चकट फू......

सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता. प्रत्येक सर्फिंगच्यासाठी तिचा भरपूर वेळ जात असे. तरी कसेबसे ती इंटरनेट वापरत होती. एकदा गंमतच झाली. तिच्या पीसीवरच्या इंटरनेटवरील डाउनलोडचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. एकदा नव्हे तर अनेकदा हे घडले. थोड्याशा विचारानंतर शेजारच्याच्या वाय फाय इंटरनेट कनेक्शनमधूनच तिलाही सर्फिंग, डाउनलोड इत्यादी नेटचे सर्व प्रकार बिनबोभाट करता येतात, हे तिच्या लक्षात आले. तेही स्वत:साठी म्हणून वेगळे कनेक्शन न घेता! अशा प्रकारच्या नेट स्पीडसाठी तिला भरपूर पैसे मोजावे लागले असते. म्हणजे आता तिला हाय स्पीड ब्रॉड-बँड इंटरनेट (तेही अनलिमिटेड!) कनेक्शन चक्क फुकटात मिळाल्यात जमा!

सुनीतीला यात काही गैर आहे असे वाटले नाही. ती कुणाची तरी फसवणूक करत आहे, गैरफायदा घेत आहे किंवा चोरी करत आहे असेही तिला वाटले नाही. शेजारच्या इंजिनियरकडे इंटरनेट कनेक्शन आहे; ते चोवीस तास उपलब्ध आहे; सुनीतीच्या वापरामुळे त्याला काही त्रास होत नाही; त्याचा इंटरनेट 'स्लो' होत नाही; त्याच्या बिलात काही फरक पडत नाही; जर असे असेल तर यात काही चूक असू शकेल का? हा अपराध आहे का?

सुनीती करत असलेल्या या काल्पनिक अपराधीपणाबद्दल आपले मत काय?
............... .................... ...............
परदेशात वाय फाय सुविधा असलेले नोटबुक पीसी वापरणारे सर्रासपणे कुठेही केव्हाही इंटरनेट कनेक्ट करून ई मेल उघडत असतात. त्यासाठी मुद्दामहून कुणीही फी भरत नाही. इंटरनेट सेवा पुरवणार्‍यांनासुद्धा यात काही नुकसान सोसावे लागत नाही. कारण अशा प्रकारचा अवैध वापर नगण्य प्रमाणात असतो. उलट याला उत्तेजन दिल्यास एखादा संभाव्य ग्राहक गाळाला लागण्याची शक्यता वाढते.

सुनीतीची गोष्ट थोडी निराळी आहे. पद्धतशीररित्या (जाणून बुजून) दररोज, नियमितपणे ती शेजारच्याचे इंटरनेट कनेक्शन सुविधा (तेही फुकटात!) वापरत आहे. तिच्याही वापरासाठी तो इंजिनियर बिल भरत आहे. खरे पाहता नैतिकरित्या यात नक्कीच चूक आहे.

परंतु शेजारच्या इंजिनियरचे कुठल्याही प्रकारचे नुकसान वा त्याच्यावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. सुनीती इंटरनेट वापरो न वापरो इंजिनियरला तेवढेच बिल भरावे लागते, कमी नाही की जास्त नाही. या अंगाने बघितल्यास सुनीतीचा काही अपराध नाही असेच वाटेल. एखाद्या खाजगी कंपाउंडमध्ये वाढवलेल्या झाडाची सावली हमरस्त्यावर पडलेली असताना अनेक वाटसरू वापर करत असल्यास त्यात काही वावगे वाटत नाही, असाच काहीसा प्रकार सुनीतीच्या बाबतीत घडत असावा.

अशा प्रकारच्या फुकटच्या सुविधा वापरणार्‍यांचे शेकडोनी उदाहरणं सापडतील. विद्यापीठाच्या बंदिस्त मैदानात एका नावाजलेल्या गझल गायकाची मैफल आयोजित केलेली असेल. तिकिटाचे दरही अत्यंत महाग. सामान्यांना न परवडणारे. परंतु मैदानाबाहेर उभ्या उभ्या आपण त्या गझल गायकीचे आस्वाद (फुकट!) घेवू शकतो. स्वत:ला विकत घेण्यास न परवडणारे अल्बम्स, ई-पुस्तकं, जर्नल्स, सॉफ्टवेर्स, जुने गाजलेले चित्रपट, काहीही पैसे न मोजता नेटवरून डाउनलोड करू शकतो. पायरेटेड सीडी, पायरेटेड पुस्तकं स्वस्तात विकत घेताना आपल्याला अपराधीपणा जाणवत नाही. एखाद्या सर्जनशील (होतकरू) गायकाच्या, संगीतकाराच्या, लेखकाच्या तोंडातला घास हिसकावून घेत आहोत याची आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही, आठवण रहात नाही. विकिपिडियावरील माहिती फुकट वाचताना मदतीसाठी केलेल्या आवाहनाकडे आपण दुर्लक्षच करत असतो!

हा फुकटेपणा गुन्हा वाटत असल्यास हा गुन्हा अजिबात त्रासदायक नाही. मग नेमके चुकते कुठे? याच्या उत्तरासाठी एखाद्याने केलेल्या प्रत्यक्ष कृतीचा आढावा घेण्यापेक्षा त्या संबंधातील वर्तणुकीतील मानसिकतेचा अभ्यास करणे इष्ट ठरेल. आपल्या वर्तणुकीचा पाया न्यायोचित देवाण - घेवाण यावर आधारित हवा, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. शेजारच्याचा नेट कनेक्शन अपरोक्षरित्या वापरत असल्यास आपण आपल्या दुसर्‍या एखाद्या कृतीने त्याची भरपाई करू शकतो. (मुळात सुनीतीने शेजार्‍याला भेटून आपण नेमके काय करत आहोत याची कबूली दिली असती तर कदाचित अपराधीपणाची हुरहुर राहिली नसती. परंतु तेवढे धैर्य तिच्याकडे नव्हते व तसे काही करण्यास तिचा ego - superego आड येत होता!) गाण्याच्या मैफलीचा स्वाद फुकट घेत असल्यास (व अशा फुकटेपणाच्या अपराधी भावनेचा त्रास होत असल्यास!) गाण्याचे आयोजन करणार्‍या संघ - संस्थेला देणगी स्वरूपात काही रक्कम देता येवू शकते. नेटवरून फुकट डाउनलोडचा त्रास जाणवत असल्यास समाजोपयोगी कार्य करणार्‍या संस्थेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही देणगी देता येवू शकते. अशा प्रकारच्या देवाण - घेवाणीतूनच समाजाचा गाडा पुढे जाऊ शकतो. त्यामुळे फुकटेपणाचा त्रास होणार नाही.

वर उल्लेख केलेल्या उदाहरणात सुनीती फक्त घेत आहे, व काहीही देत नाही. परस्पर सहकारावर आधारलेल्या जीवनपद्धतीत फुकटेपणाला स्थान नाही. सहकार ही एक समजून उमजून करण्याची रीत आहे. सुनीतीच्या कृतीतूनही उपकृततेची भावना व्यक्त होत नाही वा ती सहकाराचा हात देणार आहे हेही सूचित होत नाही. त्यात फक्त अप्पलपोटेपणा व निव्वळ स्वार्थ दिसतो.

परंतु आपण अजूनही सुनीती स्वार्थी आहे म्हणून दोष देत असल्यास तिचा हा स्वार्थ अगदीच किरकोळ, क्षुल्लक स्वरूपाचा आहे हेही लक्षात ठेवावे लागेल. आपण तिच्या जागी असतो तर कदाचित तेच केले असते..... किंवा हाय स्पीड नेटच्या भनगडीतच पडलो नसतो.

तिच्या या कृतीचे पोस्ट मार्टेम करणे हा कदाचित आपल्या नैतिक अरेरावीचा भागही असू शकेल...

Comments

एनपीआर, विकिपिडिया

हापिसातून येतांना एनपीआर च्या स्थानिक आकाशवाणी केंद्रावरचा कार्यक्रम ऐकत होतो. रोज हापिसात जातांना आणि येतांना रेडिओवर तिथले कार्यक्र्म ऐकत असतो. इतरवेळीही ऐकतो. जाहिराती नसलेले व दर्जेदार माहिती पुरवणारे कार्यक्रम मी एकही पैसा खर्च न करता ऐकू शकतो. हे स्टेशन चालवण्यासाठी वेळोवेळी लोकांकडून पैसे जमा केले जातात. सरकारी अनुदानही मिळते. पण मी आजवर कधीही पैसे दिलेले नाहीत. माझ्या ओळखीचे काही लोक नियमित पैसे देतात. या लोकांमुळे माझ्यासारख्या फुकट्या श्रोत्याला फायदा होतो. परंतु मी भविष्यात या रेडिओस्टेशनला पैसे देण्याची शक्यता नाही व त्यात मला काही गैरही वाटत नाही. तरीही आमच्याइथले स्टेशन त्यांना लागणारी रक्कम नेहमीच जमा करतात. काही दिवसांपासून विकिपिडियाच्या प्रत्येक पानावर पैशांच्या मदतीसाठी आवाहन केले जाते. त्यांना पाहिजे असलेला निधी त्यांनी अगदीच कमी दिवसात उभा केला. मी विकिपिडियाला मदत केलेली नाही. मला एनपीआर, विकिपिडिया दोन्ही सुविधा वापरतांना जराही अपराधी वाटत नाही.

____________
उदाहरण (गुरू, 01/06/2011 - 16:05)

सुनीतीच्या प्रायवसीला अशा प्रकारच्या सर्फिंगने धोका होऊ शकतो. तिच्या संगणकावरील माहितीचा गैरवापर शेजारी करू शकतो. त्या अर्थाने सुनीतीला काहीएक एक्सपेक्टेड कॉस्ट (प्रायवसी गेल्याने होणारे नुकसान*तसे होण्याची संभवनीयता) सहन करावी लागत आहे.

काही वस्तु किंवा सेवा नॉन-एक्स्क्ल्युडेबल प्रकारात मोडतात. पण वायफाय सुविधेचा वापर तसा नाही. माझ्या घरातील वाय-फाय कोणी वापरू नये म्हणून मी सहजपणे निर्बंध घालू शकतो. विमानतळावरील वायफायही बर्‍याचदा फुकट उपलब्ध नसते. त्यामुळे आपण दिलेले उदाहरण संयुक्तिक वाटत नाही.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

पंगतीत सांडलेले खाणारा

"कोमेन्साल" म्हणून वागणारी काही जनावरे असतात. ("कोमेन्साल" म्हणजे त्याच मेजावरचे जेवणारे - यासाठी "पंगतीत सांडलेले खाणारा" अशा अनुवादाची कल्पना मला सुचतो.)

"सिंबायोटिक" म्हणजे "एकमेका साह्य करू" अशा इतरेतरपोषक धोरणाच्या जनावरांपेक्षा हा प्रकार थोडा वेगळा मानला जातो. गेंड्याच्या कातडीवरून कीटक खाऊन उदरनिर्वाह करणारा पक्षी गेंड्याचाही फायदा करून देत असतो, म्हणून गेंडा-पक्षी यांचा संबंध इतरेतरपोषक मानला जातो. पण गुराच्या चालण्याने चाळवलेले जमिनीवरचे कीटक खात गुरामागून जाणारे काही बगळे असतात. ते गुराचा काय फायदा करून देतात, ते सहज सांगता येत नाही. असा बगळा गुराच्या पंगतीत सांडलेले खाणारा आहे.

खरे तर इतरेतरपोषण आणि पंगतीत सांडलेले खाणे ही एका करड्या क्षेत्राची दोन कृष्णधवल टोके आहेत. इतरेतर पोषणात "व्यवहार कराणार्‍या दोघांचा तंतोतंत समसमान फायदा होत आहे" असे काही असते. पण प्रत्यक्षात एकाला थोडाच फायदा, एकाला खूप फायदा होत असेल.

वगैरे, वगैरे.

- - -

सुनीतीबद्दलच्या गोष्टीत नको इतका मूलभूत नैतिक अर्थ शोधला जात आहे, असे मला वाटते.

- - -

वैयक्तिक कबुली : मागे काही महिने मी शेजाराचे संकेताक्षरमुक्त वायफाय वापरले होते. त्या वेळी माझ्या घरच्या टेलिफोनमध्ये काही बिघाड होता. माझ्या घरचे वायफाय संकेताक्षरबद्ध आहे. संकेताक्षरासह वायफायची उपलब्धता बाजारपेठेत मुबलक असल्यामुळे "संकेताक्षरमुक्त वायफाय म्हणजे पंगतीत सांडलेले कोणी खावे यास अनुमती" असे मी मानतो.

अगदी निकडीची गरज असल्याशिवाय मी असे मुक्त वायफाय वापरत नाही. यात धोका आहे, ते वर "का" यांनी सांगितलेच आहे. (सायबर कॅफेमधील मुक्त वायफाय वापरतो, ते वेगळे. तिथे कॅफेचा मालक "दुरुपयोग करणार नाही", असे आश्वासन देतो.)

कायदा पहीला

दुसर्‍याचे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन वापरणे ही गोष्ट बेकायदेशीर आहे. याचे कारण हे असावे की - एका कनेक्शनवरून "चाइल्ड पोर्नोग्राफी/ विकृत" साइटस जर कोणी सातात्याने पहात असेल तर अशा समाजविघातक घटकांचा मागोवा घेणे पोलीसांना सोपे जावे. त्यामुळे हा कायदा आला असावा.

आणि हा कायदा आला असल्याने , माझे म्हणणे आहे की सुनीती करते ते चूकीचे आहे. कायदा हा कोणत्याही परिस्थितीत पाळलाच पाहीजे. कायद्याचे उल्लंघन करत असेल तर ती समाजकंटक आहे.

धन्यवाद

असा कायदा काही ठिकाणी असेल, असे दिसते खरे.
कायद्याच्या बंधनात वागले पाहिजे, हे बरोबर.

मी देखील चोरी केली आहे

धनंजय मी देखील काही काळ कनेक्शन चोरीचा अपराध केलेला आहे. तेव्हा आपण आपल्याला एकटे समजू नये. आपलेदेखील धन्यवाद.

मीदेखील

मी काही काळ अमेरिकेत असताना माझ्या घरात मला वायफाय इंटरनेट उपलब्ध असल्याचे दिसत असे. ते असुरक्षित असल्याने अपार्टमेंट चालकांनी सर्व भाडेकरूंना ही सेवा मोफत दिली असावी अशा गैरसमजातून मी ते १०-१२ दिवस वापरले. गैरसमज दूर झाल्यावर स्वतःचे कनेक्शन घेतले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

थोडा फरक

एका नावाजलेल्या गझल गायकाची मैफल आयोजित केलेली असेल. तिकिटाचे दरही अत्यंत महाग. सामान्यांना न परवडणारे. परंतु मैदानाबाहेर उभ्या उभ्या आपण त्या गझल गायकीचे आस्वाद (फुकट!) घेवू शकतो.

पायरेटेड सीडी, दुसर्‍यांचे वायफाय कनेक्शन इ. आणि या गोष्टींत फरक दिसतो. सुनीतीने जर शेजारच्याच्या परवानगीने वायफाय कनेक्शन वापरले असते तर त्यात काही गैर वाटत नाही.

तसेच, मी जर एखादी डिवीडी विकत आणली आणि नंतर माझ्या मैत्रिणीला पहावयास दिली तर त्यात काही गैर नाही. गझल गायकाचे उदाहरण याप्रमाणे वाटते. मैदानाबाहेर गायकाचा आवाज पोहोचत असेल तर अवश्य ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. जर ते मैदानाबाहेरून चित्रण करून त्या चित्रफिती/ ध्वनीफिती लोकांना विकू लागले तर प्रश्न निर्माण होतो असे वाटते. तसेच फुकट ऐकायला मिळते आहे म्हणून मैदानाबाहेर ट्रॅफिक जॅम करणे किंवा गर्दी करणे हा प्रयत्न प्रश्न निर्माण करतो.

अन्यथा, एकाने विकत घेतलेला माल दुसर्‍याने वापरणे यात अनैतिक असेलच असे नाही. उदा. माझ्या शेजारच्यांनी विकत घेतलेल्या आणि मोठ्याने लावलेल्या सीडीवरची गाणी ऐकून माझी करमणूक होत असेल तर त्यात काही गैर नाही.

आणखी एकः

आमच्या घरात वाय-फाय लावले आहे अशी माझी समजूत होती. वाय-फाय कनेक्शन शोधताना आमच्या आडनावाचे कनेक्शनही दिसून आले. (असे अमेरिकेत होणे जरा योगायोगच) वापरताही आले. दोन दिवसांनी नवर्‍याला विचारले की 'जरा स्लो आहे कनेक्शन' तेव्हा त्याने सांगितले की त्याने अद्याप जोडणीच केलेली नाही आणि केली की पासवर्डाशिवाय नक्कीच करणार नाही. तेव्हा आपण भलतेच कनेक्शन वापरत होतो याची जाणीव झाली.

कायदा

आधुनिक तंत्रज्ञानामुळे कायद्याचे उल्लंघन सोपे झाले आहे. मात्र एकाची वस्तू दुसर्‍याने वापरणे यातही बरेचदा कायद्याचे उल्लंघन होते. माझ्या टेबलावर 'रेस्ट ऑफ द रोबोटस' हे अझिमॉव्हचे पुस्तक आहे. त्याच्या आतल्या पानावर लिहीले आहे, "This book is sold subject to condition that it shall not, by way of trade or otherwise, be lent, re-sold..... without publisher's prior consent.." याचा अर्थ हे पुस्तक कुणी वाचायला नेले तरी कायद्याचे उल्लंघन होते आहे.

अशा गोष्टींमध्ये कायदा किती पाळायचा किंवा नाही हे देश, व्यक्ती, परिस्थिती यावर अवलंबून असेल असे वाटते.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

हे कसे होते?

माझ्या टेबलावर 'रेस्ट ऑफ द रोबोटस' हे अझिमॉव्हचे पुस्तक आहे. त्याच्या आतल्या पानावर लिहीले आहे, "This book is sold subject to condition that it shall not, by way of trade or otherwise, be lent, re-sold..... without publisher's prior consent.." याचा अर्थ हे पुस्तक कुणी वाचायला नेले तरी कायद्याचे उल्लंघन होते आहे.

तर मग हे कसे शक्य होते? इथे कायद्याचे उल्लंघन आहे का?

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चांगला

चांगला मुद्दा आहे, कल्पना नाही. याखेरीज ग्रंथालये पुस्तके उसनी देतात त्या वेळीही काय होते माहीत नाही.

अवांतर : रोमन अक्षरांचा नियम बहुधा लागू नाही. माझ्या प्रतिसादात मी पापक्षालन केले नव्हते.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

हुं

ते ढीग धमक्या देतील! अशी उधारी 'फेअर यूज' या संकल्पनेत बसविता येते असे मला वाटते. फेअर यूज तत्त्वानुसार डीवीडी घेऊन तिची बॅकअप प्रत बनविता येते. शिवाय, आपली प्रत मित्रांनाही देता येते. एखाद्या व्यक्तीला १०००० मित्रही असू शकतात. या तीन तत्त्वांना एकत्रित ताणून करून टॉरंटचेही समर्थन करण्यात आलेले आहे (पण ते चूक आहे असे ओपनसोर्सवालेही म्हणतात - संदर्भ (पान क्र. १७९/पीडीएफ क्र. १८९)).
शेवटी, एखाद्या व्यक्तीचे 'उदाहरण' करून संपूर्ण जगाला धडा देण्याची प्रकाशकांची इच्छा असेल तरच ते या कारणासाठी 'व्यक्ती'वर खटला करतात असे मला वाटते. अन्यथा, त्यांना खटल्यातून लाभ होण्याची फारशी शक्यता नसते.

खटला

खटला फारच लांबची गोष्ट. अशा प्रकारे खटला भरल्याचे माझ्यातरी पहाण्यात नाही. प्रकाशकांना परवडणारे नाही.
ह्या नोटिसेबद्दल बराच काळ कुतूहल होते. कारण पुस्तक वाचणार्‍या प्रत्येक व्यक्तीने या कायद्याचे उल्लंघन निश्चितच केले असावे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

खटला

हे वाचा!

(नोटिशीची वाट पाहणारा) सुनील

रोख

माझा रोख पुस्तकांच्या गैरवापरामुळे खटला भरण्याकडे होता. टोरेंट वापरून गाणी/चित्रपट उतरवून घेतल्याबद्दल दंड झाल्याच्या घटना अमेरिकेत झाल्या आहेत. भारतात बहुधा अजून नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

ठीक

होय, ते माहिती असूनही माझा प्रतिसाद चित्रपटांविषयीच होता कारण पुस्तके आणि चित्रपट या दोन्हींच्या संरक्षणासाठी समानच कायदे आहेत.

हा फक्त मुखपृष्टाबाबत आहे

बहुतेक या वाक्यात 'विदाउट धिस कवर' किंवा तो अर्थ ध्वनित करणारे शब्द असतील.

या वाक्याचा अर्थ 'या मुखपृष्टाशिवाय' ते कुणाला देणे इत्यादी गोष्टी अनधिकृत ठरतात.
असे होण्यास एक कारण आहे. एकेकाळी पुस्तके मुखपृष्टासकट पाठवली जायची. विक्रेत्याकडच्या प्रती संपल्या नाही तर मुखपृष्टे कापून तो परत पाठवायचा. हे पुस्तक परत देण्यासारखे मानले जात असे. (आर्थिक व्यवहारासाठी.) अशी मुखपृष्ट कापलेली पुस्तके मग 'पायरसीत' जायची. याला प्रतिबंध म्हणून हे वाक्य लिहिले जायचे.

हल्ली कदाचित ही प्रथा संपली असेल्.

प्रमोद

नाही

बहुतेक या वाक्यात 'विदाउट धिस कवर' किंवा तो अर्थ ध्वनित करणारे शब्द असतील.

नाही. धिस बुक असे स्पष्ट म्हटले आहे. तुम्ही म्हणता तशी कव्हरची नोटीस वेगळी असते. पुस्तकाची प्रत अधिकृत आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

धिस बुक असून..

माझ्याकडच्या पुस्तकांवर "धिस बुक" असून पुढे "हायर्ड ऑर सर्क्युलेटेड ... इन एनी फॉर्म ऑर बाइन्डिंग ऑर कव्हर अदर दॅन दॅट इन विच इट इज पब्लिश्ड..." असेही आहे.
हे जर सगळे तंतोतंत पाळायचे म्हटले तर जुनी पुस्तके विकत घेता/विकता येणार नाहीत. सेकन्ड हॅन्ड पुस्तक हा शब्दप्रयोगच बाद होईल. ---वाचक्नवी

सहमत

हे जर सगळे तंतोतंत पाळायचे म्हटले तर जुनी पुस्तके विकत घेता/विकता येणार नाहीत.

सहमत आहे. आणि अगदी राष्ट्रपतींपर्यंत प्रत्येकाने कधीतरी या कायद्याचे उल्लंघन केले असेल. हे कुणाच्या लक्षात येत नाही की जाऊ दे म्हणून सोडून देतात कल्पना नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

तांत्रिक विसंगती

एकदा गंमतच झाली. तिच्या पीसीवरच्या इंटरनेटवरील डाउनलोडचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. एकदा नव्हे तर अनेकदा हे घडले. थोड्याशा विचारानंतर शेजारच्याच्या वाय फाय इंटरनेट कनेक्शनमधूनच तिलाही सर्फिंग, डाउनलोड इत्यादी नेटचे सर्व प्रकार बिनबोभाट करता येतात, हे तिच्या लक्षात आले.

आपण निवडल्या शिवाय संगणक आपोआप कुठले वायफाय कनेक्शन वापरायचे हे आपोआप ठरवून वापरू शकतो असे वाटत नाही. त्यासाठी आधी उपलब्ध कनेक्शन्स पहावी लागतात, त्यातील मग जे संकेताक्षर माहीत असलेले संकेताक्षर वापरून अथवा संकेताक्षरमुक्त आहे ते तसेच निवडून वापरता येऊ शकेल. पण या बाबतीत सुनीताला ते वापरण्याच्याच आधी समजलेले असते की नक्की ती कुठले कनेक्शन वापरत आहे ते.

तरी देखील जर कोणी आपले वायफाय संकेताक्षरमुक्त ठेवत असेल तर तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्या व्यक्तीस इतर कोणी वापरले तरी हरकत नाही असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे यात नैतिकतेचा प्रश्न येत नाही असे वाटते. आलाच तर केवळ संगणक आणि त्यातील माहीतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे असे वाटते.

-------------------

काही वर्षांपुर्वी माझा एक मित्र अमेरिकेतील चांगल्या (लक्झरी) अपार्टमेंटमधे रहावयास गेला. तेथे तात्काळ चालू असलेले केबल कनेक्शन आणि त्यात असलेली सर्वच चॅनल्स पाहून त्याला वाटले की लक्झरी अपार्टमेंट असल्याने प्रॉपर्टी मॅनेजमेंटने व्यवस्था केली असावी. चार-पाच महीन्यांच्या वापरानंतर असेच अचानक त्याला शेजार्‍याकडून कळले की तसे काही मॅनेजमेंट देत नाही आणि ते आधीच्याचे कनेक्शन त्याचे नाव जरी गेले असले तरी केबल कंपनी बंद करायची विसरली होती. याने मग केबल कंपनीला फोन करून ते आपल्या नावावर करायला सांगितले आणि आधी जे काही ३-४ महीने फुकट कनेक्शन वापरले त्याचे पैसे त्यांनी घ्यावेत असा आग्रह चालू केला. त्या केबल रिप्रेझेंटेटीव्हला वेड लागायची वेळ आली कारण असे कोणीच कधी केले नव्हते. पण हा पठ्ठ्या ऐकायला तयार नव्हता आणि केबल कंपनीला सिस्टीममधे ते कसे बसवायचे ते समजत नव्हते. शेवटी क्रेडीट/डिसकाउंट वगैरे काही बोलत त्यांनी याची समजूत घालत नवीन खाते उघडयाला मदत केली.

बाग आणि बाक

>> जर कोणी आपले वायफाय संकेताक्षरमुक्त ठेवत असेल तर तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्या व्यक्तीस इतर कोणी वापरले तरी हरकत नाही असाच त्याचा अर्थ होतो. >>
एखाद्याने त्याच्या बागेत बाक ठेवला असेल आणि मी रस्त्याने जात असेन तर वरील न्यायाने मी असे समजू शकते काय की तो बाक सर्वांसाठी खुला ठेवला आहे?
"त्याची बाग" = "त्याने विकत घेतलेली सेवा "
"त्याचा बाक" = त्याचे कनेक्शन"
असा संबंध मी जोडते आहे.
__________________
पण संकेताक्षराचं जुळत नाही. हे उदाहरण योग्य नाही. मी मान्य करते. :)

कुठे आहे यावर...

एखाद्याने त्याच्या बागेत बाक ठेवला असेल आणि मी रस्त्याने जात असेन तर वरील न्यायाने मी असे समजू शकते काय की तो बाक सर्वांसाठी खुला ठेवला आहे?

सुनीती त्या इंजिनियरच्या घरात जाऊन त्याच्याच संगणकावर फुकट (संकेताक्षरमुक्त) आहे म्हणून वायफाय वापरत आहे का? अर्थातच नाही. त्या मुळे हे उदाहरण तितकेसे संयुक्तीक वाटले नाही.

मूळ लेखात दिलेले गायनाच्या कार्यक्रमाचे उदाहरण योग्य वाटते. आणि त्या बाबतीतही त्या गायकाला अथवा संस्थेला बाहेरून कोणी फुकट गाणे ऐकले तर हरकत नसावी असेच वाटते.

"वैयक्तिक नैतिकता"

संगणक स्वत:, प्रथमतः, कुठल्याही नव्या इंटरनेटला जोडु शकत नाही.

सुनीताने इंजीनीअरच्या कनेक्शनला जोडल्याने त्याचे कनेक्शन् स्लो होत नाही हे खरे नाही. (ते स्लो झाल्याने त्याला कीती फरक पडतो वगैरे त्यालाच माहीत) त्याच्या बिलात फरक पडतो की नाही हे ही त्याच्या कनेक्शनवर् अवलंबुन आहे.

अमेरीकेत मोफत वायफाय अनेक ठिकाणी असतात. अनेक् लोकांना कनेक्शन सीक्युअर कसे करायचे हे माहित नसते. ह्यामुळे अनेक मोफत वायफाय असताना (नेटवर्क प्रायव्हेट केलेले नसेल तर) कायद्याने अपराधी ठरवणे अवघड जाउ शकते.

पण माझ्या नैतिकतेचा विचार् केल्यास् मी असे मोफत् वायफाय् न् विचारता वापरणार नाही. (मध्यंतरी माझा मोडेम् बिघडल्याने एक् दिवस मला शेजारच्याचे वायफाय् वापरावे लागले होते, तेव्हा त्यास तशी कल्पना मी दिली होती)

@शुक्लपक्ष

एका कनेक्शनवरून "चाइल्ड पोर्नोग्राफी/ विकृत" साइटस जर कोणी सातात्याने पहात असेल तर अशा समाजविघातक घटकांचा मागोवा घेणे पोलीसांना सोपे जावे.

पायरसी वगैरे गोष्टींसाठी आयपी प्राथमिक असला तरी कुठल्या संगणकावरुन सदर प्रकार केले जातात् हे शोधणे फारसे अवघड नाही, ही यंत्रणा अमेरीकन पोलिसांकडे असते हे त्यांच्या सायबर पथकाकडूनच् आम्हाला कळाले आहे.

-Nile

शंका

पायरसी वगैरे गोष्टींसाठी आयपी प्राथमिक असला तरी कुठल्या संगणकावरुन सदर प्रकार केले जातात् हे शोधणे फारसे अवघड नाही, ही यंत्रणा अमेरीकन पोलिसांकडे असते हे त्यांच्या सायबर पथकाकडूनच् आम्हाला कळाले आहे.

हे कसे शक्य आहे? म्हणजे, संगणक साफ पुसला नाही तर कदाचित समजू शकेलही पण अन्यथा कसे शक्य आहे? वायफाय राउटरमध्ये काही नोंद उरत नसावी, उरत असली तरी आपल्या वायफायची ओळखच नकली देऊन राउटरशी जोडणी केलेली असेल तर ती नोंदही कुचकामी ठरेल. एक शक्यता अशी की ही कृत्ये करताना, सोबतच, आपले स्वत:चे खाते असलेल्या इमेल साईटही उघडल्या तर त्यावरून त्यांच्या मालकाला धरता येत असेल. (चोरीच्या मोबाईलवरून परिचितांशी बोलल्यास चोर पकडला जाऊ शकतो तसे!)
कबुली: डॉमिनोजने फुकट वायफाय सुविधा दिल्याच्या समजुतीत मीही ते वापरले आहे आणि वायफाय वापर ही चोरी नक्कीच नाही.
खास काळजी घेतली नाही तर वायफायचा मालक आपली माहिती चोरू शकतो (https सायटींची माहिती सुरक्षितच राहते असे मला वाटते). परंतु माहिती चोरण्यासाठी असे वायफाय खुले ठेवणे धोक्याचे ठरेल, दहशतवाद्यांनी त्यातून इमेल पाठविल्यास चोरावर मोर होईल. शिवाय, वायफायला जोडलेले फुकटेही मालकाची माहिती चोरू शकतात.

होय

वायफायची ओळखच नकली देऊन राउटरशी जोडणी केलेली असेल तर ती नोंदही कुचकामी ठरेल.

अर्थातच, ते आयपी बद्दलही खरे आहे. माझा मुद्दा एव्हढाच होताकी फक्त आयपी वापरल्यानेच तुम्ही धोक्यात याल् असे नाही.
मी त्यांना विचारलेल्या प्रश्नांनुसार त्यांना तुमचा कंप्युटर मिळायला हवा, तुम्ही फॉर्म्याट केलात तरी काही माहिती* रिकव्हर करता येते असे त्यांचे म्हणणे होते.

*कीती, काय हे परिस्थितीवर अवलंबून आहे.

-Nile

शक्य

नव्या तंत्रज्ञानात चोरीची व्याख्या नव्याने करावी लागेल काय?
थोडे वेगळे उदाहरणः येथे दिलेल्या पद्धतीने कृती केल्यास तिला चोरी म्हणावी काय? समजा मी एखाद्या व्यक्तीस देवनागरीत खरड लिहिली की "कृपया तुमच्या व्यनिची यादी मला कळवा" तर तशी यादी द्यावी की नाही याचा निर्णय ती व्यक्ती स्वतः घेते. जावास्क्रिप्ट चालू ठेवणे म्हणजे "अशा सर्व विनंत्यांना (ज्या रोमन लिपीमध्ये लिहिलेल्या असतात) मुक्त होकार आहे" असा आदेश संगणकाला देणे होय. जावास्क्रिप्ट वापरून व्यनिंची यादी (आणि तिच्यातून निवड करून व्यनि) मिळविण्याला चोरी म्हणणेही मला पटत नाही.
--
तुम्ही सुनीतीच्या कृतीला फुकटेपणा म्हणत आहात.
रस्त्यात पडलेली नोट उचलावी काय? तोही फुकटेपणाच आहे की!
गांधीजींच्या सत्याग्रहात, सुभाषबाबूंच्या सेनेत किंवा स्वातंत्र्यासाठीच्या इतर कोणत्याही कार्यात सहभागी न झालेल्या (१५-०८-१९२९ आधी जन्मलेल्या) सर्व भारतीयांना फुकटे म्हणावे काय?
मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून घडलेल्या चळवळींत सहभागी नसलेल्या (१-५-१९४२ आधी जन्मलेल्या) सर्व मुंबईकरांना फुकटे म्हणावे काय?
माहितीचा अधिकार कायदा पारित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांत सहभागी न होता तो अधिकार वापरणार्‍यांना फुकटे म्हणावे काय?
ट्रॉली प्रश्नावरून असे दिसते की आपले नीती-अनीती विषयीचे उपजत मत कधीकधी विवेकी नसते.
--
अन्नछत्रातही नैतिक टोचणी लावली जात असावी. विपश्यना शिबिराच्या शेवटी अशी टोचणी लावून पैसे मागतात असा तुमचा आरोप होता. मला असे वाटते की अशी टोचणी न लागणे हेच 'यशस्वी' सजीवाचे लक्षण आहे.
मला स्वतःला गिल्ट कॉन्शन्स क्वचितच होतो आणि मी शक्यतो देणग्या देत नाही ;)
--
मुळात, संकल्पना चोरीचेही आरोप काही चित्रपटांवर होतातच. तसे चित्रपट डाऊनलोड करताना नैतिक टोचणीसुद्धा वाटू नये ना? ;)

धोकादायक

या गोष्टीतील सुनीती शेजार्‍याच्या अनोळखी इंजिनियरचे वाय फाय कनेक्शन फुकट वापरत आहे. त्यातून तिला फायदा होतो आहे. शेजार्‍याचा तोटा होत नाही हे सर्व तर्क ठीक असले तरी सुनीती केवढा धोका पत्करते आहे याची बहुदा तिला कल्पना नसावी. कशावरून शेजारचा तो इंजिनीयर अतिरेकी नाही? त्याने कदाचित मुद्दाम आपले वाय फाय कनेक्शन संरक्षणाशिवाय ठेवले असण्याची शक्यता आहे. उद्या या कनेक्शनवरून काही ई-मेल पाठवली गेली व तो आयपी पत्ता पोलिसांना मिळाला तर त्या आयपी पत्त्यावरून गेलेल्या सर्व ई-मेल्स संशयास्पद ठरतील. यात सुमतीच्या ई-मेल्सही संशयास्पद ठरतील व तिच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची खूप शक्यता आहे. सुमतीने हे उद्योग ताबडतोब बंद करून स्वत:चे संरक्षित कनेक्शन घ्यावे. परवडत नसले तर सायबर कॅफे मधे जाऊन बसावे हे योग्य वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कायदा पाळा !

कायदा पाळा ! त्याचे उल्लंघन करू नका.

इथे जर कायदा काहीही म्हणत नसेल तर एकच दूरगामी अडचण आहे -

"सवय" !

ही एकदा लागली की आपण आपोआप चकट-फू करायला आपण तयार होऊ लागू.

बाकी काहीच अडचण नाही. तसही आपण ओक्सीजन फूकटच वापरतो. :)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

नक्कीच चुकीचे

आपले नाही हे माहित असताना दुस-याचे वापरणे चुकीचे व म्हणून असा वापर करणारे चुक करत आहेत.

कॉमन्सालिज्म

१)ही कॉमन्सालिज्म प्रकारची पार्टनरशिप आहे, जी निसर्गात असते. उदा. रेमोरा आणि शार्क.
सुनीतीने आपण करत असलेल्या वापराची माहिती शेजार्‍याला दिली आणि बदल्यात इतर काही मदत देऊ केली तर ते सिंबायोसिस किंवा म्युचुऍलिजम होईल, आणि ते(सुद्धा) स्वीकारार्ह असेल.
सुनीतीच्या केसमधे (शेजारच्या इंजिनियरकडे इंटरनेट कनेक्शन आहे; ते चोवीस तास उपलब्ध आहे; सुनीतीच्या वापरामुळे त्याला काही त्रास होत नाही; त्याचा इंटरनेट 'स्लो' होत नाही; त्याच्या बिलात काही फरक पडत नाही; ) नैतिकतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे मला वाटते.

२)विकिपिडियावरील माहिती फुकट वाचताना मदतीसाठी केलेल्या आवाहनाकडे आपण दुर्लक्षच करत असतो!
याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते-
=विकिपेडिया फुकट वाचणे अपेक्षितच आहे. त्याच्या ध्येयधोरणांमधे तसे म्हटलेले आहे.
=विकिपेडियातवर लिहिणारेही फुकटच लिहित असतात. (असा माझा समज आहे.)
=आवाहनाकडे दुर्लक्ष करणेसुद्धा अनैतिक नाही. संपर्कक्रांतीच्या या युगात आपल्यापर्यंत पोहोचणार्‍या प्रत्येक आवाहनाला 'ओ' देणे कुणालाही शक्य नाही.

पुस्तके इत्यादिंची पायरसी ही बौद्धिक संपदा चोरल्याच्या कलमाखाली गुन्हा आहे. त्यामुळे ती तुलना इथे गैरलागू ठरते.

नुकसान किती?

सुनीतीच्या केसमधे (शेजारच्या इंजिनियरकडे इंटरनेट कनेक्शन आहे; ते चोवीस तास उपलब्ध आहे; सुनीतीच्या वापरामुळे त्याला काही त्रास होत नाही; त्याचा इंटरनेट 'स्लो' होत नाही; त्याच्या बिलात काही फरक पडत नाही; ) नैतिकतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे मला वाटते.

ही माहिती खात्रीलायकरीत्या सुनीतीला आहे का? हत्तीच्या पाठीवर फुलपाखरू बसलंय, की उंदीर बसलाय की घोडा किंवा दुसरा हत्तीच बसला आहे याने फरक पडतो. नैतिकतेने जरी काळं-पांढरं, दोषी निर्दोषी म्हणता आलं तरी 'किती नुकसान?' हा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझ्या मते अगदी मामूली नुकसान करणारे नैतिक अपराध होऊच नयेत याची भीती कायम बाळगत बसलं तर त्यामुळे अंतिमतः समाजाचा तोटा अधिक होईल.

याची दुसरी बाजू अशी की सुनीती किंवा इतर कोणीही आपल्या वायफाय कनेक्शनचा वापर करूच नये असं त्या इंजिनियरला वाटत असेल तर प्रत्यक्ष नुकसानापेक्षा नुकसानाच्या शक्यतेची त्या इंजिनीअरला वाटणारी भीती ही अधिक नुकसान करू शकेल. पण त्यावरही त्याला संकेताक्षराचा उपाय आहेच. तेव्हा इतक्या साध्या गोष्टीचा विचार फार करू नये, सुनीतीने आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊन हवं तसं वापरावं असं वाटतं. अर्थातच गैरवापर करू नये.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर