अवमान, मानहानी, चिथावणी

जालावरील चर्चा वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की 'नेहमीचे यशस्वी' लेखक वगळता अनेकांकडे ज्ञान, जिज्ञासा किंवा चर्चेची चिकाटी अगदीच कमी असतात. (सिग्मॉईड आलेख येईल काय?) लेन प्रकरणात भावना अनावर होऊन केलेल्या बहुतेक लिखाणांमध्ये कायद्याचे बरेच अज्ञान दिसले म्हणून मी गूगलून थोडी माहिती जमविली आहे.

चिथावणी
भा. दं. वि. १२४अ
सरकारप्रति द्वेषाचे, शत्रुत्वाचे वातावरण बनविणे.
भा. दं. वि. १५३
दंगलीसाठी चिथावणी देणे.
भा. दं. वि. १५३अ
धर्म, भाषा, वंश, जात, इ. च्या आधारावर दोन समाजांत तेढ उद्युक्त करणारी विधाने किंवा कृती करणे किंवा दंगलखोरांना प्रशिक्षण देणे.
प्रार्थनागृहात अशी विधाने केल्यास अधिक कठोर शिक्षा आहे.
भा. दं. वि. १५३ब
धर्म, भाषा, वंश, जात, इ.च्या कारणाने एखादा समूह भारताचे नागरिक होण्यास लायक नसल्याचा दावा करणे किंवा त्याचे नागरिकत्व नाकारण्याची मागणी करणे.
प्रार्थनागृहात अशी विधाने केल्यास अधिक कठोर शिक्षा आहे.
अवमान
भा. दं. वि. २९५-२९८
२९५: धर्माचा अपमान करण्यासाठी धार्मिक वस्तू/स्थळाची नासधूस करणे.
२९५अ: धार्मिक भावना दुखविणार्‍या कृती हेतुपुरस्सर करणे.
२९६: धार्मिक समारंभात हेतुपुरस्सर विघ्न आणणे.
२९७: धार्मिक भावना दुखविण्यासाठी स्मशानात शिरणे.
२९८: धार्मिक भावना दुखविणारी विधाने हेतुपुरस्सर करणे.
भा. दं. वि. ५०४
एखादी व्यक्ती रागाच्या भरात सार्वजनिक शांततेचा भंग किंवा इतर काही गुन्हा करेल अशा हिशोबाने, अपमान करण्याच्या हेतूने, त्या व्यक्तीचा अपमान करणे.
अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९
अनु. जाती/जमातीच्या व्यक्तीस अनु. जाती/जमातीच्या नसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जागी हेतुपुरस्सर अपमानित करणे.
राष्ट्रीय मानचिन्हे कायदा १९७१
झेंडा, राज्यघटना आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणे.
विधीगृहांचा सन्मान
न्यायालयांचा सन्मान
याव्यतिरिक्त, 'भारतमाता', राष्ट्रपिता, राष्ट्रीय/स्थानिक महास्त्रिया/पुरुष, इत्यादींचा अवमान करण्याविरुद्ध काही कायदा मला माहिती नाही.
मानहानी
भा. दं. वि. ४९९-५००
असत्य असल्याचे आणि मानहानी करण्याक्षम असल्याची माहिती असलेले विधान सत्य असल्याचा दावा करून व्यक्तीची/संस्थेची मानहानी करणे. नैतिक/बौद्धिक पात्रता, विश्वासार्हता, पत किंवा समाजातील आदर कमी करणारे विधान मानहानी करते.
सद्हेतूने केलेले, वक्त्याला सत्य वाटणारे कथन बदनामीकारक नसते.
मृत व्यक्तीच्या बदनामीची तक्रार केवळ तिच्या कुटुंबातील किंवा जवळची नातेवाईक व्यक्तीच करू शकते.
या गुन्हेगारी तक्रारीव्यतिरिक्त दिवाणी खटल्यातून आर्थिक भरपाई मागता येते.

लेनप्रकरणात काही प्रश्न
उदयनराजे भोसले हे शिवाजीचे 'जवळचे नातेवाईक' आहेत काय?
नामसाधर्म्य प्रकारचा डिस्क्लेमर (याला मराठी प्रतिशब्द काय?) असल्यावर एखादे विधान 'व्यक्तीविषयीचे' का राहील? (केस इन पॉइंटः 'नॉटी जोक' किंवा इतर कल्पनारम्य कलाकृती, उदा. रश्दीने कल्पिलेली आयेशा नावाची वेश्या) त्याशिवाय कलम ४९९ लागू होईल का?
"मी स्वतः उ.शे.रा. चा भक्त आहे आणि खीर खाण्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावतात" असे विधान केले तर कलम २९५अ लागू होईल का? शिवाजीला देव मानणारा धर्म निर्माण झाल्यास कलम २९८ लागू होईल का?
कलम ५०४ मध्ये 'दंगलीस उद्युक्त करण्याचा हेतु' सिद्ध करणे आवश्यक आहे. तो कसा सिद्ध करणार? शिवाय शिवाजीचा अपमान केल्यामुळे इतर लोकांनी दंगल केल्यास कलम ५०४ लागू होईल का?
कलम १५३अ मध्ये 'दोन समाजांत तेढ वाढविल्याचे' सिद्ध होणे आवश्यक आहे. जातीचा उल्लेख न करता दोन व्यक्तींविषयी काही सत्य/काल्पनिक दावा केल्याने त्या दोन व्यक्तींच्या जातींमध्ये तेढ का वाढावी? असा दावा तेढ वाढविणारा असल्याचे गृहीत धरले तरी 'लोक असा दावा करतात' हे विधानही तेढ वाढविते का?

'लोक असा दावा करतात' हे विधान तेढ वाढविते.

हे विधानही तेढ वाढविते का?

'अशा दाव्यावर बंदी आहे.

किंवा

'लोक असा दावा करतात' या विधानावर बंदी आहे.

अशा भित्तीपत्रकांवर बंदी घातल्यास ही बंदी लोकांना समजणार कशी?

इशारा: मी कायदेतज्ञ नाही. कायद्यांचा मी लावलेला अर्थ, स्वैर भाषांतर, यांमध्ये चूक असू शकते. नमूद केलेल्या कायद्यांव्यतिरिक्त कायदे असू शकतात.

Henry Hale: I fear the presence of the outsiders will attract those of whom we do not speak.
Female Elder #2: But if you talk about those of whom we do not speak, have you not spoken of that about which we do not talk.
Henry Hale: Do not speak of that of about which we talk of not speaking... about. -
स्केरी मूवी ४

Comments

कायद्याचा अर्थ

अनेक सर्वसमावेशक कायदे करायचे. आपल्याला वाटेल त्याला व तेव्हा लावायचे. राज्यसत्ता भोगायची. मेडीव्हियल राज्यकर्त्यांचे वारसे या कायद्यात दिसतात.

यावरचा उपाय म्हणजे. कुठल्या कायद्यांवये किती शिक्षा कुणाला झाली, किती गुन्हे नोंदले गेले, किती खटले झाले याच्या विदा गोळा करणे. मोठे काम आहे. नुसते खटले चालणे हीच एक शिक्षा असते ते वेगळे.

आजकाल सरसकट जाहीररित्या, कॅमेरासमोर धमक्या देण्याचे पेव आहे. याविरुद्ध कुठले कलम लागते माहित नाही.

प्रमोद

क्रिमिनल इंटिमिडेशन

धमकी देणे हा कलम ५०३ अन्वये फौजदारी गुन्हा आहे.

पुतळा

वरील प्रकारात पुतळ्याची विटंबना कुठल्या प्रकारात टाकणार?
प्रकाश घाटपांडे

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

काय दादा, आमची परीक्षा घेता होय?
धार्मिक पुतळा असेल तर २९५अ सुद्धा लागू होईल.
अन्यथा मिश्चीफ सदराखाली ४२५-४२७, ४३४, इ. एवढेच माहिती आहेत.

काही उत्तरे

विचारलेले प्रश्न मोलाचे आहेत. उपक्रमवर कोणी वकील नसावेत. किंवा वकीली चर्चा फक्त कोर्टात करावी या व्यावसायिक मताचे ते असावेत. मी वकील नाही त्यामुळे माझी उत्तरे जाणकाराची नाहीत.

माझ्या मते जाहीर मतप्रदर्शनाचे कायदे हे गुन्हा घडल्यासच वापरले जातात. म्हणजे जाहीरपणे कोणी म्हणाले की त्याचे दात घशात घालू आणि तसे झाले नाही वा प्रयत्नही झाला नाही तर जाहीर मतप्रदर्शन हा गुन्हा होणार नाही. मात्र अशा गोष्टी कायदारेषेच्या जवळची वाटचाल असते. व त्यात धोका असू शकतो. (म्हणजे कोणी त्यावर गुन्हा दाखल करू शकतो.)

गुन्हा दाखल करणे, खटला चालवणे, शिक्षा होणे आणि शिक्षा भोगणे हे चार टप्पे समजले तर प्रत्येक टप्यात आरोपी स्वता:चा बचाव करू शकतो. त्यामुळे गुन्हा दाखल झाला (नुसत्या वक्तव्यावरून) तरी तो न्यायालयात टिकणार नाही असे मला वाटते. मात्र हे सगळे सोसायची ताकद लागते. ज्यांच्याकडे असते ते जास्त मुक्तपणे बोलू शकतात.

उदयनराजे भोसले हे शिवाजीचे 'जवळचे नातेवाईक' आहेत काय?

माझ्यामते आहेत. कदाचित यात (सर्वात ??) जवळचे हयात नातेवाईक असा अर्थ न्यायालयात होऊ शकेल.

नामसाधर्म्य प्रकारचा डिस्क्लेमर (याला मराठी प्रतिशब्द काय?) असल्यावर एखादे विधान 'व्यक्तीविषयीचे' का राहील? (केस इन पॉइंटः 'नॉटी जोक' किंवा इतर कल्पनारम्य कलाकृती, उदा. रश्दीने कल्पिलेली आयेशा नावाची वेश्या) त्याशिवाय कलम ४९९ लागू होईल का?

माझ्यामते ही कायद्याच्या काठावरची वाटचाल आहे. मात्र न्यायालय थोडी सहिष्णुता दाखवेल असे वाटते.

"मी स्वतः उ.शे.रा. चा भक्त आहे आणि खीर खाण्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावतात" असे विधान केले तर कलम २९५अ लागू होईल का? शिवाजीला देव मानणारा धर्म निर्माण झाल्यास कलम २९८ लागू होईल का?

बहुतेक नाही. सहसा इतरांनी सेवन केलेले विविध निषिद्ध अन्न (जैन धर्मासाठी मांसाहार, हिंदूसाठी गोमांसभक्षण, मुसलमानांसाठी डुक्कर) हे दुसर्‍याच्या भावना दुखवत नाहीत असे मानले जाते. हे सर्व लोक आपल्या भावना दुखावल्या हे बिनदिक्कतपणे म्हणू शकतात. पण असे बोलल्यास कुठला गुन्हा होतो असे मानता येणार नाही.

कलम ५०४ मध्ये 'दंगलीस उद्युक्त करण्याचा हेतु' सिद्ध करणे आवश्यक आहे. तो कसा सिद्ध करणार? शिवाय शिवाजीचा अपमान केल्यामुळे इतर लोकांनी दंगल केल्यास कलम ५०४ लागू होईल का?

माझ्या मते बदनामीचे विधान दंगलीस उद्युक्त करत नाही. दंगलीस उद्युक्त करणारे विधान म्हणजे 'याला मारा, त्याला झोडा, या लोकांना असे करा अशा सारखी प्रत्यक्ष वा तसे दर्शवणारीर अप्रत्यक्ष विधाने.

कलम १५३अ मध्ये 'दोन समाजांत तेढ वाढविल्याचे' सिद्ध होणे आवश्यक आहे. जातीचा उल्लेख न करता दोन व्यक्तींविषयी काही सत्य/काल्पनिक दावा केल्याने त्या दोन व्यक्तींच्या जातींमध्ये तेढ का वाढावी? असा दावा तेढ वाढविणारा असल्याचे गृहीत धरले तरी 'लोक असा दावा करतात' हे विधानही तेढ वाढविते का?

यावेळी केवळ ते विधान नाही तर त्यासोबतची इतर विधाने आणि परिस्थिती तेढ दर्शवत असेल तर तसे होईल. मात्र कित्येकदा अशा गोष्टी सोडून दिल्या जातात.

'लोक असा दावा करतात' हे विधान तेढ वाढविते. हे विधानही तेढ वाढविते का?
'अशा दाव्यावर बंदी आहे.
किंवा
'लोक असा दावा करतात' या विधानावर बंदी आहे.

उत्तर वरील प्रमाणेच राहील.

प्रमोद

थोडा फरक

कलम ५०४ मध्ये 'दंगलीस उद्युक्त करण्याचा हेतु' सिद्ध करणे आवश्यक आहे. तो कसा सिद्ध करणार? शिवाय शिवाजीचा अपमान केल्यामुळे इतर लोकांनी दंगल केल्यास कलम ५०४ लागू होईल का?

माझ्या मते बदनामीचे विधान दंगलीस उद्युक्त करत नाही. दंगलीस उद्युक्त करणारे विधान म्हणजे 'याला मारा, त्याला झोडा, या लोकांना असे करा अशा सारखी प्रत्यक्ष वा तसे दर्शवणारीर अप्रत्यक्ष विधाने.

१५३ मध्ये क ने ख ला ग विषयी उद्युक्त केल्यास क विरुद्ध गुन्हा आहे. क ने ख चा अपमान केल्यामुळे ख ने क चा निषेध म्हणून दंगल केल्यास ५०४ मध्ये क विरुद्ध गुन्हा आहे असे मला वाटते.
१५३ हे ५०५ चा एक भाग आहे असे वाटते.

निषिद्ध अन्न...

भारताच्या/भारतमातेच्या आकाराचा केक खाल्ला तर?

उपयोग होतो ?

सीमाप्रश्नावर काहीतरी साधकबाधक चर्चा व्हावी या हेतूने "झी २४ तास" या वृत्त वाहिनीने इथे कोल्हापुरात काही मराठी नेते आणि काही कानडी नेते (कन्नड वेदिका) यांच्या संयुक्त बैठकीचे परवा शुक्रवारी आयोजन केले होते; त्याप्रमाणे रेकॉर्डिंगसाठी "वेदिके"चे नेते बेळगांवहून कोल्हापुरात आले होते. याला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. अर्थात नुसता मौखिक विरोध केला तर आपले म्हणणे दोन्ही राज्याला समजणार नाही असे मानून शिवसैनिकानी "झी" च्या स्टुडिओत धडक मारली अन् वेदिकेच्या नेत्यांवर शारिरीक हल्लाबोल केला. काही नेत्यांना स्टुडिओच्या कर्मचार्‍यांनी मागील दाराने बाहेर काढले, पण सेनेच्या रेट्यात जे सापडले त्यांचे काय हाल झाले ते रात्री विविध वाहिन्यावर दाखविले.

पोलिसांनी या धाग्यात उल्लेख केलेले कलम १५३ व ५०४ चा उल्लेख करून काही शिवसैनिकांना अटक केली सकाळी १०.३० वाजता, आणि ११.०० वाजता कोर्टासमोर उभे केले असता तात्काळ १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सर्वांची मुक्तता झाली. तिथून ही मंडळी विजयीवीराच्या थाटात घोषणा देत आपल्या कार्यस्थळी मार्गस्थ झाली. जे जखमी झाले आहेत ते सरकारी इस्पितळात अजूनही दहशतीच्या छायेत आहेत. प्रश्न असा आहे की, सदर दोन कलमे इतकी का कमकुवत आहेत की, लावली अन् अर्ध्या तासात काढलीदेखील? आता केव्हातरी दोनतीन वर्षांनी एखादी नाटकी तारीख पडणार, ज्यांना मार बसला आहे ते काही परत कोल्हापुरात येऊन 'ओळख परेड' नावाचा फार्स करू शकणार नाहीत, आणि बचावाचा वकिल पुराव्याअभावी आरोपीना सोडावे असा पवित्रा घेणार ~ व कायदाही तसेच करणार !

किती गांभीर्याने घ्यायची ही सत्राशेसाठ कलमे ?

एक शक्यता

मारहाण निषेधार्हच आहे पण दोन्ही बाजूंच्या मतदारांना खूष करण्याचा हा प्रयत्न असेल का? मी दृष्ये पाहिलेली नाहीत; मारहाण गंभीर दिसत होती का?

गांभीर्य

ही कलमे तुमच्या विरुद्ध लागतात तेव्हाच तुम्ही गांभीर्याने दखल घ्याल. रिकामटेकडा यांचा अन्वयार्थ याविषयीचा असावा. जाहीर वागण्यात/बोलण्यात किती संयम असावा हे या वागण्यातून शिकतो. नुसता खटला चालला, (या गुन्ह्यात तो चालेल की नाही माहित नाही) तरी तो त्रास होतो. (हुसेनला भारताबाहेर पळून जावे लागले.)
आपल्या गृहराज्यमंत्र्यांना देखील त्रास झाला. (थोडासा का होईना.)

बाकी लोक पुराव्या अभावी निर्दोष सुटतील वगैरे मान्य.

प्रमोद

कलम ५०४

कलम ५०४ ही तारेवरची कसरत दिसते. या कलमामध्ये किती शिक्षा झाल्या हे जाणून घ्यायला आवडेल.
या कलमात 'हेतुतः शांतता भंगास उत्तेजनेबरोबर हेतुतः बदनामी' असे शब्द आहेत.
नुसती बदनामी नाही तर त्यात शांतताभंगास उत्तेजना देणे असेल तर तो गुन्हा ठरेल असे माझे मत झाले. एखाद्याला खूनी म्हणावे वा बलात्कारी म्हणावे आणि समोरच्याला त्याविरुद्ध काही करायला प्रवृत्त करणे हे या कलमाला धरून राहील. एखाद्याला खूनी म्हणावे आणि 'मी म्हणतो काय करशील तू?' असे म्हणावे. आणि त्या माणसाच्या साथीदाराने वा त्यामाणसाने तुमच्यावर हल्ला केला तरी कदाचित हा कायदा लागू होईल. मात्र नुसतेच खुनी म्हटले आणि पुढचे वाक्य म्हटले नाही तर ते ५०४ मधे बसणार नाही.

मात्र या कलमाचा अर्थ गुन्हा दाखल करणारे वेगळा लाऊ शकतील. म्हणजे एखाद्या व्यक्तिचे आदरार्थी नाव न वापरणे त्यामुळे अपमान वाटणे आणि हिंसाचाराला प्रवृत्त होणे.

504. Intentional insult with intent to provoke breach of the peace Whoever intentionally insults, and thereby gives provocation to any person, intending or knowing it to be likely that such provocation will cause him to break the public peace, or to commit any other. offence, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.
प्रमोद

हिंदू सक्सेशन ऍक्टनुसार

उदयनराजे भोसले हे शिवाजीचे 'जवळचे नातेवाईक' आहेत काय?
जवळच्या नातेवाईकांत आई-वडील, अपत्ये, पत्नी, भावंडे इत्यादी येतात. हिंदू वारसा कायद्यानुसार (सक्सेशन ऍक्ट) अपत्ये आधी, नंतर बायको, मग आई-वडील ह्या क्रमाने संपत्तीवर ह्क्क असतो बहुधा. इथे थेट वशंज आणि जवळचे नातेवाईक ह्यांत गल्लत होते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर