कहाणी मानवप्राण्याची (पुस्तक परिचय)

कहाणी मानवप्राण्याची हे नंदा खरे यांनी लिहिलेले पुस्तक (मनोविकास प्रकाशन, ५३६ मोठी पाने, रु. ८०० पुठ्याच्या बांधणीत) नुकतेच वाचले.

आजचा सुधारक मासिकाचे संपादक म्हणून (आणि त्यापूर्वीही अनेक कारणांनी) नंदा खरे हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांचे 'अंताजीची बखर' (ऐतिहासिक आणि विनोदी) हे माझे एक आवडते पुस्तक (कादंबरी). नुकताच या कादंबरीचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. त्यांची इतर पुस्तके २०५०, दगडावर दगड, विटेवर वीट, नांगरल्यावीण भुई ही पुस्तके देखिल मला आवडली होती. नंदा खरे हे आय.आय.टीतून उत्तीर्ण झालेले सिविल एंजिनियर. खरे-तारकुंडे या प्रख्यात कंत्राटदारी कंपनीत ते भागीदार होते (हल्ली निवृत्त).

ते पुस्तक लिहित असताना पुस्तकातील काही मुद्यांवर चर्चा झाली होती. त्यामुळे पुस्तक वाचायची मला चांगलीच उत्सुकता होती. गेल्या जानेवारीत पुस्तक प्रकाशन झाले. वेळेवर नोंदणी न केल्याने माझी पंचाईत झाली. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशीच सर्व पुस्तके संपली. त्यामुळे दुकानात दुसरी आवृत्ती येऊन मला विकत घ्यायला वेळ लागला.

पुस्तकाचे निर्मितीमूल्य उत्तम आहे. मजबूत पुठ्याच्या बांधणी बरोबर वासुदेव कामतांसारख्या प्रथितयश चित्रकाराने केलेले मुखपृष्ट शोभनीय आहे. आतील रेखाटने, चित्रे, आलेख या सगळ्या बाबतीत पुस्तक चांगले आहे. नामसूची (इंडेक्स) उत्तमपणे तयार केली आहे. पुस्तकाचा आकार मोठा आहे, दोन कॉलम मधे पानांची छपाई आहे. पुस्तकाला तळटीपा नाहीत. (हव्या होत्या असे वाटले.) पण बहुतेक संदर्भ साहित्य पुस्तकातल्या संहितेच लिहिले गेले आहे. पुस्तकाच्या शेवटी अधिक वाचनासाठीची यादी मोठी आहे. पुस्तकाचे सहलेखक म्हणून छाया दातार, भा.ल.भोळे, सुलक्षणा महाजन, संज्योत आपटे, मिलिंद मालशे आणि जयंत गडकरी यांची नावे आहेत. या सर्वांनी प्रत्येकी एका विषयावर टीपण लिहिले आहे. प्रस्तावना कुमार केतकरांची आहे.

'माकडाचा माणूस', 'रोटियोंके पेड','संपर्क आणि संघर्ष' ,'संस्था प्रक्रिया', 'इंधन आणि बाजार' आणि 'सावध ऐका पुढल्या हाका' अशा सहा विभागात पुस्तक आहे. यातील 'संस्था प्रक्रिया' या विभागात सहलेखकांनी लिखाण केले आहे. त्यात 'कुटुंब, धर्म, नगरे आणि व्यापार, राज्यसंस्था, लेखनकला आणि 'वर्ग आणि वर्गसंघर्ष' असे विभाग आहेत. पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण आहे. त्याच बरोबर उपलब्ध पुरावा केवढा अंदाज केवढा याचे व्यवस्थित विश्लेषण त्यात आहे. पुस्तकाची रचना कालागणिक पुढे जात असल्याने वाचताना अडथळा येत नाही. यामुळे माझा पुस्तक वाचायचा वेग चांगला राहिला. मराठीत हल्ली वाचलेले सगळ्यात चांगले पुस्तक असे मी याला नक्कीच म्हणेन. एवढेच नाही तर कित्येक इंग्रजीपुस्तकांच्या पेक्षाही ते चांगले वाटले.

'माकडाचा माणूस' (पूर्ण पुस्तक परिचय देण्याऐवजी या एकाच विभागाचा मी तपशीलवार परिचय देतो.) या विभागाची सुरुवात बिग बँगने हे होते. पण यातील मूळ धागे हे कॉन्टीनेन्टल द्रिफ्ट, उष्ण-हिमयुगांचे चक्र आणि स्थलांतरे यात आहे. या धाग्यांच्या अनुषंगाने उपलब्ध पुराव्या नुसार पूर्वस्थिती वद्दलची अनुमाने काढत प्रकरण लिहिले आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी पृथ्विचे तापमान बरेच जास्त होते. त्यामुळे जास्त भूभाग पाण्याखाली होता. दाट जंगले होती. पण हळू हळू हे थंड होत गेले. जमीनीचा भाग वाढला. जंगलांचे दाटपण जाऊन गवताळ पण वाढले आणि माकडांना झाडांऐवजी जमीनीवर मोठा वास करायची पाळी येऊ लागली. कपि (एप) वंशाची ती स्रुरुवात असावी. दोन पायांवर चालणे, हातांचा विविधांगी उपयोग करणे ही त्यांची खासियत. त्यांचा मेंदूही माकडांपेक्षा मोठा. आणि दृष्टीही दूर बघणारी. आफ्रिकेत केनिया-इथियोपिया यांच्या मधल्या फूटदरीत 'रिफ्ट वॅलीत' ४५ लाख वर्षांपूर्वीचे अनेक अवशेष सापडतात.

अवशेष तर थोडेसे असतात त्यावरून अंदाज कसे बांधायचे? जसे दात मिळाल्यावर त्याने काय खाल्ले जाऊ शकते आणि काय नाही याचा अंदाज बांधता येतो. कवटीतल्या डोळ्यांच्या ठेवणीवरून उभे राहण्याची प्रक्रिया ध्यानी येते. (जर हल्ली आपल्याला चार पायावर चालावे लागले तर पुढे पाहण्यासाठी मान चांगलीच वाकडी करावी लागेल. तर चार पायावर चालणार्‍यांसाठी ती क्रिया जास्त सहज असते.) ल्युसी सांगाड्याबाबतची हकिकत ही अचानक आलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चांगली शब्दबद्ध करता आली आहे. राखेच्या चिखलातून धावत जाणार्‍या दोघांच्या पायाचे ठसे शिल्लक राहिले. आणि द्विपाद कपींबाबत जास्त चांगला अंदाज बांधता येतो. अशाच सार्‍या पुराव्या अंदाजातून लेखक ऑस्ट्रेलो कपि मानवाची ओळख करून देतो. तर वापरलेल्या कपर्‍या आणि टोच्या या दोन शस्त्रांची (उपकरणांची) ओळख आपल्याला होते. कपर्‍या आणि टोच्या ही दोन दगडी आयुधे मानवाच्या कहाणीतील महत्वाच्या गोष्टी. या शस्त्रांचे अनेक साठे ठिकठिकाणी सापडतात. त्यानंतरचे महत्वाचे हत्यार म्हणजे दगडी हातकुर्‍हाड आणि ठोके. ही पूर्वीच्या हत्यारांपेक्षा जास्त टोकदार हत्यारे. ही सर्व हत्यारे वापरणारे 'होमो' (ऑस्ट्रेलो सारखे) दुसरे प्राणी समूह. ही हत्यारे जगात ठिकठिकाणी सापडतात. या सर्वातूनच आपले म्हणजे 'होमो सेपियन्स' चे अस्तित्व जाणवू लागते. मेंदूचा आकार, चेहरेपट्टी यातील फरक कसा झाला. विविध मानवपूर्व जाती आणि त्यांचा आपल्याशी संबंध कधी जनुकांचा तर कधी अकलेचा अशा विविध गोष्टीतून हे प्रकरण पुढे सरकते.

चूल कशी आली, माती कधी पासन भाजायला लागले आणि शेवटी धातुंचा शोध हे प्रवासातले मोठे आणि महत्वाचे टप्पे. अन्न संकलन (शिकार करणे आणि अन्न जमवणे.) हा या जीवनातला मुख्य आधार. भाषा आणि जाणीव कशी वाढली असेल याचे अंदाज बांधत हे प्रकरण संपते. यानंतरचा प्रवास हा 'रोटियोंके पेड' म्हणजे शेती, बैठेपणा आणि जोडीला आलेली संस्कृती याकडे जातो. पण त्यावर मी लिहिण्यापेक्षा इतरांनी मुळाबर हुकुम वाचून काढावे असे वाटते.

प्रमोद

Comments

चांगला परिचय

संक्षिप्त पुस्तक परिचय आवडला. उन्हाळ्यात भारतात असतांना पुस्तकप्रदर्शनात हे पुस्तक पाहिल्याचे आठवते. वजनाचा विचार करून घेतले नव्हते.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

उत्तम

पुस्तकपरिचय, मात्र अधिक विस्ताराने लिहिलेत तरी आवडेल. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. 'ओरिजिन ऑफ द स्पीसिज'च्या प्रसिद्धीला दीडशे वर्षं गेल्या वर्षी पूर्ण झाली, त्या दृष्टीने हे पुस्तक समयोचित म्हणावे लागेल. मराठीत अशा नॉन-फिक्शन पुस्तकाची आवृत्ती प्रकाशनाच्या दिवशीच संपते, हे सुचिन्हच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

हेच म्हणतो. मराठी भाषेत अशा स्वरूपाच्या पुस्तकाना मिळत असलेला प्रतिसाद दिलासा देणारा आहे.

छान परिचय !

छान परिचय !
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

+१

एक चांगला पुस्तक परिचय.
चन्द्रशेखर

पुस्तक परिचय

पुस्तक वाचावेसे वाटते. परिचय उद्बोधक. बंगळुरला बघतो मिळते का कोठे. कालनिर्णय (दिनदर्शिका) ;) व्यतिरीक्त मराठी पुस्तके अजुन तरी मला दिसली नाहीत येथे.

http://rashtravrat.blogspot.com

छान

सुरेख परिचय. मराठीत अशा प्रकारची पुस्तके येणे स्वागतार्ह आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

वाचावेसे वाटते आहे.

पुस्तक उत्तम असावे. वाचावेसे वाटते आहे. अजून मोठी ओळख असती तरी चालली असती.
(पण कुमार केतकरांची प्रस्तावना म्हणजे भंपकपण असणार असेही कुठेतरी वाटून गेले...)

-निनाद

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला, येत्या पुणे भेटीत पुस्तक विकत घेईन.

अवांतर: "व्होल्गा ते गंगा" आठवले.

शिपाईगडी

धन्यवाद

पुस्तक वाचनीय दिसते. अनेक लेखकांनी एकत्र येऊन संकलन करण्याची कल्पना मराठीत फारशी नसावी असे वाटते. त्यामुळेही उत्सुकता आहे.

 
^ वर