दुसर्या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका
दुसर्या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका
मागे विश्वास कल्याणकर यांनी इतिहासातल्या सहली या य,न,केळकर लिखित पुस्तकातील काही माहिती दिली होती. माझ्या कडे खंड 2 मिळाला. त्यात दुसर्या बाजीरावने केलेल्या लग्नांसंबंधी व त्याच्या बायकांसंबंधी एक पूर्ण प्रकरण आहे. लेखक पहिल्यांदाच सांगतात की यात रक्षा, नाटकशाळा, ख़ासेचाकरीतल्या स्त्रिया आणि प्रीतिपात्रे म्हणून बोभाटा झालेल्या प्रतिष्ठित घरातल्या स्त्रिया यांचा समावेश नाही. आपल्याकडे इत्तिहासातील पात्रांविषयी लिहिताना कोणा हल्लीच्या माणसांना राग कसा येणार नाही याची भरपूर खबरदारी घ्यावी लागते. दुसरा बाजीराव मात्र यात मोडत नाही तेव्हा नि:शंक मनाने मी लिहित आहे. मात्र त्यासोबत असे ही म्हणतो की कदाचित अशी लग्ने ही दुसर्या बाजीरावाचीच झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. याच पुस्तकात 'छत्रपती व पेशवे यांचे अनौरस वंशज' असा एक निबंध आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी.
दुसरा बाजीराव काळाच्या मानाने खूप जगला (जन्म 1775 मृत्यु 1851). या काळात त्याची एकंदर 11 लग्ने झाली. त्याच्या लग्नांचा तक्ता खालील प्रमाणे. (हा तक्ता मी तयार केला आहे. काही चुका होऊ शकतात.
क्र. साल नाव मृत्यु
1 1786 भागिरथी 1793
2 1793 सरस्वती 1797
3 1797 राधा 1806
4 1806 वाराणशी 1821+
5 1808 वेणु (कुसा) 1816
6 1816 सरस्वती 1821+
7 1820+ सत्यभामा
8 1820+ गंगाबाई
9 1820+ मैनाबाई
10 1820+ सईबाई
11 1820+ ??
लग्नाच्या वेळी प्रत्येकीचे वय 7 ते 9 दरम्यान असावे. (काही जणीँच्या बाबतीत वयाचा असा उल्लेख दिसतो.) बाजीराव ब्रह्मावर्तास (1818 साली पेशवाई बुडाली) गेल्यानंतर 5 लग्ने केली पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. बाजीरावाची मुले अल्पायुषी ठरत होती. वाराणशी व वेणू यांना पहिल्यांदा मुले झाली पण ती वर्षभरात गेली.
आरोग्य:
त्यावेळची आरोग्याची स्थिती कशी असावी याचा थोडाफार अंदाज करता येतो.
पहिल्या सहाजणींपैकी चौघीजणी 16 वर्षाच्या आतल्या असताना मृत्युमुखी पडल्या. शेवटची सरस्वती पण कदाचित तेवढीच जगली असावी. वाराणशी जास्त जगली असे म्हणता तिचा मृत्युही 25 ते 30 मध्ये झाला असणार. वाराणशीला फिट्स येत असत. तिला पिशाच्चबाधा होती म्हणून उपचार चालले होते. यासाठी त्याने नारायण नागबळी काढला होता. साधु फकीर झाले होते पण उपयोग झाला नाही. यावेळची एक उल्लेखनीय बाब म्हणजे बाजीरावाने मुद्दाम मुंबईहून डॉक्टर बोलावून वाराणशीच्या देवी काढल्या होत्या. त्यानंतर पुण्यात त्याने एक दवाखाना काढून दिला होता. पुण्यात देवी काढून घेण्याचे एक सत्र सुरु झाले.
सामाजिक परिस्थिती.
मुलींची 7 ते 9 वर्षांपर्यंत होत असत. 12 वर्षाची मुलगी झाली आणि लग्न झाले नाही तर मोठी आपत्ती मानली जात असे. औरस संतती हवी असेल तर लग्ना शिवाय उपाय नसे. मग कितीही घोडनवरा असला तरी त्याचे लग्न अल्पवयीन मुलीशीच होणार हे ठरलेले. यामुळे अशा घोडनवर्यांतची पंचाईत होत असे. लग्ने जातीतच होणार म्हणजे आणि जातीची लोकसंख्या कमी असेल तर तीही एक पंचाईत.
बाजीरावाची काही लग्ने कोणाच्या तरी आश्रितांच्या मुलींशी झाली. या लग्नांमूळे त्यांच्या सासर्यां ना बरीच कमाई झाली. एक लग्न त्यांच्या विरोधकाच्या नातीशी झाले. हा विरोध या लग्नानंतरही चालू होता.
प्रेमपत्रे:
बाजीरावाची 5वी बायको वेणू हिने लिहिलेली प्रेमपत्रे कवितांच्या रुपात उपलब्ध आहेत. त्यातील काही.
बहुत दिवस जाले स्वारिला नाथराया ।
विरहपदर ज्वाला मी शकेना वराया ॥
निशीदिनिं मन माझे वेधिले प्राण-मित्रे ।
सदनिं कधिं सख्यातें मी विलोकीन नेत्रे ॥
मी आपुल्या निशीदिनी जवळी असावें ।
हे इच्छितें दृढ सख्या स्वमनी असावें ॥
मी एकलीच सदनी शयनी वसावें ।
हे योग प्राप्त मजला कधिही नसावे ॥
Comments
वाचवत नव्हते
शेजवलकरांचे पानिपत हे पुस्तक मराठीतील अक्षर वाङ्मयातील एक आहे.
शेजवलकरांचे पुस्तक जेंव्हा पहील्यांदा हातात घेतले होते, तेंव्हा वाचवत नव्हते इतकी अस्वस्थता आली होती...
शेजवलकरांचा टिळकांवरचा लेख अवश्य वाचावा.
कुठे मिळेल त्याचा संदर्भ मिळाला तर अवश्य सांगावा. टिळकांवर वेगळ्याच पद्धतीने लिहीलेले गोविंद तळवळकरांचे, "बाळ गंगाधर टिळक" हे पुस्तक देखील अशा अर्थाने वाचनीय आहे.
मराठी समाजात इतका प्रतिभावंत इतिहासकार जन्मावा हे महाराष्ट्राचे सुदैव आणि त्यांना अल्पायुष्य व योग्य ती कीर्ती-मानसन्मान लाभू नये हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
सहमत...
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
शेजवलकरांवर कुरुंदकर
मी शेजवलकरांचे लिखाण वाचलेले नाही. पण नुकताच कुरुंदकरांच्या 'मागोवा' या पुस्तकात त्यांनी शेजवलकरांवर लिहिलेला लेख वाचण्यात आला. त्यातील काही विधाने खाली देत आहे.
-शैली म्हणून शेजवलकर शिव्या देतांना पेशवे व स्तुती करताना मराठे असा शब्द वापरतात.
-आज विसाव्या शतकात जगाचा इतिहास वाचून जे आपल्याला वाटते त्या प्रतिक्रिया मुद्रणपूर्व युगात पेशव्यांच्या मनात उद्भवायला हव्या होत्या, असा शेजवलकरांचा आग्रह आहे.
-एकदा एखाद्या कल्पनेच्या आहारी गेले म्हणजे राजवाडे यांच्याप्रमाणे शेजवलकरांचाही तोल सूटतो.
इतरही अनेक विधाने आहेत. तो महत्त्वाचा मुद्दा नाही. कुरुंदकरांनी शेजवलकरांच्या विश्लेषणाचे महत्त्वही या लेखात मान्य केले आहे. निव्वळ टिका केलेली नाही. पण 'भाबड्या स्तुतिपाठकांनी त्यांची (शेजवलकरांची) बावळट पूजा बांधण्यापेक्षा निदान फटकळ मतभेद दाखवून त्यांचे ग्रंथ नवी पिढी बारकाईने वाचीत आहे, हे नजरेस आणणे मला इष्ट वाटते' असे कुरुंदकर म्हणतात. श्री आजानुकर्ण यांनी 'शब्द न् शब्द चोख' असा दावा करतांना शेजवलकरांचे लिखाण 'बारकाईने' वाचले असावे, अशी अपेक्षा करतो.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
आणखी काही
शैली म्हणून शेजवलकर शिव्या देतांना पेशवे व स्तुती करताना मराठे असा शब्द वापरतात.
त्याच लेखात कुरुंदकर असेही म्हटतात "काही इतिहासकार (बहुधा रोख राजवाड्यांवर असावा) स्तुती करताना पेशवे आणि शिव्या देताना मराठे अशी शैली वापरत त्याचा हा व्यत्यास असावा. "
शेजवलकर विकारी, भावनाप्रधान होते असे कुरुंदकरांनी म्हटले आहे. शेजवलकर नवीन पुरावा नाकारीत नसत परंतु एका कोपर्यात नोंदवून जुनेच प्रवचन सुरू ठेवीत.
कुरुंदकरांचे सर्वात महत्ताचे वाक्य म्हणजे "हा मनुष्य हयातभर वाईटपणा पदरात घेऊन अप्रिय सत्ये सांगत राहिला", माझ्या मते हेच काम कुरुंदकरही करत होते.
शेवटी या दोघांशी माझे ज्या एक - दोन ठिकाणी मतभेद आहेत ते लिहितो.
शेजवलकर नानासाहेब पेशव्यावर टीका करताना लिहितात "प्लासीची लढाई झाली त्यावेळी पेशव्याने अलिवर्दीखानाबरोबर (सिराजौद्दौल्याचा आजा) संरक्षणाचा केलेला करार लागू होता, त्यानुसार नानासाहेबाने सिराजुद्दौल्याच्या मदतीला जायला हवे होते."
इथे माझे मत वेगळे आहे. पेशव्याने क्लाईव्हला युद्धात हरवून बंगाल मराठी राज्यात आणला असता तर हरकत नव्हती, पण क्लाईव्हविरुद्ध सिराजुदौल्याला मदत देऊन त्याची राजवट बंगालात स्थिर करणे हे काही शहाणपणाचे नव्हते. सिराजुद्दौल्याच्या विकृत कामक्रीडा, मनमानी , जुलुमी आणि धर्मांध राज्यकारभाराला बहुसंख्य हिंदू प्रजा कंटाळली होती. त्यामुळे क्लाईव्हच्या काठीने साप मरत असेल तर ठीकच आहे असा विचार नानासाहेबाने केला असेल तर योग्यच आहे. इंग्रजांचे राज्य आल्यावर हिंदू प्रजेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुण्यात एका व्याख्यानात कुरुंदकर म्हणाले होते "नाना फडणीसाने आयुष्यात कुठल्या मौजमजा केल्या ज्या आपल्याला आज करता येत नाहीत हे बघण्यापेक्षा त्याच्या कुठल्या चुका देशाला महागात पडल्या हे बघितले पाहिजे (हा टोला विजय तेंडुलकरांना होता) . टिपू सुलतानाने नाना फडणीसाकडे असा प्रस्ताव आणला होता की टिपू, निजाम आणि पेशवे मिळून इंग्रजांशी लढू. पण तो नानाने फेटाळून लावला. इतकेच नाही तर स्वतःच्या सुरक्षेची हमी ज्या तीन व्यक्तींकरवी टिपूने द्यायची होती त्यात एक नाव इंग्रजाचे होते."
टिपूला एकही हिंदू तर सोडाच मुसलमानसुद्धा सत्ताधारी मित्र उरला नाही. निजाम एक तर इंग्रजांचा मांडलिक. तो इंग्रजांविरुद्ध सामील होईल ही शक्यता नव्हती. दुसरे म्हणजे टिपूच्या धर्मांध, विश्वासघातकी स्वभावामुळे तो कोणालाच भरवशाचा वाटत नव्हता. कूर्गी नायरांचे लाखांच्या संख्येने धर्मांतर (एका दिवसात ५०, ००० लोक मुसलमान केले), शेजारच्या मुसलमान संस्थानिकाला भेटीला बोलावून कपटाने मारले वगैरे अनेक गोष्टींमुळे कोणीही शहाण्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तसाच नानानेही ठेवला नाही यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. टिपूची अखेरही निजामाने फितुरी केल्याने श्रीरंगपट्टणमच्या लढाईत झाली.
कुरुंदकरांनी त्याच व्याख्यानात आणखी एक गोष्ट सांगितली ती त्यावेळी पटली पण जास्त वाचन केल्यावर ती बरोबर नसल्याचे समजले.
"शिवाजीच्या निधनानंतर २७ वर्षे सामान्य लोक मिळेल ते हत्यार घेऊन औरंगजेबाशी लढले इतके सामान्य लोकांना शिवाजीबद्दल प्रेम होते. तशी गोष्ट पेशवाई बुडाल्यावर झाली नाही, कारण पेशव्याची राजवट प्रजेला सुखाची नव्हती."
पेशवाई शिवाजीच्या राज्याइतकी सुखाची नव्हती हे उघडच आहे. पण लोक लढले त्याचे खरे कारण वेगळे आहे असे मला वाटते.
शिवाजीने वतनदारीची पद्धत रद्द केली होती हे सर्वज्ञात आहेच. संभाजीनेही वतने तोडून न देण्याचे धोरण बर्याच अंशी राबवले. मात्र राजारामाने जिंजीला बसून लोकांना त्यांची वतने परत द्यायचा सपाटा लावला. रियासतकार सरदेसाईंनी याबद्दल असे लिहिले आहे की वतनांबद्दल खंडो बल्लाळाच्या सहीच इतके कागद मिळतात की वाचून कंटाळा येतो. आता राजाराम वतन देणार, पण ते ताब्यात औरंगजेबाच्या. त्यामुळे औरंगजेबाशी लढणे आले. किंवा आधी ताब्यात असलेले आपले वतन औरंगजेबाने घेतले तरी त्याच्याशी लढणे आले. संताजी आणि धनाजीमध्ये सुद्धा मतभेद यावरूनच झाले. संताजी वतने तोडून देऊ नयेत या मताचा तर धनाजी वतने देण्याच्या बाजूने. लोक धनाजीजडे जात, त्याच्याकरवी राजारामकडून वतनाचा कागद मिळवीत आणि मग औरंगजेबाशी लढत. जर राजारामाने वतने तोडून दिली नसती तर किती लोक लढले असते?
शिवाजीच्या राज्यावर लोकांचे प्रेम खरोखर असते तर संभाजीला औरंगजेबाने कैद करून पुढे मारले त्यावेळी कोणीच कसे लढले नाही? शेवटी लोक उदात ध्येयापेक्षा स्वार्थाकरता लढतात हे मला रियासतकार सरदेसाईंच्या पुस्तकावरून समजले. त्यांची पुस्तके खरोख्रर अभिनिवेशरहित असतात.
विनायक
विनायक
आक्षेप योग्यच
कुरुंदकरांचा 'मागोवा' या पुस्तकातील तो लेख मी वाचला आहे. श्री. विनायक यांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्यभर वाईटपणा घेऊन त्यांना सापडले ते सत्य त्यांनी लोकांसमोर मांडले याच्याशी मी सहमत आहे. किंबहुना यापूर्वी मांडलेली एखादी गोष्ट नवीन पुराव्याधारे खोटी ठरत असेल तर ते मान्य करण्याचाही प्रांजळपणा दाखवला. (मला वाटते तितक्याच प्रतिभावान व विकारी असलेल्या राजवाड्यांच्या बाबतीत तसे नव्हते. चू.भू.द्या.घ्या.) शेजवलकरांनी पेशव्यांवर केलेली टीका अनाठायी नाही. त्याची माहिती पानिपत या पुस्तकात व सरदेसाईंच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत मिळेल.
शेजवलकरांचे लिखाण बारकाईने म्हणजे नेमके कसे वाचावे हे मला समजले नाही. मला उपलब्ध असलेल्या व वाचनात आलेल्या ऐतिहासिक पुस्तकांवरुन मला त्यांचे लेखन चोख वाटते. इतिहासात माझा रस हा एक वाचक यापुरताच आहे. मला इतिहास संशोधक व्हायचे नाही. उद्या शेजवलकरांचे मुद्दे सप्रमाण खोडणारे पुस्तक माझ्या वाचनात आले तर मी माझे मत अवश्य बदलीन. त्यात मला काहीही वाईट वाटणार नाही. फलज्योतिष, टिळक, पेशवे यासंबंधातील माझी पूर्वीची मते व आताची मते यात फरक आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बारकाई
'बारकाईने' म्हणजे काय अपेक्षित होते ते कुरुंदकरच सांगू शकतील. पण माझ्यापुरता अर्थ लावायचा झाल्यास ऐतिहासिक विश्लेषण वाचतांना २०व्या शतकातील ज्ञान, नीतीमत्ता यांची व ऐतिहासिक काळातील परिस्थितीत गल्लत होण्याची शक्यता वाचन करतांना टाळणे अशासारख्या गोष्टी असाव्यात. मीही वाचकच आहे. किंबहूना मी शेजवलकर वा सरदेसायांचे काहीच वाचलेले नसल्याने तुमच्यापेक्षा बराच नवखा. तेव्हा 'शब्द न् शब्द' चोख असल्याचे धाडसी विधान कुणाच्या लिखाणाबाबत मी करेन असे मला वाटत नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
अच्छा
मराठीत उपलब्ध असलेल्या राजवाडे, सरदेसाई आणि शेजवलकर या इतिहासकारांपैकी शेजवलकरांचे लेखन मला चोख वाटते. मी राजवाड्यांचे काहीच लेख वाचले आहेत. आणि राजवाड्यांवर झालेली टीकाच जास्त वाचली आहे त्यामुळे माझा पूर्वग्रहही यास कारणीभूत असेल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा, जाणे तो शहाणा, करी तो भोगी
हे सगळे करुनही रघुनाथराव पेशवा झालाच. माधवरावाच्या मृत्यूनंतर नारायणरावाचा खून करुन रघुनाथरावाने पेशवेप्राप्ती साजरी केली. आणि पहिल्या बाजीरावाची सून, मराठ्यांची भाग्यलक्ष्मी गोपिकाबाई पंचवटीस मठात राहून, हातात करवंटी घेऊन भीक मागून उदरपोषण करु लागली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भीष्माचे वय
महाभारत युद्धाच्या वेळी भीष्माचे वय काय असावे? जर एक पिढी २० वर्षांची धरली तर.
तरुण देवव्रत (२०) + विचित्रवीर्य (२०)+ धृतराष्ट्र/पंडु (२०)+ कौरव/पांडव (२०) + अभिमन्यु (२० लग्न झालेला) असे १०० वर्षे ठरते. यातील पंडु/धृतराष्ट्र यांना उशीरा मुले झाल्याचा उल्लेख आहे.
१०० हे अती वय धरले तर पीढीचा काळ १४-१६ आणावा लागतो.
प्रमोद
वाघ गेला आता सारी कोल्ही राहिली आहेत!-1
श्री. विनायक यांचा प्रतिसाद आणि श्री. चंद्रशेखर यांनी लिहिलेल्या ब्लॉगपोस्टातील मतांशी माझी मते काहीशी जुळत असली तरी, दुसऱ्या बाजीरावाचा कालखंड हा मराठी इतिहासातील सर्वात डागाळलेला काळ आहे यात काहीच शंका नाही. याला अर्थातच केवळ पेशवे जबाबदार नव्हते. सर्वच मराठी (ब्राम्हण व मराठे) सरदार कसे वागत होते याची माहिती अनेक पुस्तकांतून मिळते.
(खालील मुद्दे 'मराठी लावणी' या म.वा.धोंड यांच्या पुस्तकातून)
राजकीय स्थितीः
पानपतानंतर महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणून माधवरावासारखा माणसांची योग्य परीक्षा असलेला व त्यांच्याकडून कामे करुन घेणारा नेता लाभला. त्याने महादजी शिंदे, नाना फडणीस, गोपाळराव पटवर्धन, रामशास्त्री वगैरे कर्तबगार माणसांना पुढे आणले. निजामाचा दणदणीत पराभव केला, जानोजी भोसल्याचे बंड मोडून काढले आणि स्वार्थाकरता इंग्रजांशी संंगनमत करु पाहणाऱ्या राघोबाला आपल्या बाजूस वळवण्याचा प्रयत्न केला व त्यात अपयश आल्यावर त्याला कैदेतही टाकले. अवघ्या ११ वर्षांनी माधवराव मृत्यू पावला तेव्हा तत्कालीन एका पत्रलेखकाने "वाघ गेला! सारी कोल्ही राहिली आहेत. ईश्वरसत्ता प्रमाण!" असे उद्गार काढले आणि त्याची प्रचीती काही वर्षातच आली.
पुढे नानाने पुण्यात आणि महादजीने उत्तरेत पराक्रम गाजवून 'खूप शर्तीने राज्य राखले' असले तरी मराठेशाही आतून किडत चालली होती. नारायणरावाचा खून करुनही अपेक्षित राज्यप्राप्ती न झाल्याने रघुनाथराव इंग्रजांस मिळाला. नानाच्या चुलतभावाने (मोरोबा फडणीस) याने नानावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि बारभाईचे विसर्जन होऊन नानाच्या हाती कारभार आला. नाना कर्तबगार असला तरी सहकाऱ्यांचा विश्वास तो कधीच संपादू शकला नाही. सरदार व सैन्यात हेवेदावे-बेशिस्तपणा वाढीस लागला. सर्वत्र बेबंदशाही माजू लागली. याचे एक उदाहरण म्हणजे तुकोबा होळकराने बदामीस टिपू सुलतानाचा पराभव केला पण त्याच्या सैन्याने मराठी मुलखातच गावे लुटली, बायका नासवल्या रयतेची गुरे नेली. तुकोबा होळकर पेशव्यांच्या फौजेचा सेनापती म्हणून त्या लढाईवर गेला होता.
उत्तरेत प्रचंड पराक्रम करुन पानपताचे अपयश धुवून काढलेला महादजी पेशव्यांचे दर्शन घेण्यास पुण्यास यायला निघाला तेव्हा नानाने घाबरुन कॉर्नवालिसकडे सैन्याची मदत मागितली. महादजीच्या सैन्याने पुण्यात २० महिने तळ दिला, त्या काळात पुण्यात दुष्काळाचा भयंकर कहर चालू होता. पुण्यात पटकीचा धडाका सुरु झाला होता. आजाराने आणि भुकेमुळे कंगाल लोक रस्त्यात मरुन पडत होते. लोक आपल्या फिकिरीत होते त्यात शिंद्याच्या लष्कराचे पंचवीसएक हजार लोक आणखी पुण्यात आल्याने पुण्याचे लोक जास्तच चरफडले. या सर्व परिस्थिचीची तमा न बाळगता शिंदे व पेशवे 'पुणे ग्राम गोकुळ क्रीडले त्यांत कृष्ण श्रीमंत धनी' असे पवाडे रचवून घेण्यात व विलासात मग्न होते.
दोनच वर्षानी सवाई माधवरावाने आत्महत्या केली आणि स्वार्थ, हेवेदावे, परस्परसंशय, भ्याडपणा, कारस्थाने, कपट, फितुरी, विश्वासघात, अंदाधुंदी, खुनशीपणा, सूडबुद्धी, धर्मभोळेपणा, दक्षिणा, स्त्रैणता, स्वैराचार, नाचरंग, तमाशे या राष्ट्रीय दुर्गुणांना उधाण आले.
दुसरा बाजीराव गादीवर येण्यास पुणे दरबारातील सरदार, होळकर, सातारा-कोल्हापूरचे छत्रपती यांचा विरोध होता. त्यामुळे त्याने दौलतराव शिंद्याशी संधान साधून त्याला नानासह दोन कोटींची वरात दिली. दौलतराव शिंद्याने नानाला कैदेत टाकले आणि त्याचा उपासमार करणे, तापल्या तोफेवर विवस्त्र बसवणे असा अमानुष छळ केला. नानाच्या गटातील अप्पा बळवंत मेहेंदळे सारख्यांनी विषभक्षण करुन स्वतःची सुटका करवून घेतली. पण दौलतरावाने मृतांच्या नातेवाईकांचाही छळ केला. दौलतरावाने पुण्यास जे केले तेच पुढे त्याने ग्वाल्हेरास केले. स्वतःचा सेनापती नारायणराव बक्षी याच्या अंगास बाण बांधून बत्ती मारून आकाशात उडवले आणि ठार केले. का? तर 'बक्षीचा पक्षी केला' असा प्रास साधण्याकरिता.
ही मोठमोठ्या सरदार मंडळींची गत. सामान्य रयतेचे विलक्षण हाल झाले. वानवडीवर शिंद्यांची पलटणे होती. ते शहरावरच तोफा रोखून लोकांजवळ धान्य मागत आणि लोकांच्या घरात बेलाशक शिरुन दाणावैरण नेत.
या अंदाधुंदीच्या काळात बाजीरावसाहेबांनी शिंद्यांचा तगादा भागवण्याकरता पुण्यात पट्ट्यांचा सुळसुळाट केला होता १. कर्जपट्टी, २. सरंजामपट्टी, ३. वेतनपट्टी, ४. सावकारपट्टी, ५.उंबरेपट्टी, ६. भाडेपट्टी आणि कहर म्हणजे ७. संतोषपट्टी. ही संतोषपट्टी बाजीरावसाहेबांस पेशवाई मिळाली याकारण रयतेस संतोष झाल्याचे गृहीत धरून वसूल करण्यात येत होती.
व्यक्तीदोषाने प्रेरित होऊन बाजीरावाने अनेक खुनशी कृत्ये केली त्याचा त्रासही रयतेस भोगावा लागला. विठोजी होळकराचा अमानुष वध केल्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. "बापू गोखल्याने विठोजीस सरकारांत पाठविले. सरकारवाड्यात पोचताच त्याला बेडी तोडून ठार मारिला. दोनशे कमचा मारून लागलीच हत्तीच्या पायास बांधोन वोढविला" हा प्रसंग चालू असताना बाजीराव शनिवारवाड्याच्या वरच्या दिवाणखान्यातून या प्रसंगाचा तमाशा आनंदाने पाहत बसले होते. पुढे बाजीरावाने आपल्या दृष्टिसुखार्थ होळकराचा मुडदा तसाच चौकात चोवीस तास ठेवला .
मराठी साम्राज्याच्या विस्तारास आधी कारणीभूत ठरलेले शिंदे आणि होळकर आता उत्तरेत एकमेकांशी आधीच लढत असताना, एकमेकांचा मुलुख उद्ध्वस्त करत असण्यात रंगले असताना या प्रसंगाने यशवंतराव होळकर प्रचंड संतप्त होऊन पुण्यास येण्यास निघाला आणि त्याच्या फौजेने येताना मराठी प्रांतात विलक्षण धिंगाणा घातला. खानदेश प्रांताचे त्याच्या सैन्याने केलेले नुकसान पुढे पन्नास वर्षेपर्यंत भरुन निघाले नाही. दिवाळीच्या सुमारास यशवंतराव पुण्यात पोचला आणि बाजीराव पुण्यातून पळून वसईस गेला आणि कारभार इंग्रजांवर सोपवून मोकळा झाला.
ऐन दिवाळीच्या काळात यशवंतरावाने पुण्याला यमपुरीचा अनुभव दिला. दौलतरावाचे कौर्य फिके पडावे इतके कौर्य यशवंतरावाने पुण्याबाबत दाखवले. 'शहर गायीसारखे हळहळते' अशा स्वरुपाचे उतारे तत्कालीन अनेक पत्रात उपलब्ध आहेत.
मराठेशाहीचा कारभार इंग्रजांवर सोपवल्याचे बाजीरावासह कोणत्याच मराठा सरदारास आवडले नसले तरी सगळेजण इंग्रजांशी स्वतंत्रपणे लढले, होळकराने अनेकदा इंग्रजांस चोपलेही. मात्र अखेरीस प्रत्येकजण पराभूत झाला.
या सर्व घटनांनी सुरापूरकर, प्रतिनिधी, कोळी, पेंढारी, बेरड, रामोशी सर्वच टोळ्या बंड करुन उठल्या आणि स्वतःच्याच राज्यात लुटालूट करु लागल्या. आपल्या काखेत लहान मुलांना घेऊन बायकांनी नदीत जीव दिला.
(शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त केल्या आहेत)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पुणे ग्राम वस्ती, बहरली इष्काची कुस्ती! - 2
बाजीरावाच्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती
(सर्व मुद्दे 'मराठी लावणी' या म.वा.धोंड यांच्या पुस्तकातून)
तत्कालीन लावण्यांमध्ये मराठी समाजाची सामाजिक स्थिती लख्खपणे प्रतिबिंबित होते. रयत आणि राष्ट्र झपाट्याने अधोगतीला चालले असताना सरदार, कारभारी, सावकार इत्यादी व्यक्तिशः संपन्न होत चालले होते त्यामुळे
करितील काय हो अन्नाविण गांजली
हि दुनया सारी जठराग्नीत भाजली
अशा विपन्नतेसोबतच
हत्ती घोडे रथ अंबारी थवे पालख्यांचे
सरकार वाड्याभौताली झुलती बाहरीचे
जागोजाग वस्ती भरदार, गर्दी बाजार, कमती नसे काही
पुणे शहर अमोलिक रचना दुसरी नाही
असे संपन्नतेचे वर्णनही आढळते.
अनंतफंदी आणि परशुराम यांनी आपल्या लावण्यांमध्ये अनेक दुराचारांची वर्णने केली आहेत. अर्थात अनेक शाहीर हे पोटार्थी असल्याने त्यांनी श्रीमंतांकरिता आणि विलासिनींकरिता कवने रचली. याच काळात कामुकतेचे, स्त्रैणतेचे, व्यभिचाराचे, अनीतीचे, लोचटपणाचे एवढेच काय पण नपुंसकतेचे पवाडे रचन्यात शाहीर स्वतःला धन्य मानू लागले. (अनंतफंदीने एका लावणीत बत्तीस बाळ्यांचे वर्णन केलेले ऐकून परशरामाने तेहतीस बाळ्यांचे वर्णन करणारे कवन रचले. इतके दागिने सामान्य किंवा खानदानी घरांमध्ये घालण्याची पद्धत नव्हती हे सर्व प्रकार दागिन्यांनी मढून, भूषणांनी नटून प्रियकराची वाट पाहणाऱ्या विलासिनींची वर्णने आहेत.)
बाजीराव हा अशा सर्व रंगेलांचा बादशहा. बाजीरावास त्याच्या रंगेलपणात जो साथ करील त्यासच दरबारास स्थान होते. जो आपली रुपवान बायको वाड्यात पाठवील त्यावर मर्जी इतरांवर इतराजी. खंडेराव रास्त्याचा जो नाश झाला तो आपली बायको वाड्यावर पाठवत नाही म्हणून. खंडेराव रास्त्यानंतर माधवराव रास्त्याचाही तसाच छळ झाला. बापू गोखल्याला आधी बाजीरावाने त्रास दिला पण हळूहळू बापू गोखले आपल्या कुटुंबाची विटंबना करवून घेण्यास तयार झाल्याने बाजीरावाच्या मर्जीत आला. वाड्यात दोनतीनशे बायका नित्य न्हावयास येत असत. त्यांचा न्हावयाचा समारंभ दुपारपर्यंत चाले. जेवावयाची तयारी झाल्यावर इच्छेस येईल त्या वाड्यात बाजीरावाची स्वारी जात असे. पंक्तीच्या वेळी बायका त्याला सदासर्वकाळ जवळ बसलेल्या लागत. त्यामुळे आश्रित लोकांनी चारचार लग्ने करुन घरी एक बायको ठेवून बाकीच्या बायका वाड्यावर पाठविणे सुरु केली. याचकरिता अन्याबा राहतेकर वगैरे मंडळींनी जास्तीची लग्ने केली. अनेक अब्रूदार लोकांनी या काळी पुणे सोडणे पसंत केले. अशा प्रकारे रावबाजीच्या काळात सर्व गृहस्थांची घरे खराब झाली.
तरीही रावबाजीस कृष्णावतार म्हणणारे बहुत होते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो सदैव कामातुर स्त्रियांच्या घोळक्यात वावरत असे आणि त्याने हातात कधी शस्त्र धरले नाही. पुढे राज्य गेल्यावर तो हरिश्चंद्र, नळ आणि राम यांच्याही पंक्तीत जाऊन बसला. जशी यांना राज्ये परत मिळाली तशीच रावबाजीलाही मिळावी म्हणून शाहिरांनी रावबाजीची कृष्ण, नळ, राम यांच्याशी तुलना करणारी अनेक कवने रचली.
उदा. होनाजीच्या लावणीतील बाजीरावाच्या दरबाराचे वर्णन पाहा.
केवळ रत्नाची खाण, सुस्वरुप दिनमान, राजबीज पुतळा
मध्यभागी आपुण भोवत्या नाटकशाळा
शृंगार करुनी कामिनी, नित्य अवघ्याजणी, मिळून वेल्हाळा
एक आपल्या हाती एकांती चुरिती पदकमळा
एक आजूबाजू एक सन्मुख घाली डोळा
त्या मुशाफराच्या संगे भोगिती सोहळा
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बायकांचे सैन्य
तसाही विषय बाजीरावाच्या लग्नाच्या बायकांपासून बराच बाजूला गेला आहे तेव्हा 'मराठी लावणी' या पुस्तकातील एक रोचक उल्लेखही द्यावासा वाटतो.
एकंदर कालखंडात स्त्रियांना फालतू महत्त्व प्राप्त झाल्याने तत्कालीन स्त्रीजीवनातही बरेच बदल झाले जे शाहीरांच्या कवनांमध्ये आले आहेत. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने मंडळी बाजीरावाचे अनुकरण करण्यात मग्न झाल्याने स्वार्थी, स्वैराचारी, स्त्रैण व भ्याड झाल्याने स्त्रिया राजकारणे करु लागल्या व बेजबाबदार, बदफैली आणि पुरुषी बनल्या.
१. मल्हारराव होळकरांचा मुलगा तुकोजी स्त्रीलंपट निघाला आणि तुकोजीचा दत्तक मुलगा मल्हारराव-२ हा तर शुद्ध पेंढारी निघाला त्यामुळे अहिल्याबाईने जमेल तसे राज्य चालवले आणि प्रजेस उपाशी ठेवून कोट्यवधी पैसा केवळ स्वतःच्या लहरीखातर ब्राम्हणभोजनांसारख्या कार्यात तीस वर्षे पावेतो उडवून मराठी राज्याच्या मोक्षास हातभार लावला.
२. महादजी शिंद्याच्या मृत्यूनंतर दौलतरावाच्या हाती कारभार आल्यावर महादजीच्या विधवा बायका बंड करुन उठल्या आणि शेणवी सरदार व पठाणांसोबत येऊन सबंध महाराष्ट्रात लुटालूट करत हिंडू लागल्या.
३. पंतप्रतिनिधींची रखेल ताई तेलीण हिने पेशव्यांचा सेनापती बापू गोखले याला सतत आठ महिने युद्ध खेळून दमविले.
४. यशवंतराव होळकराची सुंदर, तरुण, शूर, क्रूर व दुर्वर्तनी रखेल तुळसाबाई हिने अमीरखान व गफूरखान या पठाण सरदारांशी संधान बांधून आपल्या मल्हारराव या पाच वर्षाच्या मुलाला गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला.
५. मिसेस जेम्स हॉस ऊर्फ जमालखान हिने खटपट करुन पुण्यात स्त्रीपलटण उभारली.
६. दौलतराव शिंद्याची बायको बायजाबाई हिने बटकींचे सैन्य गोळा केले होते तर दौलतरावाने स्त्री पहिलवानांचे. या स्त्रिया गावोगावी हिंडून पुरुषांना कुस्तीचे आव्हान देत. त्या इतक्या मजबूत होत्या की कोणी पुरुष त्यांजबरोबर कुस्ती खेळण्यास उभा राहत नसे.
उदा. परशरामाची एक लावणी
जशी हत्तीची छाया धुंद कैफांत सडक राहती
तशाच नवऱ्या निसंग होऊन शहरांमध्ये फिरती
सहज नटून रस्त्याने चालता उर उघडी छाती
बटकी दासी कसबिणी बऱ्या त्याहून चळल्या गरती
एक सारख्या झुंडी जमवून पाणवठ्याला जाती
बोलू नये ते विचकट बोलूनी मग पाणी भरती
या पार्श्वभूमीमुळे तत्कालीन अनेक लावण्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रीचीच कामातुरता जास्त वर्णिलेली आहे. तत्कालीन लावण्यांमधील स्त्री ही विरहिणी नसून 'कुणास करुनी नेत्रखुणा आणू घरात पाचारून' अशी पुरुषांची शिकार करणारी आहे. अनेक लावण्यांमध्ये स्त्रियांच्या व्यभिचाराला पावित्र्याचा मुलामा चढवून त्यांच्या निर्लज्ज व विकृत मनाचे चित्रण केले आहे (आडकाठी तुज जिवलगा रे केली कोणी, ये दिवसा जवळी नवऱ्यावाणी किंवा व्यभिचारपणाची आण, एकांती जाण, प्रियकराजवळ वाहिली) तर पुरुषांना दुधखुळा, शुकस्वामी, रडणारा असे हिणवण्यात आले आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लग्नाचे अधिकृत वय
लेखाला दिलेले सर्वच प्रतिसाद मी वाचले नाहीत, त्यामुळे मी खाली दिलेले संदर्भ चर्चेत आले होते की नाही, माहीती नाही. तरीही बहुतांश प्रतिसाद वाचता, लग्नाचे अधिकृत वय सध्या तरी ठिक आहे, असे गृहीत धरले जातेय की काय असे वाटले. खालील दुवा वाचल्यास अधिक माहिती मिळेल.
जगभरातील अनेक देशात आजही लग्न-संमतीचे वय १२ आहे. -
http://en.wikipedia.org/wiki/Age_of_consent