अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१

राम राम मंडळी,

आज मी तुम्हाला एका खाद्यस्पर्धेची गोष्ट सांगणार आहे.

'नल्या लळीत' हा एक वेगळाच विषय आहे. त्याचं मूळ नांव नलीन लळीत. पण आख्खी दुनिया त्याला 'नल्या' म्हणून ओळखते. हा नल्या माझा दोस्त. अगदी जिवाभावाचा. सुखातही साथ करणारा आणि दु:खातही पाठीवर हात ठेवणारा! पण मंडळी, सदरच्या लेखाचा 'नल्या लळीत' हा विषय नसल्यामुळे, आमचं नल्यापुराण आम्ही पुन्हा कधितरी सवडीने ऐकवू.

तर सांगत काय होतो? हां, तर हा नल्या लळीत दादरच्या अहमदसेलर चाळीत राहतो. दादरला हिंदमाता (किंवा भाईकाकांची व्हिंदमाता !) सिनेमाच्या गल्लीत फार पुरातन अश्या 'अहमदसेलर' नांवाने ओळखल्या जाणार्‍या ८ चाळी आहेत. अगदी बटाट्याच्या चाळीसारख्याच! नळावरची भांडणे, इतर कुटुंबवत्सल सुखदु:खं, जिन्यातली प्रेमप्रकरणं, सारं काही जिथं एकत्रीतपणे, सुखासमाधानाने गेली अनेक वर्षे नांदत आहे अश्या अहमदसेलरच्या ८ चाळी!

मी गेली अनेक वर्षे नल्याकडे जायच्या निमित्ताने या चाळीत जातो आहे. नल्या चाळ नं २ मध्ये राहतो. चाळीचा सार्वजनिक गणेशोत्सव चाळ दरवर्षी साजरा करते. त्यानिमित्ताने गाण्याचा कार्यक्रम, चाळकऱ्यांच्या कुठल्या कुठल्या स्पर्धा, असे नाना कार्यक्रम चाळीत सुरू असतात. सर्व चाळकरी मोठ्या उत्साहाने या सर्वात भाग घेऊन गणेशोत्सव साजरा करतात. एकेवर्षी या निमित्ताने माझं गाणंही चाळकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने आणि संयमाने(!) ऐकून घेतलं! बाहेरच्या कॊमन व्हारांड्यात मस्तपैकी गाण्याची बैठक जमली होती. अगदी जिन्यामध्येही दाटिवाटीने माणसं बसली होती. खूप धमाल आली होती. नल्यानेच ठेवलं होतंन माझं गाणं. तसं नल्याला गाण्यातलं फारसं काही कळत नसल्यामुळे नल्या मला खूपच मानतो! ;) तसा आमचा नल्याही मोठा गवय्या बरं का! 'प्रथम तुझं पाहता', 'मर्मबंधातली ठेव ही' वगैरे गाणी बिनधास्त हाणतो आणि चाळीतल्या पोरीबाळींसमोर भाव खातो! ;) असो!

असंच एक वर्ष. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला होता. त्याच दरम्यान एके दिवशी नल्या ठाण्याला माझ्या घरी हजर झाला.

"तात्या, तुझ्याकडे एक काम आहे. करशील का बोल?"

"काय?"

"यंदा चाळीच्या गणेशोत्सवात चाळीतल्या बायकांची खाद्यस्पर्धा घ्यायचं ठरवलं आहे. मी स्पर्धा समितीवर आहे. तू लेका खाण्यापिण्याचा शौकीन आणि चोखंदळ माणूस! खाद्यस्पर्धेकरता परिक्षक म्हणून येशील का?"
'मधल्यावेळचं खाणं/अल्पोपहाराचे पदार्थ' हा स्पर्धाविषय आहे. दुसऱ्याही एक बाई आहेत. त्या आणि तू, तुम्ही दोघे परिक्षक! येशील का बोल? ठाणा-दादर परतीचं तिकिट आणि मानधन म्हणून शंभर रुपये मिळतील!"

आयला! आपण तर साला ही ऒफर ऐकून एकदम खूश झालो! खाद्यस्पर्धेचा परिक्षक! वा वा, म्हणजे निरनिराळे पदार्थ खायला मिळणार! बरं, स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक गृहिणीने आपापला खाद्यपदार्थ जास्तीत जास्त उत्तम करण्याचा प्रयत्न केला असणार. त्या प्रत्येक खाद्यपदार्थाची मी मोठ्या ऐटीत चव घ्यायची, थोडा भाव खायचा, आणि सांगायचं कुणाचा नंबर पहिला ते! ;)
आणि च्यामारी एवढं सगळं खाऊन, वर शिवाय शंभर रुपये मिळणार! हिंदीत 'सोने पे सुहागा' का कायसं म्हणतात तेच की हो! ;)

मी नल्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता! साला एवढी चांगली ऒफर कोण सोडतो? ;) मी मोठ्या आतुरतेने गणपतीची वाट पाहू लागलो.

वेळेवारी बाप्पा आले. चाळीतला गणेशोत्सव सुरू झाला. स्पर्धेचा दिवस येऊन ठेपला आणि दुपारच्या सुमारास तात्या अभ्यंकर निघाले अहमदसेलर चाळीत जायला! खाद्यस्पर्धेचे परिक्षक म्हणून!

निघण्यापूर्वी घरातल्या देवापुढे मी मोठ्या भक्तिभावाने प्रार्थनाही केली होती,

"देवा गणपतीराया, सर्व स्पर्धक साळकाया माळकायांना यश दे रे. प्रत्येकीचा पदार्थ अगदी उत्तम होऊ दे " ;)

(भाग दोन बराचसा लिहून तयार आहे. लवकरच पूर्ण करून येथे टाकतो.)

आपला,
(स्पर्धा परिक्षक!) तात्या.

Comments

लवकर टाका

भाग दोन बराचसा लिहून तयार आहे. लवकरच पूर्ण करून येथे टाकतो.

लवकर लवकर टाका. :)

सुंदर!

अतिशय प्रांजळ आणि मनमोकळं लेखन. शैलीही उतम आहे.
हा लेख वाचला आणि ह्या साईटची सदस्य झाले. ही साईट खूप छान वाटते आहे.

ईश्वरी.

वा वा तात्या

वा वा तात्या,

क्या बात कही हे ! मजा आली वाचून.

गेले अनेक महीने तुझ्या चटकदार लेखनाला पारखा झालो होतो. कारणे तुला माहित आहेत.

आता उपक्रमकारांच्या कृपेने तो योग पुन्हा जुळून आलाय.

उपक्रमकारांना धन्यवाद आणि तुलाही.

पुढील भागाची वाट पहातो आहे. पुढील भागात चटकदार पदार्थच की बाई पण?

लवकर पुढील भाग पाठव.

आपला,
(उत्कंठित) धोंडोपंत

धोंडोपंतांशी

एकदम सहमत..
लवकर येउ दे पुढचा भाग..
केशवसुमार..

तात्या टच!

लेखाला नेहमीप्रमाणे खास 'तात्या टच' आहे. सुरेख व दिलखुलास लेखन! बरेच दिवसांनी तात्यांच्या शैलीतला लेख वाचायला मिळाला. खाद्यस्पर्धेचं पुढे काय झालं तेही लवकर लिहा. कुठल्या पदार्थाला प्रथम बक्षिस मिळालं? :)

काय तात्या? हल्ली आहात कुठे? बरेच दिवसात मनोगतावर दिसला नाहीत. आणि आता एकदम इथे दिसताय! मनोगत गाजवून झालं, आता उपक्रम गाजवणार वाटतं!

माधवी.

मस्त आहे

पुढचा भाग लवकर येऊ द्या..

आने दो

तात्या नशीबवान आहात हं........ काय काय खाल्लंत कळू दे लवकर :)

पुढचा भाग येऊ दे मगच प्रतिसाद टाकतो...

अरे, सगळं इथंच लिहून झालं, मग प्रतिसादात काय लिहिणार?

सन्जोप राव

वा !

पुढचा भाग लवकर टाका :)

अच्छा..

अच्छा है..
आगे काय झालं बेटा? ते पण लिहा.

जय हो तात्याखादाड!
जय भोलेनाथ!

बाबा त्रिकाल!

पुढे काय?

पुढे काय झालं? कोणाला बक्षिस मिळालं?

पल्लवी

वाट पाहत आहोत..

तात्या, दुसरा भाग पण तयार आहे ना? टाका की लवकर ..

आभार..

सर्व प्रतिसादींचे मनपासून आभार..

तात्या, दुसरा भाग पण तयार आहे ना? टाका की लवकर ..

दुसरा भाग थोडासाच लिहायचा राहिला आहे, आज किंवा उद्याकडे प्रसिद्ध करतो..

तात्या.

मस्त हं तात्या.

तात्या स्पर्धा झाली की नाही,मी वाट पहातोय.

 
^ वर