय विश्लेषणांत काही राहून गेले आहे असे सहसा नसतेच. जर आपल्याला ते दिसले नाही तर आपणच नीट पाहावे म्हणजे दिसते. आणि राग वैफल्य वगैरे दोषही आपलेच असतात आणि त्यांवर उपायही आपणच, आपल्यावरच करायचा असतो. अपेक्षाभंगाचे दु:ख दारूण असते. तशीच अतृप्तीची बोचही. कुठल्याही प्रकारच्या अतृप्तीमुळे राग चटकन येतो.

रागावर सगळ्यात चांगला उपाय `मौनं सर्वार्थ साधनं'. दुसऱ्यांचे दोष दाखवताना मुठीची तीन बोटे आपल्याकडे वळत असतात. रामदासांचे `मनाचे श्लोक' सुद्धा, जर कोणी अर्थ समजून त्याप्रमाणे वागेल, तर तोही एक चांगला उपाय ठरावा. मानसोपचाराचे बरेच उपाय त्यात दिसतात.

http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपण मला भेटू शकता.

Comments

क्लिष्ट , त्रासदायक आणि गोंधळात टाकणारी भावना

यामध्ये अजून एका मुद्द्याची भर घालता येईल ती म्हणजे - "तुमच्या मते" दुसर्‍या व्यक्तीने तुमचा घेतलेला गैरफायदा किंवा तुमच्यावर केलेला अन्याय. बरेचदा हा "हिट अँड रन" पद्धतीचा असू शकतो. तुम्ही काही करू तर शकत नाही पण तुमचं न भरून येणारं नुकसान झालेलं असतं. अशावेळी जो "सीदींग व्होल्कॅनिक" राग धुमसत राहतो तो वरील कोणत्याही उपायांनी बरा होत नाही. त्याकरता शेवटी मानसोपचारतद्न्यच लागतो.
उदाहरणच द्यायचं झालं तर -
(१) एकट्या लहान मुलींशी गर्दीत केले जाणारे गलिच्छ चाळे. इट इज अ हिट अँड रन केस.
(२) कारने ठोकून पळून जाणे. मग कारमध्ये बसलेल्या मुलाला इजा होवो की काहीही होवो हे भ्याड लोक पळून जातात. हे आमच्याबरोबर घडलेले आहे. कारचा नंबर घेता आला नाही. कारण मागे बसलेल्या मुलीला पहायचं का कारचा नंबर घ्यायचा?

"राग" ही फार क्लिष्ट , त्रासदायक आणि गोंधळात टाकणारी भावना आहे. आपण सांगीतलेले काही पैलू हे तर "टिप ऑफ आइसबर्ग" झाले.

राग

छान विषय व छान प्रतिसाद आहे शुचि ह्यांचा. बरोबर कधी कधी आपण जबाबदार नसून सुद्धा भोगावे लागते.

लक्ष इतरत्र नेणे

लक्ष इतरत्र नेणे (डिस्ट्रॅक्शन; दुर्लक्ष नाही) हा रागावरील एक प्रभावी उपाय आहे. त्याची साधी आणि चांगली उदाहरणे गोळेकाकांनी दिली आहेत.

जरा थंड पाणी पिऊन बघा

हे वाचून मला चक दे इंडियाची आठवण झाली. ;-)

सात्विक संताप

सात्विक संताप म्हणून पण रागाचा एक प्रकार असतो. काही उपक्रमींचे प्रतिसाद वाचले की बाकीच्यांना येतो हा संताप.

चन्द्रशेखर

राग

एक चांगला प्रश्न आणि एकदम करत्या येण्या जोगे उपाय असे दिसले.

राग आला की तो दाखवू नये. त्या दाखवण्यामुळे राग वाढतो. ज्यावर रागवायचे अशी व्यक्ति समोर असेल तर तिला राग येतो. त्यामुळे राग व्यस्त प्रमाणात वाढत जातो.

दाखवलेला राग पटकन शमतो असे काही नित्य रागीट मंडळींचे प्रतिपादन मी पाहिले आहे. मी मनात काही ठेवत नाही. जे लोक राग दाबतात ते कुढत बसतात, अढी धरून वागतात. या उलट रागीट माणूस पटकन शांत होतो. या प्रतिपादनाबाजूने/विरुद्ध वाचायला आवडॅल.

आपण हसतो/रडतो त्यावेळी जी भावना असते ती संपते. (संपण्याकडे जाते.) माणूस मोकळा होतो. हिणवून हसत नसलो तर इतरांना त्यात सहभागी करता येते. रडणार्‍यास सहसा सहानुभूती मिळते. रागावणार्‍यास काय करावे?

प्रमोद

दखल घ्यावी

रागावणार्‍यास काय करावे?

रागावणार्‍याची दखल घ्यावी. जेव्हा मनुष्य इतरांसाठी काहीही करतो (एखाद्याचे काम करून देणे, एखाद्याबद्दल खेद वाटला हे दर्शवणे, एखाद्यावर रागावणे किंवा काहीही) तेव्हा समोरच्याने किमान त्याची दखल घेतली तर बरेच प्रश्न सुटतील.

अर्थातच, प्रत्येकाच्या रागाची दखल घ्यावी किंवा घेतली पाहिजे असे नाही. परक्यांच्या रागाकडे दुर्लक्ष करणे आणि आपल्यांच्या रागाची दखल घेणे इतके तरी करता येईल.

दाखवलेला राग पटकन शमतो असे काही नित्य रागीट मंडळींचे प्रतिपादन मी पाहिले आहे. मी मनात काही ठेवत नाही. जे लोक राग दाबतात ते कुढत बसतात, अढी धरून वागतात. या उलट रागीट माणूस पटकन शांत होतो.

अशा व्यक्ती पाहिल्या आहेत. वरील वाक्यांत तथ्य वाटते पण तसा सर्वसामान्य नियम नसावा.

नित्य रागीट

दाखवलेला राग पटकन शमतो असे काही नित्य रागीट मंडळींचे प्रतिपादन मी पाहिले आहे.

नित्य रागीट मंडळींना चटकन राग येतो म्हणून नित्य रागीट म्हटले असावे. त्यांच्या मते त्यांचा राग चटकन शमत असला तरी तो लगेच परत् येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नित्य रागीट मंडळींना दुसर्‍यांच्या मतांना आदर देणे किंवा सगळ्या गोष्टी आपल्या मतनुसार व्हाव्यात असा आग्रह सोडणे अशा इतर उपायांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहीजे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

:)

शीर्षक वाचून मी 'संगीतातले राग' समजलो होतो..!

क्षमस्व.. :)

तात्या.

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

शुची, चितळेसर, प्रियाली, चंद्रशेखर, प्रमोद, अभिजित आणि विसोबा प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

खेचरजी, मी क्षमा केली! मात्र ती आवश्यक नव्हती असे वाटते. तुम्ही हवे ते समजू शकता. आकाशात उडणार्‍यांना कोण अडवणार!

 
^ वर