लिपी आणि मौखिक ज्ञान

नमस्कार मंडळी,
प्रियाली यांनी या आधी सुरु केलेल्या या चर्चेत्तून पुढे आलेली माहिती, सदस्यांचे प्रतिसाद यावर विचार करत असता या परंपरेशी निगडित एका पैलूकडे माझे लक्ष गेले.

माझ्या एका कन्नड मित्राकडे गेलो असता त्याने 'सूर्यनमस्कार' या नावाचे काही संस्कृत ऋचा पठणाची तबकडी लावली. त्यात सुरुवातीला प्रस्तावना होती. त्या मध्ये सूत्रधार इंग्रजीमध्ये असे सांगत होता की आपण ज्या ऋचा ऐकणार आहात त्यात सूर्या, वरूणा, आदित्या, पवना इत्यादींची वर्णने आहेत वगैरे. ते सूर्या, वरूणा, आदित्या, पवना असे उच्चार ऐकून मी म्हटले की हे संकृताचे पाश्चात्यीकरण चालले आहे. त्यावर ते उच्चार योग्य आहेत असे त्याचे मत पडले. आणि त्याला असेच उच्चार शिकवले गेले आहेत असे तो म्हणाला. म्हणून मी त्याला र आणि रा हे कसे वेगळे उच्चारले आणि लिहिले जातात ते थोडे दाखवले. आणि कन्नडामध्ये ते कसे असते व लिहिले जाते याची चौकशी केली. त्यावर बोलत असताना मी त्याला म्हटले की देवनागरी मध्ये जे काही उच्चारायचे आहे ते आपण लिहू शकतो अशी क्षमता कन्नडालिपी मध्ये आहे काय? त्याला मी त्याच्या कडचे एखादे संस्कृत श्लोकांचे पुस्तक दाखव असे सुचवले. आणि मी आजवर माझ्या विहिरीत बसून जे काही कयास बांधले होते त्यांना पहिला सुरुंग लागला.

तो म्हणाला की ते श्लोक कन्नडालिपीमध्येच आहेत. जुन्या कन्नडालिपीमध्ये अतिशय समर्पक उच्चार करता यावेत अश्या काही सोयी होत्या पण आता त्या रोजच्या वापरात नसाव्यात. आजवर मी समजत होतो की संस्कृत हे देवनागरीतच लिहिले गेले आहे आणि मूळ संहिता म्हणजे देवनागरी आणि त्याचे निरुपण मग मराठी, इंग्रजी, जर्मन या कोणत्याही भाषेत होते.
अधिक चौकशी करता असे समजले की कन्नडा साहित्यात अनेक ठिकाणी संस्कृत मूळ श्लोक देवनागरी मध्ये आणि मग कन्नडालिपीमध्ये असे दोनही तर्‍हेने छापलेले उपलब्ध असते. बंगाली मध्ये मध्ये मात्र तसे नाही असेही समजले.बंगाली पुस्तकांच्यात देवनागरी श्लोक आणि अर्थ बंगाली लिपीमध्ये असतो.

पण आता मुद्दा असा उपस्थित होतो की जर ते ज्ञान जन्मकाळात मृद्रित न केलेले आणि पाठांतरानेच पुढे सरकलेले असेल तर कोणत्याच लिपीची त्यावर मक्तेदारी नाही. जो तो आपल्या लिपीत ते उतरवून काढेल आणि ती लिपी जर का हावे तसे उच्चार करण्यास/लिहून ठेवण्यास सक्षम नसेल तर मग अमुन ने म्हटले ते प्रत्यक्षात उरायला वेळ लागणार नाही.

यावरून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
१. सर्वप्रथम कोणत्या लिपीत वेद अक्षरबद्ध झाले? तसेच संकृत भाषेची आणि त्यातिल वेदादी साहित्याची लिपी कोणती हे कसे व कधी निश्चित झाले?
२. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा गीता इत्यादी प्रसृत होते तेव्हा मूळ संहिता/श्लोक देवनागरीत लिहितात असा संकेत का रुढ झाला?
३. हे सर्व वाड्मय अक्षरबद्ध होवू लागल्याला सुद्धा अनेक शे वर्षे झाली असतील आणि अनेक लोक ते मुद्रित स्वरुपात वाचूनच वेद म्हणू लागले असावेत अशी शक्यता आहेच. असे असताना देशी / परदेशी अभ्यासक इत्यादी लोक, वेदांचे पठण सर्वत्र सारखे होते असे म्हणतात तर हे पुन्हा मौखिक प्रसार पद्धतीचे श्रेय अधोरेखित करते की त्या लोकांच्या विदातील अथवा निष्कर्षातील काही कच्चे दुवे समोर आणते?

या विषयी उपक्रमींचे विचार आणि माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. मौखिक ज्ञान हे लिपीबद्ध कसे आणि केव्हा झाले असावे आणि त्यावर एका लिपीचा अधिकार असतो की ज्या लोकांनी ते मुखोद्गत केले आहे त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराच्या लिपीचा ते वापर करतात / करु शकतात हा या चर्चेचा मूख्य आशय असावा आणि त्याला अनुषंगुन विचार आणि माहिती मांडावी अशी आपणास नम्र विनंती.

आपला,
-- लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त चर्चा - अधिक प्रश्न

चर्चा सुरेख आहे परंतु खोलवर जाऊन लिहिता येईल असे फारसे माझ्याकडे काही नाही. वर जे प्रश्न आहेत ते मलाही पडले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न

देवनागरी कधी वापरली जाऊ लागली? अर्थात विकिवर माहिती आहेच.

ब्राह्मी लिपी देवनागरीची आई मानली जाते. (देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीपासून.) इ.स.पूर्व ५ व्या शतकात ब्राह्मी वापरली जात होती. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात. तेव्हा देवनागरी कोण वापरत होते आणि ब्राह्मी कोण?

जर व्यासांनी गणेशाला महाभारत लिहायला लावले तर ते कोणत्या लिपीत? असे अनेक प्रश्न माझ्यासमोरच उभे आहेत. या विषयावर काही वाचन करता आले तर पहावे लागेल.

अवांतरः कन्नडमध्ये बोलताना अकारान्त नावांचे उच्चार आकारान्त केले जातात हे ही चर्चा वाचून ध्यानात आले. रमेशा, अरुणा, भरता, व्यासा (घरातील काही व्यक्ती)

थापा!

जर व्यासांनी गणेशाला महाभारत लिहायला लावले तर ते कोणत्या लिपीत?

थापा आहेत हो सगळ्या! आमच्या गणपतीला महाभारत लिहायला लावणारा हा व्यास कोण लागून गेला??

आमचा मोदकबाप्पा काय त्या व्यासाचा रायटर आहे?

बोला, गणपती बाप्पा मोरया!

आपला,
(कट्टर गणेशभक्त!) तात्या.

संत तात्याबांनी व्यासांना शिकवले ;)

मत!

व्यासाबद्दल आम्ही आमचे एक मत नुकतेच http://mr.upakram.org/guestbook/14 इथेही नोंदवले आहे. इच्छुकांनी ते कृपया वाचावे! ;)

तात्या.

तक्षशिलेचा विद्वान 'चाणक्य' याला संत तात्याबांनी लिहायला शिकवले ;)

संबोधनात्मक!

रमेशा,अरुणा,भरता,व्यासा ही सगळी संबोधनाची रुपे आहेत असे वाटते. कारण संस्कृतमधे 'हे रमेशा.हे अरुणा,हे भरता' असे संबोधनाचे रुप होते. हाक मारताना रमेशचे 'रमेशा' होऊ शकते. कदाचित कालाच्या ओघात लोकांच्या पचनी हे असे उच्चार पडले असावे.ह्याला आपण मराठी लोक अपवाद आहोत असे वाटते.
संगीतातले सात स्वरही 'सा,रे.ग,म,प,ध,नी सा' असे आपण उच्चारतो तरी बहुसंख्य लोक 'सा,रे(काही जण रि,री असाही उच्चार करतात),गा,मा,पा,धा वगैरे असे उच्चार करतात.
तेव्हा संस्कृतचे उच्चार भारतात कुठेही गेले तरी एकच होते हे पटत नाहीत.भारताच्या विविध प्रांतात हे उच्चार वेगवेगळ्या पध्दतीने उच्चारले जातात.
ह्याचे एकच उदाहरण नमुना म्हणून देतो. 'ज्ञ' ह्या चा उच्चार आपण जसा करतो तसा इतर ठिकाणी करत नाही. दक्षिण भारतीय ह्याचा उच्चार'न्य' असा करतात तर उत्तर हिंदुस्थानी लोक 'ग्य' असा करतात.

पण संस्कृतात नव्हे!

क्षमस्व, पण संबोधनातला "आ" संस्कृतातला नसावा असे वाटते. संकृतात रामा, रमेशा, इ. नसतात. आठवी विभक्ती जिचे दुसरे नाव संबोधन आहे, तिच्याप्रमाणे हे राम, हे रमेश अशी रूपे होतात (आठवा रामरक्षेतील "भो राम मामुद्धर").
मराठीत मात्र रामा, रमेशा असे संबोधन असते हे मान्यच आहे. पण अत्त्यांनंदांच्या मुद्द्याला त्याचा आधार मिळण्याजोगा दिसत नाही.
इतरांनी म्हटल्यानुसार दक्षिणी भाषांतील (व त्यांच्या इंग्रजी भाषांतरामधील) रामा, रमेशा ही त्यांच्या धाटणीतील प्रथमेचीच रूपे आहेत, संबोधनाची नव्हेत.

संगीतात दक्षिणेकडे "स रि ग म" म्हणतात असे वाटते. तसेही रे ला रि म्हणणे अधिक साधार असावे कारण त्या स्वराचे नाव "रिषभ" असेच आहे. "गा मा पा" हे उत्तरेकडील उच्चारण असावे.

"ज्ञ" चा उच्चार कुठल्याही भारतीय भाषेत बरोबर (म्हणजे मूळ संस्कृताबरहुकूम ज + ञ्) केला जात नाही (ग्न, ग्य, न्य, द्न्य हे सगळेच उच्चार चुकीचे आहेत), पण हा अपवाद आहे. बाकी बहुतेक सर्व व्यंजनांचा उच्चार भारतभर (त्या त्या भाषेच्या प्रमाण स्वरूपात) सारखाच केला जातो असे वाटते.
अपवाद बंगाल्यांचा - जे व ला ब, स ला श, इ. म्हणतात
आणि तमिळांचा - जे भूकंपाला बूहंबम् म्हणतात.
अन्यत्रही ग्रामीण भाषेत ष ला ख (लक्ष्मीला रखमा, लक्ष्मणला लखन, इ.), वगैरे म्हणतात, पण आपण आता शुद्ध/प्रमाण भाषेचा विचार करतो आहोत.

जाता जाता: जुन्या संस्कृतात दिसणार्‍या (समुद्रपर्यंताया एकराळिति) "ळ" चा उच्चार मराठीतल्या ळ सारखा नव्हता, तो ड सारखा होता असे ऐकले आहे (वरील विधानाची फोड एकराट् इति अशी होती म्हणे). बहुधा संस्कृतात ळ हे व्यंजन नव्हते.

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

ड्-ळ्

जाता जाता: जुन्या संस्कृतात दिसणार्‍या (समुद्रपर्यंताया एकराळिति) "ळ" चा उच्चार मराठीतल्या ळ सारखा नव्हता, तो ड सारखा होता असे ऐकले आहे (वरील विधानाची फोड एकराट् इति अशी होती म्हणे). बहुधा संस्कृतात ळ हे व्यंजन नव्हते.

मंत्रपुष्पांजलीचा अर्थ देण्याच्या दृष्टीने विचार करताना असे लक्षात आले, की मंत्रपुष्पांजली ही कोणत्यातरी ब्राह्मणात/आरण्यकात आहे. (विस्मृतीबद्दल माफ करा.) ते साहित्य वैदिक साहित्यात धरले जाते. म्हणजेच ते वैदिक संस्कृतात लिहिले गेले आहे. मूळ शब्द एकराट्/एकराड् असा असावा. त्याला वैदिक साहित्यातील 'अज्मध्यस्य डकारस्य ळकारं बहुवृचो जगु:|' हा उच्चाराचा नियम लागू झाला असावा व 'ड्' चा 'ळ्' झाला असावा असा माझा कयास आहे. या नियमाप्रमाणे २ स्वरांच्या मधे आलेल्या 'ड्' चा 'ळ्' होतो.

सांगायचा मुद्दा हा, की वैदिक संस्कृतात 'ळ्' आहे.

राधिका

ळ विषयी

सांगायचा मुद्दा हा, की वैदिक संस्कृतात 'ळ्' आहे.

बरोबर. ऋग्वेदाची सुरूवातच "अग्निमीळे पुरोहितं" अशी आहे. (दुवा) 'ळ' विषयी उत्सुकता आहे. हिंदीमध्ये 'ळ' दिसत नाही, दक्षिणेत मात्र प्रचलित आहे. तिथे 'ळ' असलेले शब्द इंग्रजीत लिहिताना z वापरतात असे वाटते. चूभूद्याघ्या.

मला पण

"'ळ' विषयी उत्सुकता आहे."
मलापण.
ळ हा आंग्ल भाषेत नाही, हिंदीत नाही, जर्मन भाषेतही बहुधा नाही. ळ् हा फक्त भारतीय भाषांची मक्तेदारी/शोध आहे काय?तसेच ळ ची गरज का भासली असावी?

नॉर्वेजियन् मध्ये?

नॉर्वेजियन् भाषेत ळ च्या जवळ जाणारा उच्चार आहे असे वाटते, कोणी तज्ज्ञ खुलासा करेल काय?

- दिगम्भा

मला गमभन चे कौतुक वाटते खरे पण एवढे कौतुक आता पुरे!

रुग्वेद की रुग्वेदा?

शशांककाकांनी जो दुवा दिलेला आहे, त्यात 'रुग्वेदा' संहिता असे म्हटले आहे. खरा शब्द काय आहे? रुग्वेद की रुग्वेदा??

आपला,
(वेदांचे शून्य ज्ञान असलेला) तात्या.

मिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत! ;)

रुग्वेद की रुग्वेदा ?

संस्कृत भाषे अनुसार योग्य शब्द आहे : 'ऋग्वेद: ' अंती असलेल्या विसर्गाच्या उच्चाराचा अपभ्रंश हो ऊन 'ऋग्वेदा' असा उच्चार दक्षिणे कडे ( तसेच अन्य ठिकाणी ) प्रचलित झाला असावा. हा वैयक्तिक तर्क आहे. यासाठी कुठलाही प्रमाणभूत संदर्भ मला ज्ञात नाही.
आपला( अनभिज्ञ),
.......यनावाला

दक्षिणेतील ळ

ळ असलेले शब्द इंग्रजीत लिहिताना zh वापरले जाते.

मात्र मराठीत ळ असूनही मराठी वृत्तपत्रे अशा शब्दांचे लेखन 'झ' वापरुन करतात.

उदा कझगम (द्वमुक मधील: योग्य शब्द कळघम)
कोझिकोडे (कालिकतः योग्य शब्द कोळिकोडे)येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

तो 'ळ' वेगळा!

माझ्या काही मल्याळी मित्रांशी बोलताना नेहमीच ह्या 'ळ' चा विषय निघतो. ते सर्व मोठ्या अभिमानाने सांगतात की हा 'ळ' देवनागरीतील 'ळ' प्रमाणे नसून वेगळाच आहे आणि त्याचा उच्चार ते जेव्हा करतात तेव्हा तो 'ळ्ळ' असा काहीसा जीभ वर टाळ्याला चिकटवून केल्यासारखा वाटतो. मी तसा उच्चार करून दाखवला तरी तो तसा नाहीच हे मात्र त्यांचे पालूपद सुरुच असते. इंग्रजी मधे लिहिताना ते त्याचे 'ईझेड्' असे स्पेलींग सांगतात ज्याचा त्या उच्चाराशी परस्पर असा काहीही संबंध नाही. केळ्याला ते पळ्ळम म्हणतात असे ऐकून आहे आणि हा शब्द आपण कसाही म्हटला तरी त्यांना तो उच्चार नेहमीच चुकीचा वाटतो. मात्र ते अक्षर ते देवनागरीत लिहून दाखवू शकत नाहीत.
तसेच तमिळ मधे क,ख,ग, साठी एकच अक्षर आहे त्यामुळे हिंदीत विचारलेल्या 'खाना खाया?' ह्या वाक्याचे तीन पर्याय मिळतात.
१)काना काया? २) खाना खाया? ३)गाना गाया?
उच्चारांमधे इतके सगळे वैविध्य असतानाही वेदोच्चार सगळीकडे सारखेच आहेत असे आपण ठामपणे कसे म्हणू शकतो?

आपण की तज्ज्ञ?

उच्चारांमधे इतके सगळे वैविध्य असतानाही वेदोच्चार सगळीकडे सारखेच आहेत असे आपण ठामपणे कसे म्हणू शकतो?

मला वाटते वेदांबाबत ठामपणे काही म्हणण्याची पात्रता येथील फार कमीजणांत असावी. निदान माझ्यात तरी ती नाही. परंतु वेदोच्चार* सर्वत्र सारखे आहेत असे देशी विदेशी तज्ज्ञ नक्की म्हणतात.

याच चर्चेत राधिका यांनी म्हटल्याप्रमाणे:

राहिला प्रश्न लेखी ऋचांवरून वेदांचे पठण करू पाहणार्‍यांचा, तर तसे जमणे मला तरी कठीण वाटते. कारण उदात्त, अनुदात्त, स्वरित वगैरे उच्चारणे अधिकारी व्यक्तीने शिकवल्याशिवाय जमत नसावे असे मला वाटते.

तेव्हा वेदपठण करणारा मग तो पंजाबी असो की, मल्याळी, बंगाली असो की गुजराथी. त्याला या उच्चारांचे योग्य शिक्षण वर्षानुवर्षे दिले गेले नसेल असे आपल्याला वाटते का? वेदपठण शिकवणार्‍या अनेक पाठशाळा अजूनही आहेत. दक्षिणेत तरी नक्की आहेत. त्यांत अचूक उच्चारांवर भर देत असावेतच. वेद हे सहा महिन्यांत फाड फाड शिकण्याची गोष्ट नसावी असे वाटते.

* हे वेदोच्चार त्यांनीही विद्वान आणि संस्कृततज्ज्ञांचेच तपासून पाहिले असावेत. हौशी, नवशागवश्यांचे पाहिले नसावेत असेही वाटते.

ज्ञानप्रसार

हम्म..
छपाईच्या शोधाने ज्ञानप्रसाराला गती मिळाली म्हणतात. बायबल हे सर्वाधिक छापले/विकले गेलेले पुस्तक आहे असे ही म्हणतात.
दोन्ही पटले.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

दोन ळ

तमिळमध्ये (बहुधा मल्याळम मध्येही) दोन वेगवेगळे ळ आहेत. एक आपला नेहमीचा (मराठीतला) ळ. याचे इंग्रजी लिप्यंतर ते L ने करतात.
दुसरा ळ हा बोबड्याने मराठीतला ळ म्हणण्याचा प्रयत्न केला तर कसा उच्चार होईल तसा - ळ व य यांच्या मधला. याचे लिप्यंतर ZH ने केले जाते. [मी माझ्या मित्राला विचारले असे का करतात म्हणून. तो म्हणतो "झुळ्" असे म्हणताना तसा उच्चार होतो]
सध्या सोयीसाठी आपण याला .ळ म्हणूया.
क.ळघम किंवा को.ळीकोडे (पूर्वीचे कालिकत/कॅलिकट्) किंवा आलप्पु.ळा (पूर्वीचे अलेप्पी) यात तो येतो. पण कयघम, कोयीकोडे, आलप्पुया असे उच्चारसुद्धा खपून जातात, कारण हा .ळ अन्य भाषिकांना बापजन्मी म्हणता येणार नाही अशी बहुतेक तमि.ळ लोकांची खात्री असते व तेवढी सवलत ते देतात.

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

एका मुद्द्याचा खुलासा झाल्यास बरे होईल

संस्कृतात "ळ" हे अक्षर नाही असे मला म्हणायचे नव्हते. मला शंका त्याच्या उच्चाराबाबत होती. उदा. ज्ञ चे जे झालेले (म्हणजे सर्व भाषांत त्याचा उच्चार भ्रष्ट झाला) आपण पाहतो आहोत त्यावरून मूळ ज्ञ व आपण उच्चारतो ते ज्ञ हे वेगळे आहेत असे म्हणता येते.
माझा मूळ मुद्दा (जो मी बहुधा नीट मांडू शकलो नाही) असा होता की वैदिक संस्कृतात दिसणारे "ळ" हे अक्षर(किंवा त्यातील व्यंजन) व मराठीतले परिचित ळ हे व्यंजन हे एकच आहे की वेगळे याचा काही आधार किंवा प्रत्यय आपल्यापैकी कोणाकडे आहे का?
नुसत्या वाचनातून तर या प्रश्नाचा खुलासा होणे अशक्य आहे.
पण कोणी ऋग्वेदाचा (अग्निमीळे इ.) पाठ लक्षपूर्वक ऐकला असेल तर किंवा एखाद्या वेदज्ञाचा परिचय असेल तर अशी व्यक्ती याचे उत्तर खात्रीने देऊ शकेल. तशी माहिती कोणाकडे असल्यास अवश्य सांगावे. नसल्यास ती संधी येण्याची आपण सगळे वाट पाहूया. तेव्हाच याचा निकाल लागेल असे वाटते.

- दिगम्भा

सहमत!

माझा मूळ मुद्दा (जो मी बहुधा नीट मांडू शकलो नाही) असा होता की वैदिक संस्कृतात दिसणारे "ळ" हे अक्षर(किंवा त्यातील व्यंजन) व मराठीतले परिचित ळ हे व्यंजन हे एकच आहे की वेगळे याचा काही आधार किंवा प्रत्यय आपल्यापैकी कोणाकडे आहे का?

नाय बा! काहीच आयडिया नाही शेठ!

तशी माहिती कोणाकडे असल्यास अवश्य सांगावे. नसल्यास ती संधी येण्याची आपण सगळे वाट पाहूया. तेव्हाच याचा निकाल लागेल असे वाटते.

सहमत आहे!

अहो पण मी काय म्हणतो दिगम्भाशेठ, चाल्लंय तेही बरं चाल्लंय की! ;))

तात्या.

या ळ बद्दल मला फारच जिव्हाळा वाटतो. त्याची बरीच माहिती आज मिळाली. बरे वाटले. सर्वांचे आभार. हा ळ पक्का मरठमोळा अथवा दाक्षिणात्य असावा असा कयास होता, आता त्याला वैदिक बैठक मिळाली.
-- लिखा.

भाषा व लिपी

आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहित नाही. पहिल्या प्रश्नाचे उत्तर वेदांवरील कोणीतरी अधिकारी व्यक्तीच देऊ शकेल. दुसर्‍या प्रश्नात उल्लेखिलेला संकेतही मला माहित नाही. आपला तिसरा प्रश्न मात्र मला नीटसा कळला नाही. नेमके कोणते कच्चे दुवे आपल्याला अभिप्रेत आहेत?

ते ज्ञान जन्मकाळात मृद्रित न केलेले आणि पाठांतरानेच पुढे सरकलेले असेल तर कोणत्याच लिपीची त्यावर मक्तेदारी नाही. जो तो आपल्या लिपीत ते उतरवून काढेल

होय, प्रत्यक्षात हे असेच आहे.

लिपी जर का हावे तसे उच्चार करण्यास/लिहून ठेवण्यास सक्षम नसेल तर मग अमुन ने म्हटले ते प्रत्यक्षात उरायला वेळ लागणार नाही.

मला वाटते येथे दृष्टीकोनात फरक पडू शकतो. मला मुळात अमुनचे मतच पटलेले नाही. त्याचे भाकीत प्रत्यक्षात उतरते आहेच पण त्यामुळे काही वाईट होते आहे असे मला तरी वाटत नाही.

दुसरी गोष्ट ही की पूर्वी मौखिक ज्ञानप्रसाराची पद्धत अस्तित्त्वात होती. तेव्हा वेदांतील एकही शब्द किंवा अक्षर इकडचे तिकडे होऊ नये किंवा गाळले जाऊ नये म्हणून प्रत्येक वेदातील एकूण अक्षरसंख्या, शब्दसंख्या, ऋचांची संख्या, सूक्तसंख्या हे मोजून् घेतलेले होते व त्यानुसार चूका शोधून काढल्या जात. आधी कोठेतरी दिगम्भामहोदयांनी म्हटल्याप्रमाणे वेद पाठ करण्याच्या शंख, पद्म इ. एकूण १० पद्धती अस्तित्त्वात होत्या. (चू.भू.द्या.घ्या) यातल्या कोणत्या तरी एका पद्धतीप्रमाणे एकच ऋचा त्यातील शब्द १-१,२-२,१-१,२,३-३,२,१-१,२,३,४-४,३,२,१...... अशा पद्धतीने उच्चारून पाठ केली जात असे. जेणेकरून एकही शब्द इथला तिथे होऊ नये. उदात्त, अनुदात्त, स्वरित वगैरे तसेच मूळ उच्चारही कटाक्षाने पाळले जात असणारच. त्यामुळेच आजही ज्या व्यक्ती मौखिक पद्धतीने वेद शिकतात त्यांचे उच्चार पूर्वीच्या काळाप्रमाणेच असण्याची दाट शक्यता आहे.

राहिला प्रश्न लेखी ऋचांवरून वेदांचे पठण करू पाहणार्‍यांचा, तर तसे जमणे मला तरी कठीण वाटते. कारण उदात्त, अनुदात्त, स्वरित वगैरे उच्चारणे अधिकारी व्यक्तीने शिकवल्याशिवाय जमत नसावे असे मला वाटते. (एका वर्षात ऋग्वेदातील ८ सूक्ते शिकूनही अजून मला पठण जमत नाही, कारण मला तसे ते कुणी शिकवलेले नाही. स्त्रीयांना वेदपठण शिकवणारे कमी आहेत, हा भाग तर सोडूनच द्या.) त्यामुळे वेदपठण शिकायचे असल्यास मौखिक परंपरेला पर्याय नाही.

वेदांचा अर्थ लावावयाचा असेल तर वेगळ्या प्रकारे सर्व परिस्थितीचा विचार करावा लागेल.

राधिका

नाही

पाठांतरासाठी कटपयादी सूत्रांचा वापर आणि दिगभ्भा म्हणतात तशी रिडण्डन्सी ह्यात काही साम्य आहे का ?

नसावा

राधिका

विस्ताराने जाणून घ्यायची इच्छा आहे

मला वाटते येथे दृष्टीकोनात फरक पडू शकतो. मला मुळात अमुनचे मतच पटलेले नाही. त्याचे भाकीत प्रत्यक्षात उतरते आहेच पण त्यामुळे काही वाईट होते आहे असे मला तरी वाटत नाही.
या बद्दल आपले मत विस्ताराने जाणून घ्यायची इच्छा आहे. (या साठी आपण नवी चर्चा सुरु केली तर त्यात विषयाला योग्य न्याय मिळेल असे वाटते.)

......त्यामुळेच आजही ज्या व्यक्ती मौखिक पद्धतीने वेद शिकतात त्यांचे उच्चार पूर्वीच्या काळाप्रमाणेच असण्याची दाट शक्यता आहे. ..... त्यामुळे वेदपठण शिकायचे असल्यास मौखिक परंपरेला पर्याय नाही.

आपल्या प्रतिसादातून बरीच संयुक्तिक माहिती समजली आभार.

वेदांचा अर्थ लावावयाचा असेल तर वेगळ्या प्रकारे सर्व परिस्थितीचा विचार करावा लागेल.
वेगळ्या प्रकारे म्हणजे कसा? आता कसा अर्थ लावतात? यावर थोडी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

--लिखाळ.

उत्तरे

प्रियाली,

जर व्यासांनी गणेशाला महाभारत लिहायला लावले तर ते कोणत्या लिपीत? असे अनेक प्रश्न माझ्यासमोरच उभे आहेत. या विषयावर काही वाचन करता आले तर पहावे लागेल.

जरुर. वाचण्यास उत्सुक आहे.

कन्नडमध्ये बोलताना अकारान्त नावांचे उच्चार आकारान्त केले जातात हे ही चर्चा वाचून ध्यानात आले.

होय. ते लोक शेवटचा अ जरा ताणतात असे माझेही निरिक्षण आहे.

अत्त्यानंद,

रमेशा,अरुणा,भरता,व्यासा ही सगळी संबोधनाची रुपे आहेत असे वाटते. .... तेव्हा संस्कृतचे उच्चार भारतात कुठेही गेले तरी एकच होते हे पटत नाहीत.भारताच्या विविध प्रांतात हे उच्चार वेगवेगळ्या पध्दतीने उच्चारले जातात.
ह्याचे एकच उदाहरण नमुना म्हणून देतो. 'ज्ञ' ह्या चा उच्चार आपण जसा करतो तसा इतर ठिकाणी करत नाही. दक्षिण भारतीय ह्याचा उच्चार'न्य' असा करतात तर उत्तर हिंदुस्थानी लोक 'ग्य' असा करतात.

होय असेच मलाही वाटते पण आता जे लोक ऋचा वगैरेंचे पठण करतात ते कसे पठण करतात ते पहायला पाहिजे.
मी वर चर्चेत म्हणाल्या प्रमाणे अनेकदा इंग्रजीमध्ये बोलताना सूर्या वगैरे म्हटले जाते..उगीच फॅशन म्हणून की काय ते समजत नाही.

--लिखाळ.

कन्नडच नव्हे

कन्नडच नव्हे तर तेलुगु, तमिळ व मल्याळम या इतर द्रविडी भाषातही मूळाक्षरांचा उच्चात 'आ'जोडून केला जातो, जो त्या-त्या भाषांच्या नियमानुसार शुद्ध आहे. कोंकणी भाषा देखील देवनागरी बरोबरच कन्नड व मल्याळम लिप्यांचा वापर करते असे समजते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

भाषा आणि लिपी

कोणती भाषा कोण कोणकोणत्या लिपी वारते याची माहिते सुद्धा रंजक असेल. काही भाषांना जसे खासी (?) लिपीच नाही असे ऐकून आहे.
-- लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे :)

अ आणि आ

दक्षिण भारतीय भाषांमध्ये अक्षरांचे जुन्या पद्धतीचे उच्चार असतात. उदाहरणार्थ अकारान्त शब्दाचे सामान्यरूप उकारान्त होते. विठ्ठल-विठ्ठलु, कप-कपु/कप्पु असे. नावासारखा न बदलायचा शब्द जर अकारान्त असेल तर शेवटच्या अक्षराचा उच्चार गुरू होतो. उदा. 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' या ओळीत घड्याळातला 'ळ' लघु उच्चारायचा आहे तर चमत्कारिकातला 'क' गुरू. मराठीत आपण कऽ असे म्हणून तो दीर्घ करतो तर दक्षिणेत त्याला चक्क का म्हणतात. तर शेवटी येणार्‍या 'का'ला ओळखण्यासाठी त्याला 'काऽ' म्हणतात!

सूर्या, वरूणा, आदित्या, पवना

हे वारुणा, पावाना असे (पाश्चात्यांप्रमाणे?) म्हटलेले नाही. शेवटी येणार्‍या 'अ'चा पूर्ण उच्चार करण्याची त्यांची प्रथा अशी आहे इतकेच.

बरं बरं

मराठीत आपण कऽ असे म्हणून तो दीर्घ करतो तर दक्षिणेत त्याला चक्क का म्हणतात. तर शेवटी येणार्‍या 'का'ला ओळखण्यासाठी त्याला 'काऽ' म्हणतात!
बर् बर .. आता उलगडले.
आभार.
--लिखाळ.

देवनागरी लिपी

१. प्राचिन लिपींचा विचार करता देवनागरी लिपी ही इतर लिपींपेक्षा प्रगत आहे असे वाटते. उदाहरणार्थ चिनी किंवा जपानी लिपींमध्ये २००० मूळाक्षरे असतात. त्या तुलनेत देवनागरीत बरीच कमी मूळाक्षरे असूनही यांत सर्व उच्चार व्यवस्थित लिपिबद्ध करता येतात. मात्र, कितीही प्रयत्न केला तरी ध्वनीचे उच्चार लिपिबद्ध करण्याच्या पद्धतींवर त्या-त्या भागातील जीवनशैलीचा सूक्ष्म प्रभाव असतो. ही अडचण दूर करण्यासाठी मौखिक परंपरा असावी.

२. मराठीतच एक उदाहरण घ्यायचे तर सरस या शब्दाचा उच्चार करतांना आपण तो स-रऽ-स् असा करतो. म्हणजेच मधल्या अक्षराचा स्वर किंचित लांबतो आणि शेवटच्या अक्षराचा स्वर किंचित लघूरूप होतो. वास्तविक "सरस" या शब्दांत तीनही व्यंजनांचे अकाररूपच आहे. ज्याप्रमाणे जुन्या कन्नडलिपित समर्पक उच्चारांची नोंद करण्याची सोय होती, तशीच इतर लिपींमध्येही असावी. कालौघात ती मागे पडली असावे. उदाहरणार्थ, मराठीतच, हल्ली 'श' आणि 'ष' चा उच्चार सहसा 'श' असाच केल्या जातो.

३. संस्कृतमध्ये अनुस्वार आणि विसर्गाचा खूप वापर होतो. ऐकीव माहितीनुसार याचा संदर्भ आयुर्वेदाशी जोडला आहे. संस्कृत बोलतांना त्या व्यक्तीस अनुस्वार-विसर्गांमुळे एका दृष्टीने सहज प्राणायाम होतो. संस्कृतमधील स्तोत्र त्यातील उदात्त-अनुदात्त उच्चारांसह म्हटले आणि या पैलूंचा विचार केला तर ह्या विधानात तथ्य आहे असे वाटते. दुर्दैवाने याचे कुठलेही लिखित पुरावे मिळत नाहीत. मात्र, अनुष्टुभ छंदातील स्तोत्रादी रचना म्हणण्याची पद्धत सर्वत्र बरीच सारखी आहे.

४. आधुनिक मानसशास्त्रांतही आकलनाबाबत असे म्हटले जाते की ज्या विषयात विद्यार्थी अधिक एकरूप होतो त्याचे चांगले आकलन होते. केवळ ऐकण्याने वा वाचण्याने आकलन जे आकलन होते त्याहून अधिक आकलन स्वतः त्या विषयावर विचार वा कृती केल्याने होते. कदाचित या मुद्याचाही मौखिक परंपरेशी संबंध असावा. यामुळेच बरेच भारतीय ग्रंथ सूत्ररूपात मांडलेले दिसतात.

५. यावरून अजून एक किस्सा आठवला. बराच काळ भासाची नाटके ही काळाच्या पडद्याआड गेली असा समज होता. परंतू, त्याच्या संहिता महामहोपाध्याय गणपत शास्त्रींना मल्याळम लिपीत सापडल्या. कदाचित मध्ययुगीन अस्थैर्यामुळे, ज्यात नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे नष्ट झाली, त्या काळी देवनागरीत लिपिबद्ध केलेल्या हजारो रचना विलयास गेल्या असतील. त्यापैकी बऱ्याच रचना दाक्षिणात्य लिपित वाचल्या असाव्यात.

अर्थात या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे इतिहासकारच देऊ शकतील.

शैलेश

सर्व उच्चार

त्या तुलनेत देवनागरीत बरीच कमी मूळाक्षरे असूनही यांत सर्व उच्चार व्यवस्थित लिपिबद्ध करता येतात.
अर्थात मराठी मधील :) देवनागरीत ठ्यॅ स्वर लिहायची सोय नव्हती, जी इंग्रजी शब्दातून आलेल्या ऍ मुळे निर्माण झाली. मराठी ने (कॅट) व हिंदीने (कैट) यावर वेगवेगळे पर्याय शोधले.

अभारतीयच नव्हे तर द्रविडी भाषात देखील अशी काही अक्षरे आहेत जी देवनागरीत लिहीण्याची सोय नाही. बारा स्वर व आठरा व्यंजनांवर आधारीत तामिळ या निकषावर मराठीपेक्षा प्रगत ठरावी.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

नालंदा तक्षशिला

नालंदा तक्षशिलेचा उल्लेख आज दोनदा उपक्रमावर झाल्याने थोडासा विषयांतरीत प्रतिसाद देत आहे.

नालंदा तक्षशिला हे एक जोडनाम म्हणून आपण बरेचदा वापरतो परंतु ही दोन महाविद्यापीठे एक दुसर्‍यापासून शेकडो मैल दूर होती. तसेच त्यांचा उदय आणि अस्त यांचा कालावधीही वेगळा आहे. तक्षशिला ही सध्याच्या पाकिस्तानात असल्याने या शहराला अनेकदा स्वार्‍यांना तोंड द्यावे लागले असे वाटते. तक्षशिला विद्यापीठ इ. स. ५ व्या - ६व्या शतकात नष्ट करण्यात आले तर नालंदा हे खिल्जी घराण्याची सत्ता आल्यावर म्हणजे बहुधा बारावे शतक असावे, मुसलमानी स्वारीत नष्ट झाले.

देवनागरीचा प्रसार ११ व्या १२ व्या शतकापासून झाला असे मानले जाते. त्याआधी ब्राह्मी वापरली जात होती आणि देवनागरी प्रचलित होण्यापूर्वीच्या काही लिपी वापरल्या जात होत्या. तक्षशिलेतील काही नाणी किंवा मौर्यकालीन नाणी पाहिली असता त्यावर देवनागरी लिपी दिसत नाही. तक्षशिलेच्या भिंतीवर कोरलेले शिलालेख गूगल सर्च केल्यास मि़ळतील त्यातही लिपी नेमकी देवनागरी नाही. (ती कोणती याबद्दल मला विशेष माहिती नाही.)

नालंदा विद्यापीठात मात्र देवनागरी दस्त ऐवज असू शकतील असे वाटते.

चू. भू. द्या. घ्या. अचूक संदर्भ दिलेले नाहीत परंतु अंदाजे कालावधी बरोबर असावा.

----

नालंदा-तक्षशिला <> कांदिवली-बोरिवली.

चिनी

उदाहरणार्थ चिनी किंवा जपानी लिपींमध्ये २००० मूळाक्षरे असतात. त्या तुलनेत देवनागरीत बरीच कमी मूळाक्षरे असूनही यांत सर्व उच्चार व्यवस्थित लिपिबद्ध करता येतात.

मराठी किंवा संस्कृतमध्ये आपण जसे बोलतो तसे लिहीतो. चिनी भाषेत असेच आहे का याविषयी साशंक आहे. माझ्या माहितीप्रमाणे तिथे शब्दाच्या अर्थानुसार आकृतीबंध काढला जातो. उदा. झाड लिहायचे असेल तर झाड दर्शवणारी आकृती. (चू. भू. द्या. घ्या.)

प्रगत?

ध्वनीचे उच्चार लिपिबद्ध करण्याच्या पद्धतींवर त्या-त्या भागातील जीवनशैलीचा सूक्ष्म प्रभाव असतो. ही अडचण दूर करण्यासाठी मौखिक परंपरा असावी.

सहमत.

प्राचिन लिपींचा विचार करता देवनागरी लिपी ही इतर लिपींपेक्षा प्रगत आहे असे वाटते. उदाहरणार्थ चिनी किंवा जपानी लिपींमध्ये २००० मूळाक्षरे असतात. त्या तुलनेत देवनागरीत बरीच कमी मूळाक्षरे असूनही यांत सर्व उच्चार व्यवस्थित लिपिबद्ध करता येतात.

पूर्णपणे असहमत. कोणतीही लिपी इतरांपेक्षा प्रगत किंवा अप्रगत असू शकत नाही. प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे काही वर्ण असतात (sounds या अर्थी) व तेवढे वर्ण दाखवण्याइतकी त्या भाषेची लिपी सक्षम असते. जे वर्ण त्या भाषेत नाहीत, ते लिहीण्यासाठी वेगळ्या अक्षरांची गरजच काय? देवनागरीत सर्व उच्चार लिपिबद्ध करता येतात हा समजही साफ चुकीचा आहे. जर्मन भाषेतील काही उच्चार देवनागरीत जसेच्या तसे मुळीच लिपीबद्ध करता येणार नाहीत. इतर भाषांबद्दलही हेच निरीक्षण लागू होईल.

राधिका

प्रगत !

शैलेश,
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.
प्राचिन लिपींचा विचार करता देवनागरी लिपी ही इतर लिपींपेक्षा प्रगत आहे असे वाटते.
येथे सहकज असे वाटले की प्रगत म्हणावे की नवे / मॉडर्न असे काही म्हणावे ! मी कोठेतरी वाचले होते की इंग्रजी या भाषेत संस्कृतापेक्षा कमी काळ, कमी विभक्ती-कमी विभक्ती प्रत्यय असे आहे कारण भाषाविकासात नव्या नव्या भाषा या जास्त सोप्या (हा माझ्या आकलनाने मी वापरलेला शब्द ) होत जातात. म्हणजे नव्या नागरी थाटाच्या या सोप्या भाषा. तसे असेल तर आपण मराठी ला प्रगत न म्हणता नवी/ उत्क्रांत असे म्हणू शकू. (उत्क्रांती ही नेहमी गुणवर्धक असतेच असे नव्हे)

संस्कृत बोलतांना त्या व्यक्तीस अनुस्वार-विसर्गांमुळे एका दृष्टीने सहज प्राणायाम होतो.
येथे मंत्रशास्त्र विकासाचा संबध आहे असे वाटते.

--लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे :)

देवनागरी लिपी

१. प्राचिन लिपींचा विचार करता देवनागरी लिपी ही इतर लिपींपेक्षा प्रगत आहे असे वाटते. उदाहरणार्थ चिनी किंवा जपानी लिपींमध्ये २००० मूळाक्षरे असतात. त्या तुलनेत देवनागरीत बरीच कमी मूळाक्षरे असूनही यांत सर्व उच्चार व्यवस्थित लिपिबद्ध करता येतात. मात्र, कितीही प्रयत्न केला तरी ध्वनीचे उच्चार लिपिबद्ध करण्याच्या पद्धतींवर त्या-त्या भागातील जीवनशैलीचा सूक्ष्म प्रभाव असतो. ही अडचण दूर करण्यासाठी मौखिक परंपरा असावी.

२. मराठीतच एक उदाहरण घ्यायचे तर सरस या शब्दाचा उच्चार करतांना आपण तो स-रऽ-स् असा करतो. म्हणजेच मधल्या अक्षराचा स्वर किंचित लांबतो आणि शेवटच्या अक्षराचा स्वर किंचित लघूरूप होतो. वास्तविक "सरस" या शब्दांत तीनही व्यंजनांचे अकाररूपच आहे. ज्याप्रमाणे जुन्या कन्नडलिपित समर्पक उच्चारांची नोंद करण्याची सोय होती, तशीच इतर लिपींमध्येही असावी. कालौघात ती मागे पडली असावे. उदाहरणार्थ, मराठीतच, हल्ली 'श' आणि 'ष' चा उच्चार सहसा 'श' असाच केल्या जातो.

३. संस्कृतमध्ये अनुस्वार आणि विसर्गाचा खूप वापर होतो. ऐकीव माहितीनुसार याचा संदर्भ आयुर्वेदाशी जोडला आहे. संस्कृत बोलतांना त्या व्यक्तीस अनुस्वार-विसर्गांमुळे एका दृष्टीने सहज प्राणायाम होतो. संस्कृतमधील स्तोत्र त्यातील उदात्त-अनुदात्त उच्चारांसह म्हटले आणि या पैलूंचा विचार केला तर ह्या विधानात तथ्य आहे असे वाटते. दुर्दैवाने याचे कुठलेही लिखित पुरावे मिळत नाहीत. मात्र, अनुष्टुभ छंदातील स्तोत्रादी रचना म्हणण्याची पद्धत सर्वत्र बरीच सारखी आहे.

४. आधुनिक मानसशास्त्रांतही आकलनाबाबत असे म्हटले जाते की ज्या विषयात विद्यार्थी अधिक एकरूप होतो त्याचे चांगले आकलन होते. केवळ ऐकण्याने वा वाचण्याने आकलन जे आकलन होते त्याहून अधिक आकलन स्वतः त्या विषयावर विचार वा कृती केल्याने होते. कदाचित या मुद्याचाही मौखिक परंपरेशी संबंध असावा. यामुळेच बरेच भारतीय ग्रंथ सूत्ररूपात मांडलेले दिसतात.

५. यावरून अजून एक किस्सा आठवला. बराच काळ भासाची नाटके ही काळाच्या पडद्याआड गेली असा समज होता. परंतू, त्याच्या संहिता महामहोपाध्याय गणपत शास्त्रींना मल्याळम लिपीत सापडल्या. कदाचित मध्ययुगीन अस्थैर्यामुळे, ज्यात नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे नष्ट झाली, त्या काळी देवनागरीत लिपिबद्ध केलेल्या हजारो रचना विलयास गेल्या असतील. त्यापैकी बऱ्याच रचना दाक्षिणात्य लिपित वाचल्या असाव्यात.

अर्थात या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे इतिहासकारच देऊ शकतील.

शैलेश

उत्तम

उत्तम लेख, लिखाळ.
लेखाचा विषय आणि बरेचसे प्रतिसाद यातून बरीच माहिती मिळाली. लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सखोल संशोधनाची गरज आहे असे वाटते.

देवनागरी लिपी

देवनागरी लिपी ही तशी अर्वाचीन असावी. वैदिक काळात कुठली लिपी वापरायचे, हे कोडेच आहे.वैदिक काळात काही लिहून ठेवले असते तर खोदकाम करताना आतापर्यंत सापडायला हवे होते. पण आमचे दुर्दैव! रोजेटा स्टोन सारखा एखादा शोध लागावा आणि वैदिक लिपी सोबतच हडप्पाच्या लिपीची उकल व्हावी.
ह्यावरून आठवले, सम्राट अशोकाने आपले आदेश(ईडिक्ट) अनेक लिपींत लिहून आपली धोरणे लोकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मीपासून आरमेइक, ग्रीकपर्यंत अनेक लिपींचा, भाषांचा उपयोग ह्या शिलालेखांत झाला आहे.

पुष्टी

सम्राट अशोकाने आपले आदेश(ईडिक्ट) अनेक लिपींत लिहून आपली धोरणे लोकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मीपासून आरमेइक, ग्रीकपर्यंत अनेक लिपींचा, भाषांचा उपयोग ह्या शिलालेखांत झाला आहे.

आरमेइक, ग्रीक या दोन भाषांतील अशोकाचा शिलालेख येथे दिसेल.

ग्रीक लिपीविषयी

मला नक्की माहित नाही, यावर फारसे वाचन नाही परंतु याकाळातील नाणीही ग्रीक अक्षरे छापलेली आहेत त्यावरुन काही प्रजाजनांना तरी ग्रीक येत असावे किंवा निदान कळत असावे.

अथवा

ग्रिक देशाशी जोरदार व्यापार, माहिती, तंत्र यांची देवाणघेवाण होत असावी असे असेल का?
-- (दर्यावर्दी) लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे :)

ग्रीक देशाशी

आपले नेमके कसे आणि केव्हापासून संबंध होते हा एक मोठ्ठा गहन विषय आहे. :)) (ह्. घेण्यासारखे नाही, खरंच गंभीर आहे.)

ग्रीकांचा आणि आपला अगदी पहिला संबंध पौराणिक काळातील आहे. म्हणजे त्याचा नेमका काळ कळत नाही.

ग्रीकांशी संबंध

ग्रीकांशी संबंध सिकंदराच्या काळापासून आला असावा. म्हणजे ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून. मौर्य काळापासून ग्रीकांशी घसट अधिक वाढली असावी. सिकंदर निघून गेल्यावर अनेक ग्रीक लोक भारतीय उपखंडात स्थायिक झाले. विशेषतः अफगाणिस्तान आणि पंजाब भागात. पण हे ग्रीक क्षत्रप बरेच प्रभावशाली होते आणि भारतभर पसरले होते.

अवांतर: सिकंदर, अलक्ष्येंद्र ऊर्फ अलेक्ज़ांडर हा ९६ कुली ग्रीक नव्हता. कारण तो होता मॅसडोनियाचा.

हा हा

सिकंदर, अलक्ष्येंद्र ऊर्फ अलेक्ज़ांडर हा ९६ कुली ग्रीक नव्हता. कारण तो होता मॅसडोनियाचा.
९६ कुली ग्रीक ही कल्पना आवडली :)
-- लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

ग्रीकांशी संबंध त्यापूर्वी

ग्रीकांशी संबंध सिकंदराच्या काळापूर्वी पासून असावा असे वाटते. आयोनिया आणि त्याजवळील प्रांतांशी भारतीयांचे संबंध होते.

विस्तार नंतर करेन. सध्या व्यग्र आहे.

डॉक्युमेंटेड

सिकंदराच्या आधीचा काळ 'वेल डॉक्युमेंटेड' नाही. त्यामुळे खात्रीलायक काही सांगू शकत नाही. आयोनिया ह्या शब्दापासून यवन आणि यवनिका (नाटकाचा पडदा) हे शब्द संस्कृतात आले, एवढे माहीत आहे.

हडप्पा संस्कृतीशी मेसोपोटेमियाच्या संस्कृतीचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध होते. तसेच ग्रीक संस्कृतीशीही असावेत. पण हडप्पाची लिपी अजून 'डिसायफर' झाली नसल्याने अनेक गोष्टी खात्रीलायकरीत्या कुणी सांगू शकत नाही.

भारताशी खऱ्या अर्थाने संबंध सिकंदराच्या स्वारीने प्रस्थापित झाले, असावेत असे मला वाटते. स्ट्राबो आणि प्लिनी ह्या इतिहासकारांच्या नोंदी चाळल्यास माहिती मिळू शकेल. पण त्यातल्याही बऱ्याचशा नोंदी ह्या किंवदंती स्वरुपाच्या आहेत.

असो.

वेल डॉक्युमेंटेड नाही/ क्षत्रप

'वेल डॉक्युमेंटेड' नाही हेच भयंकर खेदजनक आहे. :( कारण त्यामुळे तर्क, आख्यायिका यांना अवास्तव महत्त्व दिले जाते.

आयोनिया आणि यवनांचा मुद्दा बरोबरच. लोथल, ढोलवीरा शहरांचे मेसेपोटेमिया इ. शी सागरी संबंधही होते.

त्यापैकी एक प्रसिद्ध आख्यायिका अशी की, पायथॅगोरस अध्ययनासाठी भारतात येऊन राहिला होता. येथे रीतसर शिक्षण घेऊन त्याने नंतर अध्यापनही केले. त्याला यवनगुरू म्हणून ओळखले जाई. पुढे त्याने ग्रीसला परतणे पसंत केले. (पायथॅगोरसही नेमका ग्रीक नसून एजियन होता.)

मेगॅस्थेनिस आणि स्ट्राबोच्या लेखनात वाचायला मिळणारी दुसरी एक आख्यायिका म्हणजे हेरॅकलिस (हर्क्युलिस) आणि डायनायसिस (बॅकस) हे दोघे भारतवारी करून गेले होते. परंतु हा अलेक्झांडरच्या प्रचारातील एक भाग मानला जातो.

तिसरी एक आख्यायिका ज्यावर अधिक वाचायला उत्सुक आहे ती म्हणजे सॉक्रेटिसचा भारतीय ऋषीशी झालेला संवाद.

आणखी एक परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा नुकताच वाचनात आला तो म्हणजे दरायस तिसरा आणि अलेक्झांडर यांच्यातील शेवटच्या लढाईत दरायसकडे भाडोत्री भारतीय सैन्याची तुकडी होती. यावरून अलेक्झांडर यायच्यापूर्वीही ग्रीकांशी आपले संबंध होतेच. (दरायसच्या अधिपत्याखाली अनेक ग्रीक राज्येही होती हे मानून)

डिस्क्लेमरः वरील सुरुवातीच्या तीन आख्यायिकांवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न ठरावा. हे वाचनात आलेले मुद्दे आहेत, त्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहणे शक्य झालेले नाही. या आख्यायिका केवळ मनोरंजनासाठी आहेत असे समजायला हरकत नाही, त्या येथे देऊन सदर लेखिकेला कोणतीही वावडी पसरवायची नाही किंवा प्रचार करायचा नाही. :)

अवांतरः क्षत्रप या शब्दावरून सत्रप ( satrap) हा शब्द आल्याचे समजते. बराच काळ क्षत्रप हा संस्कृतातून आलेला शब्द असावा असे मला वाटत असे परंतु तो फार्शी शब्द आहे असे कळते.

धर्मप्रसारासाठी

नेमके ह्या शिलालेखाविषयी माहित नाही, पण सम्राट अशोकने (बौद्ध ) धर्म प्रसारासाठी सर्वप्रथम दूत देशोदेशी पाठवल्याचा पुरावा आहे. त्यासाठी कदाचित परक्या भाषेत हे शिलालेख तयार केले असावेत.

अजून एक...

सेल्यूकस निकेटर ह्या अलक्षेंद्राच्या सरदाराचे राज्य त्याकाळी खैबर खिंडीच्या पलिकडच्या प्रांतात म्हणजेच बॅक्ट्रिया ह्या प्रांतात होते (आजचा अफगाण व जवळचा प्रांत). सेल्यूकसला चंद्रगुप्ताने युद्धात हरवले व ते राज्य मौर्य साम्राज्यात आले. अर्थातच त्यांची भाषा ग्रीकच राहिली असणार. अशोक हा चंद्रगुप्ताचा वारसदार आणि त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रगुप्ताहून जास्त होता असं म्हणतात, तेंव्हा हे बॅक्ट्रियन् राज्य पण त्यात असणार. कदाचित त्यामुळेपण हे शिलालेख् ग्रीक भाषेत असू शकतील.

वा !

सुंदर माहिती.
कदाचित त्यामुळेपण हे शिलालेख् ग्रीक भाषेत असू शकतील.
होय अशीही शक्यता वाटते.
--लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे . त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

पण वैदिक काळ कोणता?

वैदिक काळात कुठली लिपी वापरायचे, हे कोडेच आहे.वैदिक काळात काही लिहून ठेवले असते तर खोदकाम करताना आतापर्यंत सापडायला हवे होते.

वैदिक काळ नेमका कोणता? आणि वैदिक काळात हडप्पा लिपीच वापरत असतील तर?

अवांतरः रोजेटा स्टोन, चॅम्पोलियन यासर्वांचीच गरज आहे.

मला असलेली माहिती

सर्वसाधारणपणे ख्रिस्तपूर्व १५०० ते ख्रिस्तपूर्व ५०० ह्या कालखंडाला वैदिक काळ मानतात. ख्रिस्तपूर्व १५०० ते ख्रिस्तपूर्व ८०० हा पूर्व वैदिक काळ (इंग्रजीत अर्ली वेदिक पीरियड). ह्या काळात ऋग्वेदाची निर्मिती झाली. सामवेद आणि ऋग्वेद ह्यांत केवळ काही ऋचांचा फरक आहे. सामवेदात बहुतेक १०-१२ जादा ऋचा आहेत.
ख्रिस्तपूर्व ८०० ते ख्रिस्तपूर्व ५०० हा उत्तर वैदिक काळ (इंग्रजीत लेटर वेदिक पीरियड) ह्या काळात यजुर्वेदाची, ब्राह्मणांची, अरण्यके आणि उपनिषदे आदींची निर्मिती झाली.

जाणकारांनी भर घालावी आणि चूभूद्याघ्यावी.

 
^ वर