दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका

दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका
मागे विश्वास कल्याणकर यांनी इतिहासातल्या सहली या य,न,केळकर लिखित पुस्तकातील काही माहिती दिली होती. माझ्या कडे खंड 2 मिळाला. त्यात दुसर्‍या बाजीरावने केलेल्या लग्नांसंबंधी व त्याच्या बायकांसंबंधी एक पूर्ण प्रकरण आहे. लेखक पहिल्यांदाच सांगतात की यात रक्षा, नाटकशाळा, ख़ासेचाकरीतल्या स्त्रिया आणि प्रीतिपात्रे म्हणून बोभाटा झालेल्या प्रतिष्ठित घरातल्या स्त्रिया यांचा समावेश नाही. आपल्याकडे इत्तिहासातील पात्रांविषयी लिहिताना कोणा हल्लीच्या माणसांना राग कसा येणार नाही याची भरपूर खबरदारी घ्यावी लागते. दुसरा बाजीराव मात्र यात मोडत नाही तेव्हा नि:शंक मनाने मी लिहित आहे. मात्र त्यासोबत असे ही म्हणतो की कदाचित अशी लग्ने ही दुसर्या बाजीरावाचीच झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. याच पुस्तकात 'छत्रपती व पेशवे यांचे अनौरस वंशज' असा एक निबंध आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी.

दुसरा बाजीराव काळाच्या मानाने खूप जगला (जन्म 1775 मृत्यु 1851). या काळात त्याची एकंदर 11 लग्ने झाली. त्याच्या लग्नांचा तक्ता खालील प्रमाणे. (हा तक्ता मी तयार केला आहे. काही चुका होऊ शकतात.
क्र. साल नाव मृत्यु
1 1786 भागिरथी 1793
2 1793 सरस्वती 1797
3 1797 राधा 1806
4 1806 वाराणशी 1821+
5 1808 वेणु (कुसा) 1816
6 1816 सरस्वती 1821+
7 1820+ सत्यभामा
8 1820+ गंगाबाई
9 1820+ मैनाबाई
10 1820+ सईबाई
11 1820+ ??

लग्नाच्या वेळी प्रत्येकीचे वय 7 ते 9 दरम्यान असावे. (काही जणीँच्या बाबतीत वयाचा असा उल्लेख दिसतो.) बाजीराव ब्रह्मावर्तास (1818 साली पेशवाई बुडाली) गेल्यानंतर 5 लग्ने केली पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. बाजीरावाची मुले अल्पायुषी ठरत होती. वाराणशी व वेणू यांना पहिल्यांदा मुले झाली पण ती वर्षभरात गेली.

आरोग्य:
त्यावेळची आरोग्याची स्थिती कशी असावी याचा थोडाफार अंदाज करता येतो.
पहिल्या सहाजणींपैकी चौघीजणी 16 वर्षाच्या आतल्या असताना मृत्युमुखी पडल्या. शेवटची सरस्वती पण कदाचित तेवढीच जगली असावी. वाराणशी जास्त जगली असे म्हणता तिचा मृत्युही 25 ते 30 मध्ये झाला असणार. वाराणशीला फिट्स येत असत. तिला पिशाच्चबाधा होती म्हणून उपचार चालले होते. यासाठी त्याने नारायण नागबळी काढला होता. साधु फकीर झाले होते पण उपयोग झाला नाही. यावेळची एक उल्लेखनीय बाब म्हणजे बाजीरावाने मुद्दाम मुंबईहून डॉक्टर बोलावून वाराणशीच्या देवी काढल्या होत्या. त्यानंतर पुण्यात त्याने एक दवाखाना काढून दिला होता. पुण्यात देवी काढून घेण्याचे एक सत्र सुरु झाले.

सामाजिक परिस्थिती.
मुलींची 7 ते 9 वर्षांपर्यंत होत असत. 12 वर्षाची मुलगी झाली आणि लग्न झाले नाही तर मोठी आपत्ती मानली जात असे. औरस संतती हवी असेल तर लग्ना शिवाय उपाय नसे. मग कितीही घोडनवरा असला तरी त्याचे लग्न अल्पवयीन मुलीशीच होणार हे ठरलेले. यामुळे अशा घोडनवर्यांतची पंचाईत होत असे. लग्ने जातीतच होणार म्हणजे आणि जातीची लोकसंख्या कमी असेल तर तीही एक पंचाईत.
बाजीरावाची काही लग्ने कोणाच्या तरी आश्रितांच्या मुलींशी झाली. या लग्नांमूळे त्यांच्या सासर्यां ना बरीच कमाई झाली. एक लग्न त्यांच्या विरोधकाच्या नातीशी झाले. हा विरोध या लग्नानंतरही चालू होता.

प्रेमपत्रे:

बाजीरावाची 5वी बायको वेणू हिने लिहिलेली प्रेमपत्रे कवितांच्या रुपात उपलब्ध आहेत. त्यातील काही.
बहुत दिवस जाले स्वारिला नाथराया ।
विरहपदर ज्वाला मी शकेना वराया ॥
निशीदिनिं मन माझे वेधिले प्राण-मित्रे ।
सदनिं कधिं सख्यातें मी विलोकीन नेत्रे ॥

मी आपुल्या निशीदिनी जवळी असावें ।
हे इच्छितें दृढ सख्या स्वमनी असावें ॥
मी एकलीच सदनी शयनी वसावें ।
हे योग प्राप्त मजला कधिही नसावे ॥

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

एकंदरीत पेशव्यांच्या स्त्रियांचा विचार करता बर्‍याच अल्पायुषी असल्याचेच दिसेल. (अल्पायुषी म्हणजे ५० च्या आत वारलेल्या) बहुधा, गोपिकाबाई अपवाद असाव्या. परंतु त्यांचा मृत्यूही बघता बालविवाह, जीवघेणी बाळंतपणे याचबरोबर व्रतवैकल्ये, रूढी परंपरांच्या जाळ्यांत अडकून केलेली प्रकृतीची हेळसांड हे कारण देखील दिसते.

एकापेक्षा अधिक लग्ने (बहुपत्नी), पहिली पत्नी नांदत असता दुसरीशी लग्न झाल्याची उदाहरणे पेशव्यांच्या घराण्यात आहेत काळ? वरील यादी पाहून हा प्रश्न पडला. पहिल्या बाजीरावाला आणि मस्तानीला तूर्तास बाजूला ठेवू.

आहेत.

वरच्या यादीतच अशी लग्ने झालेली दिसतात.
क्र ४ + ५

तसेच नंतरची लग्नेही समांतर दिसतात.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मदर इंडिया

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पेशवाईच्या काळात आणि तदनंतर एक शतकभर ब्राह्मण समाजातील स्त्रियांचे( स्त्रिया कसल्या मुलीच त्या. लग्न झाले म्हणून स्त्रिया म्हणायचे ) गरोदरपणात आणि बाळंतपणात अतोनात हाल झाले. कित्येक जणींचे त्यात मरण ओढवले. त्याचे कारण म्हणजे लैंगिक विषयासंबंधीच्या चुकीच्या धार्मिक समजुती.(संमतीवयाच्या कायद्याला केव्हढा विरोध झाला !)त्यामुळे नवव्या/दहाव्या वर्षी लग्न. मग न्हाण आले की गर्भाधान. नवर्‍याचे अत्याचार. कोवळ्या वयात बाळंतपण, अपार हाल . प्रसंगी मरण.
कॅथेरिन मेयो या अमेरिकन इतिहासकार बाईने हिंदू स्त्रियांचे हे हाल प्रत्यक्ष पाहिले. त्याचे वर्णन "मदर इंडिया" या तिच्या वादग्रस्त पुस्तकात(१९२७) आहे.

पेशव्यांचे आणखी एक पाप

पेशवाईच्या काळात आणि तदनंतर एक शतकभर ब्राह्मण समाजातील स्त्रियांचे( स्त्रिया कसल्या मुलीच त्या. लग्न झाले म्हणून स्त्रिया म्हणायचे ) गरोदरपणात आणि बाळंतपणात अतोनात हाल झाले.

पेशव्यांनी त्यांच्या आधीपासून सुरू असलेली प्रौढ विवाहाची (मुलगी विवाहयोग्य वयात आल्यानंतरच विवाह करण्याची) चाल बंद करून बालविवाहाची चाल सुरू केली ही माहिती नव्याने समजली, त्याबद्दल यनावालांचे धन्यवाद.

यनावाला म्हणतात त्यामुळे ते खरेच असणार. पण कदाचित् असेही समजू की ही चाल पेशव्यांनी सुरू किंवा बंद केली नाही तर ती पेशव्यांच्या आधीपासूनच सुरू होती तशीच ती नंतरही सुरू राहिली. हे जर खरे असेल तर स्त्रियांचे हाल "पेशव्याईच्या काळात आणि तदनंतर एक शतकभर" इतक्यापुरतेच मर्यादित नसून कदाचित् हजारो वर्षे आधीही सुरू असावेत. तर्कशुद्ध असली तरी या मांडणीचा दोष असा की बालविवाहाच्या प्रथेबद्दल पेशव्यांना दोष देता येत नाही. आणि ज्या युक्तिवादामुळे पेशव्यांना दोष देता येत नाही तो तर्कशुद्ध कसा असेल?

विनायक

?

पेशव्यांनी त्यांच्या आधीपासून सुरू असलेली प्रौढ विवाहाची (मुलगी विवाहयोग्य वयात आल्यानंतरच विवाह करण्याची) चाल बंद करून बालविवाहाची चाल सुरू केली ही माहिती नव्याने समजली, त्याबद्दल यनावालांचे धन्यवाद.

तसा काही ठाम दावा यनावाला यांच्या प्रतिसादात आढळला नाही. मेयोने तेव्हढ्याच काळाचे (पेशवे+१०० वर्षे) वर्णन केले असेल. (यनावाला यांच्या प्रतिसादावर आधारित तर्क.)

यनावाला म्हणतात त्यामुळे ते खरेच असणार. पण कदाचित् असेही समजू की ही चाल पेशव्यांनी सुरू किंवा बंद केली नाही तर ती पेशव्यांच्या आधीपासूनच सुरू होती तशीच ती नंतरही सुरू राहिली. हे जर खरे असेल तर स्त्रियांचे हाल "पेशव्याईच्या काळात आणि तदनंतर एक शतकभर" इतक्यापुरतेच मर्यादित नसून कदाचित् हजारो वर्षे आधीही सुरू असावेत. तर्कशुद्ध असली तरी या मांडणीचा दोष असा की बालविवाहाच्या प्रथेबद्दल पेशव्यांना दोष देता येत नाही. आणि ज्या युक्तिवादामुळे पेशव्यांना दोष देता येत नाही तो तर्कशुद्ध कसा असेल?

यनावाला पेशवेद्वेष्टे आहेत असा औपरोधिक दावा ध्वनित होतो आहे.

यनावालांचा खोडसाळ प्रतिसाद

प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या लेखाचा मूळ विषय "दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका". यावरून पुढे त्याचा, रघुनाथरावाचा बाहेरख्यालीपणा (नाना फडणीसाचे नाव अजून कसे आले नाही?) वगैरे विषय येणार हे उघडच आहे. पेशवाईत वाईट काय होते हे सांगायची चढाओढ लागते.

आपल्या पुरोगामी विचारवंतांना शिवाजीच्या राजवटीत काहीच वाईट दिसत नाही. आता बालविवाहाचेच उदाहरण घ्या. शिवाजीच्याच काय मनुस्मृतीच्या काळापासून बालविवाहाची प्रथा सुरू असणार. तेही फक्त ब्राह्मण नाही तर बहुतेक सर्व हिंदू जातींमध्येही. त्यापासून होणारे दुष्परिणामही स्त्रियांना इतकी वर्षे भोगावे लागत असणार.
तरीही हे विचारवंत जेव्हा " पेशवाईच्या काळात आणि त्यानंतर एक शतकभर ब्राह्मण स्त्रियांचे गरोदर पणात आणि बाळंतपणात अतोनात हाल झाले" असे विधान करतात, तेव्हा मी याचा अर्थ असा घेतो की असे हाल फक्त इ. स्. १७१३ (या वर्षी बाळाजी विश्वनाथाने पेशवाईची वस्त्रे धारण केली) पासून १९१८ (१८१८ मध्ये पेशवाई बुडाली तेव्हापासून १०० वर्षे) अश्या २०५ वर्षांमध्येच झाले. अर्थात् याला कारण पेशवेच असणार. बाळाजी विश्वनाथाने "कुठल्याही ब्राह्मण मुलीचे लग्न तिच्या १० वर्षे पूर्ण होण्याच्या आत न केल्यास तिच्या बापाला फाशी देण्यात येईल" असा फतवा काढला असणार आणि इतिहास संशोधक यनावालांजवळ त्याची प्रत नक्की असणार.

पेशवाईच्या काळात आणि तदनंतर एक शतकभर ब्राह्मण समाजातील स्त्रियांचे( स्त्रिया कसल्या मुलीच त्या. लग्न झाले म्हणून स्त्रिया म्हणायचे ) गरोदरपणात आणि बाळंतपणात अतोनात हाल झाले. कित्येक जणींचे त्यात मरण ओढवले. त्याचे कारण म्हणजे लैंगिक विषयासंबंधीच्या चुकीच्या धार्मिक समजुती.(संमतीवयाच्या कायद्याला केव्हढा विरोध झाला !)त्यामुळे नवव्या/दहाव्या वर्षी लग्न. मग न्हाण आले की गर्भाधान. नवर्‍याचे अत्याचार. कोवळ्या वयात बाळंतपण, अपार हाल . प्रसंगी मरण.
कॅथेरिन मेयो या अमेरिकन इतिहासकार बाईने हिंदू स्त्रियांचे हे हाल प्रत्यक्ष पाहिले. त्याचे वर्णन "मदर इंडिया" या तिच्या वादग्रस्त पुस्तकात(१९२७) आहे.

यनावालांच्या वरील कसाही विचार केला तरी त्यातून "मेयो बाईंनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये १७१३ - १९१८ अश्या २०५ वर्षांमधल्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्रात पहिली १०० वर्षे पेशवाई आणि पुढची १०० वर्षे ब्रिटीश राजवट असली तरी दोन्ही राजवटीं या हालांना कारणी भूत नाहीत. फक्त बालविवाहामुळे किती वाईट परिणाम होतात याचे वर्णन या पुस्तकामध्ये आहे" असा अर्थ काढता आला नाही उलट "पेशवाईमध्ये अनेक वाईट गोष्टी होत्या त्यात या आणखी एका गोष्टीची भर" असा दिसतो.

जिथे पेशव्यांचा दोष नाही तिथे त्यांचा दोष आहे असे ध्वनित करणार्‍या प्रतिसादामुळे यनावाला पेशवेद्वेष्टे आहेत असे माझे मत झाले तर काही चूक आहे का?

विनायक

सेम

यनांच्या प्रतिसादात जे विनायक यांना 'दिसले' तेच मला विनायक यांच्या प्रतिसादात 'दिसले'. यनांनी मेयोबाईंच्या पुस्तकात काय प्रतिपादन आहे हे आधीच्या परिच्छेदात लिहून नंतरच्या ओळीत 'मेयोबाईंनी हे पुस्तकात लिहिले' असे म्हटले. त्यात पेशवाईच्या आणि नंतरच्या काळात या शब्दप्रयोगातून 'पेशव्यांमुळे' हा अर्थ ज्या कारणाने विनायक यांना वाटला त्याच कारणाने त्यांनी त्याचा प्रतिवाद केला असे मला वाटले.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पुरावे

शिवाजीच्याच काय मनुस्मृतीच्या काळापासून बालविवाहाची प्रथा सुरू असणार. तेही फक्त ब्राह्मण नाही तर बहुतेक सर्व हिंदू जातींमध्येही. त्यापासून होणारे दुष्परिणामही स्त्रियांना इतकी वर्षे भोगावे लागत असणार.

वरील विधानांसाठी काही पुरावा उपलब्ध आहे काय?
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

वय

मनुस्मृतीत तर उल्लेख आहेतच.

रामाच्या विवाहाच्यावेळी त्याचे वय सोळा होते असे ऐकले होते..तेव्हा सीतेचे वय जास्तीत जास्त १२ असावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

एज ऑफ कन्सेंट

म्हणजे एज ऑफ कन्सेंटचा प्रॉब्लेम नव्हता तर.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

१२?

रामाच्या विवाहाच्यावेळी त्याचे वय सोळा होते असे ऐकले होते..तेव्हा सीतेचे वय जास्तीत जास्त १२ असावे.

सीतेचे वय १२? हे मी कधी ऐकलेले नाही. पुराणे आणि महाकाव्यांत बालविवाह झाल्याचे उल्लेख नाहीत. तसे असते तर कवींनी अनेक उपकथांतून ते मांडले असते. सीता उपवर असून तिचे वय विवाहयोग्य होते एवढेच कवी म्हणतो. ती कमी वयाची असल्याचा उल्लेख रामायणात नाही. सीता ही रामाची समवयीन असावी असा अनेकांचा समज दिसतो. बालविवाहाचे उल्लेख महाभारतातही आढळत नाहीत. उलट, स्वेच्छेने पती निवडायची संधी मुलींना मिळाल्याचे दिसते.

सहमत

महाभारतात स्त्रियांना निवडीचे स्वातंत्र्य असल्याचे दिसते.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

रामाची सीता कोण?

सीतेचे वय १२ आणि महाभारतात स्त्रियांना निवडीचे स्वातंत्र्य होते या सहमतीमधला अन्योन्यसंबंध समजला नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बायको । अन्योन्यसंबंध

प्रियाली यांच्या प्रतिसादातील विधानांशी सहमती दर्शवल्यानंतर महाभारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान यावर विशेष जोर द्यावासा वाटला. श्री थत्ते यांचा प्रतिसाद व प्रियाली यांचा उपप्रतिसाद वाचल्यास अन्योन्यसंबंध लक्षात यावा.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

बादरायण

श्री. थत्ते व प्रियाली यांनी रामायणासंदर्भात प्रतिसाद दिले आहेत. महाभारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान यासाठी वेगळा प्रतिसाद देणे योग्य ठरले असते.

भीमाचे गर्वहरण हा मारुतीच्या संबंधातील प्रसंग वगळता रामायण व महाभारतात काही संबंध आहे असे वाटत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अर्धवट

बालविवाहाचे उल्लेख महाभारतातही आढळत नाहीत. उलट, स्वेच्छेने पती निवडायची संधी मुलींना मिळाल्याचे दिसते.

हे प्रियाली यांच्या उपप्रतिसादातील वाक्य आहे.

कृपया स्वाक्षरीतील विनंतीकडे लक्ष द्यावे व पुढील चर्चा खरडवहीत चालवावी.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

क्षमस्व

अर्धवटपणा झाला खरा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दुधाचे दात पडलेली सीता

(अनेक वर्षांपूर्वी शिकलेल्या/वाचलेल्या) वाल्मिकी रामायणामध्ये विवाहसमयी सीतेचे काही (दुधाचे)दात पडलेले होते असे वर्णन आहे असे वाटते. म्हणजे तिचे वय विवाहप्रसंगी सुमारे ८ वर्षांचे असावे असा कयास आमच्या शिक्षिकेने सांगितल्याचा आठवतो. (चुभू. द्या. घ्या. केवळ आठवणीवर विसंबून लिहिले आहे, पुरावे शोधण्याचे कष्ट घेतलेले नाहीत.)

संदर्भ मिळाला नाही

(अनेक वर्षांपूर्वी शिकलेल्या/वाचलेल्या) वाल्मिकी रामायणामध्ये विवाहसमयी सीतेचे काही (दुधाचे)दात पडलेले होते असे वर्णन आहे असे वाटते. म्हणजे तिचे वय विवाहप्रसंगी सुमारे ८ वर्षांचे असावे असा कयास आमच्या शिक्षिकेने सांगितल्याचा आठवतो.

मी बालकांड शोधले परंतु दुधाचे दात पडलेली सीता वगैरे असे काहीही आढळले नाही. चू. भू.द्या. घ्या. एवढेच नव्हे तर सीतेच्या सौंदर्याचे वगैरे वर्णनही बालकांडात आढळले नाही. केवळ जनकाची सीतेला उजवून टाकण्याची धडपड दिसते. (त्यावरून सीता घोडनवरी तर नव्हती अशी शंका वाटते.) असो. रामायणाच्या इतर कांडात दुधाचे दात पडल्याचा उल्लेख असेल तर कल्पना नाही.

हल्ली शरदराव दिसत नाहीत. त्यांना वाल्मिकी रामायणात असा संदर्भ शोधणे शक्य आहे का?

बालविवाह

इरावती कर्वे यांच्या संस्कृती या पुस्तकात "आपण सीता आणि राम यांच्या बालविवाहाची कथा वाचत आहोत असे दिसते" असे स्पष्ट नोंदवले आहे.
(संदर्भ २ आठवड्यांनी देऊ शकेन).

संदर्भ पटकन सापडला नाही म्हणून वरील वाक्य करड्या रंगाचे केले आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सर्व जाती

पुरातन काळापासून बालविवाह अस्तित्त्वात असावेत हे मान्य होण्यासारखे आहे. परंतु सर्व जातींमध्ये हा प्रकार अस्तित्त्वात होता यासाठी कुठला पुरावा उपलब्ध आहे काय?

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

माझा तर्क

शिवाजीच्या काळात पाश्चात्यांशी संपर्क होई त्यापेक्षा पेशवाईत अधिक असे. शिवाजीच्या काळात पाश्चात्यांच्या स्त्रियांची परिस्थिती असे कशी ते मला माहिती नाही. पेशव्यांच्या काळात मात्र पाश्चात्यांचे पुरोगामी विचार उपलब्ध असतील तर त्यांकडे दुर्लक्ष/विरोध करणे हा अधिक मोठा अपराध नाही का?

पुरोगामी विचार?

पेशव्यांच्या काळात मात्र पाश्चात्यांचे पुरोगामी विचार उपलब्ध असतील तर त्यांकडे दुर्लक्ष/विरोध करणे हा अधिक मोठा अपराध नाही का?

बहुदा पाश्चात्यांचे विचार पुरोगामी होते हे मोजण्याचे कोरिलेशन कोएफिशियन्ट्स उपलब्ध नसावेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पेशवाईचा काळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
* पेशवाई हा काळाचा उल्लेख आहे. त्याकाळी घडलेल्या प्रत्येक गोष्टीला पेशवे जबाबदार आहेत असे समजणे हास्यास्पद आहे. इसवीसन सुरू झाल्यानंतरच्या घटनांची जबाबदारी येशु ख्रिस्त अथवा ख्रिस्तिधर्म यांच्यावर टाकता येते काय?
* ही क्रूरप्रथा पेशवाईत सुरू झाली असे म्हटलेले नाही. पेशवाईत आणि तदनंतर शतकभर चालू होती असे म्हटले आहे.कारण नंतर समाजसुधारक आले, संमतीवयाचा कायदा झाला, स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली.
* नवव्या/दहाव्या वर्षी मुलीचे लग्न हा प्रकार महाभारतकाळी नव्हताच पण पुराणातही कुठे या चालीचा उल्लेख आढळत नाही.
* शिवशाहीतही हा प्रकार नसावा. कोवळ्या वयात बाळंतपण येऊन मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले असते तर तसा उल्लेख दासबोधात/तुकारामगाथेत कुठेतरी आला असता."लेकुरे उदंड जाहली|" हे दासबोधात आहे.

सहमत/असहमत

पेशवाई हा काळाचा उल्लेख आहे. त्याकाळी घडलेल्या प्रत्येक गोष्टीला पेशवे जबाबदार आहेत असे समजणे हास्यास्पद आहे. इसवीसन सुरू झाल्यानंतरच्या घटनांची जबाबदारी येशु ख्रिस्त अथवा ख्रिस्तिधर्म यांच्यावर टाकता येते काय?
* ही क्रूरप्रथा पेशवाईत सुरू झाली असे म्हटलेले नाही. पेशवाईत आणि तदनंतर शतकभर चालू होती असे म्हटले आहे.कारण नंतर समाजसुधारक आले, संमतीवयाचा कायदा झाला, स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली.
* नवव्या/दहाव्या वर्षी मुलीचे लग्न हा प्रकार महाभारतकाळी नव्हताच पण पुराणातही कुठे या चालीचा उल्लेख आढळत नाही.

या सर्वांशी सहमत. पेशवाई हा काळाचा उल्लेख आहे याचा अर्थ पेशव्यांनी फतवे काढून बालविवाह सुरू केले नाहीत.

शिवशाहीतही हा प्रकार नसावा. कोवळ्या वयात बाळंतपण येऊन मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले असते तर तसा उल्लेख दासबोधात/तुकारामगाथेत कुठेतरी आला असता."लेकुरे उदंड जाहली|" हे दासबोधात आहे.

खुद्द शिवाजीमहाराजांचे लग्न बालवयात झाले होते. किंबहुना, पहिली दोन्ही लग्ने (सईबाई, सोयराबाई) बालवयातच झाली होती.

चांगला प्रतिसाद

त्याचे वर्णन "मदर इंडिया" या तिच्या वादग्रस्त पुस्तकात(१९२७) आहे.

कॅथेरिन मेयो या अमेरिकन इतिहासकार बाईं विषयी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद!
आपण तेथल्या तेथे पुस्तकाचे नाव देता, ही गोष्ट मला आवडली.

आपला प्रतिसाद वाचून विचार प्रवृत्त्त झालो.
पण ब्राह्मणच का? शतकभरच का?
हा विचार माझ्या मनात आलाच.

धार्मीक आणि भंपक समजूतींच्या नावाखाली
सर्व समाजातील स्त्रीयांचे हाल शतकानुशतके होत आहेत, असे मला वाटते.
हे सर्व धर्मांना लागू आहे. दुर्दैवाने, आजही हे हाल थांबले आहेत असे दिसत नाही. :(

फक्त ब्राह्मणच स्त्रीयांच्या फक्त शतकभरच चालल्या हालांविषयीच आपण का लिहिले,
यावर आपले विचार वाचायला आवडतील. की फक्त त्यांचेच आणि तितकाच काळ हाल झाले असे आपण मानता?

आपला
गुंडोपंत

ब्राह्मण/शतकभर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
* ***********************************
** ही क्रूरप्रथा पेशवाईत सुरू झाली असे म्हटलेले नाही. पेशवाईत आणि तदनंतर शतकभर चालू होती असे म्हटले आहे.कारण नंतर समाजसुधारक आले, संमतीवयाचा कायदा झाला, स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली.
**काही धार्मिक रूढी ब्राह्मण समाजापुरत्या मर्यादित होत्या. उदाहरणार्थ विधवेचे केशवपन.हे इतर जातींत नव्हते. तसेच न्हाण येण्यापूर्वी लग्न, न्हाण आल्यावर गर्भाधान अशा ब्राह्मणसमाजात होत्या. त्या नेमक्या कधी सुरू झाल्या हा संशोधनाचा विषय आहे.(म्हणजे मला ठाऊक नाही)

ओके

ओके,
आता लक्षात आले,
काय म्हणायचे होते ते.

आपला
गुंडोपंत

मराठी इतिहासातील डागाळलेला काळ

दुसर्‍या बाजीरावाची राजवट हा मराठी इतिहासातील सर्वाधिक डागाळलेला काळ होता. या पेशव्याला रावबाजी म्हणत, पण त्याचे जीवन म्हणजे चैनबाजी आणि इश्कबाजी. शृंगारिक लावणी हा प्रकार याच्याच प्रोत्साहनाने वाढीस लागला, असे वाचनात आले होते. प्रमोदजींनी बाजीरावाच्या लग्नाच्या बायकांचा तपशील नोंदवला असला तरी त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया (दासी, नाटकशाळा, कलावंतिणी) प्रत्यक्षात संख्येने खूप अधिक होत्या. लोकहितवादींनी (गोपाळ हरी देशमुख) आपल्या लेखामधून बाजीरावाचे विलासी आयुष्य आणि त्याच्या रंगेलपणावरही स्पष्टपणे लिहिले होते. बाजीराव त्यावेळेस बिठूरला (ब्रह्मावर्त) येथे ब्रिटिशांच्या पेन्शनीवर मजेत दिवस काढत होता. कुणीतरी त्याला या लेखनातील तपशील सांगितला होता, पण बाजीराव एकतर वृद्ध झाला होता आणि तो कधी या आरोपांचा प्रतिवाद करण्याच्याही भानगडीत पडला नाही. बिठूरच्या वास्तव्यातही त्याच्या जुन्या विलासी सवयी बहुधा कायम असाव्यात कारण खर्च पुरत नाही म्हणून हा शेवटचा पेशवा ब्रिटिशांच्या मागे पत्र लिहून सतत तगादा लावत असे.

सन १८०० पासून मराठा दरबारचे बहुतेक सरदार बाजीरावपासून दुरावले होतेच, पण जनतेलाही हालापेष्टांतून जीवन जगावे लागत असल्याने त्याच्या राजवटीबद्दल मुळीच प्रेम नव्हते. एकटा बापू गोखले स्वामीनिष्ठ राहून बाजीरावसाठी भाबडेपणाने लढत होता. खडकीच्या लढाईत तो हरल्यानंतर बाजीरावसाहेब पळून गेले आणि नंतर त्यांनी मराठी राज्याचे उदक ब्रिटिशांच्या हातावर सोडले. १८१८ ला पेशवाई संपली. शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागला, परंतु त्यानंतरची १० वर्षे पुण्याची अवस्था काय होती, हे तत्कालीन वर्णनावरून कळून येते. तालेवार आणि खानदानी लोकांनी पुणे सोडणे पसंत केले होते. पुण्यात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. शेरभर धान्यासाठी घरातले सोन्याचे डाग मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली होती. जुन्या वाड्यांच्या जागी मोकळ्या बखळी शिल्लक राहिल्या होत्या. तिथेही घुशींचे राज्य.

छत्रपती संभाजीराजे यांचे औरंगजेबाने केलेले हाल, पानिपतावर मराठ्यांचा झालेला दारुण पराभव आणि शेवटच्या बाजीरावाचा धुडगुस याची वर्णने सर्वसामान्य वाचकांना कधीच अलिप्तपणे वाचवत नाहीत.

बाजीरावाचा बाहेऱख्यालीपणा

याच्यावरून आठवले, 'पुण्याचे पेशवे' या अ. रा. कुलकर्णी लि़खित पुस्तकात असा उल्ले़ख आहे, की दुसर्‍या बाजीरावाला वयाच्या बाराव्या वर्षी गुप्तरोग झाला होता. याच पुस्तकात रघुनाथरावांच्या इष्कबाजीचे दा़खले आहेत. आपल्या नाटकशाळा रघुनाथराव लढायांच्या मोहिमांवर नेत असे, असाही त्यात उल्लेख आहे.

निरर्थक वाद

बाल वयात मुलीचे लग्न करण्याची प्रथा पेशवाईत व ब्राम्हण समाजातच सुरू झाली नाही याचा अप्रत्यक्ष पुरावा शिवाजी महाराजांच्या चरित्रावरूनही पडताळता येतो. त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटनांची सनावळी या प्रमाणे आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म- इ.स.1630

सईबाई निंबाळकर यांच्याशी विवाह- 1640

संभाजी महाराजांचा जन्म- 1657

सईबाईंचा मृत्यू- 1659
चन्द्रशेखर

प्रतिसाद

दुसर्‍या बाजीरावावर लिहिणे देखिल हे वाटते तेवढे सोपे नाही असे प्रतिसादांवरून दिसते. त्यातही हेतुपुरस्सरतेचा वाद दिसतो.

मला असे वाटते की अल्पवयीन पण वयात आलेल्या (आजच्या पेक्षा) मुला मुलींचे विवाह हे त्याकाळाची गरज असावे. जेव्हा आयुर्मर्यादा कमी असते तेव्हा लवकर विवाह-संसार-संततीच्या मागे समाज लागू शकतो. माझ्या वाचनातील अरब देशात ही पद्धत पैगंबरांच्या काळी होती. (अगदी ६ वर्ष्याच्या मुलीचे लग्न लावण्याचा उल्लेख आहे.) इतर समाजात होती की नव्हती याबद्दल नीटशी माहिती नाही पण १३-१४ वयात लग्ने लागत असतील असा माझा कयास आहे. पुरातन काळच्या वाङ्मयात वयाचा नीट उल्लेख नसतो. वयात न आलेल्या मुलींची लग्ने हे कौमार्याचा संशय नको म्हणून आले असावे. थोडेसे गुगलून हा दुवा मिळाला. http://marriage.about.com/cs/teenmarriage/a/teenmarriage.htm

दुसर्‍या बाजीरावाच्या वेगवेगळ्या बायका या बाळंतपणात गेल्याचा उल्लेख मी वाचला नाही आणि लिहिला पण नाही. अर्थात बाळंतपणात बायकांचा मृत्यु दर हा कमी होता असे माझे म्हणणे नाही. प्रियाली यांनी गोपिकाबाईंचा उल्लेख केला आहे. त्याबरोबर किती पेशवे ५० पर्यंत जगले? किती विशीत गेले (माधवराव, नारायणराव आणि सवाई माधवराव). असे बघितले तर त्यांची आयुर्मर्यादा खूप मिळत नाही. (कोणी तक्ता बनवेल का?)

पुरुषांचा बाहेरख्यालीपणा हा या लेखाचा उद्देश नव्हता. मला असे वाटते की हा त्याकाळच्या राजे-रजवड्यांसाठी (आणि इतरांसाठीही) एक सामान्य प्रकार होता. य. न. केळकरांनी लिहीलेला छत्रपती व पेशवे यांचे अनौरस वंशज हा निबंध वाचल्यावर कोणा एकावर अंगुलीनिर्देश करणे फार चुकीचे आहे हे जाणवेल. या निबंधावर वेळ मिळेल तसा लिहिण्याचा बेत आहे.

दुसर्‍या बाजीरावाच्या इतिहासाबरोबर विवाहाची सांगड घालायला हवी होती का? दुसरा बाजीराव जवळपास नाना फडणविसांच्या मृत्युपर्यंत (१८००) राजकारणात जवळपास नव्हता. होळकर शिंद्यांच्या वर्चस्वा खाली वा इंग्रजांच्या (१८०२ पासून) वर्चस्वाखाली त्याने काही दिवस काढले. १८१८ पासून १८५१ पर्यंत तर त्याने ब्रह्मावर्तास विजनवासात दिवस काढले. १८०० ते १८१८ या काळात राजकारणात महत्वाची भूमिका त्याने अंशतः बजावली असावी. या काळात त्याचे ११ पैकी ३ विवाह झाले.

प्रमोद

लिहिणे सोपे आहे

दुसर्‍या बाजीरावावर लिहिणे देखिल हे वाटते तेवढे सोपे नाही असे प्रतिसादांवरून दिसते.

लिहिणे सोपे आहे. पचवणे कठिण असावे. :-)

जेव्हा आयुर्मर्यादा कमी असते तेव्हा लवकर विवाह-संसार-संततीच्या मागे समाज लागू शकतो.

हे खरे आहे. विशेषतः, बालमृत्यूचे प्रमाण खूप असले की जगलेल्या संततीकडून आपला वंश वाढवणे यालाही अवास्तव महत्त्व दिले गेले असावे.

बालविवाहांची प्रथा ही अनेक कारणांनी पडली असावी. वंशवृद्धी हे एक मोठे कारण आहेच, सोबत स्त्रीकडे संपत्ती म्हणून बघणे, रोटीबेटी व्यवहाराद्वारे दोन कुटुंबांना जोडता येणे किंवा मुलीच्या बापाला आपल्या भविष्याची तरतूद करता येणे अशा अनेक कारणांनी मुलींना लवकरात लवकर उजवून टाकण्याची पद्धत रुजू झाली असावी. शिवाय बाकीची कारणे सामाजिक परिस्थिती या विभागात दिलेली आहेतच.

पुरुषांचा बाहेरख्यालीपणा हा कोणत्याही ऐतिहासिक लेखाचा विषय असू नये. "राजाला अनेक लग्न करणे शोभते" आणि जनाना बाळगणारा राजा मोठा - अशीच मानसिकता जर तत्कालीन समाजाची असेल तर एखाद्याने अनेक लग्ने केली म्हणून त्याला नावे ठेवणे अयोग्य आहे.

य. न. केळकरांनी लिहीलेला छत्रपती व पेशवे यांचे अनौरस वंशज हा निबंध वाचल्यावर कोणा एकावर अंगुलीनिर्देश करणे फार चुकीचे आहे हे जाणवेल. या निबंधावर वेळ मिळेल तसा लिहिण्याचा बेत आहे.

अवश्य. लवकर लिहा. वाचण्यास उत्सुक आहे.

दुसर्‍या बाजीरावाबद्दल

दुसरा बाजीराव या व्यक्तीची जेवढी निंदानालस्ती झाली आहे तेवढी मराठ्यांच्या इतिहासातल्या दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीची झाली नसेल. कोणीही उठावे व बाजीरावाला कोणतेही दुर्गुण चिकटवावे अशी परिस्थिती दिसते. या परिस्थितीला प्रामुख्याने इंग्रज कारणीभूत आहेत. त्यांनी स्वत: व सातारच्या महाराजांच्या मार्फत जाहीर नामे काढून बाजीरावाला जेवढे दुर्गुण चिकटवता येतील तेवढे चिकटवण्याचा प्रयत्न केला आहे.दुसर्‍या बाजीरावांच्या वर लिहिलेली माझे हे किंवा दुसरे हे ब्लॉगपोस्ट ज्यांना रुची असेल त्यांनी जरूर वाचावे.
आता राहिला मुद्दा या लेखातून निर्माण झालेल्या वादाचा.
मूळ लेख फक्त माहिती देणारा व निष्पक्ष आहे. त्यात बाजीरावांच्यावर किंवा पेशवे किंवा ब्राम्हण समाज यांच्यावर टीका करण्याचा अजिबात उद्देश नाही. श्री. यनावाला यांच्या प्रतिसादानंतर वाद उफाळून आलेला दिसतो. प्रत्यक्षात श्री. यनावाला यांचा प्रतिसाद खोडसाळपणे किंवा कोणाची निंदानालस्ती करण्यासाठी त्यांनी लिहिला आहे असे माझे तरी मत झाले नाही. परंतु श्री. यनावाला यांनी जी वाक्यरचना केली आहे त्यातून दुसरा अर्थ काढता येणे पूर्ण शक्य आहे. सर्व संकेतस्थळांवर अशा चुका शोधून काढणारी मंडळी असतातच. तशीच उपक्रमवर आहेत. माझा श्री. यनावाला यांना एवढाच मैत्रीपूर्ण सल्ला की त्यांनी आपली वाक्यरचना त्यातून दुसरा काही अर्थ निघत नाहीना याबाबत सतत जागरूक राहून करावी.
चन्द्रशेखर

धन्यवाद

श्री चंद्रशेखर अनुदिनीवरील दोन्ही लेख वाचले. त्यानिमित्ताने नवीन माहिती कळली. परंतु या परिस्थितीला प्रामुख्याने इंग्रज कारणीभूत आहेत. त्यांनी स्वत: व सातारच्या महाराजांच्या मार्फत जाहीर नामे काढून बाजीरावाला जेवढे दुर्गुण चिकटवता येतील तेवढे चिकटवण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानांचे समर्थन करता येऊ शकेल इतपत विश्वसनीय माहिती आढळली नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

बाजीराव आणि इंग्रज

श्री अक्षय यांना माझ्या ब्लॉगपोस्टमधे मी केलेली विधाने विश्वसनीय वाटली नाहीत. मी यासाठी जो संदर्भ ग्रंथ वापरला आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे

1893 मधे जुने मराठी दस्तऐवज प्रसिद्ध करण्याच्या हेतूने ठाण्यामधे मराठी दफ्तर या नावाची एक संस्था सुरू करण्यात आली होती. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 'मराठी दफ्तर रुमाल दुसरा ' या पुस्तकात चार लेखांक आहेत.या पुस्तकाचे संपादक विनायक लक्ष्मण भावे या नावाचे गृहस्थ आहेत. या पुस्तकातून मी माझ्या ब्लॉगपोस्टमधे वापरलेली सर्व माहिती घेतलेली आहे. वरील पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना रूची असेल ते हे पुस्तक मूळ स्वरूपात वाचू शकतात. या पुस्तकात दिलेले दस्त ऐवज हे अचूक असल्याची प्रमाणपत्रेही या पुस्तकात दिलेली आहेत.
चन्द्रशेखर

पुन्हा एकदा धन्यवाद

श्री चंद्रशेखर, संदर्भ दिल्याबद्दल अनेक आभार. माझ्या प्रतिसादातील 'विश्वसनीय' हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नव्हता. चुकीच्या शब्दरचनेबद्दल दिलगीर आहे. तुमच्या लेखातील माहिती अविश्वसनीय आहे असे मला म्हणायचे नव्हते. लेखांतील (निश्चितपणे विश्वसनीय) माहितीतून 'इंग्रजांनी अपप्रचार केल्याने दुसर्‍या बाजीरावास इतिहासात कमी लेखले जाते' या दाव्यास पुष्टी मिळत नाही, असे म्हणायचे होते. पहिल्या लेखातील वर्णन आणि श्री आजानुकर्ण यांच्या खालच्या प्रतिसादातील वर्णने (गोरा वर्ण, वाड्यावरील श्रीमंती) सुसंगत वाटतात.

जालावर हे पुस्तक कोठे उपलब्ध आहे, हे कृपया कळवावे. (ब्लॉगमधी माहिती पडताळून पाहण्यासाठी नाही तर खरोखर कुतूहल म्हणून.)

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

मम

जालावर हे पुस्तक कोठे उपलब्ध आहे, हे कृपया कळवावे. (ब्लॉगमधी माहिती पडताळून पाहण्यासाठी नाही तर खरोखर कुतूहल म्हणून.)

मीपण हेच म्हणतो. रावबाजीच्या पराक्रमाचे पुरावे माझ्याही वाचनात आले नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी दफ्तर रुमाल दुसरा

हे पुस्तक जालावर डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या संकेत स्थळाचा दुवा खाली दिला आहे.
दुवा

ज्यांना या विषयात रुची आहे त्यांनी जरूर पहावा.

चन्द्रशेखर

मराठी दफ्तर रुमाल दुसरा

माझ्या संग्रहात फक्त या पुस्तकाची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत या विषयाचा उहापोह करण्यात आलेला आहे. मूळ पुस्तक आपणास आंतरजालावरून डाऊनलोडच करावे लागेल. मी कोणत्या दुव्यावरून पुस्तकाचा हा भाग डाऊन लोड केला होता ते मला शोधून काढावे लागेल. प्रस्तावना हवी असल्यास व्य.नि. पाठवून मला ई-मेल पत्ता दिल्यास मी ही प्रस्तावना पाठवू शकतो

चन्द्रशेखर

चांगली माहिती, प्रेमकाव्य

माहिती चांगली आहे. प्रेमकाव्यही वाचनीय. तंतकवींपेक्षा पंतकवींची छाप दिसते.

पाहावे आपणासी आपण...

खरे तर इतिहासाबाबत ' लेट बायगॉन्स बी बायगॉन्स' (पुरलेली मढी उकरु नका) हा सल्ला मानणे व्यवहार्य असते. ज्यांनी थोर पराक्रम गाजवले, राज्यविस्तार केला, मुत्सद्दीपणा दाखवला ते लोक आणि ज्यांनी फंदफितुरी केली, रंगढंग केले, सर्वसामान्यांचे शिव्याशाप घेतले तेही लोक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. समजा रावबाजी हा नादान नसून अत्यंत बुद्धिमान होता, कामुक नसून सदाचारी होता आणि पळपुटा नसून शूर व दूरदृष्टीचा होता, असे सिद्ध केलेच तरी त्यामुळे काय फरक पडणार आहे? घडायचा तो इतिहास घडून गेलाच आहे. दुर्दैव म्हणजे स्वप्नरंजन आणि विभूतिपूजा यातून बाहेर पडायला आजही मराठी मन तयार होत नाही. दुसरे म्हणजे इतिहासातील ढळढळीत सत्ये वस्तुनिष्ठ आणि अलिप्त पद्धतीने स्वीकारण्याची आपली तयारी नसते. जेते इतिहास लिहितात आणि पराभूतांवर अन्याय करतात, हे गृहितक त्रिकालाबाधित सत्य मानून त्याच्या प्रकाशात आपण प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतो. काळाचे संदर्भ बदलले तरी युक्तिवाद तोच राहतो. पांडवांच्या कैवार्‍यांनी कर्ण, दुर्योधन यांना बदनाम केले, ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहून संभाजी महाराजांना बदनाम केले, इंग्रजांनी दुसर्‍या बाजीरावाला बदनाम केले ही निरनिराळी गाणी आपण एकाच चालीत म्हणू लागतो.
इतिहास म्हणजेच इति+ह+आस (हे असं असं घडलं होतं) म्हणूनच इतिहासकार प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे नोंद करून गप्प बसतात, पण ऐतिहासिक कादंबरीकार मात्र थोडे अधिक कल्पनास्वातंत्र्य घेतात आणि ललित शैलीने एखाद्या व्यक्तीरेखेची सहानुभूतीपूर्ण प्रतिमा रेखाटतात. शिवाजी सावंत यांची 'मृत्यूंजय' कादंबरी वाचून कर्णाचा दानशूरपणा, त्याची मित्रनिष्ठा, त्याच्यावर झालेला अन्याय हे वर्णन वाचून वाचक भारावून जातात, पण याच कर्णाबद्दल महाभारतात असलेल्या अधिकृत नोंदी लक्षात घेत नाहीत. दुर्योधनाबाबतही तेच घडते. हा कायम दुराचारी, गर्विष्ठ, पांडवांना पाण्यात पाहाणारा रंगवला गेला आहे, पण तो प्रजेला सुखी ठेवणारा उत्तम प्रशासक होता, हे लक्षात घेतले जात नाही. पांडव वनात असताना आपल्या पश्चात प्रजेची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी पाठवलेला हेर जेव्हा 'दुर्योधनाच्या राज्यात प्रजा सुखी समाधानी आहे' असे सांगतो तेव्हा द्रौपदी मत्सराने दातओठ खाते. ते श्लोक तसेच आहेत. जेत्यांनी बदललेले नाहीत. संभाजी महाराजांबाबत समकालीन पुरावे सापडत नाहीत तेव्हा मुघल, इंग्रज, पोर्तुगिज यांच्या दफ्तरी असलेल्या पत्रव्यवहारांचा आधार घ्यावा लागतो. (कारण त्यात फेरफार झाला असण्याची शक्यता कमीच). ना. सं. इनामदार यांच्या 'मंत्रावेगळा' सारख्या कादंबर्‍या वाचून रावबाजींबाबत सहानुभूती वाटली तरी समकालीनांचे लेखनही दुय्यम ठरवून चालत नाही.
पेशवाईतील रंगढंगाला रघुनाथरावांच्या काळातच सुरवात झाली होती. पण राघोबादादा हलक्या कानाचा होता, इंग्रजांशी संधान बांधून होता हे सांगताना त्याने पानिपतच्या युद्धाचा सूड उगवला होता आणि अटकेपर्यंत समशेर गाजवली होती, हेही इतिहासाने नमूद केले आहे. नाना फडणवीसांनी तर स्वतःच्या प्रबळ कामवासनेची कबूली स्वतःच लिहिलेल्या पत्रात दिली आहे. पण म्हणून नाना तेवढाच नव्हता. तो जिवंत होता तोवर इंग्रजांना मराठ्यांच्या दौलतीत पाय घालणे शक्य झाले नव्हते म्हणूनच नानाचा मृत्यू झाल्यावर 'मराठेशाहीतील शहाणपण लयाला गेले' अशी नोंद इंग्रज इतिहासकारांनी केली आहे.
विषयांतराबाबत क्षमस्व. मला म्हणायचे आहे, की दुसर्‍या बाजीरावाचे रंगढंग क्षणभर बाजूला ठेवले तरी वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे त्याने असे कोणते कर्तृत्व गाजवले आहे, की ज्याची इतिहासाने ठसठशीत नोंद केली आहे. या बाजीरावसाहेबांनी कोणत्याही मोहिमेत मर्दुमकी गाजवल्याचे वाचनात नाही. सातारकर छत्रपती, होळकर, शिंदे, पंतप्रतिनिधी हे त्याच्यापासून कधीच दुरावले होते, पण पेशव्यांचे पूर्वंपार निष्ठावान असलेले पटवर्धनांसारखे सरदार आणि जाणते कारभारीही त्याच्यापासून चार हात लांब राहणे पसंत करत होते. १८१८ ला बाजीरावाची ब्रह्मावर्तला रवानगी झाल्यावर कुणीही इंग्रजांविरुद्ध उठाव केला नाही. रावबाजीने विलासाखातर तसेच सरदारांना मोहिमखर्च देण्यासाठी सावकारांकडून भरमसाट कर्जे काढली होती. स्वतः पेन्शन घेऊन स्वारी ब्रह्मावर्ताला रवाना झाली आणि इकडे पुण्यातील साठ-सत्तर सावकार आयुष्यातून उठले. जनतेचे हाल तर विचारायलाच नकोत.
जाता जाता : रंगेलपणाबाबत एकट्या बाजीरावाला दोष देऊन चालणार नाही. इंग्रजांनी भारतातल्या राजे-महाराजांना पराभूत करून स्वतःच्या संस्थानांमध्ये गप्प बसवले त्यानंतर बहुतांश राजांनी घातलेला धुडगुस जनतेने चांगलाच अनुभवला. गायकवाडांसारखे प्रजाहितदक्ष राजे होते त्याच गुजरातमध्ये एक नबाब कुत्रा-कुत्रीची लग्न लावण्यात मग्न होते. इंदूरला होळकरांना गादीवरून जावे लागले, तो कट इंग्रजांनी रचलेला नव्हता. या संस्थानिकांच्या कामक्रीडा, विलास, वैभवाचे प्रदर्शन आणि विक्षिप्तपणा व मूर्खपणाच्या किश्श्यांवर मागे एक पुस्तक वाचनात आले होते. नाव आठवल्यास सांगतो.

(मी वाचक आहे, विद्वान नाही, याची मला जाणीव आहे आणि कुणाला खोडून काढणे, हाही माझा हेतू नाही. ही केवळ चर्चा असल्याने कुणीही काही व्यक्तीगत घेऊ नये, ही विनंती )

टाळ्या

वरील मतांशी (दुसर्‍या बाजीरावाच्या कर्तृत्वाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भाग सोडून) सहमत आहे. उत्तम शब्दांत मत मांडले आहे. प्रतिसाद आवडला. धन्यवाद!

फक्त

खरे तर इतिहासाबाबत ' लेट बायगॉन्स बी बायगॉन्स' (पुरलेली मढी उकरु नका) हा सल्ला मानणे व्यवहार्य असते.

याबाबत माझे म्हणणे "नो योर हिस्टरी". माणसाने आपल्या पूर्वजांची माहिती स्वच्छ मनाने करून घेण्यात काहीही गैर नाही. (ते तसे होत नाही हा भाग वेगळा) पण ज्यांना रस आहे त्यांनी अवश्य करावे आणि ज्यांचे गैरसमज आहेत ते दूर करावेत.

DSC00034

पेशवाईतील रंगढंगाला रघुनाथरावांच्या काळातच सुरवात झाली होती.

मला वाटते नानासाहेबांच्या. :-) पण असो.

माझे मत आजची स्थिती पाहून...

प्रियाली,
आपण म्हणता ते मान्य आहे. प्रत्येकाने आपला इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे असतेच, परंतु त्यापासून बोध घेऊन चुका सुधारणेही गरजेचे असते अन्यथा 'इतिहासाची पुनरावृत्ती होते' हे वाक्य नेहमी सत्य ठरते. असा बोध घेऊन पूर्वजांनी केल्याप्रमाणे चुका टाळणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धूर्त मुत्सद्दी एखादाच निघतो. भारतीय मानसिकता किंवा वेडेपणा कसा असतो, याचे उदाहरण पाहा. घोरीने अठरा वेळा पृथ्वीराज चौहानवर स्वार्‍या केल्या. प्रत्येक वेळी तो आणि त्याचे सैन्य मार खाऊन पळून जायचे. घोरी नेहमीप्रमाणे पृथ्वीराजला जीवदान मागायचा आणि स्वतःच्या पराक्रमाची छबी न्याहाळत बसलेला पृथ्वीराज त्याला हसत हसत जाऊ द्यायचा. पराभव झाला, की घोरी नाटकीपणाने म्हणत असे, 'पृथ्वीराज! मला एकदा तरी तुला हरवायचे आहे रे' (जणू काही मैत्रीपूर्ण सामनाच) आणि एकोणिसाव्या लढाईत जेव्हा पृथ्वीराज घोरीच्या तावडीत सापडला तेव्हा घोरीने दयामाया न दाखवता त्याचे डोळे तापल्या सांडशीने उखडून काढले.
याउलट शिवाजी महाराज कसे सावध होते पाहा. अफझलखान दगाबाज आहे हे माहीत असल्याने त्यांनी त्याला परत जाण्याची संधी दिली नाही. ते भेटीला जाताना त्याला येन केन प्रकारेण ठार मारण्याची तयारी करूनच गेले होते. नेसरीच्या खिंडीत अडकलेल्या बेहलोलखानाला सरसेनापती प्रतापराव गुजरांनी उदार मनाने जाऊ दिले तेव्हा महाराज प्रचंड चिडले. 'खानासी सल्ला काय निमित्त्ये केला?' असा जाब त्यांनी विचारला. भावनेच्या भरात प्रतापरावांनी निष्ठावान सहा सरदारांसह स्वतःला बेहलोलखानावर घालून घेतले आणि त्याच बेहलोलखानाने प्रतापरावांचे उपकार विसरून त्यांची खांडोळी केली.
मला वाटते इतिहास ध्यानी धरावा तो असा. पण दुर्दैव म्हणजे आधी उल्लेखल्याप्रमाणे मराठी मन हे स्मृतिरंजन आणि विभूतिपूजा यातून बाहेरच येत नाही. त्यातून आजचा काळ आपण पाहातोच आहे. समाजात कलह माजण्यास इतिहासच कारणीभूत ठरतो आहे. सत्य इतिहास जाणण्यापेक्षा 'गप्प बसा. आम्ही सांगतो तोच इतिहास' असा माथेफिरूपणा वाढीस लागला आहे. कर्तृत्ववान लोकांचे मोजमापही जातीच्या निकषांवर केले जात आहे. मग 'जुने जाऊद्या मरणालागुनि' हीच भावना मनात येते. त्या अर्थाने मी 'पुरलेली मढी उकरू नयेत' असा उल्लेख केला. पण परिस्थिती अभ्यासाला अनुकूल असेल तर तुमचे म्हणणे हा मूलभूत नियम आहे.

मराठेशाहीत रंगढंगाला खरे तर पेशव्यांपूर्वी खुद्द छत्रपतींनीच सुरवात केली होती. शाहू महाराजांनी बाजीरावला चांगल्या सुस्वरूप बटक्या सातार्‍याला पाठवून देण्यास सांगितले होते. लढाईच्या धामधुमीत बाजीरावला ते जमले नाही तेव्हा शाहू महाराजांनी पत्र पाठवून त्याच्यावर आगपाखड केली. त्यावर बाजीराव वैतागला. 'आम्ही येथे दिल्लीपावेतो मोहिमा आखत असताना आणि रक्त सांडत असताना स्वामींना फिकीर पडलीय बटक्यांची' असे तो उद्विग्नतेने बोलला. शाहूंसाठी सुस्वरूप बटक्या निवडण्याचे व खरेदी करण्याचे काम बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब यांनी हौसेने केले. हे नानासाहेब तरुणवयापासूनच हौशी होते. पानिपतच्या पराभवानंतर तीन महिन्यात त्यांचा पर्वतीवर आजाराने मृत्यू झाला. मात्र तेवढ्याही काळात तब्येत बरी नसताना त्यांनी एका अल्पवयीन देशस्थ ब्राह्मण मुलीशी विवाह केला होता, असे मी कुठेतरी वाचले होते. (तपशील मात्र माहीत नाही) पण नानासाहेब पेशवे पराक्रमी होते. त्यांनी तरूणपणात मोहिमा गाजवल्या. मोठे राजकारण तडीस लावले. ते श्रेष्ठ गाणपत्य (गणेशभक्त) होते आणि गुलहौशी असले तरी मर्यादेत. रघुनाथराव किंवा रावबाजीसारखे कामपिपासू नव्हते. असो.

पृथ्वीराज रासो

आपल्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच.

खालील प्रतिसाद मूळ चर्चेशी अवांतर आहे.

घोरीने अठरा वेळा पृथ्वीराज चौहानवर स्वार्‍या केल्या. प्रत्येक वेळी तो आणि त्याचे सैन्य मार खाऊन पळून जायचे. घोरी नेहमीप्रमाणे पृथ्वीराजला जीवदान मागायचा आणि स्वतःच्या पराक्रमाची छबी न्याहाळत बसलेला पृथ्वीराज त्याला हसत हसत जाऊ द्यायचा. पराभव झाला, की घोरी नाटकीपणाने म्हणत असे, 'पृथ्वीराज! मला एकदा तरी तुला हरवायचे आहे रे' (जणू काही मैत्रीपूर्ण सामनाच) आणि एकोणिसाव्या लढाईत जेव्हा पृथ्वीराज घोरीच्या तावडीत सापडला तेव्हा घोरीने दयामाया न दाखवता त्याचे डोळे तापल्या सांडशीने उखडून काढले.

पृथ्वीराज रासो हे काव्य सोडल्यास घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात नेमके काय झाले हे कळण्यास मार्ग आहे का? म्हणजे, दुसरा एखादा लिखित/ मौखिक इतिहास उपलब्ध आहे का? अन्यथा, चांदच्या या काव्यात भाटगिरी अधिक असावी अशी अटकळ आहे कारण पृथ्वीराजचे डोळे गेल्यावर शब्दवेधी बाणाने तो घोरीचा खात्मा करतो असे वर्णनही आहे. घोरीने पृथ्वीराजचा पराभव केला हे निश्चित परंतु पुढील तपशील खरे का खोटे हे मला माहित नाही.

मूळ चर्चेशी ही उपचर्चा अवांतर असल्याने आपण खरडवहीतून कळवले तर आवडेल.

राघोबा

योगप्रभूंचा प्रतिसाद अत्यंत संयत आहे.

>>इंग्रजांशी संधान बांधून होता हे सांगताना त्याने पानिपतच्या युद्धाचा सूड उगवला होता आणि अटकेपर्यंत समशेर गाजवली होती, हेही इतिहासाने नमूद केले आहे.

अनेकदा माझ्या मनात विचार येतो, पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर राघोबाला पेशवा न करता माधवरावांना पेशवे करणे यातच पेशवाईच्या नाशाची बीजे आहेत का?
१७६१ मध्ये माधवराव १६ वर्षे वयाचे होते आणि राघोबांनी अटकेपार झेंडे रोवण्याचा पराक्रम केला होता हे लक्षात घेता त्यावेळी राघोबालाच पेशवा करणे (पेशवा भट घराण्यातलाच हवा असा आग्रहच होता तर) योग्य होते. माधवराव नंतर उत्तम पेशवे ठरले ही हाईंडसाईट म्हणून ठीक असली तरी त्यावेळी राघोबाला डावलून १६ वर्षांच्या अननुभवी माधवरावांना पेशवा करणे अयोग्य म्हणता येईल. त्यातून राघोबा दुखावला जाऊन त्याने पेशव्यांविरुद्ध आणि मराठे सरदारांविरुद्ध कारस्थाने केली असे वाटते. राघोबाला पेशवा केला असता तर कदाचित इतिहास वेगळा झाला असता.

अर्थात या पुन्हा जर तर च्या गोष्टी आहेत.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कोणजाणे

राघोबाला पेशवा केला असता तर कदाचित इतिहास वेगळा झाला असता.

उत्तम योद्धा किंवा सेनापती उत्तम शासनकर्ताही असेल असा कोठे नियम नाही. :-)

पानिपत १७६१

अनेकदा माझ्या मनात विचार येतो, पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर राघोबाला पेशवा न करता माधवरावांना पेशवे करणे यातच पेशवाईच्या नाशाची बीजे आहेत का?

हे त्र्यं. शं शेजवलकरांचे पुस्तक वाचले तर बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो. रघुनाथराव पराक्रमी होता यात शंकाच नाही. रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांनी १७५८ मध्ये अटकेपार झेंडे लावल्यावर रघुनाथरावाची कीर्ती भारतभर इतकेच काय इराणपर्यंत पसरली होती. इ. स. १७५९ मध्ये सदाशिवभाऊने गोविंदपंत बुंदेल्यांना लिहिलेल्या पत्रात पुढच्या वर्षात रघुनाथराव उत्तरेत येतील असे लिहिले होते. दरम्यान अब्दालीपासून दिल्लीचे रक्षण करण्याची जबाबदारी दत्ताजी शिंद्याने एकट्याने शिरावर घेतली , जानेवारी १७६० मध्ये अब्दालीने दिल्लीजवळ अनेक ठिकाणी एकदम यमुना ओलांडण्याचा उपक्रम केल्याने दत्ताजीला अब्दालीला आवरणे शक्य झाले नाही आणि त्यात एका तोफेचा गोळा लागून त्याचा मृत्यू झाला.

९ मार्च १७६० मध्ये नानासाहेब पेशवा नगरजवळ रंगपंचमी खेळत असताना दत्ताजीच्या मृत्यूची बातमी आली. त्रिवर्ग पेशवे म्हणजे नानासाहेब, भाऊ आणि विश्वासराव (बहुधा गोपिकाबाईपण) यांनी चर्चा करून मोहिमेवर भाऊची रवानगी करण्याचे ठरवले. भाऊला कारकुनीबरोबरच युद्धशास्त्रही कळते असा समज होता. पण प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव एका छोट्या लढाईपुरताच मर्यादित होता. रघुनाथरावाने मोहिमेवर जाण्यासाठी १ कोट रूपये मागितले आणि त्यासाठी तो अडून बसला असेही एकेठिकाणी वाचले आहे. कदाचित् आपल्याशिवाय पेशव्याला पर्याय नाही हे राघोबाला माहिती असल्याने तो अडून बसला असावा.

मला असे वाटते की रघुनाथरावा ऐवजी भाऊला पानिपतावर पाठवणे हीच चूक झाली. पण राघोबाला न पाठवता भाऊला पाठवण्यात गोपिकाबाईचा असा विचार असावा, समजा राघोबाला पाठवले तर तो युद्ध जिंकून ये ईल पण नानासाहेबानंतर पेशवेपदावर दावा सांगेल, मग विश्वासरावाची संधी जाईल. त्यापेक्षा भाऊ बरा. जिंकला तरी विश्वासरावाच्या पेशवेपदाला धोका नाही. बहुधा नानासाहेबाची तब्येत त्याकाळी बरीच खालावली होती त्यामुळे त्याच्या मृत्यूची चाहूल गोपिकाबाईला असावी.

पुढे पानिपत झाले. भाऊऐवजी राघोबाला पाठवले असते तर अब्दाली समोर आलाच नसता. दुसरे म्हणजे साठ हजार फौजेबरोबर चाळीस ते पन्नास हजार बायका आणि बाजारबुणगे त्याने नेले नसते. आणि पानिपतचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता.

त्यानंतर दोन अडीच महिन्यात नानासाहेबाचा मृत्यू झाला. रघुनाथराव पानिपतावर न गेल्याबद्दल सार्वत्रिक नाराजी असल्याने माधवराव पेशवा झाला. माधवरावाने प्रेमाने राघोबाला आटोक्यात ठेवले होते. माधवरावाच्या मृत्यूनंतर मात्र किंचित् वेडसर नारायणरावाऐवजी रघुनाथरावाला पेशवा करायला हरकत नव्हती. नारायणरावाच्या खुनामुळे आधीच अप्रिय असलेला रघुनाथराव आणखीनच अप्रिय झाला. जन्मल्या जन्मल्याच सवाई माधवराव पेशवा झाला तरी सर्व सूत्रे नाना फडणीस आणि महादजी शिंदे यांच्या हाती होती. हे दोघे पानिपतावरून कसाबसा जीव वाचवून आल्याने त्यांचा रघुनाथरावावर विशेष राग*. त्यामुळे पुढे हे दोघे त्याच्या मागे सूडकर्‍यासारखे लागले. सुमारे दहा वर्षे जीव वाचवण्यासाठी सतत दगदग, धावपळ , रानोमाळ भटकंती यामुळे रघुनाथरावाचा १७८३ मध्ये मृत्यू झाला.

नाना, महादजी, राघोबा यांचे हर्षामर्ष पानिपतामुळे निर्माण झाले असे विधान शेजवलकरांनी केले ते पटण्यासारखे आहे.

* पेशव्याच्या दरबारामध्ये पेशवा - शिंदे आणि रघुनाथराव - होळकर अश्या दोन फळ्या होत्या. पैकी दत्ताजी शिंदे पेशव्याच्या कर्जाची चिंता करत असे आणि नियमितपणे पेशव्याला वसूल पाठवत असे. मल्हाररावाने पेशव्याला वसूल दिला नाही. पानिपतचे युद्ध हे दत्ताजीच्या खुनाचा सूड असल्याने त्यात सर्व शिंदे लढले तर होळकर लढाईला तोंड फुटताच पळाले. बुराडीच्या लढाईच्या वेळीसुद्धा नानासाहेब पेशव्याने दत्ताजीच्या मदतीला मल्हाररावाने जावे असा रास्त सल्ला दिला होता, तो मल्हाररावाने मानला नाही आणि दत्ताजीलाही "मी एकटाच सगळे बघतो" हा अति - आत्मविश्वास नडला.

विनायक

माळगावकर/शेजवलकर

काही दिवसांपूर्वी मनोहर माळगावकर गेले. इतिहासावर कणखर कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या.
त्यांची कान्होजी आंग्रेंवरील कादंबरीतील राजाराम आणि त्यानंतर शाहू आणि पहिले पेशवे यांचे राजकारण वाचून माझे डोळे उघडले होते.
शेजवलकरांचे पानीपत हे पुस्तक मराठीतील अक्षर वाङ्मयातील एक आहे. त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

नानासाहेब पेशवे कुठल्या दुर्धर रोगाने आजारी होते याबद्दल मी कुठेतरी वाचले होते. पण नीट संदर्भ नसल्याने मी स्पष्ट लिहित नाही.
पानिपताच्या वेळी नानासाहेब पेशवे दुसरी मोहिम उघडणार होते. त्यामुळे इकडचा दबाव चांगलाच कमी झाला असता. मात्र ही मोहीम उभारण्यास त्यांच्या वैयक्तिक (त्यांनी या दरम्यान लग्न केले?) अडचणी मुळे वेळ लागला. यावेळी गोपिकाबाई निर्णय घेत होत्या हे काही पटत नाही. नानासाहेबांनी पानिपत युद्धानंतर मोहीम उघडली आणि या मोहिमे दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. शेजवलकरांचे पुस्तक या सर्वावर चांगला प्रकाश टाकते. (पण हाती नसल्याने अधिक लिहू शकत नाही.)

प्रमोद

शेजवलकर

शेजवलकरांचे पानिपत हे पुस्तक मराठीतील अक्षर वाङ्मयातील एक आहे.

केवळ पानिपतच नव्हे तर शेजवलरांचा शब्द न् शब्द चोख आहे. पानिपत-१७६१ सोबतच त्यांच्या निवडक लेखांचे राजा दीक्षित यांनी संपादित केलेले पुस्तकही प्रत्येकाने संग्रही बाळगावे. लोकमान्य टिळकांना प्रतिगामी मानणाऱ्यांनी (अज्ञानामुळे मी ही एके काळी मानायचो) , शेजवलकरांचा टिळकांवरचा लेख अवश्य वाचावा.

मराठी समाजात इतका प्रतिभावंत इतिहासकार जन्मावा हे महाराष्ट्राचे सुदैव आणि त्यांना अल्पायुष्य व योग्य ती कीर्ती-मानसन्मान लाभू नये हे महाराष्ट्राचे दुर्दैव. (शेजवलकरांच्या बाबतीतही लोक कोकणस्थ-कऱ्हाडे वादात रंगले ही तर दुर्दैवाची परमावधी.) शेजवलकरांचा शिवचरित्राचा प्रकल्प पुरा झाला असता तर एक अनमोल दस्तावेज मराठी ऐतिहासिक लेखनात समाविष्ट झाला असता.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर