आणि मी सिगरेट सोडली....

आणि मी सिगरेट सोडली...

सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा! मात्र 'आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे' या नावाने पंडित नेहरूंनी गौरवलेले भिलाई, दुर्गापूर, टाटानगर, राउरकेला वगैरे पोलाद कारखाने, भाक्रा नांगलचे धरण जागा तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची.

भिलाई, दुर्गापूर या कारखान्यांचं नांव अजून "हिंदुस्तान स्टील" असंच होतं, तिचं ’स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ असं पुनर्नामकरण झालं नव्हतं. "भिलाई स्टील प्लांट" पाहायला आम्ही गेलो आणि 'द्रुग' नावाच्या (त्यावेळच्या तरी) 'कुस्थानका'वर उतरलो. आम्ही एकूण ४० विद्यार्थी होतो. बाहेर धो-धो पाऊस पडत होता व आम्हाला आमच्या उतरायच्या जागी नेण्यासाठी नियोजित केलेली बस अजून यायची होती. मग तोवर काय करायचं? पाऊस तर होताच पण वर जाम थंडीही होती. एकाने टूम काढली की "चला, मस्त थंडी आहे. एकेक सिगारेट शिलगावूया"! मी अजून विद्यार्थी होतो व कमवतही नव्हतो त्यामुळे क्षणभर "करू की नको" असं झालं, पण क्षणभरच. "एकदा ओढण्यानं काय होतंय" या भावनेनं शेवटी मी त्या मोहाला बळी पडलोच व माझी पहिली सिगारेट शिलगावली.

त्याकाळी खूप लोकप्रिय असलेली (आणि बिनफिल्टरची असल्याने अगदी unadulterated poison असलेली व अगदी "Good to the last puff" या कीर्तीची ’पनामा’!) आम्ही निवडली! तिचा पहिला झुरका घेतला आणि तोंड वाकडं केलं. दुसर्‍याने ओढलेल्या सिगारेटचा वास किती छान यायचा पण स्वत: दम भरल्यावर मात्र अगदीच अपेक्षाभंग झाला. "हात्तिच्या, चवीला इतकी बेकार लागते असं माहीत असतं तर ओढलीच नसती!" असा विचार मनात आला. आता शिलगावलीच होती म्हणून "वसूल" करायला म्हणून संपवली. दुसरी सिगरेट शिलगावायचं खरं तर कारण नव्हतं कारण पहिल्या सिगरेटचा अनुभाव कांहीं चांगला नव्हता.

त्या काळात सिगरेट ओढणे म्हणजे एक 'ष्टाईल' समजली जायची. त्यावेळचे जवळ-जवळ सगळेच हिरो ऐटीत सिगरेट ओढायचे. त्यामुळे मग दुसरी, त्यानंतर तिसरी असं करत-करत हळू-हळू सिगरेट ओढायची आवड निर्माण होऊ लागली. पण खिसा खाली असल्यामुळे त्यावेळी सिगरेट क्वचित ओढायचो. क्वचित म्हणजे रविवारी हॉस्टेलची दुपारची ’फीस्ट’ झाल्यावर वगैरे. मेटॅलर्जीला असताना पहिल्यांदाच सिगरेटची ’किक’ काय असते ते अनुभवले. मग मात्र "स्वर्ग मेल्याविना दावी तयाला व्यसन म्हणतात" या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सिगरेटच्या त्या ’किक’साठी ती ओढावीशी वाटू लागली.

हे माझे पनामा-प्रेम-प्रकरण नंतर दहा एक वर्षें चाललं. सध्याची कल्पना नाही, आता कदाचित तो ब्रँड नामशेषही झाला असेल. पण महिना ३००-४०० रुपये पगार असताना साठ पैशाला वीस सिगरेटचं पॅक या भावात मिळणारी फक्त ’पनामा’च परवडायची. "चार मिनार" आणखी स्वस्त असली तरी तिचा वास आवडायचा नाही म्हणून शेवटी 'पनामा'च एकदम प्यारी झाली होती! बी. ई. मेकॅनिकल व बी. ई. मेटॅलर्जी आटोपून मग ’मुकुंद’ कंपनीत ३२५रु. महिना पगारावर मी पाट्या टाकायला सुरुवात केली. खिशात ३०० का होईनात, पण पैसे खुळखुळायला लागले व मग ’पनामा’चं पाकीट बाळगायला सुरुवात झाली!

रहायचो हिंदू कॉलनीत माझ्या आत्याकडे. त्यामुळे घरी सिगरेट ओढायची टाप नव्हती. अगदी 'तौबा-तौबा'! पण घराबाहेर पडलो आणि पहिलं वळण घेतलं कीं धुराडं सुरू व्हायचं. आत्याला नक्कीच वास आला असेल, पण ती सूज्ञपणे कधी काही बोलली नाही. स्वत:च्या पैशाने सिगरेट ओढायला सुरुवात केल्यावर रोज २-३ सिगरेटपासून रोज १० सिगरेटचा टप्पा कधी गाठला ते कळलेच नाही. त्यानंतर ६५चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. आम्हाला आंही ब्रह्मचारी असल्यामुळे मुकुंदच्या व्यवस्थापनाने आम्हाला कळव्याच्या कॉलनीत राहायला जायची (प्रेमळ) आज्ञा केली व मी व इतर तीन माझ्यासारखे ब्रह्मचारी असे आम्ही एकूण चार ब्रह्मचारी कळव्याच्या "मुकुंद कॉलनी"त 'डेरेदाखल' झालो. कॉलनीत इतर कुणी चिटपाखरूही नव्हतं. फक्त ड्यूटीवरील रखवालदार व आम्ही. त्यात आम्हाला गस्त घालण्यासाठी धूमकेतूसारखे वेळी-अवेळी जायला सांगण्यात आले होते. कधी रात्री १२ वा. तर कधी ३ वाजता, कधी ४ वाजता! म्हणजे कुठलाही एक ढाचा नसलेले वेळापत्रक ठेवायला लागायचे. नेहमी कुठला तरी रखवालदार झोपलेला मिळायचाच, त्यातला एक गोप-बहादूर या रखवालदाराला खूपदा झोपलेला पकडल्यावर त्याचे 'झोप-बहादूर' असे नामकरणही आम्ही केले.

कंपनीनं प्रत्येकाला वैयक्तिक खोली व चौघात मिळून एक आचारी व एक वरकाम्या नोकर ठेवला होता. त्यामुळे कधी स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही, ना कपडे धुण्याची. दिवसभर प्रोजेक्टची इरेक्शन-कमिशनिंगची ड्यूटी, आरामात मिळणारं जेवण व रात्री-अपरात्री मारलेल्या फेर्‍या असं जिप्सी टाइप जीवन आणि चार ब्रह्मचारी! मग काय विचारता? पनामाचं रोज एक पाकीट कधी संपायला लागलं ते कळलंच नाही! मग मात्र पुढची वीसेक वर्षं रोज वीस सिगरेटचा ’रतीब’ सुरू झाला. पगार वाढला तसा सिगरेट्चा ब्रँड बदलत गेला. पनामा जाऊन कॅप्स्टन, मग गोल्डफ्लेक, मग विल्स फिल्टर अशी प्रगती होत गेली, पण रोजचा वीस सिगरेटचा रतीब मात्र बदलला नाही.

मग लग्न झालं. सौ.ला माझ्या सिगरेट ओढण्याबद्दल मुळीच तक्रार नव्हती. त्यामुळे प्रेमळ आग्रहाखातर सुटायची तशीही सिगरेट सुटली नाही व रतीब चालूच राहिला. १९६४ साली "surgeon-general has determined that smoking is injurious to health" असं अमेरिकन सिगरेट्च्या पाकिटावर लिहिलं जाऊ लागलं व पाठोपाठ त्याच सुमाराला "सिगरेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे" असा प्रचार भारतातही सुरू झाला. तो प्रचार पटायचा पण "आज ओढू दे, उद्यापासून सोडू" असं करत आम्ही तो दिवस पुढं ढकलायचो. मी किंवा माझ्या मित्रांनी सिगरेट सोडायचा निर्णय कधीच मनावर घेतला नाही. पुढे मुलं झाली. पण तब्येत ठणठणीत होती म्हणून असेल पण सिगरेट सोडावी असं कधी मनानं घेतलंच नाही. दोनदा 'झटका आल्या'मुळं (म्हणजे हृदयविकाराचा वगैरे नव्हे पण असाच एक झटका) तीन-तीन वर्षांसाठी अशी दोनदा मी सिगरेट सोडलीही. त्या सहा वर्षांत मी सिगरेट फक्त परदेशवारीतच ओढायचो. सुरुवातीला परदेशी ओढायला सुरुवात केलेलं धूम्रपान मी परत आल्यावर इमिग्रेशनचं डेस्क ओलांडल्याबरोबर थांबत असे. कारण मी उरलेले पाकीट तिथंच फेकून देत असे व आणलेली ड्यूटी-फ्री पाकिटं मित्रांत वाटत असे. पण हळू-हळू 'एवढं पाकीट संपवून मग सोडूया' वरून 'एवढं कार्टन संपवून मग सोडूया' असे करता-करता धूम्रपान चालूच राहू लागलं.

या दरम्यान मी इंडोनेशियातील दुसर्‍या क्रमांकाचं शहर असलेल्या 'सुरबाया'ला नोकरीसाठी आलो. त्यानंतर एकच फरक झाला की Wills जाऊन '555' हा ब्रॅन्ड हाती आला. पुढे 'क्रेटेक' नांवाची लवंगेचा वास असलेली "बेंटुल बीरू-निळी बेंटुल" छापाची इंडोनेशियन सिगरेटही मला आवडू लागली, पण "वीस-एक्के-वीस"चा पाढा काही बदलला नाही.

पण त्यासुमारास एक नवी समस्या माझ्यापुढे उभी राहिली. ती म्हणजे आमची वाढत असलेली मुलं व त्यांच्या शालेय शिक्षणातील 'सामान्य ज्ञाना'चा अभ्यासक्रम. या सुमाराला माझा मोठा मुलगा १२ वर्षाचा व मुलगी ७ वर्षाची होती. त्यांना शाळेत सिगरेट ओढण्याचे गैरफायदे शिकवले जाऊ लागले. 'बाबा, सिगरेट ओढू नका, आजारी पडाल'ने सुरू झालेली गाडी 'आम्हाला अनाथ कराल बरं का'पर्यंत आली. मग मात्र 'आता सिगरेट सोडायचीच' असा निर्धार झाला. पण आता ती सुटता सुटे ना!

असं म्हणतात की सिगरेट सोडायची असेल तर एकच यशस्वी मार्ग आहे. तो म्हणजे ती ओढायला सुरुवातच न करणे. तो मार्ग तर आम्ही केव्हाच ओलांडला होता व त्यामुळे आम्हाला उपलब्ध नव्हता. मग काय करायचे?

असे करता-करता आम्ही ८७-८८च्या सुमारास त्रिनिदादला कंपनीच्या कामासाठी पोचलो. तिथे माझ्या मुलीने बंड केले. 'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा देऊन ती मोकळी झाली. मला खूप वाईट वाटले. "सुरबायाला गेलो की सोडीन" असं सांगून मी तात्पुरती वेळ मारून नेली. शेवटी १९८९च्या १४ नोव्हेंबरला इंडोनेशियाला 'राम-राम' ठोकून मी परत येत असताना वाटेत सिंगापूरला transit मध्ये असताना मला काय वाटले कुणास ठाऊक. मी सिंगापूरच्या transit lounge मध्ये जी सिगरेट सोडली ती आजतागायत! खरं त्यावेळी धमकी किंवा प्रेमळ बंड वगैरे कसलाही प्रयोग माझ्या मुलांकडून झाला नव्हता. पण माझ्याच मनानं घेतलं की बस झालं आता. सोडा सिगरेट.

एकदा सोडल्यावर पहिले ७-८ महिने खूप त्रास झाला. अशा वेळी मी काहीतरी चघळायला ठेवत असे. यासाठी आवळकाठी या प्रकारची आवळ्याची सुपारी म्ला बरीच उपयोगी पडली. आधीच धूम्रपानाच्या रूपाने तंबाखूची धास्ती घेतलेली असल्यामुळे धूम्रपान सोडण्यासाठी म्हणून मी तंबाखू खायला मात्र कधीही सुरुवात केली नाही. माझे असे काही मित्र आहेत की ज्यांनी हा मार्ग चो़खाळला व परिणामतः आता ते दोन्हींच्या व्यसनात गुंतले आहेत. १४ नोव्हेंबरला सोडलेल्या सिगरेटने त्यानंतर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नूतन वर्षाच्या स्वागतपार्टीत परत मला मोहाची मिठी जवळ-जवळ मारलीच होती. पण निग्रहाने मी तो मोहाचा विळखा तिला माझ्याभोवती आवळू दिला नाही.

त्या संक्रमणकाळात आजूबाजूला कुणी सिगरेट ओढत असेल तर मात्र मला खूप जळफळायला व्हायचं, पण स्वनिश्चयाच्या बळावर मी सिगरेटपासून दूर राहिलो. शेवटी सहा-एक महिन्यानंतर मात्र माझ्या जवळपास कुणी सिगरेट ओढत असल्यास त्याचा त्रास व्हायला लागला. मग मला जरासे हुश्श झाले.

आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन. तेव्हा ती पहिली सिगरेट कुठल्याही परिस्थितीत ओढायची नाही ही खूणगाठ मनाशी पक्की घातली आहे!

१३ नोव्हेंबर २००९ रोजी सिगरेट सोडून मला वीस वर्षें झाली व १४ नोव्हेंबर २००९ रोजी मी धूम्रपानमुक्त अशा २१व्या वर्षांत पदार्पण केले. मी जे केले (तब्येतीला कांहींही 'धाड' झालेली नसताना) याचा अभिमान तर आहेच पण काही लोक सिगरेट ओढताना पाहून वाईट वाटते व त्यांना मदत करावी असेही वाटते. तशी मदत मी त्यांना देऊही करतो, पण यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो. मी आत्मनिश्चयाने यशस्वी झालो तसं त्याच्याही बाबतीत व्हायला हवं हे मनात येतं व मी त्यांना सांगतो मी यात यशस्वी झालोय. तुम्ही जेव्हा निश्चय कराल त्यावेळी जर माझ्या अनुभवाचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, मी जरूर माझा अनुभव तुमच्या उपयोगी पडेल अशा शब्दात तुम्हाला सांगेन. अगदी फुक्कट!

उपक्रमच्या धोरणानुसार येथे ललित लेखन प्रकाशित केले जात नाही. सदर लेखन अनुभव या प्रकारात मोडत असून त्यातून दिला गेलेला स्फुरणदायी संदेश पाहता हा लेख धूम्रपान सोडू इच्छिणार्‍यांना प्रेरणा ठरू शकतो. अपवाद म्हणून सदर लेख प्रकाशित राहावा असा निर्णय घेण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. - संपादक मंडळ

लेखनविषय: दुवे:

Comments

लई भारी

लई भारी. :) खरच लई भारी.

फक्त सिगारेट पिल्यावर होणाऱ्या अनुभूतीला थोडा अजून detail मध्ये मांडता येईल का? कीक (सिगारेट ची बरका) म्हणजे नक्की काय हे मनो-शाररीक भाषेमध्ये कोण सांगेल का? अनुभव गोळा करतोय.

संपादन कसे करायचे इथे?

यात मी दोन-तीन ओळी लिहू शकतो, पण संपादन कसे करायचे इथे? (मी इथे नवा आहे)
सांगितलेत तर नक्की करेन.
ज. का.
-------------------
ये जकार्ता मेरी जान!

डोक्यात झिणझिण्या आलेल्या जाणवायच्या

'किक' यायला सुरुवात झाली तेंव्हां डोक्यात झिणझिण्या आलेल्या जाणवायच्या आणि थोडेसे झिंगल्यासारखेही वाटायचे. पण नंतर 'किक' येण्याची संवय झाल्यावर तसे वाटेनासेही झाले!
_____________
ये जकार्ता मेरी जान!

अभिनंदन!

अंगाला सिगरेटचा वास येणे हे एक तापदायक प्रकरण आहे. सिगरेट ओढणार्‍यालाच नव्हे तर समोर असणार्‍यालाही हा वास आणि व्यसन विळखा घालते. (पक्षी: पॅसिव स्मोकिंग).

तुमचा अनुभव रोचक आहे. व्यसन सुटल्याबद्दल अभिनंदन! इतरांना मदत करण्याची तुमची इच्छा स्पृहणीय आहे.

आमच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे त्याचा मनाला अतिशय संतोष होतो. :-) सिगरेटच्या वासाने डोके फिरत नाही. अर्थात, शहर सोडले की हल्लीच मोठमोठे कॅसिनो बांधलेले आहेत. तेथे सर्रास धूम्रपान चालते. असो.

उपक्रमावर स्वागत! पु.ले.शु.

त्यात काय?

|आमच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे

त्यात काय? आमच्या आख्ख्या देशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे.
पण मॅट्रिक्स चा मॉर्फिअस म्हणतो तसं, "रूल्स एक्झिट. सम कॅन बी बेन्ट, अदर्स कॅन बी ब्रोकन! (रिमेनिंग कॅन बी इग्नोर्ड!)"---असं भारतात चालतं.

||वाछितो विजयी होईबा||

स्फूर्तिदायक अनुभव

स्फूर्तिदायक अनुभव.

(संपादकमंडळाला विनंती : उपक्रमाच्या धोरणाच्या सामान्यनियमातच हे लेखन बसते, असे मला वाटते. अपवाद म्हणून नाही. चर्चेचा प्रस्ताव मध्ये "विविध क्षेत्रातील लोकांचे अनुभव" हे अपेक्षित आहे, आणि लेख मध्ये "लेख, अनुभव, अनुवाद, बातमी, माहिती, संदर्भ, विचार, व्यक्तिचित्र ..." हे अपेक्षित आहे. या लेखाला "अपवाद" का मानावा लागला? हे "जवळजवळ ललित" आहे काय? याबद्दल मी आता गोंधळलेलो आहे. "ललित" म्हणजे आजवर मी "कल्पित गद्य=फिक्शन" आणि "स्वरचित काव्य" असेच मानत आलो आहे. "ललित"-निबंधही वैचारिक लेखन "नॉन-फिक्शन" म्हणून मी उपक्रमासाठी योग्य मानत असे. या परिच्छेदाचा नवीन धागा करून धोरणे अधिक स्पष्ट करावी, अशी संपादकमंडळाला विनंती.)

सहमत आहे

वरील लेख हा व्यक्तिमत्व, अनुभव आणि विचार या तिन्ही बाबींशी सुसंगत असाच आहे. शिवाय तो लेखकाचा स्वतःचा आहे. मला स्वतःला यात लालित्य नसुन औचित्य वाटते. हा लेख सिगारेट सोडण्याचा उपक्रम राबवणार्‍यासाठी प्रेरणादायी तर नक्कीच आहे. उपक्रमाच्या उद्दिष्टाशी सुसंगत असाच आहे
प्रकाश घाटपांडे

+१

पूर्ण सहमत
चन्द्रशेखर

चांगला शब्द

>>> औचित्य वाटते <<<

"औचित्य" शब्दाचा अचूक आणि समर्पक वापर केला आहे.

सहमत

अनुभवकथन आवडले.

याला अपवाद करावा लागू नये याबद्दल सहमत आहे. जर मित्रमंडळींच्या चमत्कारांचे वर्णन चालू शकते तर सिगरेट कशी सोडली हे अनुभवकथन चालायला हरकत नसावी.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

असहमत

उपक्रमवर रोशनी चालेल काय?

लेखात विचारप्रवर्तक मते नसतील (उदा. सिगरेट पिण्याचा व्यक्तिगत हक्क विरुद्ध मुलांप्रति/समाजाप्रति कर्तव्ये, सिगरेटविषयीचे पिअर रिव्ह्यूड संशोधन विरुद्ध बिग टोबॅको, व्यसने/आवडीनिवडी विरुद्ध उपयुक्तता, पुण्यात सर्वोत्तम विड्या कुठे मिळतात, तेंदूपत्ता आणि बालमजुरी, पानाचे डाग कसे घालवावे, अमेरिकेतून तंबाखूचा वापर कसा जगभर पसरला, (आर्यांचे) सोमपान म्हणजे कॅनाबिस होते काय, इ. विचार या संदर्भात करता येतील) तर नॉन फिक्शनसुद्धा ललितच ठरेल ना?

लेख आवडला ("यात नेहरू हा सदाहरित चर्चाविषय आहे", "वसतिगृहातील पिअर दडपण उल्लेखिले आहे", इ. बचाव शक्य आहेत) पण "अनुभवकथन ललित नसते" हा दावा पटला नाही.

मुद्दा

मुद्दा कळला पण टाकायचेच म्हटले तर रोशनीतही संदेश वगैरे टाकता येतील. किंवा बरेचदा पर्यटनाचे, गिर्यारोहणाचे अनुभव येतात त्यात संदेश वगैरे नसतो.

यावर चर्चा व्हायला हवी असे वाटते आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

टाकू का?

धनंजयकाका,

"ललित"-निबंधही वैचारिक लेखन "नॉन-फिक्शन" म्हणून मी उपक्रमासाठी योग्य मानत असे.

ए.सी. ने रात्रभर खोली थंडगार केली होती. अंगावरली चादर सरकली तसे भल्या पहाटेच माझे डोळे उघडले. पहाट येवढी रम्य असते याचा अंदाज यापूर्वी मला आला नव्हता. सूर्यकिरण क्षितिजापलिकडून डोकावू लागले होते. पक्ष्यांचे थवे किलकिलाट करून आकाशात भरारी घेत होते. मला क्षणभर खोलीत बसवेना. मी प्यांट आणि टि-शर्ट चढवला आणि खोलीबाहेर पडलो. दोन चार पाऊले चालल्यावर जाणवलं की पायात चपलाच नव्हत्या पण म्हटलं "हॅट! अंगावर कपडे घातले तेच फार झालं." मी जो स्सूममध्ये निघालो तो थेट टेकडीवरल्या गावदेवीच्या मंदिरापाशी जाऊन थबकलो. देवळात घंटानाद सुरु होता. यापूर्वी अनेकदा या देवळावरून आमची स्वारी गेली आहे पण आत डोकावायची इच्छा झाली नाही. आज मात्र आत जावे अशी अनिवार इच्छा झाली.

आता थांबतो. वरलं स्फुट हा माझा स्वानुभव आहे. नॉन-फिक्शन का काय ते ही आहे? टाकू काय उपक्रमावर?

संपादक महाशय, हे आमचं अवांतर लेखन आवडलं नसेल तर ललित-लेखन म्हणजे काय अशी नवी चर्चा टाकून देणार काय?

- राजीव

सुधीरकाका, तुमच्या चिकाटीने सिगरेट सुटली. मला अद्याप सिगरेट ओढून पाहावी असे वाटले नाही. मित्रांनी गळ घातली तरी पाकीट हातात घेण्याव्यतिरिक्त आम्ही इतर काहीही केलेले नाही आणि करण्याची इच्छाही नाही.

चांगले उदाहरण - वेगळा धागा

विचारार्ह उदाहरण - याबद्दल वेगळा धागा असावा.

अनुभव आवडला.

मला सिगरेट सोडून जवळपास दीड वर्ष झाले आहे. सुरवातीला काही महिने सोडण्याचा त्रास फार झाला. मी ऐटीत सिगरेट ओढतो आहे अशी स्वप्नेही पडायची. आता त्रास होत नाही. धूम्रपानाची स्वप्नेही पडत नाही. सिगरेट न ओढणाऱ्याला सिगरेटच्या धुरामुळे व वासामुळे किती त्रास होतो ह्याची कल्पना येते आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

५८ तास

सिगारेट अथवा तंबाखुचे दुसरे कोणतेही व्यसन सोडवण्यासाठी फक्त ५८ तासांचा निग्रह लागतो. एकदा का हा सर्वात कठीण काळ ओलांडला की, तंबाखुचे कोणतेही व्यसन सुटू शकते.
मी ही सिगारेट सोडून २ वर्षे होऊन गेली. हा तासांचा हिशोब मला एका मित्राने सांगितला व त्यामुळे मला धीर आला व चांगल्या मनाला बजावले की, ’तुला फक्त ५८ तास काढायचे आहेत. नंतर सतत सिगारेटला चटावलेल्या मनाला काबुत ठेवाण्यासाठी लागतांना होणारा त्रास तुला होणार नाही.” त्याने ऐकले. सिगारेटला चटावलेले दुसरे मन मला तिकडे ओढत होते पण हे मन ५८ तासांपर्यंत कणखरतेने लढा देत राहीले व जिंकले.
आता मी सिगारेटच्या वासापासुन दूर पळतो व आश्चर्य वाटते की, हे असले घाणरडे व्यसन मी कसे काय इतके दिवस बाळगुन होतो?

