धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा बळी (पूर्वार्ध)


रॉजर बेकन (1220-1292), कोपर्निकस (1473 - 1543), गॅलिलियो (1564-1642), केप्लर (1571-1630) इत्यादी वैज्ञानिकांनी व तत्वज्ञानी कितीही कंठशोष केला असला तरी पाश्चिमात्य राष्ट्रातील अंधारयुगाच्या खुणा 18व्या शतकापर्यंत शिल्लक होत्या. (त्या तुलनेने आपल्या येथे अजूनही अंधारयुगच आहे असे म्हणावे लागेल!) क्रिश्चन धर्माचे जोखड झुगारून (निखळ!) वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास त्या समाजाला पुढील 200 वर्ष वाट पहावी लागली. परंतु हा अंधारयुग त्याकाळातील अनेक बुद्धीवंतांना, विचारवंतांना क्लेषदायक ठरला व काही वेळा प्राण घातकही ठरला. कारण एका बाजूला परंपरागत धर्माची शिकवण व ऐहिक सुखांचा तिरस्कार करणार्‍या पाप-पुण्यांच्या टोकाच्या कल्पना व दुसर्‍या बाजूला बुद्धीमत्ता, तर्कविचार आणि अंगभूत प्रतिभेच्या जोरावर जगाकडे पाहण्याचा अत्याधुनिक दृष्टिकोन व धर्माने दाबून ठेवलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याची दुर्दम्य उत्सुकता या पेचात अनेक वैज्ञानिक सापडले होते. सामाजिक व्यवहारासाठी धर्माची पाठराखण करण्याला पर्याय नव्हता. व कुणीही धर्मरोषाचा धोका पत्करण्यास तयार नसे. अशा वैज्ञानिकांपैकी ब्लेझ पास्कल (1623-1662) हे नाव आपण कधीच विसरू शकत नाही. (Pascal चे उच्चार 'पास्कल' असेही केले जात असावे!) प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या 39 व्या वर्षी अकाली मृत्यु पावलेल्या गणित, भौतिकी, संभाव्यता सिद्धांत (Probability Theory) या विषयात अनेक संकल्पनांना जन्म देऊन या ज्ञानशाखेत कधीच न पुसणारा ठसा या प्रतिभावंताने उमटविला.

आपल्या माहितीतले कुमार गंधर्व, श्रीनिवास रामानुजन हे चाइल्ड प्रॉडिजी होते. 50-60 वर्षापूर्वी, 12 - 15 आकडे असलेल्या संख्याची काही सेकंदातच तोंडी बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, वर्ग-वर्गमूळ करून जमलेल्यांना थक्क करणार्‍या 8-10 वयाच्या आपल्या येथील शकुंतलादेवीला आपण चाइल्ड प्रॉडिजी म्हणत असू. (मात्र बालपणातील ही विलक्षण बुद्धीमत्ता मोठेपणी कुठल्याही शोधकार्याला उपयोगी ठरली नाही ही तिची शोकांतिका होती.) परंतु ब्लेझ पास्कल खर्‍या अर्थाने चाइल्ड प्रॉडिजी होता व शेवटच्या क्षणापर्यंत त्याची प्रतिभा टिकून होती. पास्कल चार वर्षाचा असताना त्याची आई वारली. त्याचे वडीलच त्याचे शिक्षण घेऊ लागले. त्याच्या गिल्बर्ट व जॅकेलिन या दोन थोरल्या बहिणींचाही त्याला शिकवण्यात सहभाग होता.

युक्लिडच्या Elements या पुस्तकातील भूमितीतील प्रमेयांची थोडीसुद्धा ओळख नसताना वयाच्या आठव्या वर्षी त्यातील विधानं तो सिद्ध करून दाखवत होता. आज जरी युक्लिडच्या काही प्रपोजिशन्सबद्दल शंका असल्या तरी पास्कलने त्याकाळी केवळ बुद्धीमत्तेच्या बळावर तर्कशुद्धपणे मांडणी करून सिद्ध करून दाखविले ही खरोखरच नवलाची गोष्ट होती. परंतु या तीक्ष्ण बुद्धीनेच त्याच्या शिक्षणात अडथळे आणले. वडील पंतोजी टाइप असल्यामुळे मुलाने गणित सोडवण्यासाठी जास्त डोके वापरल्यास त्याचे डोके फुटून जाईल या भीतीने गणित, विज्ञान हे विषय सोडून भाषा, व्याकरण यासारख्या सोप्या विषयांचा अभ्यास करण्याची सक्ती केली. परंतु ज्या गोष्टी करू नको म्हटल्या जातात तीच गोष्ट कराविशी वाटणे ही बालसुलभवृत्ती असल्यामुळे पास्कल चोरून गणित सोडवत असे. शेवटी कंटाळून वडिलानी गणित शिकण्यास परवानगी दिली.


वयाच्या चौदाव्या वर्षी पास्कल विज्ञान गोष्टी करणार्‍या संस्थेनी आयोजित केलेल्या भूमितीवरील भाषणं ऐकण्यासाठी जात होता. हीच संस्था पुढे फ्रेंच अकॅडेमी म्हणून नावारूपास आली. याच काळात त्यानी शंकुच्छेदासंबधी (conic section) शोधनिबंधवजा लेख लिहिला (1639). त्यात मिस्टिक हेक्साग्राम (mystic hexagram) म्हणून ओळखल्या जाणारे सुमारे 400 प्रपोजिशन्स होत्या. त्यातील वर्तुळाच्या संबंधातील एक प्रमेय पास्कल प्रमेय म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा शंकुच्छेदावरील प्रमेयांचा लेख पास्कलचा समकालीन असलेल्या रेने देकार्तेला दाखवला गेला तेव्हा 16-17 वर्षाचा मुलगा असे काही लिहू शकेल यावर त्याचा अजिबात विश्वास बसला नाही. पास्कलची ही कृती नंतर प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली.

आयुष्यात कुठलिही गोष्ट सुखासुखी होत नसते. पास्कलच्या गणितातील प्राविण्याला दु:खाची झालर होती. जन्मल्यापासूनच अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या पास्कलला वयाच्या 17 व्या वर्षी पोटदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. मृत्युपर्यंत या पोटदुखीने त्याची पाठ सोडली नाही. पोटदुखीच्या असह्य वेदनामुळे रात्र न रात्र तो जागून काढत असे. Chronic insomnia मुळे त्याला दिवस काढणे कष्टदायक ठरत होते. तरीसुद्दा प्रयत्नांची शिकस्त करत तो काम करत होता.


वयाच्या अठराव्या वर्षी त्यानी बेरीज-वजाबाकी करणार्‍या यंत्राचा शोध लावला. वडील पॅरीसमध्ये करसंकलनाधिकारी असल्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ आकडेमोड करण्यातच जात असे. पास्कल नेहमीच विज्ञानाकडे उपयुक्ततेच्या दृष्टीने बघत होता. भरपूर दिवस खपून गीअर्स व चाकं यांच्या सहाय्याने त्यानी हे यंत्र बनवून वडिलांना भेट दिली. वडील खुश झाले. हे यंत्र तयार करण्यासाठी खर्चही जास्त लागल्यामुळे त्याचा वापर काही श्रीमंतच करू शकले. त्यांच्यासाठी ती एक खेळणीच होती. सुमारे 50 यंत्र त्याकाळात तयार केले असावेत. पास्कलचे हे बेरीज - वजाबाकी करू शकणारे यंत्र पुढील काळातील संगणकाची नांदी ठरली.

त्याकाळच्या धर्माधिष्ठित समाजव्यवहाराप्रमाणे पास्कल तरुणपणातच कॅथोलिक पंथाबद्दल विचार करू लागला. त्याच काळात त्याच्या बहिणी जान्सेनिस्ट या कॅथोलिक पंथाच्या पूर्णपणे आहारी गेल्या होत्या. हा पंथ जेसुइट्स पंथापेक्षा जास्त कडवट होता. जेसुइट्स मानवाला उपयोगी कार्य करण्यात धन्यता मानत असत. परंतु केवळ चांगले कार्य करत राहण्यापेक्षा ईश्वराचे प्रेम व कृपा मिळवण्यासाठी आणखी जास्त काही केल्यास खरीखुरी मुक्ती मिळेल यावर जान्सेनिस्टचा भर होता. त्यामुळे या पंथाचे भक्त बायबल व ईश्वर यांचा विचार करण्यात व इतर पंथीय कसे चुकत आहेत याचा प्रचार करण्यात गर्क असत. रॉजर बेकन, कोपर्निकस, गॅलिलियो, केप्लर यांचाही बायबलवर विश्वास होता. त्याचबरोबर निसर्गालाही ईश्वर मानण्याची त्यांची तयारी होती. परंतु बायबलमधील शब्द न शब्द खरा असतो यावर पास्कलचा दृढ विश्वास होता. तरीसुद्धा खर्‍या कॅथोलिकप्रमाणे पास्कल गणित व विज्ञान क्षेत्रातील स्वत:चे कार्य चालू ठेवत होता. परंतु ओढ मात्र धर्म, ईश्वर व ईश्वरीसत्य शोधण्याकडे होता.

आपल्यासारख्यांना धर्माचा एवढा पगडा असू शकतो यावर विश्वास बसणार नाही. आपल्या दृष्टीने काही धार्मिक सोपस्कार केले की पुरे एवढीच धर्माबद्दलची कल्पना असते. परंतु युरोपच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास केवळ धार्मिक चढाओढीसाठी हजार बाराशे वर्ष खर्ची घातली याचे आपल्याला आश्चर्य वाटेल. पास्कलच्या कुटुंबच्या कुटुंब या पंथाच्या मागे लागला होता. पास्कल पोटदुखीने तडफडत असूनसुद्धा एकीकडे धर्मशास्त्राचा विचार व दुसरीकडे विज्ञानासंबंधी उत्सुकता या कात्रीत सापडला होता. यातील एकही गोष्ट त्याला सोडवत नव्हती.

(अपूर्ण)

Comments

ब्लेझ् पास्कलविषयी आणखी माहिती

दुरुस्ती

पहिल्या परिच्छेदातील शेवटून चौथे वाक्य
(Pascal चे उच्चार 'पास्कल' असेही केले जात असावे!)
ऐवजी
(Pascal चे उच्चार 'पास्काल' असेही केले जात असावे!) असे वाचावे.

 
^ वर