'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

सक्षम स्त्रिया
सक्षम स्त्रिया

बायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.

गर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत आधीच दुर्लक्षित, कुपोषित राहिलेल्या बायका आणि त्यात खेड्यांमध्ये असलेला प्राथमिक आरोग्य सेवांचा अभाव या गोष्टी तर स्त्रियांचा कर्दनकाळच ठरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा एक उत्कृष्ट धडा 'गावगुंफण'मध्ये मिळतो.

खेड्यात आरोग्यसेवा उभारण्यासाठी शहरी डॉक्टर आणि नर्सेस वगैरेंवर अवलंबून राहण्याऐवजी गावातल्या बाईच्या मदतीला जर तिच्याच गावातली बाई येऊ शकली तर ते सर्वात परिणामकारक होईल हे लक्षात घेऊन औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही आदर्शवादी तरुणांनी ऐंशीच्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही खेड्यांत काम सुरू केलं.

म्हटलं तर त्यांची कल्पना अतिशय साधी होती. आधुनिक वैद्यकामुळे अनेक आजार सहज आणि फारसा खर्च न करता टाळता येतात किंवा बरे करता येतात. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते. त्यात भोंदू वैद्य आणि रुग्णाकडून पैसे उकळायला टपलेले डॉक्टर हे खेड्यातल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. त्यापेक्षा खेड्यातल्याच काही महिलांना प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे द्यायचे आणि त्यांना आपल्याच गावात कार्यरत ठेवायचं अशी ती कल्पना होती. चीनमधल्या अनवाणी डॉक्टर या योजनेपासून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली.

अशा कामाला काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. मुळात मुलींनी शिकूच नये; शिकल्या तरी एकदा लग्न लागलं की सासरी राहून जन्मभर नवरा, मुलं आणि सासरच्या मंडळींची सेवा करत जन्म काढावा अशा विचारांच्या जगात बायकांना अशा लष्करच्या भाकर्‍या भाजायला बाहेर काढायचं हीच एक कठीण गोष्ट होती.

संस्थेनं गावांतल्या बायकांना मूलभूत वैद्यकीय तपासण्या करण्याचं आणि प्राथमिक उपचार करण्याचं प्रशिक्षण दिलं. दाईचं प्रशिक्षण घ्यायला गावातल्या मागास, परित्यक्ता, दलित किंवा मुस्लिम स्त्रियांना प्राधान्य दिलं. अशा गरजू बायकाही कदाचित या कामासाठी जास्त सहजतेनं तयार झाल्या असतील. खेड्यापाड्यांत असणार्‍या जातीपातींच्या टोकदार वास्तवाचा विचार करता अशा कामासाठी एखाद्या बाईला जातपात न विचारात घेता कुणी आपल्या घरात घेतील ही गोष्टही कठीण वाटते. पण हे शक्य झालं, कारण गावातल्या बायकांना आपली आबाळ होते आहे हे कळत होतं आणि या बायका आपला तारणहार आहेत हेही कळत होतं. अशा पध्दतीनं या कामामुळे अनायासे जातिनिर्मूलनालाही हातभार लागला.

एकदा स्त्री सक्षम झाली की ती आपलं घरदार आणि परिसर सुधारते हा इतरत्र दिसून येणारा प्रकार इथेही दिसला. हळूहळू ग्रामसभेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला. गावात शौचालयं बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, स्त्रीभ्रूणहत्यांविरोधात आंदोलन, दारूबंदी अमलात आणणं अशा गोष्टींसाठी सरकरकडून विविध योजनांद्वारे जी मदत मिळते त्याची माहिती बायकांना होऊ लागली; कंबर कसून त्यांनी अशा योजनांना गावाचा पाठिंबा मिळवला.

वयात येणार्‍या मुलींना स्वतःच्या शरीराविषयी माहिती देणं असे उपक्रमही चालू झाले; लग्न आणि शरीरसंबंधांविषयी त्यांना वाटणारी भीती घालवून त्यांना अधिक सक्षम केलं गेलं. गावातल्या जन्म-मृत्यूंची नोंदणी ते कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांना मदत अशी अनेक इतर कामंही या महिलांकडून होऊ लागली.

किरकोळ औषधोपचार निव्वळ एका बसच्या तिकिटाएवढ्या खर्चात होऊ लागले पण गंभीर आजाराकरता खर्च करावाच लागे. मग त्यासाठी मदत म्हणून गावात महिला बचत गट सुरू केले गेले. त्यांद्वारे बायकांच्या हातात पैसा खेळायला लागला. सावकाराची कर्जं फेडणं, घरगुती व्यवसायासाठी भांडवल असाही त्या पैशाचा उपयोग होऊ लागला. घरच्या घरी शेवया-पापड बनवणं, दळण-कांडण करून देणं अशा व्यवसायांचं प्रशिक्षण आणि साधनसामुग्री महिलांना दिली जाऊ लागली. त्यातून महिलांना उत्पन्नासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाले. हळूहळू गाव सुधारत गेलं.

अगदी साध्यासुध्या दिसणार्‍या अशा स्त्रियांना आत्मविश्वासानं स्वतःच्या कामाविषयी, गावाच्या प्रगतीविषयी बोलताना पहाणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्याची प्रचिती इथंही येते. (माहितीपटातल्या माहितीपूर्ण पण काहीशा रुक्ष भागाऐवजी अशा आणखी स्त्रियांना बोलतं करून त्यांच्याकडूनच ती माहिती मिळाली असती तर माहितीपट अधिक परिणामकारक झाला असता असं मात्र वाटत रहातं.)

आज संस्थेचं काम सत्तर गावांत आहे. शहरांतल्या गरीब वस्त्यांमध्येही आरोग्याच्या समस्या खेड्यांसारख्याच आहेत हे लक्षात घेऊन संस्थेनं आता सोलापुरातही काम सुरू केलं आहे. सोलापुरातल्या सत्तर झोपडपट्ट्यांमध्ये आज संस्था कार्यरत आहे. संस्थेविषयी अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. माहितीपटाच्या डी.व्ही.डी. उपलब्ध आहेत. त्यासाठी अतुल पेठे यांच्याशी संपर्क साधावा. त्यासाठी या दुव्यावर माहिती मिळेल.

टीपः या माहितीपटाच्या डी.व्ही.डी. विक्रीतून मला कसलाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक फायदा होणार नाही. हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेशीही माझा कसलाही हितसंबंध नाही.

Comments

चांगली माहिती

लेख आवडला.डी.व्ही.डी मागविण्याचा विचार करत आहे.

+१, +१

लेख आवडला. डी.व्ही.डी मिळविण्याचा विचार करत आहे.

सुंदर परिचय

अशी उदाहरणे वाचली / ऐकली की मनाला उभारी मिळते. आपल्या सारखा सामान्य माणूसही समाज, देश व जग बदलण्याच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकतो ही जाणीव निर्माण होते.
धन्यवाद!
जयेश

उपक्रमावर गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगतीटीपः

उपक्रमावर गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगतीटीपः हा लेख वाचून आनंद झाला. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते हे सत्य आहे .असेच प्रयोग भारतभर झाले तर वैद्यकीय लुटीतून जनतेची नक्कीच सुटका होईल.
या माहितीपटाच्या डी.व्ही.डी. विक्रीतून मला कसलाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक फायदा होणार नाही. हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेशीही माझा कसलाही हितसंबंध नाही. सर आपण असे लिहिण्याची कांही आवश्यता नव्हती. आपले मन साफ असले तर लोकांच्या चेष्टा , टीका टिप्पण्या याची काळजी करण्याचे कांही कारण नाही. आपणास या माहिती बद्दल धन्यवाद thanthanpal.blogspot.com

वेठीस धरत नाही ना

अवांतर्- "आपले मन साफ असले तर लोकांच्या चेष्टा , टीका टिप्पण्या याची काळजी करण्याचे कांही कारण नाही. '--- अहो असे असले तरी आपण इतरांना वेठीस धरत नाही ना हे ही तपासणे आवश्यक असते.

वा!!

वा! माहितीप्रद लेख.. इथे ओळख करून दिल्याबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. डीव्हीडी मिळवून पाहण्याचा विचार आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. डीव्हीडी मिळवून पाहण्याचा विचार आहे.

--- असेच म्हणतो, नेटक्या परिचयाबद्दल धन्यवाद.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धन्यवाद

चांगली ओळख आणि कौतुकास्पद उपक्रम.

उत्तम माहिती

उत्तम माहिती मिळाल्यामुले आमचा फायदा झाला.
प्रकाश घाटपांडे

खूप चांगली माहिती आणि काम

खूप चांगली माहिती आणि काम येथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

डॉ. भारत वैद्य यांचे नाव दिसले तसेच ओझरती माहीती महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थळावर दिसली. मात्र, हॅलो फाउंडेशनच्या संस्थळावर त्यात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती असती तर बरे झाले असते असे वाटते. अशा लोकांची अधिक माहिती यायला हवी असे वाटते. त्यांना तसेच अतुल पेठेंना भेटायला आवडेल...

किंचितशी दुरुस्ती

डॉ. भारत वैद्य यांचे नाव दिसले तसेच ओझरती माहीती महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थळावर दिसली. मात्र, हॅलो फाउंडेशनच्या संस्थळावर त्यात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती असती तर बरे झाले असते असे वाटते.

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. 'भारत वैद्य' हे व्यक्तीचं नाव नसून संस्थेच्या उपक्रमाचं नाव आहे. अहंकारी नावाचं डॉक्टर दांपत्य संस्थेच्या कार्यकर्त्यांपैकी प्रमुख आहेत. माहितीपटाच्या प्रकाशनाला दोघं उपस्थित होती. त्याविषयीचं वृत्त इथे पाहता येईल.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धन्यवाद

अधिक माहीती बद्दल धन्यवाद. ओझरते वाचताना मला ते नाव वाटले होते. बाकी स्वतःचे नाव कमी प्रकाशात ठेवून "अहंकारी" दांपत्य स्वतःच्या आडनावाला जागत नाही आहे असे वाटले. ;)

वा वा...

खूपच चांगला लेख आणि उपक्रम.
लेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटोही आवडला. प्रसन्न वाटले.

असेच म्हणतो..!

खूपच चांगला लेख आणि उपक्रम.
लेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटोही आवडला. प्रसन्न वाटले.

माहिती हवी

चिंतातूर जंतु यांचा वरील लेख मी माझ्या सेवायोग या ब्लॉग वर त्यांच्या अनुमतीने प्रकाशित केला. परंतु काही वाचकांनी मला कळविले की अहंकारी दांपत्य धर्मांतरीत ख्रिश्चन असून त्यांचा मूळ 'अजेंडा' वेगळाच आहे. तसेच त्यांना मिळणार्‍या देणग्यांबाबतही संशयास वाव आहे.

चिंतातुर जंतु यांनी माहितीपटावर आधारित लेख लिहिला आहे. त्यामुळे कदाचित त्यांना याची माहिती नसावी. अहंकारी यांच्या धर्मांतराबाबत माझा काही आक्षेप नाही. चांगले काम लोकांपर्यंत पोहचावे या भावनेतून मी सदर लेख प्रकाशित केला. परंतु वस्तुस्थिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. कुणास अधिक माहिती मिळवता आल्यास कळविणे.
जयेश

अतुल पेठेंना विचारा

परंतु काही वाचकांनी मला कळविले की अहंकारी दांपत्य धर्मांतरीत ख्रिश्चन असून त्यांचा मूळ 'अजेंडा' वेगळाच आहे. तसेच त्यांना मिळणार्‍या देणग्यांबाबतही संशयास वाव आहे.

या आरोपांतल्या तथ्याविषयी मला शंका आहे कारण या संस्थेच्या कामाविषयी मला या आधीही इतरांकडून माहिती मिळाली होती. असो. अधिक खात्रीलायक माहितीसाठी अतुल पेठ्यांना विचारू शकता. माहितीपट बनवण्याआधी आणि त्या दरम्यान पेठ्यांनी या लोकांबरोबर पुष्कळ काळ घालवला आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर