मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबे

सध्याच्या मध्यमवर्गात डबलइंजिन कुटुंबेच जास्त दिसतात. उदा. आयटीवाल्या कुटुंबातला नवरा २ वर्षे परदेशी (ऑनसाइट) जातो. काही लाख कमावतो. कधी बायको जाते. मग फ्लॅट मोकळा होता. एक फ्लॅट मोकळा झाला की दुसरा मोकळा होतो. मग आणखी एक चारचाकी होते.. हे काही संपत नाही. ( एवढेच कशाला परदेशात जाऊन राहिले तरी नवरा एकीकडे नोकरी करतो आणि बायको दुसरीकडे.) हे झाले आयटीवाले जोडपे. इतरांच्या बाबतीतही कमी-अधिक अशीच परिस्थिती आहे. पैसे कमावण्याच्या नादात लोक जगणे विसरून गेले आहेत. एवढा पैसा कमावून करणार काय कळत नाही. माणसाने किती जगायला हवे हो? जगायला किती पैसा लागतो हो?

एकट्याच्या/एकाच्या पगारात मूलभूत गरजा अगदी नीट भागत असताना दोघांनी नोकरी करण्याची गरज काय? असो. मुले आईवडलांपासून दुरावत आहेत. मुलांचे पालन-पोषण ही पूर्णवेळ जबाबदारी नाही काय? आपली कुंटुंबव्यवस्था मोडकळू लागली आहे आणि एवढे मोठे आमूलाग्र बदल आपल्या समाजाने बहुधा अनेक शतकांत बघितले नसावेत. (युरोपीय समाज दुसऱ्या महायुद्धानंतर जसा आणि जेवढा बदलला तसेच काहीसे भारतात होते आहे. अर्थात हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.) संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे. जिथेतिथे, बाह्यसौंदर्य ते वटपौर्णिमाच्या शुभेच्छाछाप फालतू चर्चा होत आहेत. नवराबायको संस्थळावर जळवांसारखे चिकटून पडलेले आहेत. पोर विडियो गेम्ज़ खेळत आहेत. (ह्याबाबत विदा उपलब्ध नाही. हे केवळ एक निरीक्षण). असो. तर कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?

कृपया आपली मते मांडावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

सामाजिक बदल जाणून घेण्यासाठी

चर्चा नक्की कशासाठी आहे? डबल इंजिन चा राग व्यक्त करण्यासाठी की, कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी की कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी कोणाची यासाठी?

आपल्या आसपास होणारे सामाजिक बदल जाणून घेण्यासाठी ही चर्चा आहे.

क्षणभर मान्य, आणि दुसर्‍याने कुटूंबाच्या गरजा भागवण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करावे. मग कुटूंबाला वेळ कमी मिळाला तरी चालेल? याला आपण कुटूंब म्हणायचे?

प्रस्ताव नीट वाचावा, ही विनंती. गरज नसताना नोकरी करणाऱ्यांबद्दल बोला.

(घरी बसणार्‍या बाई पेक्षा जास्त.:) ).

आक्षेपार्ह. घर सांभाळणे ही पूर्णवेळ जबाबदारी आहे. नवरा-बायकोपैकी कुणीतरी एकाने आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास ती जबाबदारी घ्यायला हवी, असे माझे मत आहे. मुले मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करणारे असतातच ना.

ऑनसाईट गेलेले बरेचसे लोक आगोदरच गरजा कमी करून जगतात असे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. या बद्दल प्रस्तावकाचे तसेच सदस्यांचे काय मत आहे?

नक्कीच. म्हणूनच जर्मनीत जाऊन आल्यावर तेव्हा फ्लॅट मोकळा होऊ शकतो. यूकेत जाऊन आल्यावर होंडा सिटी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही प्रश्न

प्रस्ताव नीट वाचावा, ही विनंती. गरज नसताना नोकरी करणाऱ्यांबद्दल बोला.

गरजेची व्याख्या काय?
घर सांभाळणे म्हणजे काय?
पूर्णवेळ जबाबदारी म्हणजे काय?
कुटुंबाचे सदस्य कोण? तुमची कुटुंबाची व्याख्या काय?
मुले मोठी करणे म्हणजे काय?

मुले मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करणारे असतातच ना.

किती मोठी झाल्यावर? शरीराने की मनाने?






माझ्यामते

गरजेची व्याख्या काय?

उदा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण. भूक भागवणे ही गरज झाली. श्रेयस ही चंगळ झाली.

घर सांभाळणे म्हणजे काय?

हाउसकीपिंगपासून सगळ्या गोष्टी आल्या. बागेची निगा. घराची साफसफाई. स्वयंपाक-पाणी वगैरे वगैरे.

पूर्णवेळ जबाबदारी म्हणजे काय?

म्हणजे २४ तासाची. नोकरीत फक्त ९ ते ६ काम करावे लागते.

कुटुंबाचे सदस्य कोण? तुमची कुटुंबाची व्याख्या काय?

किमान नवरा-बायको आणि अपत्ये. हे सगळे जण एकत्र राहतात हे गृहीत धरलेले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जाने कहाँ गये वो दिन

नोकरीत फक्त ९ ते ६ काम करावे लागते.

माझ्या कंपनीची कामाची अधिकृत वेळ 8.30 ते 6.00 आहे. त्यासाठीच्या पिक अप बशी ठिकठिकाणावरुन सकाळी 7.15 च्या आसपास सुटतात. संध्याकाळी ड्रॉप बशी हापिसातून 6.10 ला सुटतात व वाहतुकीचा वेळ जमेस धरता 7.45 च्या आसपास घराजवळ पोचतात. म्हणजे कामाची वेळ ही एकंदर 12 तास आहे. हे सामान्य वेळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत. ज्यांचे क्लायंट्स यूएस ईस्टर्न किंवा सेंट्रल टाईमझोनमध्ये आहेत त्यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस कॉल्ससाठी 1.00 ते 1.50 तास अधिक वेळ हापिसात थांबावे लागते. त्यामुळे आठवड्याची सरासरी काढली तर कामाची वेळ किमान 12 ते 13 तास दररोज पकडावी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

घराबाहेरची वेळ

बसमध्ये गेलेला वेळ हा 'पगारी कामाचा' नाही. बसमध्ये झोपणे, पुस्तक वाचन, सर्फिंग/फोरम वॉर/ब्लॉगिंग, विणकाम, असे काहीतरी करता येऊ शकते.

हापिसातही विणकाम करतातच की

बसमध्ये गेलेला वेळ हा पगारी कामाचा नसला तरी हा वेळ मौजमजेचा किंवा स्वतःचे छंद जोपासण्यासाठीचा नसून नोकरी करण्यासाठीचा आवश्यक वेळ आहे. तो वेळ घालवल्याशिवाय नोकरी करता येणे (वर्क फ्रॉम होम वगळता) सद्यस्थितीत शक्य नाही. त्यामुळे तो नोकरीच्या वेळेतच पकडणे मला योग्य वाटते.

बसमधील प्रकाशात व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाचन शक्य नसते. (म्हणजे मला जमत नाही). त्यामुळे सक्तीने झोपावे लागते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखी काही

लाजे पुरते वस्त्र चालेल? कोणी दान केले तरचे अन्न चालेल? शाळेतले शिक्षण न घेता व्यवहारीक चालेल? श्रेयस मध्ये काम करणारे तिथेच जेवले तर चंगळ?

हाउसकीपिंगपासून सगळ्या गोष्टी आल्या. बागेची निगा. घराची साफसफाई. स्वयंपाक-पाणी वगैरे वगैरे.

या कामांसाठी एखाद्याला रोजगार दिला तर चुक? मग घरी बसणार्‍या आणि आयटी मध्ये गडगंज पगार असलेला नवरा असला तरीही?

म्हणजे २४ तासाची. नोकरीत फक्त ९ ते ६ काम करावे लागते.

पुर्णवेळ जबाबदारी म्हणजे २४ तास राबायचे? विश्रांती झोप वगैरे काही नाही? मग पळवाट म्हणून नोकरी काय वाईट?

किमान नवरा-बायको आणि अपत्ये. हे सगळे जण एकत्र राहतात हे गृहीत धरलेले आहे.

नवर्‍याचे पालक अथवा बायकोचे पालक हे कुटुंबाचा भाग नाहीत? त्यांना गुण्यागोविंदाने एकत्र राहायचे असल्यास तुमचा विरोध आहे?

५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले. आता बोअर होईल प्रतिसाद देणे. :(






किमान हा शब्द विसरलेला दिसता.

किमान नवरा-बायको आणि अपत्ये.

नीट वाचा. किमान हा शब्द विसरलेला दिसता.

म्हणजे २४ तासाची. नोकरीत फक्त ९ ते ६ काम करावे लागते.
पुर्णवेळ जबाबदारी म्हणजे २४ तास राबायचे? विश्रांती झोप वगैरे काही नाही? मग पळवाट म्हणून नोकरी काय वा

२४ तासांची जबाबदारी म्हणे २४ तास राबणे होत नाही.

हाउसकीपिंगपासून सगळ्या गोष्टी आल्या. बागेची निगा. घराची साफसफाई. स्वयंपाक-पाणी वगैरे वगैरे.
या कामांसाठी एखाद्याला रोजगार दिला तर चुक? मग घरी बसणार्‍या आणि आयटी मध्ये गडगंज पगार असलेला नवरा असला तरीही?

असो. डबलइंजिनवाल्यांचा अपराधबोध दुसरे काय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चर्चेचे निष्कर्ष

असो. डबलइंजिनवाल्यांचा अपराधबोध दुसरे काय.

चर्चेचे निष्कर्ष आधी मांडून चर्चा करायची असेल तर चर्चा करण्याचीच गरज उरत नाहीत. असो, तुमचा निष्कर्ष तुमच्यासाठी बरोबर असेल.
संसाराची गाडी डबल इंजिन हा तुमचा दृष्टीकोन तर काही जणांसाठी संसाराची गाडी एकच आहे, इंजिंन एकच आहे. पण गाडी इंजिंन वर चालवायची की पुढची आणि मागची चाके सुद्धा गाडी चालण्यासाठी महत्वाची मानायची एक मुद्दा आहे. तुम्ही ज्याला डबल इंजिन म्हणता त्याला अनेक संसारांमध्ये गाडीची पुढची आणि मागची चाके सुद्धा म्हटले जाते. त्यात हवा असेल तर संसाराची गाडी चालेल. या बाबतीत मग नवरा बायको यांना चाकं समजा. तेच मान्य नसेल तर मग चर्चा करणे वायफळ.

तुमचा मुद्दा १००% चुकीचा असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल. कारण अनेक उदाहरणे तुम्ही म्हणता तशी आहेत सुद्धा. पण याचा अर्थ कुटुंब व्यवस्था मेली असा घेणं चुकीच आहे. ज्या घरात समजुतीने घेणारे आहेत. तिथे तुम्ही म्हणता त्या जबाबदार्‍या योग्य प्रकारे वाटून घेतल्या जातात. घरकाम वाटून घेऊन दोन पिढ्यांमध्ये केले जाते. मुलाचे आणि मुलीचे आई वडील अनेकदा नातवंडे सांभाळायची जबाबदारी योग्य प्रकारे पाळतात. तसेच त्यांच्या दिवसभराच्या कष्टांचा मान राखुन उर्वरित दिवस आणि सप्ताहाखेर त्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतात. असो, असे बरेच मुद्दे आहेत. पण जिथे गोष्ट किमान लोकांचीच करायची आहे तिथे मुद्दे वेगळे आहेत. सगळ्याच गोष्टींचे जनरलायझेशन करणं अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. तुमचे वेगळे असेल आणि त्या बद्दल मला आदर आहे. पण तुमचे मत हेच सर्वांचे असावे हा आग्रह अमान्य.
मुळात आपल्याला काय हवे? त्यासाठी आपण काय करायला हवे आणि जे करतो आहोत ते योग्य आहे का? याचा सारासार विचार केल्यास कुटुंब व्यवस्था नक्कीच चांगली राहू शकते. पण मी मला हवे तेच करणार असा विचार केल्यास काय होते याची उदाहरणे सुद्धा आसपास मिळतातच.
असो, तुमचा विचार थोडा एकांगी वाटल्याने लिहिले. बाकी कुटुंब व्यवस्था टिकण्याच्या कळकळीचे कौतुक आहेच.






संक्रमण काल

श्री धम्मकलाडू यांनी उपस्थित केलेला चर्चेचा विषय येथे चर्चा करणार्‍यांच्या दृष्टीने जरी जिव्हाळ्याचा असला तरी नव्या पिढीच्या दृष्टीने फारसा महत्वाचा असेल असे मला वाटत नाही. सध्याचा काल हा एक प्रकारचा संक्रमण काल आहे असे म्हटले तरी चालेल. गेल्या काही पिढ्या मुली शिकत असल्या तरी शिक्षण हे मूलत: चांगला व सुशिक्षित नवरा मिळावा म्हणून घेतलेले असे व त्या पद्धतीने तिच्या मनाची तयारी झालेली असे. एकदा लग्न झाले की ही मुलगी फक्त सुगृहिणी व सुमाताच बनत असे. आयुष्याच्या शेवटी शेवटी रिकामेपणाने मन खाऊ लागले की मग तिला आपल्या शिक्षणाची आठवण होत असे. परंतु तो पर्यंत फार उशीर झाल्याने मग या शिक्षणाचा फारसा उपयोगच होत नसे.
आता प्रत्येक घरात मुले आणि मुली यांच्या शिक्षणात काहीही फरक केला जात नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी या दोघांनाही स्वत:चे करिअर घडवायचे असते. दोघांनाही निवड केलेल्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची उमेद असते. ही करिअर आय.टी क्षेत्रात असो किंवा व्यवस्थापनात. एका विशिष्ट वयानंतर जोडीदाराची आवश्यकता भासू लागते. अशा वेळी ही मुले स्वत: विवाह ठरवतात किंवा पालकांना तसे सांगतात. विवाह झाल्यावर एक गरज भागते पण करिअरची ओढ तशीच राहते. त्यामुलेच मुले हो ऊ देणे ही गोष्ट सुद्धा आता वैयक्तिक निर्णय झाला आहे व सगळीच नवी जोडपी मुले हो ऊ देण्याचा निर्णय पुढे पुढे ढकलताना दिसत आहेत. या लग्न झालेल्या जोडप्यांना आपले रक्ताचे आई-बाप सोडले तर दुसर्‍या कोणत्याच नात्यात रस नसतो व अशी नाती त्यांना अनावश्यक वाटतात.
थोडक्यात म्हणजे येथे चर्चा करणारे अजून कुटुंबाचा संसार त्याला डबल इंजिन का सिंगल इंजिन अशा जुनाट संकल्पनात अडकलेले आहेत. तर नवी पिढी, कुटुंब हे एकक मान्य न करता व्यक्ती हे एकक मान्य करते आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची वैयक्तिक प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतिपेक्षा जास्त महत्वाची होत चालली आहे. जगभरच्या सर्व देशात हेच होते आहे व आपल्या येथेही हेच होणार आहे.

चन्द्रशेखर

खरे आहे

लग्न झालेल्या जोडप्यांना आपले रक्ताचे आई-बाप सोडले तर दुसर्‍या कोणत्याच नात्यात रस नसतो व अशी नाती त्यांना अनावश्यक वाटतात.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजूबाजूला इतर नातेसंबंधांविषयी आश्वासक वातावरण दिसत नाही. किंवा अशा नातेसंबंधांतून केवळ स्वार्थाचे व विश्वासघातकीपणाचेच दर्शन झालेले असते. अडचणीच्या प्रसंगी मला स्वतःला नातेवाईकांपेक्षा मित्रांच्या (केवळ आर्थिकच नव्हे तर इतरही) मदतीचा भरवसा वाटतो. तशी मदत अनेक मित्र वेळोवेळी करतात. वैवाहिक जीवनाबाबतही नवीन पिढीच्या मनात अशीच शंका असते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

परिणाम

आजूबाजूच्या नातेसंबंधांपेक्षा दूरचित्रवाणीवरील नातेसंबंधांचा अधिक परिणाम होत असेल का?

नसेल

दूरचित्रवाणीवरील नातेसंबंध हास्यास्पद आहेत यावर, अगदी कार्यक्रम मन लावून बघणाऱ्या सर्वांचे एकमत असते. दूरचित्रवाणीवरील नातेसंबंधांचा हा परिणाम नाही. मात्र दूरचित्रवाणीवरील नातेसंबंधांकडे अधिक लक्ष दिल्याने किंवा कोणत्या च्यानेलवरील नातेसंबंध बघायचे यावरुन आजूबाजूचे नातेसंबंध बिघडल्याचे पाहिले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

आभाळमाया बघितल्यास मी दूरचित्रवाणीसंच फोडून टाकेन अशी धमकी मी आईला दिली होती.

जडतो तो जीव...लागते ती आस

आभाळमाया क्लासिक वाटेल अशा भन्नाट सीरिअल्स आता चालू आहेत. वेड लागायची वेळ येते एखादाही भाग चुकून नजरेस पडला की.

काय त्या बायका, काय त्यांच्या साड्या, काय ती रडारड, काय ते बोलणं. अरारारा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभाळमाया क्लासिक

आभाळमाया क्लासिक वाटेल अशा भन्नाट सीरिअल्स आता चालू आहेत.

आताच कशाला? तेव्हाही 'चार दिवस सासूचे' वगैरे होतेच की..

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

फार दिवस सासूचे

'चार दिवस सासूचे' सुरु होऊन फार दिवस झाले असले तरी माझ्या माहितीप्रमाणे 'आभाळमाया' त्याही आधी सुरु झाली होती. श्री. रिकामटेकडा यांना कोणते वर्ष अपेक्षित आहे हे नक्की माहीत नसल्याने तेव्हा 'चार दिवस सासूचे' होते की नाही याचा अंदाज बांधणे चुकीचे आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मित्र

अडचणीच्या प्रसंगी मला स्वतःला नातेवाईकांपेक्षा मित्रांच्या (केवळ आर्थिकच नव्हे तर इतरही) मदतीचा भरवसा वाटतो.

अर्थातच! मित्र तुम्ही स्वतः निवडलेले आहेत, नातेवाईक नाहीत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

इंडिविज्युअलिझम

श्री धम्मकलाडू यांनी उपस्थित केलेला चर्चेचा विषय येथे चर्चा करणार्‍यांच्या दृष्टीने जरी जिव्हाळ्याचा असला तरी नव्या पिढीच्या दृष्टीने फारसा महत्वाचा असेल असे मला वाटत नाही.
ही 'डेविल्ज़ एडवोकेट'टाइप चर्चा टाकण्यामागे तुम्ही म्हणता त्या संक्रमण काळाचा अंदाज घेणे हा एक हेतू आहे.

थोडक्यात म्हणजे येथे चर्चा करणारे अजून कुटुंबाचा संसार त्याला डबल इंजिन का सिंगल इंजिन अशा जुनाट संकल्पनात अडकलेले आहेत. तर नवी पिढी, कुटुंब हे एकक मान्य न करता व्यक्ती हे एकक मान्य करते आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची वैयक्तिक प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतिपेक्षा जास्त महत्वाची होत चालली आहे.

खरे आहे. ही चर्चा 'डेविल्ज़ एडवोकेट'छाप चर्चा आहे. युरोपात इंडिविज्युअलिझम जसा वाढला, फोफावला तसा बहुधा भारतातही २१ व्या शतकात वाढतो आहे. त्यामुळे एकंदरच येत्या काळात कुटुंबव्यवस्था बऱ्यापैकी कोलमडणार हे दिसते आहेच. भारतात ग्लोबलायझेशन नुकतेच आलेले असताना किंवा येऊ घातलेले असताना तरुण झालेली, शिक्षित झालेली माझी पिढी जुन्या व नव्याच्या मधली लोंबकळणारी पिढी आहे. नवेही खुणावते, ओढते आहे. पण जुन्याचे बोट सोडवत नाही. असो.

तुमचा प्रतिसाद फार आवडला

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ओढग्रस्तता फक्त त्रिशंकूंच्या मनात

भारतात ग्लोबलायझेशन नुकतेच आलेले असताना किंवा येऊ घातलेले असताना तरुण झालेली, शिक्षित झालेली माझी पिढी जुन्या व नव्याच्या मधली लोंबकळणारी पिढी आहे. नवेही खुणावते, ओढते आहे. पण जुन्याचे बोट सोडवत नाही. असो.

होय. नव्या पिढीतील बहुतेकांचे नातेसंबंधांविषयीचे फंडे क्लीअर आहेत. ज्यांना जुन्याचा सोस सोडवत नाही त्यांचीच अवस्था केविलवाणी होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जुने

मी देखील १९८४ मध्ये म्हणजे ग्लोबलायझेशन येऊ घालायच्याही आधी ग्रॅजुएट झालेल्या पिढीतला आहे. पण मला अशी ओढाताण जाणवत नाही.

कुटुंबव्यवस्था एकाच्याच (बहुतांशी स्रीच्याच) सर्वस्व-त्यागावर आधारलेली नसावी असे वाटत असल्याने असावे. तशी व्यवस्था मोडली तर चांगलेच आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!

पण मला अशी ओढाताण जाणवत नाही.

कारण तुम्ही मनातून असा संक्रमणकाल किंवा बदल अपेक्षित केला असावा किंवा तुम्हाला तो योग्य वाटतो. जुने असणे म्हणजे जुन्याचा सोस असणे नव्हे. अनेक नव्यांच्या मनात जुन्याचा फार सोस असतो. त्यांची अवस्था केविलवाणी होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कुटुंबव्यवस्था

त्यामुळे एकंदरच येत्या काळात कुटुंबव्यवस्था बऱ्यापैकी कोलमडणार हे दिसते आहेच.

कुटुंबव्यवस्थेची चौकट बदलत आहे. कोलमडणार नाही. बायको आणि मुले एवढेच संकुचित कुटुंब आता राहिले आहे. आई वडीलांनी म्हातारपणी आपापली सोय पाहावी. परांजप्यांनी पुण्यात खास एनाराय लोकांच्या माता पित्यांसाठी एक स्किम सुद्धा सुरू केली आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

बायको आणि मुले?

बायको आणि मुले यांना संकुचित कुटुंब मानायचे दिवस गेले वसंतराव. बायको आणि नवरा एवढेच संकुचित कुटुंब आता बऱ्याच ठिकाणी दिसते. काही दिवसांनी एकट्याचेच/एकटीचेच कुटुंब दिसेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आहिरे-नाहीरे

मी नोकरी हा शब्द ५ वेळा वापरला असे आपले म्हणणे आहे, माझे लेखन आपण काळजी पूर्वक वाचले या करता ध्यन्यवाद. जी चर्चा चालू आहे ती कमावत्या बद्दलच आहे. त्यामुळे मी जे सामाजिक परिणाम होत आहे त्या बद्दल लिहिले आहे. आणि नोकरी शिवाय इतर बाबी वर चर्चा म्हणजे व्यवसाय पण नोकरी करण्या इतपत हे सोप्पे नाही. ज्यांच्या जवळ पैसा असूनही ते लोक व्यवसाय न करता नोकरीच पसंद करतात मग ज्यांच्या जवळ कांहीच नाही नोकरीचा विचार केला तर बिघडले कोठे. शब्द मापण्या पेक्षा मी जो सामाजिक प्रश्न आहिरे-नाहीरे चा मांडला तो महत्वाचा आहे त्यावर विचार करावा अशी नम्र विनंती

डबल बॅरल गरजेची

प्रत्येकाने स्वरःपुरता (ज्यात गरज व चैन दोन्ही आहे) पैसा कमवलाच पाहिजे या मताचा मी आहे. त्याने केवळ पैसा मिळतो असे नाहि तर त्याबरोबर येणारा आत्मविश्वास फार मोलाचा ठरतो.

नोकरी न करणार्‍या स्त्रियांमधे जे एक नैसर्गिक परावलंबित्त्व येते ते मला व्यक्तीशः खूप खटकते. माझ्या घरी गेल्या ३ पिढ्या स्त्रिया नोकरी करत आहेत. (त्या आधी करायच्या पण मी त्यांना बघितलेले नाहि) त्यामुळे समाजातील साधारण सारख्या परिस्थितीतील घरात रहाणार्‍या त्यांच्याशी समवयस्क स्त्रिया आणि ह्यांच्यात तुलना केल्यास आत्मविश्वाश, स्वावलंबित्त्व, आर्थिक स्वायत्ततेतून छंद / आवड याची झालेली जोपासना दिसते. (अर्थात हा नियम सिद्ध करण्यापुरते काहि अपवाद आहेत )

नोकरी न करणारे पुरुष मी पाहिले आहेत मात्र त्यातील फारच क्वचित घर सांभाळताना पाहिले आहेत. ते बायकोला मदत करतात पण बायको जे अन्यत्र करते त्याची ते रिप्लेसमेंट नसतात. अर्थात कुटुंबावर डबल बॅरलचा विपरीत परिणाम होताना दिसल्यास जो तो योग्य निर्णय घेतोच असो वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पोस्ट ग्रॅज्युएट नोकराणी?

माझ्या घरी गेल्या ३ पिढ्या स्त्रिया नोकरी करत आहेत.

या वाक्यावर माझा स्वतःचा अनुभव लिहितो.
मी व एक "अ" नावाचा मित्र. दोघेही समवयस्क, प्राथमिक शाळेपासून ते पीजीपर्यंत एकत्र शिकलो, नोकरीही आगेमागे लागली आणि लग्नाच्या बाजारात ज्याला "वेल सेटल्ड्" म्हटले जाते त्या अवस्थेला आलो. गेल्या वर्षी या "अ"चे रितिरिवाजानुसार अन् अगदी थाटामाटात लग्न् झाले व साहजिकच माझे त्याच्या घरी जाणे किंवा त्याचे माझ्याकडे येणे कमी झाले. अर्थातच ही एक नैसर्गिक अवस्था असते त्यामुळे मूळचे घट्ट नाते तुटते असे काही मानायचे कारण नसते. पण आता त्याच्या संसाराला एक वेगळेच डोकेदुखीदायक वळण लागले आहे, ते म्हणजे "नोकरी".

"अ" चे वडील विद्यापीठात चांगल्या अधिकारी पदावर, तर "अ"ची आई शासनाच्या पीडब्ल्यूडी मध्ये परत चांगल्याच हुद्यावर्, शिवाय "अ" हा एकुलता एक मुलगा आणि तोही शिक्षण विभागात् ऑडिट खात्यात. (सहाव्या वेतन आयोगामुळे या कुटुंबाचे एकत्रीत वेतन पाहिल्यास चक्कर येते). तिन्ही महत्वाचे घटक सकाळी ९ ला बाहेर पडतात्, तीन वेगवेगळ्या दिशांना जातात व सायंकाळी ७ च्या आत घरी येत् नाहीत. तर आता इकडे बंगल्यात ही नवी नवरी (जी स्वतः स्टॅटिस्टिक्स् विषयातील् एम्.एस्सी. आहे) सकाळपासून् जवळजवळ रात्रीपर्यंत एकटीच. शिवाय उपनगरात रहात असल्यामुळे शेजारपाजारही फटकूनच राहतो. "बोअरिंग सिम्प्टम्स्" आणि वजन वाढत चालले आहे म्हणून् तिने नवर्‍याकडे ("अ") स्वतःही नोकरी करण्याचा आग्रह धरला आहे. तिच्या या प्रस्तावाला नोकरी करणार्‍या "सासूने" वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत्. कारण्? "मग घर कुणी सांभाळायचे?". सौ.अ आता आम्ही मित्राकडे तक्रार घेवून आली आहे की, "माझ्यासारखी पोस्ट् ग्रॅज्युएट" मुलगी यांना "नोकराणी" म्हणून् हवी होती काय्?

फार् फार प्रॉब्लेम आहेत या "डबल इंजिन" धाग्यात.

आधी झोपली होती का?

"माझ्यासारखी पोस्ट् ग्रॅज्युएट" मुलगी यांना "नोकराणी" म्हणून् हवी होती काय्?

तिने लग्नाच्या प्रस्तावास होकार देताना या पैलूचा विचार केला नाही का? तिच्या स्वतःच्या अपेक्षा समोर मांडल्या नाहीत का?

(ट्राईंग टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पाठीत एक धम्मक लाडू द्या

घरातले सगळेच कमावणारे म्हटल्यावर विरोध तिला अपेक्षितच नसेल. विरोधाचा विचार न केल्याची शिक्षा म्हणून पाठीत एक धम्मक लाडू द्या :)






एक बाजू पाहीली,वाचली..दुसरी बाजू कुठं आहे?

"कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?" हा असा विशय असताना इथं फक्त पुरुषच वचवच (आय मीन टॉक-टॉक) करताहेत. बायामंडळी फक्त चर्चा वाचताहेत का? असे का?
(सद्ध्याच्या) शिक्षणाने बायका फक्त पैसे कमावायला शिकतात. त्यांना स्वतःची मते, स्वतःचा दृष्टीकोन मांडता येत नाही. असे समजावे का?

ऊर्जेची बचत

त्यांना जे म्हणायचं आहे ते पुरुषच मांडत असतील तर त्यांनी त्रास कशाला घ्यावा?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

;-)

त्यांना जे म्हणायचं आहे ते पुरुषच मांडत असतील तर त्यांनी त्रास कशाला घ्यावा?

अगदी! तसेही पुरुषांना बायकांच्या गप्पांत (बायकी गप्पांत नाही हं!) इंटरेष्ट जरा जास्तच असतो हे माहित आहेच. ह. घ्या.

पुरुष?

हा असा विशय असताना इथं फक्त पुरुषच वचवच (आय मीन टॉक-टॉक) करताहेत. बायामंडळी फक्त चर्चा वाचताहेत का? असे का?

इथल्या विशयावर चर्चा करनारे पुरुशच आहेत असे आपल्याला का वाटले? बायका पुरुशांचे आयडी घेऊन चर्चा करत असतील असे आपल्याला वाटत नाही का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काय सांगू ?

>>>>>तिने लग्नाच्या प्रस्तावास होकार देताना या पैलूचा विचार केला नाही का? तिच्या स्वतःच्या अपेक्षा समोर मांडल्या नाहीत का?

हा मुद्दा मला सुचला नव्हता पण तुमचा प्रतिसाद पाहून (म्हणजे वाचल्या क्षणीच) मी "अ" ला सेल लावला व त्याची या बाबतीतील प्रतिक्रिया जाणून घेतली. आता हा वाघ्या म्हणतोय, "होय प्रतीक, लीना तसे म्हणाली होती हे खरे आहे, पण मीच असा विचार केला की, तिघांचे एकत्रीत वेतन इतके येते घरात, तर आणखीन् कुणी नोकरी करायची इच्छा का व कसे करेल? त्यामुळे घरात ती आरामात राहायला लागल्यावर थोड्याच दिवसात तिच्या अंगातील नोकरीचे भूत (हा शब्द् त्याने जोराने उच्चारला, इतका तो वैतागला आहे आजकाल). मी बंगल्याच्या टेरेसवर कॉलनीतील मुलासाठी ट्युशनचे वर्ग चालव अशीही सूचना केली, पण त्याला मातोश्रींचा विरोध ! मागे आईच्या डोक्यात व्ही.आर्.एस्.चा विचार डोकावत होता पण या ६ व्या वेतन आयोगाच्या पगारामुळे तो विचार पार मागे पडला आहे. काय करू, तूच सांग्?"

काय सांगू ?

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

त्या मुलीने जर आधी कल्पना दिली असेल तर मुलाने घरच्यांना समजवायला हवे व नोकरीची परवानगी काढायला हवी. घरात वेतन येते म्हणून नोकरी करु नये हे चुकीचे आहे. प्रत्येकाच्या स्वतःविषयीच्या अपेक्षा असतात. घरात एकटे बसून घर खायला उठते. शिवाय इतके शिकून काय उपयोग असे वाटू शकते. सुरुवातीला पार्टटाईम वगैरे नोकरी करुन घरातली कामे वगैरे उरकतात हे त्या मुलीने सासूबाईंना पटवून दिले तर फुलटाईम नोकरीही करण्यास परवानगी मिळू शकते.

अवांतरः
हलकेच घ्या पण त्या मुलीचा मूळ प्रश्न घरात एकटे बसून बोअर होते एवढाच असेल तर पुढे मुलाबाळांचा काय विचार आहे असे विचारुन एकदाचा निर्णय घेऊन टाकायला सांगा त्याला. :) म्हणजे बोअर होणे हा प्रश्न सुटेल. वजन वाढण्याचा प्रश्न तसाच राहील पण नंतर वजनाकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कुटुंबव्यवस्था

>>>> "कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?"

श्री.सतिश रावले यांच्या या प्रश्नाला नेमके काय उत्तर त्यांना अपेक्षीत आहे हे जरी मला सांगता येत नाही (कारण अद्यापि मी "संसारात" पडलेलो नाही), तरीही "घर सांभाळणे" या संकल्पनेची विस्तृत व्याख्या करणे गरजेचे आहे. माझी थोरली बहिण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे आणि भावोजी जिल्हा बँकेत नोकरी करतात. घर शहरात आणि बहिणीची शाळा तालुक्यातील एका गावात त्यामुळे दररोज एस्.टी.ने ये-जा. इथल्या ज्या सदस्यांना ग्रामीण भागातील एस्.टी.प्रवासाचा अनुभव् आहे त्यांना यातील धावपळीच्या वेदना, दगदग काही प्रमाणात माहिती असतील, शिवाय स्त्री प्रवाशांच्या म्हणून काही खास् टिपिकल समस्या येता जाता असतातच. तर सांगायचा मुद्दा असा की, माझे भावोजी हे साधारणतः सहा वाजता बँकेतून परत येतात तर बहिण सातच्या आत कधीच येऊ शकलेली नाही. तर इथे "पुरुष संस्कृती"चा अहंकार म्हणजे काय याचा अनुभव येतो. सहा वाजता घरी आलेला हा नवरा नावाचा गृहस्थ हक्काची बायको नोकरीवरून परत येईपर्यंत चहादेखील् करून घेत नाही. का तर, सात वाजता बायको आल्यानंतर ती करलेच की ! आणि तसे माझी बहिण करते देखील, मग चहा झाला की हे पतीमहाशय रिमोट कंट्रोल घेऊन इडियट बॉक्स उघडून बसणार आणि ताईसाहेब परत किचन ड्युटीकडे !

कसली आली आहे "घर सांभाळण्याची" जबाबदारी आणि कशी टिकवायाची असली कुटुंब व्यवस्था !

वेतन येते म्हणून

>>>>घरात वेतन येते म्हणून नोकरी करु नये हे चुकीचे आहे.

व्वा >> त्या दोघांच्या वादात तिने नेमक्या याच वाक्याचा उपयोग करून "लॉजिकली" त्याला निरूत्तर केले होते. ती इतकेदेखील म्हणाली की, तिला जे अपेक्षित वेतन मिळणार ते त्याच्या आईवडिलांच्या नावे शहरातील मूकबधीर विद्यालयाला देणगी म्हणून देवून टाकू, पण किमान माझ्या शिक्षणाचा आदर राखून मला केवळ घरातील नटवलेली बाहुली हा रोल देऊ नकोस. (अशा स्वरूपाची चर्चा माझ्यासमोर हॉटेलमध्ये झाली असल्याने तपशीलात फरक नाही.)

मुलाबाळांचा प्रश्न काही तिथे निघाला नाही. कदाचित लग्नाचे पहिलेच वर्ष असल्याने हा मुद्दा तितकासा ऐरणीवरचा त्यांना वाटला नसणार. अर्थात यातून सुवर्णमध्य काय निघायचा तो निघेल पण या क्षणी "पोस्ट्-ग्रॅज्युएट" तरूणीने दिवसभर घरात एकटीच बसावे हेदेखील अतार्किक वाटतेच.

आश्चर्य

पदव्युत्तर शिक्षण घेतलेली मुलगी स्वत:चे निर्णय स्वतः अजूनही घेऊ शकत नाही आणि नोकरी करणार्‍या स्त्रीला तिचा नवरा घरात मोलकरणीसारखा वागवतो आणि ती ते सगळं सहन करते याचा खेद वाटला. एकतर हे सर्व असंच आहे आणि हे योग्यच आहे याची त्यांनी स्वतःला सवय करून घ्यावी हे इष्ट नाहीतर स्वतःचे निर्णय, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातातच असेल यासाठी झगडा करायला तयार व्हावं.

नोकरी करायची का नाही हा प्रश्न आपलं शिक्षण, आवड आणि उपलब्ध संधी यांच्यावर अवलंबून नाही; पण स्वतः सोडून इतर काय म्हणतात यावर अवलंबून आहे याचं प्रचंड आश्चर्य वाटलं.

बाकी नोकरी ही फक्त पैशांसाठीच करायची या गृहीतकाला साफ विरोध.

कधी कधी वाटतं, कणा नसलेल्या माणसांना दु:ख आणि त्रासच मिळणार.

इथेही सापेक्षता!

दु:खाची व्याख्या वेगळी असू शकते. लोकांशी रोखठोक बोलण्यात आणि तंडत बसण्यात त्यांना अधिक दु:ख होते.

दुख तो अपना साथी है

खरे आहे. अनेकांची सहनशक्ती इतकी प्रचंड असते की रोखठोक बोलून कडवटपणा पदरी घेण्यापेक्षा दुःख सहन करणे सोयीस्कर वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मान्य आहे.

कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते; पण सदैव एकाच व्यक्तीला तडजोड करावी लागत असेल, आणि याचाही त्या व्यक्तीला त्रास होत असेल तर मग?

घरी झगडा (भांडण नव्हे) पोस्टग्रॅज्युएट मुलीला नोकरी करायची नसेल तर, किमान आहे हे चांगलं आहे, अशी स्वतःची समजूत घालून घेणं इष्ट नाही का?

युनिट ऑफ मेजरमेंट

श्री. चंद्रशेखर यांनी यापूर्वी दिलेला प्रतिसाद इथे चपखल बसतो. व्यक्ती हे एकक मानायचे की कुटुंब हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटला की तडजोड वगैरे कशी करायची याची उत्तरेही मिळतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

डिझर्व हॅज गॉट नथिंग टू डू विथ इट

कधी कधी वाटतं, कणा नसलेल्या माणसांना दु:ख आणि त्रासच मिळणार.

हे चूक आहे. अनेकदा कणा न दाखवणे सोयीस्कर असते. "महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती"... उलट मोडेन पण वाकणार नाही असा वसा घेतलेले लोक जास्त दुःखग्रस्त असतात असे एक सामान्य निरीक्षण आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इन्व्हॅलिड चर्चा

मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबे

-मध्यमवर्गीय ची व्याख्या काय आहे? डिंक किंवा डिस्क कुटुंबे त्यादृष्टीने मध्यमवर्गीय राहिली आहेत का?

पैसे कमावण्याच्या नादात लोक जगणे विसरून गेले आहेत.

-म्हणजे काय ते कळले नाही. भरपूर पैसा कमावणारे लोक जगत नसतात / आनंदी नसतात / समाधानी नसतात असे काही म्हणायचे आहे का? समाजवाद/साम्यवादाच्या कालातली 'धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती' ही विचारसरणी अभिप्रेत आहे काय?

माणसाने किती जगायला हवे हो? जगायला किती पैसा लागतो हो?

-कायद्याने वयाच्या बत्त्याण्णवाव्या वर्षी मरण्याची सक्ती करता येईल काय? किंवा बत्तेचाळीसवर्षे जगलेच पाहिजे असा कायदा करता येईल काय?
जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्रथिने, व्हिटामिने आणि क्यालरीज यांच्या गोळ्या तयार केल्या तर त्या अत्यंत स्वस्त पडतील. माणसाला वस्त्र आणि निवारा यांची गरज असतेच असे नाही.
हा हिशेब केला तर जगायला दिवसाकाठी प्रत्येकी (आजच्या दराने) वीस रुपये पुरेसे ठरावेत. पाणी अजूनतरी फुकट मिळू शकते.

एकट्याच्या/एकाच्या पगारात मूलभूत गरजा अगदी नीट भागत असताना दोघांनी नोकरी करण्याची गरज काय? असो. मुले आईवडलांपासून दुरावत आहेत. मुलांचे पालन-पोषण ही पूर्णवेळ जबाबदारी नाही काय? आपली कुंटुंबव्यवस्था मोडकळू लागली आहे आणि एवढे मोठे आमूलाग्र बदल आपल्या समाजाने बहुधा अनेक शतकांत बघितले नसावेत.

- मुले ही सेक्स चे अन्वाँटेड, ऍक्सिडेंटल, डिस्कार्डेबल बायप्रॉडक्ट आहेत अशी विचारसरणी रूढ केल्यास हे प्रश्नच उद्भवणार नाहीत. किंबहुना ती तशी होतेच आहे.

तर कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?

-मुळात लग्नच कशाला करायला हवे? फ्रीवर्ल्डमध्ये एका क्षुल्लक घटनेसाठी आयुष्यभराची कमिटमेंट कशाला?

हा सो कॉल्ड 'एंजल्स ऍडव्होकेट' प्रतिसाद.

जाहल्या काही चुका...

१९५० च्या आसपासचा काळ. माझे वडील मॅट्रिक झाले आणि त्यांना लगेच सरकारी नोकरीसाठी बोलावणे आले. त्यांचे लग्न ठरताना आजोबांनी (आईचे वडील) मुलाची सरकारी नोकरी याला सर्वाधिक प्राधान्य दिले आणि आपली उच्चशिक्षित मुलगी सालंकृत आणि अगदी हुंड्यासह दिली. लग्नानंतर काही महिन्यांनी आईलाही शिक्षिकेच्या नोकरीसाठी बोलावणे आले. तो काळ घरातल्या वडीलधार्‍यांना विचारून निर्णय घेण्याचा होता. पण या मुद्यावर माझ्या आजीने हटवादी भूमिका घेतली. 'शिकलेल्या मुली नाकाने कांदे सोलतात. त्यातून ही नोकरी करणार म्हणजे घरी भाकर्‍या कोण बडवणार? आम्ही आयुष्यभर राबलो आणि आता सून सेवा करेल अशी अपेक्षा बाळगली तर तुमची ही नाटके. एवढीच बायकोला नोकरीला लावायची असेल तर घर सोडा. माझा एक मुलगा नव्हताच असे समजेन.' हा असा धिंगाणा बघून वडील आणि आई गप बसले आणि त्यांनी आपणहून हा विषय मनातून काढून टाकला. पण ही संधी सोडल्याचे चटके नंतर दोघांनाही बसले. आजीने मरेपर्यंत आपल्या देहाचे चोचले पुरवून घेतले. कुटुंब वाढल्यावर आमचे आई-वडील आम्हा भावंडांच्या संगोपनासाठी खपत राहिले. वडिलांच्या एकट्याच्या आणि अपुर्‍या पगारात आईने काटकसरीने संसार केला खरा पण त्या बाईच्या अंगावर आयुष्यात सोन्याचा एक दागिना काही चढला नाही आणि सुती लुगड्याखेरीज तिला काही लाभले नाही. त्यांचे स्वतःचे घर होऊ शकले नाही. प्रवास घडले नाहीत. आईला माहेरहून मिळालेला हुंडा आणि दागिने वडिलांकडील लोकांनी कर्जफेडीसाठी फुंकून टाकले. दोन शर्ट -पँटा आणि एक सायकल ही वडिलांची मालमत्ता. पण ही गरीबी असूनही वडिलांनी कष्टाच्या उत्पन्नाखेरीज अन्य मार्ग पत्करले नाहीत, आईला कुणाकडे उसने मागावे लागले नाही आणि आम्हा मुलांनाही कुणापुढे लाचार व्हावे लागले नाही, ही नशिबाची बाजू असली तरी खूपशी सुखे आमच्यापासून कायम वंचितच राहिली. म्हणून आजही वाटत राहाते की 'आईलाही नोकरी असती तर?' असो.

(ही वैयक्तिक आठवण अनेकांना येथे रुचणारही नाही. त्यांनी ती ओलांडून पुढे जावे, ही विनंती)

हळवी आठवण

ही वैयक्तिक आठवण असली तरी अतिशय हळवी आणि सर्वसमावेशक असल्याने ती ओलांडून जाण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या अनुभवाचा काळ आणि त्याचा आवाका यावर त्या काळातील कितीतरी ज्येष्ठ् लेखकांनी साहित्यात स्त्रीचे विषण्ण चित्र रेखाटले आहे. त्या काळातील "सासू" च्या धाकाने आपल्या मातोश्रींची शैक्षणीक गुणवत्ता कशी वाया गेली याचे विदारक चित्र तुम्ही उभे केले आहे. १९५० च्या काळात नोकरीसाठी आवश्यक शिक्षण (जे सर्वांच्याच नशिबी नव्हते) घेणे आणि तरीही "घरी भाकर्‍या बडविणे" हे नशिबी आलेल्या त्या माऊलीचा काळ नजरेसमोर आला आणि आजची स्त्री स्वयंनिर्णयाच्याबाबतीत किती नशीबवान आहेत हे उमजून आले (किमानपक्षी मुंबई-पुण्यातील स्त्री).

आठवण

अशाच आठवणी अनेक मध्यमवर्गीयांच्या आहेत. सुदैवाने माझ्या आजीने माझ्या आईला नोकरी करु दिली व त्यामुळे आम्हा भावंडांच्या शिक्षणाचा खर्च पालकांना स्वतःचा आब राखून करता आला.

(आम्हीही तुलनेने हुशार असल्याने घरच्यांवर शिक्षणाचा जास्त खर्च पडणार नाही याची काळजी घेत राहिलो ;) )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चर्चा मूळ पदावर

मला वाटते गरीबी किंवा परिस्थितीनुसार नोकरी करणे अपरिहार्य असल्यास नोकरी करण्यास श्री. धम्मकलाडू यांचा आक्षेप नसावा. त्यांचा प्रयत्न चंगळवादाच्या मागे लागलेल्या पिढीमुळे कुटुंबसंस्थेची वाताहत होत आहे या सामाजिक घटनेकडे लक्ष वेधण्याचा असावा.

यात चंगळवाद म्हणजे काय हा वादाचा मुद्दा आहे.

(श्री. थत्ते व श्री. धम्मकलाडू यांच्या खरडवह्या पाहून मला असे वाटते.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझे मत

धम्मकलाडू त्यांच्या चर्चाप्रस्तावात जर मूलभूत गरजा भागत असतील तर दोघांनी नोकरी करायची गरज काय असा प्रश्न विचारतात. आजकालच्या समाजातली बहुतेक माणसे मूलभूत गरजांच्या केव्हाच पलिकडे गेली आहेत असे वाटते. मूलभूत गरजांच्या पलीकडे सर्व गोष्टी चंगळीच्या असेही राहिलेले नाही. त्यामुळे अलबतच प्रत्येकाच्या/प्रत्येक कुटुंबाच्या गरजांच्या व्याख्या निरनिराळ्या असतात. त्यातूनच दोघांनी नोकरी करायची आवश्यकता निर्माण होते.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर नवरा-बायकोपैकी दोघांनी नोकरी करायची का एकाने, दोघांना करायची इच्छा/गरज असेल तर दुसर्‍याने पूर्णवेळ करायची का अर्धवेळ हे आणि असे मुद्दे हे फक्त त्या दोघांनीच ठरवायचे आहेत. त्यावर घरातल्या बाकी कुणाचे (पक्षी दोन्हीकडचे सासू-सासरे आणि बाकीची ज्येष्ठ मंडळी) नियंत्रण असता कामा नये. माझ्या घरात असे समरप्रसंग घडलेले आहेत. माझा अनुभव असा आहे की ज्येष्ठ मंडळी कुरकुर (क्वचित आरडाओरडा) करतात पण नंतर समजून घेतात.

मुलांचे पालन-पोषण ही अत्यधिक महत्त्वाची जबाबदारी असली तरी ते (मटेरियली) चांगले होण्याच्या दृष्टीने कदाचित दोघांना नोकरी करायची आवश्यकता पडतही असेल. आणि आई नोकरी करत असल्यामुळे मुलांचे चांगले पालन-पोषण झाले नाही अशी फारशी उदाहरणे नसावीत. सर्वच पालकांना आपल्या मुलांचे सर्व दृष्टीने भले व्हावे अशी आंतरीक प्रेरणा असते, किंबहुना त्यासाठीच सगळा खटाटोप चालू असतो.

कुटुंबव्यवस्था (आणि एकंदरच समाजव्यवस्था) कायमच बदलती आहे. या बदलाचा वेग सध्या जास्त असेल. पण तो मान्य करण्यावाचून पर्याय नाही. प्रत्येक काळातल्या समाजमनाचा कुटुंबव्यवस्था हा आरसा असतो. माझे आई-वडील माझ्या जवळ राहतात (खरे सांगायचे तर मी त्यांच्याकडे राहतो - कारण आमचे राहते घर माझ्या वडिलांनी बांधलेले आहे) म्हणजे माझी मुले माझ्या राहतील अशी सध्याच्या परिस्थितीत अपेक्षा करणे सर्वथा चुक आहे.

बाकी चंद्रशेखर यांच्याशी सहमत.

कळीचा मुद्दा

>>> पदव्युत्तर शिक्षण घेतलेली मुलगी स्वत:चे निर्णय स्वतः अजूनही घेऊ शकत नाही आणि नोकरी करणार्‍या स्त्रीला तिचा नवरा घरात मोलकरणीसारखा वागवतो आणि ती ते सगळं सहन करते याचा खेद वाटला. <<<

सन्माननीय सदस्य अदिती यांच्या या विधानाला विरोध करण्यासारखे काही नाहीच, इतके ते रोखठोक आहे. फक्त "निर्णयक्षमता" या मुद्द्यावर थोडे लिहितो. एकतर ही मुलगी आमच्या "मराठा" समाजातील आणि त्यातही कोल्हापुर-सांगली-सातारा हे जिल्ह्ये जरी साखर कारखान्यांच्या नेत्रदीपक प्रगतीमुळे सुबत्तेने/आर्थिक उन्नतीने वाढले असले तरी "स्त्री" चे स्थान अजुनही इतके मोकळे नाही की पुण्या-मुंबईच्या तिच्या "काऊंटरपार्ट" प्रमाणे विद्युल्लता होवून ती आपल्या शिक्षणाच्या आधारे तेजस्वीपणे माहेर वा सासरकडील ज्येष्ठांना विरोध करेल. साधारणतः दहावी-बारावी पास/नापास झालेल्या मुलीचे जे स्थान तेच पदवीधर/पदव्युत्तर मुलीचे. १० पैकी ८ मराठयांच्या मुली (इकडील ग्रामीण भागातील) निव्वळ "लग्न" होईतोपर्यंत शिकायचे या मनोवृत्तीच्या असतात (किंबहुना त्यांच्या पालकांची स्थितीदेखील काही वेगळी नसते, शिवाय पैसाही बर्‍यापैकी असल्यामुळे "पोरगी शिकतो म्हणतीया तर शिकू दे, लग्नहोईस्तोवर" असे हरेक घरात संवाद् असतात.

नाऊ अबाऊट द गर्ल इन डिस्क्शन :: "लीना" माझ्या मित्राची नवपरिणीत पत्नी. ही जरी "स्टॅट्स" मधील् पीजी असली तरी तिचे ते काय 'ध्येय"च असेल असे नाही. वर लिहिल्यानुसार पदवीनंतर घरी बसण्यापेक्षा चला पीजीच्या टर्म्स भरू या. या भागातील कित्येक तरूणी जर पीजीच्या पहिल्या वर्षीच "एंगेज्ड्" झाल्या तर् त्यांच्या दृष्टीने आता त्या पदव्युत्तरची किंमत तितकीशी राहत नाही. एका मोठ्या साखर कारखान्याच्या आणि तालुका पातळीवर् वसलेले "लीना" चे माहेर आजा-आजी, काका-मामा, आई-वडिल, भावंडांनी सदैव गजबजलेले आहे (मी स्वतः पाहिले आहे), त्यामुळे या मुलांच्या अभ्यासात तसेच दंग्याधोप्यात तिचा लग्नापूर्वीचा काळ चुटकीसरशी उलटून जात असणार, पण आता सासरी ती अवस्था बिलकुल नाही. सासू-सासरे आणि हा नवरा "अ". बस्स! तीन डोकी, अन् तीदेखील सकाळी ९ ला बाहेर पडली की सायंकाळी ७.३० वाजता घरी परत.

निर्णयाची क्षमता असो वा नसो..... "तुफान रिकामा वेळ" हा खरा कळीचा मुद्दा झाला आहे या झमेल्यात.

 
^ वर