वेदनेच्या विळख्यात....

वेदनेच्या विळख्यात....

बाइकच्या गंभीर अपघातात जयंताच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. हेल्मेटनीच त्याचा जीव वाचवला असे म्हणावे लागेल. या अपघातामुळे त्याच्या मेंदूच्या आतील भागात कुठे तरी इजा झाल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या लक्षात आले. परंतु त्याविषयी ते काहीही करू शकत नव्हते. सर्व बाह्योपचार करून त्यांनी जयंताला डिस्चार्ज दिला. जयंताच्या मेंदूला धक्का बसल्यामुळे मेंदूचा काही भाग निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी डिस्चार्ज देते वेळी वर्तवली. परंतु नेमके काय होऊ शकेल हे ते सांगू शकले नाहीत.
काही दिवसांनी जयंताला आपल्यात काही तरी बदल झालेला आहे हे जाणवू लागले. दाढी करताना चुकून ब्लेड लागून रक्त आले तरी त्याला काहीही जाणवत नसे. एके काळी थोडेसे खरचटले तरी प्राणांतिक वेदना जाणवत होत्या. आता भळाभळा रक्त आले तरी त्याचे काहीही वाटेनासे झाले. त्याला मारझोड करा, धक्काबुक्की मारा, टोचा, थोबाडीत मारा, लाथा घाला, काही म्हणजे काहीही त्याला वाटेनासे झाले. इतर चार चौघासारखा तो अशा गोष्टींना प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हता. त्याला वेदना जाणवत नव्हत्या. त्यामुळे रडणे, विव्हळणे, आक्रोश करणे, या गोष्टी त्याच्या खिजगणतीत नव्हत्या. अपघातापूर्वीच्या आयुष्यात कुठे थोडीशी जखम झाली तरी घरभर थयथयाट करत असे. आता मात्र तो अगदी निर्विकार झाला होता.
गंमत म्हणजे शरीरावरील इजामुळे त्याला कुठलीही वेदना जाणवत नसली तरी काही गोष्टी पाहिल्या वा ऐकल्यानंतर त्याला वेदनांची जाणीव होत होती. वेदनांचा अनुभव तो विसरला नव्हता. उदाहरणार्थ पिवळा रंग वा पिवळ्या रंगाच्या छटा बघितल्यावर त्याचा जीव कासावीस होत होता. परवीन सुल्ताना वा भीमसेन जोशीचे तारसप्तकातील स्वरविस्तार ऐकत असताना अतीव वेदना होत होत्या. शरीराचा एखादा भाग तुटून पडतो की काय असे वाटत होते. त्याच्या बाह्य वागणूकीत काहीही फरक पडत नसला तरी मेंदूत काहीतरी होत आहे अशी तक्रार तो डॉक्टरांकडे करत होता. वेदना व्हावेत वा होऊ नये म्हणून तो काही खास प्रयत्नही करत नसे. विशिष्ट रंग वा विशिष्ट ध्वनीमुळे अतीव वेदना जाणवत असताना इतरांप्रमाणे त्याच्या बाह्य वर्तनात तसूभरही फरक जाणवत नसे. तो रडत नव्हता, विव्हळत नव्हता, जोरजोराने आरडाओरडाही करत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावरचे भावही बदलत नव्हते. परंतु त्या क्षणी त्याच्याकडे निरखून पाहिल्यास त्याला यातना होत आहेत हे जाणवत होते. उदाहरणार्थ, खांद्यांच्या वा हाताच्या हालचाली, पापण्यांची उघडमीट, चालण्याच्या शैलीतील बदल, ठळकपणे दिसत होत्या. यावरून जयंताला काहीतरी सलत असावे हे जाणवत होते.
जयंताचा नसतज्ञ डॉक्टरांना मात्र जयंताला वेदना होत आहेत याविषयी शंका होती. तशा प्रकारच्या वेदना रंग बघितल्यामुळे वा संगीत ऐकल्यामुळे होतात यावर डॉक्टरांचा अजिबात विश्वास नव्हता. हे सर्व थोतांड आहे असे त्यांचे म्हणणे होते. जे काही जयंताला जाणवते त्याला वेदना/यातना म्हणता येईल का याबद्दलच डॉक्टरांच्या मनात संशय होता. सर्व सामान्यपणे वेदना, दुख:द प्रसंग यापासून चार हात दूर राहण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु जयंताच्या बाबतीत भलतेच काही तरी घडत असावे व त्यालाच तो वेदना म्हणत असावा.
कदाचित अपघातात मेंदूवर झालेल्या परिणामामुळे त्याला इतरासारखे वेदना जाणवत नसावेत, परंतु वेगळेच काही तरी घडत असावे हे मात्र नक्की!

Source: Mad Pain and Martian Pain, David Lewis, (1980)

वेदना हा मानसतज्ञांचा अत्यंत आवडता विषय. ते नेहमीच त्यावर भाष्य करत असतात. मुळातच वेदनेची जाणीव वैयक्तिक स्वरूपाची व सापेक्ष असली तरी वेदनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करणे शक्य आहे का याचा मागोवा घेण्याच्या प्रयत्नात आजचे वैद्यकीय संशोधक आहेत. वेदना सापेक्ष असली तरी यातनाग्रस्त व्यक्तीच्या बाह्य वर्तनातून त्याचे अस्तित्व जाणवत असते. उदाहरणार्थ, दाढदुखीमुळे होत असलेले शल्य चेहर्‍याच्या निरीक्षणावरून सहजपणे ओळखता येते. अपघातग्रस्त व्यक्तीच्या रडण्यातून, विव्हळण्यातून, ओरडण्यातून त्याला वेदना होत आहेत याची जाणीव होत असते. या गोष्टी उत्स्फूर्त असतात व यातनेचे बाह्यपरिणाम असतात. विचार, आठवणी, सुख - दु:ख, समाधान, समज - गैरसमज, अनुभव, कॉमन सेन्स, इत्यादीसारखेच वेदना हा मनोव्यापाराचा भाग असला तरी, वेदनानुभवामुळे बाह्यवर्तणुकीवर परिणाम होत असतो व ते बघणार्‍यांच्या लक्षात येते.
व्यक्तीसापेक्ष अनुभव म्हणजे नेमके काय हे शोधण्यास वेदनानुभवाइतकी दुसरी सोपी गोष्ट नसेल. वेदनेचे मोजमाप करता येत नसले तरी प्रत्येकाच्या सहनशक्तीनुसार व व्यक्तीमत्वानुसार वेदनेची तीव्रता कमी जास्त होत असावी. त्यामुळे वर्तणुकीत सारखेपणा जाणवणार नाही. वर्तनातील बदल मात्र लक्षात राहतील.
जयंताच्या वेदनानुभवाला वेगळी झळाळी आहे. जयंताच्या वेदनेचे स्वरूपसुद्धा इतर सामाऩ्यांप्रमाणे व्यक्तीसापेक्ष असली तरी त्याची कारणं सर्वस्वी वेगळे आहेत. तरीसुद्धा आपण त्यांना वेदना असेच म्हणायला हवे. वेदनेचे मूळ वेगळे असले तरी त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही. त्याच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करता येत नाही.
एकंदर वेदनेच्या स्वरूपाविषयी फार वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते वेदना व्यक्तीसापेक्ष भावना आहे. वेदनेचा उगम मेंदूत होत असून मेंदूतील विशिष्ट भाग उद्दीपीत झाल्यानंतर वेदना जाणवू लागतात. अजून एका मतप्रवाहानुसार व्यक्तीगत अनुभवामुळे त्या व्यक्तीला त्रास होत नसल्यास त्या अनुभवाला वेदना असे म्हणतासुद्धा येणार नाही. हेच जर खरे असल्यास जयंताच्या वेदनेचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल. जयंताचे याविषयी काहीही म्हणणे असले तरी त्याच्या अनुभवाला वेदना हा लेबल चिकटवता येणार नाही. जयंताच्या नसतज्ञ डॉक्टराची शंका रास्त आहे असेच म्हणावे लागेल. जयंताच्या अशा अनुभवावर कितपत विश्वास ठेवावा याचाही विचार करावा लागेल. अपघातानंतरच्या वेदना व अपघातापूर्वीच्या वेदना यांच्यात फरक करावाच लागेल. आता त्याला होत असलेल्या जाणीवेला वेदना म्हणावे का? त्यावर विश्वास ठेवावा का?
मुळात अंतर्मनात काय घडत आहे व त्याचे दृष्य परिणाम काय आहेत हीच खरी समस्या आहे. वेदनेच्या संदर्भात जेव्हा एखाद्याला अतीव वेदना होत असतात, तेव्हा त्याची लक्षणे बाह्यस्वरूपात ठळकपणे दिसू लागतात, असे विधान नेहमीच केले जाते. परंतु हे विधान फार ढोबळमानाने केल्यासारखे वाटते. मुळात वेदना ही पण भावना असल्यास सामान्यपणे बाह्यवर्तनावर त्याचे परिणाम होण्याची गरज नाही. (काही जण भावनोद्रेकामुळे मुद्दामहून चित्र विचित्रपणे वागतात त्यांची गोष्टच वेगळी!) वेदनेचे परिणाम वर्तनावर कशा प्रकारे होतो यापेक्षा तो का होतो हे विचारणे समर्पक ठरेल.
या प्रश्नाला उत्तर शोधल्याविना जयंताच्याबाबतीतल्या वेदनांचे स्पष्टीकरण देता येणार नाही.

Comments

लेख आवडला

लेख आवडला.

यातील विचार कॉन्शसनेसच्या उगमाकडे नेत आहेत.

वेदना ही राग-लोभासारखी 'भावना' आहे की संवेदना ? (यातही वेदना शब्द आलाच.). भावना असो अथवा संवेदना तिचे परिणाम बाह्य वर्तनावर होतात यात नवे ते काय?
जयंताचा मेंदू परत लोकांसारखी कापल्या-भाजल्याची वेदना शिकू शकेल का? कारण त्यात जयंताचे अस्तित्व अवलंबून आहे. तसेच तो रंगाच्या वेदना विसरू शकेल का? कारण त्यानिरुपयोगी आहेत.

मेंदूला इजा झाल्यावर लोक परत त्या गोष्टी शिकत असावेत असे मला वाटते. त्यामुळे हे प्रश्न.

प्रमोद

सिनेस्थीसिया

सिनेस्थीसिया

देजा व्ह्यू

वेदनेचे परिणाम वर्तनावर कशा प्रकारे होतो यापेक्षा तो का होतो हे विचारणे समर्पक ठरेल.

हा कळीचा प्रश्न आहे असे लेखक म्हणतात. मला प्रश्न मुळीच समजलेला नाही. दोन अधोरेखित प्रश्नार्थक शब्दांच्या उत्तरामध्ये मध्ये काय कळीचा फरक असतो? ज्या ठिकाणी उत्तर सुस्पष्ट आहे, असे उदाहरण कोणी देऊ शकेल काय? मग त्या उदाहरणाच्या दृष्टांताने इथे काय प्रश्न आहे, कुठल्या प्रकारची दोन उत्तरे हुडकायची, ते मला समजेल.

उदाहरणार्थ :

"हा कुत्रा मला आता कशा प्रकारे चावला?"
उत्तर : डाव्या पोटरीवर, दोन इंच खोल चार दातांचे घाव + अर्धा इंच खोल दोन दातांचे घाव, असा चावला.
"हा कुत्रा मला आता का चावला?"
उत्तर : आधी कुत्र्याला दगड मारला, मग चावला.

या ठिकाणी "कशा प्रकारे?" आणि "का?" याचे उत्तर वेगळे आहे, हे खरे आहे. "का" शब्दात भूतकाळातले "कशा प्रकारे"चे उत्तर बहुधा अपेक्षित असते.
मात्र
रोजव्यवहारातला शब्दार्थामधील फरक "वेदना" विषयाला मला जुळवता येत नाही.

क्लिष्ट कोडं

आपल्या लेखांमध्ये एक विचार-प्रयोग, त्यातून उद्भवणारा प्रश्न व त्यावर भाष्य हा आकारबंध परिचित आहे. काहीसं वेताळ-पंचविशीसारखं. या विशिष्ट लेखात विचार-प्रयोगात काही (माझ्या मते गरजेपेक्षा) अधिक क्लिष्ट गोष्टी आल्या आहेत.

- वेदनेची संवेदना (पिवळा पितांबर?) जाणं समजू शकतो. (समजा) शरीराकडून निघालेले निरोप मेंदूपर्यंत पोचत नाहीत.
- इतर काही गोष्टींमुळे 'वेदना' होतात. हेही समजू शकतो. (समजा) चुकीच्या ठिकाणचे निरोप मेंदूच्या वेदना-केंद्रापर्यंत पोचतात.
- पण या नव्या 'वेदनां'मुळे नव्याच प्रतिक्रिया होतात. हे मात्र गोंधळात पाडतं. म्हणजे वेदना झाल्यावर जे निरोप वेदना-केंद्रापासून जातात (ओरड, कळवळ वगैरे आदेश देणारे) तेही तिसरीकडेच जातात.

आता इतके घोळ जर झाले असतील तर संपूर्ण व्यवस्था इतकी कोलमडलेली आहे, की आपण कशाला काय म्हणतो याला अर्थ उरत नाही.

विचार-प्रयोगांतून काही सार्थ हाती लागण्यासाठी थोडा वेगळेपणा आवश्यक असतो, पण जर इतके बदल जर केले तर मग मूळ व्यवस्थेत केलेली, वेदना सारख्या शब्दाची व्याख्या तपासून बघण्यात अर्थ राहात नाही.

वेदनेच्या बाबतीत केवळ बाह्य वर्तनावरूनच अनुमान करावं लागतं का? अॅनेस्थेशिया देण्याचं शास्त्र, एम आर आय ची चित्रं, यातून काहीच वस्तुनिष्ठ आत्तापर्यंत हाती लागलेलं नाही का? तज्ञांनी यावर टिप्पणी करावी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर