लिपी आणि मौखिक ज्ञान

नमस्कार मंडळी,
प्रियाली यांनी या आधी सुरु केलेल्या या चर्चेत्तून पुढे आलेली माहिती, सदस्यांचे प्रतिसाद यावर विचार करत असता या परंपरेशी निगडित एका पैलूकडे माझे लक्ष गेले.

माझ्या एका कन्नड मित्राकडे गेलो असता त्याने 'सूर्यनमस्कार' या नावाचे काही संस्कृत ऋचा पठणाची तबकडी लावली. त्यात सुरुवातीला प्रस्तावना होती. त्या मध्ये सूत्रधार इंग्रजीमध्ये असे सांगत होता की आपण ज्या ऋचा ऐकणार आहात त्यात सूर्या, वरूणा, आदित्या, पवना इत्यादींची वर्णने आहेत वगैरे. ते सूर्या, वरूणा, आदित्या, पवना असे उच्चार ऐकून मी म्हटले की हे संकृताचे पाश्चात्यीकरण चालले आहे. त्यावर ते उच्चार योग्य आहेत असे त्याचे मत पडले. आणि त्याला असेच उच्चार शिकवले गेले आहेत असे तो म्हणाला. म्हणून मी त्याला र आणि रा हे कसे वेगळे उच्चारले आणि लिहिले जातात ते थोडे दाखवले. आणि कन्नडामध्ये ते कसे असते व लिहिले जाते याची चौकशी केली. त्यावर बोलत असताना मी त्याला म्हटले की देवनागरी मध्ये जे काही उच्चारायचे आहे ते आपण लिहू शकतो अशी क्षमता कन्नडालिपी मध्ये आहे काय? त्याला मी त्याच्या कडचे एखादे संस्कृत श्लोकांचे पुस्तक दाखव असे सुचवले. आणि मी आजवर माझ्या विहिरीत बसून जे काही कयास बांधले होते त्यांना पहिला सुरुंग लागला.

तो म्हणाला की ते श्लोक कन्नडालिपीमध्येच आहेत. जुन्या कन्नडालिपीमध्ये अतिशय समर्पक उच्चार करता यावेत अश्या काही सोयी होत्या पण आता त्या रोजच्या वापरात नसाव्यात. आजवर मी समजत होतो की संस्कृत हे देवनागरीतच लिहिले गेले आहे आणि मूळ संहिता म्हणजे देवनागरी आणि त्याचे निरुपण मग मराठी, इंग्रजी, जर्मन या कोणत्याही भाषेत होते.
अधिक चौकशी करता असे समजले की कन्नडा साहित्यात अनेक ठिकाणी संस्कृत मूळ श्लोक देवनागरी मध्ये आणि मग कन्नडालिपीमध्ये असे दोनही तर्‍हेने छापलेले उपलब्ध असते. बंगाली मध्ये मध्ये मात्र तसे नाही असेही समजले.बंगाली पुस्तकांच्यात देवनागरी श्लोक आणि अर्थ बंगाली लिपीमध्ये असतो.

पण आता मुद्दा असा उपस्थित होतो की जर ते ज्ञान जन्मकाळात मृद्रित न केलेले आणि पाठांतरानेच पुढे सरकलेले असेल तर कोणत्याच लिपीची त्यावर मक्तेदारी नाही. जो तो आपल्या लिपीत ते उतरवून काढेल आणि ती लिपी जर का हावे तसे उच्चार करण्यास/लिहून ठेवण्यास सक्षम नसेल तर मग अमुन ने म्हटले ते प्रत्यक्षात उरायला वेळ लागणार नाही.

यावरून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
१. सर्वप्रथम कोणत्या लिपीत वेद अक्षरबद्ध झाले? तसेच संकृत भाषेची आणि त्यातिल वेदादी साहित्याची लिपी कोणती हे कसे व कधी निश्चित झाले?
२. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा गीता इत्यादी प्रसृत होते तेव्हा मूळ संहिता/श्लोक देवनागरीत लिहितात असा संकेत का रुढ झाला?
३. हे सर्व वाड्मय अक्षरबद्ध होवू लागल्याला सुद्धा अनेक शे वर्षे झाली असतील आणि अनेक लोक ते मुद्रित स्वरुपात वाचूनच वेद म्हणू लागले असावेत अशी शक्यता आहेच. असे असताना देशी / परदेशी अभ्यासक इत्यादी लोक, वेदांचे पठण सर्वत्र सारखे होते असे म्हणतात तर हे पुन्हा मौखिक प्रसार पद्धतीचे श्रेय अधोरेखित करते की त्या लोकांच्या विदातील अथवा निष्कर्षातील काही कच्चे दुवे समोर आणते?

या विषयी उपक्रमींचे विचार आणि माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. मौखिक ज्ञान हे लिपीबद्ध कसे आणि केव्हा झाले असावे आणि त्यावर एका लिपीचा अधिकार असतो की ज्या लोकांनी ते मुखोद्गत केले आहे त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराच्या लिपीचा ते वापर करतात / करु शकतात हा या चर्चेचा मूख्य आशय असावा आणि त्याला अनुषंगुन विचार आणि माहिती मांडावी अशी आपणास नम्र विनंती.

आपला,
-- लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

महोदय,

हा काळ कोणी आणि कसा ठरवला असावाचा काळ सर्वांस मान्य आहे का?

तसेच रोजेटा स्टोन, चॅम्पोलियन याबद्दल अधिक माहिती द्यावी अशी विनंती.

-- (अर्वाचीन) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

नाही, या काळाबद्दल साशंक

वेदांचा हा काळ फार अर्वाचीन वाटतो.

ऋग्वेदात सरस्वती नदीचे वर्णन सापडते. महाभारतात ती लुप्त झाल्याचे सांगितले आहे. म्हणजे ऋग्वेद महाभारताच्या आधी निर्मिले गेले असावे. सरस्वती नदी इ.स. पूर्व ५००० ते ३००० च्या दरम्यान कोरडी पडली असे सांगितले जाते. हडप्पा संस्कृती अस्तित्वात असतानाही सरस्वती नदी नव्हती. असे असेल तर वेदिक काळ या पूर्वीचा असावा असे वाटते.

चू.भू. दे. घे.

यावर कोणी अधिक प्रकाश टाकल्यास आनंद होईल.

धन्यवाद / सर्वच :)

माझ्या आधीच्या प्रतिसादातील देवनागरी लिपिबाबत सर्वच हा शब्द बहुधा चुकीचा होता, :) आपणाकडून मिळालेल्या नवीन माहितीसाठी मनःपूर्वक आभार.

या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होताहेत - विविध लिपींचा तौलनिक अभ्यास या आधी झाला आहे काय? त्या शास्त्रास काय म्हणतात? ती भाषाशास्त्राचीच एखादी उपशाखा आहे की इतिहास आणि भाषाशास्त्र यांच्या छेदनबिंदूत असणारी स्वतंत्र शाखा आहे? याबाबत कुतूहल आहे.

शैलेश

नाही

भाषाशास्त्रात लिपी किंवा लेखी भाषेला महत्त्व नाही असे म्हटले जाते. केवळ बोलीभाषा- ज्यात प्रमाणित व तथाकथित अप्रमाणित भाषाही समाविष्ट होतातप- यांचा अभ्यास भाषाशास्त्र करते.

राधिका

लिपीशास्त्र

विविध लिपींचा तौलनिक अभ्यास या आधी झाला आहे काय? त्या शास्त्रास काय म्हणतात?
मलाही उत्सुकता आहे. चीन मध्ये लिपी (कॅलिग्राफी ) वर लोक बरेच काम करत असत असा समज आहे. त्यांनी अक्षरे वळणदार काढणे याव्यतिरिक्त त्यात अजून काय काम केले आहे याची माहिती आहे का कोणाला?

प्राचिन अवशेषांवरील लिपीचे आकलन करुन त्याचा अभ्यास पुरातत्ववेत्ते करत असतात त्यामुळे विविध लिपींचा अभ्यास सुद्धा त्यात येत असावा असे वाटते.
याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
-- लिखाळ.
आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे :)

आभार

या चर्चेत भाग घेवुन माहितीत बहुमोल भर घालणार्‍या आपणा सर्वांचे अनेक आभार. या विषयावर माझ्याकडे भर घालण्यासारखे काही नाही पण शंका आणि प्रश्न मात्र भरपूर आहेत. त्यातील अनेक शंकांचे निरसन, त्यांच्या इतर बाजूंचे दर्शन, आकलन मला या चर्चेतून होत आहे याचा फार आनंद वाटतो. ही चर्चा अजून रंगो आणि फलदायी होवो अशी प्रार्थना. सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-- लिखाळ.

भर नाही

या विषयावर माझ्याकडे भर घालण्यासारखे काही नाही - हे माझ्याबाबतीत अगदी खरे. पण चर्चा वाचून खूपच माहिती मिळाली.

दिलासा

या विषयावर माझ्याकडे भर घालण्यासारखे काही नाही - हे माझ्याबाबतीत अगदी खरे

-----माझ्याही !!

चर्चा वाचून खूपच माहिती मिळाली.

----- आणि इथे अर्थपूर्ण चर्चापण होतात हा दिलासाही !!

विषय थांबवू नका

हा विषय थांबवू नका..
जशी जशी माहीती गोळा होत जाईल तसे तसे ही चर्चा साधक होत जाईल.
सर्वांचे च आभार अल्पबुध्दी मुळे आम्ही येथे फक्त वाचकच होतो पण सर्वांचे प्रयत्न पाहून मी ही ह्या बाबतीत काही माहीती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे, लवकरच आम्ही एका पुरातन वस्तू संग्रहाला भेट देणार आहोत दिल्ली येथे... पाहू काही माहीती मीळेल का ते :) व एका बंधू कडे काही पुरातन पोथी आहेत त्यांचे मत आहे की आपल्या चर्चेसाठी त्या उपयोगी पडतील, त्यांच्या घरी जाण्याचा योग यावा अशी ईच्छा आहे !

अवांतर : मी काही ज्योतीषी व वडील धारी व्यक्तीकडे काही पुस्तके (जुन्याकाळातील ) पाहीली आहेत, मला असे वाटते की काही प्रश्नांची उत्तरे तेथे देखील सापडतील... जर शोध घेतला गेला तर अशी अनेक घरे महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये भेटतील जेथे अशी पुस्तके आहेत पण त्याना त्याचे मोल माहीत नसावेत.

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

नक्कीच..

माझेशब्द महोदय,
आपल्याला चांगली उपयुक्त माहिती मिळो अशी सदिच्छा !
अपल्या पाहण्यात असलेली पुस्तके आपण इ-पुस्तक या प्रकारात माझे शब्द या संकेतस्थळावर ठेवलीत (तसे उचित असेल तरच अर्थात) तर येथील अभ्यासू मंडळींना त्याचा फायदा करून घेता येईल असे वाटते.
--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

चालू द्या.

आम्ही अजूनही प्रतिसाद वाचून थकून गेलेलो नाही.अजूनही देवनागरी लीपी चा शोध प्रतिसादातून लागलेला नाही असे वाटते.मीही पूस्तके चाळतो आहे, चर्चेत सहभागी होता यावे म्हणून.पण अजून काही संदर्भ मिळालेले नाहीत.तो पर्यंत चालू द्या..!

लिपी आणि मौखिक ज्ञान

सौरभ

माझे या समग्र विषयावरील मुक्त विचार इथे मांडतो.

लिपिशास्त्र नावचे शास्त्र अस्तित्वात आहे. इंग्लिशामधे त्याला 'स्क्रिप्टॉलॉजी' म्हणावे की 'स्क्रिप्टोग्राफी' याबद्दल तज्ञांमधे मतभेद आहे. या विषयाचे संशोधक भारतात थोडे आणि इतर देशांत जास्त आहेत. (एकंदरीतच कुठल्याही विषयावरील 'संशोधन' या गोष्टीबद्दल भारतीय सामान्यांत, विद्वानांत आणि सरकारात जी काही अनास्था आहे त्यावरून हे साहजिक आहे). माझ्यादृष्टीने लिपिशास्त्राचा भाषाशास्त्रातच समावेश व्हावा, पण विद्यापीठीय स्तरावर शिकविल्या जाणार्या भाषाशास्त्र या विषायात बहुधा लिपिशास्त्र नाही किंवा असले तरी केवळ तोंडओळख म्हणून.
असो. साधारण १९५०-६० च्या दशकात ल.श्री.वाकणकर नावाचे एक लिपिशास्त्रज्ञ भारातात होऊन गेले. त्यांचे 'गणेशविद्या' नावाचे लिपिशास्त्रावरचे वाळवी लगलेले एक पुस्तक मझ्याजवळ कर्मधर्मसंयोगाने आले, ते मी जिवापलिकडे जपून ठेवले आहे. आणि त्यांनी बर्याच संशोधनांती असा दावा केलाय की लेखन-कला हीच मुळात भारतात सुरु झाली आणि इथून ती इतरत्र गेली त्यामुळे पुराणकाळातील भारतीय लिपी हीच जगाच्या सर्व लिप्यांची जननी आहे. मोहेंजो-दरो आणि हडप्पा संस्कृतीत वापरल्या गेलेल्या लिपिपासूनच अशोककालीन ब्राह्मी, तिच्यापासून देवनागरी आणि तिच्यापासून इतर लिप्या कशा विकसित झाल्या त्याचे काही तक्ते त्यांनी दिलेत जे पाहाण्यासारखे आहेत. याच पुस्तकातील 'बिब्लिओग्राफी' (संदर्भसूची) मध्ये डॉ.शफी शेख नावाच्या १९२० मधल्या एका लिपिशास्त्रज्ञाचा संदर्भ दिलाय. या माणसाने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने सिद्ध केलंय की अरबी लिपिचे मूळ भारतीय लिपीतच, ते देखील ब्राह्मी-देवनागरीत आहे.
आता मी या सर्व मतांशी पूर्ण सहमत आहे असं नाही पण या मंडळींचे प्रयत्न आणि कष्ट नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत.

मला एकंदर ९ भारतीय लिप्या आणि ३ परदेशी लिप्या येतात. त्या खालीलप्रमाणे:
देवनागरी, मोडी (फक्त वाचणे), तमिळ, मलयाळम, कन्नड, तेलुगु, बांग्ला (बंगाली), उर्दू, गुजराती
रोमन, जपानी, अरबी

वर कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे, प्रत्येक भाषेच्या लिपीत त्या त्या भाषेतील सगळे उच्चार व्यवस्थित मांडण्याची सोय असते, पण इतर भाषेतले उच्चार माण्डण्याची सोय असेलच असं नाही, म्हणूनच दोन वेगवेगळ्या भाषांच्या लिपींची एकमेकींशी तुलना करू नये. तरीही उच्चारशास्त्र, भाषाशास्त्र, ध्वनिशास्त्र इ० अनेक गोष्टींचा विचार करता तज्ञ मंडळींना देवनागरी लिपि आत्तापर्यंतची सर्वात श्रेष्ठ लिपी वाटते.

पहाटेचे ३ वाजलेत, मला झोप् येतेय. उरलेलं उद्या. नमस्कार.

नमस्कार

सौरभ महोदय,
आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादा बद्दल आभार.
आपण आपल्याकडिल अजून माहिती येथे द्यावी अशी विनंती.

येथे मांडलेल्या काही मूळ प्रश्नांवर आपण माहिती देवू शकाल का? जसे, वेदांची लिपी कोणती? ते केंव्हा लिपिबद्ध झाले?

'गणेशविद्या' नावाचे लिपिशास्त्रावरचे वाळवी लगलेले एक पुस्तक मझ्याजवळ कर्मधर्मसंयोगाने आले, ते मी जिवापलिकडे जपून ठेवले आहे.

फार छान. आपणासारख्या अभ्यासकाच्या ते हातात पडले हा चांगला योग म्हणायचा. ते पुस्तक आपण स्कॅन करुन 'माझे शब्द' सारख्या स्थळावर चढवलेत तर अनेकांना त्याचा उपयोग होईल असे वाटते.

--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

सौरभ - काही प्रश्न

आपला प्रतिसाद आवडला परंतु काही प्रश्न पडले.

त्यांनी बर्याच संशोधनांती असा दावा केलाय की लेखन-कला हीच मुळात भारतात सुरु झाली आणि इथून ती इतरत्र गेली त्यामुळे पुराणकाळातील भारतीय लिपी हीच जगाच्या सर्व लिप्यांची जननी आहे.

हे संशोधन त्यांनी कसे काय केले? यासाठी त्यांनी जगभरातील इतर कोणत्या प्राचीन लिपी विचारांत घेतल्या? जगातील इतर संशोधक लिखाणाचा शोध मेसोपोटेमिया येथे लागला असे सांगतात त्याला हे पुस्तक कसे खोटे पाडते?

या पुस्तकातील काही विशेष वाचण्याजोगे लिखाण येथे टंकणे शक्य आहे का?

अवांतरः लिपीचे अनेकवचन लिप्या असे होते का? मला माहित नाही म्हणून प्रश्न विचारते. (पूर्वी मी सुंदरीचे अनेकवचन सुंदर्‍या करत असे, ते चुकीचे आहे असे कळल्यापासून जरा साशंक असते.)

एक उपयुक्त संकेतस्थळ

लिप्यांबद्दल उतम माहितीसाठी हा दुवा पहावा.

वैदिक संस्कृत कोणत्याच लिपीत लिहिता येत नाही.

विकिवर झालेल्या एका चर्चेत मला खालील प्रतिसाद सापडला. तो मी येथे जसाच्या तसा डकवत आहे. (मला स्वतःला यातील फारसे काही माहित नाही, परंतु माहिती चर्चेशी सुसंगत वाटली.)

भगवान शंकराने डमरू वाजवला आणि त्यातून खाली दिलेली चौदा माहेश्वरी सूत्रे प्रगटली:


अ‌इउण् । ऋलृक् । एओङ् । ऐऔच् ।
हयवरट् । लण् । ञमङ‌ण‌नम् । झभञ् । घढधष् ।
जबगडदश् । खफछठथचटतव् । कपय् । शषसर् । हल् ॥

या सूत्रात दिल्याप्रमाणे पाणिनीने आपल्या संस्कृत व्याकरणात अ, इ, उ, ऋ, आणि लृ हे पाच मूळ आणि ए, ओ, ऐ, औ हे चार संयुक्त असे एकूण नऊ स्वर सांगितले आहेत. मूळ स्वर र्‍हस्व, म्हणजे एक मात्रा लांबीचे. आ, ई, ऊ, ॠ हे त्यांचेच दीर्घ उच्चार, म्हणजे दोन मात्रा लांबीचे. अ३, इ३, उ३, आणि ऋ३ हे त्यांचे प्लुत, म्हणजे तीन मात्रा लांबीचे अतिदीर्घ उच्चार, अनुनासिक आणि अननुनासिक. त्यामुळे अ चे तीन उच्चार र्‍हस्व(अ), दीर्घ(आ किंवा अ२)) आणि प्लुत(अ३). यातला प्रत्येक अनुनासिक आणि अननुनासिक आणि उदात्त(acute), अनुदात्त(grave) आणि स्वरित(circumflex). अनुदात्त आडव्या अधोरेखेने तर स्वरित उभ्या रेघेने दाखवायचा. 'उदात्त'ला खूण नाही. त्यामुळे 'अ' चे एकूण उच्चार ३ X २ X ३ = १८. असेच इ, उ, आणि ऋ चे. संस्कृतमध्य दीर्घ ऌ नाही(मराठीत आहे) आणि ए, ऐ ओ, औ ला ऱ्हस्व नाही(कानडी, तेलुगू, तमिळ, मलयालम या भाषात आहे) , त्यामुळे ऌ, ए, ऐ, ओ आणि औ चे फक्त बारा उच्चार.

उदाहरणार्थ:-

शतच।क्रं यो३। ह्यः।

उदात्त स्वर स्वरयंत्राच्या वरच्या भागातून तर अनुदात्त खालच्या. स्वरित या दोघांचे मिश्रण. उच्चैरुदात्तः । नीचैरनुदात्तः । समाहारः स्वरितः। (पाणिनी- १.२.२९.३१)

शिवाय नासिक्य स्वर/व्यंजन लिहिण्याचे दोन प्रकार. एक अनुस्वार आणि दुसरा अर्धनासिक दाखवण्यासाठी चंद्रबिंदू. 'य, व, ल' वर आणि अगोदर आणि 'श,स, ह' च्या अगोदर चंद्रबिंदू येतो. उदा. यँ. वँ, लँ.., तँ होवाच। इमाँल्लोकान् ।

निष्क्रियँशांतम् । परँसेतुम् । वासाँसि । संवत्सर किंवा सँव्वत्सर, संयम किंवा सँयम । वगैरे. विसर्गाचे तीन प्रकार.

पहिला- 'सः'--उच्चार 'सहा'प्रमाणे. जिह्वामूलीय व उपद्ध्मानीय हे दोन अर्ध-विसर्ग. पहिला क,ख अगोदर दुसरा प,फ पूर्वी.

उदा. यःकश्चित्, दुःख, कःपदार्थ. वैदिक संस्कृतात ळ, आणि ळ्ह(तमिळ-मलयालम मधला .ळ) आहेत. उदा. अग्निमीळे पुरोहितम् | किंवा मीळ्हुषे । 'व'चे दोन उच्चार एक उ + अ मिळून होणारा व(इंग्रजी W), दुसरा दन्त्योष्ठ्य 'व'(इंग्रजी V) [वकारस्य दन्तोष्ठम्] . उर्दू क़, ख़, ग़, ड़, ढ़, ज़, फ़ आणि मराठी च, झ नाहीत. हे च, झ जगातल्या कुठल्याच भाषेत नसावेत!. वैदिक देवनागरीसाठी आंतरराष्टीय उच्चारण पप्द्धतीत(IPA) उच्चारखुणा आहेत, असे म्हणतात पण मला सोदाहरण सापडल्या नाहीत. युनिकोड देवनागरीत हिंदी, हिदुस्तानी, सिंधी, नेपाळी अणि दाक्षिणात्य भाषांच्या उच्चारांकरता टंक आहेत, पण 'मराठी' करता नाहीत!!!

सदर प्रतिसादकर्ते विकिवर कार्यरत असून मनोगतीही आहेत.

छान

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. सदर प्रतिसादकर्त्याचे नाव जाणण्याची इच्छा आहे. त्यांना नाव जाहिर करायचे नसल्यास , व्य. नि.चे माध्यम वापरता येईल.
असो.

'व'चे दोन उच्चार एक उ + अ मिळून होणारा व(इंग्रजी W), दुसरा दन्त्योष्ठ्य 'व'(इंग्रजी V) [वकारस्य दन्तोष्ठम्] . उर्दू क़, ख़, ग़, ड़, ढ़, ज़, फ़ आणि मराठी च, झ नाहीत. हे च, झ जगातल्या कुठल्याच भाषेत नसावेत!. वैदिक देवनागरीसाठी आंतरराष्टीय उच्चारण पप्द्धतीत(IPA) उच्चारखुणा आहेत, असे म्हणतात पण मला सोदाहरण सापडल्या नाहीत. युनिकोड देवनागरीत हिंदी, हिदुस्तानी, सिंधी, नेपाळी अणि दाक्षिणात्य भाषांच्या उच्चारांकरता टंक आहेत, पण 'मराठी' करता नाहीत!!!

हा भाग तितकासा स्पष्ट झाला नाही. यावर मला पडलेले प्रश्न-
१- इंग्रजी V वैदिक संस्कृतात आहे असे आपले म्हणणे आहे काय?
२- उर्दू वर्ण वैदिक संस्कृतात नाहीत असे आपल्याला म्हणायचे आहे, की त्यासाठी वेगळी अक्षरे नाहीत असे म्हणायचे आहे?
३- मराठी करता IPA टंक आपल्याला हवे आहेत का?

राधिका

उत्तम माहिती

उत्तम माहिती. इथे दिल्याबद्दल धन्यवाद! 'ळ' चा उलगडा झाला.
अर्धनासिक म्हणजे काय हे कुणी सांगू शकेल काय?

ही माहिती जाळ्यावर असल्याने यातील काही शब्द आहेत त्याच क्रमाने शोधल्यास मूळ लेखन (आणि लेखक) सापडेल. उदा.भगवान शंकराने डमरू वाजवला

उत्तम

उत्तम प्रतिसाद. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतिसादकर्ते नक्कीच तज्ञ असावेत.

मराठी "च" तेलगूतही

वैदिक संस्कृतातील उच्चारांवर लिहिणारे प्रतिसाददाते जबरदस्त ज्ञानी वाटले (नाव अजूनही समजले नाही, कोणी व्यनिमधून कळवले तर आभारी होईन).
पण
"मराठी च, झ नाहीत. हे च, झ जगातल्या कुठल्याच भाषेत नसावेत!. "
हे बरोबर नसावे.
मी ऐकल्याप्रमाणे मराठीतला "च" (म्हणजे चावट चोरातला च) तेलुगूतही आहे.
उदा. कू(र्)चोंडी
अर्थात् याने मूळ प्रतिसादाला बाधा येत नाही.

- दिगम्भा

हे माहित नव्हते

मराठीतला "च" (म्हणजे चावट चोरातला च) तेलुगूतही आहे.

हे माहित नव्हते. वचनमधला 'च' सुद्धा आहे का?

राधिका

शंकराच्या डमरुमधून

प्रियाली,
शंकराच्या डमरुमधून निघालेले स्वर आम्हाला १० वीच्या वर्गात संस्कृतच्या गुरुजींनी शिकव्ले होते. त्यातले पहिले चार शब्द वगळता मी इतर शब्द विसरलो होतो आणि आता ते कोण सांगणार असे वाटत होते. ते आज वाचून आनंद झाला. धन्यवाद. यातून बरीच माहिती मिळाली.
--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

'देवनागरी लिपी'

सुबोध लिपी - एक नवी सुरवात

'देवनागरी लिपी' या विशयावर मी काही लिखाण एक हेतु मनाशी बाळगून केले आहे. ते माझ्या http://rawlesatish.info या वेब साईट वर प्रकाशित केले आहे. या विशयाची आवड असणार्‍यांना ह्या वेब साईट ला भेट देवून त्या वरील लिखाण वाचण्याचे आमंत्रण देत आहे.

मी स्वत: टकनाचे रितसर प्रशि़क्षण घेतलेले आहे परंतु काही कारणास्त्व युनिकोड मध्ये टंकन करताना माझी भारी दमछाक होते आणि म्हणूनच तुमच्या या चर्चेत मला ईच्छा असून ही सहभागि होता येत नाही. तुम्ही माझे लिखाण वाचुन जर त्यावर प्रतिक्रीया दिलीत तर मलाही तुमच्या चर्चेत सहभागि झाल्याचे समाधान लाभेल.

लिपी आणि मौखिक ज्ञान

पुन्हा काही मुक्त विचार :

मराठीतील 'च्' ( चमचा, चवळी, इ. शब्दांतील) हा उच्चार खालील भाषांत असल्याचं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो: कोंकणी, तेलुगु, गुजराती, जापानी, चीनी, कोरी (कोरियन).

मराठीतील 'ज्' ( जगणे, जवळ, इ. शब्दांतील) हा उच्चार खालील भाषांत असल्याचं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो : कोंकणी, तेलुगु, गुजराती, जापानी, चीनी, कोरी (कोरियन), अरबी/अरबजन्य लिपी असलेल्या सर्व भाषा, बहुतेक सर्व युरोपीय भाषा, इ.

इंग्लिशातला V वैदिक संस्कृतात आहे या मताशी मी सहमत नाही. पाणिनीय व्याकरणात दोन निरनिराळे 'व्' उच्चार संस्कृतात असल्याचा उल्लेख कोणत्या सूत्रात आहे? ते तसे असल्याचा उल्लेख इतर कुठल्या व्याकरणकाराने केल्याचेही ऐकिवात नाही. याबद्दल अधिक माहिती पाहिजे.

उर्दूतील सर्व उच्चार वैदिक संस्कृतात नाहीत. उर्दूची वर्णमाला ही अशी बनलेली आहे:
मूळ अरबी वर्णमाला + एक फार्शी वर्ण + च + ट , ड, ड़ + संस्कृतातील सर्व महाप्राण वर्ण.

मूळ अरबी वर्णमालेतील खालील उच्चार (जे उर्दूत आहेत पण योग्य उच्चारले जात नाहीत) संस्कृतात असल्याचे ठोस पुरावे नाहीत:
ص ح ' ق ف غ ع ظ ض ذ ث خ
(कृपया लक्षात घ्या की भारतीय मुस्लिम या सर्व वर्णांचे उच्चार बरोबर करतात असे नाही. त्यामुळे हे उच्चार नेमके कसे आहेत ते समजण्याकरिता एखाद्या अरब पंडिताकडे जावे लागेल).
फार्शीतील एक उच्चार जो उर्दूतही आहे तो असा: ژ
(याचा उच्चार pleasure, measure, vision, इ. शब्दांतील s; किंवा seizure, azure या शब्दातील z सारखा आहे. दुर्दैवाने मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्लिश शिकवताना हा उच्चार नेमका शिकवला जात असल्याचे मी पाहिलेले नाही.)
'च्' ( चप्पल, चर्मकार, चहा इ. शब्दांतील) हा उच्चार अरबीत नाही, पण फार्शीत आहे. तो संस्कृतातही आहे. त्यामुळे उर्दूत तो कोणत्या भाषेतून आला हे नक्की सांगता येत नाही. पण काही झाले तरी उर्दू ही नि:संशय भारतीय भाषा असल्यामुळे आपण ते श्रेय आपल्याकडे घेऊ शकतो.
ट, ड, ड़ हे उच्चार उर्दूने निखालसपणे संस्कृतातूनच घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे शक्य तेवढ्या अक्षरांचे महाप्राण उच्चार ( म्ह० ख, घ, छ, झ, इ.) संस्कृतातून घेतलेले आहेत.

संस्कृतात "व"चा उच्चार एकच - दंतोष्ठ्य

संस्कृतात "व"चा उच्चार एकच. तो दंतोष्ठ्य.

तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम् । पाणिनीय सूत्र १.१.९ च्या वृत्तीत "वकारस्य दंतोष्ठ्यम्" असे स्थान दिलेले आहे. संस्कृतात ओष्ठ्यवर्ण म्हणजे "उ-पवर्ग-उपध्मानीय" हे वर्ण होत. वैदिक आणि लौकिक संस्कृतासाठी एकच उच्चार आहे. प्रमाण-इंग्रजीतल्या "V" उच्चारही दंतोष्ठ्यच आहे. मराठीभाषक इंग्रजीतला "V"चा उच्चार कित्येकदा दंतोष्ठ्य नसतो, त्याचे खाली विवेचन केले आहे.

अरबीमध्ये "व"काराचा उच्चार एकच - ओष्ठ्य.

मराठीत दोन्ही चालत असावा. माझा उच्चार ओष्ठ्य आहे. तसेच माझ्या अनेक ओळखीच्या मराठीभाषकांचा उच्चार ओष्ठ्य आहे. पण कोणी दंतोष्ठ्य उच्चार केलेला मला पूर्वी ओळखूही येत नसे. त्यामुळे दंतोष्ठ्य उच्चार करणारे मराठीभाषक लोकही असावेत (मध्यप्रदेशातले वगैरे), असा माझा कयास आहे.

मराठी न-बोलणार्‍यांना भारतीय लोकांना मराठी ओष्ठ्य "व"कारातून "ब"काराचा भास होतो. आणि इंग्रजी "डब्ल्यू-एच्"चा उच्चार काही मराठी भाषक ओष्ठ्य-महाप्राण "व्ह" करतात. त्याचा "भ" आभास अन्यभाषकांना होतो. (म्हणजे त्या अन्यभाषकांचा "व" दंतोष्ठ्य असेल तर...)

बाकी भाषांबद्दल सहमत

लिपी आणि मौखिक ज्ञान

pleasure, measure, vision, इ. शब्दांतील s; किंवा seizure, azure या शब्दातील z यांचा उच्चार सगळ्या इंग्लिश शाळांमध्ये योग्यच शिकविला जातो असेही म्हणता येत नाही.
मुळात, इंग्लिश शिकवणार्‍या व्यक्तीचा, इंग्लिश भाषेच्या तद्देशीय (native) व्यक्तींच्या उच्चारांशी किती चांगला परिचय आहे, यावर त्याच्या शिकविण्यातील नेमकेपणा ठरतो. त्यामुळे शिक्षक चांगला असेल तर तो कोणत्याही माध्यमाच्या शळेत चांगलेच शिकवतो.
तरीही, इतर माध्यमांच्या तुलनेत इंग्लिश माध्यमाच्या शाळेत एकदमच चुकीचे उच्चार शिकविले जाण्याची शक्यता कमी आहे असे मला वाटते.

लिपी आणि मौखिक ज्ञान

'व कारस्य दन्तोष्ठ्यम्' हे नेमकं कुठे आहे ते माझ्याकडच्या अष्टाध्यायीत मला सापडले नाही. त्यामुळे त्याबद्दल मी खरंच काही सांगू शकत नाही. त्याबद्दल आमच्या अष्टाध्यायीच्या शिक्षकांना विचारून नक्की काय ते सांगतो.

पण मी आतापर्यंत पाहिलेल्या देवनागरी वर्णांच्या वर्गीकरणात 'व्'कार कायम 'ओष्ठ्य' गटातच दाखविलेला आहे, दन्तोष्ठ्य गटात नव्हे. किंबहुना प्रमाण (लौकिक आणि वैदिक) संस्कृतात दन्तोष्ठ्य नावाचा वर्गच नाही असे मला वाटते.
'व्' हा वर्ण 'य, र, ल' यांच्याच गटातला आहे. आता हे वर्ण कुठून आले किंवा कसे सिद्ध झाले याबद्दल माझा विचार (व्याकरणशुद्ध विचार नव्हे, व्यक्तिगत विचार) असा आहे की ' इ, उ, ऋ आणि ऌ ' यांपैकी प्रत्येक वर्णानंतर लगेच 'अ' उच्चरला की त्यांच्यामधे हे वर्ण मिळतात.
उदा० 'इ' नंतर लगेच 'अ' म्हटलं की 'य' मिळतो आणि असेच नाते 'उ-व', 'ऋ-र' आणि 'ऌ-ल' यांचे संगता येते. यानुसार 'उ' जर पूर्णपणे ओष्ठ्यच अहे तर 'व' सुद्धा तसाच असावा, दन्तोष्ठ्य नव्हे.

इंग्लिशात दोन 'व्'कार् आहेतः
१. w - हा फक्त ओष्ठ्य (Labial). याचा उच्चार अगदी मराठीतल्या किंवा संस्कृतातल्या 'व्' सारखाच आहे. अमेरिकी मंडळी त्यांच्या एकूणच अतिरेकी स्वभावानुसार याचा उच्चार करताना तोंडाचा जरा गरजेपेक्षा जास्तच चंबू करतात.
२. 'V' - हा दन्तोष्ठ्य (Labio-dental). याचा नेमका उच्चार अधरोष्ठ (खालचा ओठ) आणि वरची दंतावळी यांच्या संयोगातून होतो. ज्या मराठी भाषिकांना याचा योग्य उच्चार शिकविला गेलेला नाही ते लोक याचा उच्चार एकतर w सारखाच किंवा wh (व्ह) असा करतात.

आता खरी गम्मत यापुढे आहे. अनेक उत्तरभारतीय भाषांमध्ये संस्कृतातल्या 'व' च 'ब' होतो.
उदा० वेला-बेला, वन-बन, वाडि-बाडि, व्रत-ब्रत, इ. याच नियमानुसार 'व्ह' चा 'भ' होतो. त्यामुळे इंग्लिशमधलं V अक्षर मराठीत 'व्ह' असं लिहितात तर उत्तरभारतात (हिंदी, उडिया, बांग्ला) तेच अक्षर चक्क 'भ' असे लिहितात.
उदा० vitamin - व्हिटामिन (महाराष्ट्र) ; भिटामिन (उत्तरभारत)
victoria - व्हिक्टोरिय (महाराष्ट्र) ; भिक्टोरिय (उत्तरभारत).

बांग्ला (बंगाली) भाषेत याच्याही पुढची पायरी गाठलेली आहे. ज्याप्रमाणे इंग्लिश शब्द बांग्लात लिहिताना ते लोक V साठी 'भ्' वापरतात त्याचप्रमाणे मूळ बांग्ला शब्द इंग्लिशात लिहिताना 'भ्' साठी BH न वापरता V वापरतात. त्यामुळे सौरभ हे नाव इंग्लिशात saurabh असे न लिहिता ते लोक saurav असे लिहितात. अभिजित् हे नाव avijit असे लिहितात.

काळ

चित्तरंजन यांनी पुरविलेल्या माहितीतील 'काळ' सर्व तज्ज्ञांना मान्य नाही.
वेदांवर अधिक संशोधन करणार्‍या तज्ज्ञांना वेद हे जास्त प्राचीन असल्याचे जाणवते. अर्थात वैदिक काळाबद्दल अजूनही इतिहासतज्ज्ञांमध्ये एकवाक्यता झालेली नसली तरी वेदांच्या रचनेला मात्र ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांआधी सुरुवात झाल्याचे बहुतेक तज्ज्ञ आता मानतात.

याचे आणखी एक कारण म्हणजे वैदिक संस्कृत भाषा स्वरयुक्त होती. (या स्वरांचा संगीतातील स्वरांशी किंवा व्याकरणातील 'अ आ इ ई' वगैरे स्वरांशी सम्बन्ध नाही, तर शब्द उच्चारणाच्या कालावधीशी सम्बन्ध आहे). आणि हे स्वर केवळ वेदांतच नव्हे तर ते तेव्हांच्या दैनन्दिन व्यवहाराच्या भाषेतही होते. ('वेद हे देखील तेव्हांच्या दैनन्दिन व्यवहाराच्या भाषेतच आहेत, ते कोणत्याही विशेष अशा साहित्यिक भाषेत नाहीत' असे काही वेदपंडित मानतात).

Lithuanian भाषेत आजही अशा प्रकारचे स्वर आहेत.

काळाच्या ओघात कुठेतरी हे संस्कृत भाषेतले स्वर नाहीसे झाले आणि भाषा सरसकट एकाच स्वरात बोलण्याची पद्धत पडली. पण हा स्वरांच्या नाहीसे होण्याचा काळ काही वर्षे किंवा दशके नसून अनेक शतकांचा होता असे मानले जाते. कारण भाषेमध्ये इतका मोठा बदल घडायला खूप लांबचा कालावधी लागतो असे भाषाशास्त्रज्ज्ञांचे मत आहे.

ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यन्त सम्पूर्ण वेद स्वरयुक्त भाषेत आहेत. याचा अर्थ अथर्ववेदांचीही सम्पूर्ण रचना भाषेतील स्वर नाहीसे होण्याच्या बर्‍याच काळा आधी झालेली आहे.

वेदांतील अवघड शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र लिहिणार्‍या यास्काचार्याच्या काळात व्यावहारिक संस्कृतात हे स्वर नव्हते असे विद्वानांचे मत आहे. यास्काचा काळ साधारण इ.स.पूर्व ७०० चा आसपास मानला जातो. त्याच्या आधी काही शतके हे स्वर नाहीसे झाले होते. याचा अर्थ इ.स.पू. १००० - ९०० पर्यन्तच हे स्वर भाषेत होते. म्हणजेच अथर्ववेदांची रचना त्याही आधी झालेली होती असे मानता येईल.

वैदिक काळ

चित्तरंजन यांनी पुरविलेल्या माहितीतील 'काळ' सर्व तज्ज्ञांना मान्य नाही.
वेदांवर अधिक संशोधन करणार्‍या तज्ज्ञांना वेद हे जास्त प्राचीन असल्याचे जाणवते. अर्थात वैदिक काळाबद्दल अजूनही इतिहासतज्ज्ञांमध्ये एकवाक्यता झालेली नसली तरी वेदांच्या रचनेला मात्र ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांआधी सुरुवात झाल्याचे बहुतेक तज्ज्ञ आता मानतात.

याचे आणखी एक कारण म्हणजे वैदिक संस्कृत भाषा स्वरयुक्त होती. (या स्वरांचा संगीतातील स्वरांशी किंवा व्याकरणातील 'अ आ इ ई' वगैरे स्वरांशी सम्बन्ध नाही, तर शब्द उच्चारणाच्या कालावधीशी सम्बन्ध आहे). आणि हे स्वर केवळ वेदांतच नव्हे तर ते तेव्हांच्या दैनन्दिन व्यवहाराच्या भाषेतही होते. ('वेद हे देखील तेव्हांच्या दैनन्दिन व्यवहाराच्या भाषेतच आहेत, ते कोणत्याही विशेष अशा साहित्यिक भाषेत नाहीत' असे काही वेदपंडित मानतात).

Lithuanian भाषेत आजही अशा प्रकारचे स्वर आहेत.

काळाच्या ओघात कुठेतरी हे संस्कृत भाषेतले स्वर नाहीसे झाले आणि भाषा सरसकट एकाच स्वरात बोलण्याची पद्धत पडली. पण हा स्वरांच्या नाहीसे होण्याचा काळ काही वर्षे किंवा दशके नसून अनेक शतकांचा होता असे मानले जाते. कारण भाषेमध्ये इतका मोठा बदल घडायला खूप लांबचा कालावधी लागतो असे भाषाशास्त्रज्ज्ञांचे मत आहे.

ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यन्त सम्पूर्ण वेद स्वरयुक्त भाषेत आहेत. याचा अर्थ अथर्ववेदांचीही सम्पूर्ण रचना भाषेतील स्वर नाहीसे होण्याच्या बर्‍याच काळा आधी झालेली आहे.

वेदांतील अवघड शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र लिहिणार्‍या यास्काचार्याच्या काळात व्यावहारिक संस्कृतात हे स्वर नव्हते असे विद्वानांचे मत आहे. यास्काचा काळ साधारण इ.स.पूर्व ७०० चा आसपास मानला जातो. त्याच्या आधी काही शतके हे स्वर नाहीसे झाले होते. याचा अर्थ इ.स.पू. १००० - ९०० पर्यन्तच हे स्वर भाषेत होते. म्हणजेच अथर्ववेदाची रचना त्याही आधी झालेली होती असे मानता येईल.

ही सर्व मते माझी नसून या विषयातील काही इतिहास व पुरातत्व-तज्ज्ञांची आहेत. मी फक्त ती इथे मांडलीत. माझा स्वत:चा या विषयाचा अभ्यास नाही.

 
^ वर