"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
प्रेषक: गांधीवादी शनी, 25/09/2010 - 07:21

* राजकारण
* विचार

हि धरती आपल्याला आंदन म्हणून दिल्यासारखी मानवाची वागणूक आहे. ह्या धरतीवर केवळ आणि केवळ मानवाचाच हक्क असल्यागत मानवाची इतर प्राण्यांबाबत क्रूर वागणूक असते. हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो. मानवाने कुठेतरी विचार करून हि धरती जशी आपली आहे तशीच इतर प्राण्यांची देखील आहे हे मान्य करून, त्यांच्या बद्दल आदर दाखवून जर कार्य केले तरच हि धरती मानवावर खुश होऊन त्याला दीर्घ आयुष्याचे वरदान देईल अन्यथा महाकाय डायनासोर जसे क्षणात नाहीसे झाले तसे मानवाचे हि व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याला कारणीभूत असतील अनंत निष्पाप प्राण्यांचे श्राप.

http://www.thehindu.com/news/national/article790866.ece

हि बातमी, हत्ती होते म्हणून प्रसिद्ध तरी झाली पण इथे पुणे लोणावळा लोकलखाली कितीतरी शेळ्या, गायी, बेवारस कुत्री, सर्रास मरण पावतात, कुणाला त्यांची ना खंत ना पर्वा.

मी स्वतः (चवीसाठी) मांसाहार करत नाही, आणि प्राण्यांच्या कातडीने बनविलेल्या वस्तू टाळतो. आणि कोणत्याही प्राण्याच्या दातांनी बनविलेल्या वस्तू घरात आणण्याची इच्छा नाही. (आणि ऐपतहि नाही हा भाग वेगळा)
---------------------------------------------------------------------------------------------------------------
मानव निर्मित CWG, राम मंदिर गदारोळात ह्याचाहि विचार व्हावा म्हणून हा लेख.
ज्यांनी त्यांनी प्रत्येकाला जितके जमेल तितके, ह्या सृष्टीचे असलेले विविध अंग प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती.

मेरी धरती महान. (बाकि सब झूठ है)

Comments

ह्या मृतात्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

http://www.thehindu.com/news/national/article790866.ece
ह्या बातमीतील काही दृश्ये.

ह्या बालकाने बागडणे नुकतेच चालू केले असेल, आणि काळरुपी मानवाने त्याच्यावर झडप टाकली .

ह्या मृतात्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

शुद्धलेखन्

कितीही चांगले जेवण अल्युमिनमच्या पोचे आलेल्या व कळकट थाळीतून जेवावेसे वाटेल का? श्री गांधीवादी आपल्या या लेखाचे तसेच झाले आहे. अहो ही हा शब्द हि असा न लिहिता ही असा लिहितात हो. कृपया आमच्यावरचे हे अत्त्याचार थांबवा. आणि सर्व क्रूर असे काही नसते हो. याला फार तर कमालीचा क्रूरपणा किंवा टोकाचा क्रूरपणा किंवा फार तर सर्वात क्रूर असे तुम्ही म्हणू शकाल. माझी आपल्याला नम्र विनंति आहे की आपण आपले लेखन प्रथम ओपन ऑफिस रायटर मधे करून ते स्पेल चेकर कडून तपासून घ्यावे व मगच कट पेस्ट करावे. यामुळे चुका होणार नाहीत व तुमचे लेखन वाचकांना जास्त आवडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

क्रूर की निष्ठुर?

क्रौर्यामध्ये हेतुपुरस्सर त्रास देण्याचा समावेश असतो असे वाटते, येथे मात्र निष्काळजीपणा घडला आहे.
--------
मला स्मरते की आपल्याला (तुम्हाला, मला) सुंदर वाटतात ते प्राणी पर्यावरणाच्या दृष्टीने फारसे महत्वाचे नसतात, हे प्राणी अन्नजाळ्याच्या टोकाला असतात. भारतीय चित्ता नष्ट होऊन काय फरक पडला?
दुर्मिळ होणार्‍या प्रजातींपैकी पर्यावरणाला महत्वाच्या प्रजाती टिकाव्या, उपयुक्त नसलेल्यांपैकीही सुंदर वाटणार्‍या प्रजाती टिकाव्या, असे मलाही वाटते. पण शेळ्या, गायी, कुत्री या प्रजाती दुर्मिळ नाहीत.

मानवाने कुठेतरी विचार करून हि धरती जशी आपली आहे तशीच इतर प्राण्यांची देखील आहे हे मान्य करून, त्यांच्या बद्दल आदर दाखवून जर कार्य केले तरच हि धरती मानवावर खुश होऊन त्याला दीर्घ आयुष्याचे वरदान देईल अन्यथा महाकाय डायनासोर जसे क्षणात नाहीसे झाले तसे मानवाचे हि व्हायला वेळ लागणार नाही.

त्याला गाया सिद्धांत म्हणतात. जेम्स लवलॉक आणि लिन मार्गुलिस या दोन शास्त्रज्ञांचे डोके का फिरले कुणास ठाऊक!

अनंत निष्पाप प्राण्यांचे श्राप.

"प्राणी निष्ठुर/क्रूर नसतात" हा गोड गैरसमज आहे. पुरावा देता येईलच पण गैरसमज दूर करण्यासाठी "पशूसारखे वागणे" हा वाक्प्रचारसुद्धा पुरेसा ठरेल.

स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो.

"वनस्पतींना जीव नसतो का?" या प्रश्नाचे उत्तर शाकाहारवाले कधीच देत नाहीत.
बाकी, जगदीशचंद्रांच्या बोगस दाव्यांवर तुमचा विश्वास नाही काय?

असहमत

>>आपल्याला (तुम्हाला, मला) सुंदर वाटतात ते प्राणी पर्यावरणाच्या दृष्टीने फारसे महत्वाचे नसतात, हे प्राणी अन्नजाळ्याच्या टोकाला असतात.
असहमत
मानव हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेने पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा महत्वाचा देखील नाही. उलट त्यांनी पर्यावरणाच्या र्हास लावला आहे.
कोण महत्वाचे आणि कोण शुल्लक, हे ठरवणारे आपण कोण ?

>>"प्राणी निष्ठुर/क्रूर नसतात" हा गोड गैरसमज आहे.
ते त्यांच्या स्वभाव गुणाप्रमाणेच वर्तन करतात, मनुष्य प्राणी सोडून इतर सगळे केवळ पोटासाठी आणि स्वरक्षणासाठी शिकार करतात.

>>पशूसारखे वागणे
हा वाक्यप्रचार पशूंचा अपमान आहे. मी असा शब्द प्रयोग कधीच करत नाहीत.

फारफार तर स्वरक्षणासाठी झुरळे, काही उपद्रवी कीटके मारणे एवढाच माझा अधिकार आहे. अन्यथा जो पर्यंत माझ्या जीवास कोण (प्राणी/मनुष्य) बाधा आणत नाही तो पर्यंत कोणासही (हेतुपुरस्सर) मारण्याचा मला नैतिक अधिकार नाही. असे मला वाटते.
निष्काळजीपणा वारंवार होत असेल तर ते देखील चुकीचेच आहे.

असहमत

मानव हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेने पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा महत्वाचा देखील नाही.

उल्कापाताचे संकट आले तर केवळ मानवच पृथ्वीला वाचवू शकतात.

उलट त्यांनी पर्यावरणाच्या र्हास लावला आहे.

हे संपूर्ण सत्य नाही. पृथ्वी निर्माण झाली तेव्हा हवेत ऑक्सिजन नव्हता आणि काही सजीव गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांनी स्वतःच्या हव्यासातून इतका ऑक्सिजन बनविला की त्यांच्या पर्यावरणाचा र्‍हास झाला आणि ते नष्ट झाले.

कोण महत्वाचे आणि कोण शुल्लक, हे ठरवणारे आपण कोण ?

निरुत्तर.

ते त्यांच्या स्वभाव गुणाप्रमाणेच वर्तन करतात, मनुष्य प्राणी सोडून इतर सगळे केवळ पोटासाठी आणि स्वरक्षणासाठी शिकार करतात.

  1. पॉर्पॉइज, सील, इ.ची शिकार किलर व्हेल डॉल्फिन कधीकधी गंमत म्हणून करतात, पेंग्विनची शिकार सील कधीकधी गंमत म्हणून करतात, पेंग्विन मासे मारतात पण कधीकधी त्यांना न खाता टाकून देतात. मला वाटते की उधळपट्टी हेच प्रगतीचे खरे लक्षण आहे. मोराचा पिसारा हे त्याचे खूप चांगले उदाहरण आहे.
  2. आहार, भय, मैथुन, निद्रा, यांच्यापलिकडेही आपण विचार करतो म्हणून तर आपण 'वेगळे' आहोत ना? ;)

अन्यथा जो पर्यंत माझ्या जीवास कोण (प्राणी/मनुष्य) बाधा आणत नाही तो पर्यंत कोणासही (हेतुपुरस्सर) मारण्याचा मला नैतिक अधिकार नाही. असे मला वाटते.

उदरभरण/यज्ञकर्मासाठी?

निष्काळजीपणा वारंवार होत असेल तर ते देखील चुकीचेच आहे.

मान्य.

बिनमहत्त्वाचे

>>उल्कापाताचे संकट आले तर केवळ मानवच पृथ्वीला वाचवू शकतात.

पृथ्वीला वाचवावे असे विश्वाच्या दृष्टीने पृथ्वीत काय महत्त्वाचे आहे?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत

=))

पृथ्वी म्हणजे काय हो ?

माती , झाडे , हवा , पाणी , डोंगर , जंगले , कार्बन , ऑक्सीजन , ढग म्हणजे पृथ्वी का ?

माणुस म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजे माणुस नाही का हो ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

देवकांत बरुआ

हे 'इंदिरा इज इंडिया' सारखे वाटले :)

म्हणजे ?

म्हणजे पटले नाही तर. पण उगाच माणसाला पृथ्वी पासून सेपारेट करणे बरोबर नाही वाटत .

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

नाही

तुमचा मुद्दा मान्यच आहे पण "केवळ मानव म्हणजेच पृथ्वी" असा अर्थ ध्वनित होत असल्याचे वाटले म्हणून विनोद केला.

क्रौर्य कमी होतंय

हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.

हे पटत नाही. काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा माणूस शिकार करून जगत असे तेव्हा केवळ खाण्यासाठीच अत्यंत निर्घृणपणे पुरातन, धार नसलेल्या हत्यारांनी प्राण्यांची शिकार करत असे. कितीतरी प्राणी तडफडून तडफडून मरत. त्यात फ्रिज वगैरे नसल्याने कितीतरी मांस फुकट जात असावं. म्हणजे एका माणसाचं पोट भरण्यासाठी जितक्या यातना प्राणीसृष्टीवर करत असे त्यापेक्षा शेकडो पट कमी यातना आज होतात. जीवो जीवस्य जीवनम् या न्यायाने हत्या होणारच. पण त्यामधून कमीत कमी यातना होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा एकमेव प्राणी आहे. (बाकीच्या प्राण्यांनी आपलं अंगभूत क्रौर्य तितकंच ठेवलेलं आहे) माणसाला क्रौर्याचा वारसा निसर्गातून मिळाला आहे. स्वतःच्या नैतिक मूल्यातून ते क्रौर्य कमी करण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नांबद्दल तरी त्याला शाबासकी दिली पाहिजे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पूर्वीचे क्रौर्य

>>स्वतःच्या नैतिक मूल्यातून ते क्रौर्य कमी करण्याचा तो प्रयत्न करत आहे.

सहमत. आत्ताआत्तापर्यंत राजे महाराजे थ्रिल म्हणून शिकारी करीत असत.

महाभारतातल्या खांडववन दाह प्रकरणात खांडववन जाळण्याचा उल्लेख आहे. वनाला आग लावल्याने वनातले प्राणी बाहेर पडू लागले त्यांना अर्जुन वगैरे मंडळी पुन्हा आत पिटाळीत असल्याचे (किंवा ठार मारीत असल्याचे) वाचले होते. चू भू दे घे.

स्वतःला सोनेरी चोळी हवी म्हणून हरीण मारण्याचा आग्रह तर जगप्रसिद्धच आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

राजे महाराजांचे क्रौर्य

कालच बौद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल काही वाचत असताना हुण राजा मिहिरकुल याची गोष्ट वाचायला मिळाली. तो शिवभक्त असून त्याने राज्यातील बौद्धांच्या कत्तली केल्या होत्या असे कळते. त्याची एक गोष्ट अशी आहे की विरंगुळ्यासाठी तो हत्तींना पकडून आणे आणि त्यांना कड्यावर खेचत नेऊन त्यांचा कडेलोट करे. वरील चर्चेत हत्ती पाहून ही गोष्ट आठवली.

महाभारतातल्या खांडववन दाह प्रकरणात खांडववन जाळण्याचा उल्लेख आहे. वनाला आग लावल्याने वनातले प्राणी बाहेर पडू लागले त्यांना अर्जुन वगैरे मंडळी पुन्हा आत पिटाळीत असल्याचे (किंवा ठार मारीत असल्याचे) वाचले होते. चू भू दे घे.

खांडववनात तसे थ्रिल नव्हते कारण तेथे नगर स्थापन करायचे होते पण खांडववनात केवळ प्राणीच नव्हते तर अनेक वन्य जमातीही होत्या. त्यांनाही कृष्णार्जुनादींनी बाहेर पडण्याची संधी दिली नाही.

सर्वोत्तम

++ सहमत
सध्याचा माणूस त्याच्या मानवी इतिहासातील सर्वोत्तम आहे.

पकलो

तेच रडगाणे अन् पुन्हा तसेच प्रतिसाद.ट्वीटरसारखी सतत तीच चीव चीव बघुन पकलो राव!!!

-Nile

 
^ वर