टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या खेळण्यांच्या जगात..

टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या खेळण्यांच्या जगात..

लहान मुला-मुलींच वेगळच असं एक अद्भुत जग असतं. या जगात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्यालाही लहानातलं लहान मूल व्हाव लागतं. त्यात एकदा प्रवेश केल्यानंतर स्वत:ची आयडेंटिटी पूर्णपणे विसरून त्या जगाचे नीती-नियम, कायदे-कानून आत्मसात करावे लागतात. तुमच्यासमोर खोट खोट चहाचा कप ठेवल्यानंतर तुम्ही ते गटागटा पिवून संपवलेलं त्याना चालणार नाही. बशीत ओतून, फुंकून, हळू हळू चहा पिणे अपेक्षित असते. तुमच्या खोट्या ताटातील (खोटी) चपाती खाताना तुकडे करून भाजीला लावून खाण्याचा अभिनय करावा लागतो. तसे न केल्यास वेंधळ्यासारखे करू नका, एवढही जमत नाही हा शेरा ऐकावा लागतो. त्यांच्या सोबतीची बाहुली, ठकी मावशी, टेडी बीर त्यांना खरे खुरे वाटतात. ते त्यांचे जिवंत सवंगडी असतात. परंतु आताच्या शहरी धकाधकीत दोन-अडीच वर्षापासून रतीब घातल्यासारखे प्रिमॉंटेसरी, मॉंटेसरी, किंडरगार्टन (लोअर, अप्पर) पहिली, दुसरी, .....सहावी, सातवी या गदारोळात त्यांचे बालपण केव्हा हरवून जाते हेच कळेनासे झाले आहे. त्याबद्दल कुणालाही ना खंत, ना खेद!


परंतु अशाही परिस्थितीत काही सुज्ञ, मुलांमुलींतील निरागसपणा, कल्पनारम्यता, सर्जनशीलता टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत असतात. कुठेतरी शेवटच्या पानावर त्यांच्याबद्दलची एखादी छोटीशी बातमी असते. लहानांच जग टिकवण्यासाठी हे ' वेडे' प्रयत्नशील असतात. अशाच काही मोजक्या सुज्ञ 'वेड्यां' पैकी आयुकाच्या कंपाउंडमधील मुक्तांगण विज्ञान शोधिकेत कार्य करत असलेल्या लहानांच्या ध्यासात दिवस-रात्र गुंतलेले अरविंद गुप्ता यांचे नाव व कार्य बालशिक्षण क्षेत्राशी संबंधित (किमान पुण्यात! ) असलेल्यांना नक्कीच माहित असेल. काहींचा त्यांच्याशी परिचयही असेल. गेली 20 -25 वर्षे त्यांची ही धडफड चालू आहे.
आधुनिक जीवनशैलीचा अपरिहार्य अंग म्हणून आपल्याला वापरून झाल्यानंतरच्या टाकावू वस्तूंच्याकडे बघावे लागत आहे. पर्यावरण रक्षणातील त्या मूलभूत चार 'R' पैकी refuse करू शकत नाही, reuse जमत नाही, recycle ची सुविधा नाही, व repair शक्य नाही, अशी अवस्था असल्यामुळे टाकावू वस्तू साठत जात आहेत. बाटली बंद पाणी पिऊन झाल्यानंतर प्लॅस्टिकची बाटली टाकावू ठरते. फ्रुटी ज्यूस पिऊन झाल्यानंतर टेट्रापॅकचे वेष्टन फेकण्यालायक ठरते. टूथ पेस्ट, शेव्हिंग क्रीम, औषधी मलम संपल्यानंतरची त्या (वेड्यावाकड्या!) ट्यूबचे काय करावे हा प्रश्न उभा राहतो. प्रत्येक वस्तू चकचकीत अल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेली असली तरच ती वस्तू शुद्ध, सकस, उपयुक्त, बिनधोक अशी मानसिकता बळावलेली असल्यामुळे उपयुक्त वस्तूंपेक्षा वेष्टनासाठीच तंत्रज्ञान राबविले जात आहे व त्याची पुरेपूर किंमतही वसूल केली जात आहे. परंतु या आयआयटी प्रशिक्षित इंजिनीयरने काही प्रमाणात अशा टाकावू वस्तूंचा वापर करत लहान मुलांमुलींसाठी कल्पनारम्य खेळणींचा खजिनाच उभा केला आहे. प्लॅस्टिक बाटल्या, रद्दीपेपर, लहान-मोठे-जाड-बारीक स्ट्रॉ, शाई संपलेले रिफिल्स, मोडके तुटके पेन्स, जुनी मासिकं, पिव्हिसी पाइप्स, इंजेक्शन सिरिंज, फेकण्या लायकीचे सॅलाइन ट्यूब्स, सायकल ट्यूब्स, सायकलीच्या चाकाचे स्पोक्स, सॉसच्या बाटलीची झाकणं, पेपर क्लिप्स, टाकावू सीडी, आरशाचे तुकडे, जुनी आमंत्रण पत्रिका, सुतळी, दोरा .... काहीही असू दे, अरविंदच्या दृष्टीने ती खेळणी बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
इतकी वर्ष तो लहानापर्यंत पोचण्यासाठी जमेल त्या ठिकाणी जावून खेळणींची प्रात्यक्षिके करून दाखवत असे. तो व त्याचे सहकारी मित्र, पुणे वा पुण्याच्या जवळपासच्या शाळांना भेटी देवून कार्यक्रम करत असत. (व अजूनही करतात.) विद्यार्थ्यांसाठी वेगळे काही करावे या विचाराने प्रेरित होऊन शाळांचे काही शिक्षक स्वत:हून गुप्ताशी वेळ ठरवून विद्यार्थ्यांना आयुकाच्या शोधिकेत दिवसभरासाठी आणून सोडतात. ती मुलं सर्वस्वी वेगळ्या अशा अद्भुत जगात दिवसभर वावरत असतात. खेळतात, बागडतात, खेळणी हाताळतात, जमल्यास खेळणी बनवतात. या प्रकारच्या प्रात्यक्षिकेला काही मर्यादा पडतात. फारच कमी विद्यार्थापर्यंत पोचता येते. या खेळणींची त्यानी लिहिलेली पुस्तकं अनेक भारतीय भाषात अनुवादित झालेले असले तरी प्रात्यक्षिकांचा दृष्य भाग दाखवण्यास पुस्तकं असमर्थ ठरतात.
परंतु आता त्याला आपल्या क्षितिजाच्या विस्तारासाठी इंटरनेटवरील यूट्यूब यंत्रणा कामी येत आहे.
गुप्ता यांचे इंटरनेटवरील संकेतस्थळ उघडल्यास http://www.arvindguptatoys.com/films.html इंग्रजी (180), हिंदी (180), मराठी (150), कन्नड (150), मलयाळम (15), तमिळ (25) भाषिकांसाठी खेळणीवरील यूट्यूब विडिओ तयार आहेत. याशिवाय उरिया, पंजाबी, जपानीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषेतूनही यातील काही खेळणींच्या प्रात्यक्षिकांच्या विडिओसाठी आवाज मिळाला आहे. एका क्लिकने आपण ती विडियो बघू शकतो. बहुतांश विडिओ 1ते 3 मिनिटांचे असून प्रत्येकांना इंग्रजीत सबटायटल्स आहेत. तो व त्याच्या मित्रपरिवारातील इतर भाषिकांनी त्या त्या भाषेमध्ये प्रात्यक्षिक समजावून सांगतात. या सर्व गोष्टी यूजर्स फ्रेंड्ली असल्यामुळे खेळणी बनवणे सोपे होत आहे. या संकेतस्थळाला भरपूर हिट्स मिळत आहेत.
सूचनेप्रमाणे रद्दीपेपरची घडी घालत गेल्यास त्यापासून 15-20 प्रकारची खेळण्या बनवता येतात. पेपर क्लिपला वाकडे करून वळवत गेल्यास त्याची भिंगरी म्हणून खेळता येते. बलूनमध्ये हवा भरून त्यास इतर काही वस्तू जोडून त्याचे रॉकेट बनवता येते. रंगीत कागदांचे तुकडे वापरून कागदी माशांचा पाऊस पाडता येते. जुन्या मासिकातील रंगी बेरंगी कागदांची घडी घालून भिंतीवर टांगण्यासाठी एक छान फुलपाखराचे मॉडेल बनवता येते. सुतळी, डिंक, व रंगीत कागद वापरून खऱ्या खुऱ्या झाडासारखे दिसणारे झाड आपण बनवू शकतो; त्याला कॉरुगेटेड कागदांची पानं आहेत; कागदी पक्षी व दोऱ्याचे घरटे त्यावर आहे.दोन - चार वाकडे स्ट्रॉ वापरून तोँडात धरून फुंकल्यास स्ट्रॉ गरागरा फिरू लागतो. सिरिंज, सलाइन ट्यूब, झाकणं इत्यादी वापरून liveबनवू शकतो; जेसिबी चक्क घास उचलून दुसरीकडे टाकू शकतो; पुढे मागे, उजवीकडे वा डावीकडे तो फिरू शकतो.वापरून जेसिबी कलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून कित्येक प्रकारच्या खेळण्यांचे विडिओ या संग्रहात आहेत. या बाटल्यापासून घराच्या व्हरांड्यात टांगता येण्यासारखी फुलदाणी, कारंजी, पिचकारी, स्प्रिंकलर, पंप,असे अनेक खेळणी ब थर्मास फ्लास्क" बनवलेले आहेत. कटर, कात्री, सेलोटेप, यांचा वापर करून अशा बाटल्यापासून फॅन, मोटर, जनरेटर, भेटवस्तू ठेवण्यासाठी आकर्षक वेष्टन करता येते. विद्युत जनरेटर्सचे अनेक खेळणी आहेत. त्या केवळ स्टॅटिक मॉडेल्स नसून LED बल्ब उजळण्याएवढी ऊर्जा त्यात तयार होते. ताटलीतील पाणी, व आरश्याच्या एका तुकड्याच्या सहाय्याने त्यांनी इंद्रधनु्ष्यातील रंग दाखवणारा प्रयोग केला आहे. या खेळणीत स्ट्रॉपासून बनवलेली शिट्टी आहे, त्याची बासरी बनवली आहे, एवढेच नव्हे तर तुतारीसुद्धा बनवली आहे. नारळाच्या करवंटीपासून एक सुंदर प्राणी वा आंब्याची वाळलेली कोय व काडीपेटीतील चार काड्यांपासून प्राणी बनवले आहेत. चुंबकांच्या सहाय्याने पेन्सिल तरंगते ठेऊ शकतो.फ्रुटीच्या टेट्रापॅकच्या वेष्टनापासून बनवलेले उंदिरमामा आहेत. पिंपळाच्या पानापासून बनवलेले मांजर व त्याची पिलावळ आहेत.
याच्या खजिन्यात विज्ञानाचे धडे शिकवणारे अनेक खेळणी आहेत. eddy करंट म्हणजे नेमके काय असते convection करंट म्हणजे काय, fuzzy लॉजिक नेमके काय हे सांगू शकणारी प्रात्यक्षिके आहेत. लोहचुंबकांचा वापर करून यात अनेक प्रकारची खेळणी बनवलेले आहेत. फेनॉल्फ्थलिन पावडर, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, ऍसिटोन, सोडियम हायड्रॉक्साइड ग्लिसरिन, लेड नायट्रेट इ.इ रासायनिक पदार्थ वापरून काही सोपे व विलक्षण प्रयोगांचे विडिओ आहेत. अशा प्रकारच्या अनेक प्रयोगांची, खेळण्यांची यूट्यूब विडिओ या संस्थळावर आहेत.
अरविंद गुप्ता व त्यांच्या सहकार्यांनी हे सर्व चित्रण अगदी सोप्या व सहजपणे उपलब्ध असलेल्या संगणकीय गोष्टी वापरून केल्या आहेत.डिजिटल कॅमेरा वापरून प्रात्यक्षिकेचे चित्रण करतात. विंडोज मूव्ही मेकर सॉफ्टवेर वापरून प्रत्येकाची सायलेंट फिल्म तयार होते. व त्यानंतर हव्या त्या भाषेत आवाज देऊन विडिओ तयार केली जाते व अशा प्रकारे पूर्ण झालेली फिल्म यूट्यूबवर अपलोड केली जाते. यासाठी त्यांना खर्चिक अशा कुठल्याही यंत्रणेची गरज भासली नाही, स्टुडिओ नाही, डार्करूम नाही, साउंडप्रूफ खोली नाही. इंटरनेटची सुविधा नसलेल्यांच्यासाठी या खेळण्यांची डीव्हीडी तयार केली आहे. अरविंद गुप्तांशी संपर्क साधून त्या मिळवता येतील.
कित्येक पालकांना आपली मुलं खेळण्यात रममाण व्हावी असे मनापासून वाटत असले तरी लेगो सारख्या खेळणी अत्यंत महाग म्हणून विकत घेता येत नाहीत (व विकत घेतले तरी मोडतील वा हरवतील या सबबीखाली मुला-मुलींना हात लावू दिले जात नाहीत!); व भारतीय किंवा चायनीज बनावटीची खेळणी दुकानाबाहेर पडल्या पडल्या निकामी होतात म्हणून घ्यावेसे वाटत नाहीत. त्यामुळे गुप्तांच्या खेळण्यांच्या दुनियेत प्रवेश करून एखादे दुसरे खेळणी बनवण्याचे प्रयत्न करण्यास हरकत नसावी.
शोभा भागवत यांनी अरविंद गुप्तावर लिहिलेल्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे "अनेक जण म्हणतात तसा हा खरंच 'वेडा' म्हणून आहे आणि असे वेडे आहेत म्हणूनच जग सुंदर आहे ! "
(अरविंद गुप्ता यांना पुढील महिन्यात हैदराबाद येथे एका समारंभात Third World Academy of SciencesTriest, Italy तर्फे TWSR Regional Prize for Public Understanding of Popular Science, 2010 देवून सन्मानित केले जात आहे. यानिमित्ताने त्यांना हार्दिक अभिनंदन !)

Comments

कौतुकास्पद काम

श्री. अरविंद गुप्ता यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांचे संकेतस्थळ जरूर बघावे.

दुरुस्ती

सहाव्या परिच्छेदातील या वाक्यात

सिरिंजझाकणं इत्यादी वापरून, सलाइन ट्यूब, liveबनवू शकतो; जेसिबी चक्क घास उचलून दुसरीकडे टाकू शकतो; पुढे मागे, उजवीकडे वा डावीकडे तो फिरू शकतो.वापरून जेसिबी कलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून कित्येक प्रकारच्या खेळण्यांचे विडिओ या संग्रहात आहेत.

अशी दुरुस्ती हवी:

सिरिंज झाकणं इत्यादी वापरून, सलाइन ट्यूब, वापरून live जेसिबी बनवू शकतो; जेसिबी चक्क घास उचलून दुसरीकडे टाकू शकतो; पुढे मागे, उजवीकडे वा डावीकडे तो फिरू शकतो. वापरून फेकलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून कित्येक प्रकारच्या खेळण्यांचे विडिओ या संग्रहात आहेत.

शक्य होत असल्यास कृपया संपादकांनी ही दुरुस्ती करावी.

अभिनंदन

Third World Academy of SciencesTriest, Italy ने अरविंद गुप्तांची दखल घेतल्याबद्दल अभिनंदन

गुप्ता यांचे इंटरनेटवरील संकेतस्थळ उघडल्यास http://www.arvindguptatoys.com/films.html इंग्रजी (180), हिंदी (180), मराठी (150), कन्नड (150), मलयाळम (15), तमिळ (25) भाषिकांसाठी खेळणीवरील यूट्यूब विडिओ तयार आहेत.

यातील कन्नड रुपांतरणा साठी आपण दिलेल्या योगदाना बद्दलही अभिनंदन.
प्रकाश घाटपांडे

सुंदर चलचित्रे

अरविंद गुप्तांची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
चलचित्रे अगदी छान बनवली आहेत. काहीही फाफट पसारा नाही नेमके तेच सांगितले आहे. अर्थात जेवडे लिलया करून दाखवले आहे तेवडे ते सहज जमेल असे नाही. मात्र हे आपण सहज करू शकू अशी उर्मी देणारे आहे. यातील काही साहित्य मात्र विकत आणावे लागेल असे वाटले. पण ते फारसे महत्वाचे नाही.

यावरून आठवले. नागपूरकडे सुरेश अगरवाल टाकाऊ वस्तुंपासूनचे एक विज्ञान प्रदर्शन (फिरते) भरवायचे. विवेक मॉण्टेरो यांची वैज्ञानिक खेळणी (विकत मिळणारी) पण आठवली.

प्रमोद

अभिनंदन

गुप्ता यांच्या उपक्रमाची माहित नसलेल्यांना ओळख करुन दिल्याबद्दल तुमचे व असा जगावेगळा उपक्रम करीत असल्याबद्दल अरविंद गुप्ता यांचे अभिनंदन. ग्रामीण भागातील मुलांना इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध नसल्याने या चित्रफिती सीडी किंवा डीव्हीडी वर उपलब्ध करुन दिल्यास सोयीचे होईल असे वाटते. पुण्यात आल्यावर गुप्तांना भेटण्याचा नक्की प्रयत्न करेन. मुंबईतील नवनिर्मिती ही संस्था सुद्धा शिक्षण रंजक व्हावं म्हणून शैक्षणिक खेळणी बनविते.
जयेश

कौतुकास्पद

गुप्ता यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांच्याविषयी ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

अभिनंदन

अरविंद गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचे नाव बरेचदा ऐकले होते, लेखामुळे त्यांच्या कामाची ओळख झाली. अनेक आभार.

अवांतर : Third World Academy of SciencesTriest, यामध्ये Sciences,Trieste असे हवे. इटली आणि स्लोव्हेनियाच्या सीमेवरील त्रिएस्ते हे एक निसर्गरम्य शहर आहे.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

आभार, शुभेच्छा व अभिनंदन

गुप्तांबद्दल माहिती नव्हती.. ती करून दिल्याबद्दल श्री. नानावटी यांचे अनेक आभार
तसेच श्री. गुप्ता यांना शुभेच्छा व अभिनंदन

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उत्तम+

आधीच्या लेखासारखाच हा लेखही अतिशय आवडला. लेख ढकलला आहे. अधिकाधिक वाचकांनी ढकलावा असे सुचवतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर