मराठी सुभाषिते
शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा. एका ओळीत एकादे तत्व किंवा सत्य मांडलेले आणि दुसर्या ओळीत त्याचे उदाहरण अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. कांही सुभाषितांचे चार चरणही असतात. या सुभाषितांमध्ये सोप्या भाषेत आणि चपखल उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन पण मनोरंजक पध्दतीने केलेले असल्यामुळे ती लक्षातही राहतात. सुभाषित म्हंटले की ते संस्कृतमध्येच असले पाहिजे असा अलिखित नियम आहे.
माझ्या आईला मराठी ही एकमेव भाषा येत होती, त्या काळातील नियमांप्रमाणे संस्कृत शिकणे तिला शक्य झाले नाही. पण मराठी भाषेतील असंख्य सुवचने तिच्या जिभेवर होती आणि ती त्यांचा सुयोग्य उपयोग बोलण्यामध्ये करत असे. त्यातली कांही वचने ही सुभाषितांसारखीच होती. त्यांतली थोडी पुढे अंशतःच वाचनात आली. ती जशी आठवतात तशी खाली दिली आहेत. "सुश्लोक वामनाचा ..." या उक्तीनुसार हे श्लोक बहुधा त्यांनीच लिहिले असावेत आणि कदाचित ते संस्कृत सुभाषितांचे अनुवाद असावेत.
बालपणी बाळांची कोमलतरुतुल्य बुध्दी वाकेल । घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तीही फाकेल ।।
केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार । शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे । ............. परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ।।
...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो।।
( वाचकांना पूर्ण श्लोक माहीत असल्यास कृपया ते द्यावेत. तसेच अशा प्रकारचे इतर श्लोकसुध्दा दिले तर त्यांचा एक लहानसा संग्रह होईल.)
रामदासस्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही जवळ जवळ सुभाषितेच आहेत. त्यातला भक्तीमार्गाचा उपदेश कदाचित सर्वांना भावणार नाही, पण त्याशिवाय रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा खूप सूचना या मनाच्या श्लोकांमध्ये दिल्या आहेत. मात्र त्या सोदाहरण नसल्यामुळे नुसताच कोरडा उपदेश वाटतात. उदाहरणार्थ ...
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥
संत नामदेव, तुकाराम, चोखा मेळा आदींचे अनेक अभंग ही सुभाषितेच आहेत. उदाहरणादाखल हे अभंग पहा.
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा ।।
ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार ।।
महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती ।।
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया सोंगा ।।
व्यंकटेशस्तोत्रामधील कांही ओव्या सुभाषितासारख्या वाटतात.
समर्थागृहीचे श्वान, त्यास सर्वही देती मान।
बहिणाबाईंच्या ओव्या तर नक्कीच सुभाषितांसारख्या आहेत. (मूळ अहिराणी बोलीभाषेतल्या ओव्या जराशा शुध्द मराठी भाषेत दिल्या आहेत.)
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर ।
आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर ।।
मन वढाय वढाय, जसं पिकामध्ये ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर ।।
अशी अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडल्या कवींच्या कांही रचनासुध्दा सुभाषितांसारख्या वाटतात.
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे।।
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ ।।
वियोगार्थ मीलन होते, नियम या जगाचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस घेणार्याचे हात घ्यावे ।।
संस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिध्द साहित्याचा भाग आहेत तर कांही सुटे सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण होते हे आज आपल्याला, निदान मला तरी ठाऊक नाही. मला असे वाटते की मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर आणि प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातल्या पंडितांनी त्या श्लोकांची संकलने केली असावीत. मराठी भाषेतील सुभाषितांचे असे एकत्र संकलन कदाचित झाले नसावे किंवा कोणी केले असले तरी त्याला प्रसिध्दी मिळाली नसावी. असे संकलन करण्याच्या एका अत्यंत अल्पशा प्रयत्नाची सुरुवात या धाग्यातून करीत आहे. वाचकांनी कृपया यात भर घालावी, तसेच कांही संग्रह जालावर उपलब्ध असल्यास त्यांचे दुवे द्यावेत अशी विनंती आहे.
Comments
आठवणीतून ..
...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो।।
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
...... ....... .......... कठिण समय येता कोण कामास येतो।।
( हा श्लोकही वामन पंडिताचाच असावा असा अंदाज. नळ-दमयंती आख्यानातून ? चूभूदेघे)
इतर काही
अन्योक्ती या शब्दातच "उक्ती" शब्द आहे - अन्यावर केलेले परंतु "लेकी बोले सुने लागे" असे भाष्य.
फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.
प्रयत्ने वाळूचे
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,
सशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पाठभेद?
माझ्याकडे असलेल्या 'मराठीची बोलु कौतुके' ह्या संग्रहात वरील चार ओळी अशा आहेत:
प्रयत्नें वाळूचे कण रगडितां तेलहि गळे
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीहि विघडे
सशाचेही लाधे विपिनिं फिरता शृंगही जरी
परंतू क्षुद्राचें हृदय धरवेना क्षणभरी
यमक्या वामन असा दोष ठेवेल?
पिऊनीहि, लाधे आणि परंतू हे शब्द योग्य वाटतात. पण विघडे? हा शब्द अर्थयोग्य असला तरी त्याचे गळेशी यमक जुळत नाही. आणि वामनपंडित हे तर यमकाकरिता प्रसिद्ध! ते असा दोष ठेवतील? शिवाय, मूळ नीतिशतकात प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् अशी ओळ आहे. त्यामुळे. 'परंतू मूर्खाचे' हे कदाचित बरोबर असावे.
--वाचक्नवी
आठवण
मूर्खाचे हाच शब्द मी पाठ केला होता आणि शेवटच्या चरणाचा उपयोग अनेक वेळा संभाषणात केला होता. "एकाद्याच्या नादी कशाला लागायचे? त्याचं म्हणणं ऐकायचं आणि सोडून द्यायचं." अशा अर्थी.
सुसंगति सदा घडो
सुसंगति सदा घडो
सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो
विषय सर्वथा नावडो
वरील चार ओळी आणि नंदन ह्यांनी सांगितलेल्या चार ओळी आमच्या प्राथमिक शाळेच्या प्रार्थनेत होत्या. 'विषय सर्वथा नावडो' ही ओळ का, असा प्रश्न तेव्हा पडायचा.
नलोपाख्यान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत यांनी "तदितर खग भेणे...." हा श्लोक अगदी व्याकरणशुद्ध आणि निर्दोष लिहिला आहे.
मात्र रचना वामन पंडिताची नव्हे. हा श्लोक रघुनाथ पंडित यांच्या नलोपाख्यान (अथवा नलदमयंती) या काव्यातील आहे.यातील खग म्हणजे कलहंस.
धन्यवाद
श्री. मुक्तसुनीत यांनी "तदितर खग भेणे...." हा श्लोक अगदी व्याकरणशुद्ध आणि निर्दोष लिहिला आहे.
धन्यवाद. मात्र गमतीची गोष्ट अशी की , या श्लोकात जुन्या व्याकरणाचे नियम पाळायला हवे होते. उदाहरणार्थ , "जे करायां मिळालें ".
अन्वय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"मात्र गमतीची गोष्ट अशी की , या श्लोकात जुन्या व्याकरणाचे नियम पाळायला हवे होते. उदाहरणार्थ , "जे करायां मिळालें ". ....
कां बरें? या दोन शब्दांवर अनुस्वार संभवत नाहीत.
...
पहिल्या दोन पंक्तींचा अन्वय असा:
"जे (खग) उपवनजलकेली कराया (एकत्र)मिळाले, ( ते) इतर खग तदा भेणे वेगळाले पळाळे." यात "या" आणि"ले" वर अनुस्वर नकोच. भेणे (भीतीने) मधील णे वर अनुस्वार असू शकेल.
तिसर्या ओळीतील त्याचपाशी हा शब्द " त्याजपाशीं " असा असणे योग्य वाटते.
विद्यासमन्वितही दुष्ट ..........
विद्यासमन्वितही दुष्ट परित्यजावा|
त्यासी बुधे न सहवास कधी करावा||
ज्याच्या असे विमलही मणी उत्तमांगी |
तो सर्प काय न डसे खल अंतरंगी ||
अजून एक
व्याकरणशुद्ध सुभाषित आहे की नाहि माहित नाहि मात्र आवडते खरे..
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला,
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे
भ्रांत तुम्हा का पडे?
याशिवाय अनंत फंदींचे काहि फटके (काहि कालबाह्य असले तरी बाकीचे) सुभाषितात गणता यावेत
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
शतकत्रयी व नवनीत
मराठीतील बहुतांश सुभाषिते, अगदी प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे...सह भर्तृहरीच्या शतकत्रयीतून (नीतीशतक, शृंगारशतक व वैराग्यशतक) आलेली आहेत. त्याशिवाय बहुतेक संत व पंतकवींचे काव्यही सुभाषितांत मोडता येईल. त्यातीलच काहींनी म्हणीचे स्वरूपही घेतले. उदा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे.... किंवा दिसामाजि काही तरी लिहावे।प्रसंगी अखंडीत वाचित जावे।।गुणश्रेष्ठ उपास्य त्याचे करावे।बरे बोलणे सत्य जीवीं धरावे।।
1952-54 साली पवनार आश्रमाने मराठीतील निवडक कवींच्या वेच्यांचा नवनीत नावाचा संग्रह काढला होता. आता खूप वर्षे झाल्याने त्या पुस्तकाचा प्रकाशन काल आठवत नाही.* मात्र 'नवनीत'ची ती दुसरी आवृत्ती होती. अशाच प्रकारचा एक संग्रह 19व्या शतकाच्या शेवटी निघाला होता. (1890?) त्यातील बहुतांश वेचे संत कवींच्या रचनांतील होते. दुसऱ्या 'नवनीत'मध्ये अगदी शेवटचे कवी हे केशवकुमार किंवा परशुरामपंत तात्या गोडबोले अशा कवींचे होते. त्या संग्रहातील काही वेचे तेव्हा उतरून घेतले होते. ते असेः
सत्पात्राचा त्रास मनी। उपजे प्रभूचे मनातूनी।।
ज्या पुरुषास न पुसे कोणी। आधी त्यास भजावे।।
होता जोवरि अंबरी तपत चंडांशु तेजे निशे।
झाला निष्प्रभ तारकाधिपतिही, बोला कशाला दुजे।।
राहुच्या वदनी अजी गवसता तो भानु दैवे पहा।
कैसे क्षुद्रही काजवे चमकती त्याच्यापुढे हे पहा।।
आघंतीचे क्षण सोडुनिया अशेष जीवनि या देख।
परिस्थितीचा रंग काढिंता क्षणयुग्मचि उरते एक।।
उसीरा न चालिजे मार्गु।उणीयासी न कीजे सांगु।।
उपशांति न कीजे रागु। स्त्री बाळकाचा।।
वक्ता अतिपाडें अनुवादे।आणि श्रोतयाच्या मनी व्यग्रता नांदे।।
तरी कवित्व रसराज मंदे। जैसा जळेविण अंकुरू।।
जळ तुंबता तडागी फोडावा लागतो जसा पाट।
शोकक्षोभी रोदन हृदयस्थैर्या नसे दुजी वाट।।
साध्याही विषयांत आशय कधी मोठा आढळे।
नित्याच्या अवलोकनें जन परि होती पहा आंधळे।।
* या संग्रहातील वेचे वाचल्यानंतर, सुमारे दीड दोन शतके महाराष्ट्रातील कवी मराठीची थोरवी गाऊन लोकांमध्ये स्वभाषेबद्दल अभिमान निर्मात करत होते, एवढं लक्षात येतं. त्यामुळे तो संग्रह विशेषत्वाने लक्षात राहिला.
परशुराम बल्लाळ गोडबोले
परशुराम(तात्या) बल्लाळ गोडबोले(जन्म १७७९, मृत्यू ३-९-१८७४) यांनी ’महाराष्ट्र भाषेतील कवितांचे वेचे’ नवनीत या नावाने संकलित करून १८५४ मध्ये प्रथम प्रकाशित केले. त्याची १८ वी आणि बहुधा शेवटची आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली होती.
’नवनीत भाग २ रा’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला होता, पण तो पहाण्यात आला नाही. आता मिळतो की नाही ते माहीत नाही. डीडींकडे असल्यास त्यांतील दुर्मीळ कविता त्यांनी उपक्रमावर द्याव्यात.
डीडींचे शेवटचे वाक्य--थोडी सुधारणा करून :
सुमारे दीड दोन शतके महाराष्ट्रातील कवी मराठीची थोरवी गाऊन लोकांमध्ये स्वभाषेबद्दल अभिमान निर्माण करत होते, एवढे या संग्रहातील वेचे वाचल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे तो संग्रह विशेषत्वाने लक्षात राहिला.
»
--वाचक्नवी
सार्थ सुभाषिते
मराठी अर्थासह असलेली सुभाषिते ही इथे उपलब्ध आहेत.
प्रकाश घाटपांडे
उपलब्ध् नाही
'नवनीत'ची (१९५७) एकच प्रत मी १३-१४ वर्षांपूर्वी पाहिली होती. मात्र त्याचे संपादन परशुरमपंत तात्या गोडबोले यांनी केले नव्हते, एवढे निश्चित. वर सांगितल्याप्रमाणे त्यावेळी आवडतील (व समजतील) तेवढे वेचे मी उतरून घेतले होते. असे काही वेचे आहेत माझ्या संग्रही.
सर्वांचे आभार
माझ्या या धाग्यात महत्वपूर्ण माहिती पुरवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार