"स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी : माणूस" - लेखक रावसाहेब कसबे
सध्या उपरोल्लेखित शीर्षकाचा एक निबंध वाचत होतो. जवळजवळ शंभर पानांचा आहे. उपक्रमींना याबद्दल थोडे सांगावे आणि मुख्य म्हणजे मनात आलेले प्रश्न मांडावेत असा हेतू आहे.
ढोबळ मानाने खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेले हे लिखाण आहे.
१.धर्म आणि विज्ञान यांतील संघर्षाची नांदी
२. उत्क्रांतीचा सिद्धांत
३. माणसाचा जन्म
४. विज्ञान आणि संस्कृतीचा जन्मोत्सव
५. माणसातील जादूमय शक्तीची कल्पना
६. अस्तित्वाची अस्थिरता आणि देवा-धर्माची निर्मिती
७. नव्या वर्गाचा उदय
८. स्वतःच्या स्वतंत्र मानवी जगाचा निर्माता
९. विसरलेली भाषा
१०. मातृसत्तेचा पाडाव
११. मान्यतेची इच्छा
१२. परपीडन आणि आत्मपीडन
१३. मानवी स्वभाव
१४. परात्मता आणि जगण्यास अर्थ.
अनेक प्रकारच्या माहितीचे विवेचन करताना अनेक संदर्भ लेखक देतो. सुमारे शंभर पानांच्या निबंधात अनेक ठाशीव विधाने आलेली आहेत आणि या सार्याला कुठल्या एकाच आर्ग्युमेंट मधे मांडल्याचे मला दिसले नाही - किंवा पॅटर्न ओळखणे मला नीट करता आलेले नाही असे म्हणू, या मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखकाने काय मांडले आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात मला ज्या शंका आल्या, जिथे मला नीटसे कळले नाही ते मांडतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुरवातीलाच 'परमेश्वर ही मानवनिर्मित संकल्पना आहे' हे ऋग्वेद, ओल्ड टेस्टामेंट , कुराणाचे दाखले देऊन लेखक विशद करतो.परमेश्वरसंबंधातल्या इतर मुख्य कल्पनांचा थोडक्यात परामर्श घेऊन पुढे लेखक म्हणतो की, सतराव्या शतकापासून चालू झालेल्या विविध ज्ञानशाखांमधल्या संशोधन आणि एकंदर विकासामुळे "माणसे जुन्या श्रद्धा आणि आधुनिक ज्ञानविज्ञान यांच्यामुळे दुभंगून गेली. ....(माणसाला) जुन्या श्रद्धा सोडवेनात आणि ज्ञानविज्ञानाने मांडलेले सिद्धांत तो नाकारू शकत नव्हता ....(याचा परिणाम म्हणजे ) एकविसाव्या शतकात माणूस अधिकाधिक एकाकी असहाय आणि भयभीत बनत चाललेला आहे. याचे कारण विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने कल्पिलेली सुरक्षा कवचे - ज्यात परमेश्वर ही मध्यवर्ती संकल्पना येते - ती कवचे गळून पडत आहेत..."
माझा प्रश्न : आधुनिक माणसाच्या "एकटेपणा , असहायता आणि भयभीत अवस्थेबद्दलचे "हे विवेचन कितपत मान्य होण्यासारखे आहे ? अस्तित्ववादी वगैरे अनेक तत्त्वज्ञानाच्या शाखांनीही असे प्रतिपादन केलेले आहेच. भूतकालीन अज्ञानमूलक "सुरक्षाकवचा"च्या छायेतले सामान्य जीवन खरोखरच इतके आनंदी होते काय ? इथेच मला दाताखाली खडा आला.
ज्ञानशाखांच्या विकासाच्या टप्प्यात ज्या तीन घटना लेखक सर्वात महत्त्वाच्या मानतो त्या मला प्रस्तुत वाचनामधे नव्याने कळल्या. त्या म्हणजे
१. सोळाव्या शतकाच्या सुरवातीला गिओर्दानो ब्रुनो (giordano bruno) याने मांडलेला विचार : विश्व पृथ्व पुरते मर्यादित नाही. माणूस "निवडलेला स्पेशल कुणी " नाही. पृथ्वीसकट आपण सारे या अनंत विश्वाचा एक भाग आहोत इत्यादि. या पायी अर्थातच ब्रुनोला देहांत शासन झाले. याला जोडूनच गॅलिलिओचा उल्लेख येतो.
२. एकोणीसाव्या शतकात जॉन तिंदालने बायबलमधल्या क्रिएशनिझम वर केलेला हल्ला.
३. तिसरी घटना मात्र सर्वज्ञात असलेली, डार्विनच्या सिद्धांताबद्दलची आहे असे लेखक मांडतो. याचे विवेचन विस्तृत स्वरूपात लेखक करतो.
लेखाची यापुढची दिशा उत्क्रांतिविषयक संशोधनाच्या पुढे लोकांनी मांडलेल्या सिद्धांतांकडे आहे. यामधे आलेले ठळक मुद्दे
१. जी जी सिम्प्सन यांनी शारिरीक उत्क्रांतीबरोबरच माणसाच्या आंतरिक उर्मींच्या आधारे उत्क्रांतीसिद्धांताला पूरक असे केलेले काम. यामधे माणसाला त्याच्या पशुत्वाबरोबरच "मानवीयता" (लेखकाने उल्लेखलेली संज्ञा) या गोष्टीच्या अनुरोधाने मांडलेले सिद्धांत येतात.
सध्या इथेच थांबतो. निबंध बराच मोठा आहे आणि त्यात मला जटिलता जाणवली. काही मुद्दे अस्पष्ट वाटले किंवा अर्थातच माझे आकलन तोकडे असावे. जमेल तसा पाठपुरावा पुढील भागात घ्यावा असा विचार आहे.
(क्रमशः)
Comments
उत्सुकता
चर्चेबाबत उत्सुकता आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विषय चांगला आहे. प्रारंभाची मांडणी उत्तम झाली आहे.आता पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.
दुभंगणं आणि आनंद
पण न दुभंगलेलं जीवन अधिक आनंदी होतं हे कसब्यांच्या विवेचनात अंतर्भूत आहे की ते तुम्ही गृहित धरता आहात? आधुनिकतेत एकटेपणा, भय, दुभंगणं वाढलं असं मानता येईलही, पण आज किती माणसं ते सोडून जुन्या मूल्यांनीच जगण्यात आनंद मानतील? उदा. आधुनिक जीवनात स्त्रियांना पूर्वीहून अधिक संधी उपलब्ध झाल्या, पण त्यामुळे घर/करिअर यांसारखे दुभंग निर्माण झाले. आयुष्यभर घरातल्या रामरगाड्याला जुंपून घेऊन पूर्वी स्त्रीला काही सामाजिक सुरक्षितता मिळत होती असं तात्पुरतं धरून चालू. पण त्या सुरक्षिततेसाठी किती स्त्रिया आज करिअरला रामराम ठोकतील? किंवा जातींच्या उतरंडीनुसार परंपरागत व्यवसाय करण्याच्या पूर्वीच्या पध्दतीत गावातच स्थिर, वडिलोपार्जित व्यवसाय चालायचा. आता चरितार्थासाठी अधिक धडपड करावी लागते पण जातिनिहाय व्यवसाय स्वीकारण्याचं बंधन नाही. जर बहुसंख्य लोक परंपरागत, जातिनिहाय व्यवसायांतून बाहेर पडत असतील तर हे स्वातंत्र्य असणं हे (त्यातल्या धडपडीसकट आणि दुभंगासकट) अधिक हवंसं असणार असं म्हणता येणार नाही का? जर ते अधिक हवंसं असेल तर कदाचित त्यात काही आनंदही प्राप्त होत असेल असं मानायला जागा राहील.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रतिसाद
पण न दुभंगलेलं जीवन अधिक आनंदी होतं हे कसब्यांच्या विवेचनात अंतर्भूत आहे की ते तुम्ही गृहित धरता आहात?
हे मी अर्थातच गृहित धरतो आहे. मध्ययुगीन माणूस जास्त आनंदी होता असे कसबे म्हणत नाहीत , पण सुरक्षाकवच, सुरक्षिततेची भावना याचा उल्लेख जरूर करतात. ज्ञानविज्ञानाने उघड केलेल्या गोष्टींच्या संदर्भात त्यापूर्वीची परिस्थिती "अज्ञानातल्या सुखा"सारखी होती हे त्यांच्या लिखाणात स्पष्ट दिसते.
बाकी जंतूंच्या उरलेल्या विवेचनाशी सहमत आहे.
वाचतोय
उत्क्रांतीवर जर ठाम विश्वास असेल तर परमेश्वर मानवनिर्मित आहे हे सिद्ध करण्यासाठी धर्मग्रंथांचा आधार घेणं हा वैचारिक कमकुवतपणा किंवा अतिरेकी चांगूलपणा वाटतो. कदाचित लेखकाला उत्क्रांतीवादावरच्या विश्वासापेक्षा त्या सिद्धांताचे समाजावर होणारे परिणाम यावर भर द्यायचा असेल. निबंधाचं विवेचन पूर्ण व्हायची वाट बघतो.
कवचं गळून पडली तशी इतर सुरक्षेची जाळी निर्माण झाली, त्याचा लेखक विचार करतो का? अन्यथा ते केवळ वजाबाकीचं गणित होईल, व ऋण उत्तर आलं तर आश्चर्य काय?
हे सिद्ध करण्यासाठीचा युक्तिवाद वाचायला आवडेल. भयभीतची व्याख्याही समजून घ्यायला आवडेल. नाहीतर दाताखाली खडा येणं स्वाभाविक आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
चर्चा वाचतो आहे
चर्चा वाचतो आहे.
अनेक धर्मग्रंथांच्या आधाराने "परमेश्वर मानवनिर्मित आहे" ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे लेखक त्या धर्मग्रंथांतल्या संकल्पना परस्पर-विसंगत आहेत असे दाखवतो, आणि प्रत्येक संकल्पना त्या-त्या धर्मसमाजांच्या स्थलकालाशी बांधलेली होती, असे दाखवतो काय? (असे असल्यास श्री. राजेश घासकडवी यांच्या पहिल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण मिळू शकेल.)
हा युक्तिवाद "नियतवाद विरुद्ध निर्णयस्वातंत्र्य" यांच्यात समेट करण्याचा प्रयत्न असावा. या युक्तिवादातून काय साधते, ते धूसर आहे. "मानवीयता" अशी काही असते, याबाबत योग्य संदर्भात दुमत काहीच असू शकणार नाही. पण योग्य संदर्भात "हत्तीत्व", "मुंगीत्व" या सर्व संकल्पना अर्थपूर्ण आहेत. फरक इतका की मानव मानवीयतेच्या आंतरिक ऊर्मींबद्दल अन्य मानवांना तपशीलवार सांगू शकतो, हत्ती मात्र मानवांना हत्तीत्वाच्या आंतरिक ऊर्मींबद्दल मानवांना तपशील सांगत नाहीत. "नियतवाद विरुद्ध निर्णयस्वातंत्र्य" हा प्रश्न मूलभूत पद्धतीने विचारण्यासारखा नाही, असे माझे मत आहे. मात्र हा प्रश्न विचारण्याची मानवीय ऊर्मी असते, हे मान्य करावे लागते खरे.
लेखमाला आणि चर्चा वाचण्याची उत्सूकता आहे.
असेच म्हणतो.
-Nile
रावसाहेब कसबे
रावसाहेब कसबे यांचे थोडे फार वाचले आहे. त्यावरून माझे असे मत झाले की त्यांच्या निबंध वा पुस्तकात भरपूर प्रमाणात विस्कळितपणा असतो. (ते ललित लेखक नाहीत.)
नवीन विचारांची मांडणी किंवा कधी कधी 'कोटेबल कोटस्' मिळतील पण त्यांचे समर्थन बरेचसे विशविशित असते.
काही मांडण्यांबाबत ते प्रसिद्ध आहेत. पण मला फारसे रुचले नाहीत.
'कवचे गळून पडण्याने', बदलत्या परिस्थितीशी(आर्थिक आणि तांत्रिक) न जुळवता आल्याने, का गेले ते दिन गेले प्रवृत्तीमुळे 'एकाकी असहाय' झाल्यासारखे कोणास तरी वाटत असेल हे मी समजू शकतो. पण हे बहुसंख्य जणांना वाटते आहे की नाही हे सुद्धा विवादास्पद राहील. तेंव्हा एकाच निबंधात अनेक विषय आणि त्यातच एखादे धाडसी विधान करण्याची त्यांची प्रवृत्ती कायम आहे असे म्हणू शकेन.
प्रमोद
दोन पैसे
दोन ओवरलॅपिंग पिढ्यांमध्ये जुन्या पिढीला नव्या पिढीत घडणार्या बदलांमागील कारणमिमांसा ध्यानात येत असली तरी त्या बदलांना पचवणे कठीण वाटते. बदलांचे प्रमाण गेल्या शतकात वाढले आहे. नव्या पिढीतल्या लोकांना असहाय वगैरे काही वाटत नाही. जुन्यांच्या याविषयी काही अनामिक भावना असतात. 'सुरक्षाकवच' गळून पडत असल्याचा बहूसंख्य मानवजातीस फायदाच होत आहे.
कसबे पुढे काय म्हणतात ते वाचण्यास उत्सुक आहे.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
समर्थक कोण?
कसबे यांची मते उलगडून दाखविण्यासाठी कोणी पुढाकार घेतल्याशिवाय चर्चा फारशी पुढे सरकू शकणार नाही असे वाटते.
एकटेपणा, असहाय्यता, भित्रेपणा हे आधुनिकतेमुळे/देव नाकारल्यामुळे वाढतात हे पटले नाही.
चिरंतन भौतिकीची पीछेहाट होऊन पुंज भौतिकीचा/सापेक्षता सिद्धांतांचा जय होणे, किंवा, वस्तूंच्या निर्मितीपेक्षा सेवांची निर्मिती वाढणे, यांमुळे या बाबी वाढल्या असू शकतात काय?
--
येथे म्हटल्याप्रमाणे काही संबंध असू शकेल काय? उदा., "So, mechanical engineers are much more likely to be atheists than are electrical engineers? (Might that be because the former deal with tangible machinery and the latter deal with ghostly electrons?)"
क्ष्
दुभंग मनस्थिती शक्य आहे
सुरक्षाकवच १ - ही सृष्टी देवाने निर्माण केली. त्वमेव प्रत्यक्षं कर्तासि, धर्तासि, हर्तासि वगैरे
विज्ञानाने या समजाला दिलेला धक्का - जेनेटिक इंजिनीअरींग चे प्रयोग, क्लोन, टेस्टट्यूब बेबी वगैरे
सुरक्षाकवच २ - चांगल्या माणसांचं देव चांगलंच करतो आदि श्रद्धा
विज्ञानाने या समजाला दिलेला धक्का - ज्या देशाकडे अण्वस्त्रे तो जगावर सत्ता गाजवणार मग भलेही जग महायुद्धाच्या खाईत का लोटले जाईना. बळी तो कान पिळी.
सुरक्षाकवच ३ - आपल्यापेक्षा भव्यदिव्य आणि आपल्या आकलनशक्तीपलिकडचे असे काही अस्तित्वात आहे ज्यांची पूजा करावी. चंद्र, सूर्य, तारे, वरूण या देवता आहेत. (मला वाटतं सूक्तांमध्ये या देवतांचा उल्लेख येतो)
विज्ञानाने या समजाला दिलेला धक्का - पाणी = H2O, चंद्रावरची स्वारी, मंगळावर सोडलेले अवकाशयान
पूर्वापार चालत आलेल्या , संस्कारांनी मनात भिनलेल्या कल्पना इतक्या सहजासहजी सोडता येणार नाहीत, थोडा काळ जावाच लागेल तोपर्यंत लेखात लिहीलेली "दुभंग" मनःस्थिती (transition period ) शक्य वाटते.
हे असेल?
कसबे ह्यांना जे म्हणायचे आहे ते कदाचित हे असेल असे वाटते -
पूर्वी आधाराचा दगड होता, आता तो आधार पूर्ण सोडवत नाही आणि पूर्ण धरवत नाही, नक्की काय हवं आहे हेच कळत नाही. न धड आधुनिक/तार्किक न धड श्रद्धावादी. ह्या मनस्थितीची हि लेकरे आहेत - एकटेपणा, असहाय्यता, भित्रेपणा.
थोडे स्पष्टीकरण
सर्वप्रथम माझ्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि उत्तेजनेबद्दल आभारी आहे. मी लेखाचे पुनर्वाचन करता करता माझे प्रस्तुत लिखाण क्रमशः करण्याचा प्रयत्न करतो आहे. जमेल तसे इथल्या प्रश्नाना उत्तरे देईन.
सहस्त्रबुद्ध्यानी वर म्हण्टल्याप्रमाणे लिखाणात विस्कळितपणा आहे. पण त्याचबरोबर ते बरीच विधाने करतात, प्रत्येक विधानाला पूरक स्पष्टीकरण मिळतेच असे नाही. या मिस्-मॅशमधे काही हाताशी लागते का ? ते येथे पाहाण्याचा प्रयत्न आहे.
स्वावलंबनाच्या वाटेतूनच परस्परावलंबनाची वाट जाते.
माझा प्रश्न : आधुनिक माणसाच्या "एकटेपणा , असहायता आणि भयभीत अवस्थेबद्दलचे "हे विवेचन कितपत मान्य होण्यासारखे आहे ? अस्तित्ववादी वगैरे अनेक तत्त्वज्ञानाच्या शाखांनीही असे प्रतिपादन केलेले आहेच. भूतकालीन अज्ञानमूलक "सुरक्षाकवचा"च्या छायेतले सामान्य जीवन खरोखरच इतके आनंदी होते काय ?
आधुनिय (सध्याच्या काळातील) माणसात म्हणजे बहुतांशी शहरी भागातील किंवा स्वावलंबी झालेल्या व्यक्तींना एकटेपणा डसतो, पण तो एकटेपणा त्याला/तीला स्वत:लाच हवा-हवासा असतो. भौतिक विद्न्यानामुळे आजच्या काळातील माणूस आधि आर्थिकदृश्ट्या मग रहाणं-जगण्याच्या दृश्टीने स्वतंत्र झाला, स्वावलंबी झाला. आधि तशी (भारतात) परीस्थिती नव्हती. भावनिकदृश्ट्या मात्र आपण अजूनही भूतकाळातील कल्पनांना त्यागू शकत नाही आहोत. भौतिकदृश्ट्या जशी पाश्च्यात्यांच्या वाटेचा स्विकार केला तसाच भावनिक दृश्ट्या पाश्च्यात्यांचा 'कौटुंबिक दृश्टीकोन' आपण स्विकारू शकत नाही आहोत. पण त्या दृश्टीकोनाचा भविश्यात स्विकार करावा लागेल, असे वाटते.
स्वावलंबनानंतर परस्परावलंबन ही अवस्था असते. त्या अवस्थेत स्वावलंबी झालेल्यांनी कसे जायचे? ह्या प्रश्नांची उत्तरे 'कौटुंबिक दृश्टीकोन' सुधारल्याशिवाय मिळणार नाही, असे वाटते.
माझ्या मते, 'या जगात आपले म्हणण्यासाठी 'कायमचे' असे कोणी नसते.' पाश्च्यांत्यांप्रमाणेच भारतात ही आई-वडिलांनी मुलां-मुलींनी सद्न्यान होयीपर्यंत त्यांची जबाबदारी घ्यावी. सद्न्यान झाल्यानंतर त्यांच-त्यांच त्यांनी पहावं. ज्या क्शणी सद्न्यानी झालेल्यांवर स्वत:चीच जबाबदारी घेण्याची वेळ येईल, तेंव्हाच परस्परावलंबन म्हणजे काय? हे समजू शकेल.
'परस्परावलंबन म्हणजे काय?' हे प्रणयाचा उंबरठा ओलांडू पहाणार्या तरुणाईला जेंव्हा स्वत:चे घर नसणार, स्वत:चे आर्थिक गणित स्वत:च सोडवण्याची जबाबदारी येणार तेंव्हाच कळू शकेल.