शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

"शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.

सगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणी घरफोड करून आत घुसलेले घूसखोर व त्यांना आज्ञा देणार्‍या त्यांच्या अधिकार्‍यांपर्यंत जुडलेल्या संबंधांबद्दल लपवालपवी करून त्यांना (आणि स्वत:ला) वाचविण्याचा केलेला प्रयत्न 'वॉशिंग्टन पोस्ट'चे बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टाईन या वार्ताहारांनी उघडकीस आणला. फेल्ट यांनीच त्यांना 'व्हाईट हाऊस'मधील अंतस्थ बातम्या पुरविल्या. माझ्या माहितीनुसार चांगल्या उद्दिष्टांसाठी असे करणारे ते सर्वात जास्त प्रसिद्ध शिट्टीवादक होते. (ते २००८साली निवर्तले)

अलीकडे खूप प्रसिद्धी मिळालेले शिट्टीवादनाचे उदाहरण आहे इराकच्या 'अल गरीब' तुरुंगात अमेरिकन सैनिकांनी इराकी कैद्यांचा छळ केल्याच्या बातम्या आणि छायचित्रें! तिथे तैनात असलेल्या सैनिकांनीच, मुख्यतः सार्जंट जोसेफ डार्बी यांनी, ही माहिती वार्ताहारांना पुरविली होती कारण या सैनिकांना कैद्यांना असे छळणे आवडले नव्हते. असे करणे देशद्रोहही म्हणता येईल कारण ज्या सैनिकांनी या बातम्या पुरविल्या त्यांना ज्या वृत्तपत्रांनी/वाहिन्यांनी आपल्या वृत्तपत्राचा खप किंवा वाहिनीचे 'रेटिंग' सुधारण्यासाठी या बातम्या वापरल्या त्यांनी पैसेही दिले असतील. (माझ्या दृष्टिकोनातून त्याहूनही महत्वाचा मुद्दा हा कीं ज्या कैद्यांचा छळ केला गेला ते कांहीं 'संत' किंवा 'महात्मा' नव्हते, तर सद्दाम यांचे क्रूरकर्मा सहाय्यकच होते! (याबाबत दुमत होऊ शकेल)

अलीकडेच 'विकीलीक्स' या संस्थळावर असाच सनसनाटी गौप्यस्फोट झाला! त्यात अमेरिकन सैन्यातर्फे घडलेल्या निष्पाप अफगाणी मुलकी नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आणि त्यातच पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या दुटप्पी वागणुकीच्याही बातम्या होता. या बातम्यानुसार अमेरिकेकडून मदत घेत असतांना या अधिकार्‍यांनी अतिरेक्यांनाही मदत केली आणि दहशतवादाच्या निर्यातीत त्यांचा हातभाग होता असे आरोप होते. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी बेंगळूरूमध्ये जे वक्तव्य केले (व ज्यामुळे पाकिस्तानी सरकार, लष्कर, ISI आणि मीडिया यांनी जो गदारोळ माजवला) ते याच माहितीच्या आधारावर होते.

'डॉन' नावाचे कराचीहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र मी सातत्याने नेटवर वाचतो. परवा त्यातला अग्रलेख वाचला व मला तो आवडला. त्याची लिंक आहे http://tinyurl.com/23k6h5l

अग्रलेखात ‘विकीलीक्स’खेरीज 'पेंटॅगॉन पेपर्स'चाही उल्लेख केला आहे. 'पेंटॅगॉन पेपर्स'मध्ये एकामागून एक राज्यावर आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्य़क्षांची घटनाबाह्य वागणूक उघडकीला आणली होती आणि अधिकार ग्रहण करतांना स्वतः घेतलेल्या शपथेचा त्यांनी स्वतःच कसा भंग केला आणि आपल्या सहाय्यकांनाही तसे करण्यास कसे उद्युक्त केले हे दाखविलेले होते. मी रूपांतर करीत असलेल्या "न्यूक्लियर डिसेप्शन"मध्येही हाच प्रकार अनेक अमेरिकन राष्ट्रध्य्क्षांनी केला आहे.
अग्रलेखाच्या शेवटी "असे शिट्टीवादक पाकिस्तानात दिसत नाहींत" याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्याने प्रभावित होऊन मी ‘डॉन’ला पत्र लिहिले होते ते त्यांनी थोडीशी कात्री लावून प्रसिद्ध केले (http://tinyurl.com/34ctdhs)

मी लिहिले होते कीं ज्या देशातील लोक त्यांच्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान (नीशाँ-इ-इम्तियाझ) दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांकडून दोन वेगवेगळ्या वेळी मिळविणार्‍या त्यांच्या सर्वात दैदिप्यमान आणि नामवंत सुपुत्राला, डॉ. अब्दुल कादिर खान यांना, जेंव्हां हुकुमशहा मुशर्रफ यांनी स्वतःची चामडी बचावण्यासाठी अमेरिकेच्या संगनमताने ‘बळीचा बकरा’ बनवून त्या सुपुत्राचा सर्वनाश केला तरीही 'हूँ का चूँ' न करता सहन करतात त्या देशात शिट्टीवादक कसे निर्माण होतील? आणि डॉ. खान यांची चूक काय होती? तर त्यांनी इराण, उ.कोरिया, लिबियासारख्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान देण्याचा मुशर्रफसह बर्‍याच पाकिस्तानी राज्यकर्त्यांनीच दिलेला हुकूम (कदाचित् स्वखुषीने) पाळला हीच ना? मग त्याची शिक्षा एकट्या डॉ. खाननाच का? एकीकडे सर्व समस्यांच्या मुळाशी असलेले मुशर्रफ मजा मारताहेत आणि डॉ. खान मात्र स्थानबद्ध! ही माहितीही न्यूक्लियर डिसेप्शन या पुस्तकात आहे.

आणि हे सारे मुकाट्याने सहन करणारा पाकिस्तान लष्कराविरुद्ध, आणि त्यातही ISI सारख्या संघटनेविरुद्ध, कशी शिट्टी वाजवू शकतो? पाकिस्तानमध्ये जर आता नुकतीच पुनःप्रस्थापित झालेली लोकशाही अशीच निरंतर नांदत राहिली तर कदाचित २०२५पर्यंत तिथले लोक शिट्टी वाजवायची हिंमत करतील.

सध्या न्यूक्लियर डिसेप्शनचे मी केलेले रूपांतर ई-सकाळ पैलतीर या सदरात मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होत असून हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने वाचलेच पाहिजे असेही मी डॉन ला लिहिलेल्या पत्रात मुद्दाम नमूद केले आहे.

Comments

वाचनीय

लेखमाला अतिशय वाचनीय होणार आहे. आज पहिले प्रकरण वाचून संपवले. आंतरजालावर याहून जास्त एका दिवशी वाचणे कठीण आहे.----वाचक्नवी

रोचक

रोचक लेख.
मिडियाच्या द्वारे आपल्याला जे कळते त्याबद्दल बरेचदा शंका वाटते. परवाच कुठेतरी वाचले की निक्सन यांच्या आधीही बर्‍याचा राष्ट्राध्याक्षांनी यंत्रणेचा गैरवापर केला होता. केनेडी हत्याहे दुसरे उदाहरण. आपल्यासमोर जे येते ते हिमनगाचे टोक आहे असे वाटायला लागले आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

जुनाच प्रश्न

एखादा शिट्टीवादक देशद्राही आहे का हे कशावरून ठरवावे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर