मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबे

सध्याच्या मध्यमवर्गात डबलइंजिन कुटुंबेच जास्त दिसतात. उदा. आयटीवाल्या कुटुंबातला नवरा २ वर्षे परदेशी (ऑनसाइट) जातो. काही लाख कमावतो. कधी बायको जाते. मग फ्लॅट मोकळा होता. एक फ्लॅट मोकळा झाला की दुसरा मोकळा होतो. मग आणखी एक चारचाकी होते.. हे काही संपत नाही. ( एवढेच कशाला परदेशात जाऊन राहिले तरी नवरा एकीकडे नोकरी करतो आणि बायको दुसरीकडे.) हे झाले आयटीवाले जोडपे. इतरांच्या बाबतीतही कमी-अधिक अशीच परिस्थिती आहे. पैसे कमावण्याच्या नादात लोक जगणे विसरून गेले आहेत. एवढा पैसा कमावून करणार काय कळत नाही. माणसाने किती जगायला हवे हो? जगायला किती पैसा लागतो हो?

एकट्याच्या/एकाच्या पगारात मूलभूत गरजा अगदी नीट भागत असताना दोघांनी नोकरी करण्याची गरज काय? असो. मुले आईवडलांपासून दुरावत आहेत. मुलांचे पालन-पोषण ही पूर्णवेळ जबाबदारी नाही काय? आपली कुंटुंबव्यवस्था मोडकळू लागली आहे आणि एवढे मोठे आमूलाग्र बदल आपल्या समाजाने बहुधा अनेक शतकांत बघितले नसावेत. (युरोपीय समाज दुसऱ्या महायुद्धानंतर जसा आणि जेवढा बदलला तसेच काहीसे भारतात होते आहे. अर्थात हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.) संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे. जिथेतिथे, बाह्यसौंदर्य ते वटपौर्णिमाच्या शुभेच्छाछाप फालतू चर्चा होत आहेत. नवराबायको संस्थळावर जळवांसारखे चिकटून पडलेले आहेत. पोर विडियो गेम्ज़ खेळत आहेत. (ह्याबाबत विदा उपलब्ध नाही. हे केवळ एक निरीक्षण). असो. तर कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?

कृपया आपली मते मांडावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

डबलईंजिन

>>सध्याच्या मध्यमवर्गात डबलइंजिन कुटुंबेच जास्त दिसतात
डबलइंजिनाची प्रथा ७०च्या दशकापासूनच बर्‍याच प्रमाणात आहे. परंतु तरीही अजूनही स्त्रिया मोठ्या प्रमाणात 'कुटुंबाला वेळ' देत आहेत. माझ्या आणि पत्नीच्या अगदी जवळच्या नातेवाईकांत/मित्रमंडळीत नोकरी/व्यवसाय करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ५० टक्क्यांच्याच आसपास आहे.
मी सध्या एस् ए पी चे काम करतो आणि ऑनसाईट काम करतो. माझ्याबरोबरच्या सहकार्‍यांमध्ये नवर्‍याबरोबर ऑनसाईट फिरणार्‍या (पक्षी=नोकरी न करणार्‍या पत्न्यांचे प्रमाण ५० टक्क्यांहून जास्त आहे)

अर्थात हे मध्यववर्गाचे निरीक्षण आहे. खालच्या वर्गात हे प्रमाण फार पूर्वीपासूनच बरेच जास्त आहे. उच्च वर्गात हे प्रमाण बरेच कमी असावे.

घरच्याघरी लाडू, चिवडा, पापड, पुरणपोळी करून देणार्‍या स्त्रीच्या कुटुंबाला डबल इंजिन म्हणावे का?

गरजा भागतात की नाही हे सापेक्ष आहे. एखाद्याला आठवड्यातून एकदा सहकुटुंब पंचतारांकित हॉटेलात ब्रेकफास्टला जाणे ही गरज वाटू शकते.
तसेच किती पिढ्यांसाठी पैसा कमवायचा आहे हे ही सापेक्ष असू शकते.

(अवांतर : आपले उत्पन्न, आपला सध्याचा खर्च, आपल्या रिटायरमेंटच्या सुमारास अपेक्षित खर्च, तेवढा खर्च (महागाईप्रमाणे वाढत्या प्रमाणात) रिटायरमेंटपासून २० वर्षे किमान पुरेल एवढा पैसा मिळवणे असा हिशेब केला तर चित्र भयंकर दिसेल).

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

गेल्या १० वर्षांतली परिस्थिती...

थत्तेसाहेब, गेल्या १० वर्षांत ही परिस्थिती बरीच बदलली आहे असे वाटते. केवळ मुंबई-पुण्यापुरता गेल्या १० वर्षांत झालेल्या लग्नांचा आढावा घेतला तर बहुतांश नवी कुटुंबे डबलइंजिन आहेत. [ मुली खूप महत्त्वाकांक्षी झाल्या आहेत. चांगली गोष्ट आहे. ( केवळ परदेशी जाण्याची संधी मिळाली म्हणून लग्ने लांबणीवर टाकलेली मी बघितली आहेत.) ]

मुलगा/मुलगी लग्न करताना कुठे फ्लॅट घ्यायचा आहे, कुठे नोकरी करायची आहे, कुठली गाडी घ्यायची आहे जोडीदार निवडत असतो. अर्थात ह्यात गैर काही नाही. पण लग्न करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि कुटुंब करणे वेगळी. पोटच्या पोरांकडे लक्ष देता येत नाही तर मग लग्न कशाला करायचे? आणि लग्न केलेच तर पोरं कशाला काढायची?

गरजा भागतात की नाही हे सापेक्ष आहे. एखाद्याला आठवड्यातून एकदा सहकुटुंब पंचतारांकित हॉटेलात ब्रेकफास्टला जाणे ही गरज वाटू शकते.

भूक भागवणे ही नीड (गरज) आहे. आणि पंचतारांकित हाटिलात जाऊन ब्रेकफास्ट करणे ही वाँट. माझ्यामते पंचतारांकित हॉटेलात ब्रेकफास्टला जाणे ही गरज असू शकत नाही.

तसेच किती पिढ्यांसाठी पैसा कमवायचा आहे हे ही सापेक्ष असू शकते

.
तेही आहेच. पण मेल्यांनतर कुणी बघितले. आणि ज्यांच्यासाठी पैसा कमावत आहात त्यांना लायक बनवायला नको काय? त्यासाठी वेळ द्यायला नको काय? नालायक मुले निपजली तर पैसा काय कामाचा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डबल ब्यारल

डबल इंजिनाची प्रथा बऱ्याच वर्षांपासून मध्यमवर्गामध्ये आहे. (त्याशिवाय त्यांना सन्मानाने जगणे अशक्य झाले असावे.) मुलांचे शिक्षण, घरे, आजारपणे यासाठी पैसे लागतात. ते सामान्यपणे प्रामाणिकपणे कमावण्याकडे मध्यमवर्गाचा कल असतो. (भ्रष्टाचाराच्या पुरेशा संधी मिळत नसल्याने यातलेच काही खाबूगिरी करणाऱ्यांवर टीका करतात). या जुन्या पिढीतील डबल ब्यारल संसारांमध्ये स्त्रिया संसाराला व कुटुंबाला पुरेसा वेळ देत होत्या-देऊ शकत होत्या.

नवीन नोकऱ्यांमध्ये (केवळ आयटीच नव्हे तर अगदी ब्यांकांपासून सरकारी नोकऱ्यांपर्यंत) ९ ते ५ ही नोकरीची संकल्पना बदलली आहे. त्यामुळे घराकडे लॉँग टर्म पुरेसा वेळ देणे शारीरिक व मानसिक दृष्ट्या कोणत्याही डबल ब्यारल कुटुंबाला शक्य होईलसे वाटत नाही.

अवांतर : आपले उत्पन्न, आपला सध्याचा खर्च, आपल्या रिटायरमेंटच्या सुमारास अपेक्षित खर्च, तेवढा खर्च (महागाईप्रमाणे वाढत्या प्रमाणात) रिटायरमेंटपासून २० वर्षे किमान पुरेल एवढा पैसा मिळवणे असा हिशेब केला तर चित्र भयंकर दिसेल).

खरे आहे. पण रिटायरमेंटनंतर किती माणसे २० वर्षे जगतात?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगला विषय

संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे. जिथेतिथे, बाह्यसौंदर्य ते वटपौर्णिमाच्या शुभेच्छाछाप फालतू चर्चा होत आहेत. नवराबायको संस्थळावर जळवांसारखे चिकटून पडलेले आहेत. पोर विडियो गेम्ज़ खेळत आहेत. (ह्याबाबत विदा उपलब्ध नाही. हे केवळ एक निरीक्षण). असो.

संस्थळावर जळवांसारख्या चिकटलेल्या ह्या बायका नोकरी करणार्‍याच असल्या पाहिजेत असे नाही. नोकरी न करणार्‍या अनेक जाल-जळवा दिसून येतातच की. बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर..

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

वेळ कसा घालवावा

नोकरी न करणाऱ्या बायकांनी वेळेची वसुली कशी करावी असे श्री. लिमये यांना वाटते?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आयटीवाले

आयटीवाल्यांचे तीन ढोबळ प्रकार घेऊ

१. एच-१ वर येऊन अमेरिकेत ग्रीनकार्ड मिळवून स्थायिक होणारे. यांचे जोडीदार एच-४ वर अमेरिकेत येतात. त्यांना या विस्यावर नोकरी करायची परवानगी मिळत नाही. त्यानुसार, एच-४ विसावर राहणे पसंत करणारे जोडीदार (अ) घर व मुले सांभाळतात (आणि जालावरही रुजू असावेत) किंवा (ब) एच-४ ला एच-१ मध्ये बदलून नोकरी करतात. (हे देखील जालावर असावेत)

२. एल-१, एच-१ वगैरे विसावर तात्पुरते येऊन परतणारे. पैकी (अ) एल-१ वाल्यांचे जोडीदार नोकरी करू शकतात आणि (ब) तात्पुरते एच-१ वर येणारे जोडीदारांना सहसा आणत नाहीत आणि आणले तरी नोकरीच्या उद्देशाने आणत नाहीत. (या एकट्यांना जालाची गरज सर्वाधिक असावी)

३. अमेरिकेत हरितपत्र बाळगणारे किंवा नागरिकत्व घेतलेले आयटीवाले. यांच्या जोडीदारांना नोकरी करता येते. (यांनाही जालापासून रोखणारे कोणी नाही)

प्रकार #१(ब), #२(अ) आणि #३ मध्येच फक्त नवरा-बायको दोघे नोकरी करू शकतात. अमेरिकेतील मेट्रो-शहरे सोडली तर इतर शहरांत आपल्याला हव्या तशा नोकर्‍या उपलब्ध असतीलच असे नाही. म्हणून, नवरा-बायकोला वेगवेगळे राहावे लागते. #१(ब) नुसार नोकरी धरली असेल तर टिकवणे हे थोडे कठिण काम असते कारण नोकरी गेल्यास काही काळात विसा रद्द होतो, त्यामुळे नोकरीसाठी वणवण करावी लागते.

अर्थात, आपले कुटुंब कसे फुलवायचे हा त्या कुटुंबाचा व्यक्तिगत प्रश्न वाटतो. "जब मियां बिबी राजी तो क्या करेगा बच्चमजी"; नवरा बायकोच्या या धावपळीत मुलांचे मत विचारात घेतलेले असते का हे कळत नाही. अमेरिकेत नोकरी करणारे बरेच नवरा बायको आपली लहान, शाळेत न जाणारी पोरे भारतात ठेवून येतात असे पाहिले आहे. :-( असो.

संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे. जिथेतिथे, बाह्यसौंदर्य ते वटपौर्णिमाच्या शुभेच्छाछाप फालतू चर्चा होत आहेत. नवराबायको संस्थळावर जळवांसारखे चिकटून पडलेले आहेत.

असहमत! लग्न न झालेले, विनापाश व्यक्ती आणि रिटायर झालेले काही लोकही संकेतस्थळांवर चिकटून असतात ;-) आणि काड्या* करत असतात. संकेतस्थळाची सदस्यसंख्या वाढण्याचे कारण वेगळे असावे असे वाटते. ;-)

* काड्या हा सर्वसाधारण शब्द आहे. ||काड्या|| असे समजू नये.

किसीको मुक्कमल जहाँ नही मिलता....!

माझं लग्न सहा महिन्यापूर्वी झालं. बायको गृहीणी. रहाणं वडलांच्या घरात. मुंबईत घर घेणं कमी पगारामुळे जमलं नव्हतं. आता प्रयत्न करतोय. पण तरीही बायको नोकरी नसलेलीच हवी होती. हो! मला पुरषी अहंकार आहे.

पण तरीही म्हणेन, जगायला खरचं पैसा लागतो. 'पैसे कमावण्याच्या नादात लोक जगणे विसरून गेले आहेत.' असं म्हटलं तरी 'जगायचं' म्हणजे तरी काय?

बायकोसोबत फिरायला जायचं म्हटलं तरीही खर्च येणार म्हणून घरात बसूनच गोड-गोड गप्पा मारतो. पण माझ्या सख्या भावाने नोकरीवाली बायको केली आहे. तो आयटी कंपनीत कामाला. त्याचा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आहे. बायको खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. पण ती नेहमी रात्री साडे-दहा/अकरा वाजता येते. तो मात्र सात वाजता घरी येवून टिव्ही पहात बसतो. त्याच्याशी मी तुलना जेव्हा करतो तेव्हा मी सुखी: आहे असेच मला वाटते. कारण मी घरी आल्यावर मला पाण्याचा पेला मिळतो, गरम-गरम चहा व नाश्ता मिळतो. परंतु ती दोघे सुट्टी मिळाल्यावर लांब-लांब फिरायला जातात. तेव्हा वाटतं...

रोजगाराची संधी

आर्थिक स्थैर्य असताना नोकरी करण्याची कारणे निरनिराळी असली तरी एक बाब दुर्लक्षुन चालणार नाही ते म्हणजे अशी नोकरी करणारी स्त्री ( प्रसंगी पुरुष सुद्धा) ही एका गरजु माणसाची पर्यायाने एका कुटुंबाची रोजगाराची संधी काढुन घेत असते. एका व्यक्तिला रोजगार म्हणजे एका कुटुंबाला रोजगार. नवरा बायको दोघेही नोकरी करतात तेव्हा काहींच्या मते डबल इंजिन असले तरी अप्रत्यक्ष रित्या ते एका कुटुंबाची रोजगाराची संधी डावलत असतात.
प्रकाश घाटपांडे

असहमत

घाटपांड्यांबरोबर असहमत आहे. यासंदर्भातला विदा माझ्याकडे नाही परंतु दोघेही कमावते असूनही आर्थिक दुर्घटना टाळता न आलेले लोक मी पाहातो. परदेशात नि भारतात असे काही मित्र आहेत ज्यांच्याकडे दोघेही कमावते आहेत परंतु तरीही घर घेण्याच्या स्वप्नाने हुलकावणी दिलेली आहे.

माझ्यामते ज्याला काम करण्याची शक्ती, इच्छा , गरज, उमेद आहे त्या प्रत्येकाला काम करायची संधी मिळावीच. नोकरी करणे म्हणजे इतिकर्तव्यता नव्हेच परंतु चार भिंतीपलिकडे आपले कर्तृत्व - आपल्यापुरतेच - सिद्ध करण्याच्या संधीपासून कुणी वंचित राहू नये.

एकाची गाडी म्हणजे दुसर्‍या पायी चालावे लागणार्‍यावर अन्यायच. एकाचे स्वतःचे घर म्हणजे दुसर्‍या लाखो बेघरांवर अन्यायच. या विधानांमधले तर्कशास्त्र अपुरे आहे. त्याचप्रमाणे बेकारी, संधींची कमतरता यांच्याकडे "एकाची नोकरी तो दुसर्‍याचा तोटा" अशा प्रकारच्या झिरो-सम् गेमच्या दृष्टीने पाहाणे अयोग्य आहे असे मला वाटते.

सहमत आहे

मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादातील आशयाशी पूर्णपणे सहमत आहे. अनेक निम्नमध्यमवर्गीय-गरीब कुटुंबांमध्ये नवरा बायको दोघांना नोकरी करावीच लागते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अप्रत्यक्ष

मी अप्रत्यक्ष शब्द वापरला आहे. रोजगाराच्या संधींची कमतरता, रोजगार मिळणे आवश्यकच आहे अशा कुटुंबांची संख्या यातील ताळमेळ लावण्यासाठी. फक्त शासकीय नोकरीचा विचार केला तरी समजा एकाच कुटुबातील नवरा बायको नोकरीत आहेत. त्याऐवजी कुटुंबातील एकाला रोजगार असा विचार केला तर येथे दोन कुटुंबांचा रोजगार शासनाला निर्माण करता आला असता. एकाला पोटभर जेवण व दुसरा उपाशी हे उदाहरण जर आपण घेतले तर त्यात तेवढ्याच अन्नात दोन्ही अर्धपोटी ठेवणे हा पर्याय उपलब्ध करुन देणे हा सुजाण पर्याय आहे. जर दोन्ही लोकांना पोटभर अन्न देता आले तर गोष्टच वेगळी.
क्षमता, उपलब्धता व विभागणी याचा सुयोग्य वापर केला तर हे शक्य आहे. एकच भाकरी व दोन माणसे असतील त्यावेळी बळी तो कानपिळी न्यायाने एकानेच ती बळकावली तर दुसरा उपाशी राहिल. भारतात ८० टक्के संपत्ती २० टक्के लोकांमधे एकवटलेली आहे व २० टक्के संपत्ती ८० टक्के लोकांमधे विखुरली आहे असे ढोबळमानाने म्हटले जाते.
संधींची कमतरता व अनुपलब्धी ही आपल्याला हवी तशी अनुकूल करुन राजकारण केले जातेच. क्षमता असुनही (रोजगाराची) संधी एकालाच मिळते त्यावेळी कुणाला आधिक गरज आहे हा विचार होताना दिसत नाही.
प्रकाश घाटपांडे

गंमत म्हणून का खरेच?

नोकरी करणारी स्त्री ( प्रसंगी पुरुष सुद्धा) ही एका गरजु माणसाची पर्यायाने एका कुटुंबाची रोजगाराची संधी काढुन घेत असते.

खरेच म्हणत आहात? का गंमत म्हणून?

असो.

माझी आई आणि मावश्या जेव्हा मुलींना फार शिकवण्याची विशेष पद्धत नव्हती अशा काळात पदवीधर होईपर्यंत शिकल्या. पण अशाच भावनेतून माझ्या आजोबांनी त्यांना काम करण्यापासून परावृत्त केले की दुसर्‍या कोणाच्यातरी पोटावर पाय येईल. अर्थात कोणालाही नशिबाने पैशाची अशी गरज लागली नाही, सगळ्याजणींचे संसार सुस्थितीत होते, पण त्यामुळे या सर्व शिकलेल्या मुलींना त्यांच्या पद्धतीने फुलण्यास संधी मिळाली नाही. हा आजोबांचा दोष म्हणून सांगत नाही, तर अशा चांगल्या(ही) विचारांनी व्यक्तींचे नुकसान होते ते जाणवले.

त्यामानाने ज्या माझ्या आई/मावश्यांएवढे न शिकलेल्या स्रिया घरासाठी का होईना, कुठे पोस्टात/एस्टीत लागल्या त्यांना कमावत्या असल्याने पैशाचा कॉन्फिडन्स आला असावा.

सहमत आहे

तर अशा चांगल्या(ही) विचारांनी व्यक्तींचे नुकसान होते ते जाणवले.

हे चांगले जवळून पाहिले आहे चित्रताईंशी सहमत आहे.

मुक्तसुनित यांच्याशीही सहमत आहे. चांगले मत मांडले आहे.

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

शिक्षण

शिक्षण हे फक्त नोकरी साठीच करायचे असे मानणारा वर्ग होताच. समाज सुसंकृत व्हावा हा विचार नव्हता. शिकून काय बालिष्टर व्हायच का? हित गुर तर वळायचीत/शेती तर करायची/...../ असा भाग होता.
अवांतर- कुटुंबागणिक रोजगार कि व्यक्तिगणिक रोजगार या संकल्पना आता स्पष्ट व्हायला हव्यात तरच चर्चा विधायक वळणावर जाउ शकेल.
प्रकाश घाटपांडे

आँ

घाटपांडेकाकांचा प्रतिसाद वाचून धक्का बसला.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

बॅंग्लोराईज्ड

आयटीवाल्यांचा आणखी एक छोटा प्रकार म्हणजे भारतात नोकरी करणारे आयटीवाले. चर्चा अमेरिकेतील आयटीवाल्यांची कुटुंबसंस्था ढासळते आहे यावर अपेक्षित आहे की भारतातील मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबांमध्ये झालेले बदल यावर अपेक्षित आहे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सर्वंकष, सर्वांगीण चर्चा व्हावी

आयटीवाल्यांचा आणखी एक छोटा प्रकार म्हणजे भारतात नोकरी करणारे आयटीवाले. चर्चा अमेरिकेतील आयटीवाल्यांची कुटुंबसंस्था ढासळते आहे यावर अपेक्षित आहे की भारतातील मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबांमध्ये झालेले बदल यावर अपेक्षित आहे?

दोन्हीकडील डबलइंजिनांवर चर्चा व्हावी. मध्यमवर्गीय डबलइजिंन कुटुंबांमध्ये झालेले बदलही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वी केवळ गरज म्हणूनच संसाराला नवरा-बायको दोन्ही नोकरी करीत असता. आता चंगळीसाठी किंवा चंगळीचे हफ्ते फेडण्यासाठी दोघे नोकरी करतात, असे दिसतात. शिक्षण महागले आहे, आरोग्यसेवा महागल्या आहेत हे खरे असले तरीही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चंगळ?

चंगळ कशाला म्हणावे याबद्दल शंका आहे.

७० च्या दशकात आम्ही ७५ रु भाडे देऊन मोठ्या घरात रहात होतो. आमच्या घराचे भाडे ७१ साली ७५ रु आणि घरसोडले तेव्हा ९७ साली १६० रु होते. अशी घरे आज उपलब्ध नाहीत.

आज भाड्याने त्याहून लहान साधारण घरात रहायला ठाण्यासारख्या शहरात ८-१० हजार रु सहज लागतात. तसेच पूर्वी आम्ही २० वर्षे एका घरात राहिलो. आता अधिकृत भाड्याने घरे मिळत नाहीत म्हणुन लीव्ह लायसन्सवर रहावे लागते. तेथे सारख्या जागा बदलण्याची कटकट असते. त्यामुळे स्वतःचे घर घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. स्वतःचे घर घेणे ही चैन समजायची की गरज?

स्वतःचे घरही स्टेशनपासून दूर घ्यावे लागते; जवळ परवडत नाही.. मग पुन्हा वाहतुकीचे साधन. स्कूटर घेणे ही गरज की चैन?

७०च्या दशकात नोकरी करणार्‍या स्त्रियांना काही खरेदी -एखादी साडी - वगैरे सहजपणे करता येत असे. ती चैन असल्याचे नोकरी न करणार्‍या स्त्रियांचे मत असे.

याखेरीज आर्थिक सुरक्षितता म्हणून स्त्रियांनी नोकरी करणे आवश्यकच आहे. नवर्‍याच्या पगारात भागते की नाही याचा विचार न करता.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

पगारही प्रचंड वाढले आहेत

आज भाड्याने त्याहून लहान साधारण घरात रहायला ठाण्यासारख्या शहरात ८-१० हजार रु सहज लागतात.

पगारही प्रचंड वाढले आहेत ना.

याखेरीज आर्थिक सुरक्षितता म्हणून स्त्रियांनी नोकरी करणे आवश्यकच आहे. नवर्‍याच्या पगारात भागते की नाही याचा विचार न करता.

हे सगळे ठीक आहे पण घर सांभाळणे हा फुलटाइम जॉब नाही का? असायला नको का? ज्या घरासाठी दोघे राबतात त्याचे काय? नक्की कुणासाठी, कशासाठी एवढे राबराब राबायचे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ये तेरा घर ये मेरा घर

घर सांभाळणे हा फुलटाइम जॉब नाही का?

याचे प्रामाणिक उत्तर 'नाही' हे आहे. चटपटीत काम करणाऱ्या गृहिणीला घरचे आवरायला फार वेळ लागत नाही. मुले लहान असेपर्यंत घर सांभाळणे हे इमोशनली व फिजिकली डिमांडिंग असले तरी दीर्घकालीन विचार करता घर सांभाळणे आणि हॉपिसमध्ये ताणतणावाचे काम करणे यात मूलभूत फरक आहे. मेकॅनिकल कंपन्यांमधील फाऊंड्री किंवा तत्सम ठिकाणी ८-१० तास धोक्याचे काम करणे किंवा आयटी कंपन्यांमध्ये १०-१२ तास ताणतणावाचा सामना करत काम करणे आणि घरी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' वगैरे डोकेदुखी करणाऱ्या सिरीयली बघत काम करणे यांची तुलना करणे चुकीचे आहे. घर सांभाळणे हा सध्याच्या न्युक्लीअर फ्यामिलींमधला फुलटाईम जॉब होऊ शकत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जेंडर बायस नाही

चटपटीत काम करणाऱ्या गृहिणीला घरचे आवरायला फार वेळ लागत नाही.

यात जेंडर बायस नाही हे नमूद करावेसे वाटते. गृहिणी किंवा गृहस्थाला असे वाचावे. हल्ली बरेच गृहस्थ गृहिणींना घरकामात मदत करतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

हल्ली बरेच गृहस्थ गृहिणींना घरकामात मदत करतात.

या उलट काही गृहस्थ गृहिणींना घरकामात मदत का करत नाहीत हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो.






सहमत

याखेरीज आर्थिक सुरक्षितता म्हणून स्त्रियांनी नोकरी करणे आवश्यकच आहे. नवर्‍याच्या पगारात भागते की नाही याचा विचार न करता.

स्त्रियांनी स्वतःचा खर्च भागेल इतपत पगार मिळवला की नवऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रत्येकाने स्वतःपुरता पैसा स्वतः प्रामाणिक मार्गाने कमवावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आश्चर्य

चर्चाप्रस्ताव वाचून आश्चर्य वाटले. देशातील इन्फ्लेशनने गेल्या दोन वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. अशा परिस्थितीत फक्त दोघांनाही घर चालवणे कठीण जावे, त्यात मुले असली तर विचारायलाच नको. कोणत्या माणसाने कसे रहावे हा सर्वस्वी त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. अंबानी जसे रहातात ती आपल्याला उधळपट्टी वाटते पण त्यांचा पैसा जसा पाहिजे तसा खर्च करण्याचा अधिकार त्यांना आहे. अमुक रीतीने राहीले म्हणजे साधी रहाणी आणि अमुक रीतीने राहीले म्हणजे उधळपट्टी या कल्पना सापेक्ष आहेत. मी हाटेलात जाऊन उत्तपा खातो तेव्हा रस्त्यावरच्या भिकार्‍याच्या दृष्टीने ती चैनच असते.

एकट्याच्या/एकाच्या पगारात मूलभूत गरजा अगदी नीट भागत असताना दोघांनी नोकरी करण्याची गरज काय? असो.

कोथिंबीर २५
मिरची ५० रू किलो,
३० - गवार
३० - भेंडी
३० - फ्लॉवर
२५- कारले
२०- दोडका
२०- वांगी
२०- टोमॅटो
भाजी करणे हा प्रकार चैनीत बसतो की मूलभूत गरजांमध्ये?

संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे.
यात खरे सदस्य किती आणि त्यांचे दशावतार किती हा संशोधनाचा विषय ठरावा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

नीता

नीता अंबानी यांनी नोकरी करावी का असा प्रश्न मनाला शिवून गेला. :)

अजून थोडी माहिती

स्मोकिंग जो च्या पिझ्झावर साधारण ५०% किंवा अधिक सवलत देणार्‍या तिकिटांचे पुस्तक ३५० रुपयांना मिळते. शिवाय स्वागतभेट म्हणून एक पिझ्झाही फुकट मिळतो. पुस्तकात साधारण २५-३० तिकिटे असतात आणि ती सहा महिन्यात वापरावी लागतात.
शीतपेयांच्या दीड/दोन लिटरच्या बाटल्यांवर २०% सवलत महिन्यातून किमान १५ दिवसतरी बहुतेक सुपरमार्केटमध्ये जाहीर करतात.
पिझ्झाच्या दुकानात बसून महाग दराने शीतपेय पिण्यापेक्षा घरी पिझ्झा मागवून शीतपेय सेवन केल्यास त्यास चैन म्हणायचे की बचत?

माझ्यामते याला अत्याचार म्हणावे

पिझ्झा खाणे व कार्बोनेटेड शीतपेये पिणे हा शरीरावर केलेला अत्याचार आहे. त्याऐवजी साजूक तूप लावून चपाती व लिंबू-मध घालून पाणी प्यावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पिझ्झा आणि चपाती

पिझ्झा आणि साजूक तूप चोपडलेली चपाती ह्यातला पिझ्झा वाईट हे कोणत्या आधारावर ठरवले?
साजूक तूप/लोण्यापेक्षा चिझ तब्येतीला चांगले हे 'शास्त्रिय' अभ्यासातून दाखवलेले आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

साजूक तूप चांगले

माफक प्रमाणात खाल्लेले साजूक तूप प्रकृतीला चांगले असते. एक माहितीपूर्ण दुवाः http://www.associatedcontent.com/article/28850/ghee_nutrition_benefits_o...

आणि पिझ्झ्यामध्ये लोणी नसते हे कोणी सांगितले. भारतात मिळणारा पिझ्झा लोण्याने थबथबलेला असतो. पिझ्झ्याची कणीक मैद्यापासून बनवलेली असते (तंतूमय पदार्थांचा अभाव) त्यामुळे अनावश्यक एम्प्टी क्यालरीज शरीराला मिळतात. थोडक्यात पिझ्झ्यामध्ये हानीकारक गुण जास्त असतात. घरी बनवलेली चपातीमध्ये तंतूमय पदार्थ असतात (आम्ही कोंडा बाजूला काढत नाही). तूपही घरीच बनवतो. त्यामुळे तुपात इतर हायड्रोजनेटेड फ्याट्स वा तत्सम भेसळ नसल्याची खात्री असते.

||जय बालाजी||


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लोणी पिझ्झा?

माफक प्रमाणात घेतलेले कोकेनही शरीराला चांगलेच असावे.

आणि पिझ्झ्यामध्ये लोणी नसते हे कोणी सांगितले. भारतात मिळणारा पिझ्झा लोण्याने थबथबलेला असतो.

लोणी डोसा ऐकला आहे, लोणी पिझ्झा हे काहीतरी नविनच दिसते.

पिझ्झामधे चीज ऐवजी लोणी घातल्यास तो 'पिझ्झा' राहणार नाही. पिझ्झाबेस हा कणकेचा (होल व्हीट), मैद्याचा कशाचाही बनवला जाऊ शकतो. जसे चपाती ही कणकेची मैद्याची कशाचीही बनवली जाते. तरीही जनरली पिझ्झा हा मैदा आणि चपातीही कणकेची असल्याने तुमचा हा मुद्दा बरोबर आहे, पण त्यावर तूप न चोपडता चिझ घालावे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चीझ बडी है मस्त मस्त

पिझ्झ्याला बोटाने दाबून पाहिले असता बाहेर येणारा तेलकट द्रव काय असतो (बटरच ना?). चीझऐवजी लोणी घाला असे मी कुठे लिहिले? चीझ प्रकृतीस बरे हे योग्य, पण पिझ्झा नाही. माझ्या मूळ मुद्द्यामध्ये मी चीझवर आक्षेप घेतला नव्हता याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आजचे त्रिकोणी कुटुंब लहान असल्या मुळे खरे तर डब्बल इंजन ची कांही

डबल इंजन वाचून भल्या मोठ्या मालगाडीची आठवण झाली. मालगाडीला जास्त डब्बे लावलेले असतात आणि वाहन क्षमता खूप जास्त असल्या मुळे डब्बल इंजन लावावे लागते. आता आजचे त्रिकोणी कुटुंब लहान असल्या मुळे खरे तर डब्बल इंजन ची कांही आवशकता नाही पण बदललेली समाज व्यवस्था, राहणीमानाच्या कल्पना (बऱ्या-वाईट ) यामुळे कितीही पैसा नवऱ्याने कमावला तरी तो पुरेसा पडेना झाला.यामुळे स्त्रिया सुद्धा नोकरी करू लागल्यात. यामुळे समाजात जो सामाजिक प्रश्न निर्माण झाला तो कोणाच्या लक्षात आला नाही किंवा या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या जात आहे तो म्हणजे आहिरे आणि नाहीरे च्या वर्गातील दरी वाढली. एकीकडे एकच घरात २-३ जण नोकरी करत आहेत तर दुसरी कडे सुशिक्षित तरुणांची फोंज हातात शिक्षणाच्या पदव्या घेवून नोकरीच्या शोधात आयुष्य बरबाद करत आहेत . यांच्या घरातील कोणीही नोकरीला नाही.संघर्ष करतच यांनी शिक्षण घेतले आता नोकरीचा यक्ष प्रश्न. यात या बेरोजगार तरुणांची कांही चूक नसताना यांना या डबल इंजन प्रथे मुळे त्रास होत आहे. यांचे आयुष्य होरपळून याला आपणा कोण कडे उत्तर आहे का?

:-)

तुमच्या सात आठ वाक्याच्या प्रतिसादात पाच वेळा शब्द आला "नोकरी".....

शिक्षण व नोकरी ह्या पलीकडे विचार कधी होणार? हा खरा चर्चेचा विषय होईल.

व्यवसाय?

या धाग्यात एका व्यवसायाविषयी चर्चा आहे ;)

इतर अडचणी.

या विषयाची दुसरीही एक अशी बाजू आहे की जिचा उल्लेख वरील लेखात वा प्रतिसादात आलेला नाही, ती म्हणजे त्या "मुली"ची इच्छा ! दुसर्‍या शब्दात वा रोखठोक सांगायचे म्हणजे मी स्वतः (आयटी क्षेत्रातली नसली तरी) चांगली नोकरी करीत आहे, पगारही चांगलाच आहे अन् घरातील जबाबदारीही मर्यादित आहे. ज्येष्ठांकडून वारंवार विचारणा तसेच आता "स्टॅबिलिटी"ची भावनाही आल्याने "लग्न"करणे क्रमप्राप्त. ज्या ठिकाणी नोकरी करीत आहे तेथीलच एका सहकारी तरूणीशी (जसे अन्यत्र होते तसे) लग्नाच्या गोष्टी होईतोपर्यंत संबंध जुळले. धर्म, जात, गोत्र, शिक्षण, आचारविचार सर्वच सेम टू सेम जुळत असल्याने अगदी आज रजिस्ट्रार ऑफिसला "मॅरेज नोटीस" देवून उद्या लग्न करतो म्हटले तरी अडचण नव्हती. पण इथे खलनायक ठरलेली बाब म्हणजे तिची ५ आकडी पगाराची "सेफ नोकरी". तिचे खाजगी कंपनीत नोकरी करून सेवानिवृत्त वडील, दोन नंबरच्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन जोपर्यंत नोकरी करून तो कमावता होत नाहीत तोपर्यंत, मुलीचे "चलनी" नाणे दुसर्‍याच्या खात्यावर देण्यास तयार नाहीत. मुलगा आता एफ्.वाय.ला. म्हणजे अजून किमान् तीनचार वर्षे तो "कमावता" होणार नाही हे ठरलेली बाब. माझ्या घरचे तसे चांगले असल्याने भावी पत्नीची कमाई माझ्या घरी आली वा ना आली तर मला तसा काहीच फरक पडत नाही, म्हणून तिने सगळे वेतन माहेरी दिले तरी चालेल अशी मी भूमिका घेतली, तिला माझ्या घरातील लोकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या भूमिकेचे मी ताडन करू शकलो नाही; आणि एके दिवशी या एका सुंदर स्वप्नाची हवाच होवून् गेली.

काही महिन्यानंतर माझ्या मावशीने त्यांच्या पतीकडील घराण्यातील एक मुलगी पसंत केली जी इकडे सर्वांना आवडली अन् व्हाईस् व्हर्सा. आता इथे गोची अशी झाली आहे की, ही उपवर् कन्यका आहेत आय.टी.शी निगडीत अन् त्यांची पहिलीच अट आहे की, लग्नानंतर मी आयटीचे क्षेत्र सोडणार नाही. आमच्याकडील कुणाचाच याला तसा तीव्र विरोध नाही, पण सध्या तिची जी ड्युटी आहे ती आहे शिफ्टमध्ये, म्हणजे दुपारी एक ते रात्री दहा. इथे दहाची व्याख्या फक्त् दहा होत नाही, कारण कॅम्पस् दहाला सोडला तरी लग्नानंतर ती इकडे यायला रात्राचे अकरा तरी होणारच, आणि एका एकत्र कुटुंबपध्द्तीत राहणार्‍या लोकांना एका मुलीने रात्री ११ पर्यंत बाहेर राहणे पचनी पडत नाही. अन् ही पठ्ठीतर् "डबल इंजिन" कल्पनेची पुरस्कर्ती आहे.

"डबल इंजीन्" असो वा नसो, या संदर्भातील अशाही अनेक अडचणी आहेत समाजात.

हो नही सकता, ये हो नही सकता!

अगदी आज रजिस्ट्रार ऑफिसला "मॅरेज नोटीस" देवून उद्या लग्न करतो म्हटले तरी अडचण नव्हती.

तुम्हाला अडचण नसली तरी रजिष्ट्रार ऑफिसला याची अडचण असते. स्पेशल म्यारिज ऍक्टान्वये म्यारिज नोटिस दिल्यानंतर किमान एक महिन्यानंतरच लग्न करता येते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्यारिज नोटिस

नक्कीच, कायद्यातील ही अट मला काय अन् अशा पध्दतीच्या लग्नाचा पुरस्कार करणार्‍या प्रत्येक घटकाला माहित आहे, फक्त लिखाणाच्या त्या ओघात वा आम्हा दोघांची मानसिक तयारी कुठल्या पायरीपर्यंत आली होती ते सांगण्यासाठी "त्या" वाक्याचे प्रयोजन होते.

(थोडेसे अवांतर् :: इथे कुणाला माहित असेल वा नसेल, पण रजिस्टर लग्न करू पाहणार्‍यांना "रजिस्ट्रार ऑफिस" मधील लाल फितीचा आणि तिथल्या बेपर्वाईने पेश येणार्‍या बाबू लोकांचा किती संतापजनक अनुभव येतो, हे जर पाहिले तर ते जोडपे दुसर्‍या कुणाला अशा पध्द्तीने लग्न करण्यासाठी त्या कचेरीच्या पायर्‍या चढायला लावणार नाही. असो.)

सिस्टम प्रॉब्लेम

(थोडेसे अवांतर् :: इथे कुणाला माहित असेल वा नसेल, पण रजिस्टर लग्न करू पाहणार्‍यांना "रजिस्ट्रार ऑफिस" मधील लाल फितीचा आणि तिथल्या बेपर्वाईने पेश येणार्‍या बाबू लोकांचा किती संतापजनक अनुभव येतो, हे जर पाहिले तर ते जोडपे दुसर्‍या कुणाला अशा पध्द्तीने लग्न करण्यासाठी त्या कचेरीच्या पायर्‍या चढायला लावणार नाही. असो.)

एक तर थेट रीतसर रजिस्टर लग्न (ज्याला प्रचलित बोलिभाषेत कोर्ट म्यारिज म्हणतात) ते करण्याचे प्रमाण फार नगण्य आहे. रजिस्ट्रेशन कार्यालयात थेट होणारी अशी लग्ने ही बहुदा लफड्यातलीच असतात. (मुलामुलीने पळून जाऊन केलेले लग्न). अशी लफड्यातली लग्ने करणारे लोक पैसे खाऊ घालण्यास तयार असतात तशी दक्षिणा रीतसर लग्न करणारे देत नसतात त्यामुळे असा अनुभव येतो.

दुसरे म्हणजे आधीच लग्न झाले असतानाची नोंदणी (Registration of solemnized marriage) आणि नोंदणीकृत लग्न (Solemnization and registration of marriage) या दोन्हींसाठी एकच कार्यालय असते व तिथे कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असते (पुणे कार्यालयात केवळ १ महिला हे सर्व काम पाहते) त्यामुळे असा अनुभव येतो.

पण पुणे विभागीय रजिष्ट्रेशन कार्यालयाच्या घरच्या घरी रजिष्ट्रेशन वगैरे सुविधाही आहेत. १० किमी परिघाच्या आत जर तुमचे घर असेल तर रजिस्ट्रेशन ऑफिसर घरी येऊन लग्नाची नोंदणी करवून घेतो. त्यासाठी ५०० की १००० रुपये खर्च वेगळा लावतात. एखाद्याला घरगुती समारंभ करुन नंतर फक्त लग्नाची नोंदणी करायची असेल तर असा पर्याय उपलब्ध असल्याची थेअरेटिकल माहिती मला आहे. अशा पद्धतीची 'घरच्या घरी' नोंदणी झाल्याचे मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लफड्यातली लग्ने

रजिस्ट्रेशन कार्यालयात थेट होणारी अशी लग्ने ही बहुदा लफड्यातलीच असतात. (मुलामुलीने पळून जाऊन केलेले लग्न). अशी लफड्यातली लग्ने करणारे लोक पैसे खाऊ घालण्यास तयार असतात तशी दक्षिणा रीतसर लग्न करणारे देत नसतात त्यामुळे असा अनुभव येतो.

ठाण्यात लफड्यातली लग्ने लावणार्‍यांच्या अनेक पाट्या आहेत. त्यात बहुदा वैदिक पद्धतीने वगैरेच उल्लेख होत असतो. लफड्यातले लग्न करायचे असेल तर यासारखा उपाय नाही. (चट मंगनी पट ब्याह). कोर्ट मॅरेज/रजिस्टर्ड लग्न प्रकाराला १ महिन्याची नोटीस द्यावी लागते. ही नोटीस मग रजिस्ट्रारच्या कार्यालयात लावण्यात येते. ती बघून काही व्यावसायिक मंडळी शोध घेत घरी पोचतात आणि बहुदा थोडेबहुत कमवून जातात. या उलट धार्मिक लग्नांना फारशी अडचण नसते असे ऐकतो.

प्रमोद

१ महिना !!!!!!

वंगणाची सोय झाल्यास ब्याक डेटेड नोटीस नोंदणी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दृश्य नोटिशींच्या पाठीमागच्या बाजूस दिसणार नाही अशा रीतीने लावता येते असे समजते. (पुरावा मागू नये; मिळणार नाही).

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

आळंदी

धार्मिक लग्नांना फारशी अडचण नसते हे खरे आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार मंगळसूत्रविधी, सप्तपदी आणि आणखी एक विधी (नांव आठवत नाही) हे कायदेशीर मानले जातात. दोन साक्षीदार, लग्न लावणारा पुरोहित आणि लग्नाचे जोडपे एवढे लोक लग्नाच्या मान्यतेसाठी पुरेसे असतात. लफड्यातल्या लग्नांसाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे आळंदी (देवाची). येथे अनेक धर्मशाळा लगेच लग्न लावून त्वरित प्रमाणपत्र उपलब्ध करवून देतात. दुसऱ्याच दिवशी विवाह कार्यालयात नोंदणी करता येते. मात्र तरीही रजिस्ट्रेशन कार्यालयात थेट होणारी बहुतेक लग्ने ही लफड्यातलीच असतात. (पुरावा मागू नये.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लाजाहोम

तिसरा लाजाहोम.
सहचार्‍याला (यु.एस.चा) डिपेंडंट व्हिसा मिळण्यासाठी या तीन फोटोंची गरज असते.

दुरुस्ती

१० किमी परिघाच्या आत जर तुमचे घर असेल

येथे परिघाच्या ऐवजी त्रिज्येच्या असे वाचावे.

(मराठी संकेतस्थळांमुळे माझे मराठी बिघडले आहे. आधी ते चांगले होते.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सपनेंमें मिलती हैं

म्हणून तिने सगळे वेतन माहेरी दिले तरी चालेल अशी मी भूमिका घेतली, तिला माझ्या घरातील लोकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या भूमिकेचे मी ताडन करू शकलो नाही; आणि एके दिवशी या एका सुंदर स्वप्नाची हवाच होवून् गेली.

त्रयस्थ व्यक्ती म्हणून भोचकपणा केल्याबद्दल क्षमस्व पण तुमच्या घरच्यांची याबाबतीतली भूमिका योग्य आहे. मुलीने सगळे वेतन माहेरी देणे चुकीचे आहे. तुम्ही काहीतरी फॉर्म्युला काढून (४०-६० वगैरे) असा प्रश्न सोडवता येऊ शकतो. संसार तुमच्या दोघांचा असल्यावर फक्त तुमच्या पगारावरच संसार चालवायचा व तिने तिचा पगार माहेरी द्यायचा हे थोडे चुकीचे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आक्षेप का?

घरच्यांना का आक्षेप असावा? निदान तिचे भाऊ कमावते होईपर्यंत तरी काय हरकत आहे?
एखाद्या नवर्‍याने लहान भावाचे शिक्षण होईपर्यंत बायकोला आत्यंतिक काटकसर करायला लावण्यासारखेच आहे.

(असा विचार करणारी मुलगी आपल्या ताब्यात राहणार नाही अशी भीती वाटली असावी काय?)

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

पावशेर दुधासाठी म्हैस कशाला विकत घ्यायची?

घरच्यांना का आक्षेप असावा? निदान तिचे भाऊ कमावते होईपर्यंत तरी काय हरकत आहे?

सर्व पगार माहेरी देण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी भाऊ कमावते होईपर्यंत लग्न न करणे हे सोयीचे.

एखाद्या नवर्‍याने लहान भावाचे शिक्षण होईपर्यंत बायकोला आत्यंतिक काटकसर करायला लावण्यासारखेच आहे.

येथे बायको नोकरी करत आहे की नाही हे माहीत नाही. जर समजा ती नोकरी करत असेल तर नवरा व बायकोने आपल्या दोघांच्या संसारासाठी किती खर्च होईल याचा अंदाज काढून तेवढे पैसे वेगळे काढावेत व त्यावर संसार चालवावा. स्वतःच्या इतर पैशाचा विनियोग स्वतःच्या मर्जीने करावा. वरील उदाहरणात 'सर्व' पगार माहेरी देणार या तत्त्वाला माझा आक्षेप होता.

जर ती नोकरी करत नसेल तर नवऱ्याने बायकोला काटकसर करायला लावणे योग्य आहे. जे पैसे बायको कमावत नाही त्या पैशाच्या विनियोगाचे संपूर्ण स्वातंत्र्य बायकोला असू नये.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आक्षेप

घरच्यांना का आक्षेप असावा? निदान तिचे भाऊ कमावते होईपर्यंत तरी काय हरकत आहे?

प्रतिसादात मी जरी "आक्षेप" सारखा तीव्र भावना व्यक्त करणारा शब्द् वापरला असला तरी प्रत्यक्षात माझ्या घराकडील मंडळींची तशी समजूतदार भूमिका होती असे मी म्हणतो, कारण मुलीच्या वडिलांची जी प्रमुख "अट" होती (धाकट्या मुलग्याचे शि़क्षण पूर्ण होवून तो कमावता होणे) ती खर्‍या अर्थाने वास्तवात येईपर्यंत ३ ते ४ वर्षांचा कालावधी जाणार, आणि तो पर्यंत आपल्याकडील उपवर आणि सर्वार्थाने लायक (म्हणजे मी) मुलाला लग्नावाचून ठेवायचे हे मान्य नव्हते -- त्या अर्थाने "आक्षेप" चे प्रयोजन.

(शिवाय एका सीनियरचे असेही म्हणणे पडले की, मुलीच्या बापाकडे असा कोणता जादुचा दिवा आहे की, सध्याच्या धकाधकीच्या युगात त्याच्या मुलाला पदवी मिळाल्या मिळाल्या नोकरीची ऑर्डर हाती येणार आहे? कदाचित जर का तीनचार वर्षानंतरही नोकरी लागली नाही तर या मुलीने मग तिशीनंतर आपल्या संसाराची सुरुवातीची वाट पाहायची का?)

योग्य निर्णय

तुमच्या घरच्यांनी आणि सीनियरने तुम्हाला योग्य दिशा दाखवली. अशा अनुभवांचा/सल्ल्यांचा फायदा मिळणे भाग्याचे. प्रत्येकवेळी स्वतःच ठेच खाऊन शहाणे व्हायची गरज नसते. मुलीने स्वतःही काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता. तिचे वडील तिच्याकडून पूर्ण पगाराची अपेक्षा कशी काय करु शकतात असा प्रश्न ती विचारु शकली असती. तिचे तिच्या माहेरच्या घराप्रती काही कर्तव्य आहे हे कोणीच नाकारणार नाही. पण या कर्तव्याची मर्यादा कुठपर्यंत आहे याचा निर्णय विचार करुन घेणे आवश्यक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा प्रश्न

तुम्ही काहीतरी फॉर्म्युला काढून (४०-६० वगैरे) असा प्रश्न सोडवता येऊ शकतो.

माझ्या प्रतिसादात मी सर्वच बाबी नीटपणे मांडू शकलेलो नाही, पण आपण सुचविलेले वरील "ऑप्शन" जरूर विचारात होते (५०-५०). इथेही एक अडचण अशी की, आम्हा मराठा समाजाच्या एकत्र कुटुंब व्यवस्थेत केवळ आईवडीलच नव्हे तर अन्य जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या शब्दानादेखील तितकेच वजन आणि मान असतोच. ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली पण एका सीनियरचे असे म्हणणे पडले की, अशा गोष्टी काही लेखा स्वरूपात होत नसतात. थोडक्यात "म्युच्युअल अंडरस्टँडिंग"नेच या व्यवहाराकडे पाहावे लागले. समजा लग्नानंतर सहासात महिन्यांनी काही कारणास्तव माझ्याकडील लोकांनी तो ५० चा शेअर व्याह्याकडे "वर्ग"च केला नाही तर तो गृहस्थ कुठल्याही कोर्टात जाणार नाही. हे जरी खरे असले तर मुलीच्या मनात माझ्याविषयी (म्हणजेच नवर्‍याविषयी) एक प्रकारची संशयाची सुई फिरत राहणार जी संसाराच्या पुढील वाटचालीसाठी धोकादायक ठरू शकेल. तेव्हा "प्रतीक"ने तो दरवाजा बंद करावा हेच चांगले.

कदाचित या प्रकरणात मी जितका आक्रमक असायला हवे तितका नसल्यानेदेखील हा गुंता सोडवू शकलो नाही, असेच मी म्हणेन्.

(थोडे जादाचे : "त्रयस्थ व्यक्ती म्हणून भोचकपणा केल्याबद्दल क्षमस्व "

नाही, बिलकुल नाही. असा विचार ओपन फोरममध्ये भाग घेताना मनी येणे कदापिही शक्य नाही. तेव्हा तुमची पोस्ट् संपादित करता येत असेल तर वरील ओळ प्लीज् काढून टाका. तशी सुविधा इथे नसेल तर्, तशी ओळ आपल्या मजकुरात नाहीच असे मी समजतो. थँक्स्)

गोंधळ

कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?

चर्चा नक्की कशासाठी आहे? डबल इंजिन चा राग व्यक्त करण्यासाठी की, कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी की कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी कोणाची यासाठी?

मला वाटतं की हे सर्व काही व्यक्तिसापेक्ष आहे. अशी अनेक कुटूंबे आयटी/नॉन आयटी पाहिली आहेत जे आनंदाने जगत आहेत. त्यांची कुटूंबे आनंदी आहेत. मला तर चर्चा प्रस्ताव एककल्ली वाटतो आहे. चर्चा प्रस्तावकाची कुटूंब म्हणजे काय हि संकल्पना समजून घेता आली तर प्रतिसाद देणे सोपे जाईल.

जाता जाता, एका कुटूंबात एक व्यक्ति घरी (शक्यतो स्त्री) घरी आहे. घरी कामाला बाई आहे. तिला पुण्या मुंबई मध्ये पगार १००० पेक्षा जास्त आहे. (घरी बसणार्‍या बाई पेक्षा जास्त.:) ). त्या कामवाली बाईचा नवरापण कुठेतरी नोकरी करतो. त्यांचे कुटुंब डबल इंजिन नाही का? की त्यांचे कुटूंब टिकण्यासाठी त्यांनी त्यांच्या गरजा कमी कराव्यात? की नवर्‍याने अथवा बायकोने आपली कमवण्याची क्षमता वाढवावी? कुटूंब व्यवस्था टिकण्यासाठी एकाने घरी बसावे. क्षणभर मान्य, आणि दुसर्‍याने कुटूंबाच्या गरजा भागवण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करावे. मग कुटूंबाला वेळ कमी मिळाला तरी चालेल? याला आपण कुटूंब म्हणायचे?

ऑनसाईट गेलेले बरेचसे लोक आगोदरच गरजा कमी करून जगतात असे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. या बद्दल प्रस्तावकाचे तसेच सदस्यांचे काय मत आहे?






 
^ वर