अक्षरभ्रंश

'उपक्रम'वर गेल्या काही दिवसांत शुद्धलेखनाविषयी बरीच चर्चा झाली. लेखन करताना शब्दांच्या प्रामाण्याबाबत शंका असल्याचे बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मत व्यक्त केलं आहे. योगायोगाने गेल्या एक दोन महिन्यांत याच विषयावर काही बातम्या वाचनात आल्या होत्या. वरील लेखांतील समस्या आणि या बातम्या यांत एक समान सूत्र असल्याचे वाटल्याने हा लेख लिहीत आहे.
बातमी एक – चीनी युवकांमध्ये अक्षरांचे विस्मरण
बातमी दोन – जर्मनीत 40 लाख अर्धसाक्षर
उदा. चीनमधील युवकांना पिनयिन प्रणाली वापरत असल्यामुळे दुरावलेले चीनी अक्षरलेखन किंवा जर्मनीतील साक्षर व्यक्तींमध्ये वाचण्या-लिहीण्याची क्षमता तपासण्याचा प्रकल्प असो, अगदी आधुनिक साक्षर लोकांनाही लेखन करताना येणारा अडथळा ही ती समस्या होय. अक्षरभ्रंश (कॅरॅक्टर अॅम्नेशिया) नावाची ही समस्या कदाचित हाताने लिहिण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे येत असावी. पूर्वी पाटी किंवा कागदावर एखादे अक्षर घोटून घेत असत. ती पद्धत आता बहुतांशी बंद झाली आहे. त्यामुळे अक्षरभ्रंशाची समस्या वाढत जात असावी. चीनी किंवा जपानी लिपीत अक्षरे घोटवण्यावरच सगळा भर असतो, मूळ सहा फटकाऱ्यांवर (स्ट्रोक्स) या लिप्या उभ्या आहेत असं वारंवार सांगितलं जातं, हे येथे उल्लेखनीय.
या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लिपीचे वाचन करणे शक्य असते. मात्र तेच शब्द लिहित असताना मात्र त्यांचा हात अडखळतो. त्यांच्या हातून चुकीचे शब्द लिहिले जातात. गेल्या चर्चेत अनेकांनी आपल्या शंका जाहीर केल्या आहेतच. मलाही अनेकदा अशाप्रकारच्या संभ्रमाला सामोरे जावे लागले आहे. माहित-माहीत, लिहित-लिहीत या जोड्या तर हमखास गोंधळात टाकतात. Meteorology हा शब्द नेहमी meterology असा लिहून नंतरच तो सुधारण्यात येतो, हा नेहमीचा अनुभव आहे. यांसारख्या अनेक शब्दांचे लेखन नेमके कसे करावे, हे कोडे वारंवार पुढ्यात उभे टाकते. याचं मुख्य कारण तर उघडच आहेः संगणकावरील टंकन!
आताशा संगणकावर कुठल्याही भाषेत लेखन केले तरी, त्याचे शुद्धलेखन तपासणारी यंत्रणा असतेच. त्यामुळे अनेकदा आपण पूर्ण स्पेलिंग लक्षात न ठेवताच पुढे जात राहतो. त्यानंतर सगळ्या पापांचा घडा एफ7 च्या साहाय्याने रिता केला जातो. ओपन ऑफिस वापरत असू, तर ऑटोकम्प्लेट दिमतीला हजर असतोच. त्यामुळे खासकरून काना, मात्रा अन् वेलांटीबाबत मनात शंका आली तरी, आपण लक्ष देत नाही. इंग्रजीबाबत ते त्याहून सोपं आहे.
दुसरा एक मुद्दा, तो म्हणजे आपण वाचताना संपूर्ण अक्षर न् अक्षर वाचत नाही. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला जी भाषा अवगत असेल, त्यातील काही शब्द आपण गृहीत धरून वाचतो. फिक्सेशन असे या प्रक्रियेला नाव आहे. शब्दांतील अक्षरांचा मुख्य क्रम पाहून वाचक तो शब्द ताडतो. इंग्रजीच्या बाबतीत सांगायचं, तर encyclopedia, government या शब्दांतील पहिले तीन अक्षरे पाहिली, की वाचकाला पुढे काय येणार आहे ते कळते. मराठीच्या संदर्भात दहशतवाद किंवा जागतिकीकरण, वैश्विकरण, धुमश्चक्री असे मोठे व वारंवार वापरले जाणारे शब्द या सवयीला बळी पडू शकतात. एकदा हे शब्द विशिष्ट प्रकारे मेंदूत ठसल्यानंतर ते कसे लिहिले जातात, याची वाचक प्रत्येक वेळेस चिकीत्सा करत नाही.
त्यामुळे लिहिताना हे शब्द जागतीकीकरण, धुमश्चक्रि असे लिहिल्या गेल्यास आश्चर्य वाटत नाही. त्याशिवाय उहापोह, जामानिमा, आडवेतिडवे, कुटुंबकबिला अशा शब्दांच्या मालगाड्या म्हणजे हमखास गोंधळाची स्थिती. आमचे एक सहकारी पेयला पयेय आणि विशेषला विषेश असं लिहीत असत. अलिकडे-पलिकडे (अलीकडे-पलीकडे) या जोडगोळीने तर कायम माझा पिच्छा पुरवला आहे.
मुद्रित माध्यमांमध्ये आता-आतापर्यंत या सवयीवर एक उतारा होता, तो मुद्रित शोधकांचा. होता म्हणायचं कारण, असं की बहुतेक वृत्तपत्रांत आता पूर्ण वेळ मुद्रित शोधकांऐवजी अर्धवेळ मुद्रित शोधक असतात. क्वचित नसतातच. अशा मुद्रित लेखक नसलेल्या इंग्रजी वृत्तपत्रात काम केलंय. त्यामुळे त्यातले चटकेही जाणवतात. अशा प्रसंगात उपसंपादक खूप जागरूक असावा लागतो अन् राहिलेली भिस्त एफ7 वर!
काही वारंवार वापरण्यात येणारे शब्द केवळ सुधारून न थांबता, ती चूक कायमस्वरूपी निघून जावी, यासाठी काही मुद्रित शोधक वैयक्तिक सल्ला द्यायचे. हा एक फायदा होता. त्यामुळे ते कायम लक्षात राहून चुका टळायच्या. उदा. जाहीरात मधील ही; रुपया मधील रु हे मला अशाच मुद्रित शोधकांनी ठसवून दिलेली अक्षरे आहेत. लेखन चिकीत्सा सुविधा अद्याप तरी ती सोय देत नाही. चिकीत्सा सुविधेचा आणखी एक तोटा म्हणजे त्यात विशिष्ट शब्द आधीच भरलेले असतात. त्या विशिष्ट शब्दांच्या पलीकडे लेखकाने योग्य लिहिले असेल, तरी ते चूकच गणले जाते. एका मराठी वृत्तपत्रांत काम करताना, तिथे चिकीत्सा सुविधेत भरलेल्या शब्दांची संख्या इतकी कमी होती, की केवळ सर्वनामे आणि अन्य काही शब्दांचा अपवाद वगळल्यास सगळा मजकूर लाल रंगाने अधोरेखित दिसे. शिवाय काही योग्य शब्दांचे पर्यायही चूक दिसत. त्यातून शब्द तपासण्याऱ्याचाही गोंध उडायचा. त्यामुळे अनेकांना ती सुविधा वापरण्याचा कंटाळा यायचा. याचा परिणाम पुढे मुद्रित शोधकांवर कामाचा बोजा वाढण्यात व्हायचा.
भारतीय संदर्भात अक्षरभ्रंशाला कारणीभूत ठरणारा आणखी एक घटक म्हणजे अन्य भाषेचा प्रभाव. खासकरून हिंदीचा. उदा. की हा अव्यय मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत दोन वाक्यांची साखळी म्हणून काम करतो. मात्र मराठीत तो दीर्घ आणि हिंदीत ऱ्हस्व आहे. आता ज्याचं हिंदी वाचन अधिक आहे, अशांना की लिहिताना अडखळायला तरी होणार किंवा चुकीचं तरी लिहिलं जाणार. हीच गोष्ट प्रगती, ज्योती अशा संस्कृतमधून आलेल्या शब्दांच्या बाबत लागू आहे.
आता आपल्याकडे उपस्थित होणारे काही प्रश्न असेः
1.वरील चीनी युवकांप्रमाणे अक्षरभ्रंशाची समस्या आपल्याला भेडसावते का?(खासकरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना-ज्यांचा मराठीशी तुलनात्मक कमी संबंध आहे.)
2.पुणे किंवा इतरत्र पाट्यांवर जे अयोग्य (अशुद्ध) मराठी लिहिलेले दिसते, ते या अक्षरभ्रंशाचे एक उदाहरण म्हणून घ्यावे काय?
3.अशी समस्या येत असल्यास, एफ7 पेक्षा वेगळा उपाय काय असू शकतो?
4.ही समस्या बहुतांशी वाचनातून उद्भवत असल्यामुळे मनात वाचन न करता पठन करणे अधिक उपयुक्त ठरेल का?
लेखनविषय: दुवे:

Comments

गैरसमज

"केवळ गमभनने निवडलेली सोय" असे मी म्हटले नाही. "गमभनने निवडलेली केवळ सोय" असे म्हटले आहे. 'केवळ सोय' या दाव्याचा अर्थ होतो की 'त्यामागे काहीही आधार नाही'.

प्रतिः गैरसमज

'केवळ सोय' या दाव्याचा अर्थ होतो की 'त्यामागे काहीही आधार नाही'.

हेदेखील चूकच आहे. ज्ञ ची उत्पत्ती ही ज + ञ असल्याचे फुटकळ पुरावे मी दिले आहेत. ते खोडून काढणारा काहीतरी पुरावा दिल्यास, काहीही आधार नाही हे सिद्ध होईल.

दुरुस्ती

गमभन किंवा इतर कोणी ती सोय शोधलेली नाही हे मी मान्य करतो. मुळातच, युनिकोडमध्ये ज्ञ उमटविण्यासाठी ज + ् + ञ असे लिहावे लागते. (मुळात क + ् = क् अशी उत्पत्ती नाही, ती क् + अ = क अशी आहे, पण युनिकोडने वेगळा, सोयिस्कर वापर लादला आहे.) परंतु मराठीमध्ये तशीच उत्पत्ती असल्याचे पुरावे मला माहिती नाहीत. (परंतु, जाणणे या अर्थाने ज्ञ ची एक व्युत्पत्ती थत्ते यांनी सुचविली आहे.)

प्रतिः दुरुस्ती

थत्ते यांनी सुचवलेली ज्+न ही व्युत्पत्तीही चुकीची वाटते. मी दिलेल्या दुव्यात (ज्न)* J+n असा उच्चार महाराष्ट्र वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांत होतो. तर गुजरातेत तो G+n (ग्न) असा होतो एवढे मला माहीत आहे. मूळ संस्कृत अक्षर हे ज आणि ञ यांच्या संयोगाने उत्पन्न झाले असावे असे मला वाटते.

* ज्ञानप्रबोधिनी या मराठमोळ्या संस्थेचे इंग्रजी स्पेलिंगही Jnanaprabodhini असे का आहे हे कळले नाही.

ज + न

ज + ञ् यांचा ज + न ने लागतो तसा अर्थ लागत नाही.

या फॉण्टमध्ये ज आणि न स्पष्ट ओळखू येतात. मधली पांढरी गॅप मी काढली आहे. :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

प्रतिः ज + न

ज + ञ् यांचा ज + न ने लागतो तसा अर्थ लागत नाही.

ज्ञ = ज + ञ

या समीकरणात अर्थ न लागण्यासारखे काय आहे?

जान

>>ज्ञ = ज + ञ

>>या समीकरणात अर्थ न लागण्यासारखे काय आहे

जानाति, जानता है, जाणतो हे दर्शवणारे अक्षर ज आणि न यांच अक्षरांनी बनायला हवे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कूठेतरि चूकते आहे का?

श्‍री थत्ते तूमचे कूठेतरि चूकत आहे का?
जानता है हा हींदि वाक्यप्रयोग झाला.. हींदित ज्ञ या अक्शरचिन्हाचा उच्चार ग्य असा करतात. मग जानता है आणि ज्न यांचा बादरायण संबंध समजला नाहि. मुळ संस्क्रूत शब्द ज आणी ञ यांच्या संयोगापासुन बनला आहे हे समजायला तूम्हाला अडचण का यावि?

ह्यो घ्ये बाश्शा

खालील लेखात तुम्ही दाखवल्याप्रमाणेच चित्र काढून ज्ञ मध्ये ज आणि ञ कसे स्पष्ट ओळखू येतात हे दिले आहे. ;)

दुवा

शक्य आहे

तरीही एका जुन्या विषयाची आठवण झाली :D

कोणता विषय

जरा विस्ताराने सांगा.

बादरायण

ज् + ञ वरून ज्ञ बनण्याची रेखाटने पाहून ७८६ वरून ॐ ही (पु. ना. ओकस्टाईल) उत्क्रांती आठविली.

ओके

ज + ञ् हे म्हणणे मान्य करतो कारण मी भाषातज्ञ नाही.

पण तुमच्या दुव्यातले चित्र माझ्या चित्राएवढे निर्विवाद नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

पडलो तरी नाक वर

पण तुमच्या दुव्यातले चित्र माझ्या चित्राएवढे निर्विवाद नाही.

पडलो तरी नाक वर!

एकेरी अवतरण चिन्ह

"केवळ गमभनने निवडलेली सोय" असे मी म्हटले नाही. "गमभनने निवडलेली केवळ सोय" असे म्हटले आहे.

मलाबी त्येच म्हनायचं व्हतं. म्हनूनशान म्या 'सोय' च्या हितं शिंगल इन्वर्टेड कॉमा वापरलं व्हतं. ही 'सोय' बाकीच्यांनीबी दिल्याली हाये याचा आर्थ कुटंतरी त्याला आधार आसनार ना. काय म्हंता.

आधार नाही?

आपले पूर्वज ज्ञ चा उच्चार कसा करीत होते ते माहीत नाही. पण संस्कृतमध्ये ज्ञ=ज्+ञ. संस्कृत शब्दकोशांत क्ष चे शब्द क मध्ये आणि ज्ञ चे, ज मध्ये मिळतात.
मराठीत आपण द्न्य म्हणतो, सामान्य हिंदीभाषक ग्य म्हणतात, परंतु बंगालीत व्यवस्थित ज्‍ञ(खरे तर ज्‍ञो) असाच उच्चार ऐकायला मिळतो. ते ज्ञानेश्वरचे स्पेलिंग इंग्रजी 'जे' ने करतात.
गमभन, किंवा आणखी कोणी ज् + ञ =ज्ञ केले असेल तर ते अयोग्य नाही. ---वाचक्‍नवी

 
^ वर