साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप

साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप

21व्या शतकातील निरक्षर म्हणजे केवळ वाचता व/वा लिहिता न येणे एवढेच नसून ज्यांना शिकणे, न-शिकणे व पुन्हा पुन्हा शिकत राहणे (learning, unlearning and relearning) जमत नाहीत ते.

अल्विन टॉफ्लर

ज्यावेगाने व ज्याप्रकारे माहिती तंत्रज्ञानात रोज काही ना काही भर पडत आहे व आहेत त्यांची पुनर्मांडणी होत आहे त्यावरून खरोखरच आपण निरक्षर आहोत की काय असे वाटू लागते. हा न्यूनगंड आपल्याला अस्वस्थ करणारा ठरत आहे. 21व्या शतकातील या माहितीयुगात साक्षरतेचे निकष हळू हळू बदलत आहेत व याची जाणीव होण्यास आपल्याला वेळ लागत आहे. मागील शतकापर्यंत मुद्रित वा लिखित मजकूर वाचूनच (वा काही वेळा रेडिओच्या माध्यमातून) आपल्या ज्ञानात भर पडत होती. माहितीची देवाण घेवाण होत होती. आज मात्र कित्येक पुस्तकं, कथा, कादंबर्‍या, नियतकालिकं, अंकीकरणाच्या (डिजिटाइज्ड) स्वरूपात उपलब्ध होत असल्यामुळे संगणक/ मोबाइल / टीव्हीच्या पडद्यावरून वाचत, श्राव्य स्वरूपातून ऐकत, वा दृक्-श्राव्य स्वरूपातून बघता बघता ऐकतसुद्धा आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो, संवाद साधू शकतो. संवाद हा केवळ अक्षरं वा शब्दं यांची जुळणी करून कागद वा श्राव्य माध्यमातून व्यक्त करण्याची प्रक्रिया हा समज कालबाह्य ठरत आहे. यानंतरची संवाद प्रक्रिया, माहितीचे देवाण-घेवाण, ज्ञान व मनोरंजन डिजिटल स्वरूपात येत असून या डिजिटल स्वरूपाची व त्या त्या तंत्रज्ञानाची तोंड ओळख असणे, त्याचे जुजबी ज्ञान असणे यालाच आता साक्षरता म्हणावे लागणार आहे. या बदलत्या स्वरूपामुळे आपल्या अभिव्यक्तीला धार प्राप्त होत आहे. यात हजारोंच्या संख्येने बारकावे उत्क्रांत होत आहेत. त्यामुळे भाषेचा फक्त सांगाडा राहिला असून त्याचे बाह्य वा आंतरिक स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. भविष्यात आपल्यापुढे आणखी काय वाढून ठेवले असेल याचा अंदाजही आपण करू शकत नाही.

गेल्या 50 वर्षातील माहिती माध्यमांचा आढावा घेतल्यास मुद्रित स्वरूपाला अवकळा येत आहे हे नाकारता येत नाही. साक्षरतेचे स्वरूप समजून


घेण्यासाठी शब्दसंवाद हा निकष असल्यास फक्त 2008 साली अमेरिकेतील लोकांनी एकूण 1.30 ट्रिलियन तास माहितीसाठी वापरलेले आहेत. याचाच अर्थ प्रती माणशी, प्रती दिवशी 12 तास, वा 1 लाख शब्द वा 34 गिगाबाइट्स खर्ची घातले आहेत. सोबतच्या आकृतीवरून शब्द व्यवहार कसे बदलत आहेत याची कल्पना येईल. जितक्या संख्येने शब्द आपल्या मेंदूपर्यंत पोचतात यावर आपली साक्षरता निर्भर असल्यास त्यांच्या स्रोतातील विविधता थक्क करणारी आहे. आज टीव्ही व संगणकांनी मुद्रित व श्राव्य माध्यमांना मागे टाकले आहे. मुद्रित वा पुस्तक केंद्रित मानसिकता असलेल्यांना हे अडचणीचे ठरत आहे. या शतकातील माहितीच्या ग्राहकांची ही बदललेली अवस्था अनेकांना अस्वस्थ करत आहे. व ज्यांना या गोष्टी मान्य आहेत त्यांनासुद्धा यानंतरच्या काळात आपल्या पुढे (आणखी!) काय ठेवले जाणार आहे याची उत्कंठा आहे.

1972 पासून संगणकांच्या सॉफ्टवेरमध्ये मोठ्याप्रमाणात बदल होत गेले. FORTRAN, BASIC, COBOL सारख्या प्रणाली भाषा शिकलेल्यांना पंच कार्ड व मशीन लँग्वेज जगाच्या अंतापर्यंत टिकतील असेच वाटत होते. फ्रेंच. जर्मन्, जपानी भाषेत संगणकांना 'बोलते' करण्यासाठी संगणकाचे कोडिंग व बूलियन् बीजगणिताशी झटपट करत हजारो तास वाया घालवावे लागत होते. एवढे करूनही हे 'निर्जीव' महाकाय (मेन फ्रेम) मशीन्स केव्हा दगा देतील याची खात्री नसे. त्याकाळी संगणक साक्षरता म्हणजे संगणकाच्या पडद्यावरील टेक्स्ट वाचणे इथपर्यंतच मर्यादित होते. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्या कृपेने आपल्या सर्वांची संगणक प्रणाली भाषेच्या जंजाळातून सुटका झाली आहे. आता सर्व गोष्टींचे स्पून फीडींग होत आहे. 80-90च्या दशकात संगणकाचा वापर ग्लोरिफाइड टाइपरायटर स्वरूपात होत असे.(अजूनही कदाचित होत असेलही!) काहीजणांचा अपवाद वगळता कीबोर्डवरील सर्वच्या सर्व 110 कीज कशासाठी आहेत याची आपल्याला कल्पना नाही. मोबाइलवरील कित्येक फंक्शन्सचा आपल्याला पत्ता नसतो. त्यामुळे आज पुन्हा एकदा साक्षरता म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारावासा वाटतो.

युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे वेगवेगळ्या संदर्भातील मुद्रित व लिखित असलेल्या गोष्टींना ओळखण्याची, समजून घेण्याची, त्यातून अर्थबोध करून घेण्याची, संवाद साधण्याची, आकडेमोड करण्याची व त्यात नवीन काही तरी भर घालण्याची क्षमता असे स्थूलमानाने म्हणता येईल (ability to identify, understand, interpret, create, communicate compute and use printed and written materials associated with varying contexts). परंतु या व्याख्येच्या पलिकडे जाऊन साक्षरता उत्क्रांत होत चालली आहे हे लक्षात येईल. आपल्या ज्ञानात व माहितीत भर घालणारे अत्यंत गुंतागुंतीच्या व आपल्या निवडीस भरपूर वाव असलेल्या अनेक गोष्टी आज आपल्याला उपलब्ध आहेत. दिवसे न दिवस त्यांचा वापर अनिवार्य ठरत आहे. त्यामुळे साक्षरतेचे निकषही बदलत आहेत. त्यातील काही प्रमुख निकष असे असतील:

 • वाचन - लेखन साक्षरता
 • संगणक साक्षरता
 • संगणक खेळ साक्षरता
 • महाजालावरील सर्फिंग साक्षरता
 • ग्राफ - तक्त्यांचे विश्लेषण व गणीतीय साक्षरता
 • मोबाइल व स्मार्ट फोन साक्षरता
 • i -pad, i-pod व e-book reader साक्षरता
 • श्राव्य साक्षरता
 • दृक् - श्राव्य साक्षरता
 • ऑन लाइन व्यवहार साक्षरता
 • ऑन लाइन सुरक्षा साक्षरता
 • Social Networking साक्षरता
 • Virtual जगाची साक्षरता
 • Icons & cartoons साक्षरता

यातील बहुतेक गोष्टी तंत्रज्ञानाशी निगडित आहेत. यांचाच वापर आपल्याला या खाली उल्लेख केलेल्या साक्षरता आत्मसात करण्यास उपयोगी ठरतील.

 • वैद्यकीय साक्षरता
 • वाहन साक्षरता
 • आर्थिक व्यवहाराची साक्षरता
 • सांस्कृतिक साक्षरता

आपण याविषयी अनभिज्ञ असल्यास नुकसान, गैरसोय होत राहील व कुणीतरी या अज्ञानाचा गैरफायदा घेत राहील.

आपल्याला लिहिता-वाचता येते म्हणजे सर्व गोष्टी येतात व त्यातून आपण संवाद साधू शकतो, या भ्रमात आपण यानंतर राहू शकत नाही. टेक्स्ट म्हणजे व्यंगचित्र नव्हे. ऑडिओ पॉडकास्ट हे व्हिडीओ पॉडकास्टपेक्षा अत्यंत वेगळे असते. संवाद साधण्याच्या प्रत्येक माध्यमाला हाताळण्याचे एक वैशिष्ट्य असते. व त्या वैशिष्ट्याची तोंडओळख न झाल्यास त्या निरुपयोगी ठरतात. बहुविध साक्षरता आत्मसात केलेली नसल्यास त्यातील बारकावे कळणार नाहीत.

साक्षरता उत्क्रांत होत जाणार आहे, याबद्दल दुमत नसावे. त्याचप्रमाणे भविष्य काळातील तंत्रज्ञान व्यवहाराप्रमाणे ती बदलतही जाणार आहे. त्यामुळे यापुढे फक्त लिहिणे - वाचणे पुरेशे ठरणार नाहीत. त्याचबरोबर वर उल्लेख केलेले इतरही गोष्टी लागतील. याला पर्याय नाही!

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले विवेचन

सद्यकालीन परिस्थितीत ज्ञानाची परिभाषा बदलत चालली आहे , हे मात्र १००% खरे आहे. पण या बदलत्या ज्ञानाच्या रुंदावणार्‍या कक्षा आपल्या आवक्यात आणताना दमछाक होते, हेही खरे.

||वाछितो विजयी होईबा||

वाढते मानदंड

एकेकाळी ज्या गोष्टी चैनीच्या मानल्या जात त्या आता आवश्यक मानल्या जायला लागलेल्या आहेत. वाढणारे मानदंड हे प्रगतीचं लक्षण आहे असं मी मानतो. त्यामुळे आयुष्य कठीण होत चाललंय यापेक्षा आयुष्यात अधिक कठीण गोष्टी पेलण्याची शक्ती येत आहे, असा अर्थ मी काढतो.

वरील विवेचनातल्या काही ओळी पटल्या नाहीत. उदा. •i -pad, i-pod व e-book reader साक्षरता. यात मूळाक्षरं ओळखता येण्याइतकं मूलभूत ज्ञान गरजेचं नसतं. यातले काही ज्ञानाचे घटक हे सर्वसाधारण इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्याच्या सवयींमधून येतात. त्या सवयीदेखील कुठच्याही यंत्राप्रमाणे वापरातून येतात. नाहीतर फ्रिज साक्षरता, मिक्सर साक्षरता, गीझर साक्षरता आवश्यक आहे असंही म्हणावं लागेल. साक्षरता सारखा व्यापक शब्द वापरून वापरून त्याचं चिल्लरीकरण होऊ नये असं वाटतं.

काय माहीत असावं, या सर्वसाधारण अर्थाने जर साक्षरता हा शब्द वापरला असेल तर तो उत्क्रांत होत जाईल याबाबत वाद नाही. ज्याप्रमाणे कॉंप्युटर युजर फ्रेंडली झाले त्याप्रमाणे सर्वच माध्यमं अधिक सोपी होतील, व त्यांच्या शिक्षणाची गरज कमी होत जाईल असंही वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

यंत्रसाधनांची साक्षरता

मुळात माझा उद्देश Gadget साक्षरता असावी असा होता. केवळ यंत्रसाधनं कशी चालू वा बंद करावीत एवढेच या Gadget साक्षरतेत नसून यांचा पुरेपूर वापर करण्याचे preliminary knowledge अपेक्षित आहे. फक्त जुजबी वापर न करता डिझाइनचा योग्य व पुरेपूर वापर अपेक्षित आहे.

जुजबी आणि पुरेपूर

जुजबी आणि पुरेपूर हे काहीसे धूसर स्तर आहेत. आता फिजिक्स बऱ्याच जणांना येतं. पण एखादा आईन्स्टाईन ते पुरेपूर शिकतो आणि वापरतो. मग बाकीचे फिजिक्स शिकणारे जुजबीच का? आयफोनवर दीडलाख अॅप्लिकेशन्स आहेत...

मला वाटतं तुम्हाला असं म्हणायचं आहे की नवीन युगात अनेक वेगवेगळ्या 'आयुधांवर' थोड्याफार प्रमाणात हुकुमत असावी लागते. हे अर्थातच मान्य आहे. पण त्यात आवश्यक असणारं कौशल्य हे त्या विशिष्ट आयुधांवरच्या प्रभुत्वापेक्षा त्या सर्वसाधारण वर्गातल्या उपकरणांविषयी, त्यांच्या क्षमतेविषयीची माहिती, तसंच ती शिकून घेण्याची क्षमता या स्वरूपात आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

डोन्ट चेंज युवर स्टँड!

श्री. प्रभाकर नानावटी,
आपण दिलेला हा प्रतिसाद आपल्या मुळ लेखाच्या सुसंगत वाटत नाही.
मला वाटले आपल्या लेखाचा मुळ उद्देश हा आहे.- आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो, संवाद साधू शकतो. संवाद हा केवळ अक्षरं वा शब्दं यांची जुळणी करून कागद वा श्राव्य माध्यमातून व्यक्त करण्याची प्रक्रिया हा समज कालबाह्य ठरत आहे.
व तोच असेल तर, 'साक्शरता' हा शब्द जरी इथे चूकीचा असला तरी त्या शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द कोणताच सुयोग्य व अर्थ व्यक्तीसाठी माझ्या मते ह्या लेखासाठी उपलब्ध नाही.
प्रत्येक शब्दाला कमीत-कमी दोन अंगे असतात. शब्दाचे एक अंग एक स्तर दाखवते तर दुसरे अंग दुसरा स्तर दाखवते.
तेंव्हा नाही म्हटले तरी 'साधनांद्वारे द्न्यान प्राप्तीसाठी साक्शरता' म्हणून तोच शब्द सध्या तरी, म्हणजे नवा शब्द निर्माण होण्यापूर्वी, योग्य आहे.

सहमत

आयुष्य कठीण होत चाललंय यापेक्षा आयुष्यात अधिक कठीण गोष्टी पेलण्याची शक्ती येत आहे

+१
--------
दविंची इन्स्टिट्यूट या भंपक संस्थेच्या थॉमस फ्रे या भविष्यवेत्त्याचे विचार या संदर्भात रोचक आहेत.

संदर्भ

या लेखासाठी थॉमस फ्रे च्या Blogचा संदर्भ घेतला आहे. दविंची इन्स्टिट्यूट या भंपक संस्थेनीसुद्धा तो उचलला असेल.

शरद पवार

काही वर्षांपुर्वी शरद पवार यांनी जो संगणक साक्षर नाही तो निरक्षर असे वक्तव्य केल्याची बातमी सकाळला आली होती. त्याची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे

उपकरणे, वावर, यांच्यासाठी कौशल्य बदलत आहे

उपलब्ध उपकरणे, समाजात वावर, यांच्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य बदलत आहे. सहमत.

बदलणारं स्वरूप आणि दर्जा

वेगवेगळ्या माध्यमांमुळे साक्षरतेच्या संकल्पनेत बदल होत आहेत हे खरंच आहे. पण याबरोबरच ज्याला मूलभूत म्हणता येतील अशा साक्षरताप्रकारांच्या (बोली-लेखी भाषा, दृश्यभाषा आणि श्रवणभाषा) दर्जात काही फरक होताना दिसतो. उदा: आपण वर दिलेल्या यादीतल्या अनेकविध माध्यमांतून इंग्रजीला सामोरं जाण्यात वाकबगार असणार्‍या माझ्या परिसरातल्या अनेक उच्चविद्याविभूषितांना साध्यासाध्या शब्दांचे अर्थ किंवा समानार्थी शब्दांच्या अर्थांतले किंचित फरक लक्षात येत नाहीत असं दिसतं. त्यामुळे त्यांची व्यावसायिक वापराची भाषा ही अतिशय मर्यादित वकुबाची, सैल आणि कमजोर आहे असं लक्षात येतं. प्रतिमांच्या भाषेच्या बाबतीत तर विशेषतः चिंताजनक परिस्थिती आहे. टी.व्ही., यूट्यूब, मोबाईल, टॉरेंट अशा अनेकविध माध्यमांतून पुष्कळ प्रतिमांचा स्वतःवर होणारा भडिमार लीलया पेलता येत आहे असं वरवर दाखवणारी तरुण पिढी ही 'समोर दिलेल्या सुपरिचित आणि तुमच्या आवडीच्या प्रतिमेतून तुम्हाला जे अर्थबोधन होतं ते समजावून सांगा' अशा साध्या प्रश्नाला प्रतिसाद देताना रडकुंडीला येते. 'इन्सेप्शन' किंवा 'अवतार' यांसारख्या चित्रपटांत जीवनाचं तत्त्वज्ञान आहे आणि त्या फार श्रेष्ठ कलाकृती आहेत असं ते स्वतःच सांगतात, पण त्यांतल्या प्रतिमांच्या अर्थबोधनाविषयीचे सोपे प्रश्न हाताळू शकत नाहीत; आंतरजालावर चार ठिकाणी वाचलेल्या गोष्टी कॉपी-पेस्ट करून उत्तरं देतात. या उत्तरांना प्रतिवाद केला तर आपल्याच उत्तरांचं समर्थन त्यांना अजिबात करता येत नाही, कारण मुळातल्या प्रतिमा आणि त्यांच्याविषयी वाचलेले शब्द हे त्यांना कळलेलेच नसतात. माझ्या दृष्टीनं अशी माणसं जवळजवळ निरक्षर असतात, कारण त्यांच्या रोजच्या वापरातल्या माध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोहोचणारे शब्द आणि प्रतिमा यांचे अर्थ त्यांना कळत नसतात आणि ते कळत नाहीत हेही त्यांना कळत नसतं.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

लेख आवडला

लेख मला आवडला.

'भूतकाळातील घटना वा चिंतने उगाळत, वास्तवातील घटनांकडे, परीस्थिती कडे पहात रडणार्‍या, हळहळणार्‍या लेखांपेक्शा',
'वास्तवाचे भान ठेवत भविश्यात डोकावणारे लेख' मला आवडतात.

लेख अमेरीकेच्या मेंटालिटीचा विचार करीत लिहीला गेला आहे. प्रत्येक देशाची, प्रदेशाची परीस्थिती वेगवेगळी असते. त्यांच्या-त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी वेग-वेगळ्या गुणांच्या विकसनाची गरज असते. पण सार्‍या जगात
सुक्शम स्तरावर एकच ट्रेंड सूरू असतो, तो म्हणजे 'बदल'.

लेखात माहिती मिळवण्यांच्या साधनांमध्ये कसा बदल झाला आहे हे नमूद केले गेले आहे. आणि म्हणूनच वरील लेख -
' साक्शरतेच्या 'भौतिक बदलाचे स्वरूप' '
असा मांडला गेलेला आहे.

लेखाचे नाव 'साक्शरतेचे बदलत असलेले स्वरूप' असे आहे. इंग्रजीत शब्दश: भाशांतर केल्यास 'चेंजीस इन द फॉर्मस् ऑफ लिटरसी' असे
होवू शकते. यात काही चूक आहे व ती दाखवण्यासाठी मी हा प्रतिसाद लिहीत नाही आहे. तर भारतीय डोळ्यांना हा लेखातून 'टिपलेला बदल' कसा आकळता येईल ते विशद करीत आहे.

होय बदल होत आहे! पण बदल कोठे व कसा होत आहे? व भौतिक बदलाला सामोरे जाण्यासाठी मानसिक वा बौद्धिक स्तरावर कसे
काय बदल स्विकारावे लागतील?, ह्या कडे पाहुया.

या लेखात 'साक्शरता' हा शब्द चूकीचा आहे. इथुनच सुरू करूया!
मुळात शब्दांचा चूकीचा वापर वाचकांच्या मनात एकतर 'चूकीच्या संकल्पनाचा डोलारा' तरी उभा करतो, वा मनात गोंधळ निर्माण करतो.
पण मग जर तो शब्द चूकीचा आहे तर मग अचूक शब्द कोणता? तो कसा काय शोधायचा?
व त्याकरीता आपल्याला जे काही विचारांचे आदान-प्रदान करावे लागणार त्यासाठी मग भाशा * ही एक शिडीच उपयोगी ठरणार आहे.

इं.:लिटरेट म्हणजे साक्शर
साक्शर म्हणजे 'जी व्यक्ती अक्शरांना उच्चाराने व लिहीण्या/वाचण्याने ओळखू शकते ती'.
साक्शर ची फोड ='स'+'अक्शर'
अक्शर म्हणजे 'व्यंजनांचा स्वरासहीत उच्चार'(इं.:सिलॆबल)
आणि म्हणूनच 'साक्शर म्हणजे ध्वनी व चित्रस्वरूपातील प्रतीकांना ओळणारी व्यक्ती'
पण हे झाले ध्वनी व चित्रांना ओळखणे. या जगात 'भाशिक प्रतीकं' ओळखणं, त्या प्रतीकांमधील विविधता व त्यांमधे आदला-बदल
केल्याने होणारे अर्थबदल हे व एवढेच ओळखणं पूरेसे नसतं.
आपल्याला प्रतीकं ओळखणं, त्यांच्या तर्‍हांमधील विविधता ओळखणं हे ही गरजेचे आहे. ह्या प्रतीकांच्या आकलनाच्या व त्यांना
विविध प्रकारे हाताळण्याच्या स्तरावर जावे लागणार आहे. ह्या स्तराला आता नाव देण्याची गरज आहे असे मला वाटते.
म्हणजे -
टप्पा 1) 'निरक्शरता' हा निम्न स्तर मानला तर..
टपा 2) 'साक्शरता' हा खालून दुसरा स्तर असेल तर मग...
टप्पा 3) 'व्याकलनता' हा वरचा स्तर असू शकेल... असे मला वाटते.
गॅजेट कोणतीही असो, कितीही प्रगत असो. ती हाताळता येतील. पण जी व्यक्ती 'व्याकलनाच्या शास्त्राशी' परीचित नसणार ती व्यक्ती भविश्यात होणारी संभाशणं समजू शकणार नाही, संभाशण करू शकणार नाही.

*
भाशा ही प्रतीकांची व त्यातून व्यक्त होणार्‍या प्रतिमांद्वारे घडत गेलेली असते.
प्रतीक म्हणजे 'चिन्हं'. प्रतिमा म्हणजे 'त्या प्रतीकांचा व त्या अनुशंगे येणार्‍या सगळ्या गोश्टींचा अर्थ'.
ही चिन्हं ध्वनींची देखील असू शकतात, चित्रांची देखील असू शकतात.
ह्या चिन्हांची आपआपसातील सांगड कशी करायची?, कशी करू नये?, ह्याचे देखील शास्त्र असते.
ध्वनींची सांगड ज्या शास्त्रातून समजावली जाते ते शास्त्र म्हणजे 'भाशेचे व्याकरण'
(प्रमाणित)चित्रांची सांगड ज्या शास्त्रातून समजावली जाते ते शास्त्र म्हणजे 'भाशेची लिपी'

शिकणे

वापरणे शिकताना प्रत्येक वस्तूचे वेगळे शिकणे नसते. चार पाच कॅटॅगरी असतात.

उदा. मोबाईल, आयपॉड, कॉम्प्युटर ही एक कॅटॅगरी आहे. यात एक वस्तू वापरनार्‍याला दुसरी सहज वापरता येते. वेगळी शिकावी लागत नाही.

यापुढे जाऊन मी असे म्हणेन की मेनू नेव्हिगेशन ही एकच गोष्ट शिकायची असते. (आणि त्याची एक विशिष्ट भाषा). ते जमले की सगळे जमते.

घरगुती उपकरणे ही दुसरी कॅटॅगरी असते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

साक्षरता की स्किल?

साक्षरता हा शब्द तितकासा पटला नाही. हा लेख उपकरणे वापरण्याच्या स्किल्सबद्दल असावा.

एखादे उपकरण वापरले किंवा घेतले म्हणजे त्याची सर्व फंक्शन्स आपल्याला माहित हवीत हा विचार योग्य वाटत नाही. आपल्या गरजेपुरती फंक्शन्स आपल्याला माहित हवीत. तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलत असते की अनेक उपकरणांपैकी आपण जी उपकरणे ज्या ज्या कारणांसाठी वापरतो त्याची माहिती आपल्याला असली तर पुरेसे आहे. यापुढील माहिती करून घेणे ही त्या व्यक्तीची आवड किंवा जिज्ञासा मानता येईल.

गेल्या 50 वर्षातील माहिती माध्यमांचा आढावा घेतल्यास मुद्रित स्वरूपाला अवकळा येत आहे हे नाकारता येत नाही.

बाकी हे खरेच. भारतातले माहित नाही पण अमेरिकन शाळांतही मुलांना प्रोजेक्ट्स मायक्रोसॉफ्ट वर्ड, पावरपॉइंट, पब्लिशर वापरून तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाते. हे करताना वरील सर्व सॉफ्टवेअर्सचे ज्ञान मुलांना अवगत आहे असे गृहित धरले जाते. :-) (म्हणजे शाळेत त्याचे वर्ग नसतात.)

 
^ वर