उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य
सहज
August 30, 2010 - 7:08 am
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
उपक्रमावरच्या जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!
दुवे:
Comments
माफ करा, पण
माफ करा, पण या चित्रफितीत इतके अंतर्गत विरोध आहेत, की यातील "पुरावे" एकमेकांचे खंडन करतात, असे वाटते.
- - -
(बायबलमधील नूअचा पूर झाल्याचे पुरावे, आणि मूसाने लाल समुद्राला दुभंगले त्यावेळी मोठे वादळ झाले हा ऐतिहासिक पुरावा... "आपले ओपन माइंड आहे" म्हणून असे किती वेगवेगळे लेख/चित्रफिती मुळात तपासायला पाहिजे...)
नक्की काय सांगितलं आहे?
मी इतिहासाचा तज्ञ नाही. फक्त त्या व्हिडिओत काय दिलं आहे, त्याविषयी मला काय वाटतं हे लिहितो आहे.
व्हिडिओ बघितला. पहिली बारा ते पंधरा मिनिटं कृष्णा कॉन्शसनेसवाले कृष्णाविषयी सांगतात. हा भाग पाश्चात्यांसाठी तयार केलेला दिसतो. टाळ्य आहे.
इतिहासकारांच्या, व संशोधकांच्या साउंडबायटी आहेत, मध्ये मध्ये उगाच आय कॅंडी म्हणून नाच, मंत्र वगैरे टाकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग शेवटी आहे - त्यात एक खगोलशास्त्रज्ञ ग्रहगोलांच्या स्थितीवरून तारीख ठरवतो. त्यात निवेदकाचा 'शनिच्या भ्रमणावरून युद्धं प्रेडिक्ट केली जाऊ शकतात' वगैरे भंपकपणा आल्यावर पुढे जाववेना, पण तरी बघितला व्हिडिओ...
माझ्या मते मुळात कृष्ण नावाची व्यक्ती होती की नाही हा प्रश्न नसून लोक कृष्णाने केलेल्या ज्या ज्या गोष्टींविषयी विश्वास ठेवतात त्या प्रत्यक्ष एकाच व्यक्तीने केल्या की नाही हा आहे. महत्त्वाच्या प्रश्नाला ही डॉक्युमेंटरी स्पर्शही करत नाही. केवळ कृष्ण नावाचं कोणी होऊन गेलं की नाही यावरच (काहीसा भोंगळ) ऊहापोह करते.
व्हिडिओचं सार खालीलप्रमाणे.
महाभारत झालं, महाभारतात कृष्णाचा उल्लेख आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात होता.
-सरस्वती होती यावरून सिद्ध होतं की महाभारत घडलं
-कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काही हाडं सापडली.
-ग्रहांच्या परिस्थितीवरून सुमारे 3000 बीसी मध्ये ते घडलं असं एक खगोलशास्त्रज्ञ सांगतो.
-लिव्हिंग ट्रॅडिशन हा शब्द इतक्या वेळा वापरलेला आहे... की त्यातून लोकांचा विश्वास आहे म्हणून कृष्ण अस्तित्वात असावा असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर पुरावे
-150 बीसीला कृष्णाचा शिक्का आहे यावरून कृष्ण नावाची कोणीतरी देवसदृश प्रतिमा अस्तित्वात होती हे सिद्ध होतं.
-द्वारकेच्या जागी पाण्याखाली गेलेलं एक शहर सापडलं.
नदी आहे म्हणून महाभारत घडलं हा संबंध कळला नाही. तसंच हाडं योद्ध्यांची असू शकतील अशा तर्कापलिकडे काहीच नाही. ती नसूही शकतील.
जय मध्ये सांगितलेलं युदध् घडलं असावं हा तर्क मान्य करायला काहीच हरकत नाही. ते ज्याकाळी झालं त्याकाळी कृष्ण नावाचं कोणीतरी होतं यात विशेष काय सांगितलं आहे ते कळलं नाही. पण महाभारतातल्या कृष्णानेच गीता सांगितली असंही सिद्ध होत नाही. हे म्हणजे कोणीतरी घाशीराम कोतवाल नाटकाची मूळ प्रत काही हजार वर्षांनी शोधून नाना फडणवीस होता व तो बाईलवेडा होता असं सिद्ध करण्यासारखं आहे.
महाभारताच्या श्लोकांच्या आधारावरून एक्झॅक्ट आकाश त्यावेळचं उभं करणं, त्यावरून तारखा काढणं हे कितपत रास्त आहे कळत नाही. मुळात तो इतिहास व काव्य याचं मिश्रण आहे. त्यातली वर्णनं कुठच्यातरी एका वर्षाला लागू होतात यावरून काहीच सिद्ध होत नाही. मुळात कथेतलं एक कॅरेक्टर दुसऱ्याला त्या त्या ग्रहीय घटना दुश्चिह्न म्हणून सांगतो. त्यावेळी दुश्चिह्न म्हणून मान्यता पावलेलं काहीही कवी सांगेल. मग ती वर्णनं खरी आहेत (कविकल्पना नाही) हे गृहित धरून ते घडलेलं वर्ष शोधायचं आणि त्यावरून मुळातलं गृहितक सत्य ठरल्याचं सिद्ध करणं हे चक्रीय तर्कट (सर्क्युलर लॉजिक) आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
सारांशाबद्दल धन्यु...!
इतिहास व काव्य याचं मिश्रण म्हणजे महाभारत हे पटते. बाकी, श्रीकृष्ण ही व्यक्ती इतिहासात झाली असेल, असे वाटते. गोकुळ, मथुरा, द्वारका अशी काही नावं आली श्रीकृष्णाशी संबंधित काही तरी आहे असे वाटायला लागते. अर्थात तोडफोडीमुळे इतिहासातील खाणाखुणा आता शोधता येणार नाही. तेव्हा, महाभारत,भागवत व जैमिनी अश्वमेध अशी जी काही ग्रंथनामे सांगितली जातात त्यात श्रीकृष्णचरित्र आणि त्या निमित्ताने येणारी वर्णने यांची मांडामांड केली म्हणजे व्यक्ती म्हणून सत्य-असत्याकडे जाता येईल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
कृष्णजन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा.
कृष्णजन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा.