लाचुंग आणि गंगटोक
लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.
सिक्कीमची लोकसंख्या केवळ ५लाख. (हिंदू ६०+ टक्के बौद्ध ३०+ टक्के). त्यातील उत्तर सिक्कीमचा विरळ वस्तीचा तसाच उंची मुळे दुर्गम. लाचुंग आणि आसपास ही लहानशी गावे. सिक्कीम मधील हिमालय जसा उतरायला लागतो तो मातीचा (दक्षिणेकडे) दिसतो. उत्तर सिक्कीममधील हिमालय बहुतांशी खडकाळ.
सिक्कीम मधील मुख्य ठिकाण म्हणजे कांचनजंगा (३र्या क्रमांकाचे) शिखर. सिक्कीम मधे कुठेही उंचावर गेलो तर हे शिखर दिसते. त्याची दैवताप्रमाणे पूजा केली जाते असे स्थानिकांकडून ऐकले. गंगटोक मधून बघितले की या शिखराचा खडकाळपणा ध्यानात येतो. यानंतरची मुख्य गोष्ट म्हणजे तीस्ता नदी. सिक्कीम मधे आपण तीस्ता नदीच्या अंगाने जात प्रवेश करतो. तीच तीस्ता नदी उत्तर सिक्कीम मधे लाचुंग येथे आलेली दिसते. या नदीचे खोरे या भागात अतिशय खोल आहे. ठिकठिकाणी डोंगरातून धबधबे बाहेर येतात. ते इतक्या उंचीवरून (माझा अंदाज १ ते ३ हजार फूट) येतात की बहुतेक ठिकाणी सरकारने मोठमोठे जलविद्युत केंद्रे उभी करायचे ठरवले आहे.
लाचुंग हे आता मोठे पर्यटनस्थळ बनत चालले आहे. त्याला हिमालयातील स्वित्झरलँड म्हटले जाते. युमथँग भागात र्होडोडेड्रॉनची मोठी झाडी आहे. त्याला मार्च-मे मधे भरपूर फुले येतात. या बहरासाठी पर्यटके इकडे मोठ्या संख्येने येतात. (आम्हाला अर्थातच ती मिळाली नाहीत.) गंगटोक-लाचुंग हा प्रवास १२० किमि असला तरी जायला ५ तास लागतात. (दुर्गम रस्त्याचे एक चित्र पुढे येईल.) लाचुंग पुढे २४ किमि वर युमथँग. त्यापुढे रस्ता अधिक वर जातो आणि एका झिरो पॉईंट नावाच्या ठिकाणी थांबतो. पर्यटक इथपर्यंत जातात.
लाचुंगमधून पूर्वी तिबेटकडे जायला रस्ते (खेचराचे) होते. लाचुंग हे त्याकाळी एक व्यापारकेँद्र होते. लाचुंग मधून डोँगरातील कंगोर्यांपलिकडे (रिजलाईन) चीन असे स्थानिकांनी सांगितले. तिबेटशी असलेले हे नाते आजही टिकून आहे. सतराव्या कर्मापाविषयी सध्या एक वाद आहे. 16 वा कर्मापा दिवंगत झाल्यावर 17व्याचा शोध तिबेटी प्रथेप्रमाणे लहान मुलांमधे घेतला गेला. त्यातील कुठला कर्मापा अधिकृत धरायचा यावर हा वाद आहे. यातील एक दावेदार तरुण तिबेट मधून भारतात आला. हाच खरा कर्मापा असे दलाई लामाने मान्य केले. पण इतर दावेदार आणि चीन बरोबर असलेले संबंध लक्षात घेऊन भारताने त्यास मान्यता दिली नाही. 16व्या कर्मापाच्या अस्थी आणि गादी गंगटोक जवळील एका गोँपात (मोनॅस्ट्री) आहेत. त्या ठिकाणी सतराव्याला प्रवेश द्या असे सांगणारे फलक स्टीकर्स तुरळक ठिकाणी दिसतात. लाचुंग हे प्रामुख्याने बौध्द लोकवस्तीचे ठिकाण वाटले.
उत्तर सिक्कीम हा जसा दुर्गम तसा गरीब. पर्यटक इकडे येतात पण अजूनही पुरेशा संख्येने नाही. शाळा सोडलेली मुले जास्त प्रमाणात दिसतात. गोँपा हा शिक्षणाचा एक मार्ग. अगदी वसतीगृहासारखी लामा मंडळी येथे राहतात. त्या मंडळींचे भलेच होते असे आमच्या वाहनचालकाचे म्हणणे होते. तर लाचुंग मधील हॉटेलमालकाचा एक भाऊ लामा होता. लामांमधे मुली पण असतात त्यांना ऍनी म्हणतात. त्यातील मुलांना कधी कधी लग्न करायला परवानगी असते. मुलींना मात्र नाही. (ही वाहनचालकाचे माहिती.) गंगटोक मधे तिबेटॉलॉजीची एक संस्था आहे. तिकडे खूप संख्येनी पुस्तके आहेत. (भेट देता आले नाही.) उत्तर सिक्कीमची माणसे गरिबी, शिक्षण यामुळे थोडीफार दादागिरी करणारी. रोजगार राखून ठेवणारी. वाहनचालक फक्त उत्तर सिक्कीमचा असावा लागतो हा त्यातील एक अलिखित नियम.
लाचुंग कडे यायला लागल्यावर पहिल्यांदा भिडते ते उंच कपारींच्या डोंगरांचे वैभव. हा दगड कित्येकदा उभा (80-90 च्या कोनात) दिसतो. पाऊस भरपूर. दगड फारसा मजबूत नाही (असे विकीवर म्हटले आहे. मला तो खूप कठीण दगड वाटला.) दगडांच्या कपारीत पाणी साठून राहते. उंची मुळे पाण्याचा दाब वाढत जातो आणि मग डोंगर फुटतो. असे फुटलेले भाग वारंवार लागतात. वर फुटलेले भाग
पाण्याबरोबर घसरत खाली येतात. आणि अशा खडकांची नदी झाल्यासारखी दिसते. फुटलेला खडक पांढर्या रंगाचा. अगदी नर्मदेतल्या गोट्यांसारखा दिसतो. डोंगरातला खडक मात्र काळा. (वातावरणामुळे झालेला.) कधी कधी नदीतील खडकावर सोनेरी रंगाची पुटे (गंधक सदृश्य) दिसतात. याच भागात छोटेसे गरम पाण्याचे झरे आहेत.
फोटोमधून वरील पैकी काही.
गंगटोकमधून दिसणारे कांचनजंगा शिखर.
लाचुंग गाव आणि तीस्ता नदी.
लाचुंगला जातानाचा रस्ता. खडक अगदी कॅनॉपीसारखा रस्त्यावर आला आहे.
युमथँग मधील एक भाग.
लाचुंगमधील गुराखी मुले.
तीस्तातील काही दगड.
लाचुंगची फुले
मंत्र लिहिलेले झेंडे. (लाचुंग)
दगडफुटीचे एक दृष्य. दगड डोँगरामागून वाहत आले आहेत. तेच दगड मग रस्त्यावर आले आहेत.
अधिक प्रकाशचित्रांसाठी इथे पहा
Comments
मस्त
छान फोटो आणि वर्णन.
दगडांच्या नदीत चुनखडक असावेत काय? (फेल्डस्पार अणुकुचीदार असतात असे वाटते. की आणखी काही वेगळे पांढरे दगड?)
झकास
छायाचित्र १ आणि २ ...अशक्य प्रकार आहे...आभारी आहे. माहितीही उत्तम. :)
+१
असेच म्हणतो !
गांतोक
तुमचा लेख मस्त आहे.
छायाचित्रे तर फारच मोहक आहेत. मी तिकडे पोस्टींगला असताना, नॉर्थ सिक्किमचे - वन्य प्राणी व फुलांची छायाचित्रे माझ्याकडे आहेत. आपणाला कधीतरी पाठवीन.
मला सगळ्यात भावलेल्या दोन गोष्टी -
१. प्रत्यक घरातुन छान छोट्या कुंड्यांतून फुले लावुन घर सजवलेले असते.
२. स्वच्छता व टापटीप.
तिथली लोकं गंगटुक ला गांतोक असे म्हणतात (जाता जाता)
सिक्कीमला पोस्टींग
मी राहतो त्या कॉलनीतील एक जण सिक्कीमला पोस्टींगला होते. ते ही तेथील रंजक कथा सांगुन आम्हाला जळवायचे.
प्रमोदजींनी विदर्भानंतर एकदम सिक्कीमच्या द-या-खो-यातून भटकंती चालू केली आहे. पुढील भटकंतीस शुभेच्छा.