’द म्युझिक रुम’

इ.स. २१००....एका दूरच्या ग्रहावर प्रगत प्राण्यांची वस्ती आहे अन त्यांना नासाच्या व्हॉयेजर यानावरील यंत्रे सापडतात. त्यात असते एक सुवर्ण तबकडी अन ती वाजवण्याची कृती. ते प्राणी ती तबकडी वाजवतात अन महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज ऐकून ते भारावून जातात.

ही विज्ञान-कथा नाही बरे! ही गोष्ट सत्यात येणे अगदीच अशक्य नाही. जयपूर-अत्रौली घराण्याच्या गानसम्राज्ञी- सूरश्री केसरबाईंची स्वर्गीय चीज- "जात कहां हो" सूर्यमालेच्या पल्याडच्या ’खरोखरीच्या’ स्वर्गात पोहोचली आहे. बाईंना त्यांचे गाणे रेकॉर्ड केलेले अजिबात खपत नसे. पण चोरुन टेप केलेले हे गाणे व्हॉयेजरमधल्या सुवर्ण तबकडीवर अमर झालेले आहे. ते यू-ट्यूबवर ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहिले. केसरबाईंच्या घराण्यातील एक आधुनिक गायिका व पेशाने लेखिका असलेल्या नमिता देविदयाल यांचे "द म्युझिक रूम" हे पुस्तक हल्लीच हातात पडले आणि लेखिकेप्रमाणेच मी ही एका समांतर विश्वात जाऊन पोहोचले. जयपूर घराण्याचा सबंध इतिहासच ह्या पुस्तकात दिलेला आहे. नमिता ह्या धोंडूताई कुलकर्ण्यांच्या गंडाबद्ध शिष्या. कादंबरीची सुरुवात नमिताताईंच्या अगदी पहिल्या-वहिल्या गायन क्लासापासून होते. केनेडी ब्रिजवरच्या एका लहानशा चाळीत सुरु झालेला हा प्रवास स्थल-कालाच्या सीमा ओलांडून आपल्याला एका वेगळ्याच संगीतमय विश्वात घेऊन जातो.

नमिताताईंनी आपल्या पंचवीस वर्षाच्या गुरु-शिष्या नात्याचे बरेच पैलू ह्या कादंबरीतून व्यक्त केलेले आहेत. धोंडूताईंची शिकवणी ही केवळ गाण्यापुरता मर्यादित नव्हती. गाण्याबरोबरच त्यांनी लेखिकेला संपूर्ण घराण्याची ओळख तर करुन दिलीच. त्या बरोबरच दुनियादारीबद्द्ल सुद्धा बरेच काही शिकवले. अगदी लहान असतांना लेखिका त्यांच्याकडे गाणे शिकायला जातात. मुंबईतील एका बड्या कॉन्व्हेंट्मध्ये शिकणाऱ्या लेखिकेचे शाळेतील जीवन धोंडूताईंच्या जगापेक्षा अगदी वेगळे होते पण लेखिकेला लवकरच ताईंच्या गाण्याची व त्यांच्या घरातील सूरमय वातावरणाची गोडी लागते.

धोंडूताई ह्या एका मराठी ब्राह्मण, मध्यमवर्गीय कुटंबात जन्मल्या. परंतु चारचौघींसारखा संसार न थाटता त्यांनी जन्मभर संगीतसाधनेला वाहून घेतले. अल्लादिया खान, भूर्जी खान, केसरबाई केरकर ह्या सारखे दिग्गज त्यांना गुरु म्हणून लाभले. परंतु असे गुरु लाभण्यासाठी सुद्धा भाग्य लागते आणि ताईंनी त्यासाठी भरपूर कष्ट घेतले. खानसाहेबांकडून शिकण्यामध्ये सुरवातीला पैशाची व समाजाची अडचण होती. केसरबाईंचा तिरसट स्वभाव सांभाळणे महाकठीण काम होते.

’द म्युझिक रुम’ ही केनेडी ब्रिजच्या चाळीतली किंवा बोरिवलीच्या प्रेमनगरली रुम नसून प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनांतील एक कप्पा आहे. मग कदाचित तो संगीत प्रेमी परग्रहावरचा असला तरीही त्या सूरांनी तो भारावून जाईल....’जात कहा हो अकेले’ च्या आवाजाचा माग घेत थेट भारतातच येऊन पोहोचेल!

गौरी दाभोळकर

Comments

वा

गाणं ऐकून भारावून गेलो. कहा वरची अदा आवडली. जात कहां हो हे शब्ददेखील ठावठिकाणा माहीत नसलेल्या व्हॉयेजरबरोबर पाठवण्यासाठी चपखल वाटतात.

हे किंवा या रेकॉर्डवरचं इतरही संगीत, ध्वनी कसे व कोणी निवडले? त्यात इतर काय काय अनोख्या चीजा आहेत? थोडं अजून सांगितलंत तर आवडेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शास्त्रीय संगीत

मला शास्त्रीय संगीतातील फारसे कळत नाही. तरीही जे नादमय, सुरमय असते ते कोणालाही आवडतेच. असा प्रतिसाद देऊन तुम्हाला नाउमेद करायचे नाही पण, नाही आवडले ते गाणे.

माहितीबद्दल आभारी!

व्हॉयेजर यानाची माहिती होती. पण तुम्ही दिलेली माहिती नवीनच आहे माझ्यासाठी. माहिती बद्दल आभारी आहे. महाराश्ट्रातील गायिकेचे गाणं पृथ्वीच्या मानवप्राण्यांची माहिती सांगणार्‍या वस्तूंमध्ये असणार ही खरंच अभिमानाची गोश्ट आहे.

प्रभाकर नानावटींनी लिहीलेला व्हॉयजर वरील लेख लवकरच वाचायची इच्छा आहे.

अजून लिहा

गौरी, लेख आवडला परंतु त्रोटक वाटला. नमिता देविदयाल यांच्या "द म्युझिक रूम" या पुस्तकाबद्दल आणखी वाचायला आवडले असते. तुम्हालाही लेखात लिहिण्यासारखे खूप होते असे वाटते पण लेख आवरता घेतलात असेही वाटले. :-)

असो. गाणे अद्याप ऐकले नाही, घरी जाऊन ऐकेन आणि कळवेन.

शास्त्रीय संगीतातील फार काही कळत नाही.

छान, त्रोटक

लेख आवडला. थोडा त्रोटक वाटला.

व्हॉयेजरवर पाठवलेल्या संगीताबद्दल माहिती नव्हती. यूट्यूबवर काही गाणी ऐकून बघितली.

("कादंबरी" म्हणजे या पुस्तकातील काही भाग ललित-कल्पित आहे, की लेखिकेच्या आठवणी आहेत? त्याने पुस्तकाच्या दर्जात काही फरक पडत नाही, पण थोडे कुतूहल होते.)

गौरी दाभोळकर यांनी अधिक लिहावे, ही विनंती.

 
^ वर