21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण
21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण
उपक्रमावर ऋषिकेश यांचे लेख वाचत असताना आपण पालक वा आजी-आजोबा म्हणून 21व्या शतकातील नव्या पिढीकडे पाहताना आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड आहे की काय असे वाटू लागते. ज्या प्रकारे ही 10-12 वर्षाची मुलं-मुली संगणक, वा मोबाइल हाताळत असतात ते आपल्या बापजन्मी जमणार नाही असेच वाटू लागते. मुला-मुलींचे वय 5 असो की 15 असो, "तुम्हाला हे कसे जमते? " असे विचारल्यानंतर ज्या प्रकारे त्यांची देहबोली असते त्यावरूनच आपली कुवत (लायकी!) कळते.
21व्या शतकातील प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना ही मुलं वापरत असलेले सामाजिक संपर्कासाठीची माध्यमं व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान याना वेगवेगळे करणे शक्य नाही हे कळून चुकलेले आहे. या दोन्हींच्या सांधेजोडीला यानंतर पर्याय नाही. आपण शिक्षणाच्या मूल्यमापनाविषयी कितीही लंबी चौडी बातें करत असलो तरी व शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुचवत असलो तरी - त्यात तोंडपाठ (घोकंपट्टी, पोपटपंची) करण्यापासून गुरूकुल पद्धती वा प्रत्यक्ष प्रयोग असे विविध पद्धती असल्या तरी - एकेरी वाहतुकीप्रमाणे त्या सर्व शिक्षक-शिक्षिका ते विद्यार्थी अशीच ज्ञानगंगा वाहत राहणार या समजुतीला धक्का लावणार नाही हे दृढ होत आहे. परंतु जोपर्यंत या वयोगटातील मुलां-मुलींना शिकणे मजेचे, आनंदाचे ठरत नाही वा त्यांना शिकावेसे वाटत नाही तोपर्यंत या सर्व नवीन क्लृप्त्या निरुपयोगी ठरतात. आजची पिढी तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही; मग ते तंत्रज्ञान संगणक असो की मोबाइल असो की व्हिडीओ गेम्स असो. जर हेच खरे असल्यास आपण 21व्या शतकातील शिक्षणाची इमारत या तंत्रज्ञानाच्या पायावर उभी का करू नये?
आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या डोक्यात माहिती भरत जाणे व विचारलेली माहिती लवकरात लवकर बाहेर काढण्याचे तंत्र आत्मसात करणे यावरच बहुतेक वेळा बहुतेक ठिकाणी भर दिला जातो. हुशार विद्यार्थी म्हणजे ज्याच्या डोक्यात जास्तीत जास्त माहिती आहे व जो लवकरात लवकर विचारलेली माहिती बाहेर ओकू शकतो तो, असे समजले जाते. परंतु मुलं अशी शिकत नाहीत हे आपल्या सर्वांना माहित आहे. ज्या गोष्टींची त्याना आवड आहे, ज्याबद्दल त्यांना जास्त उत्सुकता आहे, ज्यांचे प्रयोग ते स्वत: करू शकतात, ज्या विषयाबद्दल आपापासात चर्चा करू शकतात, बोलू शकतात त्यातूनच ते खरेखुरे शिकत असतात. हेच सत्य असेल तर आपण का म्हणून आपला वेळ, श्रम, पैसा विनाकारण अशा रूटीन गोष्टीवर खर्च करत आहोत?
या संबंधात ब्रिटन येथील न्यूकॅसल विद्यापीठातील डॉ. सुगाता मित्रा या प्राध्यापकाने Hole in the Wall या नावाचा एक शिक्षण विषयक प्रयोग हाती घेतला होता. प्रकल्पाच्या आराखड्याप्रमाणे दिल्ली येथील गरीब वस्तीतील एका झोपडीच्या भिंतीतच संगणक बसवले होते. एक मीटर उंचीवर संगणक बसवून त्यात इंटरनेटच्या सुविधा दिल्या होत्या. त्या झोपडपट्टीतील मुलां-मुलींना इंग्रजीचा गंध नाही. त्या मुलां-मुलींच्या पालकांना आपली मुलं काय करतात याचा विचार करायला सवड नाही. मात्र झोपडपट्टीतील या मुलां-मुलींना हा संगणक व त्याला जोडलेले इंटरनेट वापरण्यास मुक्त परवाना दिला होता. केव्हाही यावे, संगणक ऑन करून कितीही वेळ बसावे अशी मुभा होती. संगणकाच्या सुरक्षेततेव्यतिरिक्त व संगणकाचे काही प्राथमिक धडे (तेही कुणीतरी विचारल्यास!) देण्याव्यतिरिक्त कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीची त्यात लुडबुड नव्हती. गंमत म्हणजे काही दिवसातच ही झोपडपट्टीतील मुलं संगणक व इंटरनेट वापरण्याचे कौशल्य प्राप्त करून नवीन नवीन गोष्टी शिकू लागले. हवी ती गाणी डाउनलोड करून नाचू लागले. शिकता शिकताच तंत्रज्ञानाची मजा घेवू लागले. 8-10 वर्षाचा मुलगा 5-6 वर्षाच्या मुलीला इंटरनेटचे धडे देत होता.
राजस्थानच्या एका खेड्यात जेव्हा अशा प्रकारे सुविधा दिल्या गेल्या तेव्हासुद्धा मुलं (ज्यानी आयुष्यात पहिल्यांदाच संगणक बघत होते) काही दिवसातच सर्फिंग, गूगलिंग करत काही ना काही तरी नवीन शिकण्याचे प्रयत्न करत होते. 14व्या दिवशी Disney.com डाउनलोड करून मुलं कार्टून फिल्म बघू लागले. आता संगणक त्यांच्या हातातील खेळणी वा बाहुली झाली होती. हैदराबाद येथील प्रयोगात डॉ. मित्रा यांनी संगणकावर speech-to-text चे इंटरफेस डाउनलोड करून ठेवले होते. या मुलांनी संगणकाला डिक्टेशन देऊन वर्ड फाइल तयार करावी ही कल्पना त्यामागे होती. जेव्हा येथील मुलं इंग्रजीत बोलून डिक्टेशन देवू लागले तेव्हा संगणकावरील टेक्स्टमधून काही अर्थबोध होईना. कारण तिथल्या मुलांच्या इंग्रजीत तेलुगु accent असल्यामुळे संगणकाला त्यांचे बोलणे समजणे अवघड असल्यामुळे काही तरी gibberish त्यातून बाहेर येऊ लागले. मित्रा यांनी त्या मुलांना बोलावून "हा संगणक मी येथेच दोन महिने ठेवतो. तुम्ही संगणकाला तुमच्या भाषेत शिकवा". मुलं 'आ' वासून बघत होती. दोन महिन्यात या मुलांचे accent बदलले व speech to text synthesizer वापरून ती मुलं एखाद्या वार्ताहराप्रमाणे neutral accent मध्ये बोलू लागले.
याच प्रयोगाचा भाग म्हणून 12 वर्षे वयोगटातील 26 तमिळ विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञानाचे फंडाज् शिकवणे शक्य झाले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान नव्हते, जनुकं हा शब्द पहिल्यादाच त्यांच्या कानावर पडत होता. तरीसुद्धा जैवतंत्रज्ञानाच्या संदर्भातील सर्व संकल्पना त्यांच्या लक्षात आल्या. विकिपिडिया, गूगल, आस्क मी, आस्क जीव्हज अशा सर्च इंजिनमधून त्यांना आपल्याला नेमकी जी माहिती हवी ती शोधली होती, संकलित केली होती. गंमत म्हणजे ही मुलं आपापसातील चर्चेतून शिकली. प्रत्येकी एक संगणक य़ाप्रमाणे दिली असती तर या गोष्टी कधीच घडल्या नसत्या असे प्राध्यापकांचे मत होते. डॉ. मित्राच्या मते Hole in the Wall या प्रयोगावरून मुलं आपल्या नैसर्गिक उत्सुकतेतून, उत्स्फूर्ततेतून प्रश्नांची उत्तरं शोधू लागतात. समस्यांना जावून भिडू शकतात. यात समस्यांना उत्तर देवू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा सहभाग असल्यास मुलांना आणखी मजा येते व ते जास्तीत जास्त शिकण्यास उत्सुक होतात.
न्यूयॉर्क शहरातील एका पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण देण्याच्या रूढ पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना रंजक व नावीन्यपूर्ण वाटतील अशा तंत्रज्ञानांचा वापर करून शिकवण्याचे प्रयोग करण्यात आले. शिक्षकाने चाकोरीबद्धरित्या शिक्षण देण्याऐवजी अमेरिकेतील मुलांच्या टिपिकल बेडरूमप्रमाणे क्लासरूम सजवल्यास काय होईल हा विचार करण्यात आला. या विचाराने प्रेरित होऊन क्लासरूममध्ये संगणक, व्हिडिओ गेम्स, पोस्टर्स अशा गोष्टी आणल्यावर मुलांचा शिकण्याचा pattern बदलला. अजून एका प्रयोगामध्ये स्मार्ट फोन्स, ब्ल्यू टूथ मोबाइल इत्यादीमधून विज्ञान शिक्षण देण्यात आले. काही प्रमाणात ते यशस्वी झालेसुद्धा!
ओळीने ठेवलेल्या बेंचवर बसून एका बाजूने शिक्षक -शिक्षिका पाट्या टाकतात व बेंचवरील पुतळे शिकल्याचा आभास निर्माण करतात. हे कधीतरी बदलायला हवे. या रूढ पारंपरिक शिकवण्याच्या प्रकारामधून खरोखरच अपेक्षित शिक्षण मिळू शकेल का याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे. परंतु ही पारंपरिक शिक्षण पद्धत त्याज्य केल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करता येईल हा एक नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो. आताच्या पद्धतीप्रमाणे मूल्यमापनाचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांच्या डोक्यात माहिती भरा व तीच माहिती परिक्षेच्या वेळी पेपरवर उतरवून काढा. जर अशा मूल्यमापनात जास्त मुलं नापास झाल्यास शिकवणार्यांना दोष देणे व जास्त मुलं यशस्वी झाल्यास त्या शाळेचा सन्मान करणे, ही रुळलेली वाट आहे. परंतु यात काही अर्थ नाही. दंड वा पारितोषकामुळे व्यवस्थेत काहीही फरक पडत नाही. मुळात विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य आहे का याचे मूल्यमापन व्हायला हवे. मुलं जे वाचतात ते त्यांना कळले का? पुस्तकांचा व/वा इतर ज्ञान साहित्यांचा वापर करून ज्ञानात भर घालणे त्यांना जमते का? गणितातील समस्या सोडवताना संख्यात्मक व गुणात्मकरित्या योग्य उत्तर शोधता येईल का? प्रत्यक्ष उदाहरणावरून अमूर्त संकल्पनांची जाणीव होते का? एखाद्या प्रसंगाचा सामना करताना त्यासाठीच्या सर्व मार्गांचे विश्लेषण करणे जमते का? समाजात सुखाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असे functional ज्ञान प्राप्त झाले आहे का? अशा प्रकारच्या गोष्टीवरूनच विद्यार्थ्याचे भवितव्य घडायला हवे.
21व्या शतकातील या पिढीकडे उद्योग, माध्यमं, शासन, समाज यासारख्या व्यवस्था फार मोठ्या अपेक्षेने बघत आहेत. मुलांमधील नैसर्गिक उत्सुकता व तंत्रज्ञानाचा वापर करून या पिढीला सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे शिक्षण देणे शक्य आहे. अशा शिक्षणात मजा आहे, आनंद आहे, व त्यात नाविन्यही आहे. परंतु हे कधी तरी शक्य होईल का, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.
कुणीतरी, या विषयाशी संबंधित असलेले, हे वाचत असतील का?
Comments
डॉ. सुगाता मित्रा: यांची व्हिडिऑ फिल्म
"
परिक्षार्थी व ज्ञानार्थी शिक्षण
उत्कृष्ट लेख व माहिती. आपल्याकडच्या शिक्षणातून ज्ञानप्राप्ती होत नाही हीच तर सर्वात मोठी अडचण आहे.
चन्द्रशेखर
भारतीय शिक्षणतद्य
चांगला लेख. एका भारतीय शिक्षणतद्याने ह्यात प्रयोग करुन जो विदा दिला आहे. त्यामुळे अधिक आनंद झाला. बिहार मधे "३०"(की, काहीशा अशाच) नावाने एक आयायटी झालेला प्राध्यापक अशाच गरीब मुलांना आयायटीत प्रवेश मिळवुन देण्यात यशस्वी झाला आहे. ह्यावरुन अनेक गोष्टी सिद्ध होतात- शिक्षण नीट दिले की, कुणीही मानव ते ग्रहण करुन दाखवु शकतो. - शिकवण्याची पद्धत मात्र नेमकी हवी.
लेख आवडला
विविध ठिकाणी दिल्या गेलेल्या नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीची ओळख सांगणारा लेख रोचक वाटला.
तेलुगु मुलांनी उच्चारभाषा शिकणे हे गमतीदार वाटले. एखादे पेलण्याजोगे आणि आवडीचे आव्हान दिल्यावर मुले कुठपर्यंत जाऊ शकतात त्याचेच हे द्योतक आहे.
नेहमीच्या लेखाच्या पद्धतीने या लेखात दोन मुद्दे मांडले आहेत. एकात 'माहिती भरणे आणि काढणे' (पारंपारिक) या शिक्षण प्रकारावर टीका आहे. तर दुसर्यात संगणकामुळे होणारी वेगळी शिक्षणपद्दती आहे. पण या दोघांचा संबंध जोडल्याचे जाणवत नाही. म्हणजे संगणकाने पटकन मिळालेली माहिती 'माहिती देणे घेणे' या प्रकारातच बसते असे माझे मत झाले.
शिक्षणाचे काही इतर उद्देश आहेत. यात माहितीचे आकलन करणे, लॉजिकल थिंकींग करणे, विश्लेषण करणे आणि त्या आधारित लिहिणे हे येते. दृकश्राव्य पद्दतीत (संगणकीय धरून) याविषयीची कुठली उद्दीष्टे साध्य होतात हे माहित नाही.
अर्थात संगणकीय वापराचे प्रश्न (जसे उच्चारण करणे) मुलांनी सोडवलेले दिसतात ही गोष्ट वेगळी.
प्रमोद
सहमत.
संगणकाने पटकन मिळालेली माहिती 'माहिती देणे घेणे' या प्रकारातच बसते असे माझे मत झाले.
सहमत.
तंत्रज्ञानाची आवड
माहितीचे आकलन करणे, लॉजिकल थिंकींग करणे, विश्लेषण करणे आणि त्या आधारित लिहिणे
कदाचित तंत्रज्ञानाच्या आवडीतून मुलं वरील गोष्टीसाठी प्रयत्न करतील त्यामुळे त्यांना जमेल असा एक (भाबडा!) आशावाद आहे.
भाषण स्फूर्तिदायक आहे
भाषण स्फूर्तिदायक आहे.
उपक्रम सदस्य "निनाद" यांची याविषयी मते जाणायला आवडेल. त्यांचा या बाबतीत अभ्यास आहे.
पण जो पर्यंत पालकांची मुलाला सुपरमन बनवण्याची वृत्ती बदलत नाही
अशा शिक्षणात मजा आहे, आनंद आहे, व त्यात नाविन्यही आहे. परंतु हे कधी तरी शक्य होईल का, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. हे कधी शक्य आहे हे तर ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही. असे पयत्न
महाराष्ट्रातील अनेक एकांडे शिलेदार करत आहेत. नूतन बालशिक्षण सृजनानंद, वनस्थळी, ग्रामगंमल , कोसबाड, आनंदनिकेतन यांच्यासारख्या काही खासगी शिक्षणसंस्था आनंददायी व सर्जनशील बालशिक्षण व संगोपनासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. संबंध महाराष्ट्राचा विचार केला असता, हे प्रयत्न फारच अत्यल्प प्रमाणात होताहेत.त्याच बरोबर सरकारी शाळा मधील गुरुजन सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करत आहे. पण लालफीत काम करू देत नाही आणि जो पर्यंत पालकांची मुलाला सुपरमन बनवण्याची वृत्ती बदलत नाही तो पर्यंत कांही फरक पडणार नाही. आज मुलं सकाळी ५ वाजता उठतात सरळ स्केटिंग च्या मैदानावर जातात. ६.३०-७.30 जलतरण हे झाले की सकाळच्या शिफ्ट ची ८ते १ शाळा. घरी येईपर्यंत २.३० घरी . की लगेच ५ पासून तबला, फक्त क्रिकेट , भरतनाट्यम घरी आले की कार्टून या सगळ्या कसरतीत मुलांचा विचार कोणी करत नाही. या मुळे व्यवस्था बदलणे एकच उपाय.
thanthanpal.blogspot.com
उत्तम लेख
उत्तम लेख. थोडा नेहमीच टीकेचा विषय असलेला विषय.
थोड्या वेगळ्या धर्तीवर शालेय प्रयोग केले जात आहेत, अगदी मित्रा ह्यांच्या इतके ते out of the box नसतीलही पण प्रयोग नक्कीच होत आहेत.
पुण्यामध्ये रमेश पानसे ह्यांनी कर्वे नगर येथे शांतीनिकेतनच्या धर्तीवर एक शाळा काढली आहे, जिथे विद्यार्थ्याच्या आवडी निवडी आणि निगुत(aptitude) लक्षात घेऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोधिनी, अक्षरनंदन ह्या शाळा देखील असेच अभिनव प्रयोग करत आहे असे ऐकून आहे.
पण तुम्ही ज्या पालकांबद्दल हे बोलत आहात त्यांची बाजू बघितली असता - ज्याप्रमाणे विमा हा लाभधारकाला आयुष्यभर पुरणार नाही हे माहित असताना देखील काढला जातो, तसेच काहीसे आमच्या मुलांना जर आम्ही ह्या शाळा नामक एका चरकात टाकले तर आम्ही फार लक्ष न देता सुद्धा कमीत कमी ते पदवीधर बनून बाहेर पडतील असे वाटते, जास्त रेटा मारणाऱ्यांची मुले अभियंता बनून बाहेर पडतील, जरा शहाणी असतील तर IIT मधून अभियंता होतील.
हे काही अंशी योग्य पण आहे, वैचारिक किवा विवेकी नागरिक तयार व्हावा म्हणून किती पालक जोखीम पत्करून आपल्या पाल्याबरोबर असे अभिनव प्रयोग करण्यास तयार होतील?
त्याचप्रमाणे एका वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेग वेगळ्या आकलन शक्तीचा विचार करता शाळेवर काही बंधनं येणं हे साहजिक आहे असे मला वाटते.
त्याच बरोबर अजून एक खूप महत्वाचा असा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे - शिक्षक किवा पोलीस/लष्करी काम हे केवळ अर्थाजनासाठी न करता त्याचा ध्यास आणि त्याची आवड असलेल्या लोकांनी करावे, हे काम बाकीच्या कामासारखे नसून ह्या कामावर समाजाची उन्नती आणि सुरक्षा अवलंबून आहे. योग्य शिक्षक हा केवळ एक दुवा खूप उच्च अशी क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण करू शकतो असा माझा विश्वास आहे.
आता थोडेसे मागासवर्गीय किवा आर्थिक दृष्ट्या कमजोर लोकांबद्दल बोलायचे झाले तर एक विरोधाभास असा जाणवतो आहे कि, अमेरिकेमध्ये भारतीय (तथाकथित) शाळेच्या धर्तीवर एक शाळा १९९२ मध्ये सुरु करण्यात आली, तिचे नाव KIPP (knowledge is power program) हि शाळा तेथील मागासवर्गीय आफ्रिकन विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने चालू करण्यात आली. शाळेची मुख्य संकल्पना अशी आहे कि जास्तीत जास्त वेळ शालेय शिक्षणा करता दिला तर यशाची संभावना जास्त असते त्यामुळे शाळेची वेळ हि सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० अशी ठेवण्यात आली. हा एक मुद्दा झाला, कदाचित त्याही शाळेत अभिनव पद्धतीने शिक्षण दिले जात असावे पण एक वेगळा प्रयोग जाणवल्यामुळे इथे नमूद केले.
वेगळ्या प्रकारे शिक्षण घेण्याची हिम्मत नाही कारण त्याचे भविष्य सुरक्षित नाही आणि कोणी तसे शिक्षण घेत नाही म्हणून भविष्य सुरक्षित राहील अशी व्यवस्था नाही. निदान अवांतर वेळेत अशा प्रकारच्या काही गोष्टी पालकांनी करायला हव्यात आणि प्रत्येक शाळेने देखील शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल केले पाहिजेत असे मला वाटते.
भंपक
हा परिच्छेद आणि बाकीचा "इफ चिल्ड्रेन आर इंटरेस्टेड, एजुकेशन हॅपन्स" टाईप भंपकपणा यांत काय संबंध आहे?
टेक्नॉलॉजी
तंत्रज्ञान हे शिक्षणाचे एक साधन आहे एवढे लक्षात असले तर वरील कुठचेही प्रयोग करायला हरकत नसावी. मुलांना काँप्युटर वापरता आला पाहिजे, हे खरे आहे. सामाजिक न्यायासाठी गरीब- श्रीमंत सर्व मुलांना लहान वयातच काँप्युटर, विविध प्रकारची उपकरणी, वस्तू, इतिहास, भूगोल, भाषा इ. संशोधनाची साधने (सर्च इंजिने, क्रमिक पुस्तकांखेरीज इतर पुस्तके, वगैरे) हाताळायला मिळायला हव्यात हेही खरे. पण अगदी निम्न स्तरातून आलेल्या किंवा जेथे शिक्षणाला फारसा वाव नाही अशा प्रदेशातील मुलेही चमकताना दिसतात तेव्हा ते केवळ अशांची बुद्धिमत्ता उत्तम म्हणून नसावे, बहुदा अशांना चांगले शिक्षक किंवा मार्गदर्शक मिळालेले असतात. काँप्युटर आणि स्मार्ट फोनने शिक्षण मिळण्याच्या शक्यता वाढतील, पण चांगले शिक्षण मिळण्यासाठी याहून अधिक बरेच काही लागेल.
http://nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/2001/wieman-autobio...
उर्मी
उत्सुकता, उर्मी ,उत्साह असताना जर उपलब्धता निर्माण झाली नाही तर एक प्रकारचे नैराश्य / कंटाळवाणेपण येते. नंतर उपलब्धता निर्माण झाली तरी तो उत्साह व आनंद मिळत नाही.
रंजकता हा घटक असल्या शिवाय रुची निर्माण होत नाही. आता इन्फोटेन्मेंट हा प्रकार वाढतो आहे ही चांगली बाब आहे व ज्ञानास पूरक आहे.
प्रकाश घाटपांडे
चांगले शिक्षण
केवळ तंत्रज्ञानाच्याच सहाय्याने चांगले शिक्षण मिळेल असे नाही परंतु चांगल्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक होतो आहे. दुसर्या चर्चेत लिहिलेल्या एका प्रतिसादाचा दुवा येथे देते.
हे खरेच बदलायला हवे त्यासाठी शिक्षणपद्धतीत कल्पकता राबवणे आवश्यक आहे. आम्हाला शाळेत असे शिक्षण मिळाले असते तर खचितच आवडले असते. परंतु, आता भारतातही अशी पद्धती रुजू होत आहे असे ऐकून आहे.
डॉ.कलबाग यांचा विज्ञान आश्रम
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुण्याजवळ पाबळ या गावी डॉ.कलबाग यांनी सुरू केलेला विज्ञान शिक्षण आश्रम आहे. तिथे ८वी,९वी, १० वी तून शाळा सोडलेल्या (ड्रॉप आउटस्) विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.ते तिथे विविध कामे स्वहस्ते करत शिकतात. आपण निर्मिलेल्या वस्तू बाजारात विकून विक्रीकला पण शिकतात.पुढे स्वतःचा लहान मोठा उद्योग सुरू करतात.
पण हा काही आपल्या परंपरागत शालेय शिक्षणाचा पर्याय नव्हे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक राहाणारच.विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर करू नये. स्वतंत्रपणे विचार करावा यासाठी मूल्यमापन पद्धती, परीक्षेत विचारतात त्या प्रश्नांचे स्वरूप आणि गुणदान पद्धती यांत मोठे परिवर्तन व्हायला हवे. पण ते शक्य दिसत नाही. कारण आज शिक्षकांच्या दर्जाचे सुमारीकरण झाले आहे.किंबहुना ग्रामीण भागांत, जिथे विद्यार्थी हे शिक्षणासाठी सर्वस्वी शिक्षकांवरच अवलंबून असतात. तिथे दर्जाची अगदी अवनती झाली आहे असे दिसते.काही तुरळक अपवाद असतील.पण चित्र निराशाजनक आहे.नुकसान विद्यार्थ्यांचे म्हणजे पर्यायाने देशाचे होत आहे.ते कधीही न भरून येणारे आहे.