ज्ञान व ज्ञानाची साधने सामाईक हवीत!

एके काळी आपल्या खेड्यापाड्यात काही सामाईक मालमत्ता असायच्या; उदा - गायरान जमीन, देवरायी जंगल, विहिरी - तळं यासारखे पाण्याचे श्रोत, खेळण्यासाठी पटांगण, देवूळ, इ.इ. या सामाईक मालमत्तेवर सर्वांचा हक्क असायचा. सर्व जण अशा मालमत्तेची काळजी घेत असताना उपभोगही घेत होते. परंतु आताच्या बदलत्या परिस्थितीत ही सार्वजनिक मालमत्ता आता सार्वजनिक न राहता कुणाच्या तरी नावावर जमा झाली आहे. हे तिर्‍हाइत त्यावर हक्क सांगत असल्यामुळे सामान्य जनतेला त्या सहजपणे वापरता येत नाहीत. त्यासाठी किंमत मोजावी लागते. देवळातील देवाचे दर्शनही दुर्लभ होत आहे. डोके टेकायलासुद्धा दलालांना पैसे द्यावे लागतात. पब्लिक - प्रायव्हेट पार्टनरशिप या गोंडस नावाखाली हा व्यवहार होत असल्यामुळे पिढ्यान पिढ्या ज्या हक्काने आपण या गोष्टी भोगत होतो त्याला आपण पारखे होत आहोत.

या प्रकारच्या स्थावर मालमत्तेच्या खाजगीकरणांच्या धोक्यापेक्षा ज्ञान व ज्ञानाच्या साधनांची मक्तेदारी जास्त धोकादायक व दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. आपल्या येथे उपजतच विलक्षण बुद्धीमत्ता असलेले हजारो आयन्स्टाइन जन्मले तरी यापैकी किती जणांना भौतिकी शिकण्याची संधी मिळू शकेल हे सांगता येणार नाही. हाच प्रश्न कोलंबिया विद्यापीठाचे कायदा व कायद्याच्या इतिहासाचे प्राध्यापक, एबेन मोग्लेन यांनी दिल्लीतील एका सभेत भाषणासाठी जमलेल्या मोजक्या प्रेक्षकांना विचारले. परंतु या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नव्हते. कारण सपाट्याने होत असलेल्या ज्ञानाच्या बाजारीकरणामुळे कालांतराने ज्ञान संपादन सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होईल. त्यांना न परवडणारे ठरेल. मोग्लेनच्या प्रश्नाचा रोख मुख्यत्वेकरून सभेत बसलेल्या काही सॉफ्टवेर व स्वामित्व हक्क यांची जाण असलेल्यांना नक्कीच कळला असेल. त्यानी मांडलेल्या ज्ञानांचे दरवाजे मुक्त करण्याचा मुद्दा गंभीर चर्चेचा विषय झाला. वाद रंगला. परंतु मोग्लिन हा कुणी तरी द्रष्टा किंवा फार मोठ्या मूलभूत बदलाची अपेक्षा करणारा वा अत्यंत मूर्ख माणूस असाच जमलेल्यांना वाटला असेल.

मोग्लिन हे कायदेविषयक इतिहासाचे तज्ञ आहेतच. त्याचबरोबर ते सॉफ्टवेर फ्रीडम लॉ सेंटर ( SFLC) या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ही संस्था संगणक क्षेत्रातील सॉफ्टवेरला मक्तेदारांच्या कचाट्यातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. फ्री व ओपन सोर्स सॉफ्टवेर (FOSS) चे संरक्षण, प्रचार व त्यांच्या प्रगतीविषयी सल्ला देण्याचे कार्य ही संस्था करत आहे. अशा मुक्त संकल्पनेवर विश्वास असलेले मोग्लिन यासंबंधीच्या कित्येक प्रकल्पावर कार्यरत आहेत. त्यामुळे सॉफ्टवेर उद्योगातील बड्या-बड्यांशी त्यांना संघर्ष करावे लागत आहे. दिल्ली येथील भाषणाच्यावेळी ते केवळ सॉफ्टवेरच्या स्वातंत्र्याविषयीच बोलत नव्हते; तर यापेक्षा फार मोठा कॅन्वास त्यांनी त्यावेळी उभा केला होता. डिजिटल जगातील उत्पादनं व वितरणांसाठी खर्ची घातलेले ज्ञान काही दिवसांनी वास्तव जगातील घडामोडींवर परिणामकारक ठरणारे असल्यामुळे ते ज्ञान सामाईक असावे, त्याचा वापर मुक्तपणे करता यावा याचा ते आग्रह धरत आहेत. "आपण या स्वातंत्र्याच्या जवळ पोचलेलो असून यासाठीचा अडथळा आहे तो फक्त बुद्धी स्वामित्व हक्काचा."

सामाईक ज्ञानाची ही संकल्पना आहे तरी काय? ढोबळपणे सांगायचे असल्यास तज्ञापासून अज्ञापर्यंतच्या सर्वांशी संवाद साधणार्‍या, एकमेकाशी देवाण घेवाण करणार्‍या व सर्वांना सहभाग करून घेवू शकणार्‍या ज्ञानांच्या स्रोतांकडे बघण्याची दृष्टी या संकल्पने मागे आहे असे म्हणता येईल. डिजिटल जगात ही संकल्पना खरोखरीच क्रांतीकारी ठरत आहे. आता आपण वापरत असलेले विकिपिडिया, गूगल सर्च इंजिन, मोझिल्ला फायरफॉक्स, युनिक्स, लिनक्स या क्रांतीचे फलित आहेत. ग्राहकांना वेठीस धरून प्रत्यक्ष पैसे मोजल्यानंतरच चांगले काही तरी मिळू शकते या समजुतीला या संकल्पनेनी फार मोठा धक्का दिला आहे.संगीत क्षेत्राशी संबंधित उत्पादन व वितरण व्यवस्थेत या सामाईक ज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. काही तज्ञांची व त्यांचा (गैर)वापर करणार्‍या महत्वाकांक्षी उद्योजकांचीच मक्तेदारी असलेले संगीत क्षेत्र काही वर्षातच सामाईकतेकडे झेप घेवू शकली. सार्वजनिक विहिरीतील पाणी कुणीही येवून व उपसून आपली तहान भागवावी त्याप्रमाणे डिजिटल वर्ल्डमध्ये कुणीही येवून गाणी डाऊनलोड करून ऐकावीत अशी शिथिलता असल्यामुळे हे क्षेत्र आता बुद्धी स्वामित्व हक्क, संगीतज्ञाची मालकी व मक्तेदारी, सर्जनशीलतेचा अहंभाव यापासून मुक्त होत आहे. त्याचप्रमाणे नवोदित संगीतकारांना आपली रचना मुक्तपणे अपलोड करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची संधी ही संकल्पना उपलब्ध करून देत आहे.

आपला हा समाज सामूहिक मेंदूशक्तीचा वापर करतच मानवी इतिहासाला कलाटणी देत आला आहे. मेंदूतील ही शक्ती व या शक्तीच्या विचारमंथनातून उघडे होत गेलेले ज्ञान भांडार कुणा एकाचीच मालमत्ता असू शकणार नाही. प्रश्नाचे उत्तर शेवटी एकट्याच्याच नावावर असले तरी उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेत अनेकांचा सहभाग असतो, हे आपण विसरू शकत नाही. एकापासून दुसर्‍याला, दुसर्‍यापासून तिसर्‍याला... एका पिढीपासून दुसर्‍या पिढीला व त्यापासून नंतरच्या पिढीला... अशी ज्ञानगंगा वाहत आली आहे. यात अनेकांचा सहभाग आहे. असे करत करत, उत्क्रांती होत होत ज्ञानाचा विकास झाला आहे. न्यूटनने म्हटल्याप्रमाणे दिग्गजांच्या खांद्यावर उभे राहूनच आपण जगाचे निरीक्षण करत असतो. त्यामुळे आपली उंची वाढल्यासारखी वाटत असली तरी खांद्यावरून उतरल्यानंतर आपण खुजेच दिसू लागतो. त्यामुळे जे काही आपण मिळविले आहे त्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटेकरी भरपूर जण असतात. या आधीच्या पिढीने गणिताच्या वा भूमितीच्या पेटंटची मागणी केली असती तर आपण या संगणकयुगात पाय रोवून कधीच उभे राहिलो नसतो, याची जाणीव आपण ठेवायला हवी. गणित, भूमिती, वा अशा प्रकारच्या ज्ञान -विज्ञान शाखा प्रमाणे सॉफ्टवेरसुद्धा ज्ञानशाखाच आहे, याचे भान ठेवायला हवे. मोग्लिनच्या मते बुद्धीस्वामित्व हक्काचे तुणतुणे वाजविणारे या सामाईक ज्ञानाला संकुचित करत आहेत व अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी इतरांचे शोषण करत आहेत.

मोग्लिन यांना नेमके काय म्हणायचे आहे? मानवी अस्तित्वाला आकार देण्यात, त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यात माणसा-माणसातील परस्पर संवाद क्षमतेचा फार मोठा वाटा आहे. आपण विचार करू शकतो, आपण आपल्यातील अमूर्त विचारांना अभिव्यक्त करू शकतो, विचार विनिमयातून कल्पनेत बदल, सुधारणा, विस्तार करू शकतो व या सर्व व्यवहाराप्रक्रियेत इतरांना सहभागी करून घेऊ शकतो. परंतु आता तसे होताना दिसत नाही. थोडक्यात म्हणजे आता ज्या मार्गावरून मानवी समाज मार्गक्रमण करत आहे, ते मोग्लिन यांना पसंद नाही. त्यांना हे सर्व बदलावेसे वाटत आहे. मोग्लिनच्या विचारांशी सहमत असलेल्यांना यात नवीन काही नाही असे वाटेल. स्वामित्व हक्क म्हणजेच या नंतरच्या जगाचे साध्य या समजुतीला धक्का देणार्‍या मोग्लिनसमोर एकमेव ध्येय आहे; कल्पना, संकल्पना, विचार व ज्ञान यावरील मक्तेदारी लवकरात लवकर संपली पाहिजे; ज्ञान व ज्ञान साधनांचे वितरण सुलभपद्धतीने झाले पाहिजे व अशा गोष्टींना सामाईकतेमध्ये समावून घेणार्‍या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे.

डिजिटल जगातील सांघिक प्रयत्नातून होणार्‍या निर्मितीप्रमाणे वास्तवातील समस्यांना उत्तरं सापडण्याची शक्यता धूसर आहे, याची पूर्ण कल्पना मोग्लिन यांना आहे. कारण 21व्या शतकातील राजकारण व अर्थकारण यापूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा फार वेगळे आहे. या शतकातील काही उत्पादनांना जवळ जवळ शून्य निर्मिती खर्च आहे. असे असतानासुद्धा अवाच्यासवा किमतीत या गोष्टी विकल्या जात आहेत. काही शिकायचे म्हटले की अगोदर किंमत मोजा, ही वृत्ती वाढत आहे. खरे पाहता ज्या गोष्टी प्रती काढण्याइतपत चांगल्या असतील अशा गोष्टी एकमेकात वाटण्यायोग्यच असतील. (Anything worth copying is worth sharing) म्हणूनच ज्ञान निर्मितीसाठीच्या स्रोतांना बंदिस्त न करता मुक्तपणे विकसित होण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास या ज्ञानात वाढ होत जाईल व ही वाढच माणसांचे प्रश्न सोडवू शकेल. दोनशे वर्षापूर्वीची भांडवली व्यवस्था उत्पादनांना ज्ञानाची जोड देत प्रगती केली. परंतु आता मात्र आपल्याला उलट्या दिशेने प्रयत्न करून ज्ञानाला भांडवली निकषातून मुक्त करायचे आहे. मानवी अस्तित्वासाठी सर्व मेंदूना एकत्र आणून त्यातून बुद्धीमत्तेची वाढ करू शकणारे एक प्रभावी नेटवर्क तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. विकसित राष्ट्रातील भांडवली अर्थकारण सामाईकतेविषयी अत्यंत उदासीन आहे. प्रत्येक क्षेत्रातील बुद्धी स्वामित्व हक्काच्या हव्यासामुळे प्रगती कुंठित होत आहे.

नवीन नवीन कल्पना व समस्यांना योग्य उत्तरं शोधून मानवी समाजाचा र्‍हास थांबविण्यासाठी प्रत्येक मेंदू प्रशिक्षित व्हायला हवा, याच कल्पनेचा पाठपुरावा मोग्लिन करत आहेत. कदाचित एकीकडे ही कल्पना द्रष्टा वा युटोपियन वाटत असेल व दुसरीकडे अत्यंत वेडगळ, अव्यावहारिक असेही वाटण्याची शक्यता आहे. काहींना ही क्रांतीकारक वाटेल व काही इतरांना हा अमेरिकेतील वकील कम्युनिस्टासारखा बरळत आहे असेही वाटेल. सामाईक स्रोतांवर सर्वांचा हक्क असावा हेच जर कम्युनिस्ट तत्वज्ञान असल्यास मोग्लिन हे खरोखरच कम्युनिस्ट ठरतील. डिजिटल समाजात free software movement मध्ये सामील झालेल्यांना, स्वातंत्र्याचे हक्क मागणार्‍यांना यापूर्वीही कम्युनिस्ट, लुटारू, अराजक माजविणारे म्हणून हिणवले आहे. परंतु हे हिणविणारे बुद्धी स्वामित्व हक्काच्या पांघरुणाखाली आपली डाळ शिजवत, अनिर्बंध सत्ता भोगत आहेत, हे विसरता येत नाही.

Comments

वेडगळ, अव्यावहारिक

बौद्धिक संपदा पुढेपुढे देत राहिल्याने वाढेल हे महत्वाचे आहेच परंतु ते (तुम्हीच सूचित केल्याप्रमाणे) कोणत्याही संपत्तीविषयी खरे आहे. ट्रेड सीक्रेट (व्यावसायिक गुपित) पेक्षा पेटंट (एकस्व), कॉपीराईट (प्रताधिकार) हे पर्याय या दृष्टीने समाजोपयोगी आहेत. अन्यथा, निर्मिती करणार्‍याला मेहेनताना कसा मिळेल?
--
शटलवर्थने पैसे ओतले म्हणून उबुंटू चालू आहे. मोझिला चालण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे ते गूगलची जाहिरात करून पैसे मिळवतात.
FOSS मॉडेलने नेत्रदीपक यश मिळविल्याची उदाहरणे आहेत काय? गेम थिअरीनुसार, ते एनजीओ एक फ्रिंज चळवळ म्हणूनच राहतील.
गूगल हे FOSS आहे काय? लॅरी पेज यांची क्रमवारी आज्ञावली (पेज रँक अल्गोरिदम) तर पेटंटपेक्षाही अतिसुरक्षित अशा व्यावसायिक गुपितात बंद आहे. (त्यांचे क्रोम हे न्याहाळकही पूर्ण खुले नाही. अँड्रॉईड या लिनक्स आधारित सॉफ्टवेअरला सध्या यश मिळते आहे खरे, परंतु त्याचे मूळ कारण असे असावे की अँड्रॉईड मार्केटमधील सॉफ्टवेअरे मात्र विकतच घ्यावी लागतात.)
विकिपीडियाही देणग्यांवर चालते. ते बर्‍यापैकी विश्वासार्ह आहे कारण सरकारांनी दिलेल्या पैशांतून झालेल्या संशोधनांचे संदर्भ तेथे दिले जातात. खास विकिपीडियासाठी लेखन ही दुनियादारी आहे.

सार्वजनिक विहिरीतील पाणी कुणीही येवून व उपसून आपली तहान भागवावी त्याप्रमाणे डिजिटल वर्ल्डमध्ये कुणीही येवून गाणी डाऊनलोड करून ऐकावीत अशी शिथिलता असल्यामुळे

हे कधी सुरू झाले?

गणित, भूमिती, वा अशा प्रकारच्या ज्ञान -विज्ञान शाखा प्रमाणे सॉफ्टवेरसुद्धा ज्ञानशाखाच आहे, याचे भान ठेवायला हवे.

लोहमार्गअग्नियानसमयसारिणीसुद्धा ज्ञानच देते. j2ee लाही मसंवर प्रतिष्ठा आहे असेही ऐकिवात आहे.

मर्यादा

चांगला लेख. एक चांगला प्रश्न चर्चेला आणलात.

स्वामित्व हक्काच्या कायद्यांनी जशी मर्यादा आणली तशीच प्रगती पण आणली.
पेटंटचा कायदा किती जुना हे मला माहित नाही. पण पास्कलने त्याचा वापर केला होता. त्याला आज ३००+ वर्षे झालीत. त्याचवेळी भारतात असे कायदे नसताना अशी किती प्रगती झाली? (यास इतर बाबी पण जबाबदार असतील पण हा पण महत्वाचा घटक असू शकतो.) अगदी हल्ली हल्ली पर्यंत भारतातील औषधांचा कायदा हा पळवाटखोर होता. पण त्यामुळे त्यावेळी नवीन औषधे भारतात्त किती झाली?

गाणी बनवताना सर्रास नक्कल करणे व विशविशित कायद्यात ते बसणे यात कुठल्या मूलगामी संगितकाराला प्रोत्साहन मिळते? आपण एखादे पुस्तक लिहावे आणि गाजल्यास कुणीही ते छापावे असे झाले तर किती लेखक मनापासून पुस्तक छापण्याचा प्रयत्न करतील?

याचबरोबर स्वामित्व हक्क नाकारणार्‍यांचे कौतुक करणे भाग आहे. राजवाड्यांनी हे फार पूर्वीकरण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. काही (?) औषधे/लस करणार्‍यांनी ते नाकारले होते. (असे काहीसे वाचले आहे.)

संगणकाच्या बाबतीत मात्र हा कायदा कदाचित बराच जाचक असावा. पेटंट हे १५ वर्षेच टिकते. तर स्वामित्व हक्क हा ६० वर्षे टिकतो. हे दोन्ही (पेटंट आणि स्वामित्व) हे सर्वांना पूर्ण खुले असतात. पेटंट हे तर आता नेटवरून डाउनलोड करता येते. तर पुस्तके, चित्रे, गाणी ही लोकांना वाचायला/बघायला/ऐकायला मिळतात. पेटंट सर्वांसाठी उपलब्ध असल्याने त्यातील् ज्ञान वापरायची संधी सगळ्यांना असते.

संगणकप्रणालींचे मात्र तसे नाही. बहुतेक स्वामित्वहक्काखालील प्रणाली या पूर्णपणे (सोर्सकोड) बघायला मिळत नाही. त्यांचा फक्त वापर करता येतो. बरेचदा आपली मालकी असूनही त्याचे हार्डवेयर आता उपलब्द्ध नसल्याने वापरता येत नाही. (जुन्या प्रणाली.) त्याचे आयुष्य फार लहान असते. अशा परिस्थितीत स्वामित्व (कॉपीराईट, ६० वर्षे) कायद्याखाली त्याला संरक्षण देणे कदाचित गैर वाटू शकेल. त्यासाठी कदाचित वेगळ्या कालमर्यादेचा विचार व्हावा. प्रणालींचे विक्री आयुष्य संपल्यावर त्या सोर्स कोडसकट खुल्या झाल्यातर ज्ञानाला लागलेल्या बांधात कदाचित छिद्र पडेल.

ओपनसोर्स प्रणेत्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे आणि ते सर्वस्वी कौतुक आणि मदतीस पात्र आहेत.

प्रमोद

"काही काळानंतर मुक्त" असा मध्यममार्ग

"काही काळानंतर मुक्त" असा मध्यममार्ग असू शकतो.

अनेक देशांत एकस्व अधिकारावर (आणि प्रत-अधिकारावर) कालमर्यादा घातलेल्या दिसतात. हा मध्यममार्ग ठीक वाटतो. मात्र कालमर्यादा किती ते ठरवणे तसे कठिणच. मर्यादा खूप कमी ठेवली, तर संपत्ती-उत्पादनाचे नवे साधन बनवणार्‍याला पुरेसा फायदा मिळणार नाही. मर्यादा फार अधिक ठेवली, तर आदले साधन वापरून नवे साधन बनवणार्‍या व्यक्तीवर फार बंधने येतील. पण तरी, वेगवेगळ्या देशांत दोन्ही बाजू भांडून-भांडून तडजोड करायचा प्रयत्न करतात.

धारणा

तुमचे लेख विचार करायला उद्युक्त करतात त्यामुळे आवर्जुन वाचतो.

माझी स्वतःची धारणा आहे ती अशी - नो लंच इज फ्री.

आज सगळीकडे शिक्षण महाग होते आहे असे जे चित्र आहे, ते संपुर्ण खरे नाही. इग्नोयु सारख्या संस्था अत्यंत स्वस्तात शिक्षण देतात. आज तेथे शिकायला नाक मुरडणारे हुशार विद्यार्थी तेथे जाऊ लागले की, त्याचा बोलबोला होइल.
वरील रिकामटेकडा ह्यांचा प्रतिसाद आवडला. [ अवांतर- त्यांचे लिखाण खूप वर-खाली होत असते (ते ड्युपायडींमुळे होते का?)]

कठीण विशय

लेखातील विशय खूप कठीण आहे. आकळताना धाप लागली.

इतिहासात पाहिले तर जगात 'आधी आपला स्वार्थ (व्यवस्थितपणे) साधणे' हाच गुण आजपर्यंत टिकत आलेला आहे. सांकल्पिनिक (कॉंसेप्चूअल) स्तरावर 'आधी जगाचे भले करण्याचा' विचार करून केलेली गोश्ट टिकत नाही. कारण, 'अरे संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर'

पण एक गंमत आहे बुवा! सगळ्या 'स्वार्थ साधण्याच्या' नवनवीन संकल्पना गोर्‍या लोकांनाच कशा काय आधी सुचतात? त्यामुळे अशा कृती आधि केल्यामुळे त्यांना नेहमीच ऍडेड ऍडव्हांटेज मिळतो.

ज्ञान म्हणजे नक्की काय...

या प्रकारच्या स्थावर मालमत्तेच्या खाजगीकरणांच्या धोक्यापेक्षा ज्ञान व ज्ञानाच्या साधनांची मक्तेदारी जास्त धोकादायक व दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. आपल्या येथे उपजतच विलक्षण बुद्धीमत्ता असलेले हजारो आयन्स्टाइन जन्मले तरी यापैकी किती जणांना भौतिकी शिकण्याची संधी मिळू शकेल हे सांगता येणार नाही.

कोणे एके काळी जग कसं सुंदर होतं यासारखा हा युक्तीवाद अगदी वरवरच्या चिकित्सेलाही उतरत नाही. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांत शिक्षण मिळवणाऱ्यांची संख्या जगभरच प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. सरासरी शिक्षण पातळी वाढलेली आहे. ज्या काळात गावरान वगैरे सामायिक होतं त्या काळात शिक्षण वा ज्ञान हे विभंजित होतं. लोहाराच्या मुलात गायक होण्याचे कलागुण असले तरी त्याला ते शिकण्याची संधी जवळपास शून्य होती.

मला असं वाटतं की या लेखात ज्ञान हा शब्द खूपच व्यापक अर्थाने वापरला आहे. मूलभूत ज्ञान (भौतिकी वगैरे), तंत्रज्ञान, किंवा ते तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेलं यंत्र (सॉफ्टवेअर वगैरेसुद्धा) या सगळ्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. सॉफ्टवेअर किंवा औषधं याबाबतीत निर्मात्याला फायदा मिळण्यासाठी त्याला (काही मर्यादित काळासाठी) दिलेला मालकीचा अधिकार हा जणू काही मूलभूत ज्ञानालाही लागू आहे अशा अविर्भावात प्रश्न मांडला आहे. त्यामुळे केवळ बागुलबुवा उभा राहातो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अगदी मनातले

-- लोहाराच्या मुलात गायक होण्याचे कलागुण असले तरी त्याला ते शिकण्याची संधी जवळपास शून्य होती.---
अगदी मनातले बोललात. हे गुण नैसर्गिकरीत्या अनेकात असतात; एखाद्याला चांगले गाता येणे ह्यात विषेश काहीच नाही. ज्यांच्या आइवडीलांकडे त्यांच्या मुलांना हे शिकवण्याची आर्थिक (आणि क्वचित, गुण) क्षमता होती / आहे, ते असे द्न्यान मुलांना देऊ शकले.

अतिशय महत्वाचा विषय

ग्राहक म्हणून ओपन सोअर्स संगणक प्रणाली कितीही स्वागत करण्यासारख्या असल्या तरी ज्या कोणी अशा प्रकारची नवीन प्रणाली स्वत:चा वेळ, कष्ट व पैसा खर्च करून बनवलेली असते त्याला याचा मोबदला मिळालाच पाहिजे. अन्यथा या भानगडीत कोणी पडणारच नाही. सर्व साम्यवादी देशांच्यात सार्वजनिक क्षेत्रामधले या पद्धतीचे प्रयोग पूर्णपणे फसण्याचे हे एकमेव कारण आहे. लेखात मुख्यत्वे सॉफ्टवेअर बद्दल चर्चा असल्याने फक्त त्याचाच विचार मी येथे करत आहे. एकदोन उदाहरणे देतो.
मायक्रोसॉफ्टचे ऑफिस हे सॉफ्टवेअर गुणवत्तेच्या बाबतीत ओपन ऑफिसपेक्षा मला तरी उजवे वाटते. परंतु मायक्रोसॉफ्ट ने आपले स्वामित्व दाखवण्याच्या निरनिराळ्या एवढ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत की वैयक्तिक उपयोगासाठी वापरत असलेले लोक ओपन ऑफिस वापरत असतात. केवळ परवडत नाही म्हणून कमी गुणवत्तेचे उत्पादन वापरणे लोकांना भाग पडते आहे. डॉलर आणि रुपया यांच्या किंमतीतील फरकामुळे तर भारतीय उपभोक्त्यांना अमेरिकन उत्पादकांनी बनवलेली ही उत्पादने परवडतच नाहीत. त्यामुळे मग पायरेटेड उत्पादने वापरली जातात. गूगल ने या बाबतीत एक क्रांती घडवून आणली आहे यात शंकाच नाही. उच्च गुणवत्ता असलेली उत्पादने ग्राहकांना फुकट देण्याची त्यांची योजना इतकी ग्राहकायोपगी आहे की मायक्रोसॉफ्टची जागा काही दिवसात गूगलने घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
भारतात जर सर्वसाधारण माणसापर्यंत संगणक पोचवायचा असला तर सॉफ्टवेअर प्रणाली त्याला फुकट किंवा अल्प किंमतीला मिळणे आवश्यक आहे असे वाटते. या साठी सरकारने अशी उत्पादने जर उत्पादकांकडून विकत घेऊन ओपन जनरल लायसे न्स खाली फुकट वितरण करण्यास सुरवात केली तर सर्व साधारण माणसासाठी ती एक स्वागतार्ह गोष्ट ठरू शकते. अन्यथा संगणक स्वस्त करायचे पण प्रणाली अतिशय महाग असल्यामुळे त्या पायरेटेड वापरायच्या याचा काही उपयोग नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर