परत एकदा जेम्स लेन
श्री. धम्मकलाडू यांनी या विषयावर एक धागा 2,3 दिवसापूर्वीच सुरू केला होता. त्यातच प्रतिसाद न देता हा नवीन धागा मी का सुरू करतो आहे असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु श्री. धम्मकलाडू यांच्या धाग्यात एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते म्हणून हा खटाटोप.
प्रथम हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मी वाचलेले नाही आणि वाचनाची इच्छाही नाही. परंतु या पुस्तकाची काही परीक्षणे मी आंतरजालावर वाचली. त्यावरूनच मी ही निरिक्षणे करतो आहे.
जेम्स लेनच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश शिवाजीचा इतिहास सांगणे हा नसून, शिवाजीच्या कारकीर्दीने व कर्तुत्वाने महाराष्ट्रावर व मराठी माणसांच्यावर जो एक कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला आहे तो खरोखर योग्य आहे का? की पोवाडेकार व बखरकार यांच्या अतिरंजित वर्णनांमुळे एक HYPE निर्माण हो ऊन त्यामुळे असे झाले आहे याचे विश्लेषण करण्याचा आहे असे दिसते.
या विश्लेषणामधून जेम्स लेन या अनुमानापर्यंत पोचल्यासारखा दिसतो की शिवाजीचे कर्तुत्व असाधारण असले तरी त्याला हिंदवी साम्राज्याचा संस्थापक म्हणणे योग्य ठरणार नाही. या साठी तो प्रमुख दोन कारणे देतो. पहिले म्हणजे सुरवातीच्या कालात शिवाजीने घेतलेली अदिलशाहच्या दरबारातली मनसबदारी व मिर्झा राजे यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार त्याने मोगलांच्या दरबारात स्वत: व आपले चिरंजीव संभाजीराजे यांच्यासाठी मान्य केलेली याच प्रकारची मनसबदारी. शिवाजीने मोगलांचे राज्य तोडण्याची जी कामगिरी केली त्यामुळेच या इस्लामिक देशावर प्रभुत्व मिळवणे ब्रिटिशांना सोपे गेले असेही या साहेबमजकुरांना वाटते.
मी वाचलेल्या माहितीप्रमाणे हे जेम्स लेन साहेब इतिहासकार वगैरे नाहीतच. आपल्या पुण्यातल्या वास्तव्यात त्यांनी शिवाजीबद्दल ही माहिती जमा केली व हे अकलेचे तारे तोडले आहेत.
कोणतेही मोठे कार्य उभे करताना काही वेळा परिस्थितीमुळे व काही वेळा व्ह्युहात्मक माघार घ्यावी लागते हे या साहेबांना बहुदा माहिती नसावे. तसेच 400 वर्षाच्या परकीय अंमलाखाली एखादा देश जेंव्हा गुलामगिरीत खितपत पडलेला असतो तेंव्हा त्या देशातील सामान्य जनतेची अस्मिता जागृत करणे हे केवढे मोठे कर्तुत्व आहे याची या साहेबमजकुरांना कल्पना येणे अशक्यच वाटते. एवढ्या शक्तीमान मोगल शहेनशहाच्या राज्याचे तीन तेरा वाजवून मराठी साम्राज्य उभे करण्यात शिवाजीने प्रारंभ केला व त्यांचे कार्य थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले, या इतिहासाचे एवढे विकृत विश्लेषण करण्याचे धाडस या जेम्स लेन प्रोफेसर मजकुरांनी केवळ स्वत:च्या अज्ञानापोटीच केले असावे असे दिसते. पुस्तकाला नाव देताना सुद्धा त्यांनी पुस्तकाला इस्लामिक देशाचा हिंदू राजा, असे नाव देऊन भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची करामत करून दाखवली आहेच.
एक हती व दहा आंधळे यांची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. शिवाजीसारख्या असामान्य कर्तुत्वाच्या एक ऐतिहासिक व्यक्तीचे या अज्ञानी साहेबांनी केलेले हे विश्लेषण या आंधळ्यांच्या निरिक्षणांइतकेच महत्वाचे वाटते. या कारणांमुळेच पुण्यातील सर्व इतिहासतज्ञांनी हे पुस्तक अतिशय चुकीच्या माहितीने भरलेले असून ते प्रसिद्ध करू नये अशी विनंती प्रकाशकांना केली होती व ती त्यांनी मान्य करून माफीनामाही सादर केला होता.
एक निरर्थक, निष्कारण व मूर्खपणाने केलेली लेखी बडबड इतकेच महत्व या पुस्तकाला आहे. या पुस्तकावर बंदी घालावी असे काहीही या पुस्तकात नाही. या पुस्तकाला एकच जागा आहे ती म्हणजे कचर्याची टोपली! असे मला वाटते.
Comments
हम्म
विचार योग्य वाटतात. इतरत्र म्हटल्याप्रमाणे दुर्लक्ष केले असते तर असे पुस्तक वाचनालयांमध्ये धूळ खात पडून राहिले असते. संस्थांची नासधूस, राडा वगैरे करणे या प्रतिक्रिया टोकाच्या वाटतात.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
थोडक्यात
थोडक्यात केलेले विश्लेषण आवडले.
याउपर जेम्स लेन प्रकरणी जो गदारोळ चालेल तो गदारोळ करणार्यांच्या सोयीचा आहे म्हणुनच. बहुदा ह्या पब्लिसीटीचा जेम्स लेनला फायदाच होईल असे वाटते आहे.
प्रतिसाद
मीही पुस्तक वाचलेलं नाही, त्यामुळे बहुतेक् प्रतिसाद मूळ लेखाच्या आधारे, किंवा पुस्तकाबद्दलच्या माझ्या तुटपुंज्या वाचनावरून.
हे मान्य करणं जड जातं. पेशवाईपर्यंतचा प्रवास बघितला तर सुरूवात शिवाजीने केली यात वाद नसावा. पण शिवाजी ही व्यक्ती, व शिवाजी ही विभूती/दंतकथा यात फरक आहे असं सांगण्याचाही प्रयत्न वाटला. त्यातूनच शिवाजीविषयीच्या इतरही दंतकथांचा उल्लेख आला असावा. जर शहाजीच्या कर्तृत्वाचे इतकेच सुंदर पोवाडे लिहिले गेले असते तर त्याला आद्य प्रवर्तक म्हटलं असतं का?
हे विधान सकृद्दर्शनी खरं असू शकेल, किमान त्यासाठी गोळा केलेला पुरावा तरी पहावा या लायकीचं वाटतं. त्यात शिवाजीला दोष दिला आहे असं वाटत नाही.
भारतात इस्लामी राजवट होती याबाबत वाद नसावा.
दुर्दैवाने बंदी घालण्याच्या आततायी प्रयत्नातून भांडारकरची नासधूस होते, भारताची पुरोगामी अशी नाचक्की होते, वर ते पुस्तक कचर्याच्या टोपलीतून बाहेर येतं... आंधळे कोण याचा पुनर्विचार व्हावा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
व्याख्या
'रिलिजन ऑफ स्टेट' काय होता? मुस्लिमांवर जिझिया कर लावला का?
इस्लामिक राष्ट्र
इस्लामिक राष्ट्र व इस्लामिक राजवट यात फरक आहे. भारतावर ब्रिटिश म्हणजे ख्रिस्ती राजवट 125 वर्षे होती. म्हणजे भारताला ख्रिस्ती राष्ट्र म्हणता ये ईल का?
चन्द्रशेखर
इन की ऑफ?
पुस्तकाचे नाव 'हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया' असे आहे. ('हिंदु किंग ऑफ इस्लामिक् इंडिया' नाही) यावरुन मुस्लिम-भारतातील(ज्यावेळी मुस्लिमांचे वर्चस्व होते) (तेव्हाचा) हिंदु राजा असा अर्थ मी काढला.
-Nile
असहमत
"शिवाजीचे कर्तुत्व असाधारण असले तरी त्याला हिंदवी साम्राज्याचा संस्थापक म्हणणे योग्य ठरणार नाही." या विधानात चूक काय आहे? तसे म्हणणार लेन हा पहिला लेखक नाही.
हिंदवी साम्राज्य
1674 या वर्षी शिवाजीने राज्यारोहण समारंभ करून घेतला. या वर्षापासून ते इ.स. 1817 पर्यंत म्हणजे जेंव्हा सातार्याच्या प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांना शरणागती लिहून दिली तेंव्हापर्यंतच्या 143 वर्षात जे मराठी हिंदवी साम्राज्य भारतात प्रस्थापित व वर्धित केले गेले होते त्याचा संस्थापक कोण होता? असे श्री रिकामटेकडा यांना वाटते?
चन्द्रशेखर
व्याख्या
हिंदवी म्हंजे काय? ते हिंदुधार्जिणे राज्य होते काय?
इतर
इतर राजवटींमध्ये हिंदूंवर अन्याय होत होता, त्यांची मंदिरे पाडली जात होती. शिवाजीमहाराजांच्या काळात, त्यांच्या राजवटीत हे प्रकार बंद झाले. याला हिंदुधार्जिणे म्हणायचे असेल तर म्हणा.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
काय निवडावे निवडणारे?
सुरत
>शिवाजीने सुरत लुटली
सुरतेच्या फक्त परधर्मीय व्यापार्यांकडून पैसे मिळवले की सुरते मधील मंदीरे फोडून?
समभाव
शिवाजीने हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन, मराठी-गुजराथी-पोर्तुगीज असा भेद न करता व्यापार्यांना लुटले. सोमनाथचे मंदिर न लुटता केवळ शहर लुटले असते तरी गझनी, खिल्जी यांना सेक्युलर म्हणता आले असते का?
धन्यु
>शिवाजीने हिंदू-मुस्लिम, मराठी-गुजराथी असा भेद न करता व्यापार्यांना लुटले.
शिवाजी महाराजांनी सुरतेत मंदीर, मस्जीद किंवा कुठले सार्वजनीक धर्म प्रार्थना स्थळ लुटले नसावे असे वरच्या प्रतिसादावरुन वाटते.
असो माहीतीबद्दल धन्यु.
शिवाजी महाराजांनी धार्मीक तेढ वाढवली असे जे काही वाचले ऐकले त्यावरुन वाटत नाही. इतकेच नमुद करावेसे वाटते. सेक्युलर इ साठी वेगळी चर्चा उपयुक्त ठरावी.
राजवट
शिवाजीमहाराजांनी एकही धर्मस्थळ उध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. हेच औरंगझेबाबद्दल म्हणता येईल किंवा नाही शंका आहे.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
संतुलन
औरंगझेबाने सतीची पद्धत बंद व्हावी यासाठी प्रयत्न केले. तसेच ते त्याच्या वडील व आजोबांनीदेखील केले. कर्मठांनी प्रसंगी लाच देऊन ते हाणून पाडले...
उगीच 'आपण विरुद्ध ते' या स्वरूपात चर्चा वहावू देण्यापेक्षा योग्य काय व अयोग्य काय याकडे अधिक लक्ष दिलं जावं असं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्रतिसाद
सेक्युलर नसूनही औरंगजेबही देवळांना देणग्या देई. शिवाजीने सुरत लुटली तर गझनी, खिल्जींनी सोमनाथ!
माझा प्रतिसाद या वाक्याला उद्देशून होता.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
बरोबर
म्हणूनच शिवाजीला सेक्युलर राजा म्हणू आणि औरंगझेबाला मुस्लिम राजा.
विसंवादी वाक्य.
सेक्युलर नसूनही औरंगजेबही देवळांना देणग्या देई. शिवाजीने सुरत लुटली तर गझनी, खिल्जींनी सोमनाथ!
शिवाजीने सुरत लुटली हे वाक्य अगोदरच्या व नंतरच्या वाक्यांशी विसंवादी आहे असं वाटतं. औरंगजेब देवळांना देणग्या देई (ही गोष्ट खरी आहे असं मी समजून चालतो) या पार्श्वभूमीवर शिवाजी मुसलमानांच्या धार्मिकस्थळाना देण्ग्या द्यायचा की नाही याबद्दल वाक्य हवं होतं. तसंच गिझनी, खिल्जीनी सोमनाथ लुटलं या बरोबर शिवाजीनी मुसलमानांचं धार्मिक स्थळ लुटलं होतं का त्यासंबंधी वाक्य हवं होतं. सोमनाथाची लूट आणि सुरतेची लूट दोन्ही सारख्याच प्रकारात मोडत नाहीत असं वाटतं. सोमनाथाची लूट आक्रमकानी धार्मिक स्थळाची केलेली लूट होती तर सुरतेची लूट आक्रमकांविरुद्ध होती त्यांच्या धार्मिक स्थळाची नव्हती.
सुसंवाद
सोमनाथचे मंदिर न लुटता केवळ शहर लुटले असते तरी गझनी, खिल्जी यांना सेक्युलर म्हणता आले असते का? सुरतेच्या दृष्टीने शिवाजीच परकीय होता! त्याने 'आक्रमकांना लुटले' म्हणजे काय?
शिवाजी सार्याच धर्मांबद्दल समभावी होता. अफझलखानाचा दर्गा/समाधी (जी पाडण्याचा हल्ली प्रयत्न होतो) त्यानेच बांधली ना?
राम पुनियानींच्या या संदर्भाला तुम्ही किती किंमत देणार ते मला माहिती नाही.
औरंगजेबाने गोवळकोंड्याची जामा मशीद पाडून त्याखालचा खजिना लुटला असे वाचले आहे. पण माझ्याकडे त्याविषयी विश्वासार्ह संदर्भ नाहीत.क्ष्
शिवाजीच्या सैन्यातील मुसलमान
शिवाजी स्वराज्यस्थापनेसाठी मुसलमानांपेक्षा हिंदूंविरुद्धच अधिक लढले असावेत. चंद्रराव मोरे आणि इतर घरभेदी मराठे सरदार, मिर्झाराजे जयसिंग व इतर हिंदू सरदार.
कॉ. गोविंद पानसरे आणि प्रेम हनवते यांच्या (शिवाजीच्या सैन्यातील मुस्लिम आणि शिवरायांचे निष्ठावंत मुसलमान सरदार) लेखांमध्ये शिवाजीच्या सैन्यातील मुसलमानांबद्दल बरीच माहिती आहे. त्यातील निवडक माहिती खालीलप्रमाणे.
सिद्दी हिलाल - घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले। उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.
सिद्दी वाहवाह - (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद.
सिद्दी इब्राहिम - शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.
नूरखान बेग - स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दीड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.
मदारी मेहतर - विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.
काझी हैदर - शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.
शमाखान सरदार - कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.
सिद्दी अंबर वहाब हवालदार - जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.
रुस्तमजनमा - शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.
इब्राहीम खान - आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.
दौलतखान - आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४)
सिद्दी मिस्त्री - आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.
सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.
दाऊदखान - आरमाराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.
इब्राहिम खान गारदी - तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हिंदु - मुसलमान विभागणी
शिवाजी स्वराज्यस्थापनेसाठी मुसलमानांपेक्षा हिंदूंविरुद्धच अधिक लढले असावेत. चंद्रराव मोरे आणि इतर घरभेदी मराठे सरदार, मिर्झाराजे जयसिंग व इतर हिंदू सरदार.
थोडीशी फसवी आहे. वर्चस्व अमान्य करणारा चंद्रराव मोरे, शिवाजीवरच हत्यार उगारणारा खंडूजी खोपडा, शहाजीराहांना गाफील पकडून कैद करणारा बाजी घोरपडे यांना शिवाजीने मारले हे खरेच आहे. ते स्वाभाविकच नाही का?
मिर्झाराजे हिंदू होते म्हणून त्यांच्याशी तहाची भाषा केली, शरणागती पत्करली (अर्थात यात बराच मोठा भाग मिर्झाराजांच्या पराक्रमाचा आहे. जसवंतसिंगासारखे लोक पाठ दाखवून पळाले होते), तुम्ही हिंदूंचे नेतृत्व करा मी तुम्हाला सामील होतो असे पत्र दिले. इतकेच नव्हे तर त्यांच्या आग्रहाखातर आग्र्याला गेले. सभासदाच्या बखरीत लिहिले आहे की मिर्झाराजे हिंदू असल्याने त्यांच्याशी सला (तह) करता येईल असा विचार शिवाजीने केला. अफजलखानाबरोबर मात्र कोणी हिंदू सरदार नसल्याने तहाची शक्यताच नव्हती. त्यामुळे खानाला जावळीत भेटीस बोलावून विश्वासघाताने मारणे हाच एक उपाय होता. त्यासाठी पंताजींना बरेच द्रव्य वगैरे देऊन खानाचा विश्वास संपादण्यास सांगितले आणि तसा खानाचा विश्वास त्यांच्यावर बसला. "शिवाजी हरामखोर काफिर. त्यातून जावळी कुबल जागा. तुम्ही ब्राह्मण म्हणून तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजीला भेटायला येतो." हे खानाचे शब्द आहेत.
दुसरे म्हणजे इ. स. १६३६ मध्ये मोगल आणि आदिलशहाने मिळून शहाजीराजांच्या पराभव केला. त्यावेळी पुण्याच्या पांढरीवरून गाढवाचा नांगर कोणी फिरवला? कान्होजी जेधे आणि मुरार जगदेव पंडित यांनी. आदिलशहाचे सरदार म्हणून. पुढे हे दोघे शहाजीचे मित्र झाले, कान्होजी शहाजीच्या सांगण्यावरून शिवाजीकडे आले हा इतिहास वेगळा.
विनायक
न्यूरेम्बर्ग डिफेन्स?
यात फसवणूक काय ते समजले नाही. "ते मुस्लिमांची चाकरी करीत म्हणून त्यांना शिवाजीचे हिंदू शत्रू म्हणून मोजू नका" हे पटत नाही.
"The claim, 'I was only following orders' has been used to justify too many tragedies in our history. Starfleet does not want officers who will blindly follow orders without analyzing the situation. Your actions were appropriate for the circumstances, and I have noted that in your record." - Captain Picard, to Data
कधीकधी सभासदाची बखर अपुरी तर कधीकधी निखालस चुकीची माहिती देते, कधी कालविपर्यास असतो त्यामुळे ती इतर साधनांवरून तपासून घ्यावी लागते. =))क्ष्
कारण
यात फसवणूक काय ते समजले नाही. "ते मुस्लिमांची चाकरी करीत म्हणून त्यांना शिवाजीचे हिंदू शत्रू म्हणून मोजू नका" हे पटत नाही.
मिर्झाराजे शिवाजीवर चालून आले ते औरंगजेबाचे प्रतिनिधी म्हणून. तेव्हा शिवाजी (हिंदू ) मिर्झाराजांविरुद्ध लढले हे म्हणणे मला योग्य वाटत नाही. ते औरंगजेबाच्या प्रतिनिधीविरुद्ध लढले. तीच गोष्ट कान्होजी जाधव आणि मुरार जगदेवांची. शहाजी त्यांच्याविरुद्ध ते आदिलशहाचे प्रतिनिधी होते म्हणून लढले. पुढे शहाजी स्वतः आदिलशाहीत सामील झाल्यावर वैर विसरून मित्रही झाले.
मोर्यांबद्दलची सभासदाची हकीकत विश्वसनीय नाही असे मी म्हणतो कारण मी दुसरी हकीकत वाचली आहे, जी मला जास्त विश्वसनीय वाटते. अफजलखानाने पहिल्याने गळा आवळला तसेच कट्यार मारली ती चिलखताला घासून गेली असेही सभासद लिहितो तरीही मी शिवाजीने अनप्रोवोक्ड वाघनखे मारली असण्याची शक्यता जास्त आहे असे म्हटले आहे. तेव्हा मी सोयीचे आहे तिथे सभासदाचा संदर्भ देतो आणि गैरससोयीचे आहे तिथे चुकीचे म्हणतो असे नाही.
इथे मी सभासदाचा संदर्भ दिला आहे, पण त्या संदर्भाविनाही शिवाजीचे मिर्झाराजांबरोबरचे वागणे तर्कसंगत वाटते.
विनायक
दुरुस्ती
ही प्रतिक्रिया चुकून स्वतंत्र प्रतिसाद म्हणून पोस्ट झाली आहे. प्रत्यक्षात ती रिकामटेकडा यांच्या ११-०७ च्या "काय निवडावे निवडणारे" या प्रतिसादावरील आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
पंढरीनाथ रानडे आणि अनिल बर्वे यांना याच विषयामुळे त्रास झाला होता. त्याविषयी अधिक माहितीसाठी The book on trial: fundamentalism and censorship in India ले. Girja Kumar हे पुस्तक गुगलता येईल. तेथे असेही सापडेल की महात्मा फुल्यांनी शिवाजीला अंधश्रद्ध (मूळ संदर्भ मला सापडला नाही), अडाणी/अशिक्षित (मूळ संदर्भ 'शेतकर्याचा आसूड') आणि क्षुद्र (!=क्षत्रिय असा 'कुळवाडी भूषण' या पोवाड्यात उल्लेख असल्यामुळे 'क्षुद्र' या शब्दाचा अर्थ फुल्यांना 'शूद्र' असा सांगायचा होता, किंवा सरकारने नंतर शब्द बदलला असेल, असे वाटते. 'शेतकर्याचा आसूड' या पुस्तकात शूद्र असाच उल्लेख आहे.) राजा ठरविले होते.
पंढरीनाठ रानडे
पंढरीनाथ रानडे हे कॉम्रेड विष्णुपंत चितळे यांचे शिष्य़. रानड्यांचे आणि कॉम्रेड बर्धन यां दोघांचे विचार श्रीपाद अमृत डांग्यांच्या विचारांपेक्षा भिन्न होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना रानडे-चितळे यांच्या मते ते महाराष्ट्र नावाच्या स्वतंत्र राज्यासाठी लढत आहेत असेच वाटे. महाराष्ट्र मिळाल्यावर रशियाच्या धर्तीवर देशात युनियन ऑफ़ इंडियन सोशॅलिस्ट रिपब्लिक्स (UISR) स्थापन होईल असे त्यांना वाटे. एकजात सर्व कम्युनिस्ट देशदोही होते. त्यांना फक्त रशिया आणि पुढे त्यांतल्या काहींना चीनबद्दल प्रेम वाटे. त्या मानाने कॉम्रेड डांगे, सरदेसाई तसेच रघू आणि टेड्या कर्हाडकर हे पितापुत्र फार प्रगल्भ होते. त्यांच्या मनात असले काही विचार असलेच तर ते कधीही प्रगट झाले नाहीत.
पंढरीनाथ रानडे यांच्यानंतर, सध्याच्या काळातल्या तिस्ता सेटलवाड या मुसलमानप्रेमी पत्रकारिणीने शिवाजीबद्दल काही विपरीत लिखाण केले होते. बाळ ठाकर्यांच्या दमबाजीनंतर तिने पुढे लिहायची हिंमत केली नाही ,असे अंधुक आठवते. --वाचक्नवी
ऍड होमिनेम
विचारसरणीवर टीका करून वस्तुनिष्ठ मतांवरच नेम धरायचा असेल तर अजून माहिती नोंदवितो की नक्षलवादी असल्यामुळे बर्वेंना तुरुंगवास झाला होता.
फ्रॉडियन स्लिप ऑफ टंग?
पंढरीनाठ रानडे ???
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शक्य
टंकनदोष असल्यास तो दुरुस्त करता यावा म्हणून मी ८ तास वाट पाहिली.
तुम्ही
तुम्ही फ्रॉइडियन स्लिप ऑफ टंग ला मानता? :)
--
प्रकाश पाडावा
देशद्रोही होते म्हणजे काय होते बरे? ह्यावर अधिक प्रकाश पाडावा. कम्युनिस्ट लोकांबाबत चर्चा करताना देशद्रोहाकडे वळावेच लागते. Patriotism is the last refuge of a scoundrel हे डॉ. जॉन्सन ह्यांचे वाक्य आठवले.
तिस्ता सेटलवाडने काय लिहिले होते आणि ठाकऱ्यांनी काय दमबाजी केली होती ते सांगावे. तुम्ही दमबाजीचे समर्थन करता आहात की काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अवांतर
श्री. रिकामटेकडा यांच्या निरनिराळ्या प्रतिसादांवरून ते काय सांगू इच्छित आहेत हे सांगणे अवघड आहे. माझ्या मूळ लेखाचे सूत्र एवढेच आहे की. जेम्स लेन या इतिहासतज्ञ नसलेल्या एका प्राध्यापकाने थोडे फार वाचन करून लिहिलेल्या या पुस्तकाला फारसे महत्व देण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याच्यावर बंदी आणून त्या पुस्तकाला फक्त फुटकळ व अवास्तवी प्रसिद्धी मिळते आहे. या पुस्तकाकडे फक्त दुर्लक्ष करण्याची आवश्यकता आहे.
चन्द्रशेखर
वेगळा मुद्दा
बंदी घालावी का? या armchair चर्चेत तुमचे मत योग्य आहे. आज विचारवंत वि. बहुजन अशी उभी मांडणी झालेली आहे. ते (कायदेशीर, बेकायदा) बंदी घालून मोकळे झाले. आपल्या चर्चेआधीच लेनला प्रसिद्धीही मिळाली आहे. फुले-शिवाजी अशी आडवी दुफळी झाली तर ध्वनिप्रदूषण कमी होणार नाही का? पुस्तक फालतू आहे म्हणून इयरप्लग घातले तर नंतर 'when they came for communists ...' ही वाळूत डोके घालणार्या वृत्तीविषयीची कविता आठवेल. सरप्लस कमी केले की लोक गप्प बसतात असे ऑर्वेलचे मत होते.
सेक्युलर(?)
सेक्युलर म्हणजे निधर्मी की सर्वधर्मसमभावी? (माझ्या मधल्या काही चर्चा लक्षपूर्वक वाचायच्या राहील्या आहेत. असो. आता निर्माण केलेल्या व्याख्यात शिवाजीला बसवणे संपूर्णत: योग्य वाटत नाही परंतु शिवाजीचा भर सर्वधर्मसमभावावर राहीला असावा.)
एक हिंदू म्हणून इतर हिंदूंबाबत कांकणभर अधिक प्रेम असणे आणि शिवाजीने आपल्या राज्याला हिंदवी स्वराज्य म्हणणे रास्त आहे.
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारे हे राज्य, सर्वांच्या कल्याणासाठी आहे असे त्याची राजमुद्रा म्हणते.
टूशे
'सर्वधर्मसमभाव' हाच शब्द मी वापरायला हवा होता :P या धाग्यात एका प्रतिसादात मी 'समभाव' हा शब्द वापरला आहे.
एक विश्लेषण
गजनीने सोमनाथ संपत्तीसाठी लुटले यात वाद नसावा. सोमनाथमध्ये अमाप संपत्ती जमा झाली होती असे त्यावेळचे वर्णन आहे.
त्याने वाटेवरच्या किंवा त्याच्या भुभागातील कित्येक मंदीरांची तीच परिस्थिती केली नाही त्याकडे लक्ष न देता तो सोमनाथाकडे वळला असे मी वाचल्याचे आठवते.
हिंदू राजांनी धार्मिक स्थळे (मूर्तीभंजन नव्हे) लुटल्याची अनेक वर्णने सापडतात. (नक्की संदर्भ नाहीत.)
कुठलेही राजे (कुठल्याही धर्माचे) हे बहुतांशी पैशासाठी राजकारण करत असावेत असे माझे मत वेगवेगळी इतिहासांची पुस्तके वाचून झाले. एकंदर तह आणि समेटाची कलमे वाचली की अमुक मुलुख = अमुक पैसा हे समीकरण त्यात असावे हे कळते. मुलुख विकणे (झारने अमेरिकेला अलास्का विकला) हा त्यातला प्रकार.
अशा राजकारणात शिवाजी त्याचे वंशज आणि नंतरचे पेशवे होते. यातील प्रत्येकाच्या राजकीय उद्दीष्टात कमीजास्त प्रमाणात संपत्ती हा भाग नाकारता येणार नाही.
कित्येक राज्यकर्ते हे उपरे होते म्हणजे जेथल्या लोकांवर ते राज्य करत त्यांच्या बरोबर त्यांचा रक्ताचा संबंध नसे. असे उपरे राज्यकर्ते ही प्रजेसाठी कित्येक चांगल्या गोष्टी करत. कित्येक राज्यकर्ते हे घरचे असून जुल्मी असत. शिवाजी + यासारखे घरचे (उपरेच्या विरुद्ध) व प्रजाहितदक्ष (सर्वच असतील असे नाही) राज्यकर्त्यांच्या मुळे राष्ट्रभावना जागृत होते. शिवाजीचे व त्यानंतरच्या राज्यकर्त्यांचे कार्य म्हणून उल्लेखनीय ठरते.
आता ही राष्ट्रभावना जी झाली त्यात
१. शिवाजीचे वैयक्तिक (म्हणजे त्यानंतरच्या काळात ते राज्य मिटले असते तर जी राष्ट्रभावना उरली असती त्याबद्दल) योगदान काय?
२. राष्ट्र्भावना कोणात झाली ? (तो गट केवढा मोठा होता?)
३. तत्कालीन वा थोड्याफार जुन्या राज्यकर्त्यांबरोबर त्याची तुलना.
हे तीन विषय वादाचे ठरू शकतात.
जेम्स लेनच्या पुस्तकात यातील काही भागावर चर्चा आहे असे मूळ लेखावरून वाटते. मात्र असे वाद करण्यास आपला समाज तयार आहे का? हा प्रश्न मला जास्त कळीचा वाटतो.
प्रमोद
सुधारणा: गजनी
गजनी हा आमीरखानचा चित्रपट असून त्यातील एका पात्राचे नाव "गजनी" होते.
प्रमोद सहस्त्रबुद्ध्यांच्या प्रतिसादातील गजनी हे पात्र गजनीचा महमूद हे असावे.
हो
हो तसेच आहे. वरील प्रतिसादांमध्ये हा मुद्दा बरेचदा आला होता म्हणून नावात संकोच झाला.
प्रमोद
प्रयोजन कळले नाही
श्री. चंद्रशेखर यांनी वेगळ्या लेखाचे प्रयोजन सांगितले आहे, कुठलातरी मुद्दा राहिलेला आहे, असे ते म्हणतात. मात्र मला ते नीट कळलेले नाही.
"पुस्तक वाचायचे नाही, तरी ठाम कल्पना आहेत" अशा काही प्रकारचे प्रास्ताविक श्री. चंद्रशेखर करतात, तो कदाचित शैलीचा भाग असावा. (मागे "घाशीराम कोतवाल" नाटकाबद्दल न-वाचण्याचा निश्चय सांगून, ठाम मतांचे प्रतिपादन त्यांनी केल्याचे आठवते.)
जेम्स लेनच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश काय तो श्री. चंद्रशेखर असा सांगतात :
प्रत्येक पुस्तक वाचले पाहिजे, असे माझे मत नाही. श्री. चंद्रशेखर यांनाही हे ठाऊकच आहे. "पुस्तक वाचणार नाही" पुढे ते ही सुयोग्य पुरवणी जोडतात :
मात्र या आंतरजालीय परीक्षणांनी काय ठोस मुद्दे समोर आणले, ते तरी लेखामध्ये नीट उल्लेखायला हवे होते. मला वाचक-स्वार्थापोटी असे वाटते. मी पुस्तकही वाचले नाही, परीक्षणेही वाचलेली नाहीत. पुस्तक न-वाचता परीक्षणांची तरी ओळख श्री. चंद्रशेखर यांनी मला करून दिली असती, तर मला ते फार उपयोगी झाले असते.
जेम्स लेनच्या पुस्तकाचे खंडन श्री. चंद्रशेखर असे देतात :
त्यास पुष्टी म्हणून "हत्ती आणि दहा आंधळे" हा परिचित दृष्टांत देतात. "साहेब" या शब्दाच्या निंदाव्यंजक उपयोगाने जेम्स लेनबद्दल ही भावना चिथवतात - "स्वाभिमान असला तर या साहेबाच्या पुस्तकाला कचर्याच्या पेटीत टाका."
ज्या प्रकारे हा लेख लिहिला आहे, त्या प्रकारे काही अतिसामान्य आणि अविवक्षित मुद्देच कळून येतात :
१. "हत्ती आंधळ्यांना कधीच कळत नाही" (पण त्यातून असे निघते, की जेम्स लेन नव्हे की राजवाडे नव्हे, कोणालाच संपूर्ण सत्य कळणार नाही. जेम्स लेनच्या राजवाड्यांपेक्षा-अतिशय-आंधळेपणाबद्दल सुस्पष्ट मुद्दा कळत नाही.)
२. चारशे वर्षांचा इतिहास काही महिन्यांत करू नये. (हे खूपच खरे. नेमक्या किती महिन्यांत-वर्षांत करावा?)
३. या पुस्तकात चुकीची माहिती आहे, असे पुण्यातल्या अन्य इतिहासतज्ञांनी सांगितले होते. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. (या इतिहासकारांनी सुद्धा त्या त्या घटनेबद्दल काही महिने-वर्षेच अभ्यास केलेला असणार, पण त्यांच्याकडे साधनसामग्री अधिक भक्कम असावी.) पण असा मुद्दा एका प्रतिसादात सांगण्यासारखा होता. काहीतरी वेगळाच मुद्दा सांगत असल्याचे लेखक म्हणतात. तो मुद्दा काय ते मला कळलेले नाही.
वेगळा मुद्दा
माझ्या लेखात निर्देश केलेल्या वेगळ्या मुद्याचे श्री. धनंजय यांना नीट आकलन झालेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. माझा मुद्दा असा आहे की
जेम्स लेनचे पुस्तक हे शिवाजीवर लिहिलेले नसून शिवाजीच्या कारकीर्दीचा महाराष्ट्र व मराठी माणसावर जो न पुसला जाणारा ठसा उमटला आहे तो शिवाजीच्या खर्या खुर्या कर्तुत्वामुळे की त्याच्या कर्तुत्वाच्या पोवाडेकार व बखरकार यांनी केलेल्या अतिरंजित वर्णनामुळे? या मुद्याची चर्चा आधीच्या धाग्यात झालेली मला तरी आढळली नाही म्हणून हा स्वतंत्र धागा. अन्य मुद्यांची चर्चा श्री. धम्मकलाडू यांच्या धाग्यात झालेलीच आहे.
चन्द्रशेखर
त्यात काय संशय?
कितीही कर्तृत्ववान व्यक्ती असली तरी देवत्व देण्यासाठी सत्यापलाप करावा लागतो. चंद्ररावाचा वंशसंहार, सावत्र भावावर हल्ला, बहुपत्निकत्व, औरंगझेबाकडे मागितलेली माफी (सावरकरांसारखी ;) ), अशी फ्यूडल समाजात केलेली कृत्ये दुर्लक्षून, त्यांऐवजी कल्याणच्या सुभेदाराची सून, न होता शिवाजी अगर तो सुन्नत होती सबकी, पेटार्यातून सुटका, 'आधी खानाने मिठी मारली आणि मग शिवाजीने वाघनखे मारली' असा ठाम दावा, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदवी स्वराज्य, अशा आजच्या समाजाला आवडत्या कल्पना आणाव्या लागतात.
ए बाबा, तू पैले नक्की कर, तुम्हारी समस्या क्या है? नाम, नौकरी की घर?
...
...
...
देखा! तुमने फिरसे समस्या बदल डाली!
-बाबुराव गणपतराव आपटे
बुद्धिभेद
रिकामटेकडेराव, तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. चंद्रशेखर म्हाणतात "श्री. रिकामटेकडा यांच्या निरनिराळ्या प्रतिसादांवरून ते काय सांगू इच्छित आहेत हे सांगणे अवघड आहे." खरंतर दोन्ही चर्चेतील त्यांचे सर्व प्रतिसाद एकत्र वाचल्यास त्यांना काय म्हणायचे आहे हे कळणे फारसे अवघड नाही.
परंतु कृपया ३५० वर्षांपुर्वीच्या घटना आजच्या संदर्भात पाहू नका. उदा. बहुपत्निकत्व ही आज जरी (भारतात) अनैतिक व बेकायदेशीर गोष्ट् असली तरी त्या काळी ते गैर नव्हते. औरंगझेबाकडे माफी मागून राजांनी त्यानंतर त्याच्या दरबारात नोकरी पत्करली नव्हती.
जयेश
होय
धन्यवाद. पण पुरेसे यश नाही हो!
सहमत. म्हणूनच सांगतो की फ्यूडल समाजात, वैयक्तिक हेतूंनी केलेल्या कृत्यांना आजच्या समाजाच्या चौकटीत बसवू नये. आजच्या समाजाने शिवाजीकडे आदर्श/देव म्हणून पाहू नये असेच माझेही म्हणणे आहे. ;)
मॉरल रिलेटिविझमचे मी संपूर्ण समर्थन करतो. संभाजीचे डोळे काढण्यालाही दोष देऊ नये हे तुमचे मत असेलच; ते मला पटते. शत्रूचे हाल करणे त्या काळात गैर नव्हते असे वाचले आहे.
कॉम्पेन्सेशनवरून वाजले त्यांचे! पाच हजारी मनसबदार म्हणून 'ऑनसाईट' पाठविण्याची ऑफर होती.
तुम्ही जितके आक्षेप घेतलेत त्यांना उत्तर दिले आहे. या विषयातील माझे बाकीचे विचार पटले नसतील तर आक्षेप वाचायला आवडेल.
फक्त तुमचेच मत
आजच्या समाजाने शिवाजीकडे आदर्श/देव म्हणून पाहू नये असेच माझेही म्हणणे आहे. ;)
चला शेवटी तुम्हाला काय म्हणायचे होते ते एकदाचे सांगुन मोकळे झालात. खरच, एवढं सरळ व स्पष्ट मत मांडण्यासाठी किती मेहनत घेतलीत हो तुम्ही! आणि दुसरे म्हणजे आजच्या असहिष्णू (आंतरजालीय) समाजात असे धाडसी विधान करण्याला केवढे धैर्य लागते. तुमच तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
परंतु "असेच माझेही" लिहिल्याने थोडा गोंधळलो हो. माझे तर असे बिल्कुल मत नाही. अजून या चर्चेत कुणी असे धाडसी विधान केले असल्यास कृपया जरा निदर्शनास आणाल का.
माझे आवडते संपादक विचारवंत श्री. कुमार केतकरांनी स्टार माझाच्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांबद्दल मांडलेले विचार प्रस्तूत चर्चेच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. उपलब्ध युट्यूब चित्रफितींमध्ये मात्र नेमकी त्याच जागी कात्री लावली दिसते. (संकलक बहुतेक लेन समर्थक असावा ;-) संपुर्ण भाषण मिळते का ते पाहतो. देव नका हो म्हणू मलाही आवडणार नाही. पण आदर्श का मानावा याचे उत्तर केतकरांच्या भाषणात आहे.
जयेश
शेवटी?
मी आधीपासून तसेच सांगायचा प्रयत्न करीत होतो. आमची मांजर कायमच पिशवीबाहेर असते.
"३५० वर्षांपुर्वीच्या घटना आजच्या संदर्भात पहाव्या की नाही?" यावर तुमचे मत मला स्पष्ट झाले नाही.
नेमक्या ठिकाणी कात्री लागलेल्या चित्रफितींतून काय ज्ञान मिळणार? कृपया तुम्ही त्यांचे मत येथे लिहा.
हे पहा
इथे लोक नेहमी पुराव्याचा आग्रह धरतात, म्हणूनच नुसते त्यांचे मत लिहिण्यापेक्षा चित्रफीत शोधत होतो. शेवटी मिळालीच (राजांचीच कृपा म्हणायची :) आता पुन्हा तुम्ही "केतकर कुणी इतिहास संशोधक नव्हेत" असा आक्षेप घेण्यास मो़कळे आहातच.
......
असो इथेच थांबूया, वैयक्तिक काही नाही. मनास लावून घेऊ नका.
आपल्या मताचा आदर राखतो, पटत नसले तरी.
जयेश
समजले नाही
चालू द्या की!
डिट्टो.
धन्यवाद पण पटले नाही. मला पटत नाही त्या मताला मी (तात्पुरते) चूक म्हणतो. चुकीच्या मताचा आदर करणे हा स्वतःच्या अकलेचा अनादर आहे. मताचा आदर न करतासुद्धा मतधारी व्यक्तीचा आदर करावा (या व्यक्तीचे मत बदलू शकेल अशी आशा ठेवावी) असे मला वाटते.
चंद्रराव मोरे आणि विश्वासघात
शिवाजीने मोर्याला विश्वासघाताने मारले ना?
मी वाचलेली या प्रकरणाची हकीकत अशी आहे. शिवाजीराजांनी चंद्ररावाला "शंकरशंभूच्या कृपेने आम्ही इथले राजे आहोत तेव्हा तुम्ही शरण या" असा निरोप पाठवल्यावर त्याने बरेच मग्रूरीचे उत्तर दिले. "आपल्या घरात बसून राजा म्हणवून घेतल्याने कोणी राजा होत नाही. यायचे तर जरूर या, आपल्यासाठी दारूगोळा मौजूद आहे. जावळी जिंकणे सोपे नाही हे लक्षात ठेवा. येता जावली जाता गोवली. आमचे दैवत श्रीरट्टमहाबळेश्वर." त्यानंतर शिवाजीराजांनी जावळीच्या जंगलात घुसून त्याचा पराभव केला. चंद्ररावाला अटकेत ठेवले. पण अटकेत असतानाही त्याने शत्रूला (नक्की माहिती नाही, बहुधा आदिलशहाला) मदतीसाठी लिहिलेली पत्रे पकडली गेल्यावर त्याला मारले. या लढाईमध्ये मुरारबाजी देशपांडे हा चांगला लढवय्या शिवाजीराजांना मिळाला.
या सगळ्या प्रकरणात विश्वासघात कुठे आला समजत नाही.
आता नक्की आठवत नाही, पण असेही वाचले होते की ज्याला शिवाजीने मारले तो "चंद्रराव" (हा किताब आहे) झाला तोसुद्धा शिवाजी - जिजाबाईच्या कृपेने. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्याच्या चुलत्याने गादी बळकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हा तंटा सोडवण्यासाठी जिजाबाई- शिवाजीकडे आला होता आणि या दोघांनी "त्या"ला चंद्रराव केले.
विनायक
सभासदाची बखर
म्हणजे त्यांना वाटाघाटींसाठी जाऊन मारले. पुढे दिले आहे की हणमंतराव मोरेला सोयरिकीचे नाते लावून एकांतात बोलावून मारले. इतरत्र कोठेतरी वाचले आहे की जावळीत मोरे उरले नाहीत. त्यांची अर्भकेही मारली. बाकीच्यांना पळून जावे लागले.
अफझलखानाने आधी गळा धरला की शिवाजीने अनप्रवोक्ड वाघनखे मारली तेही माहिती नाही.