नथुला

नाथुला (ला म्हणजे खिंड वा इंग्रजीतला पास)

भारतातून चीन (तिबेट) कडे जायला तीन महत्वाचे रस्ते आहेत. त्यातील नथुला सिक्कीम मधे येतो. याच मार्गाने सध्याचे दलाई लामा भारतात आले. तिबेटची राजधानी ल्हासा येथून बरीच जवळ आहे. दिवाळीत सिक्कीमला जाऊन आलो त्यादरम्यान गंगटोक, लाचुंग आणि नाथुला अशी तीन महत्वाची ठिकाणे पाहिली.

सिक्कीमला जायचे असेल तर बागडोगरा विमानतळावर वा सिल्गुडी/जलपायगुडी रेल्वेस्टेशन (सर्व बंगाल प्रांतात येतात.) तिथून दार्जिलिंग वा गंगटोक (अंदाजे १२० किमि.) कडे जायचे रस्ते आहेत. याच भागातून (सिल्गुडी) पुर्वोत्तर राज्यात जाण्याचे महत्वाचे मार्ग आहेत. सिक्कीमच्या पूर्वेला भूतान आणि चीन ला जाणारे मार्ग आहेत. उत्तर विभाग (लाचुंग/लाचेन) अतिशय दुर्गम आहे. तिकडून पुढे (चीनकडे) जायला काहीही मार्ग नाही. पूर्वेकडून नेपाळला जायचा रस्ता. भारत आणि चीनची सीमा ही डोंगर्‍यातील कंगोर्‍याने (रिजलाईन) निश्चित झाली आहे. हा कंगोरा जीथे सर्वात खालती (?) आहे (सॅडल पॉईंट) तिथे नथुला वसले आहे. येथून दोन्ही बाजुची उतरंड आहे.

सिक्कीम भारतात येण्यापूर्वी (१९७६) त्याच्या सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे होती. १९६७ साली थोड्याशा जागेकरता एक मोठी चकमक येथे झाली होती. भारतीय सैन्यातील जवळ पास चाळीस जण मृत्युमुखी पडले होते. चीनी सैन्याने एक छोटासा भूभाग घेतला होता. दोन्ही कडे उतरंड असल्याने जो कंगोर्‍यावर राज्य करतो त्याला युद्धात मोठा फायदा मिळू शकतो. (उंचीचा फायदा, आणि कंगोर्‍यामागे लपायची जागा). या चकमकीनंतर जी युद्धशांती झाली तेंव्हा पूर्वेची सीमा बहुतांशी जशीच्या तशी ठेवण्याबाबत सहमती झाली. (एक वरच्या अंगाचा भूभाग सोडल्यास).

यानंतर भारत चीन बदलत्या राजकीय समीकरणात हाच मार्ग व्यापारासाठी खुला केला गेला. 'वाघा' जसे पर्यटन स्थळ झाले आहे. तसेच नथुला हे पण झाले आहे. जायला विदेशी नागरिकांना परवानगी नाही. (ते १५-२० कि.मि. पर्यंत जाऊ शकतात.) भारतीय नागरिकांना मात्र इथे जाण्याचा परवाना मिळतो. आपले ओळखपत्र आणि दोन फोटो असले की ते सहज मिळते. (१५ मिनिटात मिळते असे ऐकले.)

नथुला हे १४२०० फुटावर (अजून मीटर उंचीच्या बाबतीत कुणाच्या मनात फारसे वसले नाही.) आहे. गंगटोक वरून तिकडे जाण्याचा मार्ग अरुंद आणि वर वर चढत जाण्याचा आहे. वर चढत जाणारा मार्ग काहीसा असा आहे.

nathula1

वाटेत हा तलाव लागतो (विदेशी इथपर्यंत जाऊ शकतात.)

nathula2

तलावा काठी एक पर्यटनस्थळ झाले आहे. तिथे याकवर बसून सैर करता येते.

nathula yak

नथुलावर पोचल्यावर पहिल्यांदा दिसते ते चकमकीत मरण पावलेल्यांचे स्मारक.

.

दोन मुख्य इमारती. एक भारतीय तर दुसरी चीनी. भारतीय इमारती सोबत भारताची तटबंदी दिसते आहे.

nathula indian fortification

भारतीय बाजूचे खूप पर्यटक आले आहेत. तर चीनी बाजूचे कोणीच दिसत नव्हते. आम्ही विचारले तर ते आधीच येऊन गेले असे कळले. (फारसे येत नाहीत.) याचे कारण भारतीय लोक अलाहाबादची वेळ पाळतात तर चीनी शांघाईची (?). त्यामुळे ते अडीच तास पुढे आहेत !

सीमेच्या करारामुळे सीमा १९६७ मधे जशी होती तशीच आहे. एक छोटेसे तारेचे कुंपण. पलिकडची इमारत अगदी जवळ. फोटोत जी इमारत् दिसते आहे ती चिनी. तर पर्यटक आणि सैनिक इकडच्या बाजुचे.

china india

थोडे पलिकडे बघितले की चीन मधील रस्ता दिसायला लागतो. हा इतका चांगला दिसतो की भारत सरकारने चांगला रस्ता बनवायचे मनावर घेतले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता रुंदीकरणाची मोहिम होती. त्यात होत्या त्या रस्त्याच भजं झाले होते. पण तयारीवरन वाटत होते की रस्ता चांगला होईल.

चीनी हद्दीत दूरवर एक शिखर दिसते. जगातले सात का आठ नंबरचे शिखर. आणि दूरवरचा रस्ता (ल्हासाकडे जाणारा)

china peak

या सर्वात जाण्यायेण्याचे दार मात्र लपून गेले होते. हे दार मात्र सीमेवरचे वाटते. पलिकडे चीनी सैनिक दिसत होते.

.

हे दार सोमवार ते गुरुवार उघडते. चीनी व्यापारी दहा बारा किमि. आत असलेल्या चीनी बाजारापर्यंत येतात. तिकडे ते आपल्या जवळील कपडे, तांत्रिक वस्तु (फार मोठा व्यापार वाटला नाही.), शोभेच्या वस्तु विकतात. भारतातून पार्ले जी, डालडा अशा वस्तु घेऊन जातात. भारतीय व्यापारी याच प्रमाणे चीन मधे १०-१२ किमी आत जातात आणि खरेदी विक्रीकरून परत् येतात.

शतकानुशतके वाटचाल झालेला आणि ज्याला सिल्क रूट म्हणतात असा खेचरांनी जाण्याचा मार्ग नथुलाच्या दक्षिणेस आहे. हल्ली तिकडे जायला मनाई आहे.

परतीच्या प्रवासात काही जंगली फुलांची चित्रे मिळाली. लाल रंगाचे ताटवे मातकट जमीनीवर उठून दिसत होते.

nathula flowers

प्रमोद

Comments

सुरेख

चांगली माहिती आणि फोटो.

सीमेवरील व्यापारी दरवाज्यावरील पाटी फक्त चिनी आणि इंग्रजी भाषेत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले.

मस्तच

नविन माहिती मिळाली... चिनी-व्यापारी असे हद्द ओलांडून जाऊ शकतात हे वाचून आश्चर्य वाटले. भारतीय हद्दीतील आरसीसीचे कॉलम्स, शटरींग वगैरे जे दिसत आहे ते काही नवीन बांधकामाचे का सोडून दिलेले काम?

सुनील यांच्याशी सहमतः "सीमेवरील व्यापारी दरवाज्यावरील पाटी फक्त चिनी आणि इंग्रजी भाषेत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले."

फोटो पण छान आले आहेत. मुंबईहून/महाराष्ट्रातून जायला-येयला किती वेळ लागतो?

उत्तम

उत्तम , रोचक माहिती. लेख आवडला.

अवांतर : शीर्षक वाचून पार्ट ३ आला का काय असे क्षणभर वाटले होते. हघ्या ! ;-)

त्रोटक

वर्णन जरा त्रोटक वाटले. जास्त डिटेल्स वाचायला आवडली असती.
(१५ मिनिटात मिळते असे ऐकले.)
लेखकाने हा पास कसा काढला त्याला जास्त वेळ का लागला हे कळले तर इतर प्रवासी तीच चूक करणार नाहीत.
फोटो उत्तम, तिथल्या परिस्थितीची कल्पना देतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

क्रमशः नाही?

छान फोटो आणि माहिती पण अजून येऊद्या.

छान

छान लेख. अजून मोठा व्हायला हवा होता.
लगेच संपला, पण तरीही आवडला.

आपला
गुंडोपंत

लेख आवडला! प्रकाशचित्रे उत्तम आहेत. नातू-ला=ऐकत्या कानांची खिंड.

प्रमोदजी, आपला लेख आवडला.
आपली प्रकाशचित्रे उत्तम आहेत. माहितीही छान आहे.

मात्र खिंडीचे नाव नाथुला नसून "नातू ला" म्हणजेच ऐकत्या कानांची खिंड असे आहे.
हा शतकानुशतकांचा जुना रेशिममार्ग आहे. त्या खिंडीतून जाणारे-येणारे प्रवासी देशविदेशातील गोष्टी करत असत. त्या गोष्टी खिंडीला (की तिथल्या लोकांना?) ऐकू येत, म्हणून त्या खिंडीचे नाव स्थानिक भाषेत नातू-ला म्हणजेच ऐकत्या कानची खिड असे पडले.

अधिक माहिती माझ्या प्रवासवर्णनात मिळू शकेल. दुवा खाली देत आहे.

http://nvgole.blogspot.com/2010/04/blog-post_25.html#links

झकास लेख....

"नथु ला " हे नाव पहिल्यांदा बातम्यात ऐकलं ते असं:-
"नथु ला मधुन व्यापारास अनुकूलता दाखवुन चीनने सिक्किमच्या भारतातील् समावेशाला अप्रत्यक्षपणे मान्यताच दिली आहे."(जाहिर् नाही. अजुनही ते इशान्य भारतातल्या आख्क्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेशातील् तवांग च्या नावाने गुरकावत असतोच

त्यानंतर नाव दिसलं ते CNN का BBC च्या स्फोटक एपिसोडमध्ये.
भारतिय वाघांची जी कत्तल् आणि तस्करी होते, त्याचा सर्वात् मोठा ग्राहक आहे चीन.
तिथले थेट उच्चपदस्थ ते सामान्य सैनिक अधिकारी राजरोस/खुलेआम् वाघाचं मांस भक्षण् मोठ्या खुशीनं करतात.
त्याची कातडी विविध वस्तुंसाठी वापरतात. कित्येक् अवयव पारंपारिक् चायनिज औषधी बनवण्यासाठी वापरात येतात.
आणि हे सगळे होतं कुठुन? तर थेट भारत-चीन सीमेदरम्यान विविध मार्गानं हे होतं.
ह्या नथु-ला च्या जवळच अजुन काही छोटे छोटे अनवट मार्ग आहेत, जिथुन् हे होतं.
नथु ला चा परिसर हे ह्या उद्योगाचं फार मोठं केंद्र आहे असं ती documentry म्हणते.

मस्त

लेख अजून विस्तृत असता तरी आवडला असता. चिन्यांना डालडामध्ये आणि पार्ले-जीमध्ये रुची आहे हे वाचून गंमत वाटली.

सर्वात पहिल्या फोटोत हा प्रदेश हिरवागार दिसतो पण तळ्याच्या काठी ओसाड, वाळवंटी. असे का असावे?

काही उत्तरे

मुंबईहून/महाराष्ट्रातून जायला-येयला किती वेळ लागतो?


जवळचा विमानतळ बागडोगरा. (गंगटोक जवळ अजून एक विमानतळ बांधणे सुरु आहे. २-३ वर्षात होईल असा अंदाज आहे.)
बागडोगराला मुंबईहून थेट विमान नाही. आम्ही मुंबई- दिल्ली-बागडोगरा असे गेलो. (सकाळी ७ च्या विमानाने १ वाजता पोचलो असू.) त्यानंतर पुढील प्रवास टॅक्सीने. वेळ साधारण ४-५ तास. बागडोगरा गंगटोक हेलिकॉप्टर सोय आहे.

पासः हे सर्व टॅक्सीवाला बघून घेतो. आदल्यादिवशी फोटो वगैरे दिले दुसर्‍या दिवशी आम्ही जायला तयार होतो.

नुकतीच नरेंद्र गोळे यांची अनुदिनी पाहिली. अधिक माहितीसाठी बघु शकता.

नथुला, नातुला, नाथुला मला नेमके माहित नाही विकीवर नाथुला लिहिले आहे. उच्चार नथुला कडे झु़कणारा वाटला.

राज्याची लिपी देवनागरी. त्यामुळे रस्त्यावरच्या पाट्या व्यवस्थित वाचता यायच्या. कधी गंगटोक, गांतोक आणि गँगटॉक (याच नावाचे मॉलरोडवर उपहारगृह आहे.) अशा नावाने दिसतात. त्यामुळे श्री गोळे यांनी लिहिल्याप्रमाणे नातुला असणे शक्य आहे.

अवांतर 'प्रिन्टीङ्ग प्रेस' अशी लिहिलेली पाटी मी पाहिली.

वाघांची माहिती नवीन कळली. अशा तस्करीची जाणीव झाली नाही.

तळ्याकाठी ओसाड का वाटते?

याची नीटशी कल्पना येत नाही. सिक्कीम मधे शेती अगदी कमी आहे. पाऊस भरपूर (३५०० मिमि. वर्षाला) उत्तरेकडे जंगल आहे. नाथुला च्या भागात हिरवळ फारशी नाही.

प्रमोद

शिर्षक

शिर्षकात नथु बघून अजून एक ब्लॉकबस्टर लेख आला आहे की काय असे वाटले पण लेख उघडल्यावर प्लेजंट सरप्राइज मिळाले. लेख आणि फोटो फारच छान आहे.

रिपीट ज्योक

सुरेख

सुरेख लेख.
सिक्किम, गंगटोक, दार्जिलिंग या भागात गेले की परत यावेसे वाटत नाही. आणि परत आल्यावर पुणे-मुंबई बकाल वाटतात.

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

छान

लेख फोटो माहिती, सर्व आवडले.

व्वा!

व्वा, जावेसे वाटतेय तेथे.

 
^ वर