एक सकाळ फळाफुलांची..

नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच..! ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत? .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.
याशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांनाच डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात पिवळीजर्द कण्हेर व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो!

From Khandobachi Tekdi

..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.

From Khandobachi Tekdi

त्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.

From Khandobachi Tekdi

रानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.

From Khandobachi Tekdi

त्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...

From Khandobachi Tekdi
From Khandobachi Tekdi
From Khandobachi Tekdi

साधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां? या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है!
ज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे!!!

-हेमंत पोखरणकर
http://bornphd.blogspot.com

Comments

अप्रतिम

अप्रतिम रचना आहेत. मोगर्‍याचे फूल पाहून खंतावले. (ते रोप इथे घरात लोक वाढवतात, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर अतिशय वाईट वाटेल, म्हणून मी त्यावाटेला जात नाही).

वर दाखवलेली पिवळी कण्हेरच असावी, पण आम्ही त्याला बिट्टीचे फूल म्हणत असू. का कण्हेरीलाच बिट्टी म्हणतात?

सुंदर रचना

झेंडूच्या फुलाला मध्यभागी ठेवून केलेली रचना सर्वाधिक आवडली. शेवटची रचनाही सुरेखच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान, कण्हेर, करवीर इत्यादी

अहाहा!
डोळ्यांसाठी सुखद गारवा आहेत ह्या रचना! इथे दिल्याबद्दल अनेक आभार. बाकी पहिल्या चित्रातली कण्हेर आहे का याबद्दल शंका आहे.

चित्राताई,
बिट्टी, कण्हेर वेगळी. सहसा लालसर असणारी कण्हेर पिवळीही असते. शिवाय दोघांची पाने एकमेकांपेक्षा खूप वेगळी असतात. कण्हेर खूप उंच वाढतेदेखील. बिट्टीच्या त्यातल्यातास जवळपास असणरे फूल म्हणजे पिवळ्या कर्णटोपाचे

असो. कण्हेर अधिक भरगच्च असते ही बिट्टीच असावी.
अवांतर: कण्हेरीला "करवीर" असेही म्हणतात त्यामुळे कोल्हापूरला करवीरनगरी नाव मिळाले असे ऐकून आहे.

पुढे जालावर मिळालेला कण्हेरीचा फोटो देत आहे. शास्त्रीय नावः Nerium oleander variegata

कण्हेर
कण्हेर

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हम्म

ती बिट्टीच आहे, असे वाटले, कारण तो लांबट आकार चांगलाच परिचयाचा आहे, (ते फूल नाकावर ठेवून नाक लांब आहे असे दाखवता यायचे, किंवा पाचही बोटांवर घालून चेटकिणी होता येत असे :))
पण बरेच वर्षांत कण्हेर पाहिली नसल्याने गोंधळ झाला.
पण बिट्टीचेही झाड बर्‍यापैकी उंच वाढते.

बिट्टीच

ती बिट्टीच आहे, असे वाटले, कारण तो लांबट आकार चांगलाच परिचयाचा आहे,
माझ्यामते ती बिट्टीच आहे. चित्रे आणि फुलांची मांडणी अतिशय सुरेख.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वर्षा ऊसगांवकर

वर्षा ऊसगांवकरचे 'अफलातून' या मराठी चित्रपटातील नाव 'बिट्टी' आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बिट्टी

बिट्टी हे इटालियाच्या अखत्यारीतील एका बेटावरचे गाव/शहरही आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

या

या बिट्टीबद्दल ठाउक नव्हते. सार्डीनियाला गेलो होतो, तिथला नितळ समुद्र पाहून परत यावेसेच वाटत नव्हते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बिट्टीवरून बिट्टा

बिट्टीवरून 'जिंदा शहीद' मनिंदरजीतसिंह बिट्टा आठवला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ही बिट्टीच आहे

.. ही बिट्टीच आहे. तळकोकणांत बर्‍याच ठिकाणी बिट्टीलाही कण्हेरीच म्हणतात.

मोदकासाठी इंद्रायणी वापरलाय् की कोळपी यावर काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा ढेकरा देत आणखी २ मोदक हाणीन् म्हणतो!

हेमंत
http://bornphd.blogspot.com

सुरेख.

फारच् सुंदर रचना !! खूप आवडल्या!

सुंदर रचना

सुंदर रचना

बिट्टी....

अप्रतिम पुष्परचना आहेत...! आणि ते फूल बिट्टिचंच आहे. त्यालाच आमच्या भागात करणटोप असंही म्हणतात . त्याच्या फळांचा आकारही वैशिष्ट्यपुर्ण , जरासा डमरूसारखा असतो. आणि त्या बिट्टया झेलुन खेळण्याचा खेळ आहे.

 
^ वर