उपक्रमाची वर्षपूर्ती

सदस्यांसाठी उपक्रम खुले झाल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. उद्या १५ मार्चला मी आणि काही अधिक सदस्य उपक्रमावरील आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करू. थोड्याफार फरकाने येथे दाखल झालेले इतर सदस्यही लवकरच वर्षपूर्ती करतील. या दिवसाच्या पूर्वसंध्येवर, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना थोडेसे चिंतन करण्याचा सहज विचार मनात आला.

वर्षभरापूर्वी मनोगत हे एक प्रमुख मराठी संकेतस्थळ तांत्रिक बिघाडाने बंद झाल्याने आणि तेथील वावरावर काही अनपेक्षित बंधने आल्याने अनेक सदस्यांची थोडीशी कुचंबणा झाली होती. देशातील आणि विशेषतः परदेशातील मराठी सदस्यांना मराठी भाषा आणि मराठी मातीशी बांधून ठेवणाऱ्या, मनाला दिलासा देणाऱ्या, मराठमोळ्या संकेतस्थळाची उणीव भासू लागली. मायबोली या दुसऱ्या प्रसिद्ध संकेतस्थळाशी विशेष जवळीक नसल्याने मला स्वतःला आपल्या अनुदिनीशिवाय दुसरा मंच मिळत नव्हता. अशात एके दिवशी जीमेलवरून उपक्रमपंतांचे आमंत्रण मिळाले.

या नव्या संकेतस्थळाची रचना, धोरणे, नियम हे सर्व वरकरणी पसंत पडणारे दिसत होते. काही बारीक-सारीक अडचणी होत्या, जसे, अक्षरांचे पाय मोडके दिसणे, प्रतिसादांची उघडझाप करता न येणे, काही अक्षरांचे टंकन कसे करायचे हे लक्षात न येणे, वगैरे, परंतु त्या तात्पुरत्या होत्या किंवा सवयीने अंगवळणी पडण्यासारख्या होत्या.

"सामायिक आवडीनिवडी बाळगणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना येथे येण्याचे आमंत्रण द्यावे," या उपक्रमपंतांच्या आवाहनानुसार काही अधिकजण लवकरच येथे दाखल झाले. परंतु, उपक्रमाच्या धोरणानुसार ललित साहित्य, कविता आणि अशा इतर प्रकारांना या संकेतस्थळावर स्थान नाही हे कळल्यावर मात्र अनेकांच्या मनात उभे राहिलेले प्रश्नचिह्न थोड्याशा असंतोषातून बाहेर येऊ लागले. या स्थळावर कथा-कवितांना बंदी का?, याचे स्वरूप मराठी विकिपीडियापेक्षा वेगळे कसे? केवळ माहितीपूर्ण लेखांच्या आणि चर्चांच्या आधारावर हे स्थळ किती काळ तगणार या शंका उपस्थित होऊ लागल्या. या सर्वांतून तावून-सुलाखून बाहेर पडलेले उपक्रम आज वर्षभराचे झाले आहे.

या वर्षाच्या कालावधीत उपक्रमावर तंत्रज्ञान, भाषा, पर्यावरण, इतिहास, राजकारण, विज्ञान, प्रवास, मनोरंजन असे अनेक प्रकारांचे लेख निर्माण झाले. अशा वेगळ्या लेखांना वाचकवर्ग आणि प्रशंसा मिळेल का ही शंका या संकेतस्थळाने दूर केली. आजही, उपक्रमाचा वाचकवर्ग तसा मर्यादित आहे परंतु जो वर्ग या संकेतस्थळाने निर्माण केला त्याला धरून ठेवण्यात हे संकेतस्थळ यशस्वी झाले असे वाटते.

समान विचारांचे-आचारांचे चार लोक एकत्र जमून गप्पा मारायला लागले तरी कुठेतरी-कधीतरी सहज मतभेद होत जातात किंवा आईची दोन मुलेही सारख्या विचारांची नसतात, यासारखे विचार आपल्यापैकी कोणालाही नवे नाहीत. मतभेद, मतांतरे सांभाळून, हितसंबंध राखून ठेवणे हे थोडे कठीण कार्य असावे. आपल्या घरात अशी पेल्यातली वादळे निर्माण झाली की ती हळुवार फुंकरीने निवून जातात. संकेतस्थळावरही अशी वादळे शमण्यासाठी, त्या संकेतस्थळाची आणि त्यावरील सदस्यांची वीण परस्परांशी घट्ट असावी लागते. आजपर्यंत तरी, उपक्रमावर सदस्य एकमेकांना सांभाळून घेताना वारंवार दिसत आले आहेत आणि यापुढेही हा समतोल राखला जावा अशी सदिच्छा व्यक्त करावीशी वाटते.

आपण ज्या जागी आपला वेळ व्यतीत करतो त्या ठिकाणापासून आपली विशिष्ट अपेक्षा असते. ते राहते घर असो की कार्यालयातील जागा! प्रत्येक स्थळाचे स्वतःचे नियम असतात, शिस्त असते; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्थळांवर आपला वेळ व्यतीत करताना आपल्याला समाधान मिळते का याचा विचार आपण सतत करत असतो. उपक्रमावरही या बाबींचा अनेकदा विचार झाला आहे. केवळ मनोरंजन हे उद्दिष्ट न ठेवता उपक्रमाने माहितीच्या आदान-प्रदानाला मराठी भाषेचे कोंदण दिले आणि सदस्यांनी एका बंदिस्त चौकटीपेक्षा वेगळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्यात वाद, विवाद, मानापमान होणे साहजिक आहे पण तरीही हे सर्व या व्यासपीठापेक्षा आणि येथे जोडल्या गेलेल्या नात्यांपेक्षा अधिक उंचीचे नसावेत असे वाटते.

आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने माझ्या उपक्रमाकडून काही अपेक्षा आहेत, इतर सदस्यांच्याही असतीलच. या मंचाला अधिक सुदृढ करणे, चोखंदळ बनवणे, त्यावरील सोयी-सुविधा अद्ययावत करणे आणि तशा अनेक अपेक्षा, शंका, सुचवण्या असतील त्या या चर्चेतून मांडल्या जाव्यात. याच बरोबर, संकेतस्थळाची धोरणे, उद्दिष्टे यांवरही चर्चा करता येईल. उपक्रमाकडूनही या चर्चेत भाग घेण्याची विनंती आहे.

उपक्रम आणि त्याच्या सदस्यांना वर्षपूर्तीच्या अनेक शुभेच्छा!!



कृपया, ही चर्चा सुरळीत व्हावी आणि नको त्या अंगाने न जाता सर्वांच्या उपयोगी ठरावी म्हणून प्रयत्न करू. धन्यवाद!

Comments

शुभेच्छा !!! :)

उपक्रम आणि त्याच्या सदस्यांना वर्षपूर्तीच्या अनेक शुभेच्छा!!

या मंचाला अधिक सुदृढ करणे, चोखंदळ बनवणे, त्यावरील सोयी-सुविधा अद्ययावत करणे आणि तशा अनेक अपेक्षा, शंका, सुचवण्या असतील त्या या चर्चेतून मांडल्या जाव्यात.

मी. उपक्रम आपल्या विचारांची नोंद घेणार आहेत का ? एकदा त्यांचे मत येऊ द्यावे असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद!

मी. उपक्रम आपल्या विचारांची नोंद घेणार आहेत का ? एकदा त्यांचे मत येऊ द्यावे असे वाटते.

सध्या भारतात रात्र असल्याने (आणि कदाचित ते माझ्याइतके पडीक नसल्याने ;-) ) त्यांचे मत इतक्यातच येईल असे वाटत नाही पण ते येईल हे निश्चित तेव्हा आपण आपल्याकडून सकारात्मक सुरूवात करू.

चोखंदळ

मंचाला चोखंदळ बनवले तर इथे सेन्सॉरशिप येईल. सदस्यांनी स्वतःहून चोखंदळ व्हावे. ;)

मात्र सोयी सुविधा पुरेशा आहेत असे वाटते. सोयीसुविधांच्या बाबतीत उगीच नाकापेक्षा मोती जड असे होऊ नये. भारतातून इथे येताना बँडविड्थ नाही म्हणून फार वेळ लागू नये.

--(आगाऊ) आजानुकर्ण

हृद्य मनोगत

संकेतस्थळाचे उपक्रम हे नाव समर्पक आहे. इथल्या अड्ड्यावर गप्पा मारायला समाधान मिळते. हे आभासी जग आहे, असे वाटतच नाही. प्रियालींचे (ली वर अनुस्वार दिलाय बरंका )मनोगत अगदी संवादी वाटते. सदस्यांचा विवेकी वावर खरच समाधान करुन देणारा आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती असणारच पण सहजीवनाची वीण ही घट्ट असल्याने मतमतांतर ही परस्परांना प्रगल्भ करत गेली. अशीच पुढील वाटचाल परस्परांना समृद्ध करो हीच शुभेच्छा.
प्रकाश घाटपांडे

असेच

म्हणतो.

ह्या संकेतस्थळाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमीत्त शुभेच्छा. तसेच ह्या निमीत्ताने अत्यंत मोजक्या आणि प्रवाही शब्दात आतापर्यंतच्या वाटचालीचा गोषवारा घेणारा लेख लिहील्याबद्दल प्रियाली ह्यांना धन्यवाद.

शुभेच्छा

उपक्रम संकेतस्थळाला शुभेच्छा. लवकरच या संकेतस्थळावरील आमच्या वावरालाही वर्ष पूर्ण होईल. वर्षपूर्तीसमारंभ हा मराठी माणसासाठी मोठ्या अभिमानाचा दिवस आहे. ;) (नोट द लँग्वेज!) उपक्रम संकेतस्थळाची पुढील वाटचाल अशीच चालू राहो ह्याच शुभेच्छा.

येणार्‍या नवीन वर्षात काही तांत्रिक सुधारणा, अधिक प्रगल्भ विचार आणि परिपक्व वागणूक इथे दिसेल याची खात्री आहे. ;)

--(उपक्रमी) आजानुकर्ण

शुभेच्छा

उपक्रम संकेतस्थळाला, पडद्यामागच्या सर्व कार्यकारी मंडळींना आणि सर्व सदस्यांना अनेक शुभेच्छा. उपक्रमाची वाटचाल लेखात म्हटल्याप्रमाणे उल्लेखनीय झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, भाषा अशा अनेक विषयांवरचे उत्कृष्ट लेख इथे वाचायला मिळाले आहेत*. येत्या वर्षात ही वाटचाल अशीच चालू राहो अशी आशा करूयात.

*याचे आणखी विशेष म्हणजे आंतरजालावर विकी सोडल्यास विविध विषयांवरचे मराठीतील लेख उपक्रमावर मोठ्या संख्येने आहेत. गूगल शोधात उपक्रमाचा पेज र्‍यांक वाढवता आला तर अधिकाधिक लोकांना या संकेतस्थळाबद्दल माहिती मिळू शकेल. (हे फक्त एक डोक्यात आले म्हणून. अशा सूचनांसाठी वेगळी चर्चाही करता येईल.)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वेगळी चर्चा

गूगल शोधात उपक्रमाचा पेज र्‍यांक वाढवता आला तर अधिकाधिक लोकांना या संकेतस्थळाबद्दल माहिती मिळू शकेल. (हे फक्त एक डोक्यात आले म्हणून. अशा सूचनांसाठी वेगळी चर्चाही करता येईल.)

उत्तम कल्पना आहे आणि इथे जसे सुचत जाईल तसे मुद्दे मांडता येतील आणि त्यावर वेगळी समग्र चर्चा करता येईल.

शुभेच्छा

उपक्रमास, उपक्रमपंतांना आणि उपक्रमींना शुभेच्छा !
चिंतनपर लेख आवडला.
--लिखाळ.

माझ्या अपेक्षा

या संकेतस्थळाकडून आणि सदस्यांकडून माझ्या अपेक्षा काय आहेत त्या पुढे मांडते:

१. या संकेतस्थळाची सदस्यसंख्या वाढवणे. हे काम (ज्या) सदस्यांना आणि व्यवस्थापनाला करण्याची इच्छा असल्यास करता येईल. मी स्वतः असे प्रयत्न करून पाहिले आहेत. सपशेल अपयश हाती आले.

२. गेल्या काही महिन्यांत उपक्रमाकडून संकेतस्थळाकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतील आणि आपण आपल्या कामाची व्यग्रता तपासून पाहता इतरांवर दोषारोप करणे योग्य नाही तरीही मुखपृष्ठ अद्ययावत करणे, थोडेफार सुशोभीकरण करणे, उपक्रमाची इतरत्र प्रसिद्धी करणे हे व्हावे असे वाटते.

३. उपक्रमाचा फाँट बदलून अधिक ठळक फाँट वापरता येईल का?

अपेक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात असा अट्टहास नाही.
सुशोभीकरण करताना पाने उघडण्यास विलंब लागत असेल तर तेवढे जड सुशोभीकरण न केलेले बरे वाटते.

सहमत

सुशोभीकरण करताना पाने उघडण्यास विलंब लागत असेल तर तेवढे जड सुशोभीकरण न केलेले बरे वाटते.
सहमत आहे. मुखपृष्ठावर मजकूर/चित्रे यांना जितके महत्व असते तितकेच महत्व सुटसुटीतपणा/मोकळी जागा यांनाही असते असे वाटते. या दोन्हींचा समतोल साधला गेल्यास उत्तम. गूगलचे मुख्य पान डोळ्यांना आल्हाददायक वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या पानावरची मोकळी जागा.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

प्रियालीचे आवाहन.

श्री. प्रियालींनी २९ मे २००७ ला मला उपक्रमवर येण्याचे आवाहन केले आणि बहुधा त्याच दिवशी मी सदस्यत्व घेतले. त्यापूर्वी अर्थात, उपक्रम म्हणजे काय ते मला माहीत नव्हते.
उपक्रमावर ललित साहित्याला स्थान नसणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्यच आहे, ते जपावे. उपक्रमी असे साहित्य इतर स्थळांवर लिहितातच. ललित नसूनसुद्धा इथले लिखाण वैचारिक लालित्याने संपृक्त असते.
सुशोभीकरण करा किंवा नको. आहे ते साधे आणि सुंदरच आहे. --वाचक्‍नवी

माझ्या अपेक्षा..

माझ्या अपेक्षा....(किंवा तक्रारी) संकेतस्थळाचा सभासद झाल्याच्या पहिल्या दिवसा पासुन आहेत त्याच आहेत. इथली आरबीटरी धोरणे आणि त्यांची विसंगत अंमलबजावणी सदस्यांना बरेच चाचपडायला लावतात. उदा. ह्या संकेतस्थळाच्या सुरुवातीला कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली श्रद्धांजली इथुन काढून टाकण्यात आली होती पण नुकतीच कुणीतरी दादा कोंडके ह्यांना वाहिलेली श्रद्धांजली मात्र अजुन तशीच आहे. धोरणे सुस्पष्ट नसल्याने, 'बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा दादा कोंडके इथल्या व्यवस्थापनाला अधिक महान वाटतात का?' असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.

याचे उत्तर

मला असे वाटते की दादा कोंडके या लेखात लेखकाने दुवा देऊन येथील लेख वाचावेत असे आवाहन केले आहे. केवळ दादा कोंडके म्हान होते त्यांना नमस्कार करा असे सांगितलेले नाही. मी स्वतः (पुण्याची नसल्याने) कधीही स्वतःहून सकाळ उघडत नाही त्यामुळे माझ्यासाठी तो दुवा वाचनीय आणि माहितीपूर्ण ;-) ठरतो.

हं..

अहो (मग त्याच न्यायाने) मी बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतीथी देखिल विसरुन गेलो होतो. माझ्या सारख्याला त्या प्रस्तावामुळे ती 'माहिती ' मिळाली ना! तसेच इथल्या जाणकार सभासदांच्या प्रतिसादातुन बाबासाहेबांच्या विषयी अजुन काय काय 'वाचनीय माहिती' मिळाली असती.. त्याला पण मी मुकलो ना!..पण त्यात कोणताही दुवा मात्र नव्हता हे मात्र खरं..म्हणजे थोडक्यात लेखनामध्ये एखादा दुवा असला तरच श्रद्धांजलीचे लेख पास होतात असे धोरण आहे का? ..हरकत नाही तसे इथल्या व्यवस्थापनाने स्पष्ट करावे..अन्यथा इथल्या व्यवस्थापनाचा बाबासाहेब आंबेडकरांवर आकस आहे असाच अर्थ निघतो.
--------------------------------------------------------------------------------------------------
ह्या लेख लिहुन अमेरिकेत/भारतात/जागाच्या कुठल्याही काना कोपर्‍यात सकाळ/दुपार/संध्याकाळ/रात्र सगळे घडून गेले तरी मा.उपक्रमराव अजुन आलेले नाहित.. चित्रा ताईंनी उल्लेखलेली ती दोन टोके म्हणजे हेच काय?

सहमत..

कोलबेररावांशी सहमत आहे!

अवांतर १) - प्रियालीदेवी इथल्या संपादक मंडळात आहेत किंवा कसे? नाही, म्हणजे असतील तर उपक्रमपंतांसोबत उपक्रमाच्या संपादक मंडळातील एक सदस्या या नात्याने आम्ही त्यांचेही हार्दिक अभिनंदन करू इच्छितो! उत्तराची अपेक्षा आहे!:)

अवांतर - २) आमच्या रौशनी या लेखमालेचा पहिलाच भाग उपक्रमावरून अवघ्या दोन मिनिटांच्या आत उडवला गेला होता. रौशनी हे एका विशिष्ठ समाजवर्गाबद्दल काही माहितीप्रद लेखन आहे अशी आमची समजूत होती परंतु उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या निकषांत हे लेखन बसले नाही याचा आम्हाला खेद वाटतो!

असो....!

आपला,
(स्मरणशील!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

रोशनी...

मला वाटते, रोशनी हे ललित लेखन आहे. उपक्रमपंतांनापण तसेच वाटले असणार. साहजिकच त्याला इथे थारा नाही असे ठरले असावे.--वाचक्‍नवी

अहमदसेलरची खाद्यस्पर्धा...

मग अहमदसेलरची खाद्यस्पर्धा... हे देखील ललित लेखनच होते मग त्याला इथे थारा कसा काय दिला गेला हे तरी सांगावे!

व्यक्तिगत रोखाचा अनावश्यक मजकूर संपादित - संपादन मंडळ

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अभिनंदन

पहिले प्रथम धन्यवाद, ही चर्चा सुरू केल्याबद्दल. आणि उपक्रमाला धन्यवाद.

गेल्या वर्षभरात इतर संकेतस्थळांपेक्षा वेगळी ओळख (याला माहितीपूर्ण लिखाणासोबत खरडवह्या हेही एक मुख्य कारण :-) ) निर्माण करण्यात उपक्रमास यश आले आहे असे वाटते. उपक्रमाचे उद्देश सुरूवातीस स्पष्ट नसले तरी आता बर्‍यापैकी समजू लागले आहेत (असे वाटते!). आता एक वर्ष होत आल्याने उपक्रमकारांनी त्यांच्या बाजूने काही विचार मांडले तर ते ऐकायला आवडतील. कुठच्याही संकेतस्थळाच्या चालकांनी सतत आपले अधिकार गाजवणे तसेच कधीच काही संवाद न साधणे ही दोन्ही टोके जाणीवपूर्वक टाळली पाहिजेत असे वाटते ( हे बोलायला सोपे आहे, करायला कठीण आहे हे समजते, पण प्रयत्न हाच असला पाहिजे).

मागे मनोगतावर काही तांत्रिक बिघाड झाले होते. तसे होऊ नयेत म्हणून माहिती साठवून ठेवण्याचे जर काही प्रयत्न केले असले तर ते जरूर लिहावेत - इथले आपले लेख तर आपण साठवून ठेवतो, पण त्याला आलेले प्रतिसादही माहितीपूर्ण असतात. तेही टिकले पाहिजेत असे वाटते. याने संकेतस्थळांची विश्वासार्हता टिकेल.

त्याचबरोबर "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!" हे ध्येय असल्याने या स्थळाचा प्रत्यक्ष ठोस कामासाठी काही उपयोग झाला पाहिजे अशी उपक्रमकर्त्यांची समजूत होती असे वाटले होते. पण उपक्रमकर्त्यांच्या मनात असेच किंवा काही वेगळे असले तरी ते शेवटी सदस्य कसा विचार करतात ते त्या सदस्यांवर, त्यांच्या व्यक्तीगत पातळीवर होणार्‍या माहिती किंवा विचाराच्या देवाणघेवाणीवर अवलंबून राहील. अशाच देवाणघेवाणीतून जर एखादा खरेच प्रकल्प उभा राहिला असल्यास त्याबद्दल त्या त्या सदस्यांनी लिहावे अशी विनंती. सदस्यांनी प्रत्यक्ष एकत्र देवाणघेवाण किंवा प्रकल्प केले नाहीत तरी दुसरे लोक काय करत आहेत हे कळले तर निदान पुढच्या लोकांच्या अशा इच्छांना चालना मिळेल असे वाटते (बरेचदा लोकांना काही करायचे असते पण काय करायचे ते कळत नसते).

प्रियालीच्या म्हणण्याशी सहमत आहे की सदस्यसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अन्यथा तेच तेच लोक सतत एकमेकांना प्रतिसाद देत राहिले तर हळूहळू कंटाळा येईल असे वाटते. पण कितीही कामात असले तरी बहुसंख्य सदस्यांना उपक्रम रोज बघावेसे वाटते हे या संकेतस्थळाचे यश आहे असे वाटते. ह्या भावना भविष्यातही अशाच राहोत अशी शुभेच्छा!

सहमत

वरील प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहमत / शुभेच्छा

चित्रा यांच्याशी सहमत.
उपक्रमाला शुभेच्छा! :)
राधिका

सहमत

खालील मुद्द्यांशी सहमत आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  1. कुठच्याही संकेतस्थळाच्या चालकांनी सतत आपले अधिकार गाजवणे तसेच कधीच काही संवाद न साधणे ही दोन्ही टोके जाणीवपूर्वक टाळली पाहिजेत असे वाटते
  2. मागे मनोगतावर काही तांत्रिक बिघाड झाले होते. तसे होऊ नयेत म्हणून माहिती साठवून ठेवण्याचे जर काही प्रयत्न केले असले तर ते जरूर लिहावेत - इथले आपले लेख तर आपण साठवून ठेवतो, पण त्याला आलेले प्रतिसादही माहितीपूर्ण असतात. तेही टिकले पाहिजेत असे वाटते.

सहमत, उपक्रमींकडून अपेक्षा

>> प्रियालीच्या म्हणण्याशी सहमत आहे की सदस्यसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अन्यथा तेच तेच लोक सतत एकमेकांना प्रतिसाद देत राहिले तर
>> हळूहळू कंटाळा येईल असे वाटते. पण कितीही कामात असले तरी बहुसंख्य सदस्यांना उपक्रम रोज बघावेसे वाटते हे या संकेतस्थळाचे यश आहे असे वाटते.

सहमत आहे. माझी उपक्रमींकडून एक अपेक्षा आहे, अपेक्षा नाही विनंती आहे की त्यांनी प्रतिसाद देण्यात कंटाळा करू नये. बरा-वाइट कसाही असो पण प्रतिसाद देत राहिल्याने लेखकांचा हुरूप वाढतो, आपल्याला असलेली एखादी छोटिशी पण महत्त्वाची अतिरिक्त माहिती चर्चेत मोलाची भर घालू शकते.

धन्यवाद...पण..

माझी उपक्रमींकडून एक अपेक्षा आहे, अपेक्षा नाही विनंती आहे की त्यांनी प्रतिसाद देण्यात कंटाळा करू नये. बरा-वाइट कसाही असो पण प्रतिसाद देत राहिल्याने लेखकांचा हुरूप वाढतो, आपल्याला असलेली एखादी छोटिशी पण महत्त्वाची अतिरिक्त माहिती चर्चेत मोलाची भर घालू शकते.

नवीन, तुमचे म्हणणे १००% मान्य. प्रतिसादांनी हुरुप येतो परंतु प्रतिसाद आले नाहीत म्हणून लिहिणे सोडू नका. होतं काय की कधीतरी विषय आपल्या आवडीचा किंवा माहितीचा नसल्याने लोक गप्प राहतात. लेखकाचा उपमर्द करण्याचा हेतू नसतो, पण आपलेच अज्ञान उघडे पडेल का काय असे वाटत असते. (उदा. राजकारणाचा विषय निघाला की मी अळीमिळी गुपचिळी करते कारण त्यात मला जराही रूची नाही आणि त्यामुळे फारशी माहितीही नाही.)

दुसरे असे की कधीतरी "छान..छान आवडलं" एवढेच म्हणायची लोकांची तयारी नसते (म्हणजे आपण एखाद्याची खोटी खोटी प्रशंसा करतोय का काय असे वाटू शकते किंवा ह्य्! नुसतंच आवडलं काय सांगायचं? असंही असू शकते) आणि असे अनेक प्रकारचे विचार माणसांच्या मनात असतात.

तेव्हा, प्रतिसाद आले नाहीत म्हणून खट्टू होऊ नका. हळूहळू आपल्याला काय लिहायचे याचबरोबर लोकांना काय आणि कसे वाचायचे आहे हे कळू लागते आणि मग लोक प्रतिसाद देऊ लागतात. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे, तुम्हालाही लवकरच प्रचीती येईल अशी आशा करते.

अभिनंदन आणि शुभेच्छा!

उपक्रमाच्या प्रथम वर्षपुर्ती निमित्त माझ्याकडून ही शुभेच्छा! मला वाटणारे बरेचसे मुद्दे वर आले असल्याने परत लिहीत नाही. जरी कधी कधी सभासदांना काही बाबतीत संपादकांकडून धोरणांबाबत अथवा त्यांच्या संपादनाबाबत नाराजी वाटली असली तरी मला येथे लेखनस्वातंत्र्याला (अर्थात त्यांनी ठरवलेल्या घटकांसंदर्भात - म्हणजे ललित, काव्य आदी सोडून) कधी धक्का लावलेला अथवा त्यात चुकीच्या पद्धतीने ढवळाढवळ केल्याचे दिसले नाही. त्याच प्रमाणे त्यांना जे येथे योग्य वाटले नाही त्या संदर्भात निकाल देताना सांगून दिला आहे असे दिसते. हा भाग महत्वाचा वाटतो.

बाकी संकेत स्थळ जसे आहे तसे ठेवले म्हणून काही बिघडणार नाही, पण त्यात नवनवीन सभासदांनी येऊन भर घातली तर आमच्यासारख्यांना पण विविध विषय कळतात, तसेच व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणजे काय हे संगणकासमोर बसून संवाद करता करता सहज साध्य होते.

हा संवाद वृद्धींगत होत राहोत ही शुभेच्छा!

शुभेच्छा!..

उपक्रमपंतांना आणि उपक्रमाला माझ्या व्यक्तिगत आणि संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा!

-- तात्या अभ्यंकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

माझ्याही शुभेच्छा!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
उपक्रमाने एक वर्ष (आणि इतर बर्‍याच सभासदांबरोबर मीही एक वर्ष पूर्ण केलेय) पूर्ण केल्या बद्दल उपक्रमपंतांचे आणि ह्या संकेतस्थळावर सातत्याने माहितीपूर्ण लेख/चर्चाप्रस्ताव/कूटप्रश्न लिहिणारे,चर्चा करणारे,चर्चा भरकटवणारे,वादग्रस्त विधाने करणारे, भांडणारे, चिडणारे, चिडून इथून निघून जाण्याची प्रतिज्ञा करणारे आणि त्यांची समजूत पटवून पुन्हा त्यांना इथे येण्यास प्रवृत्त करणारे, निव्वळ वाचनमात्र असणारे आणि क्वचित प्रसंगी आपल्याही मताची पिंक टाकणारे(माझ्यासारखे),एकमेकांच्या खरडवह्या भरणारे आणि त्या वाचण्यात आनंद मानणारे(इथेही माझ्यासारखे) अशा सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन.

ह्या संकेतस्थळामुळे माझा झालेला व्यक्तिगत फायदा म्हणजे "धनंजय" ह्यांच्यासारखे एक बहुआयामी असूनही अत्यंत नम्र असणारे ;तसेच लेख/प्रतिसाद/चर्चा ह्यांद्वारे माहितीपूर्ण आणि संयत लेखन करणारे असे एक व्यक्तिमत्व मला इथे भेटले.

अजूनही काही वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तींची त्यांच्या लेखनाद्वारे इथे ओळख झाली. त्यात प्रामुख्याने यनावाला(कूटप्रश्न),प्रकाश घाटपांडे(ज्योतिष), चित्रा(अमेरिकन घरे),विकास(पर्यावरण आणि एकंदरीत जागतिक राजकारण) ह्यांची नावे घेता येतील.

इथे असणार्‍या बहुसंख्य सदस्यांना मी त्यांच्या वैशिष्ठ्यांसह मनोगतापासून ओळखतो म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नाहीये.
ह्या संस्थळावर मी स्वतः काही लिहू शकत नसलो तरी वाचनानंद मात्र भरपूर अनुभवत असतो.
भावी वाटचालीसाठी उपक्रमाला,उपक्रमपंतांना आणि समस्त सदस्य बंधु-भगिनींना माझ्या मनःपूर्वक सदिच्छा!

शुभेच्छा

पंत, त्यांचा हा उपक्रम आणि 'उपक्रम'च्या सदस्यांना प्रथम वर्षपूर्तीच्या अनेक शुभेच्छा!!

उपक्रम

बाळ वर्षाचे झाले!!! "उपक्रम" दिवसाचा अविभाज्य घटक बनला आहे. लहान मुले सगळ्यांनाच आवडतात नाही का? त्यामुळे चालु दे जे चालले आहे ते. अजुन काही वर्षाचा "घोडा झाला" उपक्रम, की मग बघु. आता तरी काही अपेक्षा नाहीत की मागण्या नाहीत. कालानुरुप उपक्रमाची बांधणी करायला उपक्रमपंत व त्यांचे सहकारी समर्थ आहेत.

गेल्या वर्षभरात एकंदर चुका मोजल्या तर सदस्यांनी केलेल्या उपद्रवापुढे उपक्रमवाल्यांच्या चुका खुपच कमी भरतील.

असो एकंदर बरे चालले आहे. उपक्रम हटके आहे हे निश्चित! खुप चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या, वेगवेगळ्या विषयावर माहीती व मते मिळतात त्याबद्दल "उपक्रम"च्या पालकांचे, कुटूंबाचे आभार!!

अनेक शुभेच्छा!!

हेच

आता तरी काही अपेक्षा नाहीत की मागण्या नाहीत.
उपक्रमाचे दृष्य स्वरूप बदलू नका अशी कळकळीची विनंती बाकी करतो. चित्रे नकोत!

आपला
गुंडोपंत

आत्महत्या

आजपर्यंत तरी, उपक्रमावर सदस्य एकमेकांना सांभाळून घेताना वारंवार दिसत आले आहेत आणि यापुढेही हा समतोल राखला जावा अशी सदिच्छा व्यक्त करावीशी वाटते.

संपुर्णपणे सहमत, मलाही असेच वाटते. राग लोभ रुसवे फुगवे असणारच.
मात्र तेव्हढीच प्रेमळ मंडळीपण इथे आहेत यात शंका नाही.
दोन चार दिवस एखाद सदस्य दिसला नाही तर त्याचे हमखास पणे चौकशी होतेच.

सदस्यांनी हवे तितके भांडावे पण रागावून आत्महत्या मात्र करू नयेत असे मला परत परत सांगावेसे वाटते.मगदीच वाईट वाटले तर काहीकाळ समाधीवस्था घ्यावी... ;)))
म्हणजे राग गेल्यावर परत येण्याचा मार्ग मोकळा... ;)

आपला
गुंडोपंत

उपक्रमाची वर्षपूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हा लेख तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद हृद्य आहेत. उण्यापुर्‍या एकवर्षाच्या कालावधीत लेखनातून आपणा सर्व जणात अनुबंध निर्माण झाले आहेत. ते टिकावे.
२/प्रियाली लिहितातः ". या संकेतस्थळाची सदस्यसंख्या वाढवणे. हे काम (ज्या) सदस्यांना आणि व्यवस्थापनाला करण्याची इच्छा असल्यास करता येईल. मी स्वतः असे प्रयत्न करून पाहिले आहेत. सपशेल अपयश हाती आले."
माझा अनुभवही असाच आहे. तरीपण सदस्यसंख्या वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मला वाटते मराठी टंकलेखन ही एक प्रारंभीची अडचण असावी.
ते उच्चारानुसारी असल्याने सोपे आहे हे पटवायला हवे.

धन्यवाद आणि शुभेच्छा

आनंदाचे वर्ष आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल मनापासून धन्यवाद ... भविष्यकाळातील आनंददायी वाटचालीसाठी शुभेच्छा

एकलव्य

धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा!

अरे वा!.. वर्षपुर्तीबद्दल वाचून आनंद झाला :)
ह्या संकेतस्थळाबद्दल अनेक आभार...
वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन. आणि पुढिल वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

-(उपक्रमी) ऋषिकेश

सहमत

ऋषिकेश यांच्या मताशी सहमत. नेमकी धोरणे आणि त्यांच्याशी ठाम राहण्याची वृत्ती या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या आहेत. या बाबतीत विकिपीडिया व उपक्रम या दोन संकेतस्थळांबद्दल मला कुतुहलमिष्र्त आदर वाटतो.

धन्यवाद!

उपक्रमाची वर्षपूर्ती ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. वर्षपूर्तीनिमित्त सर्व सदस्यांना आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!

गेले वर्षभर वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन, चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण करून सर्व उपक्रमींनी उपक्रमाच्या वाटचालीत अतिशय मोलाचा हातभार लावला आहे. यापुढेही सर्व उपक्रमींनी आपल्या आवडीच्या, अभ्यासाच्या विषयांवर आणि अनुभवांवर आधारित अधिकाधिक लेखन करीत राहावे अशी पुन्हा एकदा विनंती. उपक्रमींनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या लेखांना इतर उपक्रमींनी नेहमी दाद दिली आहे, अश्या लेखनाला आणि लेखकांना प्रोत्साहित केले आहे, तसेच विविध विषयांवर अतिशय प्रगल्भ आणि माहितीपूर्ण चर्चा उपक्रमावर होत आहेत. याबद्दल सर्व उपक्रमी सदस्य आणि वाचकांचे हार्दिक अभिनंदन!

उपक्रमाच्या वर्षभरातील वाटचालीचा सुंदर आढावा घेणार्‍या या चर्चा प्रस्तावाबद्दल आणि प्रतिसादांतील कौतुकाबद्दल धन्यवाद! उपक्रमाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा,उपक्रम अधिकाधिक चांगले बनवण्यासाठीच्या सूचना यांची अतिशय काळजीपूर्वक दखल घेऊ याची खात्री असू द्यावी.

पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे, वाचकांचे आणि हितचिंतकाचे आभार. उपक्रमाच्या वाटचालीत वेळोवेळी शक्य ती सर्व मदत करणार्‍या सहकार्‍यांचे विशेष आभार.

थ्री चीअर्स् !

उपक्रमराव आणि वासीयांचे अभिनंदन. या स्थळावर अधिकाधिक मराठी लोक येवोत ही सदिच्छा. जितक्या विविध प्रकारच्या दृष्टिकोनांना येथे वाव मिळेल, तितके हे व्यासपीठ समृद्ध होत जाईल."संवादातून (प्रसंगी वादातूनसुद्धा !) तत्वबोध" हे पुरातन तत्व केवळ तत्व म्हणूनच माहित होते ; त्याच्या प्रत्यक्ष सिद्धीचे श्रेय 'उपक्रमा'सारख्या गोष्टीना जाते. पुन्हा एकदा , आभार आणि अभिनंदन !

वर्षपूर्तीनिमित्त अभिनंदन

पुढील वाटचाल अशीच भरभराटीची होवो!

अभिनंदन!

वर्षपूर्तीनिमित्त उपक्रमाचे आणि उपक्रमी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! उपक्रमामुळे वेगवेगळ्या विषयांवर मराठीतून चांगले वाचायला मिळते, अनेक माहितगार लोकांकडून सहजासहजी मिळू न शकणारी माहिती मिळते. उपक्रमावर चाललेल्या चर्चा माझ्या विशेष आवडीच्या असल्या तरी लेख लिहिणार्‍या उपक्रमींविषयी मला नेहमी कौतुकमिश्रित आदर वाटतो.
दिसामाजि काही तरी ते लिहावे ... आणि ... अखंडित वाचीत जावे! उपक्रमाला आणि उपक्रमींना अनेकोत्तम शुभेच्छा.

अभिनंदन

उपक्रम आणि उपक्रमींचे वर्षपूर्तिबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सोनाली

हार्दिक अभिनंदन

वर्षपूर्तीच्या निमित्ताने उपक्रमचे आणि उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन!

स्नेहांकित,
शैलेश

 
^ वर