शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.

बीजिंग ओलम्पिक (८/८/८ ८.८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,
शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०, १ मे ला जगासाठी खुले झाले, जगातील १७५ पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला आहे. हंग्पू नदीच्या काठी, ५ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर मध्ये बसलेले हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे.
चांगले शहर, चांगले जीवन (BETTER CITY, BETTER LIFE) ह्या तत्वावर असलेल्या ह्या प्रदर्शनाच्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीत जगभरातून अंदाजे ७ करोड लोक भेट देतील अशी चीन ची अपेक्षा आहे. ह्या प्रदर्शनाची तारीफ करावी तेवढी कमीच.

प्रदर्शनाचे अधिकृत संकेत स्थळ :

मागे माझ्या एक मित्राने सहकुटुंब ह्या प्रदर्शनास भेट दिली. त्याने काही काढलेले फोटो (त्याच्या सहमतीने) डकवत आहे.
जागतिक प्रदर्शन १
जागतिक प्रदर्शन २
जागतिक प्रदर्शन ३
जागतिक प्रदर्शन ४

त्याच्या कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रदर्शन एकदम झक्कास आहे. खूप गर्दी असते, त्यामुळे दिवसभरात ३-४ च विभाग (नावाजलेल्या देशांचे) पाहून होतात.
सर्व देशांनी उत्तम कलाकुसरी तसेच आपापले तंत्रज्ञान दाखविण्याचा प्रयत्न केला आहे (भारत वगळता).

भारताने जे प्रदर्शन जगापुढे ठेवले आहे ते बघता आपले प्रदर्शन किती दरिद्री आहे हे आपणास प्रत्यक्ष बघितल्यावरच कळेल.
(अशी काही उदाहरणे दिली आहेत त्यांनी कि ती इथे सांगणे ठीक नव्हे).
चक्क धंदा मांडला आहे काही ठिकाणी. तंदुरी काय, सामोसे काय, रस्तावर जसे विकायला ठेवतात तसे ठेवले आहे.
नट नट्यांचे फोटो, देवांच्या मुर्त्या पुढे मांडलेले दिसते, (ह्यात खरतर वावगे काय नाही पण ती जागा योग्य नव्हे.)
आणि ह्या मुर्त्या आणि बाकीच बांबूचे , किव्वा इतर प्रदर्शनीय वस्तू घासाघीस करून विकल्या जात आहेत ते वेगळेच
(जसा आपला तुळशी बाजार )
जिथे सार जग येणार तिथे भारताचे विज्ञान, संगणक आणि इतर क्षेत्रात घेतलेली झेप, भावी लक्ष्य हेच दिसावयास हवे होते,
भारताने एक लेसर शो ठेवला आहे पण तो दोन फूट सुद्धा नाही, एखाद्या विस्तृत खोलीमध्ये फूट भर लेसर शो, काय डोमल कळणार आहे लोकांना.
त्यामुळे त्या लेसर शो मध्ये काय दाखविला आहे ते कळत सुद्धा नाही कोणाला.
योग दाखविणारी मंडळी योग सुद्धा धड करत नव्हती, एखाद्या नवख्या प्रमाणे सारखा तोल जात असे त्यांचा.
आपल्या पाटलीन बाई सुद्धा जाऊन तारे तोडून आल्या तिथे.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर पाकिस्तानचे प्रदर्शन सुद्धा चांगले होते भारतापुढे.
सौदी अरेबियाचा विभाग बघण्यासाठी १०-१२ तास लोक रांगेत उभे राहतात, आणि त्यांचा लेसर शो बघून म्हणतात कि डोळ्याचे पारणे फिटले (अर्थात त्यांच्या भाषेत).

बाकी वरील फोटो चघळता चघळता हे लेख देखील तोंडी लावणे.
शांघायचा सामोसा!
India's shoddy samosa & shawl show at Shanghai World Expo

Comments

शांघाय प्रदर्शनातला भारताचा स्टॉल

कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात हे गांधीवादी यांच्या लेखावरून मला अगदी पटले.
माझ्या मताप्रमाणे या प्रदर्शनात वैज्ञानिक प्रगती किंवा आय टी क्षेत्रातली प्रगती न दाखवता भारताने आपली सॉफ्ट पॉवर प्रॉजेक्ट करण्याचा एक अप्रतिम प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी झाला आहे ते भारताच्या स्टॉलला रोज किती प्रेक्षक भेट देतात या वरून कळते. रोज 25000 च्या वर प्रेक्षक या स्टॉलला भेट देत असतात.
सौदी अरेबियाने केलेला लेझर शो प्रत्यक्षात कोणत्या अमेरिकन किंवा युरोपियन कंपनीने तयार केला होता हे श्री गांधीवादी यांनी शोधून काढावे.
या प्रकारच्या प्रदर्शनांचा मुख्य फायदा हा त्या राष्ट्राची सॉफ्ट पॉवर प्रोपोगेट करण्यासाठी करावयाचा असतो. भारताने या सॉफ्ट पॉवर मधली आपली शक्तीस्थाने म्हणजे बॉलीवूड, खाद्यपदार्थ, हॅंडलूमचे कपडे , योग याच गोष्टी आपल्या पॅव्हिलियनमधून प्रॉजेक्ट केल्या आहेत. संपूर्ण बांबूचे बनवलेले हे पॅव्हिलियन प्रदर्शन संपल्यावर जतन करून दुसरीकडे परत उभारण्याचा निर्णय चिनी सरकारने घेतला आहे. स्वत: चीनचे पॅव्हिलियन सोडले तर दुसर्‍या कोणत्याही देशाला हा बहुमान मिळालेला नाही.संपूर्ण पॅव्हिलियन ग्रीन तंत्रज्ञानावर आहे यात सौर उर्जा, पवन उर्जा, पर्यावरण यावर भर देण्यात आलेला आहे. या पॅव्हिलियनचा मध्यवर्ती घुमट हा 35 मीटर व्यास व 18 मीटर रुंद आहे. छताच्या पॅनेल्समधे 60000 औषधी वनस्पतीसकट निरनिराळ्या वनस्पतींची रोपे लावलेली आहेत.
सॉफ्ट पॉवर आणि शांघायमधले पॅव्हिलियन याच्याबद्दल जास्त माहिती व फोटो आझ्या या ब्लॉगपोस्टवर वाचता येईल. ज्यांना रुची असेल त्यांनी जरूर वाचावे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पटले नाही

गांधीवादी यांच्याशी सहमत होण्यास दु:ख वाटते आहे. चांगले शहर, चांगले जीवन या विषयाचा सॉफ्ट पॉवरशी काय संबंध? मुळात सौर उर्जा, पवन उर्जा, पर्यावरण यांचा तरी पर्यावरणाशी काय संबंध? (सौदी अरेबियाने लेझर शो केला त्याचे कौतुक करू नये हे मान्य.) बॉलीवूड, खाद्यपदार्थ, हॅंडलूमचे कपडे , योग, औषधी वनस्पती, यांना वैशिष्ट्ये म्हणता येईल, शक्तिस्थळ का? आणि आपण तर फर्स्ट वर्ल्ड देश बनणार आहोत ना? हत्ती, गारुडी, इ. च्या मदतीने आर्थिक/तांत्रिक महसत्ता बनण्यात मदत होते काय?

आंतर्राष्ट्रीय प्रदर्शने

शांघाय एक्क्स्पो सारख्या प्रदर्शनात जिथे अत्यंत प्रगत देशासह सर्व देशातील प्रेक्षक येतात तेथे भारताने काय दाखवावे असे श्री रिकामटेकडा यांना वाटते ते समजू शकेल का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चांगले शहर, चांगले जीवन

भारतही त्यांच्या देशांच्या पंक्तिमध्ये बसण्यास लायक असल्याचे चित्र उभे केले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.

चांगले शहर चांगले जीवन

भारतही त्यांच्या देशांच्या पंक्तिमध्ये बसण्यास लायक असल्याचे चित्र उभे करायचे म्हणजे काय करायचे? काय एक्झिबिट्स ठेवायची हे सांगा ना!
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

उदाहरण

स्वदेशी लेजर शो असता तर नक्कीच चालले असते.
सौर उर्जा, पवन उर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, इ. आतबट्ट्याचे असल्याच्या चर्चा उपक्रमवर झाल्या होत्या. बॉलीवूड, खाद्यपदार्थ, हॅंडलूमचे कपडे , योग, औषधी वनस्पती हे 'चांगले शहर चांगले जीवन' या विषयात बसत नाहीत इतकेच माझे मत आहे.

ह्या बातमीला दुसरी चांगली बाजू कोणती हे जरा सांगाल काय ?

>> कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात हे गांधीवादी यांच्या लेखावरून मला अगदी पटले.
ह्या बातमीला दुसरी चांगली बाजू कोणती हे जरा सांगाल काय ?

अजून तरी काय हल्ला झाला नाही. हि अशी दुसरी(चांगली) बाजू धरूया ?
कि हि बातमी वाचून आपल्या पंतप्रधानांनी अगोदरच निषेध खलितांच्या प्रती पाकिस्तानला पाठविण्यास काढून ठेवल्या असतील.
म्हणजे आता त्यांना होणारा नंतरचा त्रास वाचला.

मला आवडले

मलातरी गांधीवादींनी दिलेले फोटो बघून भारताचे प्रदर्शन आवडले. जर बनविलेले घुमट हा खरंच बांबुचा असेल तर ते सुंदर स्थापत्य आहे. त्या घुमटाचा घेर व रंगसंगती अतिशय आकर्षक वाटते. आतमधेही अगदी दुग्धक्रांतीपासून ते पुरातन शिलालेखांपर्यंत अनेक विषय नीट मांडलेले दिसले. सामोसे ठेवल्याने अगदी "नाचक्की" होईल हे पटले नाहि.

दुसरी गोष्ट तुमच्या मित्राला अथवा वृत्तपत्रांच्या बातमीदाराला प्रदर्शनात दिलेली माहिती आधीच ओळखीची होती त्यामुळे तेच बघायचा कंटाळा आला असेल किंवा त्यामुळे अति चिकित्सेने दोष दिसले असतील. मात्र परदेशी लोकांसाठी हे सारेच नवे आहे. तेव्हा त्यांना त्यांच्याकडेही असणार्‍या हायटेक गोष्टी दाखवण्यापेक्षा "तेच ते" टाळून खास देशी दुग्धक्रांती, कुटीरोद्योग, भारतातील विविधता त्यांना दाखवणे मला तरी आवडले.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मलाही आवडले

मलातरी गांधीवादींनी दिलेले फोटो बघून भारताचे प्रदर्शन आवडले.

मलाही आवडले. फोटो डकवल्याबद्दल गांधीवादीं यांचे आभार.....!

-दिलीप बिरुटे

अनेक फोटो आवडले

अनेक फोटो आवडले. धन्यवाद.

अवांतर : त्या शहराचे नाव "शांगहाय" असे लिहावे, असे मला वाटते. (षांगहाय असे त्याहूनही उच्चारानुसारी असते, पण ष-अक्षराने सुरू होणारा शब्द वाचताना ते डोळ्यांना बरे दिसत नाही.)

दोन बाजू

श्री. चंद्रशेखरजी यांनी त्यांच्या प्रतिसादात व ब्लॉगवर व्यक्त केलेली मतेही विचारात घेतली पाहिजेत.

|सौदी अरेबियाने केलेला लेझर शो प्रत्यक्षात कोणत्या अमेरिकन किंवा युरोपियन कंपनीने तयार केला होता

सहमत. पेट्रोल सोडून आखातात पिण्याचे पाणीही मिळत नाही. इतर सर्व गोष्टी पाश्चिमात्यांकडून घेतलेल्या आहेत.(गगनचुंबी इमारती, आलिशान हॉटेल्स व मोटारी, इ.)
भारतातही बर्‍याच गोष्टी पश्चिमेकडून आल्या आहेत. पण त्या आपल्या म्हणून आपण त्यांचे प्रदर्शन मांडले नाहे हे चांगलेच केले.
'अतिपरिचयात् अवज्ञा' असे होऊन या एक्स्पोतील भारतीय दालन सुमार दर्जाचे वाटले असेल, पण बाहेरच्यांना भारताच्या ज्या गोष्टींचे आकर्षण वाटते, त्या मांडणे ही व्यावहारिकता नाही का?
अर्थातच, या सर्व गोष्टी मी प्रत्यक्ष जरी बघितल्या नसल्या तरी, प्रेझेंटेशन कसे असेल याची कल्पना मी करू शकतो. सरकारी मॅनेजमेंट असल्याने 'पॅकिंग ' थोडे ढिसाळ असेल, पण उठ सूठ भारताचे ते सर्व वाईट व इतरांचे तेव्हढे चांगले अशी मनोवृत्ती कुठेतरी सोडून द्यावी लागेल.
आपल्या गोष्टी कशाही असल्या तरी आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे(होय, वाईट गोष्टींचासुद्धा!). आपणच आपल्याला नावे ठेवून घेतली तर दुसरे तरी कशाला कौतूक करतील? वाईट गोष्टी आत्म परीक्षण करून आपल्या आपण सुधारूच की. त्या चव्हाट्यावर मांडायची काय गरज.
तुर्तास, हे दालन जसे आहे तसे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आणि पुढच्यावेळी अजून चांगले व्यवस्थापित दालन उभे राहील अशी अपेक्षा!!

||वाछितो विजयी होईबा||

आपल्याकडे चांगल्या गोष्टींचा खजिना आहे. पण..............

>> पण उठ सूठ भारताचे ते सर्व वाईट व इतरांचे तेव्हढे चांगले अशी मनोवृत्ती कुठेतरी सोडून द्यावी लागेल.
भारतापेक्षा चांगले आणि वाईत असे जगात बरंच आहेत. मला / आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे.
आपल्याकडे चांगल्या गोष्टींचा खजिना आहे. हे नक्कीच मान्य. पण त्याचे खजिनदार म्हणावे तितके लायक नाहीत.
तळे राखी तो पाणी चाखी हे सर्वदा मान्य असते, पण तळे राखणारा जर पाणी चाखायाच्या ऐवजी, संपूर्ण घटाघट पिऊन टाकायचा विचार करत असेल ,आणि उरलेल्या पाण्यात घाण करू ठेवणार असेल तर ?
तरीसुद्ध बर्याचदा तर हेच वाटत कि आपला भारतच(पुणे) बरा.

>> आपल्या गोष्टी कशाही असल्या तरी आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे(होय, वाईट गोष्टींचासुद्धा!).
ह्या ऐवजी ज्या चांगल्या आहेत त्याचा मला अभिमान आहे आणि जे काही वाईट आहे ते मी सुधरविण्याचा प्रयत्न करीन, हे जास्त योग्य वाटले असते.

>> आपणच आपल्याला नावे ठेवून घेतली तर दुसरे तरी कशाला कौतूक करतील?
पण जर जगच नावे ठेवत असेल तर काय करायचं ?
हि बातमी वाचा. एकदम ताजी आहे आणि जरा विचार करा. आपण तर नावे ठेऊन ठेऊन थकलो. आता ह्यांची तोंड कशी काय बंद करायची ?
CWG snags may hamper India's bid for Olympics

आणि ह्या बातमीकडे लक्ष देऊ नका. हे चालायचंच.

>> वाईट गोष्टी आत्म परीक्षण करून आपल्या आपण सुधारूच की. त्या चव्हाट्यावर मांडायची काय गरज.
सहमत.
किंबहुना ह्याच साठी मी हा धागा काढला आहे. आपणा इथे भेट देऊन नक्कीच आपला प्रतिसाद नोंदवाल अशी अपेक्षा.

>> तुर्तास, हे दालन जसे आहे तसे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा
माझापण पूर्ण पणे पाठींबा. (अजून दुसरा काही पर्याय आहे का ?)

>> आणि पुढच्यावेळी अजून चांगले व्यवस्थापित दालन उभे राहील अशी अपेक्षा!!
बघू, अजून दोन वर्षांनी होणारच आहे कोरियात.
जास्त माहितीसाठी हे वाचा

सहमती

मी तुषारशी पुर्णपणे सहमत आहे

 
^ वर