देशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण

"भारताच्या भरभराटीला ओहोटी.समृद्धिनिर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 88 वा." हे वृत्त दि.1नोव्हेंबर 2010 च्या दै.सकाळ मधे वाचले. संदर्भ(द लिगॅटम प्रोस्पेरिटी इंडेक्स)पाहिला.क्रमानुसार पहिले पंधरा समृद्ध देश असे:(संदर्भ१)
1.नॉर्वे 2.डेन्मार्क 3.फिनलंड
4.ऑस्ट्रेलिया 5.न्यूझीलंड 6.स्वीडन
7. कॅनडा 8.स्वित्झर्लंड 9.नेदरलॅंड
10.अमेरिका 11.आयर्लंड 12. आईसलॅंड
13.इंग्लंड 14. ऑस्ट्रिया 15.जर्मनी.
तसेच इतर काही:
.......58.चीन59.श्रीलंका 88.भारत 91. नेपाळ 96. बांगलादेश 109.पाक. शेवटी 110.झिबाब्वे
******************************************
नंतर जागतिक नास्तिकता या विषयाचा शोध घेतला.त्यात देशातील लोकसंख्येत नास्तिकांच्या प्रमाणानुसार पन्नास देशांची सूची आहे.संदर्भ२ (वर्ल्ड् वाईड इथीझम ट्रेन्ड &पॅटर्न). त्यांतील पहिले दहा देश आणि प्रत्येक देशातील नास्तिकांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण असे:
1.स्विडन...85% 2.डेन्मार्क...80% ३. नॉर्वे...72% 4. फिनलंड....60% 5.जर्मनी...49%
6.इंग्लंड....44% 7.नेदरलंड...44% 8. कॅनडा...30% 9.स्वित्झरलंड....27% 10.ऑस्ट्रिया..25%
शेवटी 50.क्रोएशिया...7%
या सूचीत भारताचे नाव नाही. कारण नास्तिकांचे प्रमाण नगण्य असावे.(<७%)
******************************
विश्लेषण:
* ही सर्वेक्षणे विश्वासार्ह असावी. कारण संबंधित संस्था अनेक वर्षे हे काम करीत आहेत.
* समृद्धी निर्देशांकाचे सर्वेक्षण या वर्षीचे (२०१०) आहे. नास्तिकांविषयीचे २००५ चे आहे.
*नास्तिकांच्या प्रमाणानुसार क्रमांक असलेले पहिले दहा देश हे सर्वच्या सर्व पहिल्या पंधरा समृद्ध देशांत आहेत.
*अमेरिकेचा एकमेव अपवाद वगळता पहिल्या पंधरांतील प्रत्येक समृद्ध देशांत नास्तिकांचे प्रमाण 25% हून अधिक आहे.
*या सर्वेक्षणांवरून सर्वसाधारणपणे पुढील पैकी एक निष्कर्ष निघतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
१.देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढले तर त्या देशाची समृद्धी वाढते.
२.देशाची समृद्धी वाढली की त्या देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढते.
*कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार केला तर वरील निष्कर्ष क्र.१ अधिक पटतो. कारण नास्तिक विचारसरणी वास्तववादी आणि व्यवहारी असते.ती ऐहिक प्रगतीस पोषक ठरते.देव धर्माच्या कर्मकांडांत लोकांचा वेळ,श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कमी होतो.भ्रामक कल्पनांवर आधारित असलेल्या अनुत्पादक व्यवसायांना आळा बसतो.
*देशाच्या समृद्धीवर परिणाम करणारे अन्य अनेक घटक आहेत.जसे नैसर्गिक साधन संपत्ती, भौगोलिक स्थान, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक तसेच मनुष्यनिर्मित उत्पात, विध्वंस इ.अनेक..तरी सुद्धा वरील निष्कर्षामागे निरीक्षणांचे पुरेसे पाठबळ आहे असे वाटते.
* निरीक्षणांवरून जे दिसते ते लिहिले. त्यात त्रुटी आणि दोष असणे शक्य आहे.
* विश्लेषणात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसावा. आढळल्यास निदर्शनाला आणावा.
* पूर्वी अशा प्रकारचे काही कोणीतरी लिहिले होते ते वाचलेले आठवते.आलेख काढला होता. संदर्भ सापडत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

ऐतिहासिक सामग्रीवरून पर्याय २ अधिक पटतो

१.देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढले तर त्या देशाची समृद्धी वाढते.
२.देशाची समृद्धी वाढली की त्या देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढते.
*कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार केला तर वरील निष्कर्ष क्र.१ अधिक पटतो. कारण नास्तिक विचारसरणी वास्तववादी आणि व्यवहारी असते.ती ऐहिक प्रगतीस पोषक ठरते.देव धर्माच्या कर्मकांडांत लोकांचा वेळ,श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कमी होतो.भ्रामक कल्पनांवर आधारित असलेल्या अनुत्पादक व्यवसायांना आळा बसतो.

ऐतिहासिक सामग्रीवरून पर्याय २ अधिक पटतो.

बाकी "कार्यकारणभाव" म्हणजे काहीतरी ढोबळ अर्थ रोजव्यवहारात मला माहीत आहे. (यात कारणप्रक्रिया कार्यप्रक्रियेच्या आधी असते, असा काही ढोबळ अर्थ आहे. शिवाय रोजव्यवहारात "संकल्प/हेतू" असला, "प्रयास" असला, तर अर्थ अधिक नि:संदिग्ध असतो.) चर्चाप्रस्तावात जे आकडेशास्त्रीय विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे, त्या संदर्भात "कार्यकारणभाव" शब्दाचा अर्थ मला माहीत नाही.

समजा "कार्याच्या आधी कारण असते" असे काही कामचलाऊ तत्त्व मानले (आवश्यक आहे, पुरेसे आहे की नाही हे सांगता येत नाही), तर ऐतिहासिक साधनसामग्री पडताळता यावी. नास्तिक लोकांचे प्रमाण आधी वाढले, की समृद्धी आधी वाढली याबाबत वरील देशांचे आकडे मिळवता येतील. आता ही दोन्ही प्रमाणे गेली कित्येक दशके/शतके वाढतच आहेत, त्यामुळे "आधी-नंतर" बाबतीत व्याख्येचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी नास्तिकांचे प्रमाण आधी "फोफावले" की समृद्धीचे प्रमाण आधी "फोफावले" असे काही बघता येईल.

युरोपियन देशांची समृद्धी गेली काही शतके चालू आहे (काही शतकांपूर्वी "फोफावली") तर जनसामान्यांत नास्तिकांचे प्रमाण विसाव्या शतकातच, त्यातल्या त्यात उत्तरार्धात "फोफावले" अशी माझी कल्पना आहे. (संदर्भ नाही.) म्हणून पर्याय २ मला अधिक पटतो.

जर या आकड्यांनी पर्याय २ला पुष्टी मिळत असेल, तर श्री. यनावाला यांनी पर्याय १ पटण्यासाठी दिलेले मुद्दे विचारात घेण्याची फारशी गरज नाही.

- - -

श्री. रिकामटेकडा यांनी पूर्वी म्हटलेले आहे (श्री. यनावाला यांनी नव्हे) की "कोरिलेशन इम्प्लाइझ कॉझेशन". हे तत्त्व मला फारसे उपयोगी वाटत नाही, आणि उगाच शब्दाला शब्द वाढवल्यासारखे वाटते. (कोरिलेशन आणि कॉझेशन हे दोन शब्द/संकल्पना काय म्हणून वापरलेल्या आहेत - ऑकमच्या वस्तर्‍याने पैकी एक शब्द/संकल्पना कातरून टाकणे आवश्यक आहे ना?)

नाहीतरी "ऑकमचा वस्तरा" म्हणजे ते जे काय म्हणतात ते मला नीट समजलेले नाही. "कन्फाउंडिंग" या प्रकाराचा अभ्यास आणि गणिती विश्लेषण मोठ्या प्रमाणात झाले आहे - मी स्वतः या संकल्पनेचा उपयोग करून ऑकमच्या वस्तर्‍याचा कुठलाही आडथळा न होता बरेच विश्लेषण केलेले आहे. वर श्री. आरागॉर्न यांना "ऑकॅमच्या वस्तर्‍याने तिसरा पर्याय नाकारला जातो" असे श्री. रिकामटेकडा म्हणतात, त्यामुळे बुचकळ्यात पडलेलो आहे. - हे सर्व श्री. यनावाला यांनी म्हटलेले नाही, हे तर आलेच.

(ऑकमचा वस्तरा फक्त "नेस्टेड मॉडेल"च्या बाबतीतच पूर्णपणे स्पष्ट असतो. वगैरे. पण या मूलभूत मुद्द्याची चर्चा अन्यत्र व्हावी. मी तरी ती इथे करणार नाही.)

समृद्धी की समता?

कार्ल सेगनने दिले आहे की कुंग आदिवासींना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्याशिवाय जगताच येत नाही. उलट, गेल्या २-३ दशकांत भारतात सुबत्ता आणि धार्मिकता हे दोन्ही वाढलेले आहेत. मला वाटते की धर्म या संस्थेच्या पोषणासाठी मुळात सत्ता या दुसर्‍या संस्थेची आवश्यकता असते. समाजात विषमता वाढली की धर्म वाढतो (कम्युनिजम हाही धर्मच ;) ) असा नियम सापडतो काय?

अमेरिकेचा अपवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक यांनी अमेरिकेच्या अपवादासंदर्भात जे लिहिले आहे ते तसे पटण्यासारखे नाही.तिथे स्थलांतरित झालेले भारतीय देवदर्शनाच्या रांगेत तासन् तास घालवत नाहीत.मृताच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिष्ठत नाहीत.धार्मिक सणांच्या भरमसाठ सुट्ट्या नाहीत.तिथे पैसे मिळवायचे तर काम करावेच लागते (असे ऐकतो/वाचतो).
समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण या संदर्भात अमेरिकेचा अपवाद असला तरी प्रस्तावातील सर्वसाधारण अनुमानाला बाधा पोचत नाही.

एक विनोद

समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण या संदर्भात अमेरिकेचा अपवाद असला तरी प्रस्तावातील सर्वसाधारण अनुमानाला बाधा पोचत नाही.

अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्याबद्दल कोणीतरी म्हणाले "एक व्हिएटनामचा अपवाद वगळला तर त्यांची कारकीर्द अतिशय चांगली होती." त्यावर जॉन केनेथ गालब्रेथ म्हणाले "हे म्हणजे आल्प्सच्या पर्वतरांगा वगळल्या तर स्विट्झर्लंड सपाट देश आहे असे म्हणण्यासारखे आहे."

हशा अणि टाळ्या :)

हशा अणि टाळ्या :)

अमेरिका हे हिंदुराष्ट्र

वरील प्रतिसादाचा अर्थ मला कुणीतरी समजावून सांगावा कारण त्यातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले लोक आस्तिक नाहीत हे कसे सिद्ध होते बरें? परंतु प्रतिसाद वाचून अमेरिका हिंदुराष्ट्र तर नाही ना झाले असा प्रश्न पडला. ;-)

तिथे स्थलांतरित झालेले भारतीय देवदर्शनाच्या रांगेत तासन् तास घालवत नाहीत.

कसे करतील? देवदर्शन म्हणजे वर्षातून एकदा येणारा ब्लॅक फ्रायडे आहे काय? अमेरिकेचे हवामान असे नाही की तिथे देवदर्शनासाठी रांगा लावाव्या. दुसरे असे की बिच्चारी अमेरिका आहे प्रचंड देश. तिथे लोकसंख्या कमी आणि जमीन मुबलक. आमच्या ४-५००० भारतीयांच्या शहरात, ५०० माणसे हातपाय पसरून कवायत करतील एवढे मोठे देऊळ आहे तर कशाला बरे रांगा लावाव्या.

मृताच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिष्ठत नाहीत.

कावळ्यांचा नाइलाज आहे. एकतर अमेरिकेत कावळे कमी. त्यातून थंडीत ते स्थलांतर करतात त्यामुळे लोक तिष्ठत राहिले तरीही कावळे बिचारे त्यांच्यावर उपकार करू शकत नाहीत. :-) त्यामुळे कावळ्यांना इथल्या भारतीयांनी सूट दिली आहे. ;-)

धार्मिक सणांच्या भरमसाठ सुट्ट्या नाहीत.

दिवाळीची नाही खरे. काळेकाका अमेरिकन राष्ट्रपतींना पत्र पाठवून काही मागण्या करतील का? बाकी, अमेरिकेतले अल्पसंख्यांक ख्रिसमस नावाचा सण साजरा करतात तेव्हा शाळा, कॉलेजे आणि काही हापिसे चांगली दोन आठवडे बंद असतात. अर्थात, त्याचे कारण धार्मिक आहे असे नाही.

अपेक्षित

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रस्तावाशी संबंधित दोन सर्वेक्षणांतून दिसणारा (निदर्शनाला आणून दिलेला) देशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण यांच्यातील संबंध अनपेक्षित नाहीच. त्याचे समर्थनही करता येते. किंबहुना सर्वेक्षणांचा विदा नसताना केवळ तर्काने सुद्धा निर्देशित संबंधापर्यंत पोचता येते. सर्वेक्षणांतील आकडेवारीने त्याला पुष्टी मिळते एव्हढेच.
* तसेच या प्रस्तावावर आलेले काही सदस्यांचे प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच आहेत.

:)

आय रेस्ट माय केस. :)

* तसेच या प्रस्तावावर आलेले काही सदस्यांचे प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच आहेत.

ग्राहकांचा संतोष हेच आमचे ध्येय. :)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

परस्परसंबंध

यनांचा वरला प्रतिसाद आणि कल्याणकरांचा हा प्रतिसाद यांत मला "कोरिलेशन" दिसून आले. :-)

या दोन्ही प्रतिसादांतून बर्‍यापैकी निष्कर्षही काढता येतो आणि त्याचे समर्थनही करता येते. किंबहुना सर्वेक्षणाचा विदा नसताना केवळ तर्काने आणि अनुभवाने निर्देशित संबंधापर्यंत पोहोचता येईल. अर्थात तो निष्कर्ष मी येथे मांडत नाही कारण तो व्यक्तिगत होईल.

कार्यकारणभाव

मूळ लेख वाचला. (म्हणजे झुकरमनचं पुस्तक नाही, त्याचा सारांश असलेला, दुव्यातला लेख). त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं स्पष्ट झाली नाहीत.

१. हे नास्तिकांचं प्रमाण कसं काय काढलं? कारण कुठच्यातरी देशात ८५% नास्तिक आहेत हे खरं वाटत नाही, व त्याच मोजपट्टीने भारतात ७% पेक्षा कमी नास्तिक आहेत यावरही विश्वास बसत नाही. कधीकधी नक्की काय प्रश्न विचारले जातात याने फरक पडतो. (लेखात पक्के आस्तिक नाहीत ते नास्तिक असा खुलासा दिसतो...)
२. आस्तिकता व नास्तिकता या दोन काळ्यापांढऱ्या गोष्टी आहेत हीही संकल्पना बरोबर वाटत नाही. जनतेचं बायपोलर डिस्ट्रिब्यूशन नसून कंटिन्युअस स्केलवर कुठेतरी मध्ये टोक असलेलं डिस्ट्रिब्यूशन असावं असं वाटतं. अशा थोड्याफार फरकाच्या डिस्ट्रिब्यूशनवर कुठेतरी रेषा आखण्याने खूप त्रुटी येऊ शकेल असंही वाटतं.

पण हे दोन्ही प्रश्न झुकरमनचं पुस्तक वाचल्याशिवाय सुटणार नाहीत.

३. मूळ लेखात एक आलेख आहे. य अक्षावर 'धर्म महत्त्वाचा आहे' असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी व क्ष अक्षावर दरडोई उत्पन्न आहे. (त्यातली देशवार लोक विभागण्याची व पर्चेसिंग पॉवर पॅरिटी न घेता डॉलरमध्ये कन्व्हर्ट करण्याची आक्षेपार्ह पद्धत बाजूला ठेवू.) जे देश (लोक) श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी पैशातून येणाऱ्या अधिक स्वातंत्र्यातून येणारे मुद्दे महत्त्वाचे असू शकतील. त्यामुळे धर्माला ते महत्त्व कमी देत असतील. ज्यांना ती स्वातंत्र्यं नाहीत त्यांच्यासाठी सापेक्षतेने धर्माचं महत्त्व अधिक असू शकेल. यामागे अधार्मिकतेमुळे अधिक श्रीमंती (वा प्रगती) ऐवजी श्रीमंतीमुळे धार्मिकतेकडे कमी सापेक्ष लक्ष अशी कारणपरंपरा असू शकेल. कदाचित गरिबी, अज्ञान व अनारोग्य यांमुळे धार्मिकता/अंधश्रद्धा वाढत असेल. म्हणून मला या लेखातल्या कोरिलेशनवरून कार्यकारणभावावर मारलेली उडी पटली नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मनुष्य-तासांचा प्रमाणाबाहेर अपव्यय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
देशाची समृद्धी कशामुळे वाढते? अनेक घटक आहेत हे मान्य.नैसर्गिक साधन संपत्ती हा महत्त्वाचा घटक आहेच. पण जागाच्या पाठीवरील ११० देशांची पाहाणी केली आहे. त्यामुळे ज्या ज्या देशात नास्तिकांचे प्रमाण अधिक तेथे तेथे नैसर्गिक संपत्तीचे वैपुल्य असे असू शकत नाही. हे कॉमनसेन्सने कळते."देशातील माणसांनी केलेले शारीरिक आणि बौद्धिक श्रम."हा देशाच्या समृद्धीनिर्मितीचा एक महत्त्वाचा घटक आहे. हा घटक देशातील माणसांच्या विचारसरणी अनुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतो.
आपल्या कडील (नस्तिक<८%) परिस्थिती काय आहे? काम करण्याचा उत्साह टिकण्यासाठी मनोरंजन,करमणूक हवी. त्यासाठी सामुदायिक सण,सुदिन, उत्सव साजरे करायला हवेत.आवडीच्या गोष्टी करायला हव्यात हे खरे. पण आपल्याकडे हे प्रमाणाबाहेर फारच होत आहे.तसेच हेतू करमणुकीचा नसून देवकृपेतून इच्छापूर्तीचा असतो.धार्मिक उत्सव किती आणि कसे होतात ते सर्वविदित आहे.यादी आवश्यक नाही. "यहां नित नित मेले लगते हैं| नित ढोल और ताशे बजते हैं|" असे काहीसे एका गाण्यात आहे ते सत्य आहे. बालाजी दर्शनाच्या २४x३६५ रांगा, सिद्धिविनायका पुढील नित्य आणि नैमित्तिक भक्तांच्या दशसहस्री रांगा,अनेक मंदिरे लांबच लांब रांगा. यांत किती मनुष्यतासांचा अपव्यय होत असेल याचा विचार करावा. समृद्धिनिर्मितीवर याचा परिणाम होत नसावा काय? वास्तविक ,व्यावहारिक,अनुभवाधारित विचार करावा.उगीच सिद्धांतात जाणे उपयोगी नाही. धादान्तात असावे असे मला वाटते.(विचारसरणींच्या परिणामाविषयी लिहायचे विस्तारभयास्तव टाळतो.)

+१

या प्रतिसादातील विचारांशी पूर्ण सहमत.

चन्द्रशेखर

नास्तिकतेतून समृद्धी!

माझ्या मते नास्तिकता व राष्ट्राची समृद्धी यांचे प्रत्यक्ष नाते नसले तरी अप्रत्यक्षपणे नास्तिकसमाज राष्ट्राच्या समृद्धीत नक्कीच भर घालू शकतो. नास्तिक ईश्वराचे अस्तित्व नाकारत असल्यामुळे तो आपोआपच ईश्वराशी संबंधित सर्व व्यवहारांना नाकारत असतो. ईश्वराशी घनिष्ट नाते सांगणाऱ्या धर्माचा व धार्मिक व्यवहारांनासुद्धा त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थान नसते हे ओघानेच आले. एखाद्या लोकशाही राष्ट्रात नास्तिकांचे बहुमत वा त्यांचा दबाव असल्यास तेथील कायदे कानून व त्यांची अंमलबजावणी धर्म निरपेक्षतेला वाव देणारे असतात. त्यामुळे धर्मव्यवहारासाठी खर्च होणारा पैसा आपोआपच मूलभूत सोई-सुविधा व विकास कामावर खर्ची घातला जातो. लोकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढीस लागते व त्यांच्या श्रमाचे चीज होऊ शकते. त्यामुळे अशा राष्ट्रातील समृद्धी तुलनेने नक्कीच जास्त असते.

धर्मव्यवहार व त्यावरील (वृथा) खर्च हा आस्तिकसमाजाचा स्थायीभाव आहे. या धर्मव्यवहारामुळे श्रम, वेळ व पैशाची उधळपट्टी होत आहे व ईश्वर व धर्माच्या नावाने होत असलेली ही उधळपट्टी अक्षम्य आहे. 2001 सालच्या एका आकडेवारीनुसार आपल्या या महान देशात 24 लाख लहान-मोठी अशी देऊळे होती. यासंख्येत आजमितीस आणखी भर पडली असेल. एका अभ्यासानुसार डाव्यापक्षाच्या पश्चिम बंगाल या राज्यात प्रती माणशी दर वर्षी सुमारे दोन हजार रुपये (पूजा पाठ, उत्सवासाठी देणगी, धार्मिकस्थळांना गुरू - बाबांना भेट यासाठी) खर्च होतात. याचाच अर्थ,10 कोटी लोकसंख्येच्या या राज्यात सुमारे 20 हजार कोटी रुपये अनुत्पादक कार्यासाठी दरवर्षी खर्च होत आहेत. हा खर्चाचा आकडा इतर राज्यात नक्कीच जास्त असू शकेल. जर हाच पैसा मूलभूत सुविधा व विकास कामासाठी वापरता आल्यास आपल्याही राष्ट्राची गणना समृद्धराष्ट्रांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आला असता.

मग

मग आपल्या म्हणण्याप्रमाणे नास्तिक लोक जास्त प्रगतीशील असतात व ते वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करत नाहीत, आणि देव-धर्म ह्यावर खर्च होणारा पैसा वाचला तर हे नास्तिक लोक त्याचा उपयोग समाज कामांसाठी करतील किवा राष्ट्र समृद्ध करण्यासाठी करतील. असेच म्हणायचे आहे का आपणास?

आणि हो, समृद्धची व्याख्या करा अन्यथा धर्मीक कृसेड्स चालवणारे युरोप देखील समृद्धच होते किवा सौदी देखील समृद्धच आहे. आपले विचार श्रम आणि पैसा ह्याकडे झुकणारे जास्त आहेत, विवेक, कष्टाळूपणा, हुशारी ह्यांचा संबंध आपण जोडलेला नाही म्हणून व्याख्या विचारतो आहे.

कष्टाळूपणा, हुशारी

समृद्धीचे सर्वेक्षण करताना जी व्याख्या वापरली असेल ती योग्य आहे असे assume करून प्रतिसाद दिला होता.

आस्तिक व नास्तिक या दोघांच्याकडेही समान प्रमाणात कष्टाळूपणा, हुशारी असू शकते. त्याचप्रमाणे दोन्ही गट वेळ, श्रम व पैशाचा अपव्यय करतात असे assume केले तरी नास्तिकांची संख्या तुलनेने फार कमी आहे. परंतु आस्तिकांच्या धार्मिक व्यवहारामुळे देश समृद्ध होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे तार्किकपणे विचार केल्यास आस्तिकांनी धर्म व ईश्वर यांना (काही काळ तरी!) आपल्या आयुष्यातून रजा द्यावी असे वाटते.
धार्मीक कृसेड्स चालवणारे युरोप देखील समृद्धच होते किवा सौदी देखील समृद्धच आहे.

या समृद्धीची कारणे अत्यंत वेगळी आहेत, हे वेगळे सांगायला नको. धार्मिक कृसेड्सच्या मागे सामान्यांना भीती दाखवून लुबाडणे व सौदी देशातील समृद्धी तेलाच्या पैशावर पोसलेली आहे. आपल्या देशाचाच विचार केल्यास आताच्या परिस्थितीत धर्मव्यवहारातील पैसा विकासासाठी हवा आहे.

काही अंशी सहमत

काही अंशी सहमत.

>>परंतु आस्तिकांच्या धार्मिक व्यवहारामुळे देश समृद्ध होण्यास अडथळे येत आहेत.

हि अतिशयोक्ती आहे असे मला वाटते, पण अगदीच तांत्रिकपणे बघितल्यास २ गोष्टी असू शकतात

१. हुशार आणि कष्टाळू अस्तिकांच्या व्यक्तिगत/सार्वजनिक धार्मिक व्यवहारामुळे वेळ, श्रम व पैशाचा अपव्यय होऊ शकतो व तो राष्ट्राच्या प्रगतीस मारक आहे.

२. हुशार आणि कष्टाळू अस्तिकांच्या व्यक्तिगत/सार्वजनिक धार्मिक व्यवहारामुळे त्यांची समाधानता जास्त असू शकते व ते उरलेल्या वेळात राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करू शकतात, असे न केल्यास त्यांच्या समाधानतेवर परिणाम होऊन त्यांच्या इतर कामात देखील त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

>>या समृद्धीची कारणे अत्यंत वेगळी आहेत, हे वेगळे सांगायला नको. धार्मिक कृसेड्सच्या मागे सामान्यांना भीती दाखवून लुबाडणे

समृद्धीचे संबंध धार्मिकतेशी लावला जाऊ शकत नाही एवढेच मला सांगायचे होते, त्याकाळच्या युरोपात देखील सामान्य धार्मिक लोक होतेच, व वेळेचा अपव्यय तिथे देखील होताच.

नास्तिकतेतून समृद्धी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हा श्री.प्रभाकर नानावटी यांचा प्रतिसाद ,चर्चाप्रस्तावाला धरून अगदी बिंदुगामी(टु द पॉइंट) आणि अभ्यासपूर्ण आहे.त्यांनी दिलेला संदर्भ अवश्य वाचावा असा आहे.तसेच त्यांनी आपले विचार मोजक्या शब्दात प्रभावीपणे मांडले आहेत.(मला अशी प्रभावपूर्ण अभिव्यक्ती जमली नसती .उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! )

आक्षेप

|तसेच हेतू करमणुकीचा नसून देवकृपेतून इच्छापूर्तीचा असतो.

आक्षेप. पुण्यात होणाऱ्या सार्वजनिक तसेच बऱ्याचशा व्यक्तिगत "तथाकथित" धार्मिक कार्यात सामाजिक स्थान/दिखावा/पैसा हे मूळ हेतू असतात. करमणूक व दुसऱ्याच्या पैशाचा फुकट उपयोग हाच एक "शुद्ध" भाव असतो (बहुतांशी). ह्या गोष्टीना आस्तिकता म्हणत नाहीत, कारण ह्या हेतूंसाठी देव आणि धर्म ह्याचा केवळ उपयोग केला जातो, कारण कोणचेही असू शकते.

आक्षेपाचे निरसन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"पुण्यात होणाऱ्या सार्वजनिक तसेच बऱ्याचशा व्यक्तिगत "तथाकथित" धार्मिक कार्यात सामाजिक स्थान/दिखावा/पैसा हे मूळ हेतू असतात. करमणूक व दुसऱ्याच्या पैशाचा फुकट उपयोग हाच एक "शुद्ध" भाव असतो (बहुतांशी). "
असे श्री.आजून कोण मी लिहितात ते सार्वजनिक धार्मिक उत्सवांच्या आयोजकांविषयीं खरेच आहे.पण त्यांची संख्या अल्प असते. मला म्हणायचे आहे ते रांगेत ताटकळणार्‍या सहस्रावधी भक्तांविषयी.
दगडूशेठ गणेशदर्शनासाठी नारळाची तोरणे घेऊन येणारे,लालबागच्या राजाला सोने चांदी अर्पण करणारे, बालाजीच्या मुडुपम् मधे नोटा टाकणारे.हे सर्व भक्त मनोकामना पूर्ण व्हावी म्हणूनच आलेले असतात हे स्पष्ट आहे.

वेळेचा अपव्यय

वेळेच्या अपव्ययाचा संबंध समृद्धीशी लावणे याला किंचित सहमती आहे तरीही आस्तिकतेशी त्याचा संबंध बादरायणच वाटतो. (म्हणजे ओढून ताणून दाखवला तर दाखवता येणे शक्य आहे.) अन्यथा, दिवसभर वन्डे मॅच बघणारे, ऑफिसच्या वेळेत उपक्रम, मिपा आणि अशा अनेक साईट्सवर मेगाबायटी प्रतिसाद किंवा लेख लिहून पगार चापणारे, घरची कामे बाजूला ठेवून सायटींवर रात्रंरात्र जागणारे, दुपारच्या वेळात काही कन्स्ट्रक्टिव न करता टिव्हीवर मालिका पाहणारे, ऑफिसला पोहोचण्यासाठी दिवसाला ३-४ तासांचा प्रवास करणारे वगैरे वगैरे अनेकदा कळत-नकळत वेळेचा अपव्यय करत असतातच.

याउलट, सिद्धीविनायकाला चालत जाणारे* आपले प्रसिद्ध अमिताभ बच्चन आणि त्यांची सूनबाई ऐश्वर्या यांना समृद्धीच्या कोणत्या सीमा पार करायचे आहे हे कळल्यास बरे होईल. तसेच, माझ्या ओळखीचे अनेक गुजराथी व्यावसायिक भल्या पहाटे चालत सिद्धिविनायकाला जातात. त्यांची प्रगती बघता, त्यांची आस्तिकता किती कामाची असाही प्रश्न पडतो.

---

* देवदर्शनासाठी रांगा आणि सुरक्षा यंत्रणेचा गैरवापर पाहिला की पित्त खवळणे साहजिक वाटते. तिथे वेळेचा अपव्यय आहेच पण त्यापेक्षा अधिक न्यूसन्स आहे असे वाटते.

असो.

राष्ट्राची समृद्धी,व्यक्तीची नव्हे.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितात,"सिद्धीविनायकाला चालत जाणारे* आपले प्रसिद्ध अमिताभ बच्चन आणि त्यांची सूनबाई ऐश्वर्या यांना समृद्धीच्या कोणत्या सीमा पार करायचे आहे हे कळल्यास बरे होईल."
..
चर्चाप्रस्तावात विचार केला आहे तो देशाच्या समृद्धिनिर्देशांकाचा. देशातील कोणा एका/दुसर्‍या व्यक्तीच्या संपत्तीचा नव्हे. या विषयीं कुठेही संदिग्धता नाही. पण कांही सदस्य लिहिण्याच्या नादात याकडे लक्ष देत नाहीत असे दिसते.

आश्चर्य नाही

अमिताभ किंवा ऐश्वर्याचे प्रतिसादातील नाव हा विनोद आहे किंवा उपहास. प्रतिसादातील इतर वाक्ये सोडून (जसे क्रिकेट मॅच किंवा मेगाबायटी प्रतिसाद) यनावालांना हेच दिसेल हे अपेक्षित होते.

सिलेक्टिव रिडींग ही त्यांची सवय नवी नाही.

विनोद/उपहास

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"सिद्धीविनायकाला चालत जाणारे* आपले प्रसिद्ध अमिताभ बच्चन आणि त्यांची सूनबाई ऐश्वर्या यांना समृद्धीच्या कोणत्या सीमा पार करायचे आहे हे कळल्यास बरे होईल."
असे प्रियाली यांनी लिहिले. यात विनोद/उपहास आहे हे माझ्या लक्षात आले नाही.(अजूनही येत नाही).त्या अज्ञानापोटी उत्तर लिहिले.क्षमस्व.

देशाची समृद्धी कशामुळे वाढते?

आदम बाबांच्या मते ती (समृद्धी) एकूण वस्तीत कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण व त्या मनुष्यबळाची कार्यक्षमता यावर अवलंबून आहे. यातही ती मुख्यत्वे 'कार्यक्षमतेवर' अवलंबून आहे असे पुढे (म्हणजे पहिल्या दोन पानांतच) खुद्द बाबा म्हणतात.

बाबा वाक्य प्रमाण मानल्यास, कार्यक्षमता नास्तिकतेने (वेळेचा अपव्यय टाळला गेल्याने) वाढत असेल आणि ही वाचलेली वेळ देशाच्या समृद्धीत भर घालण्यास उपयोगी पडत असेल, तर नास्तिकतेने नक्कीच देशाच्या सम्मृद्धीत भर पडेल. अन्यथा, अस्तिकतेने कार्यक्षमता कशी वाढते यावर संशोधनास वाव आहे.

अवांतरः'बाबा तुम्ही चुकलात!' असे नंतरच्या काळातील काही अवलियांनी (इतर संदर्भात) म्हटल्याचे तो ऐकून आहे.

गूगलवर उपक्रम

तर्कक्रीडा क्र. १७६०

निरनिराळ्या देशांची लोकसंख्या, त्यातील आस्तिक लोक करत असलेल्या मनुष्य तासांचा अपव्यय वगळता उपलब्ध असलेले मनुष्य तास आणि समृद्धी यांचे प्रमाण यांचा हिशोब द्यावा.

उदा. भारत आणि अमेरिकेत साधारणपणे नास्तिकांचे प्रमाण सारखेच आहे समजू (अमेरिकेत ३-९% आणि भारताची आकडेवारी उपलब्ध नाही तरी ७ - ८%पेक्षा कमी, दोन्ही सरासरी ६% मानू. भारताची अगदी २% मानली तरी नास्तिकांची संख्या दोन्हीकडे सारखीच होईल) . दोन्हीकडचे आस्तिक लोक मनुष्य तासांचा सारख्याच प्रमाणात अपव्यय करतात असे समजू. (तसे नसेल तर निव्वळ आस्तिक - नास्तिकांच्या संख्येवर समृद्धी न ठरता जगाच्या निरनिराळ्या भागातले आस्तिक लोक करत असलेल्या मनुष्यतास - अपव्ययाच्या निरनिराळ्या दरावरून समृद्धी ठरेल आणि हा सगळा चर्चाप्रस्तावच निरर्थक ठरेल. इथे केवळ आस्तिकच लोक वेळेचा अपव्यय करतात अणि नास्तिक करत नाहीत असे गृहीतक आहे जे मला पटले नसले तरी वादाकरता मान्य करतो.) भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या साधारण तिप्पट. म्हणजे आस्तिक लोकांनी वाया घालवलेलेले मनुष्य तास वगळूनही भारतीयांना अमेरिकन लोकांच्या तिप्पट मनुष्य तास उपलब्ध असतात. धार्मिक सुट्ट्या जास्त असतात वगैरे समजले तरीही भारतीयांना अमेरिकनांपेक्षा जास्त मनुष्यतास मिळतात हे मान्य होईल. असे असूनही अमेरिका समृद्ध देशांच्या यादीत १० वी आणि भारताचे नाव ५० मध्ये नाही. असे का बरे असावे?

?

निरनिराळ्या देशांची लोकसंख्या, त्यातील आस्तिक लोक करत असलेल्या मनुष्य तासांचा अपव्यय वगळता उपलब्ध असलेले मनुष्य तास आणि समृद्धी यांचे प्रमाण यांचा हिशोब द्यावा.

उदा. भारत आणि अमेरिकेत साधारणपणे नास्तिकांचे प्रमाण सारखेच आहे समजू (अमेरिकेत ३-९% आणि भारताची आकडेवारी उपलब्ध नाही तरी ७ - ८%पेक्षा कमी, दोन्ही सरासरी ६% मानू. भारताची अगदी २% मानली तरी नास्तिकांची संख्या दोन्हीकडे सारखीच होईल) . दोन्हीकडचे आस्तिक लोक मनुष्य तासांचा सारख्याच प्रमाणात अपव्यय करतात असे समजू. (तसे नसेल तर निव्वळ आस्तिक - नास्तिकांच्या संख्येवर समृद्धी न ठरता जगाच्या निरनिराळ्या भागातले आस्तिक लोक करत असलेल्या मनुष्यतास - अपव्ययाच्या निरनिराळ्या दरावरून समृद्धी ठरेल आणि हा सगळा चर्चाप्रस्तावच निरर्थक ठरेल. इथे केवळ आस्तिकच लोक वेळेचा अपव्यय करतात अणि नास्तिक करत नाहीत असे गृहीतक आहे जे मला पटले नसले तरी वादाकरता मान्य करतो.) भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या साधारण तिप्पट. म्हणजे आस्तिक लोकांनी वाया घालवलेलेले मनुष्य तास वगळूनही भारतीयांना अमेरिकन लोकांच्या तिप्पट मनुष्य तास उपलब्ध असतात. धार्मिक सुट्ट्या जास्त असतात वगैरे समजले तरीही भारतीयांना अमेरिकनांपेक्षा जास्त मनुष्यतास मिळतात हे मान्य होईल. असे असूनही अमेरिका समृद्ध देशांच्या यादीत १० वी आणि भारताचे नाव ५० मध्ये नाही. असे का बरे असावे?

"भारतीयांना अमेरिकनांपेक्षा जास्त मनुष्यतास मिळतात" हे विधान गैरलागू आहे. सुबत्तेचा अंदाज घेण्यासाठी एकूण मनुष्यतासांपेक्षा दरडोई मनुष्यतासांचे गणन अधिक महत्वाचे आहे.
शिवाय,

  1. अमेरिका मुळातच भौगोलिकदृष्ट्या अधिक समृद्ध देश आहे.
  2. दरडोई भौगोलिक समृद्धी तपासली तर अमेरिका भारतापेक्षा अधिकच समृद्ध आहे.
  3. अमेरिकेचे शोषण थांबून शेकडो वर्षे लोटली आहेत.

हे मुद्दे तुम्ही का दुर्लक्षिलेत ते समजले नाही.

शंका

1.अमेरिका मुळातच भौगोलिकदृष्ट्या अधिक समृद्ध देश आहे.

मुद्दा १ अधिक विस्ताराने सांगता येईल का? येथे भारतापेक्षा भौगोलिकदृष्ट्या अधिक समृद्ध असे म्हणायचे आहे का?

मुद्दा २ आणि ३ पटणारे वाटतात. मुद्दा २ हा मुद्दा १ चे एक्स्टेन्शन भासला तरी दोन्ही देशांतील लोकसंख्या आणि साधनसंपत्ती बघता तो पटणारा वाटला. भौगोलिक या शब्दाबाबत किंचित शंका वाटली.

निसर्गसंपदा

मुद्दा १ अधिक विस्ताराने सांगता येईल का? येथे भारतापेक्षा भौगोलिकदृष्ट्या अधिक समृद्ध असे म्हणायचे आहे का?

मुद्दा २ आणि ३ पटणारे वाटतात. मुद्दा २ हा मुद्दा १ चे एक्स्टेन्शन भासला तरी दोन्ही देशांतील लोकसंख्या आणि साधनसंपत्ती बघता तो पटणारा वाटला. भौगोलिक या शब्दाबाबत किंचित शंका वाटली.

नैसर्गिक संसाधने असा शब्दप्रयोग अधिक योग्य होईल हे मान्य. त्यांचे क्षेत्रफळच भारताच्या तिप्पट असल्यामुळे एकूण समृद्धी अधिकच असावी असे काहीही निरीक्षणे न करताही म्हणता येईल. दर चौरस किमीचा विचार केला तरीही तेल, अणुइंधन, धातूखनिजे, पाणी, सुपीकता, इ. बाबींमध्ये त्यांच्याकडे थोडे अधिकच असावे (असा माझा अंदाज आहे).

पटले नाही

त्यांचे क्षेत्रफळच भारताच्या तिप्पट असल्यामुळे एकूण समृद्धी अधिकच असावी असे काहीही निरीक्षणे न करताही म्हणता येईल. दर चौरस किमीचा विचार केला तरीही तेल, अणुइंधन, धातूखनिजे, पाणी, सुपीकता, इ. बाबींमध्ये त्यांच्याकडे थोडे अधिकच असावे (असा माझा अंदाज आहे).

असे नसावे. अमेरिकेचे हवामान भारतापेक्षा बरेच हार्श आहे. मला दक्षिणेकडील राज्यांची खूप माहिती नाही पण उत्तरेकडील राज्ये वर्षाला एक पीक काढतात. तेही मका, बटाटा वगैरे. जमीन सुपीक नाही. वर्षातले ३-४ महिने ती बर्फाच्छादित असते आणि ३-४ महिने अतिथंडीने काही जगू शकत नाही. शेती फक्त ४-५ महिन्यांत होते. मका, बटाटा, दूध, मांस, फळे (सफरचंदे वगैरे) इतकेच पिकते. या उलट भारतात रब्बी आणि खरीप अशी वर्षाला दोन पिके घेता येतात.

खनिज संपत्तीत भारत हा अमेरिकेपेक्षा मागे आहे असे वाटत नाही. उलट, भारताचे आकारमान पाहता आपल्याकडे अमेरिकेपेक्षा अधिक खनिजसंपत्ती आहे असे वाटते. सुपीक प्रदेशाचे म्हणाल तर गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा त्रिभूज प्रदेश मिस्सिस्सिपीच्या त्रिभूज प्रदेशापेक्षा चांगला गणला जातो असे वाटते.

परंतु, दरडोई विचार करता अमेरिकेची समृद्धी अधिक भरेल असे वाटते.

त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीत भारत अमेरिकेपेक्षा कधीही वरचढ वाटतो.

प्रतिसादाबद्दल चू.भू.दे.घे. मी कोणतेही संदर्भ न तपासता केवळ निरीक्षणांच्या आधारे लिहिले आहे.

कारण

भारतीयांना अमेरिकनांपेक्षा जास्त मनुष्यतास मिळतात" हे विधान गैरलागू आहे. सुबत्तेचा अंदाज घेण्यासाठी एकूण मनुष्यतासांपेक्षा दरडोई मनुष्यतासांचे गणन अधिक महत्वाचे आहे.
शिवाय,

1.अमेरिका मुळातच भौगोलिकदृष्ट्या अधिक समृद्ध देश आहे.
2.दरडोई भौगोलिक समृद्धी तपासली तर अमेरिका भारतापेक्षा अधिकच समृद्ध आहे.
3.अमेरिकेचे शोषण थांबून शेकडो वर्षे लोटली आहेत.
हे मुद्दे तुम्ही का दुर्लक्षिलेत ते समजले नाही.

कारण यनावालांची चर्चा "नास्तिकांची संख्या आणि समृद्धी" या संदर्भातच आहे. नंतर त्यात त्यांनी "आस्तिक लोकांनी केलेला मनुष्य तासांचा अपव्यय" हा मुद्दा आणला. समृद्धीचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे आणि केवळ नास्तिकांची संख्या किंवा आस्तिकांनी वाया घालवलेले मनुष्यतास यापेक्षा इतर बर्‍याच घटकांचा विचार करावा लागेल हेच दाखवायचे होते. एकूणात समृद्धीवर चर्चा करायाची असेल तर तुम्ही वर सांगितलेले आणि आरागॉर्न यांनी आधी सांगितलेले भ्रष्टाचार वगैरे सर्व मुद्दे लागू होतात आणि चर्चेची व्याप्ती बरीच विस्तारते.

पण यनावालांचा तो उद्देशं नाही. फक्त भारतात रिकामटेकडे आस्तिक लोक व्रतेवैकल्ये, पूजाअर्चा, देवदर्शन वगैरे गोष्टींमध्ये अपव्यय करतात या एकाच कारणामुळे भारत मागासलेला आहे असे सिद्ध करायचा यनावालांचा अजेंडा आहे. तसे म्हणायचे तर खुशाल म्हणा, पण त्यासाठी निरनिराळ्या देशांमधले नास्तिकांचे प्रमाण आणि त्यामुळे आलेली समृद्धी ही बकवास कशाला?

असो. या निमित्ताने माझे बरेच मनुष्यतास वाया गेले.

पटले नाही

यनावालांची चर्चा "नास्तिकांची संख्या आणि समृद्धी" या संदर्भातच आहे. नंतर त्यात त्यांनी "आस्तिक लोकांनी केलेला मनुष्य तासांचा अपव्यय" हा मुद्दा आणला.

अपव्यय हा मुद्दा नंतर आणलेला नसून चर्चाप्रस्तावातच आहे: "कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार केला तर वरील निष्कर्ष क्र.१ अधिक पटतो. कारण नास्तिक विचारसरणी वास्तववादी आणि व्यवहारी असते.ती ऐहिक प्रगतीस पोषक ठरते.देव धर्माच्या कर्मकांडांत लोकांचा वेळ,श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कमी होतो.भ्रामक कल्पनांवर आधारित असलेल्या अनुत्पादक व्यवसायांना आळा बसतो."

समृद्धीचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे आणि केवळ नास्तिकांची संख्या किंवा आस्तिकांनी वाया घालवलेले मनुष्यतास यापेक्षा इतर बर्‍याच घटकांचा विचार करावा लागेल हेच दाखवायचे होते. एकूणात समृद्धीवर चर्चा करायाची असेल तर तुम्ही वर सांगितलेले आणि आरागॉर्न यांनी आधी सांगितलेले भ्रष्टाचार वगैरे सर्व मुद्दे लागू होतात आणि चर्चेची व्याप्ती बरीच विस्तारते.

पण यनावालांचा तो उद्देशं नाही. फक्त भारतात रिकामटेकडे आस्तिक लोक व्रतेवैकल्ये, पूजाअर्चा, देवदर्शन वगैरे गोष्टींमध्ये अपव्यय करतात या एकाच कारणामुळे भारत मागासलेला आहे असे सिद्ध करायचा यनावालांचा अजेंडा आहे. तसे म्हणायचे तर खुशाल म्हणा, पण त्यासाठी निरनिराळ्या देशांमधले नास्तिकांचे प्रमाण आणि त्यामुळे आलेली समृद्धी ही बकवास कशाला?

रिकामटेकडा हे सदस्यनाम असलेल्याने या विषयावर प्रतिवाद करू नये ;)
यनावालांचा उद्देश मी खात्रीने सांगू शकत नाही परंतु केवळ धर्म हा एकच मुद्दा असल्याचे त्यांचे प्रतिपादन नसावे. कोरिलेशन तर नक्कीच आहे, योगायोग नाही (की तेही तुम्हाला मान्य नाही?). "त्यामुळे(सुद्धा) समृद्धी येऊ शकते" ही एक शक्यता त्यांनी मांडलेली आहे, "त्यामुळे" असे त्यांचे मत नसावे. (समृद्धीमधील या कारणाचे योगदान किंचितच असावे परंतु ती बकवास नाही असे मला वाटते.)

?

मग नास्तीकतेचे आणि समृद्धीचे संबंध जोडताना हे मुद्दे कसे दुर्लक्षित केले गेले? केवळ काही डेटा पॉइंट्स मांडून निष्कर्ष काढता येत नाही हाच मुद्दा आपण म्हणत आहात?

नाही

मग नास्तीकतेचे आणि समृद्धीचे संबंध जोडताना हे मुद्दे कसे दुर्लक्षित केले गेले? केवळ काही डेटा पॉइंट्स मांडून निष्कर्ष काढता येत नाही हाच मुद्दा आपण म्हणत आहात?

दुर्लक्षिलेले मुद्दे समान असताना काय घडते याची चर्चा विज्ञानात नेहमीच करावी लागते.

मुद्दे

दुर्लक्षिलेले मुद्दे समान आहेत याला पुरावा काय?

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

नाहीत ना!

दुर्लक्षिलेले मुद्दे समान आहेत याला पुरावा काय?

ते समान नाहीतच!

समान

समान नाहीत तर सेटेरिस पारिबस आणण्याचीच गरज नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

जर-तर

समान नाहीत तर सेटेरिस पारिबस आणण्याचीच गरज नाही.

"असते तर काय झाले असते?" याविषयी निष्कर्ष शक्य असतात. किंबहुना, ते निष्कर्ष काढण्यात अमेरिकेच्या उदाहरणाचा अडथळा होत नाही परंतु उपयोगही होत नाही म्हणून तिचे उदाहरण अपवाद म्हणून दुर्लक्षावे लागते.

इथे

इथे जर-तर अशी चर्चा चालू नाही. नास्तिकता अधिक म्हणजे समृद्धी अधिक हा प्रिमाइस आहे. अमेरिका त्यात बसत नाही म्हणून तिला वगळले. इझि-पीझी.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

?

इथे जर-तर अशी चर्चा चालू नाही. नास्तिकता अधिक म्हणजे समृद्धी अधिक हा प्रिमाइस आहे. अमेरिका त्यात बसत नाही म्हणून तिला वगळले. इझि-पीझी.

कोरिलेशन १ नाही म्हटले की काही अपवाद सापडतातच. "जेव्हा(/जर) इतर कारणांचा प्रभाव नगण्य असतो तेव्हा(/तर) नास्तिकता या घटकासोबत समृद्धी दिसते" हा प्रिमाइस आहे. "जर" या भागातील विधान खोटे असते तेव्हा हा प्रिमाइस स्वयंसिद्धच असतो.

इतर

इतर कारणांचा प्रभाव नगण्य नाही. तो तसा आहे असे मानायलाही काही पुरावा नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

नाही

|दुर्लक्षिलेले मुद्दे समान "असताना" काय घडते याची चर्चा विज्ञानात नेहमीच करावी लागते

"असताना" कि "असल्यास"? कारण "असताना" ह्यामध्ये असे गृहीत आहे कि बाकीचे मुद्दे समान आहेत ज्याचे खंडन आपण केले आहे.

|दुर्लक्षिलेले मुद्दे समान असताना काय घडते याची चर्चा

सेटीरस पेरीबास तेव्हा वापरले जाऊ शकते जेव्हा अधिक माहिती किवा डेटा पॉइंट्स उपलब्ध नाहीत, सो देअर इज चान्स ऑफ एरर इन अब्सेंस ऑफ डेटा आणि मुळात ते कौज अन्ड इफ्फेक्ट ची हमी देत नाही.

अंशतः सहमत

"असताना" कि "असल्यास"? कारण "असताना" ह्यामध्ये असे गृहीत आहे कि बाकीचे मुद्दे समान आहेत ज्याचे खंडन आपण केले आहे.

मान्य. "असल्यास" हा शब्द योग्य आहे.

सेटीरस पेरीबास तेव्हा वापरले जाऊ शकते जेव्हा अधिक माहिती किवा डेटा पॉइंट्स उपलब्ध नाहीत, सो देअर इज चान्स ऑफ एरर इन अब्सेंस ऑफ डेटा आणि मुळात ते कौज अन्ड इफ्फेक्ट ची हमी देत नाही.

रिडक्शनिजममध्ये एकाएका सुट्या घटकासोबत दिसणारे परिणाम तपासले जातात.
कॉज अँड इफेक्ट हा वेगळा मुद्दा, येथे केवळ कोरिलेशनविषयी वाद आहे ना?

ह्म्म्

|रिडक्शनिजममध्ये एकाएका सुट्या घटकासोबत दिसणारे परिणाम तपासले जातात.
कॉज अँड इफेक्ट हा वेगळा मुद्दा, येथे केवळ कोरिलेशनविषयी वाद आहे ना?

फक्त कोरिलेशन हा मुद्दा असेल तर माझे काहीच म्हणणं नाही. असे अनेक कोरिलेशन मांडता येऊ शकतात. पण चर्चेचा मूळ उद्देश कोरिलेशन नसून नास्तिकता आणि त्याचे परिणाम हा आहे असे वाटते.

अमेरिका

हे मुद्दे तुम्ही का दुर्लक्षिलेत ते समजले नाही.

आणि यनावालांनी आख्ख्या अमेरिकेकडे का दुर्लक्ष केले हे त्यांनाही विचारावे. :)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

पक्षपात

आणि यनावालांनी आख्ख्या अमेरिकेकडे का दुर्लक्ष केले हे त्यांनाही विचारावे. :)

"तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म?" हा प्रश्न तर कल्याणकर यांच्या लेखांकडे दुर्लक्ष करून यनावालांच्या लेखांवर येणार्‍या तथाकथित तटस्थ टोळधाडीलाही विचारता येतो.

संबंध?

इथे लेखाबद्दल चर्चा चालू आहे. आक्षेपार्ह मुद्याबाबत मूळ लेखकाला काहीही न विचारता तोच मुद्दा इतरांना विचारणे हे विज्ञाननिष्ठ विचारसरणीत बसत नाही असे वाटते.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

हं

इथे लेखाबद्दल चर्चा चालू आहे. आक्षेपार्ह मुद्याबाबत मूळ लेखकाला काहीही न विचारता तोच मुद्दा इतरांना विचारणे हे विज्ञाननिष्ठ विचारसरणीत बसत नाही असे वाटते.

कोरिलेशन १ नाही हे मान्य केलेलेच आहे. त्यांची समृद्धी खास कारणे देऊन स्पष्ट करता येते. त्यामुळे, अशी उदाहरणे सापडली तरी सेटेरिस पारिबस चर्चेत अडचण येत नाही.

आणि

आणि संबंध सुलभ नाही, इतर पॅरामीटर्स आहेत हे ही मान्य केलेले आहे. असे असताना लिनियर डिपेन्डन्स कसा धरता येईल हे अनाकलनीय आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

?

आणि संबंध सुलभ नाही, इतर पॅरामीटर्स आहेत हे ही मान्य केलेले आहे. असे असताना लिनियर डिपेन्डन्स कसा धरता येईल हे अनाकलनीय आहे.

इतर पॅरामीटर्स समान ठेवल्यास काय घडते त्याच्या चर्चेलाच सेटेरिस पारिबस म्हणतात.

अति

अतिसुलभीकरण करायचे असल्यास हे ठीक आहे. याचा काही उपयोग आहे असे वाटत नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर