जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार:

'शिवाजीः द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया’ या जेम्स लेन लिखित पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवण्याचा मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. जेम्स लेन लिखित या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात काही आक्षेपार्ह माहिती देण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टात न्या. बी. के. जैन आणि न्या. ए. के. पटनाईक यांच्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी झाली. त्यांनी हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला, यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाकडून कळवण्यात आले.

मुळात शासनाने घातलेला बंदीचा निर्णय योग्य होता का? हायकोर्टाने व नंतर सुप्रीम कोर्टाने ह्या पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवून योग्य पाऊल उचलले आहे का? हा निर्णय आल्यावर जेम्स लेनच्या या पुस्तकाची एकही प्रत राज्यात विकू देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. इतर पक्ष आणि संघटनाही देतील. अहमहमिका लागेल. अशा इशारांबद्दल तुम्हाला काय वाटते?

कृपया मते मांडावी, ही विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

फरक पडत नाही

पुस्तकावरची सरकारी बंदी उठवली असली तरी गैरशासकीय यंत्रणांनी (आज राज ठाकरे, उदयनराजे उद्या मराठा महासंघ, विनायक मेटे वगैरे मंडळी) बंदी लागू असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या क्षमतेवर माझा विश्वास नाही. भारत बंद च्या दिवशीच राज्यसरकारची पुरेशी शोभा झाली. त्यामुळे परिस्थितीत काही फरक पडू नये.

जेम्स लेनने शिवाजीराजांबद्दल असे काही गलिच्छ लिहिले असेल तर ते निंदनीय आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केंद्र करत आले आहे. नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.
जेम्स लेनच्या पुस्तकात शिवाजी हा शहाजीचा मुलगा नसून दादोजी कोंडदेवांचा असावा, असे काही पोर्तुगीज इतिहासकारांचे मत असल्याचा जाताजाता उल्लेख झाला आहे. कोण कोठला लेन शिवाजीचे वडील दादोजी होते म्हणतो आणि आपण मूर्ख सारखे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढतो.Maharashtrians tell jokes naughtily that Shivaji’s biological father was Dadoji Kondeo Kulkarni असे विनोद सांगणारे 'महाराष्ट्रीयन' कोण आहेत याविषयी कुतूहल आहे. शिवाजीचे गुण त्यांना मान्य करणे अवघड जाते म्हणून त्याच्या आईच्या चारित्र्यावर असले घाण आरोप करून शिवाजीचे हे गुण आमच्या रक्ताचे च होते म्हणून त्यांना स्वतःच्या उच्चभ्रू रक्ताची टिमकी वाजवायची होती.ज्यांना बहुजन समाजातून उदयास आलेले नेतृत्व डोळ्यात खुपत होते त्यांनीच मग हे शिवाजीच्या पित्या बद्दल खोटानाटा अपप्रचार केला. कोणाच्या आईच्या चारित्र्यावर शंका घेवून, मग आमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यासारखे वाटते. हे म्हणणे म्हणजे हलकट पणाची कमाल झाली. या पुस्तकाची महाराष्ट्रात काय भारतात विक्री होता कामा नये. त्याच बरोबर असे लेखन करणाऱ्या प्रवृतीला आळा घालण्या साठी कडक कायदा करावा. मध्यंतरी वारकरी समाजाचा असाच अपमान केला तेंव्हा वारकरी का मारेकरी म्हणून त्यांना हिणवण्यात आले. पण प्रकरण अंगावर शेकल्यावर माफी मागून , आता माफी मागितली विसरून जा, असे मानभावी सल्ले दिले गेले. या मुळे ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे. अश्या बिनकण्याच्या वागण्यामुळे उद्या तुमच्या आई बहिणीच्या चारित्र्य वर शंका काढण्यास हे लोक कमी करणार नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या नावा खाली तुम्ही ते नाकारू शकणार नाही, त्या लिखाणाचा विरोध करू शकणार नाही. जाता जाता. आपली न्याय व्यवस्था कशी आहे हे भोपाळ हत्त्याकांडा वरील निकाला वरून समजले यामुळे न्यायालयालयाच्या निकालाची पायमल्ली होत आहे असा आक्रोश करू नका.

आगलावेपणा

पुरे. भांडारकर संस्थेचे नुकसान का केले? वड्याचे तेल वांग्यावर काढू नका.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तुमचा प्रतिसाद पूर्णच खोडून टाकला पाहीजे

कोणाच्या आईच्या चारित्र्यावर शंका घेवून, मग आमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यासारखे वाटते. हे म्हणणे म्हणजे हलकट पणाची कमाल झाली.

जेम्स लेनचे पुस्तक तुम्ही वाचलेले आहे काय? वाचले नसल्यास तुमचा गरळओकू प्रतिसाद खोडला जावा असे मला वाटते पण अर्थातच अर्धवट माहितीवर मत मांडलेले असले तरी तो खोडला जावा अशी मागणी मी करणार नाही.

(हा प्रतिसाद (ठणठणाट) चर्चेचा प्रस्ताव या कॉलमखाली का दिसत आहे बरे?)

आक्षेप

नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.

नेहरूंची बदनामी करू नका. पुरावे द्या नाहीतर माफी मागा. मी त्यांचे 'डिस्कवरी ऑफ इंडिया' वाचले आहे. त्यात शिवाजीबद्दल चांगलेच लिहिले आहे.

कोण कोठला लेन शिवाजीचे वडील दादोजी होते म्हणतो

लेन तसे म्हणाला नाही. तुम्ही लेनवर खोटे आरोप करून त्याची बदनामी करीत आहात.

अश्या बिनकण्याच्या वागण्यामुळे उद्या तुमच्या आई बहिणीच्या चारित्र्य वर शंका काढण्यास हे लोक कमी करणार नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या नावा खाली तुम्ही ते नाकारू शकणार नाही, त्या लिखाणाचा विरोध करू शकणार नाही.

लिखाणाचा विरोध लिखाणाने करावा.

जागा चुकल्यास (निसटल्यास) कृपया गरळओकू प्रतिसादाखाली वाचावा.

श्रीमान ठणठणपाळ कृपया बिचार्‍या जेम्स लेनला ठोकण्याची आगलावी भाषा करुन अन्य सदस्यांच्या भावना दुखावू नका. लेन हे थोर इतिहासकार आहेत. त्यांनी केलेला आगलावेपणा म्हणूनच क्षम्य आहे. तुम्ही एक दोन लेख व चर्चा लिहिलात म्हणजे लेखक झालात असे वाटत असल्यास जागे व्हा. आपले गरळओकू प्रतिसाद बिल्कुल खपविले जाणार नाहीत. इथे तर नक्किच नाही.

सर्वात आधी त्या लेनच्या खांद्यावरुन कुणी बंदुक चालविली ते शोधा. आम्हाला वाटते त्या लेनची नार्को तपासणीच करावी म्हणजे सुत्रधाराचा शोध लागेल. परंतु नार्कोसाठी जास्त खर्च न करता हातभट्टीच्या दारुवरच काम भागवावे. बहुतेक जेम्स महाशयांना वैचारिक रसद पुरविणार्‍या मंडळींनी लेखन करतेवेळी सुद्धा त्यांस हातभट्टीचीच दिली असावी. म्हणूनच त्याची इतकी मजल गेली असावी. ठोकायचेच असेल तर लेखकाला न ठोकता त्याच्या लेखणीत गटाराचे पाणी भरणार्‍यांना ठोकून काढावे. म्हणजे लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अबाधित राहील आणि ठोकून काढायची आपली हौसही फिटेल.

जयेश

का?

लेन हे थोर इतिहासकार आहेत. त्यांनी केलेला आगलावेपणा म्हणूनच क्षम्य आहे.

कृपया औपरोधिक भाषेमागे लपू नका. लेन यांनी आगलावेपणा केलेला नाही.

ठोकायचेच असेल तर लेखकाला न ठोकता त्याच्या लेखणीत गटाराचे पाणी भरणार्‍यांना ठोकून काढावे. म्हणजे लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अबाधित राहील आणि ठोकून काढायची आपली हौसही फिटेल.

कायदा हातात घेण्याचे समर्थन कोणत्याही कारणाने होऊ शकत नाही.

रक्ताचा काय संबंध?

एखाद्या विशिष्ट जातीचे रक्त हे श्रेष्ठ आणि इतर जातींचे रक्त हे कनिष्ठ असल्याच्या कल्पना भोंगळ आहेत.

या मुळे ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.

असे गोलमोल बोलू नका. ही विषवल्ली कोण आणि त्यांना मुळातून खुडण्यासाठी नक्की काय करायचे तेही सांगा.

समजा जेम्स लेनने काही गलिच्छपणा केला असेल तर त्याची शिक्षा त्यालाच मिळणे आवश्यक आहे. इतरांना त्याचा त्रास नको.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

घरोघरी मातीच्या चुली

सकाळमधील बातमीतून ठणठणपाळांची जर्मन आवृत्ती सापडली.

स्पेनने जर्मनीस पराभूत केल्यानंतर ऑक्‍टोपसचा खातमा करण्यासाठी जर्मनीच्या चाहत्यांनी आग्रह धरला आहे, एवढेच नव्हे तर त्याचे कूळ शोधून काढायला पाहिजे, अशीही टीका सुरू झाली होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मग् अभिव्यक्ती स्वातंत्र्य् वगैरे फाट्यावर् मारले जाईल्..

अतिशय् उत्तम् प्रतिसाद्.... जातिअभिनिवेश् हाच् मुळ् मुद्दा आहे या सगळ्या कट कारस्थाना मागे.... आज् लेन् वापरला उद्या अजुन् कुणी तरी निश्चितच् वापरला जाईल् .... सातत्याने इतिहास् विक्रुत् करणे सुरुच् आहे.....

एक् तरुणी आपल्या ५वर्षे वयाच्या अजाण् निष्पाप् भावा सोबत् रस्त्याने जात् असते तेंव्हा एक् मवाली येतो अन् तिच्या छातीला बोट् लावतो तेंव्हा ती तरुणी त्याच्या कानाखाली वाजविते...मवाली पळुन् जातो.... लहानगा भाऊ विचारतो,"ताई त्याने तुला एक् बोट् लावले होते तु त्याला दोन् बोटे लावयची असतिस्, त्याला कानाखाली का वाजविलीस्?" आपल्या बहिनीचा झालेला अवमान् समजण्या इतपत् अजुन् तो मोठा झालेला नसतो अशीच् सध्या बहुजनांची स्थिती अशी आहे.
राजमाता जिजाऊंचा झालेला अवमान् अजुन् यांना समजलेला नाही हेच् खरे.. पण् जेंव्हा हाच् समाज् जागा होईल् तेंव्हा या अवमानाचा सुड् घेतल्या शिवाय् राहणार् नाही हे ही या ह्***** नी लक्षात् असु द्यावे... मग् अभिव्यक्ती स्वातंत्र्य् वगैरे फाट्यावर् मारले जाईल्..

हे

उदाहरण आधीही वाचल्यासारखे वाटते. :)

--

खुलाशाची विनंती

अभिव्यक्ती स्वातंत्र्य् वगैरे फाट्यावर् मारले जाईल्..

आत्ताच जागे करा ना समाजाला. वाट कशाची बघता? अभिव्यक्तिस्वातंत्र्य आत्ताच फाट्यावर मारा ना! बघाच मग मीही तुमच्या भावना कशा फाट्यावर मारेन ते.

कारण

पुस्तक अर्थातच वाचलेले नाही.

पण शिवाजीच्या शारीर पित्याविषयी टिपण्णी असल्यामुळे बंदी घातली होती असेच आठवते.

शिवाजीच्या चरित्राच्या एकूण आवाक्यात शिवाजीचा खरा बाप या विषयातली कुचाळकी कुठे बसते ते कळत नाही.
या प्रकरणातला दुसरा भाग जेम्स लेन ला ही माहिती भांडारकर संस्थेतून मिळाली असे लेन ने सांगितले होते. येथे सुद्धा ही माहिती लेनला मुद्दाम सांगण्याची गरज काय हे कळले नाही.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

अतिशय अनावश्यक

शिवाजीच्या चरित्राच्या एकूण आवाक्यात शिवाजीचा खरा बाप या विषयातली कुचाळकी कुठे बसते ते कळत नाही.
जेम्स लेन सांगितलेल्या 'विनोदा'चा उल्लेख बहुधा ब्राह्मणी कावेबाजपणावर प्रकाश टाकणारे असू शकतो. पण ते भारतीय काँटेक्स्टमध्ये अतिशय अनावश्यक व बेजबाबदारपणाचे होते.

ह्यासंदर्भात जेम्स लेनचे शिवचरित्र ब्राह्मणी वर्चस्ववादावरच टीका! हा लेख वाचावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शिवाजीचे बंगलोरातील लग्न

मी बंगलोरात गेलो असताना माझ्या मित्राने इकडे शिवाजीचे लग्न झाले होते असे सांगितले. लोकसत्तेतील लेखात शहाजी शिवाजीच्या लग्नात उपस्थित नव्हता हे वाचल्यावर ते आठवले.
हे लग्न शहाजीने लावून दिले होते (सोयराबाईशी?).

वडील मुला(मुली)ची ताटातूट करणे हा एके काळच्या राजकारणाचा भाग होता. याचे एक उदाहरण म्हणजे आग्र्यास जो समेट होत होता त्यात संभाजीला मनसबदारी देऊन त्यास (?) अफगाणिस्तानच्या युद्धावर पाठवायचे. असे एकदा झाले की पुत्रप्रेमापोटी शिवाजी कराराचा भंग करणार नाही. लग्न करण्यातही असेच डाव असायचे. शहाजीला महाराष्ट्रातून बाहेर काढणे हा त्याकाळच्या गुंतागुंतीच्या कराराचा भाग असू शकतो. (माझा एवढा अभ्यास नाही. पण शहाजीचे करार खूप गुंतागुंतीचे होते हे आठवते.) शिवाजीच्या कारवाया थांबवण्यासाठी शहाजीला अटक व मग समेट हे अशाच राजकारणाचा भाग आहे. असाच दबाव शहाजीवर (ज्याने शेवटी स्वतंत्र राज्य बंगलोरास स्थापन केले) शिवाजी आणि जिजाबाई महाराष्ट्रात राहिल्याने करता आला असता. शिवाजीचे राजकारण हे शहाजीच्या राजकारणापासून वेगळे काढता येत नाही.

जिजाबाई व शहाजी यांचा सहवास शिवजन्मानंतर कमी होता. कदाचित तो अशा बाबींमुळे. जिजाबाईचा शहाजीशी विवाह हा कदाचित प्रेमविवाह असावा. जाधव-भोसले वितुष्ट होते यावरून हा कयास मांडला गेल्याचे आठवते. शिवाजीचा मोठा भाऊ (सख्खा) संभाजी शहाजीबरोबरच राहिला. शिवाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवणे नातवाचे नाव शहाजी असणे अशा कितीतरी बाबीतून संबंधांचा गुंता लक्षात येतो.

प्रमोद

अवांतरः प्रेमविवाह

जिजाबाईचा शहाजीशी विवाह हा कदाचित प्रेमविवाह असावा. जाधव-भोसले वितुष्ट होते यावरून हा कयास मांडला गेल्याचे आठवते.

हे चुकीचे आहे. शहाजी आणि जिजाबाई यांचा बालविवाह झाला होता. शहाजींचे वय त्यावेळेस ७ (फारतर ९) आणि जिजाबाईंचे त्याहीपेक्षा लहान असावे. मालोजी भोसले हे जाधवांकडे शिलेदार होते परंतु नंतर स्वकर्तृत्वाने मोठे होत गेले. त्यांनी जिजाबाईंच्या सोयरिकीबद्दल विचारले असता आपल्या पदरचा नोकर सोयरिकीची भाषा करतो म्हणून जाधवांचे पित्त खवळले. पुढे राजकारणाचा भाग म्हणून अनिच्छेने हा विवाह त्यांना करून द्यावा लागला. असो.

शिवाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवणे नातवाचे नाव शहाजी असणे अशा कितीतरी बाबीतून संबंधांचा गुंता लक्षात येतो.

मुलाने बापाचे नाव अपत्याला देणे हे इतरत्रही लागू होते आणि सर्वसामान्य पद्धत होती.

बाकी चालू द्या!

इतर माहितीसाठी ही चर्चा वाचता येईल.

लोकसत्तेचा दुवा

धम्मकलाडू यांनी दिलेला १९-२-२००४ च्या लोकसत्तेचा दुवा सर्व शंका दूर करील अशी अपेक्षा आहे. जेम्स लेनने काही पुरावा नसता जिजाबाईचे चारित्रहनन केले आहे, त्याचा निषेध जरूर व्हावा. केवळ असत्यकथनाबद्दल पुस्तकावर बंदी आणणे योग्य नाही. लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांना सत्यकथनाबाद्दल तुरुंगवास झाला होता.--वाचक्‍नवी

माझे मत

सत्यकथन हा 'बचाव' होणे मला नैतिक वाटते.

जेम्स लेनने काही पुरावा नसता जिजाबाईचे चारित्रहनन केले आहे, त्याचा निषेध जरूर व्हावा. केवळ असत्यकथनाबद्दल पुस्तकावर बंदी आणणे योग्य नाही.

"लोक असत्यकथन करतात" हे सत्य लेनने कथले आहे. त्यात बदनामी काय? माझ्या मते मानहानिकारक असत्यकथनावर बंदी आली पाहिजे.

सावरकर

"

लोक असत्यकथन करतात" हे सत्य लेनने कथले आहे. त्यात बदनामी काय?

बरोबर आहे. ह्यात वावगे काहीच नाही. उलट लोकांच्यात काय काय घाणेरडे बोलले जाते ते बाहेर आल्यने ह्या लोकांना शरम वाटेल.

ह्यावरुन आणाखी एक उदाहरण आठवले. नथुराम गोडसेवरील नाटकात सावरकरांच्या तोंडी एक वाक्य आहे. गांधीहत्येनंतर सावरकर नथुरामाला कळवतात, नथुरामा तू दधिची आहेस तुझ्या अस्थिंची शस्त्रे होतील वगैरे. एका फोरमवर चर्चेत हे वाक्य जसेच्या तसे टाकले होते.

आता मराठी नाटकांमधून सावरकरांविषयी असे बोलले जाते, असे कुणी म्हंटल्यास ते असत्यकथन कसे काय? माझा तो प्रतिसाद एका स्युडो-सावरकरप्रेमीच्या हट्टाने नाटकाचा संदर्भ (चित्रफितीसह) देऊनही संपादित झाला होता.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

+१००

वसुलि यांचा मुद्दा बिनतोड आहे.

त्यावेळी झालेल्या रणधुमाळीचा मी साक्षीदार आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

शिवाजीचा शारीरिक बाप

शिवाजीचा शारीरिक बाप किंवा जैविक(जैवशाश्त्रिक का नको?) असे शब्द मराठी माणूस विनोदाने उच्चारील? आणि तो मराठी माणूसही भांडारकरमधला? त्या संस्थेत विनोदाला काही स्थान आहे असे वाटत नाही. तिथली माणसे पैशाची अफरातफर करतील, पण विनोद? शक्यच नाही.--वाचक्‍नवी

तसे नाही

(((लोक विनोद करतात) ही माहिती भांडारकरमधील लोकांनी दिली) असे लेनने सांगितले) असे मी वृत्तपत्रांत वाचले आहे.

वाक्य, जसेच्या तसे.

कुणाला हवे असल्यास सदर पुस्तक परि़क्षणाची पीडीएफ् इमेल करु शकतो.
-Nile

प्रतिसाद

काढला आहे

हम्म

उद्या एखाद्या फालतू ब्लॉगवर यांच्या घरातील स्त्रीयांबद्दल एखादा चूकीचा शब्द लिहीला गेला तर यातील किती लोक 'तसे सिद्ध करायचा' आग्रह धरतील याबाबतीत शंका आहे.

अर्थात संभाजी ब्रिगेड सारख्या तद्दन धंदेवाईक संघटनांनी जी गुंडगिरी केली त्याचेही समर्थन केले जाऊ शकत नाही.

शिवराय सगळ्या जातींचे

छत्रपति शिवरायांचं व्यक्तीमत्व उत्तुंगस, एकमेवाद्वितिय आहे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व, धुरंधर मुत्सद्दीपणा, उद्दंड पराक्रमामूळेच ते महाराष्ट्राचे खरे राष्ट्रपुरुष आहेत. कुठल्याही बाजारगप्पांनी त्यांच्या अढळस्थानात कूठलाही फरक पडणारेय का? हे घाणेरडे राजकारण आहे. संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी जी गूंडगिरी केली त्यामुळे शिवरायांवर एका विशिष्ठ जात अधीकार दाखवते आहे असे चित्र उभे राहीले. छत्रपती शिवरायांवर महाराष्ट्रातल्या सगळ्याच जातींचा सारखा अधीकार आहे. छत्रपती शिवराय सगळ्या जातींचे आहेत.

राहीली गोष्ट निर्णयाची. राज्य शासनाने बंदीचा निर्णय राजकिय कंपल्शनमुळे घेतला होता. जनसामान्यांच्या भावना भडकावण्याच्या प्रयत्न काही जातीयवादी संघठना करीत होत्या. त्यामूळे ते पाऊल अयोग्य वाटत असले तरी गरजेचे होते. आपली लोकशाही इम्परफेक्ट आहे. वीचारवंतांना कितीही वाटले तरी पूर्ण वैचारीक स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य भारतासारख्या जातीयवादाने पोखरलेल्या देशात शक्य आहे काय? विनायक मेटेसारख्या जातीयवादी नेता राष्ट्रवादीचा आमदार आहे. संभाजी ब्रिगेडच्या खेडकर ह्यांच्या पत्नी भाजपच्या आमदार होत्या. सगळेच राजकीय पक्ष जातीयवादाचा आसरा घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

समजा

समजा शिवाजी हा दादोजीचा मुलगा होता (किंवा भावना दुखावल्या जाण्याच्या भीतीने शिवाजी महाराज हे दादोजे कोंडदेवांचे पुत्र होते), समजा रामदास हे शिवाजींचे गुरु होते आणि त्या दोघांची प्रत्यक्ष भेटही झाली होती (आणि जिजाऊंच्या महानिर्वाणप्रसंगी रामदास स्वतः उपस्थित होते), समजा महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा माणूस शहाण्णव कुळी रक्ताऐवजी अठ्ठेचाळीस कुळी रक्ताचा होता आणि त्यानंतरच्या सगळ्या तलवारबाज समशेरखेचू उदयनरक्तांमध्ये काही ब्राह्मणी अंश आहेत...
याने महाराजांचे मोठेपण पातळ होते काय? याने शिवाजी महाराजांवरील मराठा समाजाचा एकाधिकार नष्ट होऊन महाराज साडेतीन टक्यापैकी निम्म्यातले झाल्याने मराठा समाजाच्या पिळलेल्या मिशांची टोके खाली येतात का? समजा ती तशी खाली आली, तरी त्यामुळे शिवाजी हा दिवाळीतल्या किल्ल्यावरच्या चिरमुरे फुटाण्यासारखा झेंडूफूल होतो काय?
जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजेंचे विशेष प्रेम लाभले नाही असे इतिहास सांगतो. याला फक्त शहाजीराजेंचे मासाहेबांबरोबर न रहाणे इतकेच कारण आहे, असे नाही. या स्थितीत शारीर मोहाने जिजाऊंच्या हातून न व्हावे ते घडले तर त्यामुळे त्या माऊलीचे मोठेपण कमी होते काय? शिवाजीचे मोठेपण कोणत्याही ब्राह्मणाच्या संपर्कात आले की विटाळावे इतके सस्ते आहे काय? की ज्ञानेश्वरांवर जन्माने ब्राह्मण असल्याने ब्राह्मण समाजाने हक्क सांगितला तस मराठा समाजाला हक्क सांगण्यासाठी शिवाजी हवा आणि तो अस्सल शंभर टक्के मराठा हवा हा अट्टाहासापायी हे सगळे घडते आहे?
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

राज्याच्या गृहमंत्र्यांचे वैयक्तिक मत

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, हे पुस्तक कुणी वाचू नये व विकूही नये, असे वैयक्तिक आवाहन केले.

जय हो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भयानक

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, हे पुस्तक कुणी वाचू नये व विकूही नये, असे वैयक्तिक आवाहन केले.

खुद्द राज्याचे गृहमंत्री 'पुस्तक वाचू नये' असे आवाहन करतात म्हणजे खूपच झाले. एखाद्याने कुठले पुस्तक वाचावे किंवा वाचू नये असे आवाहन करण्याचे नैतिक बळ कुठून मिळते कळत नाही. हे पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्या प्रत्येकाला घरातून बाहेर खेचून मारणार काय ही मंडळी? हे आवाहन की छुपी धमकी? आम्ही कुठल्या काळात व देशात राहतो आहोत?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रतिक्रिया

पुस्तक जोपर्यंत वाचत नाही, तो पर्यंत अंतिम प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. एक मात्र होणार, ह्या सगळ्या वादविवादामुळे पुस्तकांचा खप भलताच वाढणार, ऐरवी असले पुस्तक येउन गेले हे समजले पण नसते.

खरे आहे

ऐरवी असले पुस्तक येउन गेले हे समजले पण नसते.

अगदी खरे आहे. पण असे झाले तर राजकीय पक्षांना आपले "बळ" दाखवायची संधी कुठे मिळणार?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

नेमका मुद्दा

भारतात राहून लेखन करायचे असेल तर अमुक एका यादीतील महापुरुषांबद्दल काही वेगळे लिहिता कामा नये असा एक प्रवाद आहे. ही यादी वाढतच चालली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मात्र सहिष्णुता येईल अशी आशा धरतो.

प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी नेमका मुद्दा मांडला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अशा बंदीला काही अर्थ उरत नाही. पुस्तकावर बंदी घातल्यास कुणीतरी ते स्कॅन करून नेटवर टाकेल. आधीच्या प्रतिसादांत वाचक्नवी व विकास ह्यांनी नमूद केल्याप्रमाणे विरोधी, न पटणारे विचार विचारांनीच खोडून काढण्याची परंपरा पुरोगामी महाराष्ट्रात आहे. ती आणखी बळकट व्हायला हवी. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भांडारकर

भांडारकर संथेवरील हल्ल्यामागे असणार्‍या प्रवीण गायकवाड यांची मुलाखत पाहिली. त्यांना आता काय करणार असे विचारल्यावर् ते म्हणाले जे भांडारकरचे केले तेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे करू!

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पं नेहरू आणि महाराष्ट्र

>>> नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत मांडत <<<

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गांधी हत्या प्रकरण, सावरकर यांच्यावरील अलिखित स्वरूपाची केन्द्र सरकारची नाराजी ~~ या तीन गोष्टी कुठेही चर्चील्या गेल्या की, "नेहरू" ना मध्ये आणण्याचा आपल्या महाराष्ट्रात एक "ट्रेंड सेट" झाला आहे. त्यांच्यावर केल्या गेलेल्या टीकेत अभ्यास किती आणि ऐकीव स्वरूपाची माहिती किती याची तुलना केली तर बहुतांशी वेळा "असे कुणीतरी म्हणतात" अशा छापाचीच उत्तरे मिळतात.

"डिस्कव्हरी ऑफ इंडिया" या जगन्मान्य ग्रंथात पंडितजीनी शिवाजीराजांबद्दल व एकूणच "मराठा पॉवर" बाबत लिहिलेले जर वाचले तर त्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती आदर होता हेच प्रतीत होते. त्यातील एक छोटासा उतारा :

"शिवाजी वॉज द सिम्बॉल ऑफ अ रीसर्जन्ट हिंदु नॅशनिलझम, ड्रॉईंग इन्सपायरेशन फ्रॉम द ओल्ड क्लासिक्स, करेजीअस, अँड पझेसिंग हाय क्वालिटीज ऑफ लीडरशीप. ही बिल्ट अप दि मराठाज् ऍंज दि स्ट्राँग युनिफाईड फायटिंग ग्रुप, गेव्ह देम अ नॅशनलिस्ट बॅकग्राऊंड अँड मेड देम अ फॉरमिडेबल पॉवर वुईच ब्रोक अप दि मुघल एम्पायर."

या प्रशंसेतील केवळ 'resurgent' व 'formidable power' या दोन शब्दांचे मराठीतील अर्थ पाहिले तरी नेहरूंच्या मनात "शिवाजी महाराज" यांच्याविषयी काय प्रतिमा होते हे उघड होते.

पण

का हो सम्भाजि ब्रिगेड खरच् धन्देवैक आहे का?

आणि आता अस नहि का वाटत कि आता महाराश्त्रा ला आता समर्थ नेत्रुत्वचि गरज आहे

शिवराय मनामनात गुंजतच राहतील...!

शिवराय मनामनात गुंजतच राहतील...!

एखादी गोष्ट करू नये म्हटले की करून पाहण्याची तीव्र ऊर्मी मनात येणे, ही मानवी मनाची सहजप्रवृत्ती आहे. कोणत्याही `बंदी`बाबतही हेच सूत्र लागू होते. एखाद्या पुस्तकावर, चित्रपटावर बंदी घातली गेली की काहीही करून ते पुस्तक मिळवायचे आणि वाचायचेच, काहीही करून तो चित्रपट पाहायचाच...अशी भावना प्रबळ होते. एका अर्थाने अशा `वादग्रस्त` पुस्तकांवर, चित्रपटांवर बंदी घालून सरकारी यंत्रणाच त्या पुस्तकांची, चित्रपटांची जोरदार प्रसिद्धी करीत असते. त्या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्णाण करीत असते !! अन्यथा सर्वसामान्य माणसे संबंधित पुस्तकांकडे, चित्रपटांकडे एरवी ढुंकूनही पाहत नसतात...पण `बंदी`चे तंत्र आहे हे असे आहे.
कुणाच्याही अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येऊ नये, हे अगदी खरे असले तरी कुणीही काहीही बरळू नये, हेही तितकेच खरे आहे.
सांगोवांगीच्या गोष्टींच्या आधारे तर नव्हेच नव्हे ! लेनच्या पुस्तकाबाबत हेच झाले आहे. तुमचे पुस्तक खरोखरच संशोधनावर आधारित असेल तर मग अशा सांगोवागीपासून तर तुम्ही कटाक्षाने दूर राहायला हवे...खऱयाखुऱाय संशोधकाने तर हे पथ्य सर्वप्रथम पाळलेच पाहिजे.
आपल्याला जे म्हणायचे आहे ते आधी म्हणून टाकायचे आणि नंतर मग `...पण त्यात काही तथ्य नसावे`, अशीही पुष्टी जोडायची. ही वृत्तीच निखालस खोडसाळपणाचे द्योतक होय.
हे म्हणजे आपल्या नेहमीच्या उदाहरणासारखे झाले. आधी लाथ मारायची आणि `चुकून लागली हां...माझा तसा उद्देश मुळीच नव्हता,` असे नंतर म्हणायचे. `हवे तर माफी मागतो`, असाही साळसूदपणा वर करायचा...
धुमाकूळ घालू इच्छिणारे अशा संधींच्या शोधातच असतात. अगदी टपून असतात. कारण नसताना अशा संधी दिल्या जाव्यात का, हा विचार तथाकथित `संशोधकां`नीही करायलाच हवा.

* * *

सध्या वारीचे दिवस आहेत. वारीमुळे शिवरायांचा महाराष्ट्र भक्तिमय होऊन गेला आहे. या वारीची प्रमुख दोन आकर्षणे असतात ती संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी आणि संत तुकाराममहाराजांची पालखी...
खरे तर ज्ञानोबा-तुकोबा-शिवराय यांच्या संदर्भात जातीचा आधार घेऊन बोलणे हा गुन्हा ठरावा...पण आपल्या समाजाची मनोरचनाच अशी आहे की, काही काही उदाहरणे जातीचा उल्लेख केल्याशिवाय गळी उतरत नाहीत...आणि गळी उतरली तरी पुढे पचत नाहीत ! म्हणून नाइलाजास्तव ज्ञानोबा-तुकोबांच्या संदर्भात जातीचा आधार घेण्याचा अक्षम्य गुन्हा इथे करावा लागत आहे. समस्त वाचकवर्गाने मोठ्या मनाने क्षमा करावी.

संत ज्ञानेश्वरमहाराज ब्राह्मण, तर तुकाराममहाराज बहुजन समाजातील होते. पण वारीत सहभागी होणाऱया बहुजन समाजातील अगणित वारकऱयांनी ज्ञानोबा आणि तुकोबा असा भेद जातीच्या आधारावर केलेला कुणी आजवर पाहिला आहे काय ? (हां, दिंड्यांच्या मानापमानाची प्रकऱणे घडलेली असतीलही; पण ब्राह्रण ज्ञानोबा आणि बहुजन तुकोबा अशी विभागणी बहुजन वारकऱयांनी केल्याची उदाहरणे कुणीही दाखवून द्यावीत.). आज महाराष्ट्राच्या कोन्या-कोपऱायतून येणारे लाखो `बहुजन` वारकरी `ब्राह्मण` ज्ञानोबांच्या पालखीवारीत सहभागी होतात...केवळ सहभागीच होतात, असे नव्हे तर आपापल्या परीने त्यांच्या चरणी लीन-तल्लीन होण्याचा प्रयत्नही करतात...मी हे केवळ सर्वसामान्य `बहुजन` वारकऱयांविषयीच बोलत आहे....अशी मनोभावे भक्ती करताना कोणत्याही वारकऱयाच्या मनात ज्ञानोबांच्या ब्राह्णण्याविषयीचा विचार मनात येत नाही. ज्ञानोबा हा `आपला` संत नाही, त्याच्या वारीत नको सहभागी व्हायला, असा विचार बहुजन वारकऱयांच्या मनात आजवर एकदा तरी आला आहे काय ? ज्ञानोबा-त्यांची जात-बहुजन वारकरी ही त्रिसूत्री एकजीव होऊन गेली आहे आणि या एकजीव त्रिसूत्रीचे आजचे वय आहे अंदाजे सातशे-साडेसातशे वर्षे ! `ब्राह्मण` ज्ञानेश्वरांना त्यांच्या समाधीनंतर आजवर सातशे-साडेसातशे वर्षे कुणी `जिवंत` ठेवले असेल तर ते या बहुजनवर्गाने आणि केवळ बहुजनवर्गानेच ! इथे कुठे आली जातपात ? ज्ञानेश्वरमहाराज केवळ ब्राह्रणांपुरतेच मर्यादित राहिले असते तर त्यांच्यावरील मोठमोठ्या ग्रंथांमधून ते बाहेर पडू शकले असते काय ? `ग्रंथसमाधी`तच त्यांना पुन्हा कोंडून राहावे लागले असते !! ज्ञानोबांवर ज्ञानसमृद्ध, जडजंबाल ग्रंथ सिद्ध करणे वेगळे आणि त्यांना `जिवंत` ठेवणे वेगळे, ही बाब आवर्जून ध्यानात घ्यायला हवी. एरवी आपल्या उच्चवर्णाला चिकटून राहणारा व प्रसंगोपात्त तावातावाने चर्चा करणारा ब्राह्णणवर्ग बहुजन समाजाच्या तल्लीनतेने `आपल्या` संताच्या या पालखीत सहभागी होतो काय ? मग कशासाठी उगाच ब्राह्मण-मराठा-बहुजन समाज अशा फिजूल गोष्टी ? कशासाठी उगाच जातीपातींचा फुकाचा अभिनिवेश ?

मुळात संतांच्या आणि राष्ट्र उभारणाऱया, घडविणाऱया थोर थोर माहात्म्यांच्या संदर्भात `आपला` आणि `आपला नाही` असा विचार येणे, हेच `बेवकूफी`चे लक्षण आहे. काही संघटना असा विचार करत असतीलही; पण वारीत सहभागी होणारे सर्वसामान्य वारकरी अशी `बेवकूफी` कधीच करीत नाहीत...जिथे अशी `बेवकूफी` असते, तिथे लीनता-तल्लीनता येऊच शकत नाही !

बहुजन समाजातील वारकऱयांच्या मनात ज्ञानोबांबद्दल जशी भक्तीची भावना असते, तशीच भावना बाह्रणांच्याही मनात तुकोबांबद्दल असते, याविषयीही कुणाला शंका असण्याचे कारण नाही. आज महाराष्ट्रात राहणारा अभिजनवर्ग (यात अर्थात ब्राह्मण आलेच !) वेळप्रसंगी जी उद्धरणे मनसोक्त वापरत असतो, ती बहुतेकदा `बहुजन`तुकोबांचीच असतात.

महाराष्ट्रातील यच्चयावत मराठी माणसांच्या मनात, रक्तात, श्वासात, अणू-रेणूत, रोमारोमात संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज, छत्रपती श्रीशिवाजीमहाराज ( ही तीन नावे केवळ वानगीदाखल घेतलेली आहेत. ) भिनून, मिसळून गेलेले आहेत. इतरही संतांबद्दल, थोर महात्म्यांबद्दल हेच म्हणता येईल...

कुणी पुस्तकातून म्हणा की अन्य कुठल्याही माध्यमातून या विभूतींवर कितीही गरळ ओकले तरी त्यांच्याविषयीची श्रद्धा मराठी माणसाच्या मनातून रेसभरही कमी होणार नाही...कमी झालेली नाही.

* * *
- मागेही असाच वाद निघाला होता की, ज्ञानेश्वर एक की दोन की आणखी किती ? कोवळ्या वयातील ज्ञानेश्वर गीतेसाऱख्या महान धर्मग्रंथावर एवढे प्रगल्भ, परिपक्व भाष्य करूच शकणार नाहीत वगैरे वगैरे... दरवर्षी निघणाऱया वारीत या वादामुळे काही फरक पडला का ? वारी आहे त्याच परंपरेने, आहे त्याच भक्तिभावाने जात राहिली...जात राहील.

- संतसूर्य तुकोबांवरही असेच `संशोधन`पर काही लिहून आजवर न झालेले वेगळे संशोधन केल्याचा घडीभराचा आनंद गेल्या वर्षी कुणी मिळवला...दरवर्षी निघणाऱया वारीत या वादामुळे काही फरक पडला का ? वारी आहे त्याच परंपरेने, आहे त्याच भक्तिभावाने जात राहिली...जात राहील.

- सातेक वर्षांपूर्वी शिवरायांबद्दल कुणी काही वाईटसाईट लिहिले तरी शिवरायांवरील आपली श्रद्धा कमी होणार आहे काय ? गेल्या सात वर्षांत झाली आहे काय ? शिवरायांनी परकीय सत्तेविरुद्ध दिलेला कणखर, अथक् लढा - अशा वाईटसाईट बोलले गेल्याने, लिहिले गेल्याने-पुसला जाणार आहे काय ? `शिवराय` हे नाव मराठी माणसाच्या मनाच्या दऱयाखोऱयांत कालही गुंजत होते, आजही गुंजत आहे, उद्याही गुंजतच राहणार...
एखाद्या लेनची थुंकी शिवराय नावाच्या सूर्यापर्यंत पोहोचूच शकत नाही !

* * *
जाता जाता : अनेक मोटारसायकलींच्या मागच्या चाकाच्या मडगार्डवर शिवरायांचे भगव्या रंगातील चित्र काढलेले मला आढळते. मी अशा मोटारसायकलचालकांना थांबवतो. आजवर आठेकजणांना तरी थांबविले आहे. त्यांना विचारतो की, मडगार्डवर शिवरायांचे जे चित्र काढलेले आहे, ते तुम्हीच काढून घेतलेले आहे ना ? ते `हो` म्हणतात. त्यांच्या चेहऱयावर अभिमान झळकलेला मला दिसतो. मी मग त्यांच्या लक्षात आणून देतो की, तुमची मोटारसायकल शहराच्या कोणत्याही भागातून फिरते, सगळेच रस्ते काही स्वच्छ नसतात. किंबहुना सगळेच रस्ते अस्वच्छ असतात. अनेक ठिकाणी गलिच्छता असते. घाण असते. तुम्ही काढून घेतलेल्या आराध्यदैवताच्या चित्रावर ही घाण उडाल्यास त्याची विटंबना होत नाही काय आणि या विटंबनेला तुम्ही स्वतःच नकळतपणे कारणीभूत असता, ही बाब तुमच्या गावी तरी असते काय ?

ही बाब लक्षात आणून देताच, त्यांना वास्तवाचे भान येते आणि मग नकळत झालेली चूक ते कबूल करतात. चित्र लावायचेच असेल तर मोटारसायकलच्या पुढच्या भागावर अशा ठिकाणी लावा की, रस्त्यावरील घाण तिथे चुकूनही पोचणार नाही...असे सांगितल्यावर त्यांना ते लागलीच पटते.

तीन आठवड्यांपूर्वीचाच अनुभव आहे. मडगार्डवर शिवरायांचे चित्र असलेल्या अशाच एका मोटारचालकाला मी थांबविले आणि त्याच्यात-माझ्यात वरील संवाद झाला.
त्याला माझे म्हणणे इतके पटले की, तो माझ्याकडे बघतच राहिला. घरी गेल्या गेल्या मागील बाजूचे चित्र काढून पुढील बाजूला लावतो, असा शब्द त्याने मला लगेचच देऊन टाकला. `केलेला बदल मी तुम्हाला कळवीन, तुमचा मोबाईल नंबर मला द्या,` असेही तो वर म्हणाला.
मी काही त्याला मोबाईल नंबर दिला नाही...पण `तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे`, असे म्हणत त्याचा निरोप घेतला.

सुंदर प्रतिसाद

अतिशय सुंदर प्रतिसाद. माझेच मत तुम्ही शब्दांत मांडले. मला अगदी असेच वाटते.

जेम्स लेन प्रमाणेच इतर आणखी उदाहरणे म्हणजे एम. एफ. हुसेन, विजय तेंडूलकर आणि आनंद यादव. हे लोक आपआपल्या क्षेत्रात उच्च स्थानी असले तरी निखालस खोडसाळपणा करण्यात हुशार आहेत/होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर

सुंदर प्रतिसाद. एवढी शतकं "ब्राह्मण" ज्ञानेश्वर जिवंत ठेवणारा बहुजन वारकरी सामान्य कसा? वारकर्‍यांचा जातिभेद न मानण्याचा विचार सर्व समाजात खोलवर रूजलाच पाहिजे.

शिवाजी महाराज की जय!

थुंकी पोचेल.

एखाद्या लेनची थुंकी शिवराय नावाच्या सूर्यापर्यंत पोहोचूच शकत नाही !

पुस्तक इंग्रजीत आहे, त्याच्या लाखो प्रती जगभर वितरित होणार; अनेक भाषांत पुस्तकाची भाषांतरे होणार; करोडो लोक ते पुस्तक वाचणार; आणि लेनची नाही तर त्या करोडो लोकांची थुंकी शिवसूर्यापर्यंत पोचणार. उद्याच पहा, उत्तरेकडचे राजकारणी याचा कसा फायदा घेतील ते. आज ते सावरकरांवर थुंकतात तसे शिवाजीवर थुंकतील.

नेहरूंनी शिवाजीला लुटारू म्हटले हे शंभर टक्के खरे आहे. (मला तुरुंगात ग्रॅन्ट डफ़ आणि अन्य बंगाली इतिहासलेखकांची जी पुस्तके वाचायला मिळाली त्यावरून माझे तसे मत झाले होते.--इति नंतरचे जवाहरलाल नेहरू.) त्यामुळे त्यांनी शिवाजीच्या पुतळ्याचे उद्‌घाटन करायला प्रतापगडावर येऊ नये अशी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांची मागणी होती. ती ठोकरून देऊन जेव्हा नेहरू यशवंतरावांना घेऊन प्रतापगडाकडे जात होते तेव्हा वाटेतल्या घाटात हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेने त्यांचा धिक्कार केला. पुढे कॉंङ्‌ग्रेस पश्चिम महाराष्ट्रात चारीमुंड्या चीत झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या डिस्कव्हरी ऑफ़ इंडियात शिवाजीच्या वाट्याला चांगले शब्द आले, हा इतिहास आहे.
नेहरूंनी आयुष्यभर महाराष्ट्राचा द्वेष आणि फक्त द्वेषच केला. नेहरू मराठी लोकांना बत्तमीज म्हणत. महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव देऊ नये असे नेहरूंनी स्पष्ट बजावले होते. मग आचार्य अत्र्यांनी यावर जो गदारोळ केला त्याला घाबरून, नव्याने स्थापन झालेल्या त्या राज्याला महाराष्ट्र हे नाव ठेवायला नेहरूंनी रडतखडत परवानगी दिली. त्या काळातले नवयुग, विविधवृत्त, आलमगीर आणि प्रबोधन या साप्‍ताहिकांचे अंक आणि तेव्हा नव्यानेच सुरू झालेला दैनिक मराठा मिळवून वाचावा. नाही तर नुकताच प्रसिद्ध झालेला लालजी पेंडसे यांचा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचला तरी ही माहिती मिळेल. अत्र्यांची मुलगी, मीना देशपांडे यांची हुतात्मा ही ५९४ पृष्ठांची कादंबरी याच विषयावर आहे. मला वाटते, रोझा देशपांड्यांचा एक प्रदीर्घ लेख २००९ च्या दीपावलीच्या दिवाळी अंकात आहे. त्यांतही हा उल्लेख आहे. ---वाचक्‍नवी

दुरुस्ती

१९४६ साली डिस्कवरी ऑफ इंडिया ची प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. तिच्यातही शिवाजीच्या वाट्याला चांगलेच शब्द आहेत.
The book on trial: fundamentalism and censorship in India ले. Girja Kumar या पुस्तकात दिले आहे की नेहरूंनी १९३४ साली शिवाजीबद्दल थोडेसे वाईट लिहिले आहे.

१९४५ च्या आधीच नेहरूंनी मत बदलले असे दिसते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेला निषेध याच्याशी संबंधित नसेल असे वाटते.
पण मला त्या वर्णनात फारशी चूक वाटत नाही. जावळीच्या मोरेला विश्वासघाताने मारला, त्याची अर्भकेही सोडली नाहीत.

...त्या वेळची मंतरलेली स्थिती आज महाराष्ट्रात आहे ?

पुस्तक इंग्रजीत आहे, त्याच्या लाखो प्रती जगभर वितरित होणार; अनेक भाषांत पुस्तकाची भाषांतरे होणार; करोडो लोक ते पुस्तक वाचणार; आणि लेनची नाही तर त्या करोडो लोकांची थुंकी शिवसूर्यापर्यंत पोचणार.

- करोडो लोकांची थुंकी !? तुमच्या `जर-तर`च्या कल्पनाविलासानुसार करोडो वाचक हे पुस्तक वाचतीलही...पण हे पुस्तक त्यांनी वाचले म्हणून त्यांचीही थुंकी कशी काय पोचू शकते शिवरायांपर्यंत ? उठवळ जेम्स लेनचे हे पुस्तक म्हणजे काही `संशोधना`तील वेदवाक्य नव्हे ! केवळ `त्याच` एका विधानासाठी हे पुस्तक वाचले जाईल की काय ? आणि वाचणारे सगळेच (म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार करोडो लोक) लेनवर विश्वास ठेवतील ? मला असे वाटत नाही.
जे सूर्यावर थुंकू पाहतात, त्यांची तोंडे त्यांच्याच थुंकीने बरबटतात, हे सर्वविदित आहे.

------
उद्याच पहा, उत्तरेकडचे राजकारणी याचा कसा फायदा घेतील ते. आज ते सावरकरांवर थुंकतात तसे शिवाजीवर थुंकतील.
- पण म्हणून सावरकरांविषयीचा तुमच्या मनातील आदर (तो तुमच्या मनात आहे, असे गृहीत धरले आहे) कमी झाला का आजवर ? जे सावरकरांच्या आदराविषयी तेच शिवरायांच्याही आदराविषयी...

------
नेहरूंनी शिवाजीला लुटारू म्हटले हे शंभर टक्के खरे आहे. (मला तुरुंगात ग्रॅन्ट डफ़ आणि अन्य बंगाली इतिहासलेखकांची जी पुस्तके वाचायला मिळाली त्यावरून माझे तसे मत झाले होते.-- इति नंतरचे जवाहरलाल नेहरू.)
- हे मत नेहरूंना बदलावे लागले, हे सारेच जण जाणतात.

------
त्यामुळे त्यांनी शिवाजीच्या पुतळ्याचे उद्‌घाटन करायला प्रतापगडावर येऊ नये अशी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांची मागणी होती. ती ठोकरून देऊन जेव्हा नेहरू यशवंतरावांना घेऊन प्रतापगडाकडे जात होते तेव्हा वाटेतल्या घाटात हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेने त्यांचा धिक्कार केला. पुढे कॉंङ्‌ग्रेस पश्चिम महाराष्ट्रात चारीमुंड्या चीत झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या डिस्कव्हरी ऑफ़ इंडियात शिवाजीच्या वाट्याला चांगले शब्द आले, हा इतिहास आहे.
- हा इतिहास मी वाचलेला आहे.

------

नेहरूंनी आयुष्यभर महाराष्ट्राचा द्वेष आणि फक्त द्वेषच केला. नेहरू मराठी लोकांना बत्तमीज म्हणत. महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव देऊ नये असे नेहरूंनी स्पष्ट बजावले होते. मग आचार्य अत्र्यांनी यावर जो गदारोळ केला त्याला घाबरून, नव्याने स्थापन झालेल्या त्या राज्याला महाराष्ट्र हे नाव ठेवायला नेहरूंनी रडतखडत परवानगी दिली. त्या काळातले नवयुग, विविधवृत्त, आलमगीर आणि प्रबोधन या साप्‍ताहिकांचे अंक आणि तेव्हा नव्यानेच सुरू झालेला दैनिक मराठा मिळवून वाचावा.
- हाही इतिहास मी नीटपणे वाचलेला आहे. योगायोग म्हणजे, माझ्या एका पदवीच्या अभ्यासक्रमांतर्गत मला हे सगळे करावे लागले होते आणि मी ते अगदी मनापासून केले होते. नवयुग, विविधवृत्त, आलमगीर, प्रबोधन, दैनिक मराठा ही तत्कालीन नियतकालिके / वृत्तपत्रे मला मुळीचच नवी नाहीत !
- आज आचार्य़ अत्रे नाहीत...आणि समजा असते तरी सर्वोच्च न्यायालयापुढे त्यांचे तरी कितपत चालले असते ?
`सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर राखला पाहिजे,` असे माननीय मुख्यमंत्री मजकुरांनी (चव्हाण आडनाव असलेले अशोकराव) कालच म्हटले आहे. म्हणजे कॉंग्रेस बाद. राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रश्नाच्या राजकारणात मश्गुल. भारतीय जनता पक्ष-शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या पुस्तकावर सरसकट बंदी हवी आहे. महाराष्ट्रात ती घातलीही जाईल. इतर राज्यांचे काय ? आणि अशी बंदी घातली गेली की, मोठा गळा काढायला अभिव्यक्तिस्वातंत्र्य मोकळे आहेच ! बरे, तसे का असेना, पण मग आम्ही कोणती पुस्तके वाचावीत आणि वाचू नयेत, हे ठरविणारे तुम्ही कोण, असा सवाल सरकारला (आपल्या घरगुती गप्पांमधून!) विचारायला अभिजनवर्ग सरसावलेलाच ! अशा परिस्थितीत लेनच्या या पुस्तकाविरुद्ध लढाई करायची का होईना, ती करायची तरी कशी ? आणि कुणी ??? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची मंतरलेली स्थिती आज महाराष्ट्रात आहे काय ?

------
नाही तर नुकताच प्रसिद्ध झालेला लालजी पेंडसे यांचा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचला तरी ही माहिती मिळेल.
- होय. वाचलेले आहे मी हे पुस्तक.

------
अत्र्यांची मुलगी, मीना देशपांडे यांची हुतात्मा ही ५९४ पृष्ठांची कादंबरी याच विषयावर आहे. मला वाटते, रोझा देशपांड्यांचा एक प्रदीर्घ लेख २००९ च्या दीपावलीच्या दिवाळी अंकात आहे. त्यांतही हा उल्लेख आहे.
- अगदी बरोबर. `हुतात्मा` ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे, असे वाटते. कारण, अलीकडेच एका वृत्तपत्रात तिचे एक प्रकरणही प्रसिद्ध झालेले मी पाहिले (आणि वाचलेही!).
संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित बरेच काही माझ्या `वाचनात आलेले` आहे. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

चूक

नेहरूंनी शिवाजीला लुटारू म्हटले हे शंभर टक्के खरे आहे. (मला तुरुंगात ग्रॅन्ट डफ़ आणि अन्य बंगाली इतिहासलेखकांची जी पुस्तके वाचायला मिळाली त्यावरून माझे तसे मत झाले होते.-- इति नंतरचे जवाहरलाल नेहरू.)

- हे मत नेहरूंना बदलावे लागले, हे सारेच जण जाणतात.
------

त्यामुळे त्यांनी शिवाजीच्या पुतळ्याचे उद्‌घाटन करायला प्रतापगडावर येऊ नये अशी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांची मागणी होती. ती ठोकरून देऊन जेव्हा नेहरू यशवंतरावांना घेऊन प्रतापगडाकडे जात होते तेव्हा वाटेतल्या घाटात हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेने त्यांचा धिक्कार केला. पुढे कॉंङ्‌ग्रेस पश्चिम महाराष्ट्रात चारीमुंड्या चीत झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या डिस्कव्हरी ऑफ़ इंडियात शिवाजीच्या वाट्याला चांगले शब्द आले, हा इतिहास आहे.

- हा इतिहास मी वाचलेला आहे.

या मतांचा प्रतिवाद मी येथील प्रतिसादात केला आहे.

थोडक्यात; पण सविस्तर, येथेच सांगावे !!! :)

तुमचा हा प्रतिसाद मला कळला नाही.
कृपया, जे काही सांगायचे आहे ते थोडक्यात; पण सविस्तर येथेच सांगावे !!! :)
कारण मी मागे मागे गेलो आणि अन्य प्रतिसादांच्या भाऊगर्दीत सापडलो. कुणी कुणाला कुठली उत्तरे दिली आहेत, हेच काही क्षण समजेनासे झाले. एकमेकांना देण्यात आलेले उभे-आ़डवे, आ़डवेतिडवे, तिरके-तिरकस प्रतिसाद वाचून माझा गोंधळ उडाला आहे म्हणून ही विनंती. :) धन्यवाद.

ठीक

१९४६ साली डिस्कवरी ऑफ इंडिया ची प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. तिच्यातही शिवाजीच्या वाट्याला चांगलेच शब्द आहेत. The book on trial: fundamentalism and censorship in India ले. Girja Kumar या पुस्तकात दिले आहे की नेहरूंनी १९३४ साली शिवाजीबद्दल थोडेसे वाईट लिहिले आहे. वर गूगल बुक्सवरील त्या पुस्तकाची प्रत दिली आहे. तेथील उल्लेखावरून असे दिसते की १९४५ च्या आधीच नेहरूंनी मत बदलले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेला निषेध याच्याशी संबंधित नसेल असे वाटते. पण मला त्या वादग्रस्त वर्णनातही फारशी चूक वाटत नाही. शिवाजीने जावळीच्या मोरेला विश्वासघातानेच मारला, इ.

आलं ध्यानात...

अच्छा. अच्छा. आलं ध्यानात. तुमच्या या प्रतिसादाशी सहमत आहे.
आधीच्या माझ्या प्रतिसादात यासंदर्भात काही न्यून असेल तर त्याबद्दल माफी.
तुम्ही दिलेल्या `थोडक्यात पण सविस्तर` प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

१५३ अ

"१५३ अ मध्ये असलेला आरोप (चिथावणी देणे, इ.) एखाद्या नॉन फिक्शन लेखनाच्या बाबतीत सिद्ध झाल्यानंतर तरी त्यावर बंदी घालावी की नाही?" हा मूलभूत प्रश्न येथे अनुत्तरित राहिला आहे असे वाटते. माझे उत्तर 'बंदी घालावी' असे आहे.
१५३ अ कलमाखाली दाखल झालेली कलकत्ता कुराण पिटिशन पुनरुज्जीवित करता येईल का? करावी का? का? माझ्या मते त्याद्वारे सुडोसेक्युलर व्यक्ती उघड्या पडतील तसेच सेक्युलॅरिझमच्या खर्‍या पुरस्कर्त्यांवर होणारा दांभिकतेचा आरोपही कायमचा बंद होईल.

इतिहासापेक्षा भूगोलावर लक्ष द्या...

आपल्यापुढच्या आजच्या समस्या काय आहेत, उद्याचा काळ कसा असणार आहे, याबाबत गांभीर्याने विचार करण्याऐवजी घडून गेलेल्या गोष्टींवर काथ्याकूट करत बसणे, हे समाजाच्या मूर्खपणाचे लक्षण असते. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे 'रिकामा *** कुडाला तुंबड्या लावी' सध्या तेच घडताना दिसत आहे.

इतिहासात नको इतके रमण्यापेक्षा आपल्या समाजाने भूगोलाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण मानवजातीचे अस्तित्व आता भूगोलावर अवलंबून आहे. शिवाजीराजे, पेशवे, तुकाराम, रामदास हे त्यांचा काळ जगून गेले. आता ते त्यांच्या समाधीस्थानात चिरविश्रांती घेत आहेत, पण आपल्या सगळ्यांना अजून जगायचे आहे आणि पुढच्या पिढ्यांना जगवायचे आहे. जंगले तुटत आहेत, हवा, पाणी प्रदूषित झाले आहे, शेतजमिनी औद्योगिक वापरासाठी हिसकावून घेतल्या जात आहेत, जागतिक तपमानवाढ, मोसमी पावसाचा लहरीपणा या चिंताजनक समस्या असताना त्याऐवजी इतिहासातील व्यक्तींच्या जन्मतारखा, जात, वंशावळ हेच प्राधान्याचे मुद्दे असल्याप्रमाणे लोक वागत आहेत. दुर्दैव! केवळ दुर्दैव!

मस्तानी ही छत्रसालाची औरस राजकन्या होती, की त्याने ठेवलेल्या बाईपासून झाली होती? सवाई माधवराव हा नाना फडणवीसाचा मुलगा होता का? (कारण त्याचा तोंडवळा आणि सुरईसारखी मान थेट नानाशी मिळतीजुळती होती). पहिला बाजीराव नक्की बाळाजी विश्वनाथाचाच मुलगा होता का? यासारख्या अनावश्यक गोष्टींवर यापूर्वी रिकामटेकड्यांनी काथ्याकूट केला आहे. आता हा जेम्स लेनचा मुद्दा बराच काळ भांडत बसायला उपयोगी पडेल लोकांना.

सहमत

योगप्रभुशी सहमत आहे.
गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. आज देशासमोरील प्रश्न काय आहेत याचे संकलन केले तर प्राधान्यकमावर असलेले अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक भारतीयाला मिळणे हा मुलभुत हक्क आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही. आरोग्य, स्वच्छ पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वाहतुकीसाठी रस्ते, इतर दळण वळणाच्या सुविधा,शिक्षण,रोजगार असे कितीतरी एकमेकांशी गुंतलेले प्रश्न समस्या सोडवायला, त्याचा पाठपुरावा करायला, त्यासाठी जनआंदोलने उभारायला काय इतिहासातल्या वा पुराणातल्या व्यक्ति येणार आहेत का? मान्य आहे कि ती स्फुर्ती स्थाने आहेत. पण त्याच नशेत किती काळ अडकून पडायचे आता?
प्रकाश घाटपांडे

अर्थातच

सहमत आहे. भोपाळ दुर्घटनेचा निकाल लागल्यावर एकाही पक्षाला आंदोलन, बंद, निषेध करणे सुचले नाही. आत्ता जे शक्तिप्रदर्शन चालले आहे ते तिथे केले असते तर लोकांचाही पाठींबा मिळाला असता.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर