क्लासिक पुस्तकांची आवड

दखल घेण्याजोग्या प्रसिद्ध "क्लासिक" पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. खाली काही निरीक्षणे मांडली आहेत.

१. माझ्या लहानपणी टिव्ही/ व्हिडिओ गेम्स/ वी वगैरे इतर पर्याय नसल्याने पुस्तके हा विरंगुळ्याचा सर्वात मोठा मार्ग होता. हल्ली च्या मुलांचे तसे नाही. वाचनाची आवड असली तरी विरंगुळ्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

२. (तिच्या) वयाच्या आठव्या वर्षी मी मुलीला शेरलॉक होम्स वाचायला दिले. तिला ते आवडले नाही. त्यातील ब्रिटिशांची इंग्लिश भाषा तिला अपरिचित वाटली आणि पिस्तुलांचा वापर सर्रास न करणारा, मारामार्‍या न करणारा होम्सही आवडला नाही. पुचाट वाटला.

गंमत म्हणजे हॅरी पॉटर वाचताना तिला ब्रिटिशांची इंग्लिश अपरिचित वाटली तरी पुस्तक खाली ठेवावेसे वाटले नाही. याचे कारण इतर जे वाचतात तेच आपण वाचावे, त्यांच्या सोबत चर्चा करता येते असे वाटते.

परंतु वयाच्या १० व्या वर्षी जेरेमी ब्रेटचा शेरलॉक होम्स पाहून तिला शेरलॉक होम्स वाचण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्याचा फडशा पडला.

३. गेल्यावर्षी मी तिला २०,००० लीग्स अंडर द सी वाचायला दिले. पहिले दोन पाने वाचल्यावर तिने हे जटील आहे. इंग्रजी भाषा जुनी आहे. कंटाळा येतो असे सांगून शेल्फवर परत ठेवले. आता शाळेत एक क्लासिक पुस्तक वाचून त्यावर रिपोर्ट तयार करण्याचा प्रकल्प आहे. अर्थातच, घरात २०,००० लीग्ज असल्याने तिने ते पुन्हा वाचायला घेतलं पण त्यामागचा कंटाळा लपत नाही.

तिला रूची वाटावी म्हणून मी पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. नेटफ्लिक्सवरून सध्या चित्रपटही मागवला आहे. परंतु चित्रपट पाहिल्यावर आता रिपोर्ट तयार करण्याइतपत माहिती मिळाली. पुस्तक वाचायची गरज नाही असा पावित्रा घेतला तर... याची भीती वाटते.

मुलांना फाईंडिंग निमो मधला क्लाऊन फिश माहित आहे पण कॅप्टन निमो माहित नाही ही वस्तुस्थिती आहे.

असो.

माझ्या मुलीला वाचनाची आवड आहे. माझ्या खरडवहीत त्याचा पुरावाही मिळेल :-) पण जे वाचन चालते ते नव्याने प्रकाशित होणार्‍या पुस्तकांचे असते.

तर या अनुषंगाने काही प्रश्न आहेत.

१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी? (यात त्यातील जुनी भाषा वगैरेही आले.)
२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का? (पुढे हॅरी पॉटरही क्लासिक बनेल.)
३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?
४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?

उपाय सुचवावेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

क्लासिक पुस्तकांची आवड

--१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी?--
--२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का?--
आपल्या पालकांनी त्यांच्या काळातील क्लासिक पुस्तकांची आवड आपल्याला लावली नाही तसेच...

--३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?--
क्लासिकचे संदर्भ बदलतात

--४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?--
व्हीडीयो गेम्स आणि किंडल

आपल्या काळात

आपल्या पालकांनी त्यांच्या काळातील क्लासिक पुस्तकांची आवड आपल्याला लावली नाही तसेच...

आपल्या काळात किंवा माझ्या काळात :-) मी भा. रा. भागवत वगैरे लेखकांची भाषांतरित पुस्तके वाचली होती. ती शब्दनुशब्द भाषांतरित नसून लहान मुलांनी वाचावी अशी सुलभीकरण केलेली होती. तसेच त्यातील भाषाही दीड-दोनशे वर्षे जुनी नव्हती.

मला भीती आहे की आज ज्यूल्स वर्न आहे उद्या शेक्सपीअर येणार.

दुवा

मी पालक नाही त्यामुळे त्या अँगलविषयी माहीत नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एक रोचक लेख वाचनात आला. आयपॅड. नी काही पुस्तके डिजिटल स्वरूपात आणली आहेत/ आणत आहेत. त्यातील काहींमध्ये (उदा. ऍलिस इन वंडरलँड) गोष्टींबरोबर ऍनिमेशन्स, गेम्स इ. ही आहेत. किंबहुना यांची अप्लिकेशन्स बनवली आहेत. अर्थातच हे ठराविक पुस्तकांच्या बाबतीतच शक्य आहे. मात्र असे करून क्लासिक्स वाचण्याची आवड निर्माण करता येण्याची शक्यता आहे. याचबरोबर हे तंत्र वापरून गणित, शास्त्र इं. ची पुस्तके अधिक रोचक आणि सुलभ करता येतील असा विचार चालू असल्याचे दिसते.

दुवा १
काही पुस्तकांची यादी. यात क्लासिक म्हणावे असे फक्त ऍलिस आहे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

वाचतो आहे...

माझा मुलगा पावणेतीन वर्षांचा असल्यामुळे सध्या प्रश्न नाही. पण मी ही चर्चा अतिशय रस घेऊन वाचतो आहे.

तुम्ही लिहिल्याप्रमाणे आठ वर्षांच्या पोरांना हॅरी पॉटरची जाड जाड पुस्तकं वाचून संपवताना बघितलेलं आहे. तिसरी चौथीच्या अभ्यासक्रमात वर्षभरातदेखील जेवढी माहिती घोटवून घेतली जात नाही तेवढी ही पोरं एका दिवसात पचवतात. भूक आहे, क्षमता आहे - पण ती योग्य दिशेला कशी न्यावी हा तुमचा प्रश्न आहे.

माझ्याकडे अर्थातच उत्तरं नाहीत. पण काही प्रश्न आहेत, बहुतांशी 'योग्य म्हणजे काय' स्वरूपाचे.

- हॅरी पॉटरला क्लासिक का म्हणू नये? माझ्या मते त्या मालिकेचे पहिले चार भाग तरी सुंदर आहेत. खोलात जाऊन वाचलं तर काही गहन चर्चादेखील केलेली दिसते.
- मी वाचायला शिकलो ते दुसरे पर्याय कमी असल्यामुळे व आईवडिलांना सतत वाचताना बघितल्यामुळे. वाचनाची जनरल आवड निर्माण होणं पुरेसं नाही का?
- या पिढीचं अनुभवविश्व अधिक नादचित्रमय आहे. जोपर्यंत काहीतरी वाचून अथवा पाहून अथवा ऐकून झपाटलं जाण्याची स्थिती निर्माण होते, तोपर्यंत चिंता का करावी?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काही विचार, स्वानुभव

तुमच्या मुद्दा क्रमांक २ मधला अनुभव आशादायक आहे. आधी कंटाळवाणी वाटलेली १८९०-१९०० काळची इंग्रजी भाषा, आणि त्या समाजाची पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा नंतर तिला आवडल्या.
कदाचित मुद्दा क्रमांक ३ प्रसंगातल्या ज्यूल्स वेर्नच्या बाबतीतही हेच होऊ शकेल.

- - -
१. अभिजात वाङ्मयाची ओळख कशी करून द्यावी?
प्रौढ/पालक म्हणून मुलांना ओळख करून द्यायचा माझा अनुभव नाही. म्हणून लहानपणचे स्वानुभव आठवून बघतो आहे. वयाच्या ८-१० वर्षांपर्यंत मी "अभिजात" म्हणावे अशी पुस्तके मुळात वाचत नसे. मराठीमध्ये चांदोबा/किशोर, इंग्रजीत एनिड ब्लायटन-छाप पुस्तके वाचली होती. "अभिजात" कथा सारांशरूपाने लिहिलेली पुस्तके वाचली होती. मूळ पुस्तके वाचायला कदाचित ८वी मध्ये सुरुवात केली. यात जेन ऑस्टेनच्या पुस्तकांनी चटक लावली. सोज्ज्वळ प्रेमकथा. पण कलाकारी उच्च दर्जाची. अमेरिकेमध्ये अशा अभिजात कादंबर्‍या बहुधा लुइसा मे ऍल्कॉट हिच्या सुचतात. तरुण/पौगंड मुलामुलींच्या कथा आहेत. पण लेखन, शैली, कादंबरीची बांधणी अव्वल दर्जाची. कथा वाचताना लहानपणी या असल्या "साहित्यिक" गुणांकडे लक्ष जात नाही. तरी संस्कार होतात.
तुमच्या मुलीला होम्स आवडला? कदाचित एड्गर ऍलन पो आवडेल. कदाचित अभिजात "गॉथिक" कथा आवडतील - पण फार जुनाट नकोत. पायरीपायरीने. विसाव्या शतकातल्या अभिजात कादंबर्‍यासुद्धा बघायला पाहिजेत. या बाबतीत मी लहानपणी फार कच्चा होतो. (अजूनही कच्चाच आहे.) हेमिंगवेची "ओल्ड मॅन अँड द सी" कारागिरीच्या दृष्टीने अव्वल आहे. पण लेखनशैली थेट आहे. कथासुद्धा उत्कंठावर्धक आहे.
अभिजात साहित्यात आणखी एक चंचुप्रवेशद्वार म्हणजे छोट्या "सोप्या" कविता. २० ओळींपेक्षा कमी.

२. हॅरी पॉटर कदाचित पुढे "अभिजात" मानले जाईल. (मला वाटत नाही असेही पुढे सांगणार आहे.) मी ही सर्व पुस्तके मोठ्या आवडीने वाचली. सात क्रमिक कादंबर्‍यांची ही मालिका आहे. क्रमाने कथानकांतली गुंतागुंत आणि भाषेची क्लिष्टता वाढत जाते. पहिला भाग ७-८ वर्षांचे मूल वाचू शकते, तर शेवटचा भाग १२-१३ वर्षांचे मूल वाचू शकते. पहिले साडेतीन भाग क्लासिक होऊ शकतील, असे मला वाटते. त्यानंतर भाषा लेखिकेला पेलली नाही. कथानक पेलले. आकंठा-उत्सूकता-उपकथानकांची वीण या सगळ्या गोष्टींमुळे पुस्तके वाचनीय आहेतच.

३. वयानुसार आपसूख लागत नसावी. माझ्या काही मित्रांना वाचनाची मुळीच आवड नाही.

४. चित्रपटांबद्दल माहीत नाही. चांगल्या कादंबर्‍यांपासून बनवलेले चित्रपट मी बघितलेले आहेत, उदाहरणार्थ "डॉ झिवागो", पण त्यानंतर कादंबर्‍या वाचलेल्या नाहीत. हा योगायोग असावा.

क्लासीक्सची आवड

जे काही कार्टून नावाखाली टिव्हीवर लागते त्यावर आधीच वैतागलो होतो व प्रसंगी तासनतास टिव्ही समोर नुस्ते बसुन बाबा मला अमुक खेळणे घे अशी रोज एक नवी शॉपींग लिस्ट करुन देणार्‍या टिव्हीला फाट्यावर मारायचे असे 'ऑपरेशन टिव्ही फाटा' आम्ही २०१० मधे सुरु केले.

पाल्याच्या जन्मापासुन पुस्तके वाचुन दाखवायाची सवय असल्याने व आता स्व:ताहून वाचता येउ लागल्याने आपल्या पाल्याने क्लासीक नॉव्हेल्स वाचावीत ही आमची पण इच्छा. पण लहानपणची पुस्तके सचित्र असायची व क्लासीक्स मधे जास्त शब्द क्वचित चित्र. जितक्या उत्साहाने आपण पुस्तक आणायचे तितक्याच निरिच्छ वृत्तीने पाल्याने पुस्तक चाळुन, एखादे पान वाचुन सोडुन द्यायचे वाईट वाटत होते.

त्यामुळे तू ऐक आम्ही वाचतो अशी सुरवात, मग एकदा श्रवण सुरु झाले की त्या क्लासीक पुस्तकावर आधारीत सिनेमा (उदा. नार्नीया, शार्लट्स वेब, सिक्रेट गार्डन, जंगल बुक, चार्ली एन्ड द चॉकलेट फॅक्टरी ) दाखवायचा अर्थात एक क्लासीक झाले की एखादा फाईंडींग निमो, द इन्क्रेडिबल्स इ दाखवायचे. असा प्रकार आमच्याकडे आहे. आधी गोष्ट वाचायची मग सिनेमा बघायचा.

हळुहळू तु एक पान वाच, मी एक पान वाचतो करत सध्या वाचन करणे चालू आहे. थोडक्यात 'कॅच देम यंग' (वय वर्ष ५ पासुन सुरवात करायला हरकत नाही. मुले 'बोर्ड बुक्स' किरकोळीत वाचु लागली की मग.

१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी? (यात त्यातील जुनी भाषा वगैरेही आले.)
वर उल्लेख केलेली स्ट्रेटेजी.
तसेच अश्या पुस्तकांवर आधारीत अभ्यास उदा. पुस्तकातील एखादा सीन दाखवणारे चित्र देउन त्याला रंगवणे, त्यातील व्यक्तिरेखांची नावे ओळखा पासुन ह्या चित्रातील प्रसंगाचे वर्णन करा, असा पूरक अभ्यास कम खेळ मुलांना करायला लावणे. शिवाय काही गोष्टी ज्या आपल्याला जितक्या आवडल्या तितक्या आपल्या मुलांना लगेचच्या लगेच आवडतील असेही नाही. पण त्यामुळे मुलांना आवड नाही असे न समजता इतर क्लासीक पुस्तकांचे पर्याय देउन वाचन चालू ठेवणे.

२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का? (पुढे हॅरी पॉटरही क्लासिक बनेल.)
शक्य आहे. जेरमी ब्रेटवाली शेरलॉक होम्स मालीका माझीही आवडती. हल्ली पुन्हा बघत आहे. त्यातील स्पेकल्ड बँड इ कथानक आता भंकस वाटतात. अर्थात सध्या ही मालीका नेपथ्य, फर्निचर, सिनरी इ नीट नोंद घेउन बघत असल्याने मजा येते आहे. अर्थात डॉयलसाहेबांचा सेन्स ऑफ ह्युमर आवडतो. लहानमुले बाजुला असतानाही ही मालीका बघता येते. 'क्रिमिनल माईंड' ही माझी अजुन एक आवडती मालीका पण ती मात्र लहान मुलांनी बघु नये असे वाटते.

असो, हो हो नक्की जितके जमतील् तेवढे व्हेरीएशन ठेवणे.

३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?
अशी अपेक्षा आहे. :-) बाकी जमेल तसे वाचनाची गोडी लावायचे प्रयत्न करत आहे. नार्नीया , शार्ल्टस वेब, फँटास्टीक मिस्टर फॉक्स वाचले व बघीतले आहे, मस्त जमून आले. आणी हो बरेचसे नवे सिनेमे मुळ कथेपासुन काहीसे वेगळे असतात त्यामुळे शक्यतो जुन्या काळात येउन गेलेले सिनेमे शोधणे जे बरेचसे मुळ पुस्तकानुसार आहेत. लहान मुलांना फरक कळतो व हे पुस्तकात असे नाही व ते तसे का वेगळे किंवा बाबा तुम्ही बरोबर वाचत नाही इ झंझट उद्भवू शकते.

४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?
वर थोडाफार उल्लेख केला आहे. जाणकारांकडून (पक्षी: आमची ही ) अजुन उपाय ऐकून सुचवीन. भरपूर उपाय असणार यात वाद नाही. मुलींच्या मैत्रीणींचा मिळून एक बुक क्लब व रिलेटेड एक्टीव्हीटीज तर नक्कीच करु शकता.

तोवर होमस्कूलिंगवर आधारीत फोरम्सवरुन आधीक माहीती मिळेल. वाचना बरोबरच क्रिएटिव्ह रायटींगदेखील् सुरु करायला हरकत नाही.

मधे एक स्क्रॅपबुकचा छान् उपाय वाचनात आला होता. विशेषता इतिहासाचा अभ्यास. एका अतिशय मोठ्या कागदावर (भिंतीवर् मोठाच्या मोठा नकाशा असतो तेवढा किंवा अजुन मोठा) मधोमध एक आडवी रेषा काढावी. डावे टोक बिग बँग व उजवे टोक आजचा दिवस (प्रेसेन्ट टाइम) जस जश्या इतिहासाच्या दृष्टीने घटना रोजच्या ऐकण्या-पहाण्यात येतील त्या त्या घटना, त्या कागदाच्या टाईमफ्रेमवर नोंदवून ठेवणे. उदा. डायनोसॉर काल, दुसर्‍या महायुद्धातील घटना, ऑलिम्पीक्स, भारताचा स्वातंत्रदिन, अमुक शास्त्रातील, विज्ञानातील शोध, इ इ विविध देशातील माहीती त्या मोठ्याल्या तागावर नोंदवत जाणे. हे एक म्हणले तर लाईफ लाँग प्रोजेक्ट होउ शकते. काही वर्षानी नजर टाकली असता मुलांना त्यांनी स्व:ता नोंदवलेला जागतीक इतिहास पाहून ज्यात विविध देश, प्राणी, शास्त्र, लोक, इ इ माहीती पाहून नक्कीच अभ्यासात फायदा होईल. ज्यावेळी जगात एका ठीकाणी स्वातंत्रलढा चालू आहे त्याचवेळी दुसर्‍या खंडात काय स्थित्यंतरे होते होती इ. रोचक चित्र समोर येते.

चला हा प्रतिसाद आवडला असेल तर (तसेच नसला तरीही) मराठीतील (चांदोबा, अमरचित्रकथा, रामायण, महाभारत सोडून) चांगली क्लासीक म्हणता येतील अशी लहान मुलांची पुस्तके सुचवा.

उत्तम

उत्तम , माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.

अगदी

नेटका आणि काय करावे हे सांगणारा चांगला प्रतिसाद.
काही भाग करतो आहे पण त्यावरची चित्रे काढायला देणे वगौइरे केले नाही,
करून पाहतो.

-निनाद

वाचनाचे

वाचनाचे माहिती नाही पण माझ्या पोरीने लिखाणाचाच सपाटा लावला आहे.
(म्हणजे तीने सांगायचे आम्ही ते लिहायचे - तीच्याच भाषेत, तसेच्या तसे!) आजवर ७-८ पानांची चार पाच पुस्तके झाली आहेत.
ही पुस्तके तीच तीची पाने एकमेकांना चिकटवून वगैरे बाईंड करते.
त्यात तीची चित्रे असतात आणि त्यावर आमच्या हस्ताक्षरात तीची कथा आहे.

लेटेस्ट गोष्ट खालील प्रमाणे

"बाप्पाची गोष्ट
- गार्गी (वय वर्षे ५) रचित बाप्पाची गोष्ट!

एकदा गार्गी, राधा , बाप्पा आणि उंदीलमामा खेळत असतात. गार्गी म्हणते,
'बाप्पा, तू किती मोदक खातो? किती गोड खातो? मोदक ईज नॉट वेली हेल्दी. तुझे दात खलाब होतील आणि तुला शक्ती कशी येनाल?'. 'हम्म्म बलोबल आहे तुझे!' तेवढ्यात बाप्पाची आई आली आणि म्हणाली , ' गणपती, गणपती, चल घरी आता'. बाप्पा म्हणाला दोन मुलीना , 'तुम्ही येता का माझ्या घली खेळायला?' दोन मुली म्हणाल्या, 'होssssss येतो ना!' मग त्या पण जातात. आणि बाप्पाच्या घलाच्या बाहेल उभ्या लाहातात. मग बाप्पाचे बाबा येतात आणि मुलींना म्हणतात, "आता तुम्ही तुमच्या घरी जा, तुमची आई वाट बघत असेल" मुली बिचाssल्या जातात.
तेवढ्यात बाप्पा बाहेल येतो आणि बघतो तर काय? मुलीच नाहीत. मग त्यांना शोधत शोधत जातो. त्याला लांबवल त्या मुली दिसतात. पण बघतो तर काय??? त्यांच्यामागे एक मोठ्ठा लाक्षस लागलेला असतो. मग बाप्पा जातो पटकन आणि त्या लाक्षसाशी लढाई करतो…

आणि बाप्पा (इथे गार्गीने एक मोठा पॉज घेतला. शब्द सापडत नव्हता) ... आणि बाप्पा शिंकतो!
नाही नाही जिंकतो!!
आणि मग बाप्पा, गार्गी आणि लाधा मोदकांची पिकनिक करतात!
लात्री दोन्ही मुली झोपतात. तेवल्यात बाप्पा येतो आणि म्हणतो, ' तुम्ही येतात का माझ्या घली? ' गार्गी म्हणते 'कसे येनाल? तुझे घल तल खुप उंच उंच आहे!' बाप्पा म्हणतो, ' मी तुम्हाला घेऊन जातो. तू मला धल आणि लाधा तुला धलेल' झुsssssssम ते सगळे बाप्पाच्या घली पोहचतात.
तिथे सुंदल पिंक बेड असतो तिथे झोपून जातात. तेवढ्यात बाप्पा ची आई म्हणते, 'गणपती, कोण आहेत या मुली?' बाप्पा सांगतो, 'ही गार्गी आणि तिची बहीण लाधा' मग त्याची आई म्हणते, 'त्यांना त्यांच्या आईकडे सोडून ये आत्ताच्या आत्ता!' मग बाप्पा ला वाईट वाटत पण तो आम्हाला घेऊन 'झुssssssssम' आपल्या घली येतो!!!!!
---
लाधा = राधा
घली - घरी
तेवल्यात - तेवढ्यात
वगैरे वगैरे
-----------
रात्री पुस्तके वाचून दाखवतो पण त्यात काही भीतीदायक आले तर सरळ पुढच्या पानावर जाण्याची 'आज्ञा' असते, कथानक मिस झाले तरी चालते - बरेचदा तर ती विचारते/सांगते 'आता ती चेटकीण तीला स्पेल कलेल, मला म्हायतीये, आता पुढे वाच.' मेनस्ट्रीम
क्लासिक' पर्यंत पोहोचलो नाही अजून... डिस्नी क्लासिक्स उत्तम सुरु आहेत.

( माझ्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे - पुस्तक आपल्याला आवडणे - ते महत्त्वाचे. जगाला आवडले किंवा क्लासिक आहे म्हणून आप्ल्याला/ पाल्याला आवडलेच पाहिजे, असे आजिबातच नसावे...)

-निनाद

अनुभवाचे बोल

मुलांनी क्लासिक पुस्तके वाचावी म्हणून मी प्रियाली किंवा इतर काही प्रतिसादकर्त्यांचे प्रयत्न व त्या बाबतीतील काळजी हे समजू शकतो. सुमारे 30 वर्षांपूर्वी मी सुद्धा एच. जी. वेल्स, ज्यूल्स व्हर्न वगैरेंची पुस्तके मुलांना आणून दिली होती. ती दुसर्‍याच दिवशी कपाटात गेल्याने मीही काळजीत पडलो होतो. आता मागे वळून पाहताना स्वानुभव व मुलांचा अनुभव हे बघता काही निरिक्षणे नक्की करता येतील.
* काही मुलांना वाचनाची आवड असते तर काहींना अजिबात नाही. आवड नसणारी मुले साधारणपणे कथा कादंबर्‍यांच्या पुढे आयुष्यात जातच नाहीत. त्यांच्याबद्दल पालकांनी कितीही प्रयत्न केले तरी फारसा फरक पडणार नाही.
* वाचनाची आवड असणारी मुले जसजशी मोठी होत जातात तशी त्यांची वाचनाची भूक वाढत जाते. या काळात जर पालकांनी त्यांनी क्लासिक पुस्तके आणून दिली तर ती मुले या पुस्तकांचाही झपाट्याने फडशा पाडतात. हे वय साधारणपणे टीन एज मधे येते. या काळात डिक न्स पासून मारी करेली पर्यंतचा कोणताही लेखक त्यांना चालतो.

* माझे 11वी पर्यंतचे सर्व शिक्षण मराठीतून झाल्याने इंग्रजी पुस्तके वाचणे मला वयाची वीस बावीस वर्षे पूर्ण होईपर्यंत शक्यच नव्हते. माझ्या सुदैवाने सुशील परभृत नामक एका लेखकाने भाषांतर केलेली अप्रतिम मराठी पुस्तके मला मिळाली. यामुळे डिकन्स, आयव्हॅनो, रॉबिन हूड पासून ते कीट्स व बायरन यांच्या काव्यांपर्यंतचीची भाषांतरे मला मराठीमधून वाचता आली. त्या वेळेस बालमित्र म्हणून एक मासिक निघत असे त्यात ज्यूल्स व्हर्नच्या कादंबर्‍यांची उत्तम भाषांतरे प्रसिद्ध झालेली आहेत. त्यात मी 20000 लीग्स किंवा चंद्रावर स्वारी वगैरे गोष्टी वाचल्याचे स्मरते. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी भाषांतर केलेली समग्र शेक्सपियर मला याच वयात वाचता आला. या सगळ्यामुळे इंग्रजी पुस्तक हातात धरता सुद्धा येत नव्हते त्या काळात मी जवळ जवळ सर्व क्लासिक्स वाचली होती.
* भारतात राहणार्‍या व इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या मुलांना इंग्रजी पुस्तके वाचता येत असली तरी त्यांचे भाषा प्रभुत्व क्लासिक्स वाचण्यासारखे नसते. त्यामुळे ती क्लासिक्स वाचण्याचा कंटाळा करतात. परदेशातील मुलांच्याबद्दल मला काही लिहिता येणार नाही.

थोडक्यात म्हणजे प्रियाली किंवा इतर प्रतिसादकर्ते यांनी काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांच्या मुलांना अंतर्भूत वाचनाची आवड असेल तर वयाच्या अठरा वीस पर्यंत त्यांनी क्लासिक्सचा फडशा पाडलेला तुम्हाला दिसेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

काही

२०,००० लीग्स अंडर द सी वाचायला दिले. पहिले दोन पाने वाचल्यावर तिने हे जटील आहे. इंग्रजी भाषा जुनी आहे. कंटाळा येतो असे सांगून शेल्फवर परत ठेवले.

आमच्याकडे हे या वर्षी झाले, एवढाच काय तो फरक. ते आणल्यापासून तसेच पडलेले आहे.

हॅरी पॉटर गेल्या वर्षी वाचून संपले. सध्या पारायणे चालली आहेत. सध्या हॅरी पॉटरवर बंदी घालावी का काय असा विचार चालला आहे.

आमच्याकडे सुरूवातीच्या डोरा, लेझी टाऊन, थॉमस इंजिन (!) झाल्यानंतर नंतर जरा बोलणे कळायला लागल्यावर तिला शार्लट्स वेब वाचून दाखवले (तेव्हा ती बरीच लहान असावी). पण तिला अतिशय आवडले, ते पूर्ण केले ते आमच्यापेक्षा तिच्या हट्टाने. फक्त शेवट वाचून रडारड झाली. त्यानंतर तिला स्वतःहून पुस्तके वाचण्याची आवड जूनी बी. जोन्समुळे लागली. पण नंतर ती "जूनी" जरा रोजच्या आयुष्यात वागण्यात दिसू लागल्याने ;) आम्हाला तात्पुरती बंद करावी लागली! तेव्हा क्लासिक असे अगदी सुरूवातीला काही वाचले नाही. नंतर पण तिने केजीत असताना शार्लटस वेब स्वतः परत एकदा वाचून संपवले.

त्यानंतर अलिकडे (गेल्या वर्षात) वाचलेली पुस्तके म्हणजे - ऍन ऑफ ग्रीन गेबल्स, ऍन ऑफ अवॉनले, ऍलिस इन वंडरलँड, जस्ट सो स्टोरीज, लिटल हाऊस इन दी बिग वूडस, कॅडी वूडलॉन ही पुस्तके. ह्यात क्लासिक म्हणावी अशी पुस्तके आहेत का नाहीत माहिती नाही. पण तिला आवडली.

आता खरे तर तिची अशी समजूत झाली आहे की क्लासिक्स ही थोडी रडकी असतात!
लिटल वीमेनचे असे झाले. (बेथचा मृत्यू ही घटना तिच्या दृष्टीने पुस्तकातला रस संपवण्यास कारण झाली).

यावरून माझी उत्तरे अशी-

१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी? (यात त्यातील जुनी भाषा वगैरेही आले.)

कल्पना नाही. लिटल वीमेन आमच्याकडे अर्धेच पडलेले आहे. मुळात एखादे पुस्तक क्लासिक आहे म्हणून वाचायला देऊ नये असे माझे मत झाले आहे. ते रस वाटण्यासारखे असले तरच द्यावे. मला जे आवडेल असे वाटते, ते पुस्तक मी तिच्यासाठी उचलते, ही माझी हल्लीची ट्रिक आहे! हल्ली मी तिला तिच्या सध्याच्या आवडीच्या फँटसी पुस्तकांबरोबर एखादे मी म्हणेन ते पुस्तक वाचायला सांगते ( 'डील' म्हणून!).

२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का? (पुढे हॅरी पॉटरही क्लासिक बनेल.)

होय. मला वाटते काही पुस्तके वगळता बरीच पुस्तके ही कालबाह्य नाही, पण लहान मुलांसाठी संदर्भहीन होतात. मी वाचलेले फास्टर फेणे अलिकडच्या मुलांना आवडेल का? त्यातली गंमत कळेल का? कल्पना नाही. त्यापेक्षा ज्याच्याशी नाते जुळेल अशी पुस्तके चांगली.

३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?

बहुतेक नाही. जर पुस्तकातून काहीतरी मिळते आहे, संदर्भ लागतो आहे असे वाटले तरच पुस्तक हवेसे वाटेल. कळत असताना "वी, द लिव्हिंग" मला वाचायला अकस्मात हाती लागली होती, पण आवडली होती. काही कथा/कादंबर्‍या या विशिष्ट वयात वाचायला आवडतात. मी जरा लहानच असताना, इंग्रजी फारसे समजत नसताना केवळ वातावरण निर्मितीमुळे वुदरिंग हाईटस मन लावून वाचल्याचे आठवते.

४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?

आम्ही मुलीला लहानपणापासून पुस्तकांच्या दुकानात घेऊन जातो. तिला काही एक थोडीशी रक्कम तिला हवे ते पुस्तक घेण्यासाठी देतो. बक्षीस म्हणून ती बर्‍याचदा पुस्तकेच मागते. बाकी याव्यतिरिक्त उपाय मला वाटते आपण स्वतः त्यांच्यासमोर पुस्तके वाचणे असा असू शकेल. आमच्या अमेरिकन लेखक मित्राने इथे आमची मुलगी, त्याची मुलगी जी माझ्या मुलीची मैत्रिण आहे, आणि वाचनात फारसा रस नसलेल्या यांच्या दोन मैत्रिणी यांचा एक वाचनाचा क्लब काढला होता. एक वर्षभर मुली दर आठवड्याला एक लहानसे पुस्तक वाचून त्यावर त्याच्याबरोबर चर्चा करीत असे चालले होते. त्यात आमच्या मुलीने आणि त्याच्या मुलीने छान वाचले, बाकीच्यांना रस नव्हता, पण त्या यांच्या संगतीने थोडे अधिक बोलू/वाचू लागल्या. पण यासाठी आमच्या मित्राने वेळ मात्र दिला. जवळजवळ वर्षभर. चित्रपट बघून पुस्तक वाचले असे मात्र झालेले नाही. हॅरी पॉटरचा पहिला भाग सोडल्यास इतर सर्व भाग, डायरी ऑफ विम्पी किड, क्रॉनिकल्स ऑफ नार्निया, ही पुस्तके तिने आधी वाचली आणि मग चित्रपट पाहिला आहे.

पास

मुले नसल्याने प्रश्न पास :)
चर्चा रोचक आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हा काळचा महिमा की परकीय वस्तूंचे असलेले आकर्षण .

हॅरी पॉटर आणि भारतातील मुलांकरता ५० -४० वर्षा पूर्वी लिहिल्या जात असलेल्या जादूच्या कथांत फारसा फरक वाटत नाही. पण त्यावेळी विद्वान लोक या जादूच्या चमत्काराने भरलेल्या पुस्तका विषयी नाक मुरडत होती आणि मुलांना अश्या काल्पनिक कथा वाचण्यास देणे चूक आहे हे सांगत असत. पण त्या काळी ५०-७५ पैश्यांना मिळणारी ही पुस्तके बाल ,कुमार वाचकात मात्र तुफान लोकप्रिय होती. त्याच बरोबर आणि विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही आणि तो खांद्यावर वेताळाला टाकून निघाला मग त्याची गोष्ट आणि प्रश्न उतरे सारेच कांही भन्नाट वेगळ्या दुनियेत घेवून जाणाऱ्या चंद्रसेन सारख्या मासिक कादंबर्या. यातून मुलांना नवीन देण्या करता किशोर मासिकाचा जन्म झाला.एकेकाळी 'किशोर' चा नियमित वाचक असलेली पिढी एव्हाना वडील बनली असेल आणि तेव्हाचे वडील आता आजोबा झाले असतील, पण 'किशोर' आजही त्यांच्या स्मरणात आहे. मुलांना त्यांच्या भावविश्वाशी नातं सांगणारं साहित्य द्यायचं या उद्देशाने पाठ्यपुस्तक मंडळाने हे मासिक सुरू केलं. या मासिकाने संस्कार आणि विज्ञानाची सांगड घालीत मुलांच्या विश्वात प्रवेश केला. तोपर्यंत मराठीतील बालसाहित्य हे राजकुमार आणि जादूगाराच्या विश्वात वावरत होतं. मात्र अद्ययावतपणा, आधुनिकतेचा पुरस्कार आणि परंपरेची जोपासना, विज्ञान आणि संस्कारांचा मेळ, मान्यवर लेखकांचा-चित्रकारांचा सहभाग, मुलांसाठी हक्काचं व्यासपीठ, मूल्यशिक्षण आणि सर्जनशील लेखन या वैशिष्ट्यांमुळे मासिक घराघरात पोहोचलं. 'किशोर'च्या दिवाळी अंकाची तर बच्चेकंपनीबरोबरच पालकसुद्धा वाट पाहत असतात. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1521517
आत्ता त्याच प्रकारच्या कथा इंग्रजी भाषेत आल्या तर हीच विद्वान माणसे त्याचा क्लासिक म्हणून उदोउदो करत आहेत हा काळचा महिमा की परकीय वस्तूंचे असलेले आकर्षण .

thanthanpal.blogspot.com

पसंद अपनी अपनी

मासुमीचे अभिनंदन! :)

'क्लासिक पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?' असा प्रश्न असल्याने अनुभव नाही असे म्हणतो.

नुसतीच 'पुस्तके वाचायची सवय कशी लावावी?' हा प्रश्नही जटिलच आहे.
मुळात 'पुस्तकांचे वाचन करणे' ही गोष्ट ज्याच्या त्याच्या स्वभावधर्मानुसार ठरते. अनेक प्रौढ व्यक्तीही फारसे पुस्तकांचे वाचन करत नाहीत.
त्यात आजच्या पिढीला (तुम्ही म्हटल्याप्रमाणे) टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ माध्यमातून इन्स्टंट नॉलेज मिळत असते. त्यात काही वाईट आहे असेही नाही.
(निदान भारतात तरी) मुलांना शाळा, अभ्यास, कोचिंग क्लासेस, मित्र, खेळ आणि टिव्ही यातून मुद्दाम वेळ काढून पुस्तके वाचणे फारच अवघड आहे.
त्यामुळे पुस्तके वाचून ज्ञान/माहिती/आनंद मिळवण्यापेक्षा इंटरनेट/टिव्ही/व्हिडिओवर ते मिळवणे मुलांना सोपे वाटते आणि कदाचित श्रेयस्करही असावे.
हळूहळू पुस्तके वाचणे कमीकमी होणार असे दिसते.

आता स्वानुभव -
माझ्या मुलाने अनेक जादू/परी/राक्षस - चाळीस पानी पुस्तके, गोट्या, चिंगी, बंडखोर बंडू, बोक्या सातबंडे, खडकावरला अंकूर, हॅरी पॉटर (सर्व भाग) इ. वयोगटानुसार (वयोमानाप्रमाणे असे म्हणायचे होते. पण!) वाचून संपवली आहेत.
आता तो नववीत असल्याने पुस्तके वाचायला वेळ कमी मिळतो. तरीही सध्या तो श्रीमानयोगी, नाझी भस्मासुराचा उदयास्त, श्रीविट्ठल - एक महासमन्वय ही/अशी पुस्तके वाचतो. (तो गैरमराठी मुलुखात इंग्रजी माध्यमात शिकत आहे.) ही सर्व पुस्तके घरात कायमस्वरुपी असल्याने वाचून संपवायलाच पाहिजेत असे बंधन नसूनही तो ती पुन्हापुन्हा अनेकदा वाचतो. (हॅरी पॉटर त्याचे फेवरीट होते. आता श्रीमानयोगी.) शिवाय शाळेच्या लायब्ररीत मिळणारी इंग्रजी क्लासिक - ट्रेझर आयलंड किंवा एनिड ब्लायटन सारखी पुस्तके वाचतो. (त्याच्या इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाकडे माझेच दुर्लक्ष झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.)
अर्थात् तो टीव्हीही बघतो. पण त्यात डिस्कव्हरी/सायन्स ही त्याची आवडती चॅनेल्स आहेत.

त्याचे अवांतर पुस्तक वाचन सरासरी मुलांपेक्षा जास्त असावे. पण त्याचे कारण त्याला असलेली वाचनाची उपजत आवड हे आहे. तशी आवड लागावी असा कोणताही विशेष प्रयत्न केलेला नाही. मी एखादे पुस्तक आणून ते वाचतो. त्याला वाचायला सांगतो. त्याला वेळ असेल तसे तो ते वाचतो. मग मी त्याच्याशी चर्चा करतो. त्याची मते समजावून घेतो. त्याची एकूण प्रगती बघता
मला असे वाटते की योग्य वयात तो इंग्रजी क्लासिक्सही वाचून काढेल.

आता धाकट्या मुलीकडे वळतो. सध्या तिची अक्षर-ओळख सुरू असल्याने तिच्या वाचनाबद्दल असे काहीच म्हणू शकत नाही. कदाचित तिला वाचनाची आवड लागेल, न-लागेल. पण लागेल ही शक्यता जास्त आहे. मोठ्या भावंडाचे अहमहमिकेने अनुकरण करणे तिच्यात आहे. पण तिला चित्रकलेचीही आवड आहे. त्यात ती वाचनापेक्षा जास्त रमते. पुस्तके तर घरात आहेतच. तिला हवे असेल तर पुढे ती वाचन करू लागेल. तिने पुस्तकांचे वाचन करावे ही अपेक्षा आहे. पण जबरदस्ती नसेल.

पसंद अपनी अपनी.

१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी? (यात त्यातील जुनी भाषा वगैरेही आले.)
- कमी वयात अवघड भाषेतील पुस्तके वाचण्याची सक्ती केल्यास मुळात वाचनाबद्दलच तिटकारा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा प्रथम वाचनाची जबरदस्त आवड निर्माण होण्यासाठी छोटी, साधी-सोपी, मनोरंजक पुस्तके वाचण्याची मुलांना सवय लावावी. यत्ता दुसरी-तिसरीपासून. हळूहळू आकारमान व काठिण्य वाढवत न्यावे.

२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का? (पुढे हॅरी पॉटरही क्लासिक बनेल.)
- बदलावी -हो आणि काळानुसार - नाही. असे म्हणतो की क्लासिक पुस्तकांची यादी मुलांच्या 'वयानुसार' बदलत न्यावी. क्लासिक पुस्तकांच्या यादीत काळानुसार भर पडते. पण जुन्या यादीतली क्लासिक्स तिथे असतातच.

३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?
-होय. (म्हणजे मुळात पुस्तके वाचण्याची आवड असेल तर)

४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?
-नाही. इतर माध्यमे सोपी वाट दाखवतात. त्यामुळे उलटपक्षी वाचनाची नावड निर्माण होण्याची शक्यता असते. (वर सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे-) चित्रपट पहायचा असेल तर प्रथम मूळ पुस्तक वाचावे आणि नंतर चित्रपट पहावा. (क्लासिकचे उदाहरण नव्हे पण 'दा विन्ची कोड' मुलाने अगोदर वाचले आणि नंतर चित्रपट पाहिला. त्याला चित्रपट कादंबरीइतका आवडला नाही. पुढे एंजल्स ऍन्ड डीमन्स चित्रपट पाहिला. आता ते पुस्तक तो मनापासून वाचेलच याची खात्री नाही. याप्रमाणेच गॉन विथ द विंड, डॉ. झिवागो, माय फेअर लेडी इ. चित्रपटांचेही आहे. खुद्द माझ्याही बाबतीत हे खरे आहे. ;))

मुलांना फक्त वाचू द्या..

मी माझ्या अनुभवावरुन सांगतो.
लहान मुले घरातील मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात. मोठी माणसे पुस्तक वाचताना दिसली तर ती कुतुहलाने पुस्तक हाताळतात. चित्र बघतात. अर्थ विचारतात. आईबाप टीव्हीला खिळलेले दिसले तर मग मुलेही वाचनाकडे म्हणावे एवढे लक्ष देत नाहीत.
त्यामुळे मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याची पहिली पायरी - आईबाबा पुस्तक वाचताहेत हे मुलांना दिसू द्या. आपल्याला कळतही नाही इतक्या शांतपणे त्या लहानग्यांचा मेंदू इतरत्र दिसणार्‍या घटनांचा अर्थ लावत असतो.
माझ्यात वाचनाची आवड निर्माण होण्याला माझे वडील कारणीभूत ठरले. माझ्या लहानपणी घरी टीव्ही ही श्रीमंतांची चैन होती. (आमच्या घरात तर बोंबलायला लाईटपण नव्हती म्हणा) तर शाळेतून आलो की आम्ही घराजवळच्या मैदानावर खेळायचो. वडील ऑफिसमधून आले की जवळच्या वाचनालयात जात. एकदा मी कुतुहलाने त्यांना विचारले, 'तुम्ही रोज त्या लायब्ररीत का जाता?' त्यावर वडील मला तिथे घेऊन गेले आणि तो खजिना त्यांनी मला फिरवून उलगडून दाखवला. वाचनाचे बीज असे रुजले. मग नंतर वाचन बकरी जसा कुठलाही पाला खात सुटते तसे झाले. हे पण महत्त्वाचे असते. आपण क्लासिकचा आग्रह का धरायचा? अश्लील वगळता सर्व प्रकारचे साहित्य मुलांच्या नजरेखालून जावे. पुढे हेच वाचन आपल्या जाणीवा समृद्ध करते.

आचार्य अत्रे म्हणत, ' पैलवानाला जसा व्यायामाबरोबर पौष्टिक खुराक गरजेचा, तसे लेखक-अभ्यासक व पत्रकारांना नियमित वाचनाचा खुराक आणि लेखनाचा व्यायाम आवश्यक असतो.' हे वाक्य १०० वेळा पटते.

म्हणून मला वाटते, की आधी मुलांमध्ये आवड निर्माण करा आणि नंतर त्यांचे त्यांना पाहिजे ते वाचू द्या. अर्थात ते काय वाचताहेत याकडे लक्ष असू द्या, पण अमुक एकच वाचा, असा आग्रह नको.

स्वानुभव

मुलांचा अनुभव नाही, पण स्वानुभव आणि परिचयातल्या इतरांच्या अनुभवावरून जे वाटतं ते सांगतो.

१. क्लासिक पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी? (यात त्यातील जुनी भाषा वगैरेही आले.)

या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषेचे विविध नमुने परिचित होणं हा भाषाशिक्षणातला एक अविभाज्य भाग आहे असं वाटतं. त्यासाठी छोटे उतारे वाचणं आणि एक सराव म्हणून एकच गोष्ट विविध शैलीत लिहिण्याचा प्रयत्न करणं यांसारखे उपक्रम राबवता येतील. शब्दांशी, भाषेशी खेळ करता येतात; एकाच संकल्पनेला वेगवेगळ्या पध्दतीनं मांडता येतं; त्यानं आशयात आणि वाचकावर होणार्‍या परिणामात फरक पडतो; त्यात मजा असते, अशा गोष्टी मुळात मुलांपर्यंत पोचल्या तर पुढचं काम सोपं होतं.
त्याप्रमाणे अभिजात पुस्तकांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन वाचण्याचा सराव करणं अधिक फलप्रद होतं असा अनुभव आहे. म्हणजे साहसकथा, रहस्यकथा, अद्भुतकथा इथपासून ते आनंदी/दु:खी/उपेक्षित वगैरेंचं भावविश्व चितारणार्‍या कथा वगैरे विविध विधा (genres) आणि विविध शैली. मुद्दाम विशिष्ट दर्जाचीच आवड निर्माण करणं कठीण असतं, पण वाचनात वैविध्य आणणं आणि त्याविषयी डोळसपणानं चर्चा करून त्यातले गुणदोष दाखवत आणि तपासत राहणं हे अधिक सहजतेनं करता येतं. त्यातून हळूहळू स्वतंत्र रुची निर्माण होते आणि ती खरी त्या मुलाची असते.

२. क्लासिक पुस्तकांची यादी काळानुसार बदलणे आवश्यक आहे का? (पुढे हॅरी पॉटरही क्लासिक बनेल.)

काळानुसारच का, ती व्यक्तीसापेक्षही असते. त्यामुळे वर उल्लेखलेल्या, सहज रुची निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अशा याद्यांवर मुद्दाम विशेष भर न देता मुलाच्या आवडीनुसार त्यांतला काही भाग अधूनमधून समोर आणून पाहावा. पण त्याबरोबर संवाद अत्यावश्यक आहे.

३. वयानुसार आपसूक ही आवड लागते असे तुम्हाला वाटते का?

बहुतेकांच्या बाबतीत नाही. परिसराचा परिणाम होतो. त्यामुळे पालक-शिक्षक-स्नेही अशा सर्वांमुळे फरक पडतो.

४. चित्रपट दाखवून किंवा इतर काही माध्यमाद्वारे किंवा उपायांद्वारे आवड निर्माण करणे शक्य आहे? असल्यास ही इतर माध्यमे किंवा उपाय कोणते?

हे थोडंसं कठीण वाटतं. उदा: एका जागी शांतपणे बसून काहीतरी करण्यात गुंग होण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये असावी. ती नसेल तर त्यासाठी प्रयत्न करावेत. पण पुस्तकावर आधारित चित्रपट पाहिल्यामुळे पुस्तक वाचण्याचं कुतुहल एखादवेळी निर्माण झालं तरीही ते तात्पुरतं असू शकतं. शिवाय, काही पुस्तकांवर चांगले (आशयाला न्याय देणारे) चित्रपट बनणंच कठीण असतं. अनेकदा चित्रपटातल्या (सर्वांच्या सवयीच्या) नाट्यमयतेला सुसंगत असे बदल केले जातात. या सर्वामुळे केवळ विशिष्ट प्रकारचीच पुस्तकं आवडू लागतात, असं होऊ शकतं. उदा. हॅरी पॉटरपेक्षा रोल्ड डालचं लिखाण अधिक रोचक (मला) वाटतं पण चित्रपटांमधल्या नाट्यमयतेशी सुसंगत कथनशैलीमुळे हॅरी पॉटर अधिक मुलांपर्यंत पोहोचतो. असं होणं तुम्हाला अभिप्रेत नसावं असं वाटतं.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

तुलना

उदा. हॅरी पॉटरपेक्षा रोल्ड डालचं लिखाण अधिक रोचक (मला) वाटतं पण चित्रपटांमधल्या नाट्यमयतेशी सुसंगत कथनशैलीमुळे हॅरी पॉटर अधिक मुलांपर्यंत पोहोचतो. असं होणं तुम्हाला अभिप्रेत नसावं असं वाटतं.

या दोघांची तुलना पाहून थोडे आश्चर्य वाटले. दोघांचा लेखनप्रकार बराच वेगवेगळा आहे असे वाटते. (मला दोन्ही आवडतात.)

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

हॅरी पॉटर आणि रोल्ड डाल

या दोघांची तुलना पाहून थोडे आश्चर्य वाटले. दोघांचा लेखनप्रकार बराच वेगवेगळा आहे असे वाटते. (मला दोन्ही आवडतात.)

लेखनप्रकार वेगवेगळा आहेच. माझा मुद्दा हाच होता की चित्रपटासारख्या माध्यमांचा वाचनाची आवड वाढवण्यासाठी वापर करताकरता विशिष्ट प्रकारचं लेखनच आवडू लागण्याचा धोका असतो. पुष्कळांचं असं होताना दिसतं. तो धोका लक्षात घ्यावा.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

वाचन....

मी काही पालक नाही पण मला एक लहान भाऊ (वय वर्ष १०) आहे .
माझ्या भावाला वाचनाची आवड अजिबात नाही. वाचन हे त्याला कंटाळवाणे वाटते. जंगल बुक सारखे चित्रपट पाहिल्यानंतरही त्याला पुस्तक वाचावेसे वाटले नाही. वयानुसार आपसूक आवड वाढते असे वाटत नाही . कारण माझा बऱ्याच मित्र-मैत्रिणींना कोणत्याही प्रकारचे वाचन आवडत नाही.
पालक नसल्याने त्याबाबतीत अनुभव नाही.

आपोआप

मुळात कोणाला कोणत्या बाबतीत आवड निर्माण करणे हे फारच अशक्य वाटते. ("हे वाक्य डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकिन भी है" ह्या चालीवर वाचा). विनोदाचा भाग सोडला तर माझा स्वानुभाव सांगतो.
आमच्या घरात आई अशिक्षीत व वडील कमी शिकलेले असल्यामुळे वाचनाची आवड वगैरे प्रकार नव्हता. अगदी बँकेचे पासबूक हा ही आवडीने वाचण्याचा प्रकार नाही. आपली मुले शाळेत जातात एवढेच माहित. कोणत्या इयत्तेत आहेत ? शिक्षकांची नावे काय ? इ. माहिती नाही. फक्त शाळेत जा व्यवस्थित शिका आणि आमच्यासारखे मागे राहू नका ही तळमळ होती. क्वचित रस्त्यात शाळेतला कोणीही शिक्षक भेटला आणि आपण सांगीतले की हे आमच्या शाळेत आहेत की त्यांना आमच्याकडे नीट लक्ष द्या असे सांगायचे. अभ्यास करत नसेल तर बिनधास्त तुडवा असे सांगायचे. शिक्षक देखील हा आपलाच मुलगा आहे ह्या हक्काने वेळप्रसंगी हात / डस्टर किंवा जी वस्तू हाती लागेल तीने समाचार घ्यायचे. परत घरी सांगायची चोरी. नाहितर शाळेत मुद्दल भेटायचे आणी घरी व्याज आणी चक्रवाढ व्याज. मात्र आजही ह्या शिक्षकांविषयी अमाप आदर वाटतो. १५ ऑगस्ट / २६ जानेवारीला आवर्जून शाळेत हजेरी लावतो. शिक्षकांना देखील बरे वाटते.

तर सांगायचा मुद्दा हा की वाचनाची आवड आपोआपच निर्माण झाली. रस्त्याने चालताना दुकानांच्या पाट्या वाचणे, एबीसीडी शिकायला लागल्यावर इंग्रजी पाट्या वाचणे अशी सुरुवात झाली. मग वर्तमानपत्र, मग चांदोबा, चंपक, ठकठक, चित्रमय कॉमिक्स असा प्रवास झाला. लोकसत्तातील पुस्तक परिक्षणे वाचून मग ललित, कथा, कादंबरया, धार्मिक ग्रंथ, संतसाहित्य आणि इतर विषयांकडे वळलो. नंतर (कविता, नाटके आणि अभ्यासाची पुस्तके सोडून) सारे साहित्यप्रकार वाचून काढले. मात्र हे करताना घरुन सतत विरोध होता. काय सतत पुस्तकात डोकं घालून बसतो, डोळे बिघडतील, चष्मा लागेल इ. इ. टोमणे ऐकावे लागायचे. मात्र क्वचित कधी एखाद्या समस्येवर "एक्सपर्ट कमेंट" दिल्यावर "हा खूप वाचतो त्यामुळे सगळं माहिती आहे" असा चांगला अभिप्राय ही मिळायचा.

अगोदर वाटायचे ची आपल्या घरी शिक्षणाची परंपरा नाही त्यामुळे असे होत असावे मात्र आजुबाजूला पाहिल्यावर सुशिक्षीत कुटुंबांतही "वाचन" प्रकाराबाबत एकूण उजेडच दिसला.
एकंदरीत काही गोष्टी आतूनच याव्या लागतात असे वाटते. मात्र वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करुच नये असे म्हणवत नाही.
तो केला तर वाचनवेड्यांच्या कळपात अजून एका प्राण्याची भर पडेल आणि ते हवेहवेसे वाटेल हे नक्की.

(अवांतर : वर्तमानपत्रे, चेतन भगत (ह्याला क्लासीकल वाचन असे म्हणत नाहीत हे मला माहित आहे) हेमींग्वे सोडला तर दुसरे इंग्रजी वाचन नाही.)

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

कालचीच गोष्ट... आणि धन्यवाद

सविस्तर प्रतिसाद देणार्‍या आणि आपापले अनुभव येथे लिहिणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. यातून एक गोष्ट कळली की मी किंवा माझी लेक फार काही चुकीचे करत नाही आहोत. ;-)

असो. काल नेटफ्लिक्सवरून चित्रपट मागवल्याचे सांगितल्यावर मुलीने मला सांगितले की ती तो चित्रपट बघणार नाही कारण त्यामुळे तिचीपुस्तक वाचण्यातील रूची निघून जाईल. यावर मी तिला विचारले की "शेरलॉक होम्स बघताना असे झाले नव्हते." त्यावर तिचे उत्तर असे -

"शेरलॉक होम्स ही मालिका होती. एका भागात एक गोष्ट दाखवल्याने शेरलॉकच्या इतर गोष्टींत काय होते याची मला उत्सुकता होती. याउलट, हॅरी पॉटरचे काही चित्रपट आधी पाहिले आणि पुस्तक (भाग) नंतर त्यामुळे ते भाग वाचण्यात मजा आली नाही. परंतु जे चित्रपट आधी पाहिले नव्हते ते भाग वाचण्यात मजा आली. डेथली हॉलोज अद्याप प्रदर्शित न झाल्याने तो भाग वाचण्यात सर्वात अधिक गंमत आली. असेच ट्वायलाईटचे झाले. ती पुस्तके वाचण्याआधीच चित्रपट आल्याने आणि पाहिल्याने आता ती पुस्तके वाचण्याची फारशी रूची राहीली नाही म्हणून मी २०००० लीग्ज बघणार नाही."

ठीक! वरील उत्तर मला १००% पटले आणि माझी पद्धती तिच्याबाबत योग्य नाही हे कळले. :-)

आता,

@ घासकडवी - पावणे तीन ते १०,१२,१६ अशी वाटचाल कशी झपाट्याने होईल ते तुम्हाला कळणारही नाही. ;-) तेव्हा ही चर्चा भविष्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा करते.

@ धनंजय - स्वानुभावाबद्दल धन्यवाद. तिला इतर काही लेखकांची पुस्तके किंवा गॉथिक पुस्तकांची ओळखही करून देईन. ब्रॅम स्टोकरचा ड्रॅक्युलाही पुस्तकांच्या यादीत होता. :-)

@सहज - तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सुचवण्याही आवडल्या. इथे जेव्हा शाळेतून बुक रिपोर्टस दिलेले असतात तेव्हा केवळ परीक्षण लिहावे अशी अपेक्षा नसते. :-) उदा. यावेळचा प्रकल्प एखाद्या वर्तमानपत्रासारखा करायचा आहे. त्यात ब्रेकिंग न्यूज, फोटो, संपादकीय, जाहीराती वगैरे सर्व येऊन मांडणीही वर्तमानपत्रांतील स्तंभांसारखी करायची आहे.

लहान मुलांसाठी मराठी क्लासिक गोट्या, फा.फे., चिंगी आणि याशिवाय जयदीपची जंगलयात्रा आणि भागवतांची भाषांतरे मला आवडत.

@निनाद -

एकदा गार्गी, राधा , बाप्पा आणि उंदीलमामा खेळत असतात.

हाहाहा! मस्त. गार्गीची कथा आवडली. पुस्तकांतील किंवा कल्पनेतील कॅरॅक्टर्सशी नाते जोडणे ही आवड लावून घेण्याची पहिली पायरी आहे. गार्गी अजून लहान आहे पण तिला आणि तुम्हाला या चर्चेचा उपयोग होईल असे वाटते.

@ चंद्रशेखर - तुमचा अनुभव माझ्यापेक्षा वेगळा नसल्याचे कळल्याने मनोमन बरे वाटले आणि आशेला जागा वाटली.

@ चित्रा - क्लासिक्स रडकी असतात असे तिलाही पूर्वी वाटत असे. अर्थात त्यावेळी ती क्लासिक आहेत हे तिला माहित नव्हते. नंतर तिने थ्री मस्केटिअर्स वाचले आणि ते तिला खूप आवडले परंतु तेव्हा ते पुस्तक एज ऍप्रोप्रिएट होते (म्हणजे भाषा वगैरे जटील नव्हती.) काउंट ऑफ माँटे क्रिस्टोचेही तसेच झाले परंतु आता असे नाही. ज्यूल्स वर्नची पुस्तकेही भाषांतरीत आहेत पण त्यात अध्येमध्ये येणारे फ्रेंच शब्द, जुने इंग्लिश, लांबलचक वर्णन करण्याची पद्धत वगैरे त्रासदायक ठरत असावे.

सुदैवाने, सध्या नॉटिलसपर्यंत स्वारी झाल्याने पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट आला आहे.

@ठणठणपाळ - ठणूराव, चर्चा हॅरी पॉटर आणि जादूच्या पुस्तकांबद्दल नाही.

@विसुनाना - तुमची उत्तरे पटली. श्रीमानयोगीची पारायणे मी इतक्यांदा केली आहेत की आता ते पुस्तक गेली १५-१७ वर्षे माझ्यापाशी नसूनही त्यातील बरेचसे संवादही माझ्या लक्षात आहेत.

कमी वयात अवघड भाषेतील पुस्तके वाचण्याची सक्ती केल्यास मुळात वाचनाबद्दलच तिटकारा निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच्याशी सहमत आहे. असे होते की शाळा मुलांकडून विशिष्ट अपेक्षा ठेवतात त्यामुळे यातून सुटका दिसत नाही.

@योगप्रभू

लहान मुले घरातील मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात. मोठी माणसे पुस्तक वाचताना दिसली तर ती कुतुहलाने पुस्तक हाताळतात.

हे अगदी खरे आहे किंवा ही पद्धती मी अंमलात आणलेली आहे. आपण जी पुस्तके घरी आणतो आणि वाचतो त्याबद्दल मुले प्रश्न विचारतात आणि त्यातून त्यांची आवड वाढण्याची शक्यता असते. बर्‍याचदा रात्री अर्धा पाऊणतास मी आणि माझी मुलगी एकत्र वाचन करतो. ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे. त्यातील एखादा उतारा वगैरे आवडला तर आम्ही मोठ्याने एकमेकींना वाचून दाखवतो.

२०,००० लीग्ज सध्या आम्ही एकत्र वाचतो आहोत कारण मी पूर्वी त्याचे मराठी भाषांतर वाचले होते.

पण अमुक एकच वाचा, असा आग्रह नको.

असे होतेच असे सांगता येत नाही. शाळा मुलांकडून अपेक्षा ठेवतात. जसे, शाळेने आता यादी दिली. त्यात अलेक्झांडर डुमास, विक्टर ह्युगो, ज्यूल्स वर्न वगैरेंवर अधिक भर होता.

@चिंतातूर जंतू - तुमचे प्र.१चे उत्तर भारी आवडले. त्यातील सुचवण्या उत्तम आहेत. आभारी आहे. :-)

@दिती - तुमचा अनुभव येथे दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता तसेही होते.

@राजकुमार- तुमचा स्वानुभव येथे दिल्याबद्दल आभारी आहे. माझ्या घरी आम्ही काय वाचावे याची काटेकोर छाननी नसली तरी आमच्या वयाला साजेशी चंपक, किशोर, गोट्या, फा.फे., भा.रा.भागवत वगैरेंची पुस्तके घरी येत. पुढे आम्हाला काय वाचायचे हे आम्ही (मी आणि माझा भाऊ) ठरवण्याइतपत हुशार झालो आणि आपापल्या आवडीची पुस्तके आणू लागलो. (माझ्या घरी चांदोबा येत नसे. मराठीतील ते एक भिकार मासिक आहे असा माझ्या पिताश्रींचा ठाम ग्रह होता.)

आभार माझे नका मानू

@चिंतातूर जंतू - तुमचे प्र.१चे उत्तर भारी आवडले. त्यातील सुचवण्या उत्तम आहेत. आभारी आहे. :-)

मग तुम्हाला खरे तर "लिहावे नेटके" आणि त्याच्या लेखिका माधुरी पुरंदरे यांचे आभार मानायला हवेत. कारण माझा स्वतःचा हा सगळा भाषाप्रवास आपोआप (म्हणजे पालक-शिक्षकांच्या जवळजवळ शून्य सहभागातून) झाला. त्यामुळे मला तो अपघात वाटायचा (म्हणजे काहींना होतो आणि काहींना नाही असा). पण ही पुस्तकं पाहिली तेव्हा लक्षात आलं की पालक-शिक्षक थोडे जागरूक असतील तर हे सर्व खूप सहज जमण्यासारखं आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रकल्प संपन्न जाहला

सदर चर्चा येथे टाकण्याचे कारण शाळेतील इंग्रजी विषयाचा एक प्रकल्प करणे हा होता. यात एक अभिजात पुस्तक तीन-चार आठवड्यांत वाचून त्यावर वर्तमानपत्रासदृश विविध लेख लिहिणे असा होता. यात - एक मुख्य बातमी, एक दुय्यम बातमी, संपादकीय, जाहीराती वगैरे अपेक्षित होते. सर्व बातम्या पुस्तकाशी संबंधीत असणे गरजेचे होते. संपादकीय हे पुस्तकाच्या परीक्षणासारखे असणे तरीही परीक्षण आणि संपादकीय यांत फरक भासणे आवश्यक होते. किमान दोन वृत्तपत्रिय पाने भरतील एवढे लेखन करायचे होते आणि वृत्तपत्रासाठी आवश्यक भाषेत लिहायचे होते. वृत्तपत्राचा काळ हा पुस्तकातील काळाशी जुळता हवा होता. यासाठी २०,००० लीग्जची आम्ही निवड केली.

हा प्रकल्प करताना पालकांनी मुलांना मदत करणे अपेक्षित होते परंतु अर्थातच, संपूर्ण प्रोजेक्ट करून देणे अपेक्षित नव्हते. :-) असो. पुस्तक वाचताना आम्ही (मी आणि लेक) असे केले.

१. पुस्तकांतील टिपणे काढली. वाचता वाचताच वृत्तपत्रांतील बातम्यांत कोणता मजकूर येईल/यावा हे ठरवत गेलो.
२. संपादकीय, जाहीराती वगैरेंसाठी विषय शोधले.
३. लायब्ररीत जाऊन विविध वृत्तपत्रांतील बातम्या कशा लिहिल्या जातात याचा अभ्यास केला.
४. वृत्तपत्राच्या पानावर मजकूर नेमका कशाप्रकारे लिहिला जातो हे पाहिले (यांत हेडर, फूटर, मुख्य पानावरील बातमी तोडून आतील पानावर कव्हर करणे, संपादकीय कसे लिहावे. मुलाखत कशी छापावी वगैरे)
५. पावर पॉइंट किंवा पब्लिशरमध्ये हा मजकूर टंकून सुशोभित कसा करता येईल हे शिकवले. (न्यूजपेपर कॉलम्स, टेक्स्ट रॅपिंग, इमेज फॉर्मॅटींग, हेडर्स-फूटर्स, शीर्षके, बॉक्सेस वगैरे)

या व्यतिरिक्त त्या वृत्तपत्रात तत्कालीन बातम्या, मृत्यूची खबर वगैरे स्तंभही टाकले. यासाठी इंटरनेटची बरीच मदत झाली.

असो. प्रकल्प उत्तम झाला. ७५ पैकी ७७ मार्क मिळवून गेला. :-)

सर्वांच्या प्रतिसादांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. प्रतिसादांमुळे हुरुप वाढला होता हे वेगळे सांगायला नकोच.

 
^ वर