मराठीतली फार्शी-१

मराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.

उदाहरणार्थ, 'परागंदा'.परागंदा हा शब्द मला संस्कृत वाटायचा. आपला 'परागंदा' परांगदन ह्या फार्शी धातूपासून (फार्शीत धातूला मस्दर म्हणतात) तयार झालेला आहे, हे मला फार्शी भाषेचे आरंभिक धडे गिरवायला सुरुवात केल्यावर कळले. मराठीत जसे धातूच्या, क्रियापदाच्या शेवटी 'णे' असते, तसे फार्शीत मस्दराच्या शेवटी 'न' असते. फार्शीत धातूच्या रूपांना 'आ'कार देऊन नाम तयार करतात. 'परागंदा' हे असेच नाम आहे. 'परागंदन' म्हणजे 'विपरीत परिस्थितीमुळे घरापासून दूर जावे लागणे' अशी ज्याच्यावर परिस्थिती येते तो 'परागंदा' होतो.

आता दुसऱ्या प्रकारच्या शब्दांकडे लक्ष देऊ. फार्शीत 'शिकस्तन' हा आणखी एक धातू आहे. पूर्वीच्या काळी फार्शी ही राज्यभाषा होती आणि ती 'शिकस्ता' ह्या लिपीत लिहिली जायची. ही शिकस्ता लिपी म्हणजे फार्शी लिपीची नुक्ते नसलेली आवृत्ती. 'शिकस्ता' लिपीतले कागद वाचताना बरेच अंदाज लावायचे असतात आणि बरेच समजून घ्यायचे असते. ह्या 'शिकस्ता'ची मराठी बहीण 'मोडी'. 'शिकस्तन' ह्या धातूचा अर्थ 'मोडणे', 'तुटणे' हे लक्षात घेतले तर 'मोडी' म्हणजे 'शिकस्ता' हे लक्षात यायला वेळ लागणार नाही आणि हा सुंदर शब्द घडविणाऱ्याला मनापासून दाद द्यावीशी वाटेल.

चित्तरंजन भट

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपूर्ण / शिकस्त

लेख माहितीपूर्ण आहे. 'शिकस्तन' वरून 'शिकस्त' हा शब्द आठवला. शिकस्त देणे म्हणजे मोडणे असा अर्थ होतो का?

शैलेश

शिकस्त

शिकस्त देणे हा शब्द सहसा जुन्या इतिहासात सापडतो. शिकस्त देणे म्हणजे पराभव करणे असे वाटते. परंतु तो वेढा तोडणे, नावा, जहाजे, भींती, तटबंदी तोडणे अशा अर्थीही वापरला गेला असावा असे वाटते त्यामुळे तोडणे मोडणे यांच्यासंबंधित वाटतो.

चू.भू.द्या.घ्या.

शिकस्त

चित्त, प्रियाली
प्रयत्नाची शिकस्त केली असंही म्हणतात ना.......!

शर्थ, शर्यत, शिकस्त

प्रयत्नांची शिकस्त म्हणतात ना. शर्थ केली, असेही आपण म्हणतो. ह्या मराठी शर्थीचा आणि शर्यतीचा शर्तशी संबंध आहे की काय असे वाटते. असेलही. पण खातरजमा केलेली बरी. कुणाला नेमका मूळ शब्द माहीत असल्यास जरूर सांगावे.

चित्तरंजन

शर्त, शर्थ, शर्यत, शिकस्त

शर्त हा अरबी शब्द. अर्थ पैज. शर्यत त्याचे अनेकवचन, अर्थ -मोठी शर्त. शर्थ 'शर्त 'चा मराठीत रूढ झालेला अपभ्रंश. अर्थ- पराकाष्ठा.
शिकस्त फार्सी. अर्थ- मोडका, पराभूत; मोडकी अवस्था,पराभव. मराठीत अर्थ बदलून शर्थ झाला. चु.भू.द्या.घ्या.--वाचक्‍नवी

आणखी एक अर्थ

स्टाइनबेकच्या प्रसिद्ध पर्शियन-इंग्लिश डिक्शनरीत शिकस्तनचा अर्थ वळविणे, वाकविणे (टू कर्ल, टू बेंड) असाही दिला आहे. शिकस्तात लिहिताना अक्षरे वळविण्याचे, वाकविण्याचे बरेच स्वातंत्र्य असतो. त्यामुळे हा अर्थही जवळचा वाटतो.

आणखी

माहिती आवडली. आणखी सांगावे.
प्रयत्नांच्या शिकस्तीतला शिकस्त तो हाच आहे का?

फार्शी

'परागंदा' मध्यपूर्वेतून आला असावा असे का कोण जाणे वाटत होते. 'शिकस्ता' चे 'मोडी'मध्ये रूपांतर मात्र विलक्षण आहे.

पूर्वीच्या काळी फार्शी ही राज्यभाषा होती आणि ती 'शिकस्ता' ह्या लिपीत लिहिली जायची.

फार्शी मूळची पर्शियातली काय? कोणाच्या राज्यात ही राज्यभाषा होती?

मला वाटतं

>>'शिकस्ता' चे 'मोडी'मध्ये रूपांतर मात्र विलक्षण आहे.

हेच.

पर्शिया हा शब्द ग्रीको रोमन संस्कृतीची देणगी आहे. मूळ प्रांत फार्श किंवा फार्स असा होता जो इराणच्या दक्षिणेकडे पर्शियन आखाताजवळ आहे असे वाटते. ही मूळ भाषा तेथील असावी.

सायरस द ग्रेट आणि दरायसच्या वेळेस लिखित स्वरुपात ही भाषा आढळते म्हणजे तिचे मूळ याही पूर्वीचे असावे.

चित्तरंजन, म्हणूनच तुम्ही "फार्शी" असा शब्द लिहित आहात का? (मी सहसा फारसी असे लिहिलेले पाहिले आहे पण फार्शी नाही.)

धन्यवाद

प्रियालीताई, फारसी आणि फारशी दोन्ही शब्द आहेत. तुम्ही दिलेली माहिती बरोब्बर आहे. धन्यवाद. इस्लामच्या आगमनापूर्वी बहुतेक ही पहेलवी लिपीत लिहिली जायची.
चित्तरंजन

धन्यवाद/आणखी प्रश्न

प्रियालीताई आणि चित्तरंजन माहितीबद्दल धन्यवाद!
विकिपीडियानुसार फार्शी/पर्शियन भाषेचे मूळ इ.स.पूर्व ५०० वर्षांपर्यंत जाते म्हणे. मग शक/पह्लव यांच्यामार्फत तिचा भारतीय उपखंडातील भाषांवर प्रभाव पडला असणे शक्य आहे. पह्लवांची पार्शी (पह्लवी) मध्यपूर्वेतील इस्लामी आक्रमणात मृतप्राय झाली असेही समजते. त्यामुळे इस्लामी आक्रमणाआधी झालेली भाषिक देवाणघेवाण शोधणे आता अवघड आहे असे वाटते. पण आधुनिक फार्शीचा भारतात प्रवेश कधी आणि कुणामुळे झाला?

फार्शीचा प्रवेश

नक्की कधी झाला हे मला सांगता येत नाही परंतु पुरातन कालापासून या मार्गावर व्यापारी देवाणघेवाण असल्याने शब्दांची देवाणघेवाण नक्कीच होत असावी तेव्हा काही हजार वर्षांपूर्वीचा काळ असावा असे वाटते. फार्शीचा खरा प्रसार मात्र मुघल काळात झाला असे वाटते.

अलेक्झांडरने सिंधू या शब्दाचे ग्रीकीकरण करून त्याला इंडस केले तसेच फार्शीमुळे सिंधूचे हिंदू झाले असा इतिहास वाचायला मिळतो पण सिंधूचे हिंदू नेमके कोणत्या काळात झाले असावे याबाबत विशेष माहिती नाही, आपणही स्वतःला कधीपासून हिंदू या शब्दाने संबोधू लागलो? कोणाकडे माहिती असल्यास कृपया सांगावे.

सुबुक हिंदी

फारशीचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं, सल्तनतीच्या काळापासून सुरू झाला. फारशी परंपरा आणि संस्कृती तेव्हा अमीर-उमरावांत. फॅशनेबल होती. भारतात जी फारशी बोलली लिहिली जायची तिला सुबुक हिंदी म्हणायचे. सुबुक म्हणजे मराठीतले सुबक बहुधा. अमीर खुसरोची फारसी ही सुबुक हिंदी होती.

चित्तरंजन

आधीच्या एका प्रतिसाद मी फरासखान्याचा उल्लेख केला होता. ह्या फरासखान्याचा संबंध फर्श, फर्राश शी असावा.

सल्तनत काळात

एक सहज प्रश्न डोक्यात आला.

सल्तनत काळात फार्शीचा प्रचार आणि प्रसार झाला असे धरले तर तत्कालिन मराठीत तो प्रवेश केव्हा झाला असावा? म्हणजे उपलब्ध संतसाहित्य इ. मध्ये फार्शी शब्द दिसतात का? (शब्दांच्या सरमिसळीचा सैनेच्या बोलीमधून सर्वप्रथम प्रवेश झाला असावा असेही वाटले.)

गालिब आणि फार्शी

चित्तरंजन,
छोटासा लेख आवडला. गालिबची उत्तम शायरी फार्शीत आहे, असे ऐकून आहे. तुझ्या लेखांतून चार फार्शी शब्द कळाले आणि एखाद्या शेराचा अर्थ कळाला, तरी पुरे!
सन्जोप राव

गालिच्यापासून खेटरापर्यंत

प्रियालीताईंच्या,

फारसी की फारशी ह्या प्रश्नावरून आठवले. इराण आपल्या गालिच्यांसाठी प्रसिद्ध आहे. काश्मीरातले गालिचा कारागिरांची कुटुंबं इराणमधून आली आहेत. गालिचांचा आणि अमीर-उमरावांचा जवळचा संबंध. हे गालिचाप्रेम एवढे की गालिच्यात लपेटून अगदी जीव घ्यायची तऱ्हा यांना जमली होती. पूर्वी प्रत्येक राजाचा, मोठ्या सरदाराचाफरासखाना असायचा. ह्या फरासखान्यात गालिचे, तंबू आदी ठेवले जायचे. पूर्वी डाकचौकीही असायची . ह्या डाकचौकीवर डाक घेऊन घोडेस्वार, सांडणीस्वार यायचे. फर्मानं, पत्रं-लखोटे, ताजी फळं (कधी बर्फही असायचा. अकबराने बर्फ चाखला होता, असा दाखला आहे.) आदी चीजवस्तू ह्या डाकेत असायच्या.

मराठीत डाक हा शब्द सर्रास वापरला जातो. हिंदीतला डाकिया आणि डाकखाना आपल्याला माहीत असेलच. आजकाल ह्या ई-मेल मुळे डाक कमीच येते हे खरे. पण हा शब्द कसा आला असावा? ह्या पत्रांवर-लखोट्यांवर पाठवणाऱ्याची शिक्के डाकून त्यांना सीलबंद (इंग्रजी-फारसी शब्द मजेदार आहे) केले जात असावे. अता डाकणे म्हणजे डाग देणे, डागणे. हा डाग म्हणजे दाग़ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. पण हा शब्द आपल्याकडे फारशीद्वारे आला आहे असे वाटते. फारसीने हे अरबी शब्द घेताना त्यांच्या उच्चारांचे फारसीकरण केले. मराठीने त्यांना अजून अपभ्रष्ट केले. आम्ही 'दाग़'ला 'डाग' केले आणि 'डाक'ही केले; बुज़ुर्गचे बुद्रुक, बुर्दुक केले. भाषेने नव्या शब्दांना आपले वळण लावल्यास त्यात गैर काही नाही. मला तरी वाटत नाही. पण "स्वेटराचा उच्चार तुम्ही मराठी भाषक खेटराप्रमाणे करता," अशी माझ्या एका 'कॉन्वेन्ट-एज्युकेटेड' बंगाली मैत्रीण नेहमीची तक्रार. माझे म्हणणे, जो करत नाही तो कसला मराठी?

चित्तरंजन

फलुदा

अकबराने बर्फ चाखला होता, असा दाखला आहे.

यावरून आठवलं की शेवया, सब्जाची बी, गुलाबपाणी, केशर यापासून बनवले जाणारे फलुदा हे आइसक्रिमही मूळचे फारसी. याचा शोधही सुमारे अडिच हजार वर्षांपूर्वी लावल्याचे सांगितले जाते. अकबराच्या खानसाम्यांनी आइसक्रिम बनवण्याची कला शिकून घेतली होती असेही वाचले आहे परंतु संदर्भ आठवत नाही.

बादशाही कोल्ड्रींक..

यावरून आठवलं की शेवया, सब्जाची बी, गुलाबपाणी, केशर यापासून बनवले जाणारे फलुदा हे आइसक्रिमही मूळचे फारसी.

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट समोरच्या "बादशाही कोल्ड्रिंक हाऊस" मध्ये मिळणारा अफलातून फालुदा आठवला आणि जीव क्षणभर हळवा झाला!

आधी पलटणरोड पोलीस ठाण्याशेजारच्या ग्रँटहाऊस कँटी नचा खीमापाव आणि नंतर बादशाहीचा फालुदा!! जाऊ द्या! नकोत त्या नुसत्या आठवणी...

आज उद्याकडे गेलंच पाहिजे एकदा त्या भागात!

तात्या.

खेटर -चादर

स्वेटरचा खेटर करायचा नाही तर काय करायचा? मराठीत प्लुत अ नाही. त्यामुळे आम्ही फादरचा उच्चार चादरसारखा आणि स्वेटरचा खेटरसारखाच करणार. त्यातून स्वेटर हा पूर्णपणे मराठी झालेला शब्द. यात बंगाल्यांना हरकत घेण्याचे काही कारण दिसत नाही. आम्ही श,ष, स चा स , व चा ब, अ चा ओ आणि व्हीचा भी करत नाही ही किती मोठी गोष्ट आहे.!--वाचक्‍नवी

डाक

पुळुमावी प्रमोदिनिपुत्त

डाक बंगाली आहे, म्हणजे हाक मारणे, नाव मोठ्याने उच्चरून बोलावणे.

नवीन माहिती

डाक बंगाली आहे, म्हणजे हाक मारणे, नाव मोठ्याने उच्चरून बोलावणे.

अरे वा. ही नवीन माहिती आहे. खातरजमा करायली हवी. धन्यवाद.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

छान माहिती

वरिल सर्व माहिती छानच आहे. चर्चा विषय सुद्धा फार सुंदर.
फार्शी भाषेची अजून माहिती मिळावी अशी इच्छा झाली हे सर्व वाचून.
अरबी, उर्दू आणि फारशी या भाषांत भेद काय आहे? त्या मूळच्या कोठल्या प्रदेशात विकसित झाल्या? अशी माहिती सुद्धा येथे द्यावी अशी विनंती.
--लिखाळ.

अरबी, उर्दू आणि फारशी

लिखाळ,
धन्यवाद. आपण सुचवलेल्या विषयावर स्वतंत्र चर्चा करता येईल. तूर्तास कुवतीप्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

अरबी ही हिब्रूसारखीच सेमिटिक भाषा आहे. उर्दू आणि फारशी ह्या भाषा इंडो-युरोपीय आहेत. उर्दू आणि हिंदी किंवा हिंदुस्तानीत तसा काहीच फारसा फरक नाही. फक्त उर्दूत भरपूर फारशी आणि अरबी शब्द आहेत. दोनशे वर्षांच्या फारशी भाषेतही मुबलक अरबी शब्द होते. इतके की, क्रियापद वाचल्यावर आपण वाचतो आहोत ती भाषा फारशी आहे असा खुलासा होतो. ह्यावरून आठवले- पाकिस्तानच्या राष्ट्रगीतात केवळ १ की २ उर्दू शब्द आहेत. 'अभी तो मैं जवान हूं ' लिहिणार्‍या हफीज जालंधरीने ते लिहिलेले आहे ह्याचे आश्चर्य वाटते.

चित्तरंजन

जाताजाता- फर्श म्हणजे गालिच्यापेक्षा आकाराने मोठी चटई. फर्श पुरविणारा तो फर्राश असावा. जसे रक्स(नृत्य) करणारा तो रक्कास(नर्तक). 'रक्कासा मेरा नाम' हे गाणे आठवते का? ह्या रक्स वरून एक शेर आठवला कतील शिफाईचा -
देखी जो रक्स करते हुई मौजे1-जिंदगी
मेरा खयाल वक्त की शहनाई बन गया
1. मौज म्हणजे लाट, लहर

आभार

नमस्कार,
माहिती साठी धन्यवाद.
या भाषांची काहिच जाण नाही पण या चर्चेतून काही नवे शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे लक्ष ठेवून आहे :)
--लिखाळ.

जगन्नाथ आझाद

टग्या माहिती चांगली आहे. जगन्नाथ आझाद हे इक़बालवरील एक मोठे विद्वान होते. गावोगावी इक़बाल नुमाइश (प्रदर्शन) भरवायचे. तीन वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचे वडील तिलोकचंद महरूम हे उर्दूतले एक प्रसिद्ध रुबाईकार होते. हे कुटुंब पश्चिम पंजाबातल्या (पाकिस्तानी पंजाब) ईसाखील ह्या गावातले. त्यांचे नाव ईसाख़ीलमधील एक सडकेला दिलेले आहे.

फार्सी भाषा

पार्स, फ़ारस या नावाची जमात इ.पू. ५५० ते ३३० या काळात भारताच्या पश्चिम दिशेच्या आजच्या इराण पेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा पर्शीयन किंवा फ़ारसी. ही भाषा सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफ़ॊर्म लिपीत लिहिली जाई.
या भाषेचे संस्कृतशी साम्य जवळ जवळ बहिणीएवढे आहे. अखमेनियन हिला आर्यन भाषा अरिया या भागाच्या नावावरून म्हणत.
पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या संस्थापकांनी धर्म तत्वे याच भाषेत सांगीतली. अलेक्झांडर आणि अरबी आक्रमणातून वाचलेली तत्वे अवेस्तन लिपीत लिहीली गेली. अवेस्तन ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, थोडे अपवाद वगळता देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे.अरब हल्ल्यानंतर ईस्लाम सोबत अरबी लिपी काही अक्षरांची भर घालून फार्सी ने स्विकारली.
फारसी भाषा आजच्या घडीला इराण, अफ़्गाणीस्तान, ताजिकिस्तान ची राज भाषा आहे, तर आर्मिनिया, अझरबैझान, जॉर्जीया, कझाकस्तान, तुर्क्मेनिस्तान, तुर्की,उझ्बेकीस्तान, इराक, पाकीस्तान या भागातील लोकांना समजते. भारतीय भाषांवर प्राचीन काळापासून तिचा मोठा छाप आहे, काश्मिरी, उर्दू या शिवाय हिंदी आणि मराठीत रोजच्या वापरातील अनेक फार्सी शब्द आपल्याला सापडतात.
आज भारतीय साहित्य सृष्टीला मोहात पाडणाऱ्या सादी, हाफ़ीज शिराझी, रूमी, उमर खय्याम यांच्यासह भारतातील अमीर खुस्रो, मिर्झा गालीब आणि इक्बाल (‘सारे जहांसे अच्छा’ वाले) यांच्या उत्तम रचना फार्सीतच आहेत. तसे ‘फार्सी, फारसी’ भाषिकांना स्वत:ला ‘पारसी’ भाषिक म्हणवून घेणं आवडतं, पण आपण आपल्या मराठीत फार्शी म्हणत आलो आहोत.
फार्सीने अरबी लिपी घेतली तरी, भाषेचे नाते संस्कृतशी आहे.

पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!

पार्शी

मूळ इराणी उच्चार पार्शी, पारशी असा आहे. अरबी आक्रमाणानंतर, अरबीमध्ये प हा उच्चार नसल्याने फ़ असा उच्चार केला गेल्याने पार्शीचे फारसी झाले असे कळते.

उर्दू

उर्दूच्या प्रारंभिक विकासाचे चिह्न प्रथम द्ख्खन मध्येच सापडते. उर्दू हा तुर्की शब्द आहे. त्याचा अर्थ छावणी - (सैन्याची) असा होतो.

दर फ़ने रेख़ता कि शेरस्त बतौर शेर फ़ारसी ब ज़बाने
उर्दू-ए-मोअल्ला शाहजहाँनाबाद देहली।----मीर.

उर्दू-ए-मुअल्ला = छावणी जी शाही आहे.
रेख्ता = मिसळलेली

प्रचार प्रसार सूफी फकीरांनी केला. इब्राहीम आदिलशाहची सुविख्यात रचना "नौरस" सोळाव्या शतकातील, मुहम्मद क़ुली कुतुबशाहची कुलियाते क़लीक़ुतबशाह आणि इतर अनेक नावे उर्दूत प्रसिद्ध आहेत. नंतर ही भाषा दिल्लीत फुलली.

पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!

नमस्कार,
मी असे ऐकले आहे की मराठी मध्ये फ चा उच्चार f असा न होता ph असा होतो.
जसे मराठी मध्ये फुल चा उच्चार phul असा होतो ful असा नाही.
तर फारसी (उर्दू) या भाषांमध्ये फ चा उच्चार f असाच करतात. तर यासंबंधी कोणी माहिती देउ शकाल का?
आभार,
--लिखाळ.

बरोबर

लिखाळ,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फारशी भाषेतला मराठीतला 'फटकळ' फ नाही. आणि मराठी भाषकांची ह्या फारशी 'फ़' पायी फजिती होते. वफ़ातल्या 'फ़' चा उच्चार आम्ही ओठांना ओठ जरा जास्तच लावून फुलातल्या 'फ' सारखा करतो. तर कधी जिथे फुलातला 'फ' हवा तिथे वफ़ातला 'फ़' उच्चारतो.

चित्तरंजन

वाह

आपल्या तत्पर उत्तरासाठी धन्यवाद.
--लिखाळ.

शिरस्ता

शिरस्ता (नियम, सवय) हा ही फार्शीच का?

~ तो ~

बरोबर

तो,

शिरस्ता, गुदस्ता, गुलदस्ता, बस्ता, खस्ता आदी सर्व शब्द फारशीतून आले आहेत. आणखी शब्द द्या पाहू.

चित्तरंजन

शिकन ते खंदा

कपाळावरच्या आठ्यांना हिंदीत 'शिकन' म्हणतात. ही 'शिकन' मूळ धातू 'शिकस्तन' चेच एक रूप. ह्या रुपाला 'मुजारे' म्हणतात असे वाटते.

'पीलवान' हा शब्द हिंदीत 'पहलवान', मराठीत 'पैलवान' झाला. 'पील' म्हणजे हत्ती. 'पीलखाना' हा शब्द इतिहास वाचणार्‍यांच्या परिचयाचा असावा. मराठीत "सुंभ जळाला तरी 'पीळ' जात नाही," अशी एक म्हण आहे. त्यातला पीळ आणि फारशी पीळ, ह्यांच्यात काही नाते असावे काय? काही सांगता येत नाही. असेलही. 'पिळणे' ह्या धातूचे मूळ तपासायला हवे.

खंदा-ए-लब हा शब्द उर्दू काव्यात अनेकदा येतो. 'खंदन' म्हणजे हसणे. आता खंदा म्हणजे हसणारे/री. मराठीतला खंदा समर्थक म्हणजे हसणारा (फिदीफिदी) समर्थक काय?:)

चित्तरंजन

आणखी!

दरवाजा, खिडकी, झरोका यांपैकी किती शब्दांचे मूळ मराठी आहे?
दरवाजा शब्द द्वार या शब्दांवरून आलाय की आणखी कुठल्या?

काल किती गरम होत होतं. मी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या व झरोके उघडले. एकदम गरम हवा आत आली. खूप महिन्यांपासून पडदे आणायचा विचार करतेय . २३ तारखेला बाजारात गेले होते . एकही पडद्याचं कापड पसंत पडलं नाही.

या वाक्यात प्युव्वर मराठी :):)शब्द (संस्कृतोद्भव धरून) किती आहेत?
या लाल रंगातील शब्दांचा उगम कोणी सांगेल का?

कठीण!

या वाक्यात प्युव्वर मराठी :):)शब्द (संस्कृतोद्भव धरून) किती आहेत?
या लाल रंगातील शब्दांचा उगम कोणी सांगेल का?

कठीण आहे बुवा! ;)

आपला,
तात्या कलंत्री!

ख़ूब साती

साती,

ग़र्म, हवा, परदा, ख़ूब, महीना, तारीख़, बाज़ार ह्या अरबी-फारशी शब्दांची गरम, हवा, पडदा, खूप, महिना, तारीख, बाजार ही मराठी रुपे, हे लगेच (कोणीही) सांगू शकेल. दरवाजाही तिकडचाच वाटतो. खिडकी आणि झरोकेजरा बघावे लागतील. देशी असू शकतील. जाणकारांना विचारावे लागेल. शब्दकोश बघावे लागतील.

ख़ूब ह्या शब्दाचा अर्थ मराठीत भरपूर(बघावा लागेल), बक्कळ (हा शब्द कुठून आला असावा बरे?), मुबलक('मु' आला म्हणजे अरबीच असावा), फार असा असला तरी उर्दूत त्याचा अर्थ चांगलाही होतो. ख़ूबसूरत हा शब्दाचा अर्थ 'जिसकी सूरत ख़ूब हो' असा आहे, (ज्याचे तोंड मोठे आहे असा नक्कीच नाही) हेही आम्हाला कळले असावे. तसेच ग़ालिब जेव्हा 'आम ख़ूब हों' म्हणायचा तेव्हा त्याला 'आंबे भरपूर असावेत आणि उत्तम असावेत' असे सुचवायचे आहे, हेदेखील कळेल.

वाक्यातून उदाहरणे देण्याची तुमची कल्पना फार आवडली. आपल्या रोजच्या बोलण्यात किती अरबी-फारशी शब्द आहेत, ह्यांचा अंदाज यावा. इतरांनीही अशी अजून उदाहरणे यावीत. आधीच्या उदाहरणांत आलेले शब्द टाळावेत.

चित्तरंजन

अशी अजून उदाहरणे / काही अधिक माहिती

इतरांनीही अशी अजून उदाहरणे यावीत.

त्या बुजुर्ग इसमाला मी रोज पाहात होते पण त्यांचा खून होईल याचा अंदाज आला नाही.

हा निळा शब्द नेमका कोठला असावा?

---
फार्सी भाषेने आपल्यात तुर्की आणि मंगोल शब्द स्वीकारलेले आहेत. उर्दू, हिंदी आणि मराठीने फार्सी शब्दांबरोबरच तुर्की आणि मंगोल शब्दांचाही स्वीकार केलेला आहे आणि मंगोल भाषेने तिबेटातून आलेले संस्कृत शब्द स्वीकारले आहेत. (चक्र पूर्ण झाले.) :)

बुज़ुर्ग इसम

बुज़ुर्ग हा फ़ारशी शब्द आहे. फारशीत बोज़ुर्ग असा उच्चार होता. अर्थ मोठा. रोज़ हा फारशीतूनच आला असावा. फारशीत अरबीतून आला असल्यास माहिती नाही. खून हा फारशी आहे. अंदाज़ ही फारशी असला तरी अरबीतून फारशीत आला असल्यास माहीत नाही.

इसम हा मूळ अरबी शब्द आहे. इस्मे-फाईल (फ़ेल काम, बदफ़ैली म्हणजे वाईट काम करणारे/री आठवले असेलच) म्हणजे कर्ता, असे वाटते. उर्दू, फारशी व्याकरणाच्या पुस्तकात हा शब्द सारखा येतो.

चक्र पूर्ण झाल्यावरून आठवले, उर्दू हा बहुतेक मंगोल शब्द आहे.

सही!!!!!!

ओर्डू (की ओर्दू) म्हणजे मंगोल सैन्याची तुकडी :)) असे वाटते. होर्ड (horde) हा शब्द त्यावरूनच आलेला आहे.

चु.भू. द्या.घ्या.

मजा आली

होर्ड (horde) हा शब्द ओर्दूवरून आला आहे, हे कसे माझ्या लक्षात आले नाही. वाव्वा! मजा आली. ओर्दू म्हणजे क्याम्प की तुकडी हे माहीत नाही.

अशाच सहभागाची उपक्रमींकडून अपेक्षा. धन्यवाद प्रियाली.

लिखाळ, धन्यवाद. बाबा हा तुर्की शब्द आहे. झडप बघावी लागेल.

बाबा, झडप

बाबा हा शब्द तुर्की आहे का?
झडप (दरवाज्याची झडप आणि झडप घालणे) हा शब्द कोठला?
--लिखाळ.

ही चर्चा फार मस्त आहे. चित्त यांना धन्यवाद.

बाबा

प्रिय लिखाळ,
बाबा हा शब्द मला वाटत फारसीच असावा.
ईराण मध्ये मुले बाबा अशिच हाक मारतात.

'उर्फ'

हा शब्द सुद्धा फार्शीच आहे का? त्याला आपण 'उपाख्य' असे म्हणतो.

हयात!

हयात आहे किंवा तहहयात ह्यामधील 'हयात' शब्द कोणत्या भाषेतील असावा?

हयात, बाबा, महात्मा, जिना

हयात हा शब्द अरबी आहे. अरबीतून फारशीत, फारशीतून मराठीत आला असावा. शेवटचे अक्षर 'त' असलेले बहुतांश परकीय शब्द हे अरबी असतात. मराठीत, उर्दूत अनेक अरबी, तुर्की शब्द फारशीद्वारे (व्हाया फारशी) आले आहेत. 'बाबा' तसाच आला असावा. कारण 'बाबा' हा शब्द शंभर टक्के तुर्की आहे. अगदी 'तवा' ह्या शब्दाइतकाच.

भारत महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणतात. त्याच धर्तीवर जिनांना पाकिस्ताना बाबा-ए-क़ौम म्हणतात. (कमाल पाशाला तुर्कीत असेच काहीसे)

'दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढ़ाल' ह्या गाण्याची चाल जशीच्या तशी उचलून जिनांवर रचलेले एक गाणे मी ऐकले आहे.
'रघुपति राघव राजाराम' च्या ऐवजी 'अस् सलाम अलै कुम सलाम' हे बरोबर फिट केले होते आणि 'साबरमति के सन्त' ऐवजी 'क़ायदे-आज़म' होते.

चित्तरंजन

मराठी-फारसी

मित्रांनो,
काही फारसी शब्दांचा उगम संस्कृत असावा आणि मराठीमध्ये त्यांचा प्रसार फारसी आणि संस्कृत मधुन झाला असावा.
खालिल नमुन्यावरुन ते दिसून येइल. मला माहित असलेल्या समान फारसी-मराठी(हिन्दी) शब्दान्ची जन्त्री मी लवकरच देइन.
मी फारसीचा अथवा भाषेचा अभ्यासक नाही पण इराणमधिल वास्तव्यामुळे आणि कुतुहलापोटी काही गोष्टी कळल्या.

संस्कृत अवेस्तिक
ऋता asha (arta)
अथर्व atar (fire, atish)
यम yima
आशमान aseman (sky)
danu danu (river)
मानस manah (mind)
पित्र pitar (sather)
मर्त्यानाम् masyanam (of mortal men)
यज्ञ yasna (sacrifice)
आर्य airya
वशिष्ठ Vahishta

अधिक माहितिसाठी 'भारत- वकिलात-तेहरान साइट' पहा.

आर्ष संस्कृत

आपण दिलेली जंत्री रोचक आहे. अजून शब्द द्यावेत.ऋग्वेदातील (आर्ष) संस्कृत आणि अवेस्तातील फारशी भाषेत खूप साम्य आहे. फारशी आणि संस्कृत ह्या भाषाभगिनी आहेत. त्यांचा उगम तिसऱ्याच 'मातृ'भाषेतून झाला आहे, असे वाटते. तज्ज्ञांकडून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चित्तरंजन

मराठीतली फार्शी-१

सौरभ

माझ्या त्रोटक अभासातून जे उमगलं ते सांगतो.

मराठीकरिता वापरल्या जाणार्या लिपिचे नाव 'मोडी' याचा 'मोडणे' या क्रियापदाशी तसा काही संबंध नाही. काही भाषाशस्त्रज्ञांच्या मते, विक्रमादित्य मौर्यकालीन ' मौर्यी ' नामक लिपिपासून 'मोडी' चा विकास झाला आणि मौर्यी या नावावरून मोडी हे नाव आले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात यासंबंधीचे एक पुस्तक मला वाचायला मिळाले, त्या लेखकाचा असाच अभिप्राय होता.

तेव्हां, फार्शीची 'शिकस्ता' लिपि आणि 'मोडी' या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी 'मोडणे, तोडणे' असा असला तरी त्यांचा तसा काही संबन्ध असेलसे वाटत नाही.

मोडी-मोडणे

मला वाटते मोडीच्या उगमाबद्दल मतभेद आहेत. ठोस निर्णय झालेला नाही. याबद्दल अधिक येथे वाचता येईल.

 
^ वर