पाट्या

--बी. ई. मेटॅलर्जी आटोपून मग ’मुकुंद’ कंपनीत ३२५रु. महिना पगारावर मी पाट्या टाकायला सुरुवात केली. -
काळेसाहेब पाट्या का टाकत होते ते नाही कळाले. एक चांगला संदेश आणि दुसरा असा पाट्या टाकायचा संदेश त्यांनी का दिला हे नाही समजले.

अनुभव

अनुभवलेखन आवडले.

१९६२ ते १९८९ तब्बल २७ वर्षे सिगरेट ओढल्याने तब्येतीवर काय विपरीत परिणाम झाला का? वैद्यकीय चाचण्यात न भरुन निघणारी अशी काही हानी डॉक्टरांनी दाखवून दिली आहे का? विचारायचा उद्देश हाच की माझ्या ओळखीत अश्या काही व्यक्ती होत्या बहुदा हयातभर त्यांनी सिगरेट ओढली व ८० वर्षे वगैरे वयात त्यांना मृत्यु आला. ते कोणीही फुफुस्साच्या कर्करोगाने गेले नाहीत. त्यामुळे मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे की वैधानीक इशारा इ तंबाखू वाईट लिहतात पण माझ्या ओळखीतल्या त्या लोकांनी आयुष्यभर् सिगरेट ओढली व ८० म्हणजे बर्‍यापैकी आयुष्य जगलेच की.

का काही लोकांना सिगरेट चालते, काही लोकांना नसावी. जसे तोच आहार घेउन काही लोकांच्या धमन्यात कोलेस्ट्रोल रस्ताबंद करते तर काहींच्या नाही (आधीक संदर्भ - माझा साक्षात्कारी र्‍हदयरोग - डॉ. अभय बंग)?

अधिक माहिती

जनुकीय कारणे आहेतच. हा दुवा माहितीपर वाटेल अशी आशा आहे.

माझे दोन पैसे:
कर्करोग हासुद्धा पूर्णपणे जनुकीय रोग आहे. निरोगी शरिरात अनेक कर्कपेशी तयार होतात पण त्यांचे डीएनए दुरुस्त केले जातात किंवा त्या मरून जातात. अशा पेशींची वाढ थांबविणारी यंत्रणा अयशस्वी ठरते तेव्हाच वास्तविक कर्करोग होतो.

माझी सुटली

मी पुर्वी नोकरीच्या सुरवातीच्या काळात सामुहिक वर्तनाचा भाग म्हणुन सिगारेट ओढत असे. मित्रमंडळीत एक पाकिट दिवसाला संपत असे. त्यात ग्लॅमर ,विद्रोह हाच भाग जास्त असे. १९९२ मधे ( वयाच्या तिशीत) मला हार्ट अटॅक आला कि जो मला व डॉक्टरांनाही समजला नाही. तपासणी पश्चात तो हार्ट अटॅक होता असे निदान झाले म्हणुन समजले. त्यानंतर ऍन्जिओग्राफी झाली तेव्हा रुग्णाचा वैद्यकीय विदा गोळा करणार्‍याला डॉक्टरला ही मी सिगरेटच्या प्रमाणाबद्दल सांगितले होते. पण त्यानी माझी नोंद नॉन स्मोकर अशी लिहिली होती. त्याच्या मते चेनस्मोकर वाल्यांची नोंद स्मोकर अशी केली जाते.
डॉक्टरांना मी हार्ट अटॅकची कारण मीमांसा विचारल्यावर त्यांनी शरिरांतर्गत झालेला अपघात असे सांगितले. पण सिगारेट./ सोडुन द्यायला सांगितले. अर्थात ती आपोआपच सुटली व काही पथ्थे पाळल्यावर नंतर काही त्रास झाला नाही. दीर्घ काळ मेडिकेशनवर भागले.
अवांतर- कुंडलीत मला हे दिसले होते काय?
प्रकाश घाटपांडे

प्रेरक अनुभव

अनुभव आवडला. कुठच्याही व्यसनमुक्तीसाठी प्रेरक ठरेल असा आहे.

 
^ वर