अक्षरभ्रंश

'उपक्रम'वर गेल्या काही दिवसांत शुद्धलेखनाविषयी बरीच चर्चा झाली. लेखन करताना शब्दांच्या प्रामाण्याबाबत शंका असल्याचे बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मत व्यक्त केलं आहे. योगायोगाने गेल्या एक दोन महिन्यांत याच विषयावर काही बातम्या वाचनात आल्या होत्या. वरील लेखांतील समस्या आणि या बातम्या यांत एक समान सूत्र असल्याचे वाटल्याने हा लेख लिहीत आहे.
बातमी एक – चीनी युवकांमध्ये अक्षरांचे विस्मरण
बातमी दोन – जर्मनीत 40 लाख अर्धसाक्षर
उदा. चीनमधील युवकांना पिनयिन प्रणाली वापरत असल्यामुळे दुरावलेले चीनी अक्षरलेखन किंवा जर्मनीतील साक्षर व्यक्तींमध्ये वाचण्या-लिहीण्याची क्षमता तपासण्याचा प्रकल्प असो, अगदी आधुनिक साक्षर लोकांनाही लेखन करताना येणारा अडथळा ही ती समस्या होय. अक्षरभ्रंश (कॅरॅक्टर अॅम्नेशिया) नावाची ही समस्या कदाचित हाताने लिहिण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे येत असावी. पूर्वी पाटी किंवा कागदावर एखादे अक्षर घोटून घेत असत. ती पद्धत आता बहुतांशी बंद झाली आहे. त्यामुळे अक्षरभ्रंशाची समस्या वाढत जात असावी. चीनी किंवा जपानी लिपीत अक्षरे घोटवण्यावरच सगळा भर असतो, मूळ सहा फटकाऱ्यांवर (स्ट्रोक्स) या लिप्या उभ्या आहेत असं वारंवार सांगितलं जातं, हे येथे उल्लेखनीय.
या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लिपीचे वाचन करणे शक्य असते. मात्र तेच शब्द लिहित असताना मात्र त्यांचा हात अडखळतो. त्यांच्या हातून चुकीचे शब्द लिहिले जातात. गेल्या चर्चेत अनेकांनी आपल्या शंका जाहीर केल्या आहेतच. मलाही अनेकदा अशाप्रकारच्या संभ्रमाला सामोरे जावे लागले आहे. माहित-माहीत, लिहित-लिहीत या जोड्या तर हमखास गोंधळात टाकतात. Meteorology हा शब्द नेहमी meterology असा लिहून नंतरच तो सुधारण्यात येतो, हा नेहमीचा अनुभव आहे. यांसारख्या अनेक शब्दांचे लेखन नेमके कसे करावे, हे कोडे वारंवार पुढ्यात उभे टाकते. याचं मुख्य कारण तर उघडच आहेः संगणकावरील टंकन!
आताशा संगणकावर कुठल्याही भाषेत लेखन केले तरी, त्याचे शुद्धलेखन तपासणारी यंत्रणा असतेच. त्यामुळे अनेकदा आपण पूर्ण स्पेलिंग लक्षात न ठेवताच पुढे जात राहतो. त्यानंतर सगळ्या पापांचा घडा एफ7 च्या साहाय्याने रिता केला जातो. ओपन ऑफिस वापरत असू, तर ऑटोकम्प्लेट दिमतीला हजर असतोच. त्यामुळे खासकरून काना, मात्रा अन् वेलांटीबाबत मनात शंका आली तरी, आपण लक्ष देत नाही. इंग्रजीबाबत ते त्याहून सोपं आहे.
दुसरा एक मुद्दा, तो म्हणजे आपण वाचताना संपूर्ण अक्षर न् अक्षर वाचत नाही. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला जी भाषा अवगत असेल, त्यातील काही शब्द आपण गृहीत धरून वाचतो. फिक्सेशन असे या प्रक्रियेला नाव आहे. शब्दांतील अक्षरांचा मुख्य क्रम पाहून वाचक तो शब्द ताडतो. इंग्रजीच्या बाबतीत सांगायचं, तर encyclopedia, government या शब्दांतील पहिले तीन अक्षरे पाहिली, की वाचकाला पुढे काय येणार आहे ते कळते. मराठीच्या संदर्भात दहशतवाद किंवा जागतिकीकरण, वैश्विकरण, धुमश्चक्री असे मोठे व वारंवार वापरले जाणारे शब्द या सवयीला बळी पडू शकतात. एकदा हे शब्द विशिष्ट प्रकारे मेंदूत ठसल्यानंतर ते कसे लिहिले जातात, याची वाचक प्रत्येक वेळेस चिकीत्सा करत नाही.
त्यामुळे लिहिताना हे शब्द जागतीकीकरण, धुमश्चक्रि असे लिहिल्या गेल्यास आश्चर्य वाटत नाही. त्याशिवाय उहापोह, जामानिमा, आडवेतिडवे, कुटुंबकबिला अशा शब्दांच्या मालगाड्या म्हणजे हमखास गोंधळाची स्थिती. आमचे एक सहकारी पेयला पयेय आणि विशेषला विषेश असं लिहीत असत. अलिकडे-पलिकडे (अलीकडे-पलीकडे) या जोडगोळीने तर कायम माझा पिच्छा पुरवला आहे.
मुद्रित माध्यमांमध्ये आता-आतापर्यंत या सवयीवर एक उतारा होता, तो मुद्रित शोधकांचा. होता म्हणायचं कारण, असं की बहुतेक वृत्तपत्रांत आता पूर्ण वेळ मुद्रित शोधकांऐवजी अर्धवेळ मुद्रित शोधक असतात. क्वचित नसतातच. अशा मुद्रित लेखक नसलेल्या इंग्रजी वृत्तपत्रात काम केलंय. त्यामुळे त्यातले चटकेही जाणवतात. अशा प्रसंगात उपसंपादक खूप जागरूक असावा लागतो अन् राहिलेली भिस्त एफ7 वर!
काही वारंवार वापरण्यात येणारे शब्द केवळ सुधारून न थांबता, ती चूक कायमस्वरूपी निघून जावी, यासाठी काही मुद्रित शोधक वैयक्तिक सल्ला द्यायचे. हा एक फायदा होता. त्यामुळे ते कायम लक्षात राहून चुका टळायच्या. उदा. जाहीरात मधील ही; रुपया मधील रु हे मला अशाच मुद्रित शोधकांनी ठसवून दिलेली अक्षरे आहेत. लेखन चिकीत्सा सुविधा अद्याप तरी ती सोय देत नाही. चिकीत्सा सुविधेचा आणखी एक तोटा म्हणजे त्यात विशिष्ट शब्द आधीच भरलेले असतात. त्या विशिष्ट शब्दांच्या पलीकडे लेखकाने योग्य लिहिले असेल, तरी ते चूकच गणले जाते. एका मराठी वृत्तपत्रांत काम करताना, तिथे चिकीत्सा सुविधेत भरलेल्या शब्दांची संख्या इतकी कमी होती, की केवळ सर्वनामे आणि अन्य काही शब्दांचा अपवाद वगळल्यास सगळा मजकूर लाल रंगाने अधोरेखित दिसे. शिवाय काही योग्य शब्दांचे पर्यायही चूक दिसत. त्यातून शब्द तपासण्याऱ्याचाही गोंध उडायचा. त्यामुळे अनेकांना ती सुविधा वापरण्याचा कंटाळा यायचा. याचा परिणाम पुढे मुद्रित शोधकांवर कामाचा बोजा वाढण्यात व्हायचा.
भारतीय संदर्भात अक्षरभ्रंशाला कारणीभूत ठरणारा आणखी एक घटक म्हणजे अन्य भाषेचा प्रभाव. खासकरून हिंदीचा. उदा. की हा अव्यय मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत दोन वाक्यांची साखळी म्हणून काम करतो. मात्र मराठीत तो दीर्घ आणि हिंदीत ऱ्हस्व आहे. आता ज्याचं हिंदी वाचन अधिक आहे, अशांना की लिहिताना अडखळायला तरी होणार किंवा चुकीचं तरी लिहिलं जाणार. हीच गोष्ट प्रगती, ज्योती अशा संस्कृतमधून आलेल्या शब्दांच्या बाबत लागू आहे.
आता आपल्याकडे उपस्थित होणारे काही प्रश्न असेः
1.वरील चीनी युवकांप्रमाणे अक्षरभ्रंशाची समस्या आपल्याला भेडसावते का?(खासकरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना-ज्यांचा मराठीशी तुलनात्मक कमी संबंध आहे.)
2.पुणे किंवा इतरत्र पाट्यांवर जे अयोग्य (अशुद्ध) मराठी लिहिलेले दिसते, ते या अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण म्हणून घ्यावे काय?
3.अशी समस्या येत असल्यास, एफ7 पेक्षा वेगळा उपाय काय असू शकतो?
4.ही समस्या बहुतांशी वाचनातून उद्भवत असल्यामुळे मनात वाचन न करता पठन करणे अधिक उपयुक्त ठरेल का?
लेखनविषय: दुवे:

Comments

शक्य

  1. क्वचित.
  2. होय.
  3. एफ७ हा चांगला उपाय आहे. सराव करणे हा एक चांगला दीर्घ मुदतीचा उपाय होऊ शकेल, एफ७ वापरत बसले तरी त्याच्या निरीक्षणातून चुका टाळण्यास शिकता येईल असे वाटते.
  4. ही समस्या वाचनातून उद्भवते हे मत पटले नाही.

अल्पशिक्षित व्यक्तींनाही अभिव्यक्तीची मुबलक माध्यमे उपलब्ध झाली असणे हेसुद्धा ही समस्या वाढली असल्याचे वाटण्यामागचे कारण असू शकते असे मला वाटते. पूर्वी केवळ खूप सराव केलेल्या व्यक्तीच बहुतेक लेखन करीत असतील त्यामुळे त्यांच्या चुका कमी होत असतील.
अजून एक रोचक दुवा.

अक्श् र् ब् ह् रं श्

यावरुन् मला एवढेच् समजले कि "अक्श् र् ब् ह् रं श्" ही जगाला भेदसावणारी फारच् मोठि आणि गंभीर् समस्या आहे. आणि लवकरच् यावर् गोलमेज् वगैरे परिषद् घेणे तातडीचे व गरजेचे आहे. नाहितर् मानव समुहाची फार् मोठि हानी होण्याची शक्यता नाकारता येत् नाही.

दुवा मात्र भन्नाट होता !! सगळ कोटेशन शष्प वाचता आलं

आपापली दृष्टी

त्या त्या क्षेत्रातील मंडळींना त्या क्षेत्रातील समस्या महत्वाच्या वाटतात. प्रत्येक समस्येवर गोलमेज परिषद कशी घेणार? शिवाय चीनी भाषेच्या समस्येवर मराठी माणसांनी परिषद घेऊन काय पदरात पडणार? मानव समूहाची फार मोठी हानी झाली नाही तरी त्या समूहाचा अभिन्न अंग असलेल्या भाषेची हानी हा चिंतेचा-किमान चिंतनाचा-विषय होऊच शकतो.

तेच् तर्...........

>>>>शिवाय चीनी भाषेच्या समस्येवर मराठी माणसांनी परिषद घेऊन काय पदरात पडणार?
गोलमेज परिषद् सर्व राष्ट्रांची मिळुन् घेतात्. आणि आपल्या धाग्यावरुन् मला वाटले की ही जागतिक् समस्या आहे. त्यात् काही माझ चुकलं तर् सांगा.

>>> मानव समूहाची फार मोठी हानी झाली नाही तरी त्या समूहाचा अभिन्न अंग असलेल्या भाषेची हानी हा चिंतेचा-किमान चिंतनाचा-विषय होऊच शकतो.
यात् कोंट्रोव्हर्सी आहे असं नाही तुम्हाला वाटत्??? समुह आणि समुहाच अभिन्न अंग् असलेली भाषा एकच् नाही का???

गैरसमज

समस्या जागतिक असली तरी तिचे निराकरण त्या त्या स्थानिक गटांनी आपल्या पातळीवर करायचे आहे. त्यासाठी काही उदाहरणे म्हणून ते दुवे दिले होते. भ्रष्टाचार ही जागतिक समस्या आहे म्हणून भारतातील लोकांनी अमेरिकेच्या सरकारला सल्ले द्यावेत, हे अपेक्षित नाही.

यात् कोंट्रोव्हर्सी आहे असं नाही तुम्हाला वाटत्??? समुह आणि समुहाच अभिन्न अंग् असलेली भाषा एकच् नाही का???

नाही. याबाबतीत माझा अजिबात गोंधळ नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, येथील १० कोटी संख्येची हानी होणे (समजा नष्ट होणे) आणि त्या समुहाचे अभिन्न अंग असलेली मराठी नष्ट होणे, यात फरक आहेच. मराठी आज अभिन्न आहे. मानव समुहानेच ती बनवलेली असल्याने उद्या ती नष्ट झाली तरी अस्तित्वात असलेला समुह नवी भाषा जन्माला घालू शकतो.

योग्य दुवा

वरील दुवा योग्य आहे. परंतु, भारतीय संदर्भात, मराठीत विशेषकरून, काना-मात्रा बदलल्या तरी अर्थ बदलतो. त्यामुळे सरसकट शुद्धले़खन धाब्यावर ठेवणे आपल्याला परवडणारे नाही.

एफ७ हा चांगला उपाय आहे. सराव करणे हा एक चांगला दीर्घ मुदतीचा उपाय होऊ शकेल, एफ७ वापरत बसले तरी त्याच्या निरीक्षणातून चुका टाळण्यास शिकता येईल असे वाटते.

मान्य. याचा प्रत्यय घेतला आहे अनेकदा. परंतु, ज्या व्यक्तीच्या मूळ वाचनातच चुकीच्या प्रतिमा ठसल्या असतील, त्याला निरीक्षणाची कितपत संधी मिळेल, याबद्दल शंका आहे.

ही समस्या वाचनातून उद्भवते हे मत पटले नाही.

घाईघाईत वाचन करणार्‍या किंवा एकाग्रतेसाठी पुरेशी संधी न मिळालेल्या वाचकांच्या मनात शब्द योग्य मात्र अक्षरे चुकीच्या पद्धतीने ठसली गेली तर? त्यामुळे ती समस्या वाचनातून उद्भवते, असा उल्लेख केला.

पूर्वी केवळ खूप सराव केलेल्या व्यक्तीच बहुतेक लेखन करीत असतील त्यामुळे त्यांच्या चुका कमी होत असतील.

सहमत. त्याचसोबत वाचनाच्याही संधी व साधने त्याच प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत, हे ही लक्षात घ्यायला पाहिजे.

मान्य

भारतीय संदर्भात, मराठीत विशेषकरून, काना-मात्रा बदलल्या तरी अर्थ बदलतो. त्यामुळे सरसकट शुद्धले़खन धाब्यावर ठेवणे आपल्याला परवडणारे नाही.

नक्कीच. इंग्रजीत भाषेच्या बाबतीतही परवडणार नाही असे मला वाटते.

परंतु, ज्या व्यक्तीच्या मूळ वाचनातच चुकीच्या प्रतिमा ठसल्या असतील, त्याला निरीक्षणाची कितपत संधी मिळेल, याबद्दल शंका आहे.

सहमत.

घाईघाईत वाचन करणार्‍या किंवा एकाग्रतेसाठी पुरेशी संधी न मिळालेल्या वाचकांच्या मनात शब्द योग्य मात्र अक्षरे चुकीच्या पद्धतीने ठसली गेली तर?

घाई किंवा व्यग्रतेमुळे अक्षरांकडे दुर्लक्ष होऊ शकेल, वापर करताना गोंधळ उडू शकेल, हे मान्य आहे पण मुद्दामहून चुकीचा अक्षरक्रमच ठसेल हे पटत नाही.

त्याचसोबत वाचनाच्याही संधी व साधने त्याच प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत, हे ही लक्षात घ्यायला पाहिजे.

सहमत.
कोणत्याही नव्या व्यवस्थेत कर्तव्यांपेक्षा उपभोगालाच अग्रकम ठेवण्याचा प्रयत्न होतो, नियम प्रस्थापित होण्यास वेळ लागतो. शिवाय, हे अल्पशिक्षित लोक एकमेकांच्या (अशुद्ध) लेखनांचेच वाचन करण्याची शक्यता अधिक आहे (अशा लेखनांचे 'क्रिटिकल मास' जमले तर एक दुष्टचक्रही बनू शकेल). त्यामुळेही चुकीचे शब्द रुळू शकतील असे वाटते.
पहिल्या दुव्यात उल्लेख आहे की लोकांना अक्षरे अचूक ओळखता येतात पण ती लेखणीने कशी लिहावी ते मात्र विसरले जाते. कदाचित, "कळफलकावर कोणते बोट कोणत्या अंशात वाकविले की कोणते अक्षर पडद्यावर उमटते" याची स्मृती साठविण्यासाठी, "कोणत्या अक्षरासाठी हातातील लेखणी कशी फिरवावी" ते 'सांगणारी' जुनी जागा वापरली जात असावी.

दुष्टचक्र

>>>> हे अल्पशिक्षित लोक एकमेकांच्या (अशुद्ध) लेखनांचेच वाचन करण्याची शक्यता अधिक आहे (अशा लेखनांचे 'क्रिटिकल मास' जमले तर एक दुष्टचक्रही बनू शकेल). त्यामुळेही चुकीचे शब्द रुळू शकतील असे वाटते.

दुष्टचक्र ही कोणाची कादंबरी आहे बरं??? कोणी मदत् करेल काय्?? मला वाचायची आहे ती........... :(

इंग्रजी

इंग्रजीच्या तुलनेने मराठीत अशुद्ध शब्द शोधणे अधिक जिकिरीचे आहे. वेलांट्या, उकार र्‍हस्व की दीर्घ यामुळे बराच गोंधळ होतो. गूगलवर मराठी शोध घेतानाही ही अडचण येते. दूध आणि दुध दोन्हीचे वेगवेगळे दुवे सापडतात.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

अडचण

तो गूगलचा प्रॉब्लेम आहे, मराठीला अपेक्षित प्रकारचे शोधयंत्र गूगलपेक्षा अधिक कठिण नसेल असे वाटते.

मान्य्

शिवाय गूगलवर शोधले असता एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तरी ते शोधयंत्र वापरकर्त्याला योग्य शब्द सुचविते. याचाच अर्थ, मूळ प्रस्तावात म्हटल्याप्रमाणे F7 ला तो एक पर्याय निर्माण झाला आहे. मराठीत ती सोय नाही. मूळात गूगल केवळ मराठीचे शोधनिकाल देतच नाही. त्यात हिंदी शब्दांची सरमिसळ झालेली दिसते. यावर उपक्रमवरच आधीही चर्चा झाली आहे. दूध आणि दुध सारखी उदाहरणे त्याचीच निदर्शक आहेत. म्हणजे लिहिणारा आधी हिंदीच्या प्रभावामुळे चुकीचे लिहीणार आणि त्यावर गूगल आपल्याला ते शोधून आणून देणार.
यात आणखी एक समस्या अशी, की बहुतांशी मराठी वृत्तपत्रांत स्वतंत्र वेब संपादन होत नाही. मुद्रित माध्यमांसाठी तयार झालेली संपादीत बातमीच आंतरजालावर आणली जाते. त्यामुळे तिथे चूक राहिली असेल, तर ती तशीच पुढे जाते.

विकसीत झालेले नाही

गुगल मराठी/हिंदी - देवनागिरी स्क्रीप्टचे शोधयंत्र इंग्रजी इतके विकसीत झालेले नाही असे वाटते. उद्या त्यात "दुध" हा शब्द विचारल्यावर तुम्हाला "दूध" म्हणायचे आहे का असे विचारले जाईल. अर्थात ते करण्याची प्रॉयॉरीटी मराठीसाठी नसावी...

समस्येचे विविध कांगोरे

उपक्रमवर ज्या चर्चेत 100 पेक्शा जास्त प्रतिसाद म्हणून मिळाले ती चर्चा 'शुद्धलेखनाविशयी' नव्हती. असे मी तरी समजतो.
त्यातील निम्म्याहून जास्त प्रतिसाद हे 'प्रतिसाद' नसून 'प्रतिरोध' होते.
ते प्रतिरोध वेगवेगळ्या अंगाचे होते
एक > 'लेखकाचे त्याच्या मनात जे आहे, जसे आहे त्याकडेच लक्श देत असताना टंकताना 'लिपी संकेत' स्तरावर लक्श कमी देता आल्यामुळे जे लिखाण झाले होते.' ह्या गोश्टीला प्रतिरोध होता.
दोन > लेखकाने आतापर्यंत वाचकांच्या मनात थोडीशी देखील सहानभूती कमावलेली नव्हती. उलट आधीच्या आपल्याच अती-नकारात्मक प्रतिसादांमधून वाचकांच्या मनातून 'आपूलकी', 'आदर' गमावलेला होता.
तीन > जगी सर्व क्रूर(तम) असा कोण आहे. ह्या गांधीवादी यांच्या लेखात -
'मी स्वतः (चवीसाठी) मांसाहार करत नाही, ' असे वाक्य लिहीले होते. त्यावर चर्चा झाली नव्हती. पण त्यांना लिहायचे होते.-
'मी स्वत: (चवीसाठी) जीवहत्या करत नाही.' ही चूक देखील आपल्याला नेमका शब्द लिहीताना न आठवण्यामुळे झाली होती.
चार > उपक्रमवर 'प्रमाणलेखन चिकित्सक सुविधा' उपलब्ध नाही.

आता वळूया मुख्य मुद्द्याकडे :-
मराठीत काही मुळाक्शरे अनावश्यक आहेत. म्हणजे 'ष', 'ए', 'ऐ', 'श्र' इत्यादी हे वर्ण अनावश्यक आहे. हे माझे मत आहे.
'ष' चा उच्चार जनमानसामध्ये कालबाह्य झालेला आहे. मराठी माणसे सहजपणे जे उच्चार करतात तेच 'प्रमाण मुळाक्शरे' म्हणून मानले गेले पाहीजे. तसेच स्वराची दांडी व्यंजनाच्या (क्शराच्या) नंतरच म्हणजे दुसर्‍या अर्थाने फक्त दिर्घ इकारांता साठीची वेलांटीच प्रमाण म्हणून टिकली/ ठेवली पाहिजे. व्याकरणांचे जूने नियम 'सुवर्णाच्या जून्या अवजड दागिन्यांसारखे' बाजूला सारायला हवेत.

तसेच 'क्ष', 'द्न्य' ही जोडाक्शरे आहेत. त्यांना मुळाक्शरांच्या यादीत बसवू नये. हे केवळ माझेच मत नसून तसे मी लहानपणी देखील शिकलो आहे. (संदर्भ : पुस्तक: 'मराठी व्याकरण', इयत्ता सहावी, 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे', पुस्तकाची प्रथमावृत्ती : 1973)
अनावश्यक जोडाक्शरांना वर्ण म्हणून प्रचलित होण्याने सामान्य बुद्धीच्या साक्शरांमध्ये बरेच गोंधळ होतात.
उदा.: 'शृंगार' हा शब्द 'श्रुंगार' काही ठिकाणी असा लिहीला जातो.

जी मंडळी उपक्रमावर इतरांच्या शुद्धलेखनाच्या नावाने कचकच करतात, ती विद्वान मंडळी केवळ अर्थ आकलनाच्या बाबतीत 'शब्दबोधन' स्तरावरच रेंगाळत असतात. ही मंडळी अर्थ आकलनाच्या बाबतीत 'वाक्यबोधन' स्तरावर व त्याच्या पुढे पोहचत नाहीत. ती तिथे भयंकर तोकडी पडतात. आणि मग चरफड करीत स्वत:च म्हणतात, 'आमची आकलनशक्ती तरी कमी असावी किंवा हा लेख आमच्या आकलन शक्तीच्या पलिकडचा असावा.' भले अशी विधाने उपरोधाने म्हटली तरी जे शब्द उच्चारलेले नव्हे टंकलेले असतात ते दुसर्‍या अंगाने 'सत्य' च असतात.

काही मुद्दे

उपक्रमवर ज्या चर्चेत 100 पेक्शा जास्त प्रतिसाद म्हणून मिळाले ती चर्चा 'शुद्धलेखनाविशयी' नव्हती. असे मी तरी समजतो.

सहमत.
ठणठणपाळ यांच्या त्या धाग्यावर आलेल्या प्रतिक्रिया बहुतांशी योग्यच होत्या. कोणी काही म्हणालं, तरी मराठी भाषेत वैचारिक संवाद करायचा झाला तर प्रमाण भाषा वापरणे अपरिहार्यच आहे. म्हणूनच या धाग्यात मी कुठल्याही चर्चेचा थेट उल्लेख केला नाही. तसं पाहायला गेलं, तर सदर धाग्याचा संदर्भ या चर्चेत पाहता येईल. ती विवक्षित चर्चा फार फार तर लेखनाचे मान्य नियम न पाळल्याने आपला संदेश पोचविण्यात अपयश कसे येते, याचे उदाहरण म्हणून घ्यायलाही हरकत नाही.

आता राहिला नवीन नियमांचा प्रश्न. हे नियम तयार करताना पूर्वीच्या सारखी बजबजपुरी होणार नाही कशावरून? अगदी वेलांटी आणि मात्रांच्या पातळीवर बदल करता येतील. पण इंग्रजी किंवा तमिळसारख्या भाषेत, जिथे अनेक व्यंजनासाठी एक चिन्ह वापरण्यात येतं, तिथं चिन्हांची संख्या कमी केल्याने लिखाण सुलभ झाल्याचे दिसत नाही.

उपक्रमावरचेच उदाहरण घेतले, तर ठणठणपाळ हे नक्राश्रू हा शब्द नर्काश्रू असा लिहितात. आता श्र काढून टाकला, तरी नर्काशृ किंवा नक्राश्-रू हे काही सुलभ लिखाण होईल, असे वाटत नाही. तसंही पाहिलं तर श्र बाबत जसा गोंधळ होऊ शकतो, तसा क्ष किंवा ज्ञ बाबत होण्यास वाव नाही, असं वाटतं. कारण त्यांच्या सारखं दिसणारं अन्य चिन्हही नाही. ज्ञी, ज्ञै हे काही मराठीत वारंवार आढळणारी अक्षरे नाहीत. त्यामुळं त्यांच्या जाण्यानं फारसा फरक पडेल असं वाटत नाही. ज्ञानेश्वर, शिक्षा हे शब्द ज्यांच्या काना-डोळ्यावरून सर्वाधिक वेळेस जातात, त्यांना या अक्षरांची अडचण होऊ नये.

'ष' चा उच्चार जनमानसामध्ये कालबाह्य झालेला आहे

असहमत. मराठवाड्यात बहुतांश विद्यार्थी सरकारी बसने प्रवास करतात. त्यांच्या तोंडी यष्टी, इलेक्षन हेच उच्चार मी ऐकले आहेत. एसटी असा पुणेरी उच्चार नाही. पुण्यात शिवाजीनगर बस स्टँडवर आपल्याला आजही असे उच्चार ऐकायला मिळतील.

लोकांचा गोंधळ उडतो तो असमान लेखनामुळे असं वाटतं. उदा. संस्कृतमधून आलेला शब्द कृपा असं लिहायचा आणि इंग्रजीतून आलेला ग्रुप असा लिहायचा, अशी पद्धत पडल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता वाढते.

अमेरिकेतील होर्डिंग

स्पेलिंग चुकल्यामुळे काय वीपरीत अर्थ होतो याचा एक नमूना!


अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण

During your testing please reserve some slots for us.

याऐवजी आमच्या मॅनेजरने During your testing please reserve some sluts for us असे लिहून धमाल उडवली होती..

शब्दांची मोडतोडही तितकीच धोकादायक

शब्द वाटेल तेथे तोडला किंवा जोडला तरी विपरित आणि हास्यास्पद अर्थ निघू शकतो.

उदाहरण :
१)आम्ही गेलो तेव्हा ते गाढ व शांत झोपले होते.
आम्ही गेलो तेव्हा ते गाढव शांत झोपले होते.

२) Pen is mightier than the sword.
Penis mightier than the sword.

मराठीचे प्राडॉ

मराठीचे प्राडॉच जर अशुद्धलेखनाचा पुरस्कार करत असतील तर अक्षरभ्रंश हा होणारच.

रोचक

कदाचित चिनी लिपी उच्चारानुसारी होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे, आणि युरोपियन लिप्या चित्रलिप्यांकडे प्रवास करत आहेत.
फिनयिन [पिनयिन] ही चिनी भाषेची उच्चारानुसारी पद्धत मोबाइलांपूर्वी चीनमध्ये मुळे रोवू शकली नव्हती. हसमुख चिह्नांमुळे इंग्रजीभाषकांत अर्थानुसारी चिह्ने प्रचलित होऊ लागली आहेत.
१. कुतूहल वाटते.
२. माहीत नाही. पूर्वी अशा चुका दिसत नसत काय? मला असे वाटले की "सखाराम गटणे" हे पात्र साइनबोर्ड पेंटरांच्या दुर्लौकिकाच्या मानाने जरा अधिकच प्राज्ञ होते. असे त्या व्यक्तिचित्रात पु. ल देशपांडे यांनी ध्वनित केले होते.
३. संगणकावर किंवा भ्रमणध्वनीवर टंकन करताना लिखितशोधन सुविधा उपलब्ध असली तर उत्तम.
४. मूकवाचन हे मला तरी अतिशय उपयुक्त कौशल्य वाटते.

चित्रलिपी

अगदी अचूक निरीक्षण मांडलत.

पूर्वी अशा चुका दिसत नसत काय?

तेच मला म्हणायचंय. पूर्वी अशा चुका दिसल्या, की थेट त्या बोर्ड रंगविणार्‍याचा अशिक्षितपणा काढला जायचा. मात्र शिक्षित असूनही एखादी व्यक्ती असे लिहू शकते, याची नोंद (किमान इथून तरी) ठेवायला हवी. बाकी, पुलंच्या सखाराम गटणेचा हा मुद्दा इतके दिवस लक्षात आला नव्हता. आता तुम्ही दाखवून दिल्यावर वाटलं, कदाचित मुद्दा ठसविण्यासाठी स्टार्क कॉन्ट्रान्स्ट म्हणून त्यांनी ती पात्रयोजना केली असावी.

३. संगणकावर किंवा भ्रमणध्वनीवर टंकन करताना लिखितशोधन सुविधा उपलब्ध असली तर उत्तम.

भ्रमणध्वनीवर हवीच. विशेषतः आता संगणकाची अर्धी-अधिक कामे (संपर्कासाठीची) मोबाईलवर होत असताना ही सुविधा भ्रमणध्वनीवर असावी. अंदाजी मजकूर (प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट) सुविधेचा अधिक वापर केल्याने तरुणांमध्ये स्पेलिंगबाबत भान कमी होत असल्याचे मागे कुठंतरी वाचल होते.

शुद्धलेखन् का हवे?

कोणत्याही भाषालेखनाचा मूळ उद्देश, लेखकाच्या मनातले विचार वाचकापर्यंत प्रभावीपणे पोचवणे हा असतो. अशुद्धलेखनाने वाचकाचे लक्ष विचारांकडे न जाता त्या लेखातील चुकांच्याकडेच(किंवा मुद्दाम केलेल्या बदलाकडेच) प्रथम जाते. उदाहरणार्थ जेंव्हा एखादा लेखक क्ष, ष,ज्ञ् या सारखी मूळाक्षरे क्श,श किंवा द्न्य या पद्धतीने लिहू लागतो तेंव्हा लेखात काय सांगायचे आहे ते बाजूलाच राहते व वाचकाचे मन या अक्षरांभोवतीच घोटाळत राहते. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की या पद्धतीने लिहिलेल्या लेखनातले मुद्दे कितीही विचाराहार्य असले तरी मी ते समजवून घेऊच शकत नाही. माझे मन, (माझ्या मते) त्या लेखातल्या अशुद्धलेखनाभोवतीच, घोटाळत राहते.
थोडक्यात म्हणजे एखाद्या लेखकाला आपला लेख खूप वाचकांनी वाचावा अशी इच्छा असेल तेंव्हा शुद्धलेखन अपहरिहार्य ठरते. मी कसा अशुद्धलेखन करतो असाच अभिमान कोणाला बाळगायचा असेल तर त्याने तो जरूर बाळगावा. मात्र वाचकांनी त्या लेखाकडे दुर्लक्ष केले तर रोष मानून घेऊ नये.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चिनी लोक मॅ न्डरिनचे इंग्रजीत भाषांतर करताना काय धमाल करतात याची एक चुणूक तुम्हाला माझ्या या ब्लॉगपोस्टवर बघायला मिळेल.

सहमत्

अशुद्धलेखनाने वाचकाचे लक्ष विचारांकडे न जाता त्या लेखातील चुकांच्याकडेच(किंवा मुद्दाम केलेल्या बदलाकडेच) प्रथम जाते.

हा नेहमीचा अनुभव आहे.

तुमची नोंद वाचलेली आहे. चीनी लोकांच्या इंग्रजीच्या तडाख्यातून पाट्याच काय, झिन्हुआच्या बातम्याही सुटत नाही.

क्ष्, ज्ञ, त्र, श्र वगैरे

क्ष, ज्ञ आणि त्र ही अक्षरे लिखाणात अनेकदा येत असल्याने त्यांतील पहिल्या दोघांना मराठी आणि तिन्हींना हिंदी मुळाक्षरांत स्थान मिळाले आहे. क्यू आणि एक्स यांचा रोमन लिपीतला समावेश अशाच कारणाने झाला असावा.

श चा शेपटा उजवीकडे वळतो. अशा अक्षराला तिरप्या रेघेने दाखवला जाणारा र सुखासुखी जोडता येत नाही, म्हणूनच श्र ची निर्मिती झाली, हे उघड सत्य आहे. याच कारणासाठी क्त हा खास पद्धतीने लिहिला जातो. ख हे अक्षर रव असे लिहिण्याचा तोच उद्देश. या हल्लीच्या हिंदी पद्धतीच्या नवीन ख ला, र जोडून लिहिलेला ख्रिश्चन हा शब्द वाचताच येत नाही. असाच प्रकार क्र चा. क लिहिताना जर त्याचे पोट मोठे काढले तर त्याला जोडलेला तिरपा र दिसत नाही. म्हणूनच क्र लिहिताना आधी त्र काढून त्याला दीर्घ ऊ ची शेपटी (म्हणजे पर्यायाने क ची पाठ)जोडून क्र लिहिला जाई. आता असला क्र बघायला मिळणे कठीण; (युनिकोड वापरून)टंकलेखन करणे तर शक्यच नाही.

ॐ या खास अक्षराला अशाच कारणाने कळफलकावर जागा मिळाली आहे. जर ऍम्परसॅन्डला जागा आहे, तर ओम् ला का नसावी? ---वाचक्नवी

अक्षरभ्रंश

आधुनिक साक्षर लोकांनाही लेखन करताना येणारा अडथळा ही ती समस्या होय. पूर्वी पाटी किंवा कागदावर एखादे अक्षर घोटून घेत असत. ती पद्धत आता बहुतांशी बंद झाली आहे. त्यामुळे अक्षरभ्रंशाची समस्या वाढत जात असावी.

हे पटत नाही. कागद वा पाटीवर न लिहिलेली पिढी अजूनही शाळांतच आहे. आधुनिक साक्षर म्हणून गणले गेलेले बहुतेक सगळे कागद वा पाटीवरच शिकलेले आहेत.

अक्षरभ्रंश हा काहीतरी नवीन रोग आहे हेही पटत नाही. पुराणकाळापासून लेखनात चुका आहेत. सुदैवाने पूर्वीच्या चुका वह्यांमध्ये राह्यल्या - आजकाल सगळंच जगाला दिसतं.

लेखात विशिष्ट तंत्रज्ञानाचे प्रश्न मांडलेले आहेत. म्हणजे कॉंप्युटर लहानपणापासून न वापरलेली पिढी आता तो वापरण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करते व त्यातून काही गोंधळ निर्माण होतात. त्यामुळे त्या तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता वापरता न येता उलट आधीच्या तंत्रज्ञानाइतक्याच किंवा अधिक चुका करतात - असं काहीसं मांडल्यासारखं वाटतं.

'आजकाल कॉंप्युटर आहेत चुका सुधारायला त्यामुळे बरोबर काय हे लोकांना माहीत नाही.' हे म्हणणं थोडं आजकाल मुलांकडे कॅल्क्युलेटर असतात त्यामुळे त्यांना सवायकी येत नाही असं म्हणण्यासारखं आहे.

लेखन, टायपिंग वगैरे कुठच्याच गोष्टी नैसर्गिक नाहीत. काही वर्षांनी एक वेळ अशी येईल की यापैकी काहीही करण्याची गरज पडणार नाही. सगळं संवादातून होईल.

शेवटच्या प्रश्नाचा अर्थच कळला नाही. तिथे काही शब्दभ्रंश किंवा विचारभ्रंश झाला आहे का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ठीक्

अक्षरभ्रंश हा काहीतरी नवीन रोग आहे हेही पटत नाही. पुराणकाळापासून लेखनात चुका आहेत. सुदैवाने पूर्वीच्या चुका वह्यांमध्ये राह्यल्या - आजकाल सगळंच जगाला दिसतं.

एकदम मान्य. हा मुद्दा वर आला आहेच आणि तो मान्यही आहे.

हे पटत नाही. कागद वा पाटीवर न लिहिलेली पिढी अजूनही शाळांतच आहे. आधुनिक साक्षर म्हणून गणले गेलेले बहुतेक सगळे कागद वा पाटीवरच शिकलेले आहेत.

काही अंशी सहमत. इथे मी वैयक्तिक उदाहरणे दिली आहेतच. लहानपणी पाटी-कागदावर घोटून लिहिल्यानंतरही ही परिस्थिती आहे. त्यामुळे ही समस्या केवळ संगणक वापरणार्‍यांमध्ये आहे, असं नाही. वर पाट्या रंगविणार्‍यांचा उल्लेख तर आला आहेच. फक्त ती समस्या आहे त्यापेक्षा जास्त होत असावी, अशा अर्थाने ते वाक्य घ्यावं.

लेखन, टायपिंग वगैरे कुठच्याच गोष्टी नैसर्गिक नाहीत. काही वर्षांनी एक वेळ अशी येईल की यापैकी काहीही करण्याची गरज पडणार नाही. सगळं संवादातून होईल.

तो दिवस लवकर आला तरं बरं होईल. टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट सोय सगळीकडे झाल्यास बरं होईल.

शेवटच्या प्रश्नाचा अर्थच कळला नाही. तिथे काही शब्दभ्रंश किंवा विचारभ्रंश झाला आहे का?

नाही. तिथे मला एवढंच म्हणायचं होतं, की मूकवाचन करताना 'फिक्सेशन'ची प्रक्रिया झाल्यामुळे वाचकाच्या मेंदूत चुकीच्या प्रतिमा ठसत असाव्यात. पठनाच्या वेळेस प्रत्येक शब्द काळजीपूर्वक पाहिल्या गेल्यामुळे अक्षरभ्रंश कमी होऊ शकतो. (किमान पहिल्या वाचनात. कारण पोथ्या मुखपाठ केलेले भटजी शब्द न पाहता केवळ पाने उलटताना दिसतातच.)

हेकटवादी तेंव्हा देखील त्रास देणारच.

लेखन, टायपिंग वगैरे कुठच्याच गोष्टी नैसर्गिक नाहीत. काही वर्षांनी एक वेळ अशी येईल की यापैकी काहीही करण्याची गरज पडणार नाही. सगळं संवादातून होईल.

तो दिवस लवकर आला तरं बरं होईल. टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट सोय सगळीकडे झाल्यास बरं होईल.

भविश्यात जेव्हा 'टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट' या संबंधित सोय येईल, तेव्हा बदलाला विरोध करणारे परंपरावादी, नव्हे हेकटवादी उच्चार कसा असावा, कसा असू नये याबाबतीत 'कचकच' करतील. हि टाळकी संख्येने थोडी असली तरी सर्वसामावेशक न होता, बहुसंख्य असणार्‍यांना त्यांच्या उच्चारांना 'अशुद्ध व चूकीचे' म्हणत त्या सोयीचा वापर करायला आडकाठी आणतील. 'मयत झालेल्या एखाद्या गायकाचे उच्चार कसे स्पश्ट होते' हे सांगत त्या गायकाची गाणी इतरांना ऐकायला सांगतील.

हम्म!

1.वरील चीनी युवकांप्रमाणे अक्षरभ्रंशाची समस्या आपल्याला भेडसावते का?(खासकरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना-ज्यांचा मराठीशी तुलनात्मक कमी संबंध आहे.)

र्‍हस्व दीर्घाच्या बाबतीत मला जाणवते.

2.पुणे किंवा इतरत्र पाट्यांवर जे अयोग्य (अशुद्ध) मराठी लिहिलेले दिसते, ते या अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण म्हणून घ्यावे काय?

थोडेफार. तो गचाळपणा अधिक वाटतो.

3.अशी समस्या येत असल्यास, एफ7 पेक्षा वेगळा उपाय काय असू शकतो?

अशा शब्दांचा (सुधारून आणि योग्य शब्दांचा) अधिकाधिक वापर करणे.

4.ही समस्या बहुतांशी वाचनातून उद्भवत असल्यामुळे मनात वाचन न करता पठन करणे अधिक उपयुक्त ठरेल का?

आपल्याला सोयीचा वाटेल तो पर्याय निवडावा.

अनुभव

र्‍हस्व दीर्घाच्या बाबतीत समान अनुभव दिसतो. पाट्यांबाबत मला तरी अक्षरभ्रंशाचा प्रकार अधिक वाटतो.
बाकी दोन्ही उत्तर मान्य.

शब्द स्मरण आवश्यक

लेखनाचे निरिक्षण रोचक असे आहे. उत्तम माहितीबद्दल आभारी...!

1.वरील चीनी युवकांप्रमाणे अक्षरभ्रंशाची समस्या आपल्याला भेडसावते का?(खासकरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना-ज्यांचा मराठीशी तुलनात्मक कमी संबंध आहे.)

माहितीतंत्रज्ञान क्षेत्राबरोबर मराठी साहित्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्याही बाबतीत र्‍हस्व, दीर्घ,उकार, संस्कृतमधून आलेले मराठी शब्द याबाबतीत समस्या जाणवते.

2.पुणे किंवा इतरत्र पाट्यांवर जे अयोग्य (अशुद्ध) मराठी लिहिलेले दिसते, ते या अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण म्हणून घ्यावे काय?

असावे असे वाटते.

3.अशी समस्या येत असल्यास, एफ7 पेक्षा वेगळा उपाय काय असू शकतो?
शंतनू ओकचा प्रकल्प मराठी शुद्ध शब्दांसाठी खूप चांगला आहे. शब्दाला पर्याय देऊनही बरोबर काय आहे, हे कळले तर पाहिजे !


4.ही समस्या बहुतांशी वाचनातून उद्भवत असल्यामुळे मनात वाचन न करता पठन करणे अधिक उपयुक्त ठरेल का?

शब्दांचे स्मरण असलेच पाहिजे आणि असे स्मरण समृद्ध वाचनाने होईल. शुद्धलेखनाचे नियम लक्षात ठेवूनही मराठीचे शुद्धलेखन करता येते.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद

एकुणात गोंधळाची परिस्थिती सर्वत्र आहे.
शंतनूंनी पुरविलेल्या ओपन ऑफिसमधील एक्स्टेंशनमुळेच हा लेख आहे त्या स्वरूपात लिहिता आला. त्याबद्दल त्यांनाही विशेष धन्यवाद.
शुद्धलेखनाच्या नियमांबाबत काहीसा संदिग्धपणा आहे. परंतु प्राथमिक पातळीवर हे नियम खूप मदत करतात, हे मान्य.

माझ्या मते..

१.वरील चीनी युवकांप्रमाणे अक्षरभ्रंशाची समस्या आपल्याला भेडसावते का?
कधीच नाही. ज्यांना लहानपणापासून शुद्ध लिखाण वाचायला मिळाले आणि अजूनही मिळते त्यांना अक्षरभ्रंशाची बाधा होण्याची शक्यता नाही.
२. पुणे किंवा इतरत्र पाट्यांवर जे अयोग्य (अशुद्ध) मराठी लिहिलेले दिसते, ते या अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण म्हणून घ्यावे काय?
नाही, तो केवळ मराठी माणसांचा गलथानपणा. हिंदीभाषी प्रांतात अशुद्धलेखन अभावानेच आढळते, कारण तिथे नेहमीच शुद्ध शिकवले जाते आणि तसेच वाचायला मिळते. हिंदी वर्तमानपत्रांत मुद्रणदोष आढळतात, पण र्‍हस्व-दीर्घाची किंवा नुक्ता-चंद्रबिंदूची चूक सापडत नाही.
३. अशी समस्या येत असल्यास, एफ7 पेक्षा वेगळा उपाय काय असू शकतो?
नेहमी अचूक लिखाण वाचायची आणि शुद्ध बोलणे ऐकायची संधी. संस्कृतचे किरकोळ ज्ञान आवश्यक. तेवढे पुरते. मराठीशिवाय अन्य भारतीय भाषेतील लिखाण वाचायची सवय असली की मराठी शुद्धलेखन आपोआप सुधारते.
४. ही समस्या बहुतांशी वाचनातून उद्भवत असल्यामुळे मनात वाचन न करता पठन करणे अधिक उपयुक्त ठरेल का?
कसेही वाचा. डोळ्याला शुद्ध-अशुद्ध जाणवल्याशिवाय रहात नाही.--वाचक्नवी

ठीक्

ज्यांना लहानपणापासून शुद्ध लिखाण वाचायला मिळाले आणि अजूनही मिळते त्यांना अक्षरभ्रंशाची बाधा होण्याची शक्यता नाही.

बरोबर. पण वर रिटेंनी म्हटल्याप्रमाणे, भ्रष्ट लेखन मोठ्या प्रमाणावर झाले आणि तेच वाचायला-लिहायला मिळाल्यास?

मराठीशिवाय अन्य भारतीय भाषेतील लिखाण वाचायची सवय असली की मराठी शुद्धलेखन आपोआप सुधारते.

सहमत. छान मुद्दा.

कसेही वाचा. डोळ्याला शुद्ध-अशुद्ध जाणवल्याशिवाय रहात नाही

याबाबत मला शंका आहे. शुद्ध माहित असल्याशिवाय अशुद्ध ओळखणे अवघड आहे, असे वाटते.

रंग

रंग छान वापरलेत... :)

उदाहरणार्थ?

शुद्धलेखनाच्या नियमांबाबत काहीसा संदिग्धपणा आहे. कदाचित असेलही. मला मात्र तसा कधीही जाणवला नाही. काही उदाहरणे देऊन असा संदिग्धपणा स्पष्ट करता येईल?--वाचक्नवी

स्ंदीग्धता

मराठीत लेखन करताना शुद्धलेखनाचे अन्य नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यात माझा फारसा अभ्यास नाही.
परंतु,
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे - नियम क्र. 14
हा नियम प्रचंड गोंधळात टाकणारा आहे. याला एक कारण म्हणजे, त्या त्या भाषेतील प्रमाण उच्चार मराठीत माहीत असतीलच असे नाही. म्हणजे त्या भाषेतील शब्द आधी इंग्रजीत व नंतर तेथून मराठीत, मग भाषांतरकाराला जे काय वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दांचा उच्चार. इंग्रजीतही आपल्या सोयीनुसार उच्चार करण्याची पद्धत असल्यामुळे तोच मराठीत प्रमाण मानण्यात येतो.
इंग्रजीतील शब्दांचेही प्रमाण उच्चार काय होतात, याबाबत उपक्रमावरच आधीही चर्चा झाली आहे. उदाहरण घ्यायचं झालं, तर world वर्ल्ड हा शब्द आपल्याकडे असाच लिहिला जातो. मराठी व्याकरण किंवा शुद्धलेखनाच्या कोणत्या नियमात हा शब्द बसतो? खरं तर उच्चारानुसार तो वल्ड असा लिहायला हवा. Either सारखा शब्द घेतला, तर त्याचे दोन्ही उच्चार प्रमाणच धरण्यात येतात. पाच वर्षांपूर्वी आलेल्या Tsunami च्या काळात वर्तमानपत्रांनी घातलेला गोंधळ लक्षात घेतला, तर माझा मुद्दा अधिक लक्षात येईल. त्यावेळी काही वर्तमानपत्रे सुनामी असं छापत तर काही त्सुनामी असं छापत.
एक आठवण सांगतो. बिहारमध्ये गेल्या वेळेस निवडणुका झाल्या, त्यावेळी लालूप्रसाद राबडी देवींच्या निवासस्थानी म्हणजे 1, Anne Road इथे बैठका घेत असल्याचे पीटीआयच्या एका बातमीत म्हटले होते. त्यावेळी बिहारमध्ये दौरा केलेल्या एका वरिष्ठांना हा कुठला रस्ता आहे, असं विचारलं. त्यांनी सांगितलं, की पाटण्यातील हा रस्ता अणे मार्ग (लोकनायक बापूजी अणे यांच्या नावे) आहे. इंग्रजीतील मूळ मजकुरामुळे अशी गफलत होऊ शकते.
फ्रेंचसारख्या लिपी आणि उच्चारात घनिष्ठ संबंध नसलेल्या भाषांच्या बाबतीत मराठीत मजकूर (खासकरून वृत्तपत्रांत) नेहमी फसगत होते. जर्मनीच्या चांसेलर (का चान्सेलर?) आंगेला मेर्केल यांचं नाव वृत्तपत्रांत नेहमी अँजेला मर्केल असं छापून येतं. दक्षिण भारतीय भाषांच्या बाबतीत लिपी वेगळी असल्याने तर हा नेहमीचाच त्रास आहे. अलप्पुळाला अलपुझा, अळगिरीला अझगिरी करणे हा प्रकार सर्रास चालतो. यात उच्चारानुसारी लेखन कुठे बसते? (यातील ழ आपल्याकडे नाही हे मान्य पण त्याला ष किंवा झ हा पर्याय नाही.) इंग्रजीच्याच आधाराने लेखन करायचे तर मग इंग्रजी उच्चारांनुसार लेखन करावे, असा नियम का नाही होऊ शकत?
हिंदी किंवा अन्य सर्व भाषांनी परभाषेतील शब्द आत्मसात करताना त्याला आपले रूप देण्याचे व्याकरण सिद्ध केले आहे. आपल्याकडे यासंदर्भात व्याकरणाचे नियमही नाही (असल्यास माहित नाही) आणि शुद्धलेखनात केवळ एका वाक्यात त्याची बोळवण केली असल्यामुळे स्पष्टता येत नाही.
दुसरा एक गोंधळ, इंग्रजीतील शब्द मराठीत लिहिताना करताना i असेल तर ऱ्हस्व आणि ee किंवा ea असेल तर दीर्घ असं सर्वसाधारणपणे सांगतात. मात्र नेहमीच हा नियम पाळला जातो, असे नाही. उदा. Missile हा शब्द मिसाईल असा होतो. अशा अनेक गोंधळाच्या जागा आहेत.
यासंदर्भात पूर्वीही इथे चर्चा झाली आहे. मला जे म्हणायचे आहे, त्यातील काही मुद्दे अभ्यासपूर्वक इथे मांडलेले आहेत. आणखी एक रसप्रद लेख इथे आहे.

संदिग्ध की संदीग्ध?

षीर्शकातच अक्शरभ्रंष?

चूक् झाली

हे असं होतं.

दोन्ही लेख वाचले

दोनही लेख वाचले; फारशी नवीन माहिती मिळाली नाही.
परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहिताना तो त्या भाषेतील मूळ उच्चाराप्रमाणे लिहावा असे सांगणारा १४ वा नियम हा संदिग्ध नाही तर वेडगळपणाचा आहे. परकीय भाषेतील उच्चार मराठीत लिहिण्यासाठी लिपीत मुळात पुरेशी अक्षरे हवीत. उर्दूतले पाच ज मराठीत कसे लिहिणार? तमिळ-मलयालम मधले दोन ळ आणि दोन ण मराठीत कसे लिहिता येतील? फ़्रेन्च-जर्मन तर सोडूनच द्या, पण इंग्रजीतल्या मुळाक्षरांचे उच्चारदेखील मराठीत लिहिण्यासाठी अक्षरे नाहीत. इंग्रजीतला ट हा उच्चार मराठीतल्या ट आणि त यांच्या दरम्यानचा आहे, तो मराठी लिपीत लिहिणे शक्य आहे? कधीकधी तर ट चा उच्चार ठ च्या जवळपासचा होतो(उदाहरणार्थ: Talk=ठॉक्‌). याउलट कदाचित्‌, कुर्यात्‌, एस्‌एस्‌सी असले शब्द अक्षराचे पाय न मोडता लिहावेत असाही एक नियम आहे. आधी मराठीतले सर्व उच्चार मराठीत लिहिता येत नाहीत, तर परकीय भाषेतील कुठून येणार?
या १४व्या नियमाखाली उदाहरण म्हणून पलीस्‌ आणि डिक्शनरि हे दोन शब्द दिले होते असे अंधुक आठवते. हे शब्द असे लिहिले तर बरे दिसतील? तेव्हा हे असले नियम गाळून उरलेले नियम वाचावेत. मुळात १९६१-६२चे हे नियम सचिवालयातील कारकुनांना फाइलींवर लिहिण्यासाठी केले होते, ते सर्वांना लागू करण्याची अजिबात गरज नव्हती. या नियमांच्या यादीखाली दत्तो वामन पोतदारांनी सुचवलेली एक महत्त्वाची टीप होती . ती अशी: या सुधारित नियमांनुसार केलेले लिखाण अंमलात आले तरी शुद्धलेखनाचे जुने नियम पाळून केलेले लिखाण निषेधार्ह मानू नये. नियमावलीच्या सुरुवातीच्या प्रतींत हे वाक्य होते, पुढे महामंडळाने ते गुपचूप काढून टाकले. --वाचक्‍नवी

तेच्

नेमके मला हेच म्हणायचे होते. आता तुम्ही जे वर सांगितले, ते सर्वांपर्यंत पोचायला हवे. म्हणजे आमच्यासारख्यांना सोयीचे होईल.

महामंडळाने ते गुपचूप काढून टाकले.

यातच सर्व काही आले. मुद्दा वाढवायचा म्हणून नाही, तर केवळ सकाळी उशिराने आठवलेले दोन शब्द - स्पोर्ट्स आणि गुड्स असे लिहायचे हे कधीही माझ्या गळी उतरले नाही.

मिसाईल्(?)

Missile हा शब्द मिसाईल असा होतो.
माझ्याकडे आत्ता उच्चारकोश नाही, परंतु मिसाइलमधला इ दीर्घ उच्चारतात ही माहिती मला नवीन आहे. आंतरजालावरील कुठल्या कोशात हा उच्चार पहायला आणि ऐकायला मिळेल? या उलट, अमेरिकन उच्चार मिसल्‌ आहे असे आठवते.
इंग्रजीत आय्‌ चा उच्चार क्वचित दीर्घ ई होतो, नाही असे नाही, पण अशी उदाहरणे दुर्मीळ आहेत.
पीपल(=पिंपळ), चीतल(=चितळ), इन्व्हलीड(=अपंग-नाम), फ़टीग, मरीन, क्विनीन वगैरे.
गुड्‌स हे लिखाण बरोबर आहे, गुडस्‌ लिहिले तर स्पेलिंग Guduss करावे लागेल. तसेच स्पोर्ट्‌स हे योग्य लिखाण. शेवटच्या स चा पाय मोडल्यास चालेल, पण गरज नाही. संस्कृत नसलेल्या मराठी शब्दातले शेवटचे अकारान्त अक्षर जोडाक्षर नसेल तर आपोआपच हलन्त उच्चारले जाते.
--वाचक्‍नवी

खुलासा

मी उल्लेख केला तो प्रत्यक्ष वापरात येत असल्याबद्दल. दुर्दैवाने उच्चारकोश वापरण्याला नेहमीच प्राधान्य देण्यात येते, असे नाही. आजच सकाळी एका वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर मला तो सापडला. हा पहा दुवा
बाकी मुद्दे मान्य. (कारण सखोल अभ्यासाचा अभाव.) परत मुद्दा हाच येतो, की ही माहिती सहसा (सहज) मिळत नाही. त्यामुळे चुकांना वाव राहतो.

खुलासा

मी उल्लेख केला तो प्रत्यक्ष वापरात येत असल्याबद्दल. दुर्दैवाने उच्चारकोश वापरण्याला नेहमीच प्राधान्य देण्यात येते, असे नाही. आजच सकाळी एका वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर मला तो सापडला. हा पहा दुवा
बाकी मुद्दे मान्य. (कारण सखोल अभ्यासाचा अभाव.) परत मुद्दा हाच येतो, की ही माहिती सहसा (सहज) मिळत नाही. त्यामुळे चुकांना वाव राहतो.

वर्ल्ड

डिक्शनरी डॉट कॉम वर वर्ल्ड असाच उच्चार दिला आहे. ’वर्ल्डली’मध्ये तर निश्चितपणे र चा उच्चार होतो. अन्य कोशांत वेगळा उच्चार असू शकेल. -- वाचक्‍नवी

कदाचित

पण आपण तो व+र्+ल्+ड् असा कधी करतो. लहानपणापासून मी शिकलो आणि ऐकले त्यानुसार र् अनुच्चारितच आहे.
आता मी विक्शनरीवर तपासले असता र् एकतर अनुच्चारित आहे किंवा तो खूप मंद आहे. किमान आपण गर्व किंवा सर्प मध्ये वापरतो तेवढा ठळक नाही.

संदिग्धता नेमकी कुठे, कुठे आहे?

दोन्ही लेख वाचले. त्यातील एक लेख माहितीपूर्ण नव्हे चिंतनपूर्ण होता. त्यातून मला हवी ती सामग्री मिळाली.

लिखीत शब्द हा केवळ एक संकेत असतो. तो शब्द नसतो, प्रत्यक्श प्रतीक देखील नसतो. एखादी वस्तू, विशय, संकल्पना ही प्रतीके असतात. ह्या प्रतीकांचे नाव आपण लिखीत स्वरूपात मांडतो तेंव्हा तो एक प्रतीकाचा संकेत असतो. संकेताचा बोध घेवून प्रतीक कोणते? हे ओळखत त्याचा आपल्या मेंदूत 'प्रतिमाबोध' करून घ्यायचा असतो.

होय! , मराठीतील प्रमाणलेखनाबाबत संदिग्धता आहे, पण ती नेमकी कुठे, कुठे आहे? याबाबतचे माझे निश्कर्श :
"भाशाशास्त्रातील विविध टप्पे"

टप्पा 1) अक्शर व वर्ण संकल्पना :
1.1- ह्या संकल्पना व्यवस्थित शब्दबद्ध केल्या गेल्या नाहीत.
1.2- त्यांमधील नेमका भेद जनसामान्यांपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या रूपात पाठ्यक्रमातील आभ्यासाद्वारे व्यवस्थित पोहचवला गेलेला नाही. ते पोहचायला हवे.

टप्पा 2) या संकल्पनांची अंमलबजावणी:
2.1- वरील 1.1 कारणांमुळेच ह्या दोन संकल्पना सध्यातरी एकमेकांना पूरक नाहीत.
2.2 - व्याकरणातील 'इकारांत व उकारांत' यांमधील 'र्रस्व- दिर्घ' ही संकल्पना शास्त्र नसून अवडंबर आहे. ते दूर व्हायला हवे.

टप्पा 3) लिपी शास्त्र:
3.1 - लिपी शास्त्र शब्दबद्ध केले जायला हवे.
3.2 - लिपी शास्त्र हे 'लिखाणाच्या बाबतीमधले सामाजिक गृहीतक' मानले गेले पाहीजे. आजा-पणजांनी तसे लिहीले म्हणून ग्राह्य मानता कामा नये. त्यातील नियमांमध्ये तर्कसंगता हवी. म्हणजे 'स्वरचिन्ह आधी की क्शरचिन्ह आधी' एकच काय ते ठरवले गेले पाहीजे.
3.3 - एकाच क्शराच्या (व्यंजनाच्या) उच्चारासाठी वेगवेगळी वर्णे असता कामा नयेत. तसे केल्याने वाचकाचा वाचन करताना 'अक्शर बोधन' स्तरावरील वेळ कमी होवून त्याचे ध्यान सवयीने शब्दबोधन स्तरावरून थेट वाक्यबोधन स्तर व त्यानंतर 'संदर्भ-मतितार्थ बोधन' स्तरावर पोहचू शकेल. तसेच अनावश्यक वर्णांची संख्या कमी झाल्याने भविश्यात मोबाईल मध्ये मराठी भाशेतून आर्थिक व्यवहाराचे वा तत्सम सॉफ्टवेअर देखील वापरणे सोयीचे जाईल.

टप्पा 4) ध्वनी शास्त्र
4.1 - भाशे संबधित ध्वनी शास्त्र देखील शब्दबद्ध केले जायला हवे.
4.2 - त्यातील वास्तव व

काल्पनिक भेद देखील स्पश्ट केले जावून ते शब्दबद्ध केले जावेत.
सोबत काही चित्र जोडत आहे. (अजून अभ्यास कच्चा आहे, तरी देखील..)

अतिशय

अवांतर प्रतिसाद देत आहे.
मराठी लोक जरी द्न्य असा उच्चार करीत असले तरी तो ज्+न असा आहे. जाणणारा तो ज्~न् . अक्षरोच्चाटनाच्या मोहिमेला काहीतरी पाया असायला हवा.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

'अतिशय अवांतर' प्रतिसादाला 'पुराव्यासहीत प्रतिसाद'

'ज्ञ'='द्'+'न्'+'य्'+'अ'='द्न्य' किंवा 'ज्ञ'
पान क्रमांकः ९ ,ओळ क्रमांकः१५
संदर्भ : पुस्तक: 'मराठी व्याकरण', इयत्ता सहावी, 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे', पुस्तकाची प्रथमावृत्ती : 1973

'अतिशय अवांतर' प्रतिसादाला 'पुराव्यासहीत प्रतिसाद' देण्याशिवाय काय करू शकतो?

ज्ञ = ज् + ञ

ज्ञ = ज् + ञ

मराठीत त्याचा उच्चार रावले म्हणतात तसाच होतो.

गमभन

ज्ञ = ज् + ञ ही गमभन ने निवडलेली केवळ सोय आहे.

रिकामटेकडा यांची चूक

ही 'सोय' केवळ गमभनने निवडलेली नाही. हा दुवा पाहा.
ज + ञ असे गूगलवर शोधा. इनस्क्रिप्ट व मनोगत टंकलेखन प्रणालीमध्येही ज्ञची उत्पत्ती अशीच दिसेल.

 
^ वर