जदुनाथांचा शिवाजी

जदुनाथ सरकार यांनी १९१९ साली लिहिलेले (सहावी आवृत्ती १९६१ ची) शिवचरित्र नुकतेच वाचनात आले.

या पूर्वी http://mr.upakram.org/node/1419 येथे एक उत्तम चर्चा झाली होती. पण ती या विषयावर नव्हती.

ग्रँट डफ आणि जदुनाथ हे महाराष्ट्रात कुख्यात म्हणून प्रसिद्ध आहेत. वरील चर्चेत तशीच मते पाहायला मिळतील. यातील ग्रँट डफ बद्दल मी आस्थेने लिहिलेले वाचले आहे. त्याने लिहिलेला इतिहास थोडाफार पाहिला (पुस्तक घरी आणता आले नाही). पुस्तकात विकृत म्हणावे असे काही वाटले नाही.

जदुनाथांबद्दल मी असे वाचले होते की त्यांनी औरंगजेब व मुगल दप्तराचा एवढा अभ्यास केला होता की त्यांचा शिवाजी त्याच नजरेतून उतरला. मराठी साधनांवर पकड नसल्याने त्यांचा इतिहास एकांगी झाला आहे वगैरे. शिवाजीवर अनेक आरोप या पुस्तकात आहेत असेही ऐकले होते. सेतुमाधवराव पगडी यांनी मात्र त्यांच्या बद्दल आस्थेने लिहिल्याचे आठवते.
हे पुस्तक जदुनाथ साधन सामुग्री मिळेल तसे समृद्ध करत गेले असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे.

पहिल्यांदा पुस्तक वाचल्यानंतर मनात आलेले विचार लिहितो.
पुस्तकात हे जाणवले की शिवाजीबद्दल जदुनाथांना अनास्था होती असे नाही. एक युगपुरुष म्हणून ते शिवाजीबद्दल लिहितात. चरित्र अगदी ओघवत्या शैलीत लिहिले आहे. वाचताना कंटाळा येत नाही. मराठी साधनांचे जदुनाथांना वावडे नसल्याचे स्पष्ट जाणवले. शिवचरित्रात्मक बखरींचा त्यांनी वेळोवेळी आधार घेतला आहे.

शिवाजीवर आरोप वाटावेत अशी काही विधाने त्यांनी केली आहेत. शिवाजी निरक्षर होता. हे जदुनाथांनी कयास म्हणून मत दिले आहे. समकालीन इंग्रजांच्या आठवणीत पत्र दिल्यावर शिवाजी आपल्या सहकार्‍यांकडून वाचवून घ्यायचा. या आठवणीवर हा कयास आहे. मात्र याच वेळी इतिहासातील इतर दोन महापुरुष महाराजा रणजितसिंग आणि हैदरअली यांच्या सोबत शिवाजीला याबाबतीत गोवले आहे. शिवाजी लुटारु होता (असे त्यांचे मत होते) असे मी वाचले होते. नेमका असा उल्लेख वाचनात आला नाही. सुरत लुटीचे अघोरी वर्णन या पुस्तकात आहे.
अफजलखानवधा निमित्त उघडपणे जदुनाथ शिवाजीची बाजु घेताना दिसले.

मिर्झाराजे जयसिंग याच्याबरोबरचा तह, आग्र्यास प्रयाण आणि आग्र्याहून सुटका याबद्दल जदुनाथांनी (मला बरेच नवीन वाटावे असे) लिहिले आहे. त्यावर थोडेसे लिहितो.

जयसिंग औरंगाबादेस् १५ फेब्रुवारी १६६५ ला पोचला. युद्ध शिवाजीच्या मुख्य भागात होत होते. पुरंदरचा किल्ला पडायला आला. आणि शिवाजीने जवळपास पूर्ण शरणागती पत्करली. साधारण २-३ महिन्यात हे घडले. (मे १६६५) येणार्‍या पावसाळ्यामुळे मंदावणार्‍या युद्धाची वाट न पाहता हे घडले. काही कठीण परिस्थिती (राज्य लहान, युद्ध राज्यातच चालणे, आणि पुरंदर किल्यात सुरक्षित म्हणून राहिलेले आप्त), बरेचसे राजकारण (आदिलशाही विरुद्ध मोगल शिवाजीच्या साहायाने) आणि काही मुत्सद्देगिरी (तह नामुष्कीचा वाटला तरी कोकणातील मुलुख शिवाजीकडे राहणे.) अशात हा पुरंदरचा तह झाला.

आता मागे वळून पाहताना हा तह एका हुशारीचे प्रतीक वाटू शकेल. पण कदाचित तसे नसेल सुद्धा.

जदुनाथांच्या मते आग्र्यातील प्रसंग हा मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील अपयश होते. त्यावेळच्या चालीरितीनुसार अशी भेट कशी घ्यायची याबद्दल बरेच नॉर्म्स होते. काही कारणाने वेळापत्रक चुकले आणि शिवाजी भेटीच्याच दिवशी आग्र्यात पोचणार असे दिसू लागले. नाहीतर प्रथेप्रमाणे किमान आदल्या दिवशी त्याने तिथे पोचणे, त्याला घेण्याकरता आग्र्यातील कोणी मातबराने वेशीबाहेर येणे, दरबाराच्या रितीरिवाजांची ओळख करून देणे, दरबारातील प्रसंगाची पूर्वतयारी करणे इत्यादी गोष्टी वेळेवर झाल्याच नाहीत. जयसिंगाचा मुलगा रामसिंग नेमक्या त्याचवेळी गस्तीच्या जबाबदारीत होता त्यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे शिवाजी वा औरंगजेब या प्रसंगास नीट तयार न होता सामोरे गेले. राजस्थानी कागदपत्रानुसार यानंतरचे शिवाजीचे वागणे जदुनाथांनी चांगले मांडले आहे.

राज्याभिषेकाची काही वेगळी माहिती मिळाली. राज्याभिषेकाचा खर्च खूप झाला. वेदोक्त पुराणोक्त वाद झाले असे काही उल्लेख पुस्तकात आहेत. (पुस्तक लिहण्याच्या वेळी हा वाद महाराष्ट्रात नव्याने आला होता. त्याला अनुसरून हे उल्लेख आहेत.) दुसरा राज्याभिषेक करवून घेणार्‍यांनी पूर्वीच्या राज्याभिषेकातील दोष आणि त्यामुळे निर्माण झालेले कठीण प्रसंग मांडले आहेत. अनेक शकून अपशकुनांचा त्यात उल्लेख आहे.

एकंदरीत पुस्तक मला आवडले. पुस्तक पटले असे मी म्हणणार नाही. पण इतिहास कसा लिहावा (मोजक्या शब्दात आणि विविधबाजू घेत) याचे ते एक चांगले उदाहरण आहे असे वाटले.

लेखनविषय: दुवे:

Comments

जदुनाथ आणि शिवाजी

>>ग्रँट डफ आणि जदुनाथ हे महाराष्ट्रात कुख्यात म्हणून प्रसिद्ध आहेत.
ग्रॅण्ट डफबाबत पूर्वी वाचले होते. मराठी इतिहासकारांची बरीच ऊर्जा ग्रॅण्ट डफ कसा चुकला आहे ते दाखवण्यात खर्च झाली असे वाचले होते.
जदुनाथ सरकार महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असायला अजून एक कारण असावे. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाची (की सहा सोनेरी पाने या पुस्तकाची?) त्यांनी खिल्ली उडवली होती. "महाराष्ट्रातील चित्पावन समाजात असले लिखाण इतिहास म्हणून खपते" अशी काहीशी टिपण्णी त्यांनी केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रात ब्लॅकलिस्टेड झाले असावेत.

>>सुरत लुटीचे अघोरी वर्णन या पुस्तकात आहे
अलिकडेच स्टार प्रवाह या वाहिनीवर दाखवलेल्या अफजलखानवधाच्या भागांमध्ये खानाबरोबर आलेल्या जवाहिर्‍यांना (खानाला नजराणा देण्यासाठी) खरेदीनिमित्ताने गडावर बोलावून जेरबंद करून लुटल्याचे दाखवले आहे. तत्कालीन समाजात असे लुटणे ही काही फार आक्षेपार्ह गोष्ट नसावी.

>>शिवाजी निरक्षर होता. हे जदुनाथांनी कयास म्हणून मत दिले आहे.
यात खटकण्यासारखे काहीच नाही. शिवाजी साक्षर असण्याची काय गरज होती? [निरक्षर असण्याचा आणि राज्यव्यवहार निपुण असण्याचा काहीच संबंध नाही]. त्या काळातील बरेच राज्यकर्ते निरक्षर असावेत.

>>शिवाजी वा औरंगजेब या प्रसंगास नीट तयार न होता सामोरे गेले. राजस्थानी कागदपत्रानुसार यानंतरचे शिवाजीचे वागणे जदुनाथांनी चांगले मांडले आहे.
शिवाजीने बाणेदारपणा दाखवून औरंगजेबाचा अपमान केला यागोष्टीवर माझा विश्वास नाही. (शिवाजीच्या बुद्धीवर जास्त विश्वास आहे). शिवाजी धाडसी असला तरी मूर्ख नव्हता. त्यामुळे पराभूत म्हणून औरंगजेबाच्या भेटीला गेल्यावर त्याच्या दरबारातून निघून जाणे ही गोष्ट शिवाजी करणार नाही असे मला वाटते. [दरबारातली गोष्ट खरी असेल तर औरंगजेबाच्या भूमिकेविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहते. आणि शिवाजीचे पळून जाणे ही औरंगजेब आणि शिवाजी या दोघांनी मिळून केलेली धूळफेक होती असे वाटू लागते].

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

औरंगजेबाचा अपमान

>>>शिवाजीने बाणेदारपणा दाखवून औरंगजेबाचा अपमान केला यागोष्टीवर माझा विश्वास नाही.
जदुनाथांच्या पुस्तकातून राजे शिवाजींनी थेट औरंगजेबाचा अपमान केला असे कुठेही वाचनात येत नाही. तृतीय दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे केल्यामुळे आणि दरबारातील वागणूकीमुळे अपेक्षीत स्वागताचा अपेक्षाभंग झाल्याने तो अपमान वाटल्यामुळे ते रामसिंगाला [जयसिंगचा मोठा मुलगा ] [औरंगजेब से भेट या प्रकरणात जदुनाथ] म्हणतात '' मेरी मृत्यु का निश्चित दिन आ पहुचा है, या तो तुम मुझे मार डालो, अन्यथा मै स्वयं अपनी हत्या कर लुंगा. भले ही तुम मेरा सिर काट डालो, परंतु मै सम्राट के सामने कदापि नही जाऊंगा'' असे म्हणत् ते एका खांबाकडे जाऊन बसल्यावर रामसिंगाने बादशहाकडे निरोप पाठविला की दरबारातील वातावरणामुळे राजेंची तब्येत बिघडली आहे. तेव्हा बादशहाने सांगितले की दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना निवासस्थानाकडे घेऊन जावे.

>>>>शिवाजीचे पळून जाणे ही औरंगजेब आणि शिवाजी या दोघांनी मिळून केलेली धूळफेक होती असे वाटू लागते.
काहीच्या काही तर्क पटला नाही.

-दिलीप बिरुटे

तर्क

>>काहीच्या काही तर्क पटला नाही.
:)
तर्क काहीच्या काहीच आहे.
पण शिवाजी पळून गेल्यावर औरंगजेबाने फार काही केलेले दिसत नाही. म्हणून आपला तर्क. त्याला केलेली अटक सुद्धा डोमेस्टिक कन्झम्प्शनसाठी असेल.

शिवाजी निरक्षर असण्यात (असल्याचे म्हणण्यात नव्हे) ऑब्जेक्शनेबल काय आहे? जसे आठ बायका असणे आक्षेपार्ह नाही तसेच. त्याकाळच्या इतर राजे लोकांना वाचता येत नसेल तर शिवाजीलादेखील न येण्याची शक्यता आहेच. (शिवाजी निरक्षर होता हे मुद्दाम सांगण्याचीही गरज नाही).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

काहीच नाही.

>>>शिवाजी निरक्षर असण्यात (असल्याचे म्हणण्यात नव्हे) ऑब्जेक्शनेबल काय आहे?
काहीच नाही. मला मात्र तसे वाटत नाही एवढेच माझे म्हणने आहे.
अटकेचे नाटक असावे या आपल्या मताचाही आदर आहेच. :)

-दिलीप बिरुटे

साक्षरता

शिवाजी निरक्षर होता असे महात्मा फुल्यांनीही लिहिले आहे ना?

हो ?

हो ? याबाबत अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकात ही माहिती असावी ?

राजे शिवाजींचा पोवाडा

म. फुल्यांनी रचलेल्या 'छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा' कडे रिकामटेकडे अंगुलीनिर्देश करीत असावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

जुना दुवा

येथे थोडी माहिती जमविली होती.

दोघांनाही धन्यवाद.

डॉ. दिलीपराव बिरुटे आणि रिकामटेकडेराव,

दोघांनाही मनापासून धन्यवाद.

पुस्तक वाचले पाहिजे

वाचण्याच्या यादीत घातले आहे.

>> समकालीन इंग्रजांच्या आठवणीत पत्र दिल्यावर शिवाजी आपल्या सहकार्‍यांकडून वाचवून घ्यायचा. या आठवणीवर हा कयास आहे.
पत्र इंग्रजीत असायचे का फारसीत का मराठीत?!
यावरून ते निरक्षर होते असा कयास मांडणे धीराचे ठरेल. फारतर सेवकांची फारच सवय झाली होती असे म्हणता येईल. आपल्या हाताने पाणीही न घेणारे लोक अजून असतात की! याचा अर्थ निरक्षर नसतील असेही नाही, पण राज्य करण्यास याहून जे काही अधिक लागते ते बहुदा चांगले माहिती असावे.

>>शिवाजी वा औरंगजेब या प्रसंगास नीट तयार न होता सामोरे गेले. राजस्थानी कागदपत्रानुसार यानंतरचे शिवाजीचे वागणे जदुनाथांनी चांगले मांडले आहे.

कधीकधी आमंत्रणात चुका राहून जातात - कधी मुद्दाम केले जात असावे.
मला व्यक्तिशः औरंगजेबाच्या दरबारातील जो प्रसंग सांगितला जातो, मनसबदारांच्या रांगा, शिवाजी राजांनी -कोणी मला पाठ दाखवली, पण तो माझ्या पुढच्या रांगेत कसा- असे विचारले, हे जे सर्व सांगतात त्याचा अर्थ कळत नाही. शिवाजीराजे असे का करतील? स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायला? का त्यांना तेव्हा आपल्या शक्तीची जाणीव झाली असेल? का औरंगजेबाच्या कमकुवत असण्याची जाणीव झाली असेल? (हे सर्व माझे कयास). जदुनाथांनी हे सर्व नक्की कसे वर्णन केले आहे, हे वाचण्याची उत्सुकता आहे.

ग्रान्ट डफ

ग्रॅंट डफच्या मराठ्यांच्या इतिहासाचे सर्व म्हणजे 3 ग्रंथ मला जालावरून उतरवून घेता आलेले आहेत. मात्र ते एकाच संकेतस्थळावर नाहीत. तसेच मध्यंतरी माझ्या संगणकाची हार्ड डिस्क परत फॉरमॅट करावी लागल्याने संकेत स्थळाचा दुवा सध्या माझ्या कडे उपलब्ध नाही.

मराठ्यांच्या विरूद्ध लढणार्‍या इंग्रजी सेनेत अधिकारी असलेला ग्रॅ न्ट डफ इतिहास लिहिताना मात्र अतिशय निष्पक्षपाती भूमिकेत आहे असे माझे तरी मत झाले आहे. शिवाजी, बाजीराव, माधवराव पेशवे , नाना फडणवीस या सर्व व्यक्तींबद्दलचे त्याचे लिखाण मला अतिशय वस्तूनिष्ठ व मनात कोणताही आकस न ठेवता लिहिलेले वाटले. मी शाळेत जो मराठ्यांचा इतिहास शिकलो तो व डफ ने लिहिलेला इतिहास याच्यात मला तरी काही फरक आढळला नाही. ही पुस्तके सर्व इतिहासप्रेमींनी जरूर उतरवून घ्यावीत व वाचावीत असे मला वाटते.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

जेम्स ग्रँट् डफचे सर्व खंड डाउनलोड येथून् करा

पुढील दुव्यावर जेम्स ग्रँट डफ चे सर्व खंड पीडीएफ स्वरुपात् उतरवून घेता येतील.

आकार् थोडे जास्त आहेत २७ एमबी वगैरे... पण् मूळ पुस्तकच् मिळते तेव्हा ही पुस्तके उतरवून घेणे नक्की फायद्याचे आहे.

http://openlibrary.org/works/OL2320469W/A_history_of_the_Mahrattas

कयास ?

>>> एकंदरीत पुस्तक मला आवडले. पुस्तक पटले असे मी म्हणणार नाही. पण इतिहास कसा लिहावा (मोजक्या शब्दात आणि विविधबाजू घेत) याचे ते एक चांगले उदाहरण आहे असे वाटले.

- खरे आहे. एखादी गोष्ट पटली नाही तरी आवडू शकते आणि आवडली तरी पटतेच असे नाही.

- सेतुमाधवराव पगडी यांनी जदुनाथ सरकारांविषयी आदराने लिहिलेले आहे, हेही खरे. `जीवनसेतू` हे सेतुमाधवरावांचे आत्मचरित्र बारा-पंधरा वर्षांपूर्वी वाचले आहे. आवडलेही. (सहज : महाकवी गालिबच्या गझलांचे सेतुमाधवरावांनी जे काही मर्म उलगडून दाखवले आहे, ते मात्र तद्दन भिकार वाटले. मोठ्या उत्साहाने ते पुस्तक मी खरेदी केले आणि पुरता फसलो.)

- नेटके, आटोपशीर, मोजके लिहिण्यात जदुनाथ वाखाणले जात असत; पण कयासाचे तेवढे पटले नाही. शिवाजीमहाराज निरक्षर होते(असावेत), असा कयास जदुनाथ सरकार करतात...संशोधन सुरुवातीला कयासांच्या आधारेच पुढे पुढे जात असते...पण अंतिम संशोधनात कयासाला जागा असू शकत नाही ! (अर्थात जदुनाथांसारख्या जगप्रसिद्ध इतिहाससंशोधकाला हे माहीत नसणार असे थोडेच आहे? पण तरीही...!!!)

जदुनाथांचा शिवाजी...

जदुनाथ सरकार यांच्या india under Aurangzeb या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ.श.गो.कोलाटकर यांनी केलेला आहे. राजे शिवाजी समजण्यासाठी मला हे एक पुस्तक चांगले वाटते. या पुस्तकाबरोबर 'शिवाजी और उनका युग' हे मदनलाल जैन यांनी केलेला हिंदी अनुवाद केलेले पुस्तक संग्रही आहे.

औरंगजेब हा सम्राट आणि त्याच्यापुढे एका लहान जहागिरदारांचा मुलगा वाकला नाही. एका मोठ्या शक्तीला जेरीस आणतो अशा स्वरुपाचे लेखन मला जदुनाथ सरकारांचे वाटते. इतर इतिहासकारांचे लेखन वाचलेले, चाळलेले नाही. पण मला जदुनाथांचे लेखन आवडते. मोगलांचे लेखन करतांना इतिहासात येणार्‍या पात्रांचा,घटनांचा,आढावा घ्यावा लागतो तसे लेखन राजे शिवाजींच्या निमित्ताने येते.

आता साक्षरतेविषयी :टंकायचा टंकाळा आणि तेच माझ्यासमोर येते. 'शिवाजी और उनका युग' या पुस्तकात किशोर एवं युवा अवस्था नावाचे प्रकरण आहे त्यात शिवाजी की शिक्षा हा भाग येतो त्यात जदुनाथ सरकार म्हणतात आता हिंदी भाषेऐवजी माझा अनुवाद असा
''युरोपातील गणमान्य व्यक्ती जेव्हा शिवाजी राजेंना भेटण्यासाठी येत असायचे त्यापैकी एकानेही त्यांना कधी लिहितांना पाहिलेले नाही. ते जेव्हा शिवाजींना काही पत्र देत असायचे तेव्हा ते वाचून दाखविण्याबाबत आपल्या मंत्र्यांना राजे शिवाजी आदेश देत असायचे. त्यांचे स्वहस्ते केलेले कोणतेही लेखन सापडत नाही'' पुढे जदुनाथ म्हणतात की, रामायण-महाभारताच्या काही कथाभागांनी त्यांना प्रभावित केलेले होते त्याचाच उपयोग त्यांना राज्य उभारणी करतांना झाला. ''इसलिये किताबी शिक्षा के अभाव के कारण उन्का मस्तिष्क कुण्ठित एवं निष्प्राण नही बना, और न ही उस मध्यकालीन युग में एक क्रियाशील मनुष्य के रूप में उनकी कुशलता में ही कमी आयी'' जदुनाथ त्यांच्या निरक्षर असण्याबाबत मत व्यक्त करतात. पण माझा इतिहासाचा प्राध्यापक मित्र म्हणतो की राजे स्वतः कशाला एखादे पत्र वाचतील किंवा लिहितील. त्यांचे हस्ताक्षर नाही म्हणून त्यांना निरक्षर ठरवणे माझ्या मित्राला जसे पटत नाही, तसे मलाही पटत नाही. पण, पुरावे नसल्यामुळे त्यांना निरक्षर ठरविले जाते त्याला एक वाचक म्हणून विलाज नसला तरी मी मात्र त्यांना निरक्षर म्हणनार नाही.

-दिलीप बिरुटे

पुस्तक

तुम्ही उल्लेखिलेले हिंदी पुस्तक मी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकाचा (शिवाजी ऍन्ड हिज टाइम्स) अनुवाद दिसतो आहे.

तुम्ही अनुवादलेल्या उतार्‍याबाबत आभार. इंग्रजीत तो नेमका तसाच आहे. निरक्षर राज्यकर्त्यांच्या यादीत अकबराचे (रणजितसिंग आणि हैदरअली) नाव त्यांनी दिले आहे. माझ्याकडून ते अनवधानाने राहिले. औरंगजेबाचे चरित्र मराठीत प्रसिद्ध झाल्याचे माहित होते. पण वाचायला मिळाले नव्हते. तुम्ही काही अधिक लिहू शकाल का? आता जदुनाथांची इतर पुस्तके वाचण्याची इच्छा होत आहे.

इतिहासाकडे पुराव्यांच्या आधारे पहायचे असते (आयडिऑलॉजी सोडून) असे महाराष्ट्रात परत वाटू लागेल असा आशावाद मी बाळगून आहे.

प्रमोद

करेक्ट...! आणि इतकेच लिहू शकतो.

तुम्ही उल्लेखिलेले हिंदी पुस्तक मी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकाचा (शिवाजी ऍन्ड हिज टाइम्स) अनुवाद दिसतो आहे.

करेक्ट....! माझ्याकडे उपलब्ध असलेल्या दोन्ही पुस्तकांचा प्रतिसादात मी उल्लेख केला आहे.

औरंगजेबाचे चरित्र मराठीत प्रसिद्ध झाल्याचे माहित होते. पण वाचायला मिळाले नव्हते. तुम्ही काही अधिक लिहू शकाल का ?

औरंगजेब
India under Aurangzeb
लेखकः जदुनाथ सरकार
अनुवाद : डॉ.श.गो.कोलाटकर
प्रकाशक :
दत्तात्रेय गं.पाष्टे
डायमंड पब्लिकेशन्स,
१६९१, सदाशिव पेठ, शंकरप्रसाद को.हौ.सो.
तिसरा मजला,टिळक रोड,पुणे ४११०३०
मूल्य रु. ४५० /-

-दिलीप बिरुटे

टंकाळा !!!

टंकायचा टंकाळा !!!
फार फार आवडला हा शब्द. टंकाळा.
कंटाळा हा शब्दही टंकायचा (हा शब्द मात्र मला अजिबात आवडत नाही) किती हा टंकाळा; आपले कंटाळा !!!

धन्यु :)

>>>फार फार आवडला हा शब्द. टंकाळा.
धन्यु... :)

-दिलीप बिरुटे

राज्यभिषेक सोहळा वर्णन

राज्यभिषेक सोहळ्याचे वर्णन इथे करता का ?

-दिलीप बिरुटे

'राजा श्री शिवचत्रपती' मधून्...

मेहेंदळे यांच्या या पुस्तकात "शिवाजी ची सा़क्शरता" असा अख्खा भाग आहे, जरूर वाचा.
त्यांच्या मते 'शिवाजी साक्शर होता आणि त्याचा 'अस्सल' पुरावा आता उपलब्ध आहे!!

शिवाजी राजे राजापुरला गेलेले असताना तिथल्या इंग्रजांच्या वखारीतला वकील त्यांना भेटायला गेला होता. तेव्हाचा प्रसंग त्याने लिहून ठेवला आहे...
वकीलाने आपले पत्र त्यांना दिले. (हे पत्र मराठीत असावे, तेव्हा इंग्रज 'शेणवींकडून' भाशांतर करवून घेत असत...). महाराजांनी ते स्वता हातात घेऊन वाचले!!! आणि लगेच मुद्द्यावर् येऊन चर्चा केली...

राजापूर

मेहेंदळ्यांचे पुस्तक वाचायच्या यादीत आहे.

गंमत म्हणजे हा पुरावा नवीन नसावा. (राजापूरच्या इंग्रजी वकिलाचा पुरावा.)
शिवाजीचे इंग्रज-पोर्तुगिजांशी संबंध या नावाचे एक प्रकरण जदुनाथांनी लिहिले आहे. त्यात राजापूरच्या वकीलाने काय लिहिले आहे हे सविस्तर लिहिले आहे. घटना १६७५ ची आहे.

एकाच दस्तावेजावरून एक इतिहासकार एक अर्थ काढतो तर दुसरा तसा काढत नाही यातील हा प्रकार वाटला.
मेहेंदळ्यांचे पुस्तक वाचले नसल्याने या बाबतीत डावे उजवे करता येत नाही. तुम्ही अधिक प्रकाश टाकला तर बरे होईल.

प्रमोद

साक्षर असण्याबद्दल

साक्षर असण्याबद्दल गेल्या चर्चेतही हा प्रतिसाद होता.

साक्षर असण्याचा आणि उत्तम राज्यकर्ता असण्याचा फारसा संबंध नसावा असे वाटते.

या पुराव्याबद्दल काय् म्हणणे आहे ?

छत्रपति शिवाजी महाराज साक्षर होते की नाही हा वादाचा मुद्दा असेलही कदाचित.
मला मायाजालावर् छत्रपतिंचे त्यांच्या सहीसोबतचे अस्सल म्हणवले जाणारे चित्र सापडले आहे.
या पुराव्याबद्दल कोणाला माहिती असेल् तर् माहिती करुन् घ्यायला आवडेल.
छत्रपतिंचे हे चित्र अस्सल असेल तर् त्यावरच्या मोडी लिपितील सहीमुळे छत्रपति हे साक्षर होते किंवा नाही हा प्रश्नच निकालात् निघतो :)

From Chatrapati Shivaji Maharaj

स्कोप!

कोणत्या संग्रहालयात सापडले, इ. माहिती नाही तोवर, प्रायमाफेसी, नकलीच म्हणावे लागेल (आय मीन, विकीपिडियावर अजून आले नाही त्याअर्थी..).
- शक-कर्ता
--------
बाकी, शिवाजी किती दाढी ठेवत असे, त्याकाळी वस्तरे कसे होते, इ. काही माहिती आहे काय?

पुरावा(?)

या पुराव्याबद्दल काय् म्हणणे आहे ?

हा विनोद आहे का?

विनोद असल्यास हे उत्तरः

नेटावर शहारुखखान किंवा अमिताभ बच्चनला दाढी लावून त्यांचे फोटो टाकून खाली मोडी लिपीत कोणी महाराजांच्या नावाची सही केलेली नाही हे नशीब समजा. ;-)

विनोद नसल्यासः

वरील फोटोचा उगम कळत नाही आणि त्याबद्दल अधिक पूरक माहिती कळत नाही त्यामुळे त्याला सध्यातरी पुरावा म्हणता येत नाही.

विनोद नाही

प्रियाली,

हा विनोद नक्कीच नाहिये. छत्रपति शिवाजी महाराज् हा विनोदाचा विषय नाहीये. प्रतिसादात् मी म्हटल्याप्रमाणे हे चित्र अस्सल असल्यासच् हा पुरावा म्हणता येईल.
मायाजालावर मिळाला आहे म्हणूनच त्याची विश्वासार्हता पणाला लागतेच. पण् यदाकदाचित या चित्राच्या अस्सलपणाबद्दल किंवा नकली पणाबद्दल कोणाला माहिती असले तर् सर्वांनाच् खरे-खोटे कळून जाईल याच् हेतूने हे चित्र दिले आहे.

मला देखील उत्सुकता आहे की हे चित्र अस्सल् आहे किंवा नाही.

मायाजालावरच या दुव्यावर ही माहिती मिळाली. त्यानुसार सध्या हे चित्र मास्को च्या संग्रहालयात् आहे असे कळते.
आपल्या सदस्यांपैकी मॉस्कोत असणार्‍या सदस्यांपैकीच कोणीतरी खेरे-खोटे करु शकते.

कोणी आहे का इथे मॉस्को संग्रहालयाला भेट् दिलेले?

ऑफिसात् फेसबुक ब्लॉक असल्यामुळे बघता येत् नाहिये पण फेसबुकाच्या या दुव्यावर पण् ही माहिती मॉस्कोबद्दलच सांगते

???

हा विनोद नक्कीच नाहिये. छत्रपति शिवाजी महाराज् हा विनोदाचा विषय नाहीये.

अशी माझीही अपेक्षा आहे.

वरील चित्रात मोडी अद्याक्षरे दिसतील. क,ख,ग घ ची बाराखडी दिलेली आहे. त्यावरून वरील शब्द मला अगदी निश्चित करता आला नाही कारण मला मोडी येत नाही पण वरील सहीत ख, क,व वगैरे शब्द वाटले. मोडी शब्दांत अक्षरे एकमेकांत मेळवलेली असतात. येथे कमीत कमी चार शब्द दिसतात. चू. भू.द्या. घ्या.

कोणत्याही अंगाने तो शब्द शिवाजी असा दिसत नाही.

तसेच आपल्या चित्रावरवर चित्रकार सही करतो. चित्रासाठी उभा राहीलेला/बसलेला माणूस करत नाही असे वाटते. चू. भू.दे.घे.

त्याही पुढे जाऊन, राजे त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांवरही सह्या मारत होते असे मला वाटत नाही. जर ऑथंटिकेशन दाखवायचे असते तर त्यावर राजमुद्रा येती. सही नाही.

सर्वात शेवटचे इतक्या ऑथेंटिक चित्रावर सर्वात शेवटी शककर्ता शिवाजी वगैरे असे स्पष्ट देवनागरीत लिहिणे हास्यास्पद दिसते.

:)

तसेच आपल्या चित्रावरवर चित्रकार सही करतो. चित्रासाठी उभा राहीलेला/बसलेला माणूस करत नाही असे वाटते. चू. भू.दे.घे.

बाकीचे युक्तिवाद पटले.

ते फोटु हाईती

पैले मोनालिसा को बोलो की विंची के चित्रपे सही मारे.

+१ जबर्‍या प्रतिसाद

हसून् हसून पोट दुखले प्रियाली ताई :)

मोनालिसा च्या डिमान्ड् मुळे दा विंची चे केस नेहमी कसे पिंजारलेले असत् ते पटले - हा हा हा

मोडी लिपी मला तरी कुठे येती आहे. पण् तुम्ही दिलेल्या तक्त्यावरुन प्राथमिक मोडी शिकायला शक्य आहे.
आभारी आहे तक्त्याबद्दल

फरक

छायाचित्रापेक्षा चित्र वेगळे का समजले जाते ते मला कधी कळलेच नाही.

ऑटोग्राफ प्लीज!

छायाचित्रापेक्षा चित्र वेगळे का समजले जाते ते मला कधी कळलेच नाही.

पूर्वी चित्रे काढली जात तेव्हा त्यांच्या प्रती बनत नसाव्यात आणि आताही प्रती बनल्या तरी त्या ओरिजिनल चित्रकृतीपेक्षा दुय्यमच ठरतात.

ऑटोग्राफ प्लीज असे म्हणून चित्रांवर सह्या घ्यायची पद्धत महाराजांच्या काळी नसावी*. (असल्यास एक दो तीनच्या धर्तीवर पुरावे बघायला आवडतील आणि माझे वाक्य बदलता येईल.) :-)

* कल्पना करा महाराज शाहिस्तेखानाची बोटे तोडत आहेत; तो जीव वाचवून पळत आहे आणि जनानखान्यातील बाया आणि खोजे महाराजांसमोर त्यांच्या चित्रांच्या प्रती घेऊन स्वतःच्या बोटांची पर्वा न करता "ऑटोग्राफ प्लीज" असे म्हणत आहेत. ;-)

हस्ताक्षर की स्वाक्षरी?

हे हस्ताक्षर आहे की स्वाक्षरी?
(पिकासा दुव्यावर "स्वाक्षरी" म्हटलेले आहे - या व्यक्तीचे नाव काय आहे? मोडीत "शिव"/"सीव" असे काहीच नाही)

मुद्दा एकदम पटेश धनंजयराव

हस्ताक्षर की स्वाक्षरी हा देखील वादाचा मुद्दा असू शकेल पण् त्याही पेक्षा आधी हे चित्र अस्सल आहे की नाही याचा शोध लागला पाहिजे. आणि त्यानंतरही प्रियाली ताई म्हणतात् तसे "शिवाजी महाराज सही करत का हाच आधी एक प्रश्न आहे आणि करत असत तर कशापद्धतीने?" याचा शोध लागला पाहिजे. मगच यावर उहापोह करणे योग्य होईल असे मला वाटते

चित्र

हे चित्र मी पूर्वीही पाहिले होते. व शोध घ्यायचा प्रयत्न केला होता पण मॉस्कोतला दुवा मिळाला नाही.

हे चित्र म्हणजे एकसंध कागद दिसत नाही. सहसा कागदावरील चित्रांभोवती जाडसर कागद टाकला जातो (त्याला माउंटींग म्हणतात.) तसा कागद टाकलेला दिसतो. लंबवर्तुळाकार चित्र हे वेगळ्या कागदावरचे आहे. चित्रकार जेंव्हा सही करतो तेंव्हा तो चित्रावरच करतो. फ्रेमवर/माउंटवर सही करण्याची पद्धत नाही. खाली लिहिलेली ओळ 'शककर्ते ...... (हस्ताक्षरासह)' ही ओळ तर चक्क छापील आहे. याचा अर्थ असा की माउंट हा नवीन आहे (त्यावरील चित्रापेक्षा).

ही सही शिवाजीमहाराजांची असू शकते. पण ती छपाईबरोबर माउंटला जोडलेली (ब्लॉक टाकून/वा इतर योजनेने). सहीत काय लिहिले आहे हे लहानपणी मोडी शिकून नीटसे वाचता येत नाही. पहिले अक्षर शि आहे असे वाटते.

आता चित्राबद्दल. असे चित्र काढण्यासाठी खूप सीटींग्ज लागतील. सहसा या प्रकाशयोजनेत (सर्वसमान) चित्र काढले जात नाही. चेहरा थोडासा एका बाजुने काढला जातो. (पूर्ण एका बाजुने काढलेली चित्रे असतात पण ती पण कमी.) एकंदर बघता हे चित्र नसावे आणि छायाचित्र असावे असे मला वाटले.

अर्थात कोणी मॉस्कोतला संदर्भ दिला तर बरे होईल.

प्रमोद

शिवाजी महाराज सही करत?

ही सही शिवाजीमहाराजांची असू शकते.

शिवाजी महाराज सही करत का हाच आधी एक प्रश्न आहे आणि करत असत तर कशापद्धतीने?

सही

यात दोन प्रश्न आहेत. जुन्या पत्रव्यवहारात सही करत असत की शिक्का मारीत असत. मला वाटते करत नसावेत. (पण जुनी पत्रे पाहिली नसल्याने सांगता येणार नाही.)

शिवाजी महाराज करत नसावेत. कारण त्यांची अनेक पत्रे (लोक त्यांचा संदर्भ देतात म्हणून) आहेत. त्यातील प्रत्येकावर सही असायला हवी होती. आणि मग सगळा प्रश्न संपला असता.
आता एकटी दुकटी सही केलेली पत्रे समजा उपलब्ध असतील आणि त्यावर सही असेल असे कोणी संशोधन केले असेल तर ते का नाकारावे. मात्र त्या व्यक्तिने याचा पुरावा ससंदर्भ देणे गरजेचे आहे.

प्रमोद

आणखी एक चित्र

मी बराचवेळ महाराजांच्या चित्रांविषयी शोध घेतला पण नेटावर फारसे काही हाती लागले नाही. सध्या माझ्याकडे इतर कोणतेच संदर्भ नाहीत. एक जुनी गोष्ट आठवते ती अशी की

आग्र्याला असताना एक मुसलमान चित्रकार तुमचे चित्र काढतो म्हणून मागे लागला होता. शेवटी महाराजांनी परवानगी दिली. त्याने चित्र बनवून राजांना दिले पण त्या चित्रात राजे लवाजम्याबरोबर जाताना दिसत होते. राजांनी त्याला विचारले की ते कैदेत असल्याने आणि बाहेर पडण्याची मनाई असल्याने त्यांचे असे चित्र कसे काय काढले?

त्यावर त्या चित्रकाराने उत्तर दिले की त्याने राजांना आग्र्यात प्रवेश करताना (दरबारात हजर राहण्याच्या दिवशी) पाहिले होते आणि तेच चित्र त्याच्या डोक्यात बसले.

ही गोष्ट मी श्रीमान योगीमध्ये वाचली असावी. श्रीमान योगी ही कादंबरी आहे हे लक्षात घेऊन मी या गोष्टीचे ऐतिहासिक मूल्यमापन करू शकत नाही. या चित्रकाराचे नेमके नाव आठवत नाही पण मीर हसन/ मीर मुहम्मद असणे शक्य वाटते. श्रीमान योगी उघडून कोणीतरी माझे प्रबोधन करावे.

हे चित्र मला नेटावर सापडले ते सतराव्या शतकातील असल्याचे म्हटले आहे आणि चित्रकार मीर मुहम्मद.

विश्वासार्हतेबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही.

5921

नेटावर इतरत्र मला निकोलाय मनुचीने मीर मुहम्मदची काढलेली काही मुघल चित्रे युरोपात नेल्याचे म्हटले आहे. निकोलाय मनुची हा राजा जयसिंगाच्या सैन्यात होता आणि त्याची महाराजांशी मैत्रीही होती. तसेच जयसिंगाआधी किंवा नंतर मनुची आणि मीर मुहम्मद दोघेही शाह आलमच्या पदरी होते.

मीर मुहम्मदने काढलेले महाराजांचे अधिकृत पेंटींग

मीर मुहम्मदचा ब्रिटिश म्युझियममध्ये असलेले पेंटींगया पुस्तकात् पहायला मिळेल

लगेच दिसले नाही तर् १-२ पाने खाली स्क्रोल करुन् पहा ही विनंती.

असे दिसते ते चित्र. पण् तुम्ही दिलेल्या चित्राची ही झूम फॉरवर्ड केलेली प्रत् वाटते

From Chatrapati Shivaji Maharaj

शिवरायाचि चित्रे

आपणास जर शिवरायांची अत्यंत दुर्मिळ अशी चित्रे हवी असतील तर डॉ जयसिंगराव पवार संपादित "छत्रपती शिवाजी महाराज " हा बालभारतीने प्रकाशित केलेला स्मृती ग्रंथ पहावा.

चित्र

चित्र बरेच मॉडर्न वाटते आहे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

शिवराज्याभिषेक

बिरुटेसरांनी शिवराज्याभिषेकाचे वर्णन करण्यास सांगितले आहे त्याला अनुसरून थोडेसे.

हे राज्याभिषेकाचे वर्णन जदुनाथांनी एका स्वतंत्र प्रकरणात केले आहे. त्यातील तळटीपेनुसार हे वर्णन इंग्रज, पोर्तुगिज दस्तावेजावरून केले आहे आणि वेळोवेळी सभासद बखरीचा आधार घेतला आहे.

देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते. चिपळूण (परशुराम)(१२मे) , प्रतापगड (भवानी) (त्यानंतर चार दिवसांनी) या दोन तीर्थस्थानांना भेट दिली. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २८ मे ला प्रायश्चित्त केले (तत्पूर्वी क्षत्रियधर्मानुसार कर्मे न केल्याबद्दल.). जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यानंतर वेदोक्त पुराणोक्त वाद झाला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.

दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, टिन (मराठीत काय?) ,शिसे आणि लोखंड अशा सात धातुंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे (?), मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. यानंतर दोन ब्रह्महत्या (पूर्वी कधीतरी झाल्या होत्या) याबद्दल ८००० होन प्रायश्चित्त म्हणून देण्यात आले.

६ जूनला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. यावेळी शिवाजीने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी, दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर (जदुनाथ स्टुल असे लिहितात.) शिवाजी, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई (दुसर्‍या मंचावर) तर शंभुजी (पुस्तकात संभाजी ऐवजी हे नाव येते) थोडासा मागे. आठ कोपर्‍यात आठ प्रधान गंगेसारख्या नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीवर अभिषेक केला. सोळा (ब्राह्मण) सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे (स्कारलेट) वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. सिंहासन (सभासदाप्रमाणे) ३२ मणाचे (सोन्याचे) होते. (या पूर्ण स्थळाचे विस्तृत वर्णन जदुनाथांनी दिले आहे. पण मला आता टंकाळा आला आहे.) सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी गेला. तिकडे हत्तीवर स्वार होऊन इतर दोन हत्ती जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक हिंडत असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे (फ्राईड राइस) उधळले, दिवे ओवाळले. या दरम्यान पुरुषांना तीन ते पाच रुपये तर स्त्री आणि बालकांना दोन दोन रुपये देण्यात आले.

दोनच दिवसात पावसाला सुरुवात झाली. (हे अवांतर झाले पण गमतीचे वाटले).

सभासदा प्रमाणे यासाठी एक कोटी ४२ लाख होन खर्च झाले. (नक्की सांगता येत नाही पण साधारण राज्याचे वार्षिक उत्पन्न एवढेच असावे.) मात्र जदुनाथ या आकड्याला अतिरेकी मानतात आणि बारा दिवसाचा खर्च १० लाख होन म्हणतात.

यावेळी काही अपशकून झाले असे दुसर्‍या गटाने सांगितले. त्यांची यादी अशी. बालम भट्टाच्या (गागाभट्टाचा सहकारी) डोक्यावर लाकडी कमळ पडले, संभाजीच्या अलंकारातील दोन मोती हरवले, शिवाजी सिंहासनावरून उतरत असताना कोणीतरी शिंकले, शिवाजीची तलवार पडली, समारंभाचा भाग म्हणून बाण उडवताना शिवमुद्रा शिवाजीच्या हातून पडली आणि दत्ताजी म्हणून एक प्रधान पडला. या मुळे तांत्रिक (हा गट तांत्रिकांचा होता) गटाचे म्हणणे होते की गागाभट्टाच्या वैदिक उपचाराने मुळे ही सर्व गडबड झाली. जदुनाथ लिहितात की शिवाजीने धूर्तपणे ठरवले की आता तांत्रिक गटालाही महत्व द्यायचे. हा गट निश्चल पूरी नावाच्या तांत्रिकाचा होता. २४ सप्टेंबरला त्यामुळे दुसरा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. याहीवेळी ब्राह्मण (काही) आणि तांत्रिकांची कमाई झाली.

प्रमोद

आभारी....!

राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्णन टंकल्याबद्दल आभारी....!
'शिवाजी ऍन्ड हिज टाइम्स' मधेही असेच वर्णन आहे.
वर्णन वाचतांना मजा येते ....!

-दिलीप बिरुटे

मस्त

मस्त माहीती! धन्यवाद!

दोनच दिवसात पावसाला सुरुवात झाली. (हे अवांतर झाले पण गमतीचे वाटले).

अरे वा! तेंव्हा पण अवांतर करायचे? ;)

पावसाची सुरुवात

>>दोनच दिवसात पावसाला सुरुवात झाली.
खरे तर पावसाची गोष्ट वाचून मलाही ते मधेच कसे काय आले असे वाटले.
इतिहासकार पावसाची गोष्ट सांगण्याबरोबर शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने
चार महिनेपूर्वीच मुक्कामी आलेल्या मंडळीची गैरसोय झाली हे सुचवितात.

अवांतर: राज्याभिषेकाचे वर्णन मराठी विकि...त भरण्याची संधी आहे. :)

-दिलीप बिरुटे

काही 'विनामुल्य' पुस्तके

राजा शिवाजी विषयावरील काही विनामुल्य पुस्तके-
कृईत्झर - जेम्स लेन शिवाजी नंतरचे पुस्तक २००९
Shivaji, The Man and His Work - प्रा. बाळकृष्ण १९४०
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

दुसरे पुस्तक

दोन्ही पुस्तकांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
पहिले पुस्तक बघतो आहे. चांगले वाटले. विचारप्रवर्तक असू शकते.
दुसरे पुस्तक काही दुव्यावरून हाती लागले नाही. दुवा उपक्रमात संपतो.
परत द्याल तर बरे होईल.

प्रमोद

दुसरा दुवा

चुकीबद्दल क्षमस्व.
हा दुवा पहा. - शिवाजी द ग्रेट, - प्रा. बाळकृष्ण.

जदुनाथ सरकार यान्चे दुश्मन

इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले. खरे म्हणजे सर सरकार आपले म्हणणे नेहमी पुराव्यानिशीच मांडतात. त्यामुळे ते थोर म्हणवले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ठ केले कि राज्याभिषेकावेळीस सनातनी भट लोकांनी शिवरायांना कशे छळले. तसेच त्यांनी खरा इतिहास मांडला त्यामुळे याच प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची बदनामी सुरु केलेली आहे. परंतु या स्वार्थी, मूर्ख आणि अज्ञानी लोकांना प्रो. सरकार उंची काय कळणार ? या भट मंडळीना तर केवळ आपल्या वैदिक धर्माची पडलेली असते. त्यामधूनच काही विकृत इतिहासकार जन्माला घातले गेले आहेत. असो.

आता भारत वर्षातले सर्व लोक सुशिक्षित आणि साक्षर झाले आहेत म्हणून त्यांना सरकार यांचे योगदान माहित आहे. इतिहासाच्या विकृती करणारे केवळ एकाच कळपातील आहेत आणि ते कोण आहेत हे सांगण्याची इथे गरज नाही. प्रो सरकार यांना खुद्द सेतू माधवपगडी, डॉ बाळकृष्ण हे गुरु मनात आहेत याचा विसर पडला आहे काय???

प्रो सरकार हेच खरे निःशंक शिवचरित्रकार आहेत !!

विरोधभक्ती

भट मंडळींना वैदिक धर्माची पडलेली असते तर त्यांच्या विरोधकांना आंधळ्या विरोधाची!!!!! हे सुधारण्याची चिन्हे आजिबात नाहीत.

 
^ वर