मराठीतली फार्शी-१

मराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.

उदाहरणार्थ, 'परागंदा'.परागंदा हा शब्द मला संस्कृत वाटायचा. आपला 'परागंदा' परांगदन ह्या फार्शी धातूपासून (फार्शीत धातूला मस्दर म्हणतात) तयार झालेला आहे, हे मला फार्शी भाषेचे आरंभिक धडे गिरवायला सुरुवात केल्यावर कळले. मराठीत जसे धातूच्या, क्रियापदाच्या शेवटी 'णे' असते, तसे फार्शीत मस्दराच्या शेवटी 'न' असते. फार्शीत धातूच्या रूपांना 'आ'कार देऊन नाम तयार करतात. 'परागंदा' हे असेच नाम आहे. 'परागंदन' म्हणजे 'विपरीत परिस्थितीमुळे घरापासून दूर जावे लागणे' अशी ज्याच्यावर परिस्थिती येते तो 'परागंदा' होतो.

आता दुसऱ्या प्रकारच्या शब्दांकडे लक्ष देऊ. फार्शीत 'शिकस्तन' हा आणखी एक धातू आहे. पूर्वीच्या काळी फार्शी ही राज्यभाषा होती आणि ती 'शिकस्ता' ह्या लिपीत लिहिली जायची. ही शिकस्ता लिपी म्हणजे फार्शी लिपीची नुक्ते नसलेली आवृत्ती. 'शिकस्ता' लिपीतले कागद वाचताना बरेच अंदाज लावायचे असतात आणि बरेच समजून घ्यायचे असते. ह्या 'शिकस्ता'ची मराठी बहीण 'मोडी'. 'शिकस्तन' ह्या धातूचा अर्थ 'मोडणे', 'तुटणे' हे लक्षात घेतले तर 'मोडी' म्हणजे 'शिकस्ता' हे लक्षात यायला वेळ लागणार नाही आणि हा सुंदर शब्द घडविणाऱ्याला मनापासून दाद द्यावीशी वाटेल.

चित्तरंजन भट

लेखनविषय: दुवे:

Comments

गस्त, फस्त, बडदास्त, बेशिस्त, इ.

गस्त, फस्त, बडदास्त, बेशिस्त, भिस्ती, रास्त, सुस्त हे शब्द फ़ारसी वाटतात. पण ख्रस्ता वाटत नाही. हे ख्‌र अक्षर फारसीत असेल? हा शब्द तर चक्क संस्कृत कष्टचा अपभ्रंश वाटतो. अर्थात हा केवळ तर्क. खरे खोटे माहीत नाही. तसेच 'जास्त' हा शब्द फारसी नसून अरबी असावासा वाटते. आणि वास्ता कुठला? चु.भू.द्या.घ्या.--वाचक्‍नवी

कष्टचा अपभ्रंश वाटत नाही

फारशी आणि संस्कृत ह्या भाषांमध्ये आदानप्रदान झाल्याचे दाखले मला माहिती नाहीत. जुनी फारशी आणि संस्कृत ह्या अगदी सख्ख्या भाषाभगिनी आहेत, असे मला वाटते. त्यामुळे खस्त आणि कष्ट ह्या दोहोंतले साम्य साहजिक आहे, अनपेक्षित नाही. पण खस्ता हा शब्द फारशीतल्या खस्तन ह्या मसदराचे (धातू) एक रूप आहे. तुम्ही वर दिलेले शब्द तसेच जास्त आणि वास्त ह्या शब्दांची खातरजमा करून सांगीन.

जाताजाता आपल्या नेहमीच्या भाषेतले आणखी काही फारशी शब्द ---

रफ्तपासून (जाणे)--> रफ्तार, रफ्ता (रफ्ता-रफ्तामधला), रवाना, रवानगी, रौ (प्रवाह)
गुफ्तपासून (बोलणे)--> गुफ्तगू, गुफ्तार (बेजान हुस्न में कहां गुफ्तार की अदा), गोया (तुम मेरे पास बैठे हो गोया--जैसे के बोल रहे हो) , गो (कानूगोमधला)
बस्तन (बांधणे)--> बस्तान, बस्ता (लग्नबस्ता आठवा) , बंदोबस्त

वाहवा !

खस्ता हा पारशी शब्द आहे. वास्ता हा अरबी शब्द(वासिता) यावरुन आला आहे. ( संबंध,नाते, हा अर्थ )
वाहवाह हा पारशी शब्द, मराठीत त्याचा आपण वाहवा केला, बरोबर का ?

अवांतर :) पारसी,फारसी,की फार्सी उगाच गुंता वाढवून घेतला आम्ही ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खर् हे अक्षर की ख हे अक्षर? - खशायर

भाषाशास्त्रातील माझे ज्ञान शून्य तरीही जर ख अक्षराबद्दल प्रश्न असेल तर ते जुन्या पर्शियनमध्ये असावे का?

प्रसिद्ध पर्शियन सम्राट झेरेक्सिस (ग्रीक उच्चार) याचे पर्शियन उच्चाराप्रमाणे नाव खशायर शहा असे होते.

मागे एकदा पर्शियन १ ते १० आकडे वाचले होते ते पुन्हा चाळले

अचूक उच्चार माहित नाहीत.

सफ्र = ०
येक
दो
से =३
चहार
पंज
शेश (शेष)
हफ्त = ७ (हफ्ता यावरून आला असावा)
हष्ट (अष्टप्रमाणेच)
नोह्
दह्

मंगोल ते चिनी

चर्चा फारच छान चालली आहे.

वरील चर्चेत संस्कृतमधून मंगोल भाषेत काही शब्द गेल्याचे वाचणात आले. तसेच माझा एक चिनमधला मित्र सांगत होता की मँडेरीन (चिनी) मध्यी सुद्धा संस्कृत सदृष्य काही शब्द आहेत. जाणकार संस्कृत-मंगोल-चिनी या भाषांसंबंधांवर प्रकाश टाकू शकतील काय?

मँडॅरीन

"मँडॅरीन" हा मूळ संस्कृत शब्द पोर्तुगिजातून (चीन विषयी) इंग्रजीत गेला.

"मँडॅरीन" बोलीला खुद्द मँडॅरीनमध्ये प्हू-थोङ्-हुआ असे म्हणतात (किंवा हान्-यू, गुओ-यू - गुंडोपंत चुकल्यास दुरुस्त करा).

ही चीनच्या सम्राटाच्या "मंत्र्यांची" भाषा.
संस्कृत "मंत्री" शब्द, पोर्तुगीजमधे "mandarim" (उच्चार मन्दारीं) असा गेला, तिथून इंग्रजीत mandarin.

इंग्रजीत "उच्चपदस्थ नोकरशहा" या मूळ अर्थानेही "mandarin" हा शब्द वापरात आहे.

उर्दूतील मराठी

'दकनी ' म्हणजे उर्दू भाषेचे प्राथमिक स्वरूप....या दकनी भाषेत अनेक मराठी शब्द आढळून येतात्....

 
^ वर