झिंदगीके बाद भी......!
तत्वज्ञाच्या समोर सर्वांतर्यामी परमेश्वर प्रगट झाला व म्हणाला:
"मी तुझा परमेश्वर आहे. तुझ्याजवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त माझ्या अस्तित्वाविषयी एकही सज्जड पुरावा नाही, हे मला माहित आहे. तू मला, माझ्या भाविकांना, माझ्या धार्मिकांना नाकारतोस हेही मला माहित आहे. योग्य कारण वा पुराव्याशिवाय तुझा कशावरही विश्वास बसत नाही म्हणून तुझ्याच भल्यासाठी माझ्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यासाठी एक भले भक्कम कारण मी तुला सुचवतो. कदाचित तुला ते पटेलही.
मुळात माझ्याविषयी दोन संभाव्यता असू शकतात: मी आहे किंवा नाही. तू माझ्या शब्दावर विसंबून माझ्या अस्तित्वावर विश्वास ठेवल्यास तुला मोक्ष मिळेल. तुझ्या मृत्युनंतर तुला सुदीर्घकाळ स्वर्गसुख मिळेल. मी जर नसेल तर तुला हे अल्पायुषी जीवन काही काळ (बिनधास्त!) जगता येईल. माझे अस्तित्व नाकारल्याचा असुरी आनंद मिळेल. मला प्रसन्न ठेवण्यासाठी नवस, यात्रा, दर्शन इत्यादीवरील खर्च वाचेल. बुवा, बाबा, माँ, महाराज या माझ्या दलालांची भीती बाळगण्याचे कारण उरणार नाही. तूझा वेळ वाया जाणार नाही. परंतु तुझ्या मृत्युनंतर या गोष्टी गौण ठरतील. याउलट माझ्यावर विश्वास ठेवल्यास मृत्युनंतर दीर्घ काळ स्वर्गसुख देण्याची मी हमी देतो.
एक मात्र खरे की माझ्यावर श्रद्धा नसल्यास आणि मी अस्तित्वात नसल्यास तुला सर्व ऐहिक सुखं बिनदिक्कतपणे भोगता येतील. फक्त तुझ्या या अल्पजीवी आयुष्यात काही कमी जास्त झाल्यास तू माझ्या आधाराविना पोरका होशील. दैवीभक्तीतून मिळणार्या भरवश्यापासून वंचित होशील. परंतु मी अस्तित्वात आहे आणि तरीसुद्धा तू माझ्यावर श्रद्धा ठेवत नसल्यास मृत्युनंतरच्या आयुष्यात नरकयातना भोगाव्या लागतील.
यासाठी मी तुला दोन पर्याय सुचवतो, यापैकी एकाची तू निवड करू शकतोस;
एक, माझे अस्तित्व नाकारून (ऐहिक सुख भोगत) मेल्यानंतर नरकयातना भोगणे;
दोन, मी अस्तित्वात आहे यावर विश्वास ठेवत (माझ्यासाठी श्रम, वेळ, पैसा खर्च करत असल्यामुळे होणार्या) थोडेसे त्रासदायक आयुष्यानंतरच्या मृत्युनंतर स्वर्गसुख भोगणे;
हा दुसरा पर्याय नाकारल्यास तुझ्यासारखा मूर्ख जगात कुठेही नसेल. "
Source: Pensées by Blaise Pascal
जगभर असे अनेक जण आहेत की जे नियमितपणे (वा अधून मधूनसुद्धा!) देवळाला जात नाहीत, धार्मिक ग्रंथ वाचत नाहीत, देवाची पूजा अर्चा करत नाहीत, बाबा - बुवावर विश्वास ठेवत नाहीत, तरीसुद्धा त्यांची देवावर गाढ श्रद्धा आहे. ते ईश्वराचे अस्तित्व नाकारत नाहीत. या जगात देव आहे याबद्दल त्यांच्या मनात अजिबात शंका नाही. म्हणूनच ते आपल्या मुलां- मुलींवर धार्मिक संस्कारांचा आग्रह धरत असतात. सकाळ - संध्याकाळ देवाची प्रार्थना करण्यास सुचवत असतात. मुंजीसारख्या कालबाह्य विधीसाठी आटापिटा करतात, विवाह सोहळ्यासाठी आवर्जून भट - ब्राह्मणांना बोलावतात. (लहान मुलं - पत्नी - वा वृद्ध आई -बाबांच्या आग्रहाचे निमित्त पुढे करून) गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सणवार वर्षानुवर्षे साजरे करतात. गावच्या जत्रेत हिरीरीने भाग घेतात. घरातल्यांच्या व्यक्तीच्या मरणानंतरचे धार्मिक विधी करायला विसरत नाहीत. श्राद्ध, पक्ष, पितृपंधरवडा कधी चुकवत नाहीत. अडचणीच्या प्रसंगात - मनातल्या मनात का होईना - देवाचे नामस्मरण वा प्रार्थना करतात.(यातून मानसिक समाधान व बळ त्यांना मिळते!)
ही मंडळी वर उल्लेख केल्याप्रमाणे ईश्वरानी पुढे ठेवलेल्या पर्यायापैकी एकाची निवड केली आहे असेही म्हणता येत नाही. परंतु त्यांच्या एकंदर वागणुकीत (व विचार करण्याच्या पद्धतीत) कुठेतरी सुप्तपणे दुसर्या पर्यायाला स्थान दिले आहे हे लक्षात येईल. कदाचित हा ईश्वर खरोखरच जगात असल्यास (व आपले बरे - वाईट करण्याची शक्ती त्याच्यात असल्यास) या (व मृत्युनंतरच्या!) आयुष्यात त्रास होता कामा नये हा विचार त्यामागे असेल. उगीच विषाची परीक्षा का म्हणून घ्यावी? काही नुकसान तर होत नाही ना ! हा हिशोबीपणा त्यामागे असेल. कदाचित आत्मोद्धारासाठी हे सर्व करणे भाग आहे असेही वाटत असेल. झिंदगीके साथ भी और झिंदगीके बाद भी......!
जुगार खेळताना दोनच पर्याय समोर असल्यास पैज कशी व कुणावर लावावी हे ठरविणे सोपे असते. परंतु देव - धर्म या विषयात आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे निवड कठिण ठरते. त्यातही जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी असल्यास त्याच्यावर पैज लावण्याच्या भानगडीत कुणी पडत नाहीत. परंतु देव - धर्माच्या बाबतीत हे ठोकताळे चुकीचे ठरत आहेत. इथे पैजेवर ईश्वराच्या अस्तित्वाची हमी देणारे सापडतात.
ईश्वर - धर्म या बाबतीत दोन - तीन नव्हे तर अनेक पर्याय निवडीसाठी उपलब्ध आहेत. येथे शेकडोनी देव आहेत, डझनभर धर्म आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हजारो प्रकारचे उपाय आहेत. फक्त स्वर्गाची चावी कुणाकडे आहे याचाच पत्ता नाही. ख्रिश्चनांच्या येशू क्रिस्ताकडे ही चावी असल्यास हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख, ज्यू इत्यादी धार्मिकांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, हे मात्र नक्की! अल्लाकडे चावी असल्यास इतर काफिर धार्मिकांना स्वर्गसुख मिळणार नाही. धर्म व देव निवडण्यात चूक झाली म्हणून इतर धार्मिकांना नरकयातना भोगाव्या लागतील.
हा ईश्वर करुणाळू, दयाघन, असे काही तरी असल्यास चुकीचा धर्म निवडल्याबद्दल एवढी मोठी - नरकयातनेची - शिक्षा देणार नाही यावर समाधान मानून आपापल्या धर्माप्रमाणे वागण्यात चूक नाही, असेही वाटण्याची शक्यता असेल. परंतु हाच करुणाळू देव नास्तिकांवर दया-माया दाखवणार नाही - त्यांना नरकातच पाठवणार - या बद्दल मात्र सर्व धार्मिकांचे एकमत असेल. याबाबतीत मात्र धर्मांधांची ईश्वरनिष्ठा संशयातीत ठरेल. कारण स्वत:च्या धर्माव्यतिरिक्त इतर कुठलाही धर्म (व ईश्वर) जगात असूच शकत नाही, यावर त्यांची नितांत श्रद्धा असते व त्यासाठी जीव द्यायची व/वा जीव घेण्याची त्यांची तयारी असते.
गंमत म्हणजे हा सर्वांतर्यामी, त्रिकालज्ञानी परमेश्वर (जो सर्व चराचरांचे नियंत्रण करत असतो!) अशा मतलबी, हिशोबी, स्वार्थी भक्तांच्या श्रद्धांचा स्वीकार कसा काय करू शकतो हे एक न सुटलेले कोडे आहे. म्हणूनच हे सर्व भक्तीचे (श्रद्धेचे!) छानपैकी नाटक वठवित असतात. ईश्वरावरील श्रद्धेत वा धर्मपालनेत विचार, तत्व, तर्क इत्यादीपेक्षा कर्मकांड, रूढी, प्रथा, अवडंबर, उत्सव यानाच जास्त महत्व दिले जाते. कर्मकांड करून मोकळे व्हायला काय हरकत आहे, ही मानसिकता बळावत जाते. परंतु हा ईश्वर (खरोखरच असल्यास!) यांच्या श्रद्धेमागच्या मतलबीपणा, ढोंग, हिशोबिपणा अंतस्थहेतू, अप्रामाणिकपणा सहजपणे ओळखून त्याप्रमाणे शिक्षा देवू शकतो, स्वर्गाची दारे (कायमचे) बंद करू शकतो. परंतु असे कधी घडलेले ऐकीवात नाही.
यामुळे आपल्याला दुसरा पर्याय निवडताना जास्त काळजी घ्यावी लागेल. एकीकडे कुठल्याही प्रकारची दया-माया न दाखवणारा , चूक झाल्यास जबरदस्त शिक्षा देणारा, व इतर धर्माच्या ईश्वरांशी स्पर्धा करणारा (धर्माँधांचा!) ईश्वर व दुसरीकडे तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता तुमच्या सर्व चुका पोटात घेत तुम्हाला संधी देणारा निरुपद्रवी ईश्वर असेल. तरीही धर्मांधांचाच ईश्वर निवडायचे असा हट्ट धरल्यास त्यातही अनेक पर्याय उपलब्ध असून तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व, जीवनशैली, तुमच्या आशा आकांक्षा, तुमच्यावरील संस्कार यावरून ईश्वराची निवड करता येईल.
या सगळ्या जंजाळातून सुटण्यासाठी मरणोत्तर स्वर्गसुखाची काळजी न करता एक चांगले आयुष्य जगण्यासाठी पहिला पर्यायच योग्य ठरेल. स्वर्गसुखाच्या मृगजळाच्या मागे न लागता हेच जीवन आणखी छानपणे कसे जगता येईल याकडे लक्ष दिल्यास आयुष्य सार्थकी लागेल.
परंतु शेवटी हा एक जुगार आहे हेही लक्षात असू दे!
Comments
हे पण लक्षात असू द्या.
>>या सगळ्या जंजाळातून सुटण्यासाठी मरणोत्तर स्वर्गसुखाची काळजी न करता एक चांगले आयुष्य जगण्यासाठी पहिला पर्यायच योग्य ठरेल. स्वर्गसुखाच्या मृगजळाच्या मागे न लागता हेच जीवन आणखी छानपणे कसे जगता येईल याकडे लक्ष >>दिल्यास आयुष्य सार्थकी लागेल.
>>परंतु शेवटी हा एक जुगार आहे हेही लक्षात असू दे!
मान्य, पूर्ण पणे, पण जे घाबरून तो पर्याय स्वीकारतात त्यांची पूर्ण बाजू तुम्ही मांडली नाहीये असे मला वाटते. ती मांडायचा प्रयत्न करतो.
१. माझ्याबरोबर कल्पनातीत घटना घडली, कोणी लुटण्याचा प्रयत्न केला, माझी चूक नसताना देखील मला/माझ्या जवळच्या लोकांना अपघात झाला, अतिशय विचार/संशोधन/खर्च करून पिक लावले पण पाऊसच पडला नाही किवा जास्त पडला, मी झोपडपट्टीत जन्माला आलो त्यामुळे सहज मिळणाऱ्या संधी मिळणे दुरापास्त झाले. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःच कसा जबाबदार आहे? हे कोणामुळे घडले? ह्यामागचा तर्क काय? माझा मुलगा जन्मतःच अधू निघाला किवा काही genetic defects मुळे, त्याचं आयुष्य दुर्धर झाले.
२. मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलो, मी एका मोठ्या अपघातात वाचलो, बाकीचे जवळपास सर्वच लोक मरण पावले, मी मात्र थोड्याश्या जखमेवर बचावलो.
ह्या गोष्टीना एका सामान्य माणसाला कळेल असा तर्क देऊ शकतो का? मग प्रत्येकाच्या तर्काची एक सीमा आहे, त्याच्यापलीकडे तो निराश होतो आणि आधार शोधतो, तो आधार जो देऊ शकतो तो देव किवा संत होतो असे मला वाटते.
तुम्ही म्हणताय तो विचार खूप विवेकी किवा खाऊन पिऊन सुखी असलेल्या माणसांनी केलेला आहे.
हे पण लक्षात असू द्या.
अंशतः सहमत
विवेकी निर्णय म्हणजे काय? अनेक पर्याय उपलब्ध असताना सर्वाधिक फायद्याची कृती करणे, अशी व्याख्या शक्य आहे.
जर एका कृतीमुळे हजार रुपये मिळण्याची १०% शक्यता असेल आणि दुसर्या कृतीमुळे ५० रुपये नक्की मिळणार असतील तर पहिली कृती करणे 'बुद्धिमान' ठरते. समजा, एखाद्या प्रजातीच्या एक हजार सजीवांनी पहिल्या प्रकारचा पर्याय निवडला आणि एक हजार सजीवांनी दुसर्या प्रकारचा पर्याय निवडला, तर पहिल्या गटाला अधिक फायदा होईल आणि उत्क्रांतीमध्ये त्यांची संख्या वाढेल. आपली 'फायदा' संकल्पना अशी संख्याशास्त्रीय आहे.
देव असण्याची शक्यता ०.००००००१ % आणि नसण्याची शक्यता ९९.९९९९९९९ % असती, तरी पहिल्या शक्यतेसोबत जोडले गेलेले बक्षीस इतके प्रचंड आहे की देव मानण्यातच फायदा असता.
पास्कलचा जुगार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देव असण्याची शक्यता ०% असल्याचे सिद्ध करणे.
एकापेक्षा अधिक देव अभ्युपगम एकमेकांशी झुंजविणे. उदा., "ईश्वर - धर्म या बाबतीत दोन - तीन नव्हे तर अनेक पर्याय निवडीसाठी उपलब्ध आहेत. येथे शेकडोनी देव आहेत, डझनभर धर्म आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हजारो प्रकारचे उपाय आहेत. फक्त स्वर्गाची चावी कुणाकडे आहे याचाच पत्ता नाही. ख्रिश्चनांच्या येशू क्रिस्ताकडे ही चावी असल्यास हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख, ज्यू इत्यादी धार्मिकांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, हे मात्र नक्की! अल्लाकडे चावी असल्यास इतर काफिर धार्मिकांना स्वर्गसुख मिळणार नाही. धर्म व देव निवडण्यात चूक झाली म्हणून इतर धार्मिकांना नरकयातना भोगाव्या लागतील." ही पद्धत उपयोगी नाही कारण प्रत्येकाच्या शक्यतेचा आणि बक्षिसाचा गुणाकार करून इतरांच्या शिक्षा आणि शक्यतांचे गुणाकार त्यातून वजा करून विजेता शोधता येईलच.
सहमत
सहमत तुमच्याशी.
>>विवेकी निर्णय म्हणजे काय? अनेक पर्याय उपलब्ध असताना सर्वाधिक फायद्याची कृती करणे, अशी व्याख्या शक्य आहे.
हो पण, win-win situation. अगदी १००% नसेल तरी चालेल पण क्लोज इनफ. आता तुम्ही म्हणाल क्लोज इन्फ व्याखीत करा, तर तुमच्या सर्वाधिक फायद्यात win-win आहे का हे माहित नाही, असेल तर मला देखील तेच म्हणायचे आहे.
>>देव असण्याची शक्यता ०.००००००१ % आणि नसण्याची शक्यता ९९.९९९९९९९ % असती, तरी पहिल्या शक्यतेसोबत जोडले गेलेले बक्षीस इतके प्रचंड आहे की देव मानण्यातच फायदा असता.
हे हि आहेच.
>>एकापेक्षा अधिक देव अभ्युपगम एकमेकांशी झुंजविणे. उदा., "ईश्वर - धर्म या बाबतीत दोन - तीन नव्हे तर अनेक पर्याय निवडीसाठी उपलब्ध आहेत. येथे शेकडोनी देव आहेत, डझनभर धर्म आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हजारो प्रकारचे उपाय आहेत. फक्त स्वर्गाची चावी कुणाकडे आहे याचाच पत्ता नाही. ख्रिश्चनांच्या येशू क्रिस्ताकडे ही चावी असल्यास हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख, ज्यू इत्यादी धार्मिकांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, हे मात्र नक्की! अल्लाकडे चावी असल्यास इतर काफिर धार्मिकांना स्वर्गसुख मिळणार नाही. धर्म व देव निवडण्यात चूक झाली म्हणून इतर धार्मिकांना नरकयातना भोगाव्या लागतील." ही पद्धत उपयोगी नाही कारण प्रत्येकाच्या शक्यतेचा आणि बक्षिसाचा गुणाकार करून इतरांच्या शिक्षा आणि शक्यतांचे गुणाकार त्यातून वजा करून विजेता शोधता येईलच
याविषयी तथाकथित हिंदू धर्मात असे मत आहे कि काही ठराविक भौगोलिक परिस्थितीतील लोकांना/त्यांच्या वंशजाना धर्माचे नियम लागू होतात, बाकी सर्व धर्मांना नियम लागू पडत नाही सो ते स्वर्गात जातात कि नरकात जातात ह्यासाठी काही नियम नाही. :) (हे वाक्य केवळ एक माहिती म्हणून दिले आहे, त्यावर निर्माण होणाऱ्या वादात मी सहभागी नाही, त्या वाक्यासहि माझे अनुमोदन नाही.)
झिंदगी
झिंदगी हा शब्द वाचून याराना चित्रपटातील अमिताभच्या जंदगी या उच्चाराची आठवण झाली. शीर्षकातील असे शब्द संपादित होणे गरजेचे वाटते.
लेखकाला काय वाटते?
:)
मला एलआयसीची घोषणा आठविली.
मृत्युनंतरचे जीवन
:( मला आधी वाटले 'मृत्युनंतरचे जीवन' ह्यावर काही असेल, तसे एक पुस्तक देखील आहे.
झिंदगी शब्द
लेखाचे शीर्षक रिकामटेकडा यांनी उल्लेख केल्याप्रमाणे एल् आय् सी च्या जाहिरातीवरून घ्यावेसे वाटले. जिवंत असताना व मेल्यानंतरही...... असे मला सुचले होते. झिंदगी ऐवजी जिंदगी असे हवे होते का? 'झिंदगी' शब्द कसा हवा होता किंवा त्यातून काही चुकीचा अर्थबोध होत असेल तर ते माझ्या लक्षात आले नाही. जाणकारांनी कृपया योग्य शब्द सुचवावा.
माझ्यामते
माझ्यामते चुकीचा अर्थबोध होत नाही पण शब्द जिंदगी असा हवा. (मराठीत नुक्ता देण्याची सक्ती नाही म्हणून). शीर्षकातला शब्द खटकतो इतकेच.
मी जाणकार नाही पण कोणा जाणकाराने चूक वाटल्यास योग्य शब्द सांगावा.