वेदना व प्लॅसिबो परिणाम

वेदना व प्लॅसिबो परिणाम
(वेदनाप्लॅसिबो या विषयावर अलिकडे झालेल्या चर्चेच्या निमित्ताने....)
अस्पिरिन
1897 साली जर्मनी येथील फ्रेड्रिक बेयर कंपनीत रसायनतज्ञ म्हणून काम करणार्‍या फेलिक्स हॉफमनच्या वडिलाला संधीवाताचा त्रास होत होता. अत्यंतिक वेदनेमुळे काही क्षणी त्यांना आत्महत्या कराविशी वाटत असे. संधिवाताचे बहुतेक रुग्ण त्याच भागात वाढत असलेल्या एका औषधी वनस्पतीचा (white willow) वापर करून दुखणे आटोक्यात ठेवत होते. परंतु या औषधी वनस्पतीच्या दुर्गंधीमुळे व त्याच्या काही उपदुष्परिणामामुळे लोक हैराण होत असत. फेलिक्सच्या वडिलानाही हा वास सहन होत नसे. या वनस्पतीतील सॅलिसिलिक (salicylic) आम्लामुळे उपदुष्परिणाम होतात हे फेलिक्सच्या लक्षात आले. वडिलांच्या वेदना कमी करण्याच्या उद्धेशाने फेलिक्स हॉफमन स्वत: याविषयी काही प्रयोग करून उपदुष्परिणाम घालवण्याचा प्रयत्न करू लागला. याच प्रयत्नातून ऍसिटिल्सॅलिक आम्लाचा (acetylsalic acid) शोध त्यानी लावला. याच आम्लाचे दुसरे नाव अस्पिरिन. सॅलिसिलिक आम्लामधील वेदनाशामक गुणाला धक्का न लावता त्याचे उपदुष्परिणाम घालवण्यात फेलिक्स यशस्वी झाला.

अस्पिरिन हे एक वंडर ड्रग म्हणून काही काळ जगभर नावाजले. वैज्ञानिक औषधनिर्मितीशास्त्रातील ही एक क्रांतीच होती. औषधी वनस्पतीला ओळखून, शुद्ध करून, रसायनिकरित्या त्यात सूक्त बदल करत सुधारणा करून, व शेवटी संश्लेषित केलेली ही औषधी होती. यातील प्रत्येक घटकाची गुणात्मक व संख्यात्मक नोंद करणे शक्य झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे सोईचे ठरले. औषधी वनस्पतींचे क्लिनिकल ट्रायल्स घेणे किचकट व अत्यंत कठिण मानले जात होते. परंतु औषधी वनस्पतीपासून बनवलेल्या अस्पिरिनचे क्लिनिकल ट्रायल्स घेणे सहज शक्य झाले. विसाव्या शतकातील औषधनिर्मितशास्त्रातील एक महत्वपूर्ण संशोधन म्हणून अस्पिरिन आजही ओळखले जाते.

प्रोस्टाग्लांडिन्स (prostaglandins)
अस्पिरिनचा जेव्हा शोध झाला तेव्हा ही गोळी शरीरातील अवयव, पेशी इत्यादीवर काय परिणाम करते याची कुणालाच कल्पना नव्हती. यासाठी पुढील 75 वर्षे वाट पहावी लागली. ब्रिटन येथील जॉन वेन या फार्मासिस्टने 1971 मध्ये अस्पिरिनची वेदनाशामक प्रक्रिया नेमकी कशी असते याचा शोध लावला. आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवाला इजा झाली, टोचले, खरचटले, खुपसले, वा काही बिघाड झाल्यास शरीरातील प्रोस्टाग्लांडिन्समुळे वेदनेचे संदेशवाहक मेंदूपर्यंत पोचतात व मेंदूला धोक्याची सूचना देतात. अस्पिरिन वा अस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्या-औषधी प्रोस्टाग्लांडिन्सच्या निर्मितीतच अडथळा आणत असल्यामुळे मेंदूला वेदनेची जाणीव होत नाही.

याचप्रकारे याच्याहीपेक्षा अती पुरातन वेदनाशामक औषधी म्हणजे अफू. अफुचा वापर अश्मयुगातही आढळतो. अफू किंवा मॉर्फिनसारख्या उपपत्ती, संप्रेरकाच्या निर्मितीला न अडवता थेट मेंदूलाच संदेश न पोचण्याची व्यवस्था करतात. अफू हे सर्वात जास्त परिणामकारक वेदनाशामक आहे. परंतु त्याच्यातील अमली व व्यसनाधीनतेला पोषक अशा गुणधर्मामुळे ते वेदनाशामक म्हणून सुरक्षित नाही.

प्लॅसिबो परिणामात वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी नेमके काय होत असावे? ती वेदना संदेशवाहकांना थांबवते की मेंदूच्या आकलनातच अडथळा आणते? किंवा आणखी कुठली तरी तिसरीच यंत्रणा काम करते?

एंडॉर्फिन
आर बार्कर बॉसेल या वैज्ञानिकाच्या मते आपले शरीर हे अफूसदृश पीक पिकवणारे एक शेत (poppyfield) आहे. जॉन वेनच्या संशोधनानंतर 1975 मध्ये अस्पिरिनच्या वेदनाशामक (analgestic) परिणामांचा अभ्यास करत असताना शरीरातील एंडॉर्फिन (endorphine) या संप्रेरकाचा शोध त्याला लागला. शरीरातील पिट्युटरी ग्रंथी आणि हायपोथलमस (hypothalamus) यातील एंडॉर्फिन हा एक पॉलिपेप्टाइड आहे. हा आपल्या शरीरातील अंतर्जात अफूसदृश पीक आहे. म्हणूनच जोरात धावणे, ट्रेकिंग, मसालेदार पदार्थ खाणे, लैंगिक समागमाची इच्छा इत्यादीसारख्या सकारात्मक सवयीच्या वेळी मेंदू मोठ्या प्रमाणात एंडॉर्फिनचा स्राव रक्तातून सोडतो. त्यामुळे अशा गोष्टींची चटक लागते. त्याशिवाय चैन पडत नाही.

मादक पदार्थांच्या अतीसेवनावरील जालीम औषध म्हणून नलोक्सोन (naloxone) या औषधाची डॉक्टर्स शिफारिश करतात. अशा प्रकारची औषधं एंडॉर्फिनला प्रतिबंध करतात. त्याचप्रमाणे ही औषधं प्लॅसिबो परिणामांना निरुपयोगी ठरवतात. यावरून एंडॉर्फिनचा स्राव व प्लॅसिबो परिणाम यात काही संबंध असावा हे जाणवते. परंतु हे पुराव्यासकट सिद्ध करणे तितकेसे सोपे नाही. कारण आपण रुग्णाच्या (सापेक्ष अशा!) वेदनेविषयीच्या आकलनाशी खेळत आहोत. यात वेदनेबरोबरच भावनांची गुंतागुंत असू शकते. म्हणून यासाठी आपल्याला सर्वस्वी वेगळी वाट शोधावी लागेल.

fMRI
मेंदूची कार्यप्रणाली दाखवणारी fMRI (fucntional Magmentic Rsonance Imaging) तंत्रज्ञान आपल्याला या कामी उपयुक्त ठरू शकेल, असे संशोधकांना वाटत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्लॅसिबोसारख्या गोष्टींचा उलगडा होईल. fMRI ही मेंदू प्रक्रियेतील त्रिमिती प्रतिमा तयार करत असल्यामुळे आपल्या प्रत्येक लहान सहान गोष्टींमुळे होत जाणारे बदल टिपता येते. प्रायोगिक मानसशास्त्र व वर्तनशास्त्रासाठी fMRI वरदान ठरत आहे.

एके काळी मानसशास्त्राला मृदु विज्ञान (soft science) म्हणून हिणवले जात होते. fMRIच्या मेंदू प्रतिमा तंत्रामुळे माणसाच्या वर्तनातील बारीक सारीक गोष्टीवरसुद्धा संशोधन करता येवू लागल्यामुळे या शास्त्राला आता अत्याधुनिक विज्ञानाचा दर्जा मिळत आहे. प्लॅसिबो परिणामातील 'चमत्कारिक गूढतेचा शोध घेणे हेच काही संशोधकांचे आता लक्ष्य ठरत आहे.

बॉसेलच्या आपले शरीर हे अफूसदृश पीक पिकवणारे एक शेत या विधानाची पडताळणी स्वतंत्रपणे fMRIच्या सहाय्याने नक्कीच करता येईल. वेदनेप्रमाणे विषण्णतासुद्धा (depression) रुग्णसापेक्ष असेच समजले जाते. विषण्णतेच्या विषयीसुद्धा या तंत्रामुळे काही हाती लागण्याची चिन्हं दिसत आहेत. Antidepressant म्हणून तेथेही साबुदाण्याच्या गोळ्यासारखी औषधं दिल्या जातात. हाही एका प्रकारे प्लॅसिबो परिणामच आहे, हे आता लक्षात येत आहे.

fMRIच्या तंत्रज्ञानामुळे अक्युपंक्चर, रेकी, चुंबक चिकित्सा, निसर्गोपचार, इत्यादी पर्यायी व पूरक उपचार पद्धती संशोधनाच्या ऐरणीवर येत असून यांची उकल होण्याची शक्यता जवळ आली आहे.

Comments

अनेक्डोट्स्

ह्या सगळ्या औषधामागील अनेक्डोट्स् वाचतांना मजा आली व माहिती आवडली.

दुरुस्ती

नॅलोक्सोन हे एंडॉर्फिनची निर्मिती थांबवत नाही, एंडॉर्फिन पेशीवर जेथे जाऊन चिकटू शकतात ती जागा नॅलोक्सोन व्यापते, त्यामुळे एंडॉर्फिन पेशीवर परिणाम घडवू शकत नाही.

प्रोस्टाग्लँडिनचा उल्लेख आहे तर कॉर्टिकोस्टीरॉईड या संप्रेरकांचाही उल्लेख करता येईल. ही संप्रेरके अधिवृक्क (ऍड्रीनल) ग्रंथीतून स्रवतात. कृत्रिम रेणू अधिक शुद्ध, तीव्र परिणाम करतात. ऍस्पिरिन, पॅरॅसिटॅमॉल (टायलेनॉल/क्रोसिन), इ. वेदनाशामकांना नॉन स्टीरॉईडल ऍन्टि इन्फ्लेमेटरी औषधे (NSAID) म्हणतात. इन्फ्लेमेशन (दाह) दरम्यान वेदना, सूज, ताप आणि रक्ताळणे ही चारही लक्षणे प्रोस्टाग्लँडिनमुळे घडतात. NSAID पेक्षा स्टीरॉईडल ऍन्टि इन्फ्लेमेटरी औषधे (SAID) अधिक परिणाम (आणि दुष्परिणाम) कारक असतात. म्हणून कमी गंभीर परिस्थितीत NSAID च अधिक वापरली जातात. केवळ वेदनाशमनाचाच विचार केला तर ढोबळपणे, अफू > SAID > NSAID असे म्हणता येईल.

चुकीचा शब्द

दुरुस्ती सुचविल्याबद्दल धन्यवाद!
निर्मिती थांबवतात. या शब्दप्रयोगाऐवजी निरोधक वा प्रतिबंधक म्हणून काम करतात. असे हवे होते.
मूळ लेखाच्या संपादनाची सोय नसल्यामुळे आता काही करता येत नाही. क्षमस्व!

दुरुस्ती

लेखकाच्या सुचवणीवरून निर्मिती थांबवतात या शब्दप्रयोगाऐवजी प्रतिबंध करतात असा शब्दप्रयोग केला आहे.

-संपादन मंडळ

छान

छान लेख. प्लासिबो या संकल्पनेचा शोध असाच लागला होता. दुसर्‍या महायुद्धात मॉर्फीनचा तुटवडा असल्याने ऑपरेशन करता येणे अशक्य झाले होते. तेव्हा एका नर्सने ग्लुकोजचे इंजेक्शन देऊन पेशंटला मॉर्फिन देते आहे असे सांगितले. या इंजेक्शनचा मॉर्फिनसारखाच परिणाम पेशंटमध्ये दिसला.

विषण्णतेवर सेरिटोनिन, डोपामिन इ. न्युरोट्रान्समिटरचाही उल्लेख वाचला आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

छान

वा! नवी माहिती मिळाली
श्री प्रभाकर नानावटी यांचे लेख अशी नवनवीन माहिती व त्याबरोबरच विचारांना खाद्य नेहमी देत असतातच. त्याच मालिकेतील हा माहितीप्रधान लेख. आभार.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगला लेख

अजून येऊ द्यात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मस्त.....!

माहितीपूर्ण लेख आवडला.....!
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

खिन्नता

काही बड्या कंपन्या खिन्नतेवरील औषधांवरील संशोधन आणि त्यांचे उत्पादन बंद करणार असल्याचे नुकतेच वाचले.

अवांतर : विषण्णतेपेक्षा खिन्नता अधिक चांगला वाटतो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अरेरे

उरलेल्या बड्या कंपन्यांची या प्रकारातील औषधांमध्ये मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर