कोकण सहलीच्या निमित्ताने

डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो. त्यानिमित्ताने आमच्या माहितीत जी भर पडली तिचे हे संकलन आहे.

शिवथरघळ(१), लोटे परशूराम(२), गोवळकोट(३), गुहागर(४), हेदवी(५), वेळणेश्वर(६), धोपावे-दाभोळ फेरी बोटीतून खाडीपार(७), आसूद(८), मुरूड(९), वेशवी-बागमांडले फेरी बोटीतून खाडीपार(१०), दिवे आगार(११) आणि हरिहरेश्वर(१२) ही पाहण्याची ठिकाणे निश्चित केली. पाहण्याचा अनुक्रमही तोच ठरवला. कागदावर, तीन दिवसात तो पार पडेल, असा अनुक्रम तयार केला. जाणकारांनी त्यावर असा शेरा दिला दिला की, तुम्ही दहा दिवसांची सहल तीन दिवसांत ठासून भरता आहात. त्यामुळे सहल म्हणजे नुसतीच धावपळ होईल. त्यावर, गरज पडल्यास काही स्थळे सोडून देण्याची मानसिक तयारीही आम्ही केली. पण त्याच वेळी संकल्पित कार्यक्रम कसोशीने पार पाडण्याची तयारीही सुरू केली.

सारा उत्साह एकवटून, ११ तारखेस सकाळी ०६४५ वाजता डोंबिवलीतून, गणपतीबाप्पा मोरया आणि उंदीरमामा-की-जय, म्हणत आम्ही मार्ग आक्रमू लागलो. नऊच्या सुमारास वडखळ नाक्यावरील गंधर्व उपाहारगृहात नास्ता केला आणि महाडकडे निघालो. पावणेबाराच्या सुमारास, शिवथर नदीच्या किनार्‍यावरून जात जात, शिवथर घळीपाशी जाऊन उतरलो.

ट्रेक्षितिज संकेतस्थळाच्या शिवथरघळ१ या पानावर, असे म्हटले आहे की, हे स्थान, रायगड जिल्ह्यात, रायगड डोंगरराशीत, समुद्रसपाटीपासून २९८५ फूट उंचीवर, चहुबाजूंनी हिरव्यागार झाडझाडोर्‍याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात वसलेले आहे. समर्थ रामदासांनी हिचे वर्णन “सुंदर मठ” असे केलेले आहे. ते म्हणतात,

गिरीकंदरी सुंदर वन । सुंदर वाहती जीवन । त्यामध्ये सुंदर भवन । रघुनाथाचे ॥

घळीच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत मालिका असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून ती पुढे सावित्रीला जाऊन मिळते. तिच्या काठावर कुंभे, कसबे आणि आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत.

शिवथरघळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोरे यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. ते विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या हातात घेतला. समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्याकरता आले. ते सन १६६० पर्यंत म्हणजे दहा अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. सन १६७६ मध्ये शिवराय दक्षिण-दिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन पुढे गेले. आजच्या या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९३० साली लावला.

मुंबईकडून चिपळूणकडे, राष्ट्रीय महामार्ग-१७ वरून जात असता, महाड सोडले की पुढे थोड्याच अंतरावर एक रस्ता डावीकडे जातो. तेथे “शिवथरघळीकडे” अशी पाटी लागलेली आहे. येथून पुढे पारमाची गाव लागते. साधारण ३० किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर आणि अंबे शिवथर ही गावे लागतात. पायथ्यापर्यंत चांगला गाडीरस्ता आहे. मग १०० पायर्‍या चढून गेल्यावर आपण घळीशी पोहोचतो. शिवथरघळीची माहिती मिळवता मिळवता मी समर्थ रामदास२ या संकेतस्थळावर जाऊन पोहोचलो. तिथे मला समर्थांची सुरेख ओळख करून देणारे पाच श्लोक मिळाले. ते असेः

श्री.सद्गुरूस्तवन

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे ।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा । । १ । ।

उपदेश ज्याला असे राघवाचा । श्रवणी जसा गूण परिक्षितीचा ।
विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा । । २ । ।

करी कीर्तने नारदासारखाची । कदर्यूपरी शांती ज्याचे सुखाची ।
जया वाटते कांचनू केर जैसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा । । ३ । ।

स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद । चकोरापरी आठवी रामचंद्र ।
रमा सेवी पादांबुजे जाण तैसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा । । ४। ।

पृथुसारिखा अर्चनी वाटताहे । खरा अक्रुराच्यासम वंदिताहे ।
नसे गर्व काही अणुमात्र ऐसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा । । ५ । ।

समर्थांचे यथातथ्य वर्णन करणारे हे पाचही श्लोक सुंदर आहेत. मला तर बेहद्द आवडले. मग प्रश्न हा उभा राहिला की त्यांचा रचयिता कोण असावा? त्यावर मी ई-मेलद्वारे त्या संकेतस्थळाच्या संचालिका सुवर्णा लेले यांनाच विचारून माहिती करून घेतली. त्या श्लोकांची भाषा इतकी मनाच्या श्लोकांसारखी आहे की जणू काय ते स्वतः समर्थांनीच रचलेले असावेत. म्हणून त्यांच्याच निकटच्या कुणी शिष्याने ते लिहीले असावेत अशी अपेक्षा होती. हे सर्व श्लोक वाचण्याआधी मात्र मला केवळ पहिलाच माहीत होता. श्लोकांचा रचयिता उध्दवसुत आहे असे त्यांनी उत्तर दिले. हा उध्दवसुत म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींचा पहिला शिष्य उध्दव आहे असेही सांगितले. मात्र, थोड्याच दिवसांत त्यांनी पुन्हा एकदा मला ई-मेल करून माहिती दिली की, “मी आपल्याला लिहिले होते की समर्थ शिष्य उध्दव या श्लोकांचा रचयिता आहे, पण ते जरा चुकले आहे. शंकर श्रीकृष्ण देव यांच्या, श्री समर्थ अवतार या पुस्तकात असे दिले आहे की हे उध्दवसुत म्हणजे टाकळीचे उध्दव नाहीत. यांची वंशपरंपरा अशी आहे. त्रिंबक-मल्हारी-उध्दव-उध्दवसुत लक्ष्मण अशी. यांची गुरु परंपरा अशी आहे: श्रीसमर्थ-माधव-केशव-उध्दवसुत. यावरून उद्धवसुत १६३० ते १७०० या काळात असावेत. त्यांनी श्री समर्थांचे चरित्र लिहले त्यातील हे श्लोक आहेत. या ग्रंथाचे ५१ अध्याय आहेत व ओवी संख्या चार हजार आहेत. – सौ. सुवर्णा लेले.” पुढे जेव्हा "श्री समर्थ सांप्रदायिक दैनंदिन उपासना" हे पुस्तक शिवथरघळीत गेल्यावर, सुंदरमठ पुस्तकालयातून विकत घेतले तेव्हा खालील आणखीही तीन श्लोक त्यात समाविष्ट असल्याचे आढळून आले, आणि मक्त्यावरून रचयिता “उद्धवसुत” असल्याचेही लक्षात आले.

खरी भक्ति त्या हो जगी मारूतीची । असे रामदासा परी मारूतीची ।
नसे भेद दोघां जळी गार जैसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।। ६ ।।

जये अर्जुनासारिखे सख्य केले । मुळींहूनिया द्वैत निःशेष केले ।
सितानायकू दृढ केला कुवासा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।। ७ ।।

बळीं आत्मनीवेदनी पूर्ण झाला । विदेहीपणे दास तैसा मिळाला ।
म्हणे उद्धवसुत वर्णूं मी कैसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।। ८ ।।

तुझा भाट मी वर्णितो रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया ।।
महाराज दे अंगिंचे वस्त्र आता । बहू जीर्ण झाली देहेबुद्धिकंथा ।।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

शिवथरघळीत, रामदासांचे घळीतील धबधब्याविषयीचे काव्यही एका फलकावर लिहून ठेवलेले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥

तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धूकटे ॥ ३ ॥

दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥

गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥

कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥

- समर्थ रामदास

ह्यावरून, आम्ही तेथे जाऊन पोहोचलो, त्याअर्थी नक्कीच पुण्यवान असलो पाहिजे. तेथे दररोज १२ ते १३:३० प्रसादाची व्यवस्था असते. प्रसादात आम्हाला गरमागरम खिचडी आणि शिरा मिळाला. खिचडी हवी तेवढी देतात. ही व्यवस्था भक्तगणांनी दिलेल्या देणग्यांतून साधली जाते. मग आम्ही परशूरामला निघालो.

लोटे परशुराम या गावाजवळील फाट्यावर परशुरामाचे मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक-१७ वर, मुंबईकडून गोव्याकडे जात असता, चिपळूण या गावाच्या आधी सुमारे ८ किलोमीटर अंतरावर, डाव्या फाट्यावर हे मंदिर आहे. पुढे परशुरामाचे देऊळ व मागे त्यांच्या आईचे, रेणुकादेवीचे मंदिर आहे. जवळच वसिष्ठी नदी आहे व महेंद्र पर्वत आहे. परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करून, ब्राम्हणांना दान दिली. त्यामुळे त्या जागेत स्वतः राहणे उचित नाही असे समजून, स्वत: राहण्यास जागा उरली नाही म्हणून, परशुरामाने समुद्रात बाण मारून कोकणच्या भूमीची निर्मिती केली असे मानले जाते. या भूमीस “अपरांत” असेही म्हणतात. अपर म्हणजे पश्चिम, तिचा अंत असलेली जमीन म्हणून अपरांत. त्यांचेबद्दल असे म्हटले जाते कीः

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं, इदं क्षात्रं, शापादपि शरादपि॥ म्हणजे
मुखोद्गत वेद चारी, चापबाण पाठीवरी । हाच ब्राम्ह, हाच क्षात्र, पुरूष-उत्तम भूवरी ॥

परशुराम मंदिरासमोरच्या कासवाचे हे प्रकाशचित्र आहे. कासव आपले चारही पाय आणि मान व शेपूट असे सहाही अवयव, धोक्याची जाणीव होताच, पोटात ओढून घेते. त्याचे प्रमाणेच, भवसागरात तरायचे तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षड्रिपूंना काबूत आणण्याची कला आत्मसात करण्याचा संदेश, हे गर्भगृहासमोरील कासव भक्तगणांस देत असते. चित्पावन फाऊंडेशन३ या संकेतस्थळावर असे म्हटले आहे की, “मुख्य गाभार्‍यात परशुरामाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला ‘काम’ आणि डाव्या हाताला ‘काळ’ देवाची मूर्ती आहे. काळ आणि काम ह्या दोन्हीवर विजय मिळविणारे परशुराम असा त्याचा आशय आहे”. चिपळूण नगरपरिषद४ या संकेतस्थळावरही परशुरामाची सविस्तर माहिती मिळू शकते. परशुराम मंदिराच्या आसपास पुजेच्या साहित्यची खूप दुकाने आहेत मात्र आश्चर्य या गोष्टीचे वाटले की फुलांचे दुकान एकही नाही. आम्हाला गोवळकोटातील आमच्या कुलदेवतेकरता -करंजेश्वरीकरता- आम्ही फुलांच्या शोधात होतो, कारण तिथेही फुले सहजी मिळत नाहीत अशी माहिती आम्हाला आधीच मिळालेली होती. म्हणून परशूरामला असतांना फुले शोधली. पण इथेही निराशाच पदरी पडली. मग आम्ही गोवळकोटकडे निघालो.

चिपळूण शहराच्या वायव्येस, वसिष्ठी नदीत एक निसर्गसुंदर बेट आहे. त्या बेटावर गोवळकोट किल्ला आहे. किल्ल्यावर देवी करंजेश्वरी आणि देव सोमेश्वर यांचे सुंदर मंदिर आहे. त्यामुळे परशूरामवरून जर करंजेश्वरीस जाऊन मग गुहागरला जायचे असेल तर चिपळूण शहरात जाण्याची गरजच उरत नाही. मंदिराच्या बाजूच्या डोंगरावर गोवळकोटचा बालेकिल्ला आहे. वर दोन तोफा आणि ध्वजस्तंभही आहेत. त्यांचेभोवतीची तटबंदीही भग्नावस्थेत का होईना पण अस्तित्वात आहे. तेथवर, बांधलेल्या चार-पाचशे पायर्‍यांची सुंदर वाट आहे. वरून संपूर्ण वसिष्ठी नदीच्या खोर्‍याचे विहंगम दृश्य नजरेच्या टप्प्यात येते. डावीकडे दिसत आहे गोवळकोटच्या बालेकिल्ल्यावरून काढलेले गोवळकोट गावाचे प्रकाशचित्र. त्याचेखाली देवी करंजेश्वरीची मूर्ती दिसत आहे. वरून काढलेल्या प्रकाशचित्रात, मंदिरसंकुल, मंदिराचा कळस आणि पाठीमागे किल्ल्याखालच्या गावाचा काही भाग दिसत आहे.


ही देवी, चितळ्यांची देवी म्हणूनही ओळखली जाते. ती आमचीही कुलस्वामिनी आहे. दोन खोल्यांचा सुसज्ज भक्त-निवास, विस्तीर्ण आवार आणि हिरवा गार परिसर यांच्या कोंदणातले हे मंदिर प्रेक्षणीय आहे. उद्या गुहागरवरून धोपावे धक्क्यावर जाऊन, वसिष्ठी नदीचे मुख असलेली धोपावे-दाभोळ खाडी ओलांडून, आम्ही दापोलीस जाणार होतो. तो भाग पुढे येईलच.

आता आम्ही गोवळकोटच्या करंजेश्वरीस पोहोचलो होतो. बाजूच्या चित्रात डावीकडे मंदिरसंकुलाचे प्रवेशद्वार दिसत आहे, तर उजवीकडे देवी करंजेश्वरी आणि देव सोमेश्वर यांचे देखणे मंदिर.  संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही गुहागरकडे रवाना झालो.

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारला. नास्ता करून हेदवीच्या गणपतीला गेलो. छोट्याशा हिरव्यागार टेकडीवर वसलेले हे टुमदार मंदिर प्रेक्षणीय तर आहेच मात्र कमालीचे शांत आणि ध्यानधारणेस पोषक आहे. इथे आम्हाला “बामणघळ” या इथून चारपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रालगतच्या ठिकाणाची माहिती मिळाली. आम्ही तिथवर गेलो. तिथे बराच वेळ रमलो, त्यामुळे पुढल्या भरगच्च कार्यक्रमात उशीर-उशीरच होत गेला. हे स्थळ मात्र “नाम बडे दर्शन खोटे” प्रकारचे निघाले. इथेही खूप संदर निसर्गशिल्पे पाहायला मिळतात. तरीही जर पुढे हरिहरेश्वर पाहायचा कार्यक्रम असेल तर, “बामणघळ” पाहिली नाही, तरीही काही बिघडत नाही. हे ज्ञान, अर्थातच आम्हाला दोन्हीही स्थलदर्शने झाल्यानंतरच पदरी पडले. नंतर आम्ही वेळणेश्वरला गेलो. इथल्या किनार्‍यावर समुद्री लाटांत खूप खेळलो. किनार्‍यावरीलच एका उपाहारगृहात जेवलो आणि मग गुहागरच्या दिशेने कुच केले. गुहागरला सामान घेऊन लगेचच धोपावे-धक्क्याकडे रवाना झालो.

धोपावे-दाभोळ (सुमारे १ किलोमीटर रुंदीच्या खाडीतील) फेरी-बोट-सेवेचा उपग्रह-देखावा

सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीची, दापोली आणि दाभोळ तालुक्यांना परस्परांशी जोडणारी फेरीसेवा, ८०-८५ किलो-मीटरचे हे अंतर, धोपावे आणि दाभोळ दरम्यानची एक किलोमीटर खाडी पार करून दहा मिनिटांत संपवते. त्याचप्रमाणे मंडनगड आणि श्रीवर्धन तालुक्यांना परस्परांशी जोडणारी फेरीसेवा, वेसवी-कोलमंडले दरम्यानची एक किलोमीटर खाडी पार करून दहा मिनिटांत संपवते. यामुळे वेळ, पैसा, इंधन आणि मनुष्य-तास वाचवून माणसांचे जीवन सुखी करते. या भागात विहार करणारे आणि आडरस्त्यात अडकून पडणारे पर्यटक, आता वाहनांसकट फेरी बोटीतून सत्वर प्रवास करण्याचा थरारक अनुभव घेत आहेत. सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीचे संकेतस्थळ५ या फेरी-बोट-सेवेची संपूर्ण तपशीलात माहिती पुरवते.

डॉक्टर चंद्रकांत मोकल आणि डॉक्टर योगेश मोकल या दोन द्रष्ट्या माणसांनी “सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड” दापोली नजीकच्या छोट्या शहरात सुरू केली. त्यावेळी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक होते. दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन व्यवसाय करणे त्यांना सहज शक्य होते. त्यांनाही वाहतुकीच्या साधनांअभावी स्थानिक सामान्य माणसांप्रमाणेच खडतर प्रवास करावे लागत. एक किलोमीटर खाडी पार करून जाण्याकरता त्यांना दोन ते तीन तासांचा प्रवास अवघड रस्त्याने करून जावे लागे. म्हणून एके दिवशी त्यांनी दाभोळ येथे फेरी-बोट-सेवा सुरू करण्यात पुढाकार घ्यावा असा निर्णय घेतला. हे काम सोपे नव्हते. मात्र त्यांच्या दृष्टेपणामुळे आणि कामावरील दृढ निष्ठेमुळे हे साध्य झाले. आज तीन वर्षांच्या कालावधीतच वेसवीला, दुसरी अशीच सेवाही सुरू झालेली आहे. शेकडो लोक दररोज या सेवांचा लाभ घेत आहेत.

आता आमची टेंपो ट्रॅव्हलर धोपावे धक्क्यावर जाऊन उभी राहिली खरी पण, त्याचवेळी समोरच्या काचेतून, “सोनिया” नावाची ती फेरी बोट दाभोळच्या किनार्‍याकडे झेपावलेली होती. पुढली फेरी १६०० वाजताची. तीसुद्धा सोनिया परत येईल तेव्हाच. मग तिकीट काढले. चहा पाण्याची सोय पाहावी असा प्रयत्न केला. पण व्यर्थ.

व्यक्ती, प्राणी, पक्षी आणि सामानाची खाडीपार, सत्वर, सुलभ, ने-आण; प्रवासी मार्गदर्शन, तसेच दोन्हीकडच्या धक्क्यांवर प्रवासी निवारे, पेयजल, सुविधागृहे, वीज, तिकिट खिडक्या, प्रथमोपचार, उपाहारगृह, एस.टी.डी.बूथ, वर्तमानपत्रे व नित्योपयोगी सामानाची दुकाने ठेवू असे आश्वासन त्यांच्या संकेतस्थळावर दिलेले आहे. या त्यांच्या आश्वासनांपैकी प्रथमोपचार, उपाहारगृह, एस.टी.डी.बूथ, वर्तमानपत्रे व नित्योपयोगी सामानाची दुकाने या शेवटल्या चार सोयी, आमच्या प्रवासादरम्यान आम्हाला दिसून आल्या नाहीत. इतर सेवा सुरळित आणि व्यवस्थितपणे कार्यरत असल्याने आम्हाला या अद्भूत प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव घेता आला.

धोपावेच्या फलाटाला सोडून मार्गस्थ होताच सोनिया १८० अंशात वळली. तिने फलाट दाभोळच्या किनार्‍याकडे वळवला. मग ती वेगाने वाट चालू लागली. तिच्यात एक मालवाहू ट्रक आणि काही लोक प्रवास करतांना दिसत आहेत.

चारच्या सुमारास सोनिया परतून आली. आम्ही आतुरतेने वाटच पाहत होतो. तिचा फलाट धक्याला लागताच वाहने भराभर बाहेर पडू लागली. काही मिनिटांतच बोट रिकामी झाली. नवी वाहने धक्क्यावर रांगा लावून उभीच होती. ती एक एक करून बोटीत चढू लागली.

मग आमचे वाहन आणि आम्ही, सगळेच बोटीवर स्वार झालो.

दाभोळच्या धक्क्यावर पोहोचताच आम्ही उतरलो. वाहनात स्थानापन्न झालो आणि दापोली मार्गे आसूदची वाट चालू लागलो. आसूदच्या व्याघ्रेश्वर मंदिरात, व्याघ्रेश्वराचे दर्शन घेतले आणि मग आसूद ते बाणकोट प्रवासादरम्यानच्या मुरूड गावात आमच्या बहिणीच्या सासरचे कुलदैवत, श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. ते पाहण्याच्या निमित्ताने आम्ही वाहनातून पायउतार झालो आणि गाडीच्या दारासमोरच आम्हाला महर्षी कर्वेंचा पुतळा दिसला. यथासांग दुर्गेचे दर्शन घेतले. मग समजले असे, की ते गाव तर कर्वे यांचेच मुरूड होते. मनसेच्या संकेतस्थळावरील महर्षी धोंडो केशव कर्वे६ या पानावर त्यांचे संक्षिप्त चरित्र दिलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे स्त्री-शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आणि एका शतकातील सामाजिक व राजकीय घडामोडींचे मूर्तिमंत साक्षीदार होते. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. त्यांना सामाजिक कामाची आवड त्यांचे गुरुजी सोमण मास्तर यांनी लावली. त्यांचे इंग्रजी तीन इयत्तांचे शिक्षण मुरूडला झाले.

पुढील चित्रात दिसते आहे ती त्यांचीच शाळा. त्यापुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या ‘रॉबर्ट मनी हायस्कूल’मध्ये दाखल झाले. पाचव्या, सहाव्या व सातव्या इयत्तेत त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या. शाळेत असल्यापासूनच ते शिकवण्या करीत. त्यांची गणित शिकवण्यात ख्याती होती. १८८४ साली बी.ए.च्या विद्यार्थ्यांत ते गणितात पहिले आले होते. सकाळी साडेचारला त्यांचा शिकवण्याचा कार्यक्रम सुरू होई. घरी आल्यानंतर रात्री ते पत्नी राधाबाईंना शिकवीत. राधाबाईंच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करायचाच तर विधवेशीच करायचा, असे त्यांनी ठरविले. आपले स्नेही नरहरपंत यांची विधवा बहीण गोदूबाई हिच्याशी त्यांनी लग्न केले. या गोदूबाई म्हणजे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील विधवा-विद्यार्थिनी होत.

१८९१ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे सुमारे २३ वर्षे त्यांनी फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचे कार्य केले. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ स्थापन केली. या संस्थेच्या फंडाच्या व्याजाचा उपयोग पुनर्विवाहेच्छू विधवांच्या मदतीसाठी केला जात असे. १ जानेवारी, १८९९ रोजी त्यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात केली. याच संस्थेला पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे.  १९०० साली महर्षी कर्वे यांनी आश्रमासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधले. येथेच त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली. १९०७ साली त्यांनी ‘महिला विद्यालया’ची स्थापना केली. या विद्यालयात बालसंगोपन, आरोग्य, गृहजीवन शास्त्र आदी विषयांचे प्रशिक्षण महिलांना दिले जात होते. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार कर्वे यांनी पुढे शिक्षणपद्धतीत व अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्या. म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं.नेहरू अशा अनेक मान्यवर नेत्यांनी प्रत्यक्ष हिंगणे येथे भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.

१९१४ साली फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सारा वेळ आश्रम आणि महिला विद्यालयाकडे देता येऊ लागला. १९१६ साली त्यांनी जपानच्या धर्तीवर महिला विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ मानले जाते. या विद्यापीठाच्या महाविद्यालयाचे कर्वे हे पहिले प्राचार्य झाले. पुढील वर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्‍या विद्यालयाची त्यात भर पडली. या विद्यापीठाचे पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एस.एन.डी.टी.विद्यापीठ)’ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम मराठी होते. परंतु इंग्रजी या ज्ञानभाषेचे शिक्षण, परिचारिका (नर्स) प्रशिक्षण आदी विशेष अभ्यासक्रमही विद्यापीठात शिकवले जात असत.

खेड्यातील महिलांना शिक्षित  करण्याच्या कार्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे असे ठरवून त्यांनी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ नावाची संस्था उभी केली. समाजामध्ये समता यावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी तीनशे समविचारी सहकार्‍यांना बरोबर घेऊन १९४४ साली ‘समता संघ’ स्थापन केला. स्थापन केलेल्या संस्थांना त्यागी वृत्तीने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते मिळण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते घडवणार्‍या ‘निष्काम कर्म मठ’ या संस्थेची स्थापना सुरुवातीलाच केली होती. अल्बर्ट आइनस्टाइन, मादाम मॉंटेसरी, रवींद्रनाथ टागोर या विद्वानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९४२ साली बनारस हिंदू युनिर्व्हसिटीने त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. १९५८ साली, वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतरत्न ही गौरवास्पद पदवी आहे खरीच. पण ती तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी. महर्षींना ती पदवी देऊन भारत सरकारने त्या पदवीलाच तो मान मिळवून दिलेला आहे असे मला त्यावेळी वाटले. जिवंतपणीच, उत्स्फूर्तपणे पुतळा घडण्याचे भाग्य ज्या काही व्यक्तींना लाभते, तशातीलच एक अलौकिक व्यक्तिमत्व ते होते. त्यांची स्त्री-मुक्तीची चळवळ, सामाजिक उत्थानाची त्यांची आसक्ती आणि शतायुषी संपन्न जीवन जगण्याचे त्यांचे रहस्य या सार्‍यांसाठी ते कायमच वंदनीय आहेत. महर्षी कर्वे यांना महाराष्ट्र ‘अण्णा’ या नावानेही ओळखतो. प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी जगलेले अण्णा सुमारे १०५ वर्षांचे कृतकृत्य जीवन जगले.

सुमारे सहा वाजलेले होते. तिथून आम्ही मग बाणकोटला जाणार होतो. पण गाडीत डिझेल भरायला झालेले होते. पुढला मार्ग घाटाघाटांतून, अरुंद रस्त्यांतून होता. कोकणातल्या दुर्गम भागांतून होता. अशा ठिकाणी डिझेल संपून चालणार नव्हते. भरायचे तर नजीक पेट्रोलपंपही नव्हता. चक्रधरास रस्ता माहितीचा नव्हता. मग परत दापोलीला डिझेल भरून, मग केळशी मार्गे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. रस्ता बरा असला तरीही दिशादर्शक फलकांच्या दौर्भिक्ष्यामुळे रस्ता निश्चित करणे अवघड झालेले होते. वेळ रात्रीची असल्याने प्रत्येक तिठ्या-चौरस्त्यांवर थांबून राहून, मार्गदर्शनाचे उपाय शोधावे लागत. शिवाय, किलोमीटरचे किलोमीटर कुणीही व्यक्ती वा वाहन भेटत नव्हते. पुढे वाटेतले गाव लागल्यावर चौकशी करताच, रस्ता चुकल्याचे समजल्याने मागे फिरावे लागे. असे अनेकदा झाले. सरतेशेवटी ३३ किलोमीटरचे आसूद-बाणकोट अंतर तीन तासात पार करून आम्ही बाणकोटला पोहोचलो, तेव्हा गाडी ८२ किलोमीटर अंतर चालून गेलेली होती. वेशवी-मंडणगड-म्हाप्रळ-आंबेत-तळवडे-कोलमांडले-बागमांडले हे (२८+१७+१+३०+१२+४=९२)७ किमी अंतराचा फेरा वाचवण्याकरता फेरी-बोटीतून बाणकोटची खाडी पार करण्याच्या आमच्या मनसुब्याची अशाप्रकारे वाट लागली.

वाटेत दिवे-आगारच्या “आनंदयात्री” या हॉटेलचे मालक श्री.भाटवडेकर यांनी आम्हाला फोनवर सांगितले की आम्ही मंडणगडमार्गे खाडीभोवती फेरा घेऊन येतो, तर खूपच लवकर पोहोचलो असतो. शिवाय फेरी बोट अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने फेर्‍या करते. अशात, बाणकोटला आम्हाला फेरीची प्रतीक्षा करण्याकरता बराच कालापव्यय होईल अशी शक्यता दिसत होती. निर्जन अंधारातून, खडतर मार्ग शोधत केलेल्या तीन तासांच्या प्रवासाने प्रत्येकाचे अंग आंबून गेलेले होते. कंटाळा येऊ लागला होता. दिवे आगारला पोहोचण्याकरता बाणकोटची खाडी पार केल्यावरही किमान दीड तास लागणार होता. म्हणून आणखी किती उशीर होणार या अनिश्चिततेचे सावट प्रत्येकावर पडलेले होते.

वेशवी-बागमांडले
(सुमारे १ किलोमीटर रुंदीच्या खाडीतील)
फेरी-बोट-सेवेचा उपग्रह-देखावा

मात्र, सर्व काळ सारखाच नसतो याचा प्रत्यय आम्हाला लगेचच आला. वेशवीच्या धक्यावर आम्ही पोहोचलो तर “शांतादुर्गा” ही फेरी-बोट आमच्याच प्रतीक्षेत असल्यासारखी उभी होती. मी तिकिटे काढायला खिडकीवर पोहोचलो. गाडी सरळ फेरीत चढली. बोट सुरूही झाली. मला लवकर येण्याचे भरपूर इशारे होतच होते. मीही तिकिटे हाती पडताच धावत-पळत बोटीचा फलाट चढलो. बोट सुरू झाली. तिने झपकन गिरकी घेतली, पाठी वळून, फलाट बागमांडलेच्या दिशेने वळवून ती जलदीने खाडी आक्रमू लागली. किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल, या प्रश्नावर फारसा विचार करायला वेळही न मिळता, आम्ही मार्गस्थ झालो आणि फेरीतील प्रवासाचा आनंद मनात उतरवेपर्यंत, बागमांडलेच्या धक्यावर पावतेही झालो. दरम्यान बोटीच्या मध्यावर उभे असतांना बोट स्थिर उभी आहे असे वाटे. काठावर जाताच मात्र तिच्या तीव्र वेगाची कल्पना येत होती. शिवाय, डिसेंबरातील थंडीचे झोंबरे गार वारे शरीरात हुडहुडी भरवत होते.

येथून पुढला रस्ता चालक-महाशयांना माहीत असल्याने वेळ वाचला. परंतु याही रस्त्यावर दिशादर्शक पाट्या जवळपास नाहीतच. शिवाय रात्रीची वेळ. म्हणून चालकाच्या माहितीच्या दूरच्याच रस्त्याने जावे लागले. नव्या, किनार्‍यावरील रस्त्याचा वापर करता आला नाही. दुसर्‍या दिवशी मात्र आम्ही किनारी मार्गाचा वापर केला. तो प्रवास अतिशय सुखद असाच झाला. आता मात्र, दीड तासांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर आम्ही दिवे आगारला पोहोचलो. त्यावेळी “आनंदयात्री” हॉटेलच्या श्री.भाटवडेकरांनी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी आमचे हसतमुख स्वागत केले. रात्री अकरा वाजेपर्यंत आमच्याकरता थांबून आम्हाला जेवण दिले. म्हणून, आम्हाला त्या थकव्यातही आनंद झाला.

दुसर्‍या दिवशी हरिहरेश्वर पाहायचे असल्याने, मग आम्ही लगेचच बिछान्यावर अंग झोकून दिले. सकाळी सकाळीच जाग आली तेव्हा प्रसन्न वातावरण होते. बाहेर आलो. तत्परतेने सकाळी सात वाजताच चहा मिळाला. श्री.भाटवडेकर नारळीच्या बागेतून फिरायला जाऊन परततांना दिसले. नास्ता कधी पाठवू विचारू लागले. मी म्हटले ताबडतोब. कारण आम्ही सगळे त्याकरता तयार होतोच. शिवाय, जेवढे लवकर निघू तेवढाच प्रवास सुखकर होतो यावर आमच्यातील सगळ्यांचाच अतुट विश्वास होता. गरम पाणीही सुरू झाल्याची आनंददायक वार्ता त्यांनी दिली. नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्वतोपरी तयार झालो आणि दिवे आगारच्या सुवर्ण-गणपतीच्या दर्शनास गेलो. पर्यटक अजूनही यायचेच होते. आम्हीच प्रथम पोहोचलो होतो. मग, सगळ्यांनी व्यवस्थित बसून अथर्वशीर्ष पठण केले. मग हरिहरेश्वरकडे निघालो. मनात विचार आला की, सुवर्ण मुखवटा, दागिने इत्यादी संपत्ती सुरक्षित ठेवण्याकरता दिवे आगार ही किती सुरक्षित जागा शोधलेली होती तिच्या तत्कालीन मालकाने! दुर्गम आणि अज्ञात!! त्याकाळी तर तेथवर रस्ताही नसेल बरासा!!!

हरिहरेश्वर मंदिरात कालभैरव मंदिरातूनच प्रवेश करावा लागतो. दर्शन घेतले. प्रदक्षिणा सुरू केली. हरिहरेश्वर परिक्रमेचा पहिला भाग आहे मंदिर प्रदक्षिणा, मग मंदिरापाठच्या डोंगराची वनराईने सजलेली चढण, आणि त्यानंतर आहे त्याच डोंगरावरून समुद्रकिनार्‍यावर उतरणारा हा जिना. सुमारे दोनशे पायर्‍या म्हणजेच किमान शंभर फूट उंचीचा हा जिनाही चित्तवेधक आहे. हरिहरेश्वरची प्रकाशचित्रे दाखवतात त्यामध्ये ह्या जिन्याचीच प्रकाशचित्रे सर्वाधिक पाहायला मिळतात. मात्र त्याचे बाजूलाच असलेल्या एका नयनमनोहर शिल्पाची मात्र प्रकाशचित्रे पाहिल्याचे मला आठवत नाही. म्हणून मी मात्र आवर्जून त्याचे एक प्रकाशचित्र काढले. डाव्या बाजूला तेच दिसत आहे. प्रत्यक्षातही ते जिन्याच्या ह्याच बाजूला विराजमान आहे.

काळ्या वालुकाष्माच्या डोंगराचे समुद्राच्या बलदंड लाटांनी, सालोसाल, उत्तरोत्तर क्षरण होत होत, हरिहरेश्वरच्या परिक्रमा मार्गावरील निसर्ग-निर्मित लेण्यांची निर्मिती झाली. अतिशय चित्तवेधक आकार या खडकांमध्ये साकारलेले दिसून येतात. खालचे निसर्गशिल्पही त्यातलेच एक आहे. मात्र, हे सारे आकार पाहण्याकरता समुद्राला ओहोटी असावी लागते. एरव्ही जिन्याच्या तळाचा सर्व भाग जलमय असल्याने परिक्रमामार्ग बंद पडतो. अशावेळी किनारा धोकादायक असतो आणि त्यात उतरणार्‍या पर्य़टकांना सावध करण्याकरता ग्रामपंचायतीने सूचना फलकच लावलेला आहे.

समुद्री लाटांमुळे जलजन्य खडकांच्या कायमच होत राहणार्‍या क्षरणामुळे, ओहोटीत दृश्यमान होणार्‍या खडकांवर, विस्मयकारक निसर्ग(निर्मित)शिल्पे साकारलेली दिसून येतात. बाजूच्या  चित्रातले कोरीव खडक ही त्याचीच उदाहरणे आहेत.

ओहोटीची वेळ कशी ओळखावी याचा एक तक्ताच मला अलिबागच्या किल्यावर जाण्याकरता सोयीच्या वेळा८ या संकेतस्थळावर मिळाला.
अर्थातच अलिबाग आणि हरिहरेश्वर यांच्या भरती-ओहोटीच्या वेळा एकच आहेत या गृहितकावर हे आधारलेले आहे.  सोयीच्या वेळा पुढील सारणीत दिलेल्या आहेत. ज्या दिवशी जायचे त्या दिवशी कोणती तिथी आहे, हे आधी कालनिर्णयमधून पाहून घ्यावे. मग सारणीनुसार सोयीची वेळ काढून, त्यानुसार सहल ठरवावी. ही माहिती महाजालावरील वर दिलेल्या दुव्यावरून २०१०१११४ रोजी उपलब्ध झालेली होती. आम्ही मात्र हे सारे न पाहताच गेलेलो होतो. आमच्या पुण्याईने आम्ही गेलो त्या दिवशी, म्हणजे रविवार दिनांक १२-१२-२०१० रोजी मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी होती. सकाळी ०९०० ते १२०० सोयीची वेळ होती आणि आम्ही दिवे आगारहून हरिहरेश्वरला सकाळी १००० च्या सुमारासच पोहोचलो होतो. आमचे भाग्यच थोर होते. एरव्ही आम्ही हरिहरेश्वरच्या अद्वितीय परिक्रमेस मुकलोच असतो.

समुद्री लाटांमुळे जलजन्य खडकांच्या कायमच होत राहणार्‍या क्षरणामुळे, ओहोटीत दृश्यमान होणार्‍या खडकांवर, विस्मयकारक निसर्ग(निर्मित)शिल्पे साकारलेली दिसून येतात. बाजूच्या चित्रातले “विष्णूपद्म” आणि उजव्या बाजूचा कोरीव खडक ही त्याचीच उदाहरणे आहेत.

हरिहरेश्वरहून आम्ही दोनच्या सुमारास दिवे आगारला परतलो. उकडीच्या मोदकांचे जेवण वाटच पाहत होते. जेवलो. पावणे तीनच्या सुमारास निघून साडेसातच्या सुमारास डोंबिवलीस पावते झालो. एवढी समाधानकारक सहल सुफळ संपूर्ण झाल्यावर, कळले ते इतकेच की कोकणात जाणून घेण्यासारखे खूप काही आहे. आमच्या तीन दिवसांच्या सहलीस लोक दहा दिवसांची सहल का म्हणत आहेत, तेही समजले. मला मात्र तीच सहल महिन्याची करावी अशी इच्छा होऊ लागली. सहप्रवाशांची इच्छाही काही निराळी नव्हती. मात्र, दैनंदिन जीवनात उत्साह, हुरूप, आणि आनंद भरण्याचे काम आमच्या याही सहलीने यथासांग पार पाडलेलेच होते. परशुरामाची ही कोकणभूमी बारकाईने अनुभवावी, ह्याकरता ईश्वर आम्हाला पुन्हा संधी देवो हीच प्रार्थना!

http://trekshitiz.com/MII/MI_DefaultUser.asp?SearchValue=S&FortName=Shivtharghal&SearchChoice=Alpha
http://samartharamdas1.blogspot.com/2010_06_20_archive.html
http://chitpavanfoundation.org/Chitpavans/Parshuram_mandir.htm
http://www.cmcchiplun.org/html/tourism_4.htm
http://suvarnadurgashipping.com/service_destinations.htm
http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=5&id=761
७ ही अंतरे, हरिहरेश्वरला दुसरे दिवशी आम्ही विकत घेतलेल्या “साद सागराची-श्रीवर्धन-हरिहरेश्वर-दिवे आगार” ह्या पुस्तकातून घेतलेली आहेत. श्री.पराग पिंपळे यांनी लिहीलेले हे पुस्तक खूपच माहितीपूर्ण वाटले. कोकणसहलीचे कोणतेही नियोजन करण्यापूर्वी यावर नजर टाकल्यास अर्थपूर्ण मार्ग सापडतील असे वाटते. सप्टेंबर २००६ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तिकेची ही ऑगस्ट-२०१० मधली २३ वी आवृत्ती होती. किंमतः रु.५०/-फक्त. बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे ने प्रकाशित केलेल्या एकूण सहा पुस्तिकांच्या संचातील ही एक आहे.
http://www.onesmartclick.com/alibag/alibag-temples-forts.html

http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Comments

स्वागत!!

बापरे! गोळेकाका, तुम्ही एका लेखात इतिहास, भूगोल, प्रवास, समाजशास्त्र सर्व टाकलंय. लेखाची लांबी बघून सध्या लेख अर्धवट वाचला. टप्प्या टप्प्याने पूर्ण करेन. तूर्तास उपक्रमावर स्वागत आणि लेख आणि माहिती आवडली.

बायदवे, तुमची देवी कोकणातली कशी? "गोळे" गोव्याकडले ना?

फोटो आवडले

माहिती बघून पोटात 'गोळा' आला.
पण फोटो पाहिले अन् ते आवडले.
तुम्ही डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ ला फिरायला गेलात. आणि एवढं सगळं आल्यावर लिहीले? सगळे छान आहे. पण तुम्ही एवढा सगळा प्रवास रिलॅक्स होवून कसा काय इंजॉय केला?

लेख आवडला.

लेख आवडला. असेच पर्यटन करा व आम्हाला बसल्याजागी पर्यटक बनण्याची संधी द्या. एक नम्र सूचना करावीशी वाटते. प्रवास वर्णन लिहिताना भूतकालात न लिहिताना वर्तमानकालात लिहिले तर जास्त रोचक वाटते असे माझे मत. बघा जमते का पुढच्या प्रवास वर्णनात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शिवथर घळ

शिवथर घळ ही १९३० साली सापडली (परत) हा उल्लेख वाचला.
मला कोणीतरी सांगितले की अशा शिवथरघळी बर्‍याच आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी (सातारा जिल्ह्यात एक आहे असा तो उल्लेख होता.) हीच ती दासबोधाची शिवथरघळ असे दाखवण्यात येते.

मजकूर आणि छायाचित्रे आवडली.
विशेषतः फेरीची माहिती आवडली.
प्रमोद

सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

प्रियाली, रावलेसाहेब, चंद्राशेखर आणि प्रमोदजी सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

प्रियाली,
इतिहास, भूगोल, समाजशास्त्र ही शीर्षके मी खरोखरीच निवडलेली आहेत काय ते वर जाऊन पुन्हा पाहून आलो. पण नव्हती निवडलेली!
विषयात तसे काही ओघाओघात आलेले असेल तर तो दोष समजावा काय?

रावलेसाहेब,
उपक्रमावर यावं अशी मला इच्छा झाली खरी! मात्र कुणाच्या "पोटात" येण्याची इच्छा खरेच नव्हती हो!

चंद्रशेखरजी,
भूतकालात न लिहिताना वर्तमानकालात लिहिले तर जास्त रोचक वाटते>>> हे कसे काय साधायचे, ते काही नीटसे समजले नाही.

प्रमोदजी,
सातारा जिल्ह्यात सज्जनगड आहे. तिथल्या शिवथरघळीबाबत मला तरी माहिती नाही.

वर्तमानकालातील लेखन

मी लिहिलेली हे किंवा हे ब्लॉगपोस्ट चाळलेत तर मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात येऊ शकेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

त्यातील एखादे चित्र माझ्या "सृजनशोध" ह्या ब्लॉगसाठी द्याल का?

चंद्रशेखरजी मी तुमचे ते दोन्हीही लेख वाचले. आवडले.

मला त्या लेखांतील एक/दोन चित्रे माझ्या "सृजनशोध" ह्या ब्लॉगवर ठेवण्याकरता देऊ शकाल का?

व्य. नि.

व्य.नि. करून ई-मेल पत्ता व कोणते फोटो हवे आहेत ते कळवलेत तर फोटो पाठवू शकेन.
चन्द्रशेखर

"गळा आवळणारे झाड" हवे आहे!

"गळा आवळणारे झाड" हवे आहे!

विरोपपत्ता तुमच्या अनुदिनीवरील प्रतिसादात दिलेला आहे.

देकाराखातर मनःपूर्वक धन्यवाद.

दोष कसला?

इतिहास, भूगोल, समाजशास्त्र ही शीर्षके मी खरोखरीच निवडलेली आहेत काय ते वर जाऊन पुन्हा पाहून आलो. पण नव्हती निवडलेली!
विषयात तसे काही ओघाओघात आलेले असेल तर तो दोष समजावा काय?

गोळेकाका, दोष नाही. माहितीपूर्ण लेख आहे, ओघाओघात तुम्ही खूप रोचक माहिती दिलीत परंतु सर्व एकत्र झाल्याने कुठे पाहू आणि कुठे नको असे झाले. लेख टप्प्याटप्प्याने किंवा भागांमध्ये लिहिला असता तर अधिक आवडले असते. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले.

अगदी असेच

माहितीपूर्ण लेख आहे, ओघाओघात तुम्ही खूप रोचक माहिती दिलीत परंतु सर्व एकत्र झाल्याने कुठे पाहू आणि कुठे नको असे झाले.

अगदी असेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद प्रियाली. धन्यवाद धम्मकलाडू.

धन्यवाद प्रियाली. धन्यवाद धम्मकलाडू.

 
^ वर