पद्मविभूषण!

पद्मविभूषण!

भारताच्या पंतप्रधानांना स्वत:च्या तत्वनिष्ठतेबद्दल अभिमान होता. स्वत: राजकारणात असूनही इतर मुरब्बी नेत्याप्रमाणे ते भ्रष्ठ नव्हते. उलट त्यांनी पक्षांतर्गत विरोध असूनही भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार मोहिम उघडण्याचे धाडस केले. माहिती अधिकार हक्क हे त्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल होते. त्यांच्या पक्षाच्या जाहिरनाम्यात त्यांनी स्वच्छ प्रशासनाची हमी दिली होती. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना व त्यांच्या पक्षाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. ते व त्यांचे निवडक सहकारी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रयत्नशील होते. प्रशासनाला त्याची फिकिर नव्हती. निगरगट्ट प्रशासन लालफितीचा विळखा आणखी घट्ट करू लागला. विकासाची गती मंद होऊ लागली. तरीसुद्धा न डगमडता पंतप्रधानानी भ्रष्टाचार विरोधाची धार आणखी तीक्ष्ण केली.
परंतु पंतप्रधान आज थोडेसे अस्वस्थ होते. काल रात्रीपासूनच ते विचारमग्न झाले होते. एका उच्चपदस्थ परदेशी पाहुण्याच्या सन्मानार्थ योजलेल्या कालच्या पार्टीच्या वेळी काहीतरी बिनसले होते. कदाचित तेथे भेटलेल्या एका उद्योगपतीमुळे ते विचारात पडले असावेत. पार्टीच्या वेळी तो उद्योगपती पंतप्रधानांना एकटे गाठून हळूच कानात सांगू लागला: सर, मी जरी मोठा श्रीमंत उद्योगपती असलो तरी मला समाजात मान्यता नाही. मी ज्या प्रकारे माझा कारभार व उद्योग व्यवहार चालवत आहे त्या प्रकाराला तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं नाकं मुरडतात. मला त्याची फिकिर नाही. जगभर पसरलेले माझे सर्व उद्योग-व्यवहार मी त्या त्या देशाच्या कायद्याच्या कक्षेत राहूनच करत असतो. काही वेळा मी कायदा वाकवतो पण मोडत नाही. तरीसुद्धा मला मान-सन्मान नाहीत. माझ्यासमोर असताना हसून गोड गोड बोलणारे (व माझ्या पैशावर जगणारे) माझी पाठ फिरली की अस्सल शिव्या देत असतात. मला त्याची पर्वा नाही. तुमच्या या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या फ्याडमुळे यानंतर मला सन्मान विकतही घेता येत नाही. त्यामुळे मला फक्त एका गोष्टीचे नेहमीच दु:ख वाटते की माझ्या मायदेशी मला कुठलेही सन्मान मिळणार नाहीत. परंतु या देशासाठी मला काही तरी करण्याची तीव्र इच्छा आहे. तुमच्या देशातील प्रत्येक गावात पिण्याचे स्वच्छ पाणी-पुरवठ्याच्या योजनेसाठी जो काही खर्च येईल ते सर्व मी द्यायला तयार आहे. हा खर्च सुमारे दहा - वीस हजार कोटीच्या आसपास असेल. फक्त यासाठी माझी एकच अट आहे. तुम्ही तुमच्या देशातील अत्युच्च सन्माननीय असलेली पद्मविभूषण ही पदवी मला द्यावी. ते कसे द्यायचे, कधी द्यायचे हे मी तुमच्यावर सोपवतो. पदवीचे आश्वासन मिळाल्यानंतर योजनेसाठी लागणाऱ्या खर्चाचा चेक मी पाठवतो. जर हे तुम्हाला शक्य न झाल्यास युरोपच्या एका बेटावर हे सर्व पैसे खर्च करून एक बहुमजली आलिशान इमारत बांधून माझ्या पत्नीला भेट देईन व उरलेले आयुष्य ऐषारामात घालवीन. पंतप्रधानांच्या पाठीवर हात टेकवत तुम्ही माझ्या या सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल याची मला खात्री आहे. काही घाई नाही. असे म्हणत उद्योगपती गर्दीत मिसळून गेला.
पंतप्रधानांच्या मते हा माणूस उघड उघड सौदा करत आहे. पद्मविभूषण या सन्मानासाठी लाच देत आहे. हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. ... परंतु लाखो करोडो गरीबांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या पैशातून होत असल्यास हे सन्माननीय पद विकण्यास काय हरकत असावी? असाही एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला.
................ ..................... ...................

ज्यांना नीतीची चाड आहे, ज्यांच्या नीतीच्या कल्पना सुस्पष्ट आहेत व जे वस्तुनिष्ठपणे विचार करतात त्यांच्यासमोर अशा प्रसंगी दोन पर्याय असतात. एका पर्यायात उपयुक्ततेला झुकते माप देणे. पंतप्रधानांनी देशासाठी उद्योगपतीचे पैसे (लाच!) स्वीकारल्यास लाखे करोडो गरीबांचे कल्याण होईल. तहानलेल्यांना पाणी मिळेल. अनारोग्याचे प्रश्न सुटतील. बायका-मुलींचे पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण फिरणे थांबू शकेल. मात्र यासाठी थोडी तडजोड करावी लागेल. तत्वाला थोडीशी मुरड घालून एका भ्रष्ट माणसाला सर्वोच्च सन्मान द्यावे लागेल. देशभरातील उच्चभ्रू प्रामाणिक बुद्धीवंतांना कदाचित ते सहन होणार नाही. परंतु करोडो गोर-गरीबांचा विचार करताना या मूठभर उच्चभ्रूंच्या टीकेला जास्त महत्व देणे गैर ठरेल. .
दुसर्‍या पर्यायात तत्वनिष्ठेचा प्रश्न उपस्थित करता येईल. तत्वनिष्ठेला चिकटून बसल्यास पंतप्रधानांनी या भ्रष्ट माणसाच्या प्रस्तावाला धुडकावून लावणे श्रेयस्कर ठरेल. भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासनाची हमी देणार्‍यानी भ्रष्टाचाराला उत्तेजन देणार्‍या अशा सूचनांचा विचारही करू नये. राष्ट्र सन्मान ही काही विकाऊ वस्तु नव्हे. शिवाय लोकशाही व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेसाठी काही नीती-नियम आहेत, काही कार्यप्रक्रिया, निकष ठरवल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करण्यातच समाजहित आहे. केवळ पंतप्रधानांच्या मनमानीने, इच्छेखातिर वा सांगण्यावरून निर्णय घेत असल्यास या लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही.
पंतप्रधानांची अवस्था इकडे आड व तिकडे विहिर अशी झाली आहे. इतर भ्रष्ट राजकारण्याप्रमाणे आपणसुद्धा एक भ्रष्ट राजकारणी हा शिक्का त्यांना नको आहे. स्वत:चे हात भ्रष्ट पैशात बरबटलेले नको आहे. परंतु स्वत:च्या हट्टापायी, तत्वनिष्ठेपायी लाखो लोकांना पाण्यावाचून तडफडायला लावणे कितपत सयुक्तिक ठरेल? राष्ट्राच्या हितासाठी पंतप्रधान तत्वच्युत होत असल्यास बिघडते कोठे? खरे पाहता या परिस्थितीत लाच स्वीकारण्यापेक्षा स्वत:चा विचार करणे हेच मुळी जास्त अनैतिक ठरेल. पंतप्रधानांच्या तत्वनिष्ठेसाठी, त्यांचे शुद्ध चारित्र्य जपण्यासाठी लाखो गरीबांना पाण्यावाचून जगायला भाग पाडणे, पाण्यासाठी भर उन्हाळ्यात वणवण फिरायला लावणे कधीच योग्य होणार नाही.
पंतप्रधानांना या सर्व उलटसुलट मतप्रवाहांची संपूर्ण कल्पना नक्कीच असणार. म्हणूनच यासंबंधात निर्णय घेण्यास त्यांना वेळ लागत आहे. प्रश्न फक्त या भ्रष्ट उद्योगपतीचाच नाही. एकदा तत्वच्युत झाल्यास आणखी किती प्रकारच्या ( व किती वेळा!) मोहात आपण अडकले जाऊ याची भीती कायम सलत राहील. हाच पायंडा पडत गेल्यास आपण आपल्या राष्ट्रबांधवांची घोर फसवणूक केल्यासारखे होईल. शस्त्रात्रांच्या ठेकेदारांच्या कमीशनसाठी जनतेला नको असलेले युद्ध त्यांच्यावर लादले जाईल. दहशतवाद्यांच्याकडील पैशासाठी ठिकठिकाणी स्फोट घडवून निरपराध्यांचा बळी घेतला जाईल. मिनटा-मिनटाला तडजोड करावी लागेल. प्रशासन यंत्रणा भ्रष्ट होईल.
साध्य विरुद्ध साधन हा प्राचीन लढा आहे.
परंतु एखादे चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा वापर करणे क्षम्य ठरेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

कसे?

जगभर पसरलेले माझे सर्व उद्योग-व्यवहार मी त्या त्या देशाच्या कायद्याच्या कक्षेत राहूनच करत असतो. काही वेळा मी कायदा वाकवतो पण मोडत नाही.

मूळ ऑफरमध्ये सौदा चांगला आहे.

हाच पायंडा पडत गेल्यास आपण आपल्या राष्ट्रबांधवांची घोर फसवणूक केल्यासारखे होईल. शस्त्रात्रांच्या ठेकेदारांच्या कमीशनसाठी जनतेला नको असलेले युद्ध त्यांच्यावर लादले जाईल. दहशतवाद्यांच्याकडील पैशासाठी ठिकठिकाणी स्फोट घडवून निरपराध्यांचा बळी घेतला जाईल. मिनटा-मिनटाला तडजोड करावी लागेल. प्रशासन यंत्रणा भ्रष्ट होईल.

मूळ ऑफर आणि नवा पायंडा यांचा संबंध काय?

तत्वक्रिडा

हे तत्वक्रिडा या सदरात बसते. पंतप्रधानांनी ही ऑफर स्वीकारु नये. आपले लेख हे द्विमिती शिवाय अन्य पर्याय उपलब्ध करुन देतच नाही. अन्यथा वेगळ्या पुरस्काराची निर्मीती करुन ही ऑफर स्वीकारता आली असती. व्यावहारिक जग काही द्विमितीत चालत नाही.
प्रकाश घाटपांडे

नको

असे पद्मभूषण मिळाल्यावरही त्या उद्योगपतीच्या पाठीवर लोक पद्मभूषण विकत घेतले म्हणणारच आहेत.

पंतप्रधानांनी ही ऑफर स्वीकारू नये या प्रकाश घाटपांडे यांच्या मताशी सहमत आहे.
"तुम्ही हे रुपये स्वतःच खर्च करून ही योजना राबवा. ती यशस्वीरीत्या राबवलीत की पद्मविभूशणचे बघता येईल....किंबहुना तुम्हाला पद्मविभूषण द्यावी अशी लोकच मागणी करतील की..." असे पंतप्रधानांनी सांगावे.
(ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी देशातले सगळे पाणीसाठे माझ्या ताब्यात द्या असे तो उद्योगपती म्हणाला तर काय? हा प्रश्न उरतोच - तो पद्मभूषण मिळवण्यासाठी करत नसला तरी).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

ऑफर स्वीकारू नये.

ऑफर स्वीकारू नये. चांगलं काम केल्यास हा पुरस्कार मिळेल असे धोरण असावे. म्हणजे ह्या उद्योगपतीने जर चांगले काम केले (इथे पाणी प्रश्न सोडवला) तर आपोआपच त्याचा पुरस्कारासाठी विचार होईलच असे त्यास सुनवावे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

+१

फक्त गोड शब्दात.

+२

सहमत.
+ प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादाशी सहमत.

खासगी क्षेत्राकडे आऊटसोर्सिंग कशाला?

वर काही प्रतिसादांत असे मत आहे की त्याने स्वतःच पाणीपुरवठ्याच्या व्यवस्था बनवाव्यात आणि लोक त्याला खरेच पद्म पुरस्कारासाठी नामांकित करतील.
हे असले बीओटी कशाला? थेट पैशे देतोय तर घ्यावे ना? उद्या पोलिस'खाते'सुद्धा प्रायवेटाईझ व्हायचे.

सहमत

पैसे घेण्यात काय अनर्थ आहे ते उघडच आहे. पण तरीही त्याच्या पैशाने जनतेचा प्रश्न सुटेल अशी आशा पंतप्रधानांना असल्याचे मूळ लेखात म्हटले आहे म्हणून तत्त्व न मोडता जनतेचे काम होण्याचा उपाय या दृष्टीने सूचना होती.

खाजगी स्कीममधला धोका समजलाच म्हणून सगळे पाणी साठे माझ्या ताब्यात द्या असे उद्योगपती म्हणाला तर काय असा प्रश्न पुढे मी उपस्थित केला आहे.

पोलीसखात्याच्या खाजगीकरणाचे म्हणाल तर सरकारने ही कन्सेप्ट एस ई झेड मध्ये तरी मान्य केलीच आहे. तेथे सरकारच्या पोलीसांना, अधिकार्‍यांना, प्रदूषण नियंत्रकांना ज्युरिस्डिक्शन असणार नाही असे एस ई झेड कायद्यात अंतर्भूत असल्याचे वाचले होते. (दुवे शोधावे लागतील).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कंपनी सरकार

सेझ क्षेत्रात कामगार संरक्षण कायदेही लागू होत नाहीत असे वाचले होते. (दु.शो.ला.)

दुवे शोधाच

तेथे सरकारच्या पोलीसांना, अधिकार्‍यांना, प्रदूषण नियंत्रकांना ज्युरिस्डिक्शन असणार नाही असे एस ई झेड कायद्यात अंतर्भूत असल्याचे वाचले होते.

असे असल्यास हे खूपच धक्कादायक आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सेझ

सेझ मधे हे आहे हे मला वाटत नाही.

सेझ हा मुळात सीप्ज सारख्या ठिकाणी होताच. हा भूभाग देशाबाहेर असल्यासारखे यात आहे. म्हणजे आयात कर लावता येत नसे. पण या भागातून देशात इतरत्र माल वाहतुकीस आयात कर द्यावा लागतो.

सेज मधे 'लायसन्स इन्स्पेक्टर राज' नसते. याशिवाय कामगार कायदे नसतात. असे माझ्या वाचनात आले होते. लायसन्स इन्स्पेक्टर राज मधे एका कारखान्याला १२-१५ (??) खात्यातील इन्स्पेक्टरांशी संबंध ठेवावे लागायचे.

पण याचा अर्थ तेथे काही गुन्हा घदला तर येथील पोलिसांना तपासणी करण्याचा अधिकार असणारच. तसेच वायुगळती होऊन वा दररोजच्या सांडपाण्याने पाण्याचे नुकसान होऊन आजुबाजुच्या रहिवाशांना त्रास होणार असल्यास शिक्षा असणारच. अर्थात हा माझा कयास आहे. त्यासाठी सेझचा कायदा वाचावा लागेल.

प्रमोद

मान्य

अगदी तसे नाही. आत्ताच भारताचा सेझ कायदा आणि गुजरातचा सेझ कायदा वाचून पाहिला.

पण सेझमधील प्रशासन एका डेव्हलपमेण्ट कमिटी कडे असणार. या कमिटीवर दोन सरकारी अधिकारी आणि सेझ मधील उद्योजकांचे दोन प्रतिनिधी असणार. कमिटीचा अध्यक्ष सेझचा विकासक असणार. निवडणूक वगैरे काही नाही. वगैरे....

गुजरातच्या सेझ कायद्यात सध्याच्या काही कायद्यातील सुधारणांची माहिती दिली आहे. त्यातील काही....

मुंबई औद्योगिक संबंध कायद्याच्या तरतुदी सेझमध्ये उभारलेल्या युनिटना लागू नाही.
फॅक्टरीज ऍक्ट मधल्या कलम ६६ मध्ये महिला कामगारांच्या कामाच्या वेळावरील बंधने सेझ साठी बदलण्यात येतील.
कॉण्ट्रॅक्ट कायद्याच्या तरतुदी सेझखेरीज भागात लागू होतील.

याखेरीज एखाद्या कारखान्यात प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍यांना पाहणी करायची असेल तर सेझच्या डेव्हलपमेण्ट कमिटीची पूर्व परवानगी आवश्यक असेल.

सेझ क्षेत्रात उद्भवलेले खटले सेझ मध्ये गठित केलेल्या खास न्यायालयापुढे चालणार.

पण पोलिसांचा अंमल चालणार नाही असे कुठे दिसले नाही. तो सेझ विरोधकांनी केलेला विपर्यास असावा.

तसेच कामगार कायद्यांविषयी स्पष्टपणे लिहिलेले गुजरातखेरीज इतर राज्यांच्या कायद्यात दिसले नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

ताजी बातमी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 'सेझ'संबंधी राज्याचे विधेयक चर्चेला येऊ घातले आहे.

या प्राधिकरणाला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. जन्म-मृत्यूच्या नोंदीपासून शिक्षण आरोग्य, पोलिस, जमिनीचे दस्तावेज सांभाळणे याबाबतच्या सर्व व्यवस्था करण्याचे अधिकार तर आहेतच, पण त्यावर हवे तेवढे शुल्क आकारणे व ते स्वत:कडेच ठेवून घेण्याचे कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. त्याशिवाय वीजनिमिर्ती, वीजपुरवठा, जमिनीखालील पाण्याचा उपसा, पाणीपुरवठा करण्याचे अधिकार आहेत.

संदर्भ
पण बातमीत पुढे 'महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक अधिनियम' सेझमध्ये नाही असे दिले आहे. याचाच अर्थ 'पोलिस' असा लावला असेल का? (ही बातमी महाराष्ट्र गणपती टाईम्स ने छापली आहे हे विसरू नये.)

पुरस्काराची किंमत

सन्मान म्हणून दिल्या जाणार्‍या पुरस्कारास किंमत नसते व असे पुरस्कार एकूणच किंमतीच्या व्यवहारापासून मुक्त असावेत हे गृहीतकच मूळात चूक आहे. काही एक काम केल्यास पुरस्कार दिला जातो, ते काही एक काम म्हणजे पुरस्काराची किंमतच नव्हे काय?

वरील उदाहरणातील उद्योगपती योग्य किंमत देत आहे काय? असा विचार करता येईल.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सहमत

येथे कथा पंतप्रधानाची असली तरी अनेक ठिकाणी लागू पडेल असा विचारप्रयोग सुचवलेला आहे.

'अ' आणि 'ब' यांच्यामधील देण्याघेण्याचा व्यवहार आहे.
'अ' (येथे उद्योगपती) 'ब'ला पैशात किंमत मोजता येईल अशी वस्तू देतो.
'ब' (येथे लोकांचा प्रतिनिधी) 'अ'ला भावनिक किंमत आहे पण पैशात नाही, अशी वस्तू देतो.

अशा प्रकारचे व्यवहार रोजच्या आयुष्यात खूपदा येतात. भाविक पुजार्‍याला रुपये देतो. बदल्यात हातातल्या मिठाईला "प्रसाद" हे नाव मिळवतो.

- - -

सामान्यपणे देणे आणि घेणे हे एकाच वेळी होते. किंवा देण्याघेण्याच्या वेळात इतका थोडा फरक असतो, की आधी-नंतर असा क्रम लावणे निरर्थक असते. पानवाल्याने पान दोन सेकंद आधी देऊन मग पैसे उचलले, की आधी पैसे उचलून दोन सेकंदांनी पान हातात ठेवले... काही फरक पडत नाही.

मोठ्या मोठाल्या व्यवहारांत फरक पडतो. माल उचलण्याचा आधी पैसे मिळतील त्याची हमी लागते. पैसे देण्याआधी माल उपलब्ध असण्याची हमी लागते, वगैरे. पैसे आधी दिले तर किंमत कमी द्यावी लागते, पैसे नंतर दिले तर किंमत अधिक असते : अशा प्रकारचा फरक करून ही बाब हिशोबात घेतात.

त्याच प्रमाणे पुजार्‍याला रुपये देण्यात आणि मिठाईला प्रसादत्व बहाल होण्यातला क्रम विचारात घेण्यालायक नाही. पण भले मोठे दान आणि बदल्यात उच्च बहुमान यांच्या क्रमात देणाघेणार्‍यांचे स्वारस्य असू शकते. बहुमान आधी दिला, पण जनहितार्थ पैसे देण्याआधीच उद्योगपतीला अकालमृत्यू आला तर बहुमान वायाच गेला. पैसे दिले, पण बहुमान देण्यापूर्वीच पंतप्रधान निवडणूक हरले, तर पैसे वायाच गेले म्हणायचे.

हा व्यावहारिक प्रश्न असला, तरी नैतिक कोडे नाही. सहमत.

- - -
रोजव्यवहारात इंग्रजीभाषक लोकांमध्ये मान-संकेताचे दोन तुकडे करतात. एक तुकडा माल-किंवा-सेवा मिळवण्याच्या आधीच देतात. माल-किंवा-सेवा मिळाल्यावर मान-संकेताचा दुसरा भाग देतात.

व्यक्ती १ : प्लीज, मला बससाठी १ डॉलर देता का? माझी मुले घरी वाट बघत आहेत.
व्यक्ती २ : पर्याय १ - हे घ्या / पर्याय २ - नाही देऊ शकत.
व्यक्ती १ : पर्याय १ - थँक यू. माझ्या मुलांकडूनसुद्धा थँक यू. / पर्याय २ - ओके. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी.

येथे अधोरेखित शब्द बघा. प्लीज मध्ये "तुम्ही दयाळू आणि दान-समर्थ असाल, असे मला वाटते" असा तात्पुरता मानसंकेत बहाल केलेला आहे. पैसे मिळताच बहुमान स्थायी स्वरूपाचा केला जातो - "थँक यू". पैसे नाही मिळाले तर दिलेला तात्पुरता मानसंकेत परत घेतला जातो - सॉरी, म्हणजे "आधी वाटला तितके तुम्ही दयाळू नाही, किंवा दान-समर्थ नाही".

प्रश्न

प्रश्न आदर्श जगातील आहे की सत्य परीस्थितीला अनुसरून आहे?

आदर्श जगात काय असावे/असायला हवे याचे उत्तर वर काही प्रतिसादांमध्ये आलेच आहे. तत्वांना मुरड घालू नये - पदवी नाकारली. किंवा पदवी एक संकेत आहे त्यापेक्षा गोरगरीबांचे कल्याण महत्वाचे असे ठरवले तर हो.

प्रत्यक्षात : कदाचित पंतप्रधान म्हणतील - गरीब वगैरे सोडा हो, मला किती देता बोला?

पद्म वगैरे पुरस्कारांचे खरेच इतके महत्व राहिले आहे का? सुमार कानूला पद्मश्री मिळू शकते तर या उद्योगपतींना पद्म विभूषण मिळायला हरकत नसावी.

आजच आशा भोसले ट्विटरवर म्हणाल्या की किशोरदांना आयुष्यात एकही पद्म पुरस्कार किंवा फाळके पुरस्कार मिळाला नाही. पुढे म्हणतात, "If u want an award rt away fly Kingfisher 2 Delhi. Pretty hostesses. More MP's on board (ha ha). Award on merit alone, wait for 50 years."

--

सत्य परिस्थितीला अद्भुतकथेचा मुलामा

मला वाटते मुळात लेखकाला सत्य परिस्थितीविषयी बोलायचे आहे. सामान्यपणे हे आत्मनिरीक्षण आपण स्वतः करायचे आहे. उदाहरणार्थ :
"कुटुंबाचे भले करण्यासाठी कोण्या श्रीमंतापुढे जाऊन त्याची वारेमाप स्तुती करावी काय?"
असा प्रश्न कुटुंबवत्सल मनुष्यापुढे येऊ शकतो.
(मला विद्यार्जनासाठी पैसे हवे होते, तेव्हा माझ्या वडलांना लोकांना नम्रपणे पैसे मागावे लागले होते, ही गोष्ट आठवते. तशी परिस्थिती नसती तर त्या लोकांपुढे असला अतिरेकी नम्रपणा करणे हे माझ्या वडलांच्या स्वभावात नव्हते.)

गमतीदार ललितकथा लिहिता यावी म्हणून श्री. नानावटी यांनी उद्योगपती-पंतप्रधान ही पात्रे घेतलेली आहेत, असे मला वाटते. ललितकथेत अद्भुताच्या हव्यासामुळे श्री. नानावटी यांचे विचारप्रयोग आपल्या रोजव्यवहारापासून दूर जातात. त्यांचे विचारप्रयोग आपल्या रोजव्यवहारात करणे कित्येकदा शक्य असते. अशी टिप्पणी मी त्यांच्या अन्य लेखांखाली कित्येकदा लिहिली आहे.

परंतु कल्पना अद्भुतरम्य असल्या तर वाचकांना वेगळी गंमत मिळते. त्यामुळे श्री. नानावटींची शैली कदाचित सुयोग्य असेल.

श्री. नानावटी यांच्या लेखनाचे ध्येय म्हणजे "कृतिशील विचारप्रवर्तन" असावे, असे वाटते.

ज्यांना नीतीची चाड आहे, (त्यांना)... एका पर्यायात उपयुक्ततेला झुकते माप ... (तर) दुसर्‍या पर्यायात तत्वनिष्ठेचा प्रश्न उपस्थित करता येईल...
एखादे चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा वापर करणे क्षम्य ठरेल का?

ही चौकट उच्चपदस्थांना नव्हे तर सर्व नैतिक समस्यांना लागू असावी असा लेखकाचा मानस दिसतो. (मात्र हे माझे मत नव्हे. मला वरील समस्या नैतिक नसून व्यावहारिक वाटते. पंतप्रधानांची समस्या, आणि माझ्या वडलांची पैसे मागतानाची समस्याही - नैतिक नव्हे तर व्यावहारिक.)

कृतिशील विचारप्रवर्तनाचे ध्येय साधण्याच्या आड अद्भुत लेखनशैली येते की येत नाही, हे शेवटी लेखकानेच ठरवायचे असते.

शैली

श्री. नानावटी यांच्या शैलीबद्दल अजिबात शंका नाही. आणि ते सत्य परिस्थितीबद्दलच लिहीतात याच्याशी सहमत आहे. त्यांचे आधीचे लेख सत्य परिस्थितीवरच आहेत. (उदा. इच्छामरणावरील लेख.)

या लेखात माझा गोंधळ झाला कारण मी उदाहरण शब्दशः घेतले. आणि तसे केले तर लेखाच्या पहिल्याच वाक्याला अडखळायला होते. :)
सध्या राजकारणाचे जे चित्र दिसते आहे त्याला अनुसरून कोणताही राजकारणी तत्वनिष्ठ असेल (आणि असलाच तर कुठल्या मर्यादेपर्यंत असेल) याची खात्री देणे महाकठीण आहे. तसे बघायला गेले तर मनमोहन सिंग आणी पी. चिदंबरम यांच्याबद्दल थोडाफार विश्वास वाटतो, पण उद्या त्यांच्या कपाटातूनही काही सांगाडे* आले तर आश्चर्य वाटणार नाही. (याला मचुरिटी म्हणावे की सिनिसिझ्म?)

मुद्दा हा की उदाहरण शब्दशः घेतले तर तिसरा पर्याय ठेवायला हवा. पंतप्रधानांना किती मिळणार? असे केले नाही तर हा प्रश्न सत्य परिस्थितीबद्दल न उरता तत्वज्ञानातील हायपोथेटीकल प्रश्न होइल असे मला वाटते.

*पुणे विद्यापीठाचे एक माजी कुलगुरू निवडताना डायरेक्ट मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप केल्याचे ऐकले होते. खरेखोटे रमेश देव जाणे!

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

अवांतर

याला मचुरिटी म्हणावे की सिनिसिझ्म?

मचुरिटीवर एक लेख वाचल्यावर माझी व्याख्या बरीच बदलली.

--

सहमत

श्री धनंजय यांच्या विश्लेषणाशी सहमत.

तत्वनिष्ठा आणि तडजोड

श्री.धनंजय आणि आरागॉन यांच्या प्रतिसादानुसार विचार केला तर असे दिसेल की सामान्य माणूस रोजच्या जीवनात तत्वनिष्ठेला कितपत चिकटून राहू शकतो याबद्दल मनात शंका येतेच. आपल्या डॉक्टरने त्याला दिलेले पैसे सरळ गल्ल्यात टाकले, त्याची पावती दिली नाही या कारणासाठी कोणीही आपला डॉक्टर बदलतो का? जिथे विशेष रहदारी नाही, ऑटोरिक्षाला सहसा ग्राहक मिळतच नाही अशा ठिकाणी जाण्यासाठी रिक्षावाल्याने जास्त पैसे मागितले तर त्याला नकार देऊन पायपीट करायला तयार होतो का?

एका अयोग्य माणसाला पद्मविभूषण हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे लगेच सारा समाज अधोगतीला जाईल असे मला वाटत नाही. या तथाकथित सन्मानांना कोणी फारसे महत्व देतांना दिसत नाही अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे तो मिळण्यासाठी कोणताही व्यापारी एवढा मोठा सौदा करायला तयार होईल असेच मला वाटत नाही. आणि त्याला दिले तरी त्यापासून ज्यांना लाभ होईल ते त्याचे समर्थनच करतील.

मला कॉलेजमध्ये एक सुवर्णपदक मिळाले होते. ते पाहून मला एक श्रीमंत मित्र गंमतीने म्हणाला, "मला जरा डिझाईन दाखव, मी सोनाराकडून बनवून घेतो."

तडजोड

हल्लीच्या मुंबई अतिरेकी हल्याप्रकरणी असाच प्रश्न मला मनात आला होता. विशेषतः हेडले/कसाब प्रकरणात.
गुन्हेगारी टोळ्यांमधील एखाद्या माणसाला (तो गुन्हेगार असूनही) माफीचा साक्षिदार करण्याची पद्धत असते.
त्याला माफीचा साक्षिदार केल्याने पूर्ण गुन्ह्याचा तपास/साक्षीपुरावा नीट होतो.

अशा परिस्थितीत माफी देणे हे नीतीपूर्ण होते का? नसले तरी व्यवहार्य असू शकते.
मुंबई महानगर पालिकेत रस्त्याला नाव द्यायचे असेल तर त्याचे पैसे घेण्याची तरतूद आहे हे मी ऐकतो.
नानावटींनी प्रश्न विचारला तेव्हा नेमके तसेच झाले होते (कोणा एका विदेशी रहिवाशाला पद्म पुरस्कार जाहीर झाला होता. आणि त्याविरुध्द भाजपने प्रचार केला होता.)

माझ्यामते अशावेळी सत्य सगळ्यांसमोर असेल तर नीतीमान्यता (पुष्कळांचे पुष्कळ चांगले) मिळू शकेल.

प्रमोद

हे

मुंबई महानगर पालिकेत रस्त्याला नाव द्यायचे असेल तर त्याचे पैसे घेण्याची तरतूद आहे हे मी ऐकतो.

माहितीबद्दल आभार. हे माहित नव्हते.

रस्ता कुठे आहे त्याप्रमाणे रेट ठरत असतील का?

फॅलसी इंटरेस्टिंग आहे.

हा लेख आणि त्यातली पात्रे काल्पनिक आहेत, (आणि सदर कथा कुठेतरी अंतराळात घडते आहे) असे समजल्यास "पंतप्रधान आधीच प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ आहेत, तेव्हा ते आपल्या देशातली पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवतील. त्यासाठी त्यांनी आपले सर्वोच्च नागरी सन्मान विकायला काढू नये !" असे म्हणता येईल.

प्रश्न भारताच्या संदर्भात असल्यास, (म्हणजे मनमोहनसिंग आणि, समजा- लक्ष्मी मित्तल) आपल्याकडे आधीच पद्मपुरस्कारांनी प्रतिष्ठा गमावलेली आहे. याआधी पंतप्रधानांची गाणी म्हणणार्‍या गायिकेस, पंतप्रधानांच्या गुडघ्यावर शस्त्रकर्म करणार्‍या डॉक्टरास पद्म मिळाले आहेत. सैफ अलि खानलाही मिळाला आहे ! ;) मग एका पद्मपुरस्कारामुळे (विभूषण असला तरी) सगळ्या गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्यास- सौदा वाईट नाही.

 
^ वर