आकाश निळे का दिसते?

प्रस्तुत लेख मी स्वतः मराठी मंडळी.कॉम या संस्थळावर [पुर्वी] लिहिलेला आहे.


आकाश निळे का दिसते, हे जाणून घेण्याअगोदर काही महत्वपूर्ण भौतिक संकल्पना आपण समजावून घेऊयात.
..

अभिसारण

(सामान्यतः सुर्यापासून निघणारे) श्वेत (पांढरे) प्रकाशकिरणे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणातील अतिसुक्ष्म अणुंवर पडतात (ज्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंच्या अणुंचे प्रमाण सर्वाधिक असते.), तेव्हा ते आकाशात सर्व दिशांमध्ये विखुरले जातात, या विखुरल्या जाण्याच्या संकल्पनेला प्रकाशाचे अभिसारण असे म्हणतात.

.

रेलिघचा अभिसारण नियम

अभिसारीत झालेल्या प्रकाशाची तीव्रता (I) ही वातावरणातील अतिसुक्ष्म अणुंवर पडलेल्या प्रकाशाच्या तरंग लांबीच्या (λ) ४ थ्या घातांकाशी व्यस्त प्रमाणात असते.

I ∝ १ / λ

या नियमाच्या आधारे,

» प्रकाशाची तरंग लांबी जेवढी जास्त असेल तेवढे प्रकाशाचे विखुरण (अभिसारण) कमी असते.

उदा. लाल रंगाची तरंग लांबी जास्त असल्याने तो कमी अभिसारीत होतो तर निळा रंग तरंग लांबी तुलनेने लहान असल्यामुळे अधिक प्रमाणात विखुरल्या जातो.

» ज्या सुक्ष्म-अणुंवर प्रकाश पडतो, त्यांचा आकार जर प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षाही खूप लहान असेल, तर प्रकाशाचे सर्व दिशांत अभिसारण होते.

» अभिसारण झाल्यानंतर प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये कसलाही बदल होत नाही.

अभिसारणाची उदाहरणे:

» आकाश निळे दिसते.

» सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी सुर्य तांबडा दिसतो.

» ढग पांढरे अथवा करड्या रंगाचे दिसतात.

» धोक्याच्या सुचना देणारे संदेश / संकेत / खुणा लाल रंगाने दर्शविले जातात.

सामान्यतः आकाश निळे का दिसते?clouds-in-blue-sky.jpg

» जेव्हा सुर्यापासून उत्सर्जित झालेला श्वेत प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात दाखल होतो, तेव्हा वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या तत्सम वायूंच्या अतिसुक्ष्म अणुंद्वारे (ज्यांचा आकार प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा खूप कमी असतो), पाण्याचे बाष्प-कण, शिवाय अल्प प्रमाणात असलेले इतर वायू व हवेमधील अत्यल्प प्रमाणात असलेले सुक्ष्म कण जसे की धूळ, राख, परागकण, क्षार इत्यादींद्वारे त्या प्रकाशाचे अभिसारण होते. ही अभिसारणाची प्रक्रिया वर सांगितलेल्या रेलिघच्या नियमानुसार होते. अभिसारीत झालेला प्रकाश नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाखल होतो.

» श्वेत रंग म्हणजेच इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण होय. हे सात रंग -- जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, ROYGBIV.pngलाल(तांबडा) होय. प्रकाश हा एका तरंग किंवा लहरीच्या स्वरूपात असतो व त्यातील प्रत्येक रंगाला ठराविक तरंग लांबी (λ) असते. प्रकाशातील या सातही रंगांची त्यांच्या तरंग लांबींनुसार जागा ठरते. म्हणजेच, जांभळा, पारवा, निळा यांच्या लहरींची लांबी लाल, नारंगी, पिवळा यांच्या लहरींच्या लांबीच्या तुलनेने कमी असते. उदा. जांभळ्या रंगाची तरंग लांबी ४०० नॅनोमीटर इतकी आहे तर लाल रंगाची ६५० नॅनोमीटर एवढी आहे.

» समजा, λb आणि λr या निळ्या व लाल रंगाच्या अनुक्रमे तरंग लांबी आहेत, तसेच Ib आणि Ir या λb आणि λr या तरंग लांबींना अनुसरुन अभिसारीत प्रकाशाच्या अनुक्रमे तीव्रता आहेत. आता, रेलिघच्या नियमानुसार,

Ib ∝ १ / λb आणि Ir ∝ १ / λr

म्हणून,

( Ib / Ir ) = ( λr / λb )

पण, लाल रंगाची तरंग लांबी ही निळ्या रंगाच्या तरंग लांबी पेक्षा दुप्पट (अंदाजे) असते.

म्हणजेच, λr = २ λb

म्हणून,

( Ib / Ir ) = (२) = १६

म्हणजेच,

Ib = १६ Ir

» याअर्थी, अभिसारण पावलेल्या निळ्या रंगाची तीव्रता लाल रंगाच्या तुलनेने १६ पटीने अधिक असते. म्हणजेच, सामान्यतः (ज्या दिवशी, सर्वत्र ऊन पडलेले असते) निळाच रंग आकाशात सर्वाधिक प्रमाणात सर्वत्र विखुरलेला असतो, ज्यामुळे आकाश निळे दिसते.

» जर वातावरणातील धुलिकणांचा आकार प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा अधिक असला तर अभिसारण पावलेल्या प्रकाशाचा रंग उदासीन असू शकतो. (म्हणजेच, पांढरा किंवा करडा). हीच बाब ढगांमध्ये दिसून येते, जे पाण्याच्या बाष्प-कणांनी बनलेले असतात, त्यामुळेच प्रकाशाचे अभिसारण झाल्यामुळे ढग पांढरे किंवा करडे दिसते.

» पृथ्वीवर सतत होत असलेल्या सक्रिय ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे त्या-त्या प्रांतांमध्ये आकाशातील रंगामध्ये बराच काळ काही प्रमाणात बदल जाणवतात. उद्रेकाच्या वेळी शेकडो टन राख ज्वालामुखीच्या मुखातून हवेत उत्सर्जित झाल्याने अभिसारणाच्या प्रक्रियेमुळे हे बदल काही काळ अनुभवायला मिळतात.

» विकिंग लँडर्स ने पाठवलेल्या छायाचित्रांवरुन मंगळावरुन दिसणारे आकाश हे गुलाबी रंगाचे आहे असे दिसते, त्याचे कारण म्हणजे तेथील धुलिकण...

» वरील संकल्पनेला एक अपवाद असू शकतो. ग्रहावरील ढगांमुळे ग्रहाचा रंग विलग असू शकतो. संशोधकांच्या मते, गुरू ग्रहावरील वातावरणात सल्फर, फॉस्फरस सारख्या असंख्य रसायनांचे ढगे असल्यामुळे तेथील आकाश सतत विविधरंगी राहत असावे.

सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी सुर्य तांबडट का दिसतो?

» सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी सुर्यापासून प्रकाश खुप लांब पल्ल्याचा प्रवास करुन पृथ्वीच्या वातावरणात दाखल होतो. खुप लांब अंतर कापत प्रवास केल्यामुळे आणि वाटेत अवकाशातील कचरा, पृथ्वीच्या वातावरणातील धुलिकण, इत्यादी गोष्टींमुळे रेलिघच्या नियमानुसार त्याचे अभिसारण होते. त्यामुळे लाल रंग वगळता, इतर सर्व रंग अवकाशात चौफेर विखुरले जातात. परिणामी, पाहणार्‍याला सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी सुर्य तांबडा-नारंगी रंगाचे मिश्रण असलेल्या रंगाचा दिसतो.

लेखात वापरल्या गेलेल्या भौतिक संज्ञा:

  • Scattering - अभिसारण, प्रकाशाचे विखुरणे (जेव्हा प्रकाशकिरणे एखाद्या पृष्ठभागावर आदळतात त्यावेळी घडणारी प्रकिया)
  • Molecule - अणु, कण
  • Incidence - एखाद्या पृष्ठभागावर आदळणे, पडणे
  • Radiation - उत्सर्जन, विकीरण
  • Intensity - तीव्रता, प्रखरता
  • Wavelength - तरंग लांबी, लहरीची लांबी

» धन्यवाद!

Comments

प्रकाशाचे अभिसारण

चांगली माहिती दिलीत. सोपी करून सांगितली. धन्यवाद.

सूर्योदयाच्या वा अस्ताच्या वेळी नुसताच सूर्याचा रंग लाल न होता आजुबाजुच्या (कधी कधी अगदी १८० च्या कोनापर्यंत) क्षितीजाचा रंग लाल/पिवळा दिसतो.
या क्षितीजाच्या रंगाचे कारण अभिसारणाने सांगता येईल का? क्षितिज हिरवे-निळे दिसायला हवे का? (ज्यांचे अभिसारण झाले तो रंग. म्हणजे पांढरा वजा लाल नारिंगी.)

काही ढग काळे दिसतात तर काही पांढरे शुभ्र याचे कारण अभिसारणात आहे का?

हिवाळ्यात, उन्हाळ्यात पावसाळ्यात ढग कमी असताना आकाशाचा रंग वेगवेगळा असतो. याचे कारण देता येईल का?

प्रमोद

ह्म्म...

सूर्योदयाच्या वा अस्ताच्या वेळी नुसताच सूर्याचा रंग लाल न होता आजुबाजुच्या (कधी कधी अगदी १८० च्या कोनापर्यंत) क्षितीजाचा रंग लाल/पिवळा दिसतो.
या क्षितीजाच्या रंगाचे कारण अभिसारणाने सांगता येईल का? क्षितिज हिरवे-निळे दिसायला हवे का? (ज्यांचे अभिसारण झाले तो रंग. म्हणजे पांढरा वजा लाल नारिंगी.)

नाही. दुपारच्या वेळी (मध्यान्ह) सुर्य पांढर्‍या रंगाचा दिसतो. [ह्या] माहितीवरुन, सुर्यास्ताच्या (नि सुर्योदयाच्या वेळी) सुर्यकिरणांच्या (light from solar beam) वाटेत लाल, नारंगी व थोड्या प्रमाणात पिवळा रंग वगळता डोळ्यांनी दिसणार्‍य़ा इतर सर्व रंगांचे (निळा-हिरवा सुद्धा आले) अभिसारण होते, त्यामुळे सुर्य आणि सुर्यानजिकचे क्षितिज पिवळसर तांबूस दिसते.

---

काही ढग काळे दिसतात तर काही पांढरे शुभ्र याचे कारण अभिसारणात आहे का?

प्रकाशाचा अभिसारित झालेला रंग हे रेलीच्या नियमानुसार कणाचा आकार आणि तरंग लांबी यांच्यातील संबंधाचे फल (फंक्शन) आहे. हवेतील धुलिकणांपेक्षा ढगांतील बाष्पकण आकाराने अधिक मोठे असतात, जे सर्वच रंगांचे चौफेर अभिसारण करतात. (जसे हवेतील धुलिकण त्यांच्या आकारापेक्षापेक्षा कमी तरंगलांबी असणार्‍या निळ्या-हिरव्या रंगांचे अभिसारण करतात, त्याप्रमाणे!) ढग गडद दिसण्यामागचे कारण—ढगांच्या वरच्या बाजूस नि कडांकडील बाजूंस डोळ्यांनी दिसू शकणार्‍या प्रकाशाचे (म्हणजेच त्यातील सर्व रंगांचे) अभिसारण होत असावे. प्रस्तुत लेखातील [ही] माहितीसुद्धा योग्य व समांतर्णीय वाटते. शिवाय ढगांच्या चहूबाजूस असणार्‍या निळ्या (कधी फिकट निळा किंवा पांढरट) आकाशामुळे ते ढग अधिक गडद भासतात.


आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जसजसे आपण उंच ठिकाणी जावू, आपल्याला आकाश तुलनेने अधिक निळसर होत जाताना दिसेल. उंचीवर धुके व हवेतील इतर धुलिकणांचे प्रमाण त्या (मानाने) विरळ स्वरुपात असते, त्यामुळे निळ्या रंगाचे जास्त अभिसारण होत नाही.

धन्यवाद

उत्तरांबद्दल धन्यवाद. पण समाधान झाले नाही.

क्षितिजाजवळचा सूर्य लाल-नारिंगी दिसतो हे तुमच्या लेखावरून पटते. पण उरलेले क्षितिज हे आकाशाचा भाग आहे. तिथे जो रंग जास्तीत जास्त अभिसारीत होईल तो दिसला पाहिजे. (म्हणजे पांढरा वजा लाल नारिंगी). याच कारणाने आकाश निळे दिसते. आता क्षितीज मात्र लाल-नारिंगी दिसते हे काही अभिसारणाने होणार नाही.

तुम्ही दिलेले ढगांच्या रंगाचे कारण हे सर्वच ढगांना लागू पडते. तेव्हा काही ढग पांढरे दिसतात तर काही काळे हे का होते याचे कारण मिळत नाही.

तिसरे आकाशाबद्दल. उंचीवर धूलीकण नसल्याने आकाश अधिक निळे दिसतील. हे वेगवेगळ्या वेळी आकाश वेगवेगळ्या रंगात दिसण्याचे कारण असणार नाही.
(एक कारण संभवते जेंव्हा धूलीकण अधिक असतील तेंव्हा आकाशाचा रंग बदलतो. आणि वेगवेगळ्या वेळी धुलीकणांची संख्या वेगवेगळी असते. पण हे कारण पुरेसे आहे का?)

प्रमोद

खुलासा

सूर्याभोवतीच्या आकाशात नारिंगी, पिवळा, अशी वर्तुळे आहेत आणि दूरचेच आकाश निळसर दिसते आहे.

ढगांच्या रंगाचे कारण

ढगांच्या रंगाचे कारण हे सर्वच ढगांना लागू पडते. तेव्हा काही ढग पांढरे दिसतात तर काही काळे हे का होते याचे कारण मिळत नाही.

माझ्यामते बहुदा ढगांच्या स्थूलतेमुळे आणि त्यांत असलेल्या बाष्पकणांच्या घनतेमुळे काळा-पांढरा असे रंग दिसत असावेत. संभाव्यता अशी आहे की, पावसाळ्यात काळे ढग जमा होऊन बहुतेक वेळा पाऊस पडतो, याअर्थी ते अधिक स्थूल व घन असावेत, याउलट आकाशात वर्षभर नेहमी (बहुतांश वेळा) दिसणारे पांढरे ढग (त्या मानाने) कमी स्थूल व त्यांतील बाष्पकणांची घनता कमी असावी.

[या] प्रयोगावरुन याविषयी काही धागे-दोरे जोडता येऊ शकतील का?

आणि मुळात मलासुद्धा हे असे उलट-सुलट प्रश्न पडत आहेत, जसे की तुम्हाला... त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे जर अभिसारण संकल्पनेच्या आधारे व्यवस्थितरीत्या मिळत नसतील, तर इतर काही मार्ग आहेत, ज्यांच्या आधारे आपण ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकू, याबद्दल प्रत्येकाने आपापले ज्ञान येथे ओतणे गरजेचे आहे, जेणेकरुन लेखात दुरुस्त्याही होतील, नव्या संकल्पनाही समजतील नि तुमच्या, माझ्या व इतरांच्या प्रश्नांची योग्य व विश्वसनीय उत्तरे देखील मिळतील.

तुम्हाला काय वाटते, सुर्यास्ताच्यावेळी सुर्यानजिकचे क्षितिजसमान आकाश तांबूस का दिसत असावे? ढग पांढरे/काळे दिसण्यामागे काय कारण असावे?

माहित नाही

तुम्हाला काय वाटते, सुर्यास्ताच्यावेळी सुर्यानजिकचे क्षितिजसमान आकाश तांबूस का दिसत असावे? ढग पांढरे/काळे दिसण्यामागे काय कारण असावे?

मला काही माहिती नाही. माहिती करून घ्यायला आवडेल.

ढग काळे पांढरे दिसण्याचे कारण कदाचित ढगातील पाण्याच्या बिंदूच्या आकारमानात असू शकेल असे वाटते. जेवढा बिंदू मोठा तेवढा ढग काळा. (खालचे ढग काळे दिसतात. काळे ढग पाऊस देतात असे म्हटले जाते.) पण यामागचे कारण अभिसारणात आहे का आणखी कशात हे कळले नाही.

सूर्यास्ताच्या वेळचे क्षितीज हे कदाचित हवेच्या परावर्तित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असावे. पण त्यामुळे अमुक एक कोना पर्यंत ते अमुक रंगाचे का दिसते याबाबत काही सुचत नाही.

वरील दोन्ही माझे अंदाज आहेत त्यांना माहितीचा कुठलाही आधार नाही.

मुळात मलासुद्धा हे असे उलट-सुलट प्रश्न पडत आहेत

कित्येकदा नुसते प्रश्न गोळा करण्यात मौज असते. (कॅच २२ मधल्या योसारियन सारखी)

प्रमोद

नसावे

सूर्यास्ताच्या वेळचे क्षितीज हे कदाचित हवेच्या परावर्तित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असावे.

तुम्हाला कदाचित अपवर्तन (रिफ्रॅक्शन) हा शब्द अपेक्षित असेल पण अपवर्तनासाठी बिंदू स्रोत (पॉइंट सोर्स) किंवा पट्टी (स्लिट) प्रकाश आवश्यक असतात असे वाटते.

परावर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन

परावर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन याच अर्थाने मी शब्द वापरला. अपवर्तन हा शब्द मला माहित नव्हता.

तुम्ही पुढे जे लिहित आहात ते मात्र मला समजले नाही. रिफ्रॅक्शन साठी कुठलीही स्लिट वगैरे लागत नाही. (उदा. भिंग) ते पदार्थाच्या गुणधर्मातून येते.

प्रमोद

माझी चूक

अपवर्तनाने प्रकाशाचे पृथ:करण होण्यासाठी एकच स्लिट प्रकाश असावा, अन्यथा 'खालच्या' स्लिटचा लाल आणि 'वरच्या' स्लिटचा निळा एकत्र होऊन पांढरा रंगच मिळेल, केवळ खालची कडा निळी आणि वरची लाल दिसेल. संपूर्ण क्षितिज (=द्विमिती) लाल आणि डोक्यावरचे संपूर्ण आकाश (=द्विमिती) निळे असे पृथःकरण होणार नाही असे सांगायचे होते.

चांगली माहिती

सोप्या शब्दांत आहे.
थोडा छिद्रान्वेषीपणा: अभिसारण नियम मांडणारा लॉर्ड रॅले, रेलिघ नव्हे.

सहमत

छान माहिती. धन्यवाद.
येथे रेली असा उच्चार आहे.

भय्या इंग्रजी

मी भय्या इंग्रजीतला उच्चार सांगितला. पण भारताबाहेरच्या कोणत्याही इंग्रजीत 'घ' असा उच्चार ऐकीवात नाही त्यामुळे रेलिघपेक्षा रॅले बरा असावा.

बाकी "डार्क मॅटर"नंतर "डार्क एनर्जी"ही येणार काय उपक्रमावर?

ब्वॉर

मी भय्या इंग्रजीतला उच्चार सांगितला.

ठीक.

बाकी "डार्क मॅटर"नंतर "डार्क एनर्जी"ही येणार काय उपक्रमावर?

आमची कोठेही शाखा नाही.

जाऊ द्या

जाऊ द्या, (मागेही तेलंग्रे 'कॅरिओट्स ऑफ गॉड्स' म्हणाले होते.) आपणा माहितीचा लुत्फ घेऊ या.

दुरुस्ती

येथे दिलेल्या माहितीनुसार, आकाशाचा निळा रंग रेली अभिसारणामुळे असतो परंतु ढग करडे असण्याचे कारण थोडे वेगळे आहे.
"(अभिसारणामुळे होणारा उर्जेचा र्‍हास टाळण्यासाठी) धोक्याच्या सुचना देणारे संदेश / संकेत / खुणा लाल रंगाने दर्शविले जातात" ही अतिशयोक्ति वाटते (किती अंतरावरून बघणार?, इ.). मानवाचे लक्ष लाल रंगाकडे आकर्षित होण्याचे कारण उत्क्रांतीशी संबंधित (रक्त, निखारे, इ.) असावे.

लाल रंगाचे अभिसारण कमी होते

महामार्गांवर ठिकठिकाणी बसवलेल्या सिग्नल्स मध्ये लाल, नारंगी (/पिवळा?), हिरवा असे रंग असतात. मला कित्येकदा असा अनुभव आलाय की या सिग्नल्सपासून फार लांब असताना (अंदाजे ≤१ किलोमीटरपर्यंत)—हिरवा दिवा लागलेला असताना तो लांबून लाल दिवा लागलेला असतानापेक्षा अधिक धुसर/अंधुक दिसतो, याअर्थी त्याचे अभिसारण होत असावे, तुलनेने लाल दिवा अधिक स्पष्ट दिसतो. जर लांबवरुन भरधाव (अतिशय जलद) येणार्‍या वाहनचालकाला लाल दिवा लांबूनच लागलेला दिसत असेल, तेव्हा तो त्याचा वेग कमी-कमी करत जातो, जर ह्या ठिकाणी हिरवा दिवा थांबण्यासाठी असता, तर लांबवरुन अस्पष्ट दिसणार्‍या या दिव्यामुळे त्याला समजण्यास तुलनेने थोडा अधिक वेळ लागला असता. ह्यामध्ये अतिशयोक्ति कसली? लाल रंगाकडे आकर्षित होण्याचे काही भौतिकीय कारण देऊ शकाल का, कारण मानवाचे डोळे हे सुद्धा एक प्रकारचे भौतिकीय उपकरणच आहे, दुर्बिणीप्रमाणे?

होय

फोटॉप्सिन द्रव्यांची प्रकाशांसाठीची संवेदनाशीलता (आणि अधिक ताणायचे झाले तर त्यांच्यासाठीची मज्जातंतूंची संवेदनशीलता) वेगवेगळी असणे शक्य आहे.

रंगांधळेपणा ही सबब असू शकते

traffic_signals_wikipedia.gif
वाचनात आले की लाल, पिवळा नि हिरवा हे "रंग संकेत मानका"आधारे रस्त्यांवरील ट्रॅफिक सिग्नल्ससाठी वापरले जातात. काही चालकांच्या रंगांधळेपणाला आधार म्हणून हे रंग वापरले जातात, काहीवेळा लाल रंगांच्या दिव्यामध्ये नारंगी रंगाचा थोडा परिणाम आणि हिरव्या रंगाच्या दिव्यामध्ये निळ्या दिव्याचा थोडा परिणाम दिसतो, तो याचसाठी असावा.
---
अवांतर: चीनमध्ये लाल म्हणजे "जा" असं काही आहे काय?

नाही

रस्त्यावरील वाहतुकीत, वरचा दिवा=लाल, मधला दिवा=पिवळा, खालचा दिवा=हिरवा असे स्पष्टपणे दिसते. ज्या देशांमध्ये रंगांधळ्यांना वाहन चालविण्याचे परवाने मिळत नाहीत तेथे असा अन्याय बंद करण्याची मागणीही आहे. केवळ, लोहमार्ग/विमानतळ येथे रंगांधळेपणा ही अडचण असते.
रंगांधळेपणासुद्धा मी नमूद केलेल्या फोटॉप्सिन द्रव्यांमुळेच होतो.
टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचार हे दिव्यांचे रंग मानकापेक्षा वेगळे असण्याचे कारण असणे शक्य आहे.

रेल्वे

रेल्वेच्या सिग्नलचा क्रम मात्र उलटा असतो. कारण रेल्वेच्या ड्रायव्हरला लाल सिग्नल दुरून दिसण्याची आवश्यकता नसते. हा सिग्नल लाल असल्याची पूर्वसूचना आधीच्या पिवळ्या सिग्नलने दिलेली असते.

नितिन थत्ते

तरीपण

रेल्वेगाडीचालकाला रात्री सिग्नल दिसतच नाही, केवळ दिवाच दिसतो. त्या प्रकाशाच्या खाली बंद दिवे आहेत की वर याचा अंदाज नसल्यामुळे रंगज्ञान आवश्यक असते असा माझा मुद्दा होता.

सिग्नल लाल असल्याची पूर्वसूचना आधीच्या पिवळ्या सिग्नलने दिलेली असते.

रोचक मुद्दा.
--------
१० मीटर उंचीवरील लाल दिवा ११.३ किमीवरून दिसेल तर १०.५ मीटर उंचीवरील हिरवा दिवा ११.६ किमीवरून दिसेल. (गृ: खांब=१० मीटर, पृथ्वीची त्रिज्या=६४००००० मीटर)

अंतर

>>१० मीटर उंचीवरील लाल दिवा ११.३ किमीवरून दिसेल तर १०.५ मीटर उंचीवरील हिरवा दिवा ११.६ किमीवरून दिसेल.

रेलवेच्या दोन सिग्नलमधील अंतर २ किमी पेक्षा जास्त नसावे.
लांबून दिसणे याचा संबंध पृथ्वीच्या त्रिज्येशी नसावा. प्रकाशाच्या स्कॅटरिंगशीच असावा.

नितिन थत्ते

नाही

धनंजय यांनी आकडेमोड केली त्यानुसार शेकडो किमीतही फारसे स्कॅटर होत नाही. येथे तर १२ किमीतच सिग्नल क्षितिजाला टेकतो आहे. (पण गाडीत (=उच्चासनावर) बसलेल्या चालकाला अधिक लांबचेही दिसेल.)
अधिक ताणायचे तर लाल रंगाचे अपवर्तन कमी होते, हिरव्या रंगाचे अधिक होते. त्या फरकाला लक्षात घेऊन, जमिनीलगतची हवा थंड असताना/उष्ण असताना, इ. प्रसंगी हे प्रकाश नेमके कुठवरूनपर्यंत दिसतील तेही शोधता येईल.

उत्तम

उत्तम विवरण, धन्यवाद.

त्याचबरोबर हे रंगा-मागचे गणित उमजल्यानंतर ह्या गणिताचा उपयोग कुठे तरी करून त्यापासून काही मूल्य निर्माण (creating value thru application) केले आहे का? असावे हि शंका....ते जाणून घेण्यास अधिक उत्सुक.

उत्तर ध्रुवीय रंगीत प्रकाशमय आकाशाचे हि असेच काहीसे गणित आहे असे वाचण्यात आले, त्यामध्ये भारीत धुलीकणांचे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी घर्षण होऊन रंगीत प्रकाश निर्माण होतो असे दिसते. जाणकारांनी अधिक वैज्ञानिक भाषेत माहिती पुरवावी.

तेजोवलय!

उत्तर ध्रुवीय रंगीत प्रकाशमय आकाशाचे हि असेच काहीसे गणित आहे असे वाचण्यात आले, त्यामध्ये भारीत धुलीकणांचे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी घर्षण होऊन रंगीत प्रकाश निर्माण होतो असे दिसते.

मी यासंबंधीत आणखी एका माहितीपर लेखामध्ये अशा तेजोवलयांबद्दल [पुर्वी] लिहिलेले आहे. त्यातील काही संबंधित अंश:
Aurora-borealis (उत्तर ध्रुवप्रदेशात आकाशात दिसणारे रंगेबेरंगी तेजोवलय), पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला लागून सारखा भडिमार करणार्‍या सौर वादळांतील (सौर-वात) काही गतिशील पदार्थांमुळे निर्माण होते, जे दक्षिणेकडेपासून ते न्यु यॉर्क शहरामधून बघितले जाऊ शकते.

धन्यवाद

अच्छा, धन्यवाद.

लेख आणि चर्चा आवडली

लेख आणि चर्चा आवडली.
- - -
वाहातुक नियंत्रणासाठी रंग जर १ किमी वरून अधिक धूसर असतील तर तो काहीतरी वेगळा प्रकार आहे. माझ्या ढोबळ गणितानुसार दृश्य-प्रकाशाचा १-२% अभिसरण-ह्रास १ किमि अंतरापर्यंत होतो. लाल प्रकाशाचा १% ह्रास होतो, तर निळ्या प्रकाशाचा २% ह्रास. इतका फरक नगण्य मानावा.

ढोबळ गणितासाठी : १ ऍट्मॉस्फियर दाबाखाली नायट्रोजन वायू मध्ये दर मीटरला १स १० इतका 532 nm हिरव्या प्रकाशाचा ह्रास होतो. १ - (१ - ०.९९९९९)१००० = ०.९९

शिवाय गडद लाल आणि गडद जांभळा हे रंग डोळ्यातील रेटिनामधील रंगद्रव्यांवर जास्त परिणाम करत नाहीत. वाहातुक चिह्न ठळक असावे या हेतूसाठी अभिसरणापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, असे वाटते. पिवले-हिरवे रंग अधिक ठळक असतात, असे वाटते.

हिरवा-पिवळा

ह्म्म, मानवी डोळे हिरव्या व पिवळ्या रंगांबाबत अधिक संवेदनशील असतात, हे मान्य.

लाल

बहुतेक जाहिरातींमध्ये (विशेषतः तयार खाद्यपदार्थ विकणारी दुकाने) लाल रंग असतोच! बर्गर, पीझ्झा, इ.चे कोणतेही दुकान पहा.
मानवी डोळे लाल रंगासाठीच संवेदनशील असतात. (म्हणूनच छायाचित्राच्या ऋणप्रतींचा विकास करण्यासाठी लाल रंग वापरतात काय?)

उपलब्ध माहिती संदर्भ

विकिपेडियावरील माहिती:
[...]the eye is most sensitive to wavelengths near 555 nm.[...]

शिवाय [या] प्रबंधामध्ये देखील हिरव्या नि पिवळ्या रंगाबाबत मानवी डोळे अधिक संवेदनशील आहेत, असं दिलेलं आहे.

वरील दोन्ही संस्थळावर आणि इतरत्रदेखील याविषयाची पाठराखण करणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे मात्र मला मिळू शकली नाहीत.

---

तुमच्या म्हणण्याला माझासुद्धा दुजोरा आहे, कारण मलासुद्धा लाल हा रंग भडक वृत्तीचा/भावना भडकावणारा/आकर्षित करणारा वाटतो. उलटपक्षी, हिरवा व निळा हे रंग मनाला सुखावह वाटतात, जसे की एखाद्या हिरव्यागार बागेमध्ये, अरण्यामध्ये मुक्त संचार करताना वाटते किंवा निळ्या आकाशाकडे पाहिल्यानंतर मनाला बरे वाटल्यासारखे भासते. बरेचदा मला—अवरक्त नि अतिनील रंग (किंवा गडद लाल नि निळा) अश्लिल किंवा आंग्ल भाव निर्माण करणारे भासतात/जाणवतात.

धन्यवाद

माहिती आणि मते पटली. कदाचित, डोळ्यांच्या पलिकडे, मेंदूमध्ये, लाल रंगाला अधिक महत्व (डोळ्यांनी कमी महत्व दिले तरी) दिले जात असेल.

सूर्याचा रंग

सूर्य सर्व प्रकारची विद्युतचुंबकीय प्रारणं बाहेर टाकत असला तरीही सर्वात जास्त हिरव्या रंगाचं (साधारणतः ५५० नॅनोमीटर्स) होतं. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान साधारण ६००० केल्व्हीन आहे, त्यामुळे या प्लॉटमधे दाखवल्याप्रमाणे सूर्यातून सगळ्यात जास्त प्रमाणात प्रारणं बाहेर पडतात ती साधारण हिरव्या रंगाची असतात. क्लोरोफिलचा रंग या हिरव्या रंगामुळे हिरवा असतो का? मानवी डोळ्यांना क्लोरोफिल्->अन्न आणि मग त्यासाठी जास्त सेन्सिटीव्ह या कारणामुळे हिरवा रंग सुखावह वाटतो का?

शक्य

होय, मलाही तसेच वाटते.

निळ्या रंगाची प्रारणे

वियेनच्या (खरे तर प्लॅन्क) आलेखाने (तुम्ही दिलेल्या) ५५०० केल्विन साठी ५०० नॅनोमिटर (निळ्या कडे झुकणारी) ही पीक वेवलेन्थ आहे. ६००० साठी ती अधिक निळ्याकडे झुकेल.
पानांमध्ये निळा रंग शोषुन घ्यायची प्रवृत्ती सर्वात जास्त असायला हवी. हिरव्या रंगाचे द्रव हे इतर रंग शोषुन घेतात आणि हिरवा तेवढा बाहेर पडतो असे तर नसणार ना?

प्रमोद

होय

क्लोरोफिल लाल आणि निळा रंग शोषते. पण ते हिरवे दिसते कारण सूर्यप्रकाशात हिरवा रंग असतो.

सफरचंद

मला सुद्धा तसेच वाटते... उदाहरणार्थ, सफरचंद लाल दिसतो कारण तो लाल रंगाचे उत्सर्जन करत नाही तर त्यावर सामान्यतः दिसणारा प्रकाश पडला की तो लाल रंग वगळता इतर सर्व रंगांच्या कंप्रता (किंवा तरंग/लहरी) शोषून घेऊन केवळ लाल रंगाच्याच तरंग(लांबी) परावर्तित करतो, ज्यामुळे सफरचंद लाल दिसतो. रात्रीच्या गडद अंधारात तेच सफरचंद लाल दिसेल का, उत्तर आहे—नाही! म्हणजे सफरचंद लाल आहे की नाही हे बघण्यासाठी दिवसा सामन्यतः जो उजेड असतो किंवा प्रकाशदिव्यातून पडणार्‍या लख्ख प्रकाशामुळे (पांढरा धरुन चला) आपण सफरचंदाचा लाल रंग पाहू शकतो. सफरचंदाला निळा/हिरवा हे रंग प्रिय(!) आसावेत, त्यामुळे ते रंग तो शोषून घेतो, व त्याचा नावडता रंग म्हणजेच लाल (येथे त्या रंगाच्या तरंगलांबी गृहीत धराव्या) तो उत्सर्जित करत असावा, नाही? ;) (आपल्या सुद्धा आवडी/नावडी असतातच ना!) इतर वस्तूंबाबत देखील आपण असा कयास बांधू शकतो; उदाहरणार्थ, लाल रंगाची कार, झाडांची हिरवी पाने, इत्यादी.

सफरचंद

हा हा!

तुमचे पिवळट, हिरवट सफरचंद अंधारात अनुक्रमे कुठल्या रंगांचे दिसतील? ;)

बरोबर

तुमचं बरोबर आहे, क्लोरोफिल हिरवा रंग परावर्तित करते.

सूर्याचा रंगः इथे दिलेल्या तक्त्यानुसार हिरवा रंग ४९५-५७० नॅनोमीटर या पट्ट्यात येतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान ५७७८ केल्व्हीन आहे. (विकी लिंक). वीनच्या नियमाप्रमाणे सूर्याच्या रंगाची तरंगलांबी साधारण ५०१ नॅनोमीटर्स येते. त्यामुळे सूर्याचा रंग हिरवा आहे असं मानतात.

सुर्य फिकट गुलाबी रंगाचा?

रंगांच्या तापमानाशी संबंधीत [प्लँक] आणि [वेन] यांचे नियम आहेत—रंग तापमान ५००० केल्व्हिन किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या रंगांना शीत रंग (निळसर पांढरे) म्हणतात; २७००-३००० केल्व्हिन रंग तापमान असलेल्यांना उष्ण रंग (पिवळसर-पांढरट लाल) म्हणतात.

[या] संस्थळावर [D65] नुसार ५७८० केल्व्हिन रंग तापमान असताना सुर्याचा पृष्ठभाग फिकट गुलाबी असेल, अशी नोंद आहे. (त्या संस्थळाच्या पार्श्वभागाचादेखील हाच रंग ठेवण्यात आला आहे!)

सूर्य पांढरा

सूर्याचा रंग पांढराच असतो. (हवे तर बघुन घ्या.) बरेचदा पांढर्‍या रंगाची व्याख्या सूर्यकिरणांनी केली जाते. डी६५ ही सूर्यकिरणांची व्याख्या करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

दिलेल्या तक्त्या नुसार डी ६५ हा रंग (६५०४ केल्विनला उत्सर्जन करणार्‍या ब्लॅक बॉडीचा उच्चतम वा पीक रंग) हा सूर्याकिरणांच्यातील उच्चतम वा पीक रंग आहे.
हा उच्चतम रंग (वियेनचे गणित हे उच्चतम रंगासाठी आहे.) आणि सरासरी रंग यात फरक आहे. कदाचित सरासरी रंग हा हिरव्याकडे झुकणारा असेल. पण तो गुलाबी निश्चित असू शकत नाही.

प्रमोद

निळा | शिवाय आणखी काही शंका/प्रश्न

निळा रंग इतर रंगांच्या तुलनेने अधिक परावर्तित होतो.* पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन (७८%) आणि ऑक्सिजन (२०%) आहे, प्रयोगशाळेत या वायुंना रंग नाही, अशी निरिक्षणे आहेत.[][] पृथ्वीवरील आकाश निळे दिसण्यामागे प्रस्तुत लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे अभिसारण प्रक्रियेमुळे या दोन वायूंच्या सुक्ष्मकणांद्वारे सुर्यापासून येणार्‍या पांढर्‍या प्रकाशातील निळा रंग सर्वांत जास्त विखुरला जातो. सुर्याच्या बाबतीत देखील असेच म्हणता येईल का? सुर्याच्या अंतरंगात (किंवा त्याच्या वातावरणात) सामान्यतः हायड्रोजन (९०%) आणि हेलिअम (९%) असते, प्रयोगशाळेत या वायुंना देखील रंग नाही, अशी निरिक्षणे आहेत.[][] सुर्याच्या बाबतीत देखील पृथ्वीप्रमाणेच होत असले तर त्याचा रंग निळा असू शकतो.

---

सुर्यापासून निघणारा प्रकाश पांढरा (सर्व दिसणार्‍या रंगाचे मिश्रण) असतो, म्हणजेच जर [संफरचंदा]चे उदाहरण (माहितीसाठी) घेऊन विचार केला तर सुर्य कुठलाच रंग शोषत नाही असे आढळेल, कारण तो पांढरा रंग परावर्तित करतो आहे, याअर्थी तो निळा, हिरवा, पिवळा हे आणि जांभळा, पारवा, नारंगी, लाल यापैकी सर्व रंग परावर्तित करत असणार... मग त्याचा रंग निळा, हिरवा किंवा पिवळा कसा असू शकेल, कारण हे रंग तर तो शोषतच नाही?

---

घरातील CFL दिव्यांपासून निघणारा पांढरा रंग आणि सुर्यापासून निघणारा पांढरा रंग, या दोहोंत काही फरक आहे का? डोळ्यांना तरी तो फरक जाणवतो... सर्वात मोठा फरक म्हणजे सुर्यापासून निघणारा प्रकाश खूप उष्ण असतो, त्यामुळे खूप गरम वाटते, याउलट CFL दिव्यांपासून निघणारा प्रकाश शीतल वाटतो, चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे! मग चंद्रापासून कुठला रंगाचा प्रकाश उत्सर्जित केला जातो? आणि सुर्यापासून पांढराच रंग उत्सर्जित होतो काय?

---

पांढरा रंग म्हणजे—जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, आणि लाल या मानवी डोळ्यांना दिसणार्‍या सात रंगांचे आणि इतर डोळ्यांना न दिसणार्‍या कमी-अधिक लहरींचे मिश्रण होय, असे आपण मानतो. याचे कारण (निकोलच्या) प्रिझममधून पांढरा प्रकाश जाऊ दिल्यास हे सात त्यामधून अपवर्तित होतात, अशी निरिक्षणे आहेत. मला पांढर्‍या रंगाची तरी एवढीच व्याख्या माहित आहे. याव्यतिरिक्त पांढर्‍या रंगाची काही व्याख्या उपलब्ध आहे/होऊ शकेल काय? (एखादा कलाकार, समजा चित्रकार ती व्याख्या कशी बनवेल?) जर पांढरा रंग हा वरील सात रंगांचे मिश्रण आहे, तर काळा हा प्राथमिक रंग नसल्यामुळे तो कसा बनवला जातो/बनतो आणि त्याची काय व्याख्या होऊ शकेल?


* ~ संदर्भ उपलब्ध नाही.

निकोल नाही

याचे कारण (निकोलच्या) प्रिझममधून पांढरा प्रकाश जाऊ दिल्यास हे सात त्यामधून अपवर्तित होतात, अशी निरिक्षणे आहेत.

निकोलचा लोलक केवळ धृवीकृत प्रकाश (पोलराईज्ड लाइट) मिळविण्यासाठी वापरला जातो, तुम्हाला, साधा प्रिजमच म्हणायचे असेल.
--------
सात रंग हे केवळ मानवी डोळ्यांनी केलेले सुलभीकरण आहे. 'पांढरा' म्हणजे (विशिष्ट किमान आणि कमाल तरंगलांब्यांच्या दरम्यानच्या) सर्व तरंगलांबींना समान प्रातिनिधित्व देणारा, मग तो ध्वनी असो की प्रकाश, अशी व्याख्या वापरली जाते. सामान्य नजरेला त्यात सातच रंग दिसतात, अन्यथा रंग अनंत असतात.
--------

सुर्याच्या अंतरंगात (किंवा त्याच्या वातावरणात) सामान्यतः हायड्रोजन (९०%) आणि हेलिअम (९%) असते, प्रयोगशाळेत या वायुंना देखील रंग नाही, अशी निरिक्षणे आहेत.

सूर्य रंगांना उत्सर्जित करतो, परावर्तित नव्हे. वायू (किंवा इतरही पदार्थ) तापमानानुसार प्रकाश सोडतात, कोणत्या तरंगलांबीचा किरण सर्वाधिक प्रखर असतो त्यानुसार त्या पदार्थाचा रंग ठरतो, तापमान वाढले की रंग निळ्याकडे झुकत जातो.
वर दिल्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र या दोन्हींच्याही प्रकाशांना पांढरे म्हणता आले (लाल ते जांभळा हे सारे रंग देणे या व्याख्येने) तरी सूर्याच्या प्रकाशाची (सर्वच रंग) तीव्रता पाच लाख पट अधिक असते, शिवाय त्यात अतिनील आणि अवरक्त किरण असतात त्यामुळे सूर्यप्रकाश 'उष्ण' असतो.

लाल हाच लक्षवेधी

हिरव्या रंगाच्या वस्तूंमध्ये (प्रमाण ९०%) लाल रंगाची वस्तू (प्रमाण १०%) असेल तर लाल रंगाकडे अधिक लक्ष वेधले जाते. हेच प्रमाण जर उलट केले तरीसुद्धा ९०% प्रमाण असणार्‍या लाल रंगाकडेच अधिक लक्ष वेधले जाते.

---

रस्त्यांवरील सिग्नलमधला लाल रंगाचा दिवाच अधिक लक्षवेधी वाटतो. (निरीक्षणांवरून) जेव्हा सिग्नल सुटतो, म्हणजे हिरवा दिवा लागतो, तेव्हा बरेचदा त्याच्याकडे त्या मानाने तेवढे लक्ष जात नाही, जेवढे लाल दिव्याकडे जाते. काही विशिष्ट अंतरावरून (जरा लांबूनच) लाल व हिरवा दिवा यांच्यातील निरीक्षणांवरून हिरवा दिवा त्या मानाने जरा अंधूक भासतो. (संध्याकाळच्या वेळी पूर्वेकडे असणार्‍या सिग्नलकडे बघतांना हा अनुभव मला आला.)

धुकं, धुरकं

धनंजय, तुम्ही केलेलं गणित सामान्य हवामानासाठी आहे का? धूलिकण, धूर, धुकं आणि/किंवा धुरकं असताना लाल रंगाचा अभिसरण र्‍हास हिरव्या रंगापेक्षा बराच कमी होतो हे खरं आहे का?

खूप मोठे कण असल्यास अभिसरणाचे गणित वेगळे खरे

खूप मोठे कण असल्यास अभिसरण वेगळे खरे. रेली/रॅले अभिसरणापेक्षा वेगळा प्रकार आहे.

वर श्री. प्रमोद सहस्रबुद्धे म्हणतात, तो ढगांचा रंग हा "मिए" गणिताप्रमाणे होतो. धूलिकणांसाठी वगैरे हेच लागू असणार. या मोठाल्या कणांनी सर्वच वेव्हलेंग्थच्या प्रकाशावर जवळजवळ समसमान परिणाम होतो. म्हणून ढग, धुके, वगैरे पांढरे-करडे दिसतात.

म्हणजे लाल काय निळे काय, सगळ्याच प्रकारच्या प्रकाशाचा धूलिकणांमुळे/जलबिंदूंमुळे समसमान प्रमाणात ह्रास होणार.

दूध

एका काचेच्या पेल्यामध्ये तीन चतुर्थांश पाणी आणि १ चतुर्थांश दूध घ्या (पेला थोडा रिकामा राहू द्यावा). त्या पेल्यावर पांढरा प्रकाशझोत पाडा. प्रकाशझोत ज्या दिशेने पडतोय, त्याच्या विरुद्ध दिशेस पेल्याच्या दुसर्‍या बाजुकडून एक कागद ठेवा. मी हा प्रयोग स्वतः अजुनही केलेला नाहिये*, तरीदेखील दुधातील स्निग्ध व प्रथिनांच्या कणांचे आकारमान पाहता ह्या प्रयोगातून अभिसारणाची प्रक्रिया समजणे सोयिस्कर जाईल, असे वाटते. पांढरा प्रकाशझोत पाडल्यानंतर पेल्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या कागदावर तो प्रकाश काहीसा लालसर (म्हणजे लालसर किंवा नारंगट पांढरा) पडलेला दिसेल. नंतर पेल्यातील दूधाचे प्रमाण थोडे थोडे वाढवत निरिक्षणे करा. दूध विरल असणे गरजेचे आहे, अन्यथा इच्छित परिणाम मिळणार नाहीत. दूध वाढवट राहिल्यानंतर काहीवेळाने असे निरिक्षणास येईल की पेल्यातून बाहेर कागदावर पडलेला प्रकाश हा नांरगी रंगाचा आहे. असे का?—सामन्यतः दूधातील स्निग्ध व प्रथिनांच्या कणांचा आकार पांढर्‍या रंगात असलेल्या कोणत्याही रंगाच्या (लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा) तरंग लहरीच्या लांबीपेक्षा अधिक असतो. ज्यामुळे रेलीच्या नियमानुसार बहुतेक सर्वच रंगांचे अभिसारण होते. (ज्यामुळे दूधाचा रंग पांढरा दिसतो, जसे की ढगांंच्या बाबतीत घडते?) या प्रयोगात याच कारणामुळे दूधाला पाणी टाकून विरल ठेवलेले आहे, ज्यामुळे लाल, नारंगी व पिवळा हे रंग वगळता इतर सर्व रंगांचे अभिसारण होते, कारण आपण प्रयोगात घेतलेले द्रव हे निव्वळ दूध नसून विरल दूधयुक्त द्रव आहे, ज्यामुळे तुलनेने कमी तरंगलांबी असलेल्या रंगांचे (निळा, पारवा, हिरवा) लगेच अभिसारण होते व ते पेल्यामध्येच इतस्ततः विखुरले जातात, याउलट विरलतेमुळे आणि तरंगांची लांबी थोडी अधिक असल्यामुळेच की काय, पण काही प्रमाणात लाल, नारंगी, पिवळा हे रंग अभिसारीत न होता पेल्यातून बाहेर कागदावर पडतात. म्हणून जरी आपण पांढरा प्रकाशझोत चमकावला असला तरी कागदावर मात्र काहीअंशी लालसर/नारंगी प्रकाश पडलेला दिसून येईल!

* ~ ह्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रायोगिक तत्वावर अभ्यास व निरिक्षणे करुन पडताळून पाहावेत.

कॉन्सेप्ट कळला.

डोळ्यासमोर चित्र लगेच उभे राहीले व कॉन्सेप्ट कळला. शाळेत मास्तर म्हणायचे की, निळा रंग सगळ्यात जास्त विखुरतो आणि इतर रंग त्याच्या तुलनेने कमी विखुरतात म्हणून आकाश निळे दिसते. पण त्याचे कारण काही ते सांगत नसत. आम्हीही विचारत नसु. आज कळले; धन्यवाद.

काही लिंका -
१. ही
२. ही

मस्त

मस्त लेख! आकाशवेध आवडला.

मुख्य गोष्ट सांगितलीच नाही.

श्री विशाल यांनी आकाश एका विविक्षित (निळ्या) रंगाचे का दिसते? याबाबत बरेच विवेचन केले आहे. पण यातल्या कळीच्या मुद्याला त्यांनी हातच लावलेला नाही. निळा रंग म्हणजे काय? हे त्यांनी सांगितलेलेच नाही. निळा रंग म्हणजे विद्युत-चुंबकीय लाटांच्या पटावर असलेल्या एका विशिष्ट वारंवारितेच्या लाटा हे स्पष्टीकरण येथे उपयोगी नाही.
प्रश्न असा आहे की या विशिष्ट वारंवारितेच्या लाटांनी होणार्‍या आपल्या डोळ्यावरच्या संवेदनांना आपण कशामुळे व का निळे म्हणून (किंवा इतर भाषांतील ब्ल्यू सारख्या आणखी दुसर्‍या कुठल्या शब्दाने) संबोधतो? जे लोक रंगांध असतात त्यांना निळा रंग म्हणजे काय ते समजत नाही.मग आपण जेंव्हा एखादी गोष्ट निळी आहे असे म्हणतो तेंव्हा असे तर नाही की आपल्या मेंदू मधे, या लाटेमुळे डोळ्यातून मेंदूकडे जो संदेश पाठवला जातो त्या संदेशप्राप्तीला, आपण निळे म्हणायचे असा प्रोग्रॅम लहानपणापासून मोठ्या माणसांच्या सांगण्यामुळे आपल्या मेंदूमधे तयार झालेला असल्याने आपण आकाशाला निळे म्हणतो? माझा श्री विशाल यांना असा प्रश्न आहे की आपण अमूक वस्तू तमूक रंगाची आहे असे का म्हणतो? (एक रंग सोडून बाकीच्या रंगांच्या लहरी त्या वस्तूत शोषल्या जातात वगैरे खुलासे येथे उपयोगी नाहीत. माझा प्रश्न त्याच्या पेक्षा जास्त मूलभूत आहे.)
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